जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बँकॉकच्या प्रशस्त विमानतळाचे नाव आहे -सुवर्णभूमी विमानतळ.या विमानतळात प्रवेश केल्यावर सर्व प्रवाशांचे लक्ष आकृष्ट करते ती एक भली मोठी कलाकृती आपल्या पुराणात वर्णन केलेल्या समुद्रमंथनाची..! या कलाकृतीभोवती फोटो आणि सेल्फी घेणाऱ्यांची एकाच झुंबड उडालेली असते.याच सुवर्णभूमी विमानतळावर,थोडं पुढं गेलं की एक भला मोठा नकाशा लावलेला आहे. साधारण हजार,
दीड हजार वर्षांपूर्वीचा हा नकाशा आहे.'पेशावर' पासून तर 'पापुआ न्यू गिनी 'पर्यंत पसरलेल्या ह्या नकाशाच्या मध्यभागी ठसठशीत अक्षरात लिहिलंय इंडिया.!आणि याचं नकाशात सयाम (थायलंड) ला ठळक स्वरूपात दाखवलंय.अर्थात हा नकाशा उच्च स्वरात सांगतोय 'अरे,कोणे एके काळी ह्या विशाल पसरलेल्या भारतीय संस्कृतीचा सयाम (थायलंड) हा एक हिस्सा होता आणि आम्हाला त्याचा प्रचंड अभिमान आहे !!'
जवळजवळ साऱ्याच दक्षिण पूर्व आशियामधे ही भावना आढळते.आपल्या राष्ट्रध्वजात हिंदू मंदिराचे चिन्ह अभिमानाने बाळगणारा कंबोडिया तर आहेच.पण गंमत म्हणजे या भागातला एकमात्र इस्लामी देश आहे - ब्रुनेइ दारुस्सलाम. ह्या देशाच्या राजधानीचं नाव आहे - बंदर श्री भगवान.हे नाव 'बंदर श्री 'भगवान' ह्या संस्कृत नावाचा अपभ्रंश आहे.पण इस्लामी राष्ट्राच्या राजधानीच्या नावात 'श्री भगवान' येणं हे त्यांना खटकत तर नाहीच, उलट त्याचा अभिमान वाटतो.जावा,सुमात्रा,मलय,
सिंहपूर,सयाम, यवद्वीप इत्यादी सर्व भाग, जे आज इंडोनेशिया, मलेशिया,सिंगापूर,थायलंड,कंबोडिया,
विएतनाम वगैरे म्हणवले जातात, त्या सर्व देशांवर हिंदू संस्कृतीची जबरदस्त छाप आजही दिसते.
दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतातले हिंदू राजे ह्या प्रदेशात गेले.त्यांनी फारसे कुठे युद्ध केल्याचे पुरावे सापडत नाहीत.उलट शांततापूर्ण मार्गांनी,पण समृद्ध अशा संस्कृतीच्या जोरावर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया हा हिंदू विचारांना मानू लागला.
आता इतक्या मोठ्या प्रमाणावर जर हिंदू राजे, त्यांचे सैनिक,सामान्य नागरिक दक्षिण-पूर्व आशियात गेले असतील तर ते कसे गेले असतील..? अर्थातच समुद्री मार्गाने.म्हणजेच त्या काळात भारतामधे नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत अवस्थेत असेल.त्या काळातील भारतीय नौकांची आणि नावाड्यांची अनेक चित्रं,शिल्पं कंबोडिया,
जावा,सुमात्रा,बालीमधे मिळतात. पाचशेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जाणाऱ्या नौका त्या काळात भारतात तयार व्हायच्या. एकूण समुद्रप्रवासाची स्थिती बघता,
त्या काळात भारतीयांजवळ बऱ्यापैकी चांगले दिशाज्ञान आणि समुद्री वातावरणाचा अंदाज असला पाहिजे.अन्यथा त्या खवळलेल्या समुद्रातून, आजच्यासारखा हवामानाचा अंदाज आणि दळणवळणाची साधनं नसतानाही इतका दूरचा पल्ला गाठायचा,त्या देशांशी संबंध ठेवायचे, व्यापार करायचा,भारताचे 'एक्स्टेन्शन' असल्यासारखा संपर्क ठेवायचा... म्हणजेच भारतीयांचं नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत असलंच पाहिजे.
