२००० सालची गोष्ट असेल.एका बुधवारी आम्ही माझ्या ऑफिसमध्ये आठवडाभराच्या कामांचं नियोजन करत होतो.तेवढ्यात भोसरीच्या एम.एस.ई.बी.ऑफिसमधून माकडाचा कॉल आला.माकडाचा कॉल म्हणजे माकडाने केलेला कॉल नव्हे,तर वस्तीत शिरलेल्या माकडाच्या बंदोबस्तासाठी नागरिकांनी केलेला कॉल! त्या दिवशी आम्ही सगळेच बिझी होतो.त्यामुळे त्या कॉलवर एकट्या नेवाळेला पाठवलं;पण नेवाळे माकडाला बरोबर न घेता फक्त परिस्थितीचा अंदाज घेऊन परतला. तेव्हाच लक्षात आलं की प्रकरण वेगळं आहे.भोसरीत फिरणारं हे माकड आमच्या मंकी हिलच्या माकडांसारखं बॉनेट जातीचं माकड नव्हतं.ते होतं लाल तोंडाचं हिसस जातीचं माकड.प्हिसस माकडांचं वास्तव्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये असतं.या माकडांची शेपूट आखूड असते.त्याचं तोंड आणि ढुंगण लालसर असतं.बॉनेट माकडापेक्षा ते स्वभावाने आक्रमक असतं.त्यामुळे त्याला पकडणं सोपं काम नव्हतं.दुपारी माकड पकडण्याचं सामान घेऊन आम्ही तयारीनिशी भोसरीला गेलो.
तेव्हा महाराजांना झाडावर चांगलीच डुलकी लागली होती.त्यांची वामकुक्षी पूर्ण होईपर्यंत तिथेच बसून राहिलो.
झोप झाल्यावर माकड झाडावरून खाली उतरलं.त्याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही एका ओट्यावर थोडी फळं ठेवली.त्या फळांकडे साफ दुर्लक्ष करून ते तीन पायांवर उड्या मारत कुठे तरी पसार झालं. त्याच्या गळ्याला बांधलेली साखळी त्याने पुढच्या उजव्या हाताला गुंडाळून घेतली होती. साखळी कुठे अडकू नये किंवा तिला धरून कुणी आपल्याला पकडू नये म्हणून त्या हुशार माकडाने ही युक्ती शोधून काढली होती.
थोड्या वेळाने पाहिलं,तर हातात साखळी गुंडाळलेल्या अवस्थेत ते माकड हायटेन्शन वायरच्या खांबावर चढताना दिसलं.त्यामुळे आमचंही टेन्शन वाढलं.इलेक्ट्रिकचा शॉक बसून मेलेली माकडं मी खूप वेळा पाहिली होती.आता या माकडाचा प्रवास त्याच दिशेने सुरू होता.त्याला हुसकावण्याचाही काही उपयोग होत नव्हता. खांबावर वरपर्यंत चढून ते थोडा वेळ थांबलं.
आम्हाला वाटलं,आता उतरेल खाली;पण उलट त्याने हवेत उंच झेप घेऊन थेट ट्रान्सफॉर्ममरवरच उडी मारली.हे सगळं उजव्या हातातला साखळीचा गोळा सांभाळत.त्या महाकाय ट्रान्सफॉर्ममरमधून आजूबाजूच्या कारखान्यांना वीजपुरवठा करणाऱ्या अजस्त्र वायरी जोडलेल्या होत्या. त्यातल्या एका जरी केबलला त्याचा किंवा त्याच्या हातातल्या साखळीचा स्पर्श झाला असता तर? कल्पनाच करवत नाही.खाली जमलेल्या शे-दीडशे बघ्यांबरोबर आमचीही भीतीने गाळण उडाली.