१९५५ आणि १९६१ मधे गुजराथच्या 'लोथल'मधे पुरातत्त्व खात्याद्वारे उत्खनन करण्यात आले.लोथल अगदी समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं नाही,तर समुद्राची एक चिंचोळी पट्टी लोथलपर्यंत आलेली आहे.मात्र उत्खननात हे दिसले की सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी लोथल हे अत्यंत वैभवशाली बंदर होते.तेथे अत्यंत प्रगत आणि नीट नेटकी नगररचना वसलेली आढळली.पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोथलमधे जहाजबांधणीचा कारखाना होता, असे अवशेष सापडले.लोथलहून अरब देशांमधे, इजिप्तमधे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालायचा याचे पुरावे मिळाले.साधारण १९५५ पर्यंत लोथल किंवा पश्चिम भारतातील नौकानयन शास्त्राबद्दल फारसे पुरावे आपल्याजवळ नव्हते. लोथलच्या उत्खननाने या ज्ञानाची कवाडं उघडली गेली.पण यावरून असं जाणवलं की, अगदी समुद्रकिनाऱ्यावर नसणारं लोथल जर इतकं समृद्ध असेल आणि तिथे नौकानयनाच्या बाबतीत इतक्या गोष्टी घडत असतील तर गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील बंदरांमधे याहीपेक्षा सरस आणि समृद्ध संरचना असेल.
आज ज्याला आपण नालासोपारा म्हणतो, तिथे हजार / दीड हजार वर्षांपूर्वीपर्यंत 'शुर्पारक' नावाचे वैभवशाली बंदर होते.तिथे भारताच्या जहाजांबरोबर अनेक देशांची जहाजं व्यापारासाठी यायची. तसंच दाभोळ,तसंच सुरत.
पुढे विजयनगर साम्राज्य स्थापन झाल्यावर त्या राज्याने दक्षिणेतील अनेक बंदरं परत वैभवशाली अवस्थेत उभी केली आणि पूर्व व पश्चिम अशा दोन्ही दिशांमध्ये व्यापार सुरू केला.मेक्सिकोच्या उत्तर पश्चिम टोकाला,म्हणजेच 'दक्षिण अमेरिकेच्या' उत्तर टोकाला जिथे समुद्र मिळतो,तिथे मेक्सिकोचा युकाटान प्रांत आहे. या प्रांतात त्यांच्या पुरातन 'माया' संस्कृतीचे अनेक अवशेष आजही मोठ्या प्रमाणावर जपून ठेवलेले आहेत.याच युकाटान प्रांतात जवाकेतू नावाच्या जागी एक अति प्राचीन सूर्यमंदिर अवशेषांच्या रूपात आजही उभे आहे.या सूर्य मंदिरात एक संस्कृतचा शिलालेख सापडला,
ज्यात शक संवत ८८५ मधे 'भारतीय महानाविक' वूसुलीन येऊन गेल्याची नोंद आहे.!
रॉबर्ट बेरोन वोन हेन गेल्डर्न (१८८५ - १९६८) या लांबलचक नावाचा नामांकित ऑस्ट्रियन एंथ्रोपोलोजिस्ट होऊन गेला.हा विएन्ना विद्यापीठात शिकला.पुढे १९१० मध्ये भारत आणि ब्रह्मदेशाच्या दौऱ्यावर आला.
भारतीयांच्या प्रगत ज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल वाटले म्हणून त्याने अभ्यास सुरू केला.
त्याने दक्षिण-पूर्व देशांबद्दल प्रचंड संशोधन केले.आणि त्याच्या पूर्ण अभ्यासाअंती त्याने ठामपणे असे मांडले की,भारतीय जहाजे,कोलंबसच्या कितीतरी आधी मेक्सिको आणि पेरूमधे जात होती!भारतीय नौकांचा प्रवास विश्वव्यापी होत होता.याचा यापेक्षा दुसरा कुठला स्पष्ट पुरावा हवा आहे..? आणि तरीही आम्ही म्हणत राहणार की अमेरिकेला कोलंबसने शोधलं आणि भारताचा 'शोध' वास्को-डी-गामा ने लावला.!! (भारतीय ज्ञानाचा खजिना - प्रशांत पोळ) मुळात वास्को-डी-गामा हाच भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला.
हरिभाऊ (विष्णू श्रीधर) वाकणकर हे उज्जैनचे प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता.भारतातील सर्वांत प्राचीन वसाहतीचा पुरावा म्हणून ज्या 'भीमबेटका