पण माकड मात्र अत्यंत शांत होतं.एखाद्या ज्ञानी योग्याप्रमाणे ते आत्मविश्वासाने फिरत होतं.नशिबाने थोड्या वेळाने ट्रान्सफॉर्मरचा नाद सोडून ते पुन्हा झाडावर येऊन विसावलं.खाली जमलेले बघे हळूहळू पांगू लागले.अंधार झाला आणि आम्हीही माघारी फिरलो.
दुसऱ्या दिवशी गुरुवार होता.भोसरी परिसरातल्या कारखान्यांच्या सुटीचा वार. गुरुवारी अनेकदा वीजपुरवठाही दिवसभर खंडित केला जातो.वीज- तारांजवळ वाढणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्याचं काम केलं जातं. त्यामुळे आज माकडाला धोका थोडा कमी होता. पार्कवरचं काम उरकून आम्ही दुपारी पुन्हा भोसरीला गेलो.काल ओट्यावर ठेवलेली फळं गायब झाली होती.ती माकडाने खाल्ली की आणखी कुणी लंपास केली कळायला मार्ग नव्हता.आज पुन्हा केळी आणि सफरचंद ठेवून आम्ही माकडावर लक्ष ठेवून लपून बसलो. मोठ्या रुबाबात गळ्यातली साखळी सांभाळत दोनच मिनिटांत ते माकड झाडावरून खाली उतरलं.
केळ्यांचा घड घेऊन ते पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मरवर जाऊन बसलं.तीन-चार केळी त्याने सोलून खाल्ली,उरलेली फेकून दिली आणि खाली येऊन सफरचंद घेऊन झाडावरच्या त्याच्या मुक्कामी जाऊन बसलं.
संध्याकाळपर्यंत खाली आलंच नाही.आम्ही पुन्हा एकदा माघारी निघालो.दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा भोसरी गाठलं.आज त्या माकडाला पकडायचं असं ठरवून आम्ही पिंजरा घेऊन गेलो होतो.आम्ही गेलो तेव्हा ते नेहमीप्रमाणे ट्रान्सफॉर्मरवरून उड्या मारत फिरत होतं.आम्ही तत्परतेने पिंजरा लावला.आमिष म्हणून त्यात सफरचंद लावलं. चांगली तीन वेळा ट्रायल घेतली.तीनही वेळा ट्रायल अयशस्वी झाली.माकड पकडण्यासाठी हा विशिष्टप्रकारचा पिंजरा आम्हीच विकसित केलेला होता.हा पिंजरा दीड फूट रुंद,दोन फूट उंच आणि तीन फूट लांब असतो.त्याच्या झडपेची उघडझाप वरच्या बाजूने होते. पिंजऱ्याच्या वरच्या बाजूला एक सरकती सळई असते.लोखंडी पिंजऱ्याच्या आतमध्ये जाणारा एक हुक तिच्या एका टोकाला जोडलेला असतो. त्यावर एखादं फळ घट्ट दाबून अडकवायचं. सळईच्या दुसऱ्या टोकाशी झडप जोडलेली असते.झडपेला एका स्प्रिंगने ताणून सळईच्या दुसऱ्या टोकाच्या तोंडाशी अलगद उघडून लॉक करायचं असतं.फळाच्या आमिषाने माकड आत घुसून फळ ओढू लागतं,तेव्हा सळईच्या दुसऱ्या टोकामधून झडप मोकळी होऊन स्प्रिंगच्या ताकदीने मिटली जाते आणि बंद होते. पिंजऱ्याच्या आकारात आणि आमिषाच्या प्रकारात थोडेफार बदल करून अशाप्रकारे प्राणी पकडता येतात.तो पिंजरा लावला आणि आम्ही परत पार्कवर आलो.माकड अडकलं की आम्हाला फोन करा,असं आसपासच्या लोकांना बजावून ठेवलं.दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत भोसरीतून फोन आला नाही म्हणून तिथे गेलो,तर पिंजरा रिकामाच होता.
दरम्यान,माकडाने जवळच्या वस्तीत आणि शाळेत धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. मुलांच्या डब्यांतील खाऊ पळवणं,मुलींच्या वेण्या ओढणं,
बोचकारणं असे उद्योग सुरू होते.त्यानंतर चार दिवस झाले तरी माकड काही त्या पिंजऱ्याकडे फिरकलं नाही.अनेक आमिषं बदलून पाहिली;माकड काही केल्या पिंजऱ्यात येईना.चार-पाच दिवस असेच गेले.मर्कटलीला वाढू लागल्या.शेवटी त्याला भुलीचं इंजेक्शन देऊन पकडण्याशिवाय पर्याय उरला नाही.हे इंजेक्शन पंचवीस-तीस फुटांवरून देता येतं. यासाठी विशिष्ट प्रकारची फुंकनळी वापरली जाते.तिला ब्लो-पाइप म्हणतात.
त्यामुळे औषधासहित अख्खी सिरींज प्राण्यापर्यंत पोहोचते आणि टोकदार पोकळ सुईतून भुलीचं औषध हवेच्या दाबाने प्राण्याच्या शरीरात टोचलं जातं.एकदा ठरल्यावर सगळी तयारी करून भोसरी गाठलं.माकड त्याच्या नेहमीच्या झाडावर बसलं होतं.पशुवैद्यांच्या सूचनेनुसार भुलीचं औषध भरून मी सिरींज ब्लो-पाइपमध्ये लोड केली.माकड बेसावध आहे,असं बघून नेम धरून फुंकली;पण तेवढ्या वेळात काही तरी वेगळं घडतंय हे त्या चलाख माकडाला कळलं.सिरींज फुंकताना मी त्याच्या खांद्याचा नेमका वेध घेतला होता;पण सिरींज खांद्यापर्यंत पोहोचण्याआधी माकडाने अत्यंत चपळाईने खाली उडी मारली. सिरींज खांद्याला लागण्याऐवजी झाडात शिरली. आम्हाला हुलकावणी देण्यात माकड पुन्हा एकदा यशस्वी झालं.पिंजरा आणि भुलीचं इंजेक्शन हे दोन्ही प्रयत्न माकडाने हाणून पाडले होते.आजवर मी अनेक माकडं पकडली,पण याच्याएवढं हुशार माकड कधी भेटलं नव्हतं.ते आम्हाला आता चांगलंच ओळखू लागलं होतं. आमची गाडी दूरवर दिसली तरी ते आम्ही पोहोचू शकणार नाही एवढ्या उंचीवर जाऊन आमची गंमत बघत असे.दरम्यान,आता या माकडाच्या कारवाया शहरभर समजू लागल्या होत्या.वन विभागाबरोबरच आयुक्तांकडेही तक्रारी होऊ लागल्या होत्या.पालिकेच्या जनरल बॉडीमध्येही हा विषय निघाला आणि एक साधं माकड पकडू शकत नसल्याबद्दल आमच्यावर खूप टीकाही झाली.आम्ही तर पूर्णच हताश झालो होतो.
अशातच एक आशेचा किरण दिसला.मिरजेमध्ये शेख आडनावाचे काही मुस्लिम बांधव माकड पकडण्यात तरबेज असल्याचं समजलं.त्यांच्यापैकी शब्बीर हनीफ शेख यांच्याशी फोनवर चर्चा झाली.
थोडीफार घासाघीस करून माकड पकडण्यासाठी ते तयार झाले.वरिष्ठांच्या आणि वन विभागाच्या परवानगीने मी त्यांच्यावर हे काम सोपवलं.शब्बीर शेख यांच्याकडे माकड पकडण्याची कला कुठून आली ही एक वेगळीच गोष्ट.थोडं विषयांतर करून थोडक्यात सांगतो.नाथ संप्रदायातील एक योगी काही काळ मिरजेत मुक्कामी होते.गाव सोडून निघताना त्यांना अवगत विद्या त्यांनी गावकऱ्यांना शिकवल्या. माकड पकडण्याची विद्या शिकायला कोणीही हिंदू बांधव पुढे आला नाही.शेख कुटुंबीयांनी मात्र ती शिकण्याची तयारी दर्शवली,असं शब्बीर शेख यांच्याकडून कळलं.
शब्बीरभाईंनी आल्यावर माकडाची सगळी चौकशी केली.आम्हीही छोटे छोटे तपशील त्यांना सविस्तर सांगितले. ते म्हणाले, "हे नक्कीच अतिशय हुशार माकड आहे.त्यामुळे तुमच्यापैकी कुणीही त्याला माझ्यासोबत दिसता कामा नये. काय करायचं ते मी करेन." म्हटलं,
मान्य.दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना घेऊन भोसरी गाठली. मुक्कामाच्या बरीच अलीकडे गाडी थांबवली. भरभर चालत शब्बीरभाई पुढे निघाले.त्यांनी आम्हालाही थोडं लांबून त्यांच्या मागे येत राहण्याची खूण केली.
आम्हाला पाहून माकड इकडे-तिकडे उड्या मारू लागलं.पण शब्बीरभाई आमच्यासोबत आहेत हे मात्र त्याला कळलं नाही.शब्बीरभाईंनी बऱ्याच वेळ त्या माकडाचं निरीक्षण केलं आणि आम्ही पार्कवर परतलो. परतल्यावर पुन्हा चर्चा सुरू.शब्बीरभाई म्हणाले, "माकड चालाक आहे.एकदा का माझा प्रयत्न फेल गेला,तर नंतर ते माकड कोणाच्या बापालाबी हाती लागणार न्हाई.तेव्हा एक-दोन दिवस मी फक्त वॉच ठेवतो आणि बराबर टायमाला पकडतो." त्यांच्या प्लॅनला हो म्हणण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता.
शब्बीरभाईंनी पार्कवरच मुक्काम केला. भोसरीला ते बसने जात-येत.आम्ही आमिषासाठी त्यांना फळं,काजू,
बदाम,पिस्ते वगैरे देऊ केलं;पण त्यांनी हसून ते सगळं बाजूला ठेवलं.तिसऱ्या दिवशी त्यांनी लाकडी फळ्या एकमेकांना जोडून छोटासा तात्पुरता पिंजरा तयार केला आणि भाड्याचा टेम्पो घेऊन माकडाकडे गेले.आम्ही खूप लांबवरच गाडी थांबवून ते काय करतात पाहत होतो.
त्यांच्या हातात एक मक्याचं कणीस होतं.कणीस पुढे करत ते थेट माकडासमोरच जाऊन उभे राहिले. त्यांनी तयार केलेला पिंजरा तिथेच बाजूला ठेवला होता;पण ते नटखट माकड पळून जाण्याऐवजी आज्ञाधारक मुलासारखं त्यांच्यासमोर आलं.माकडाशी ते काही तरी बोलत होते.माकडाने एकदाच बावरून इकडे-तिकडे पाहिलं आणि ते शब्बीरभाईंच्या आणखी जवळ आलं.
त्यांनी माकडाला पिंजऱ्यात जाण्याची खूण केली.
कदाचित तोंडानेही काही बोलत असावेत.माकड पटकन पिंजऱ्यात शिरलं.बक्षीस म्हणून त्यांनी हातातलं कणीस त्याला दिलं आणि पिंजऱ्याचं फळकुट बंद केलं.
आमच्याकडे पाहून ते हसले आणि म्हणाले, 'गब्बरसिंग मिल गया!' पुढे त्याचं नाव गब्बरसिंगच पडलं.आमच्या पार्कवरचं ते पहिलं 'न्हिसस' माकड! शब्बीरभाईंनी त्याच्यावर कोणती जादू केली ते आम्हाला कळलं नाही.
त्यांच्या गुरूने शिकवलेल्या विद्येचं गुपित ते आम्हाला सांगणार नाहीत,हे उघडच होतं. कदाचित देहबोली आणि थेट संवाद यातून त्या माकडाला काही संदेश गेला असावा. कोण जाणे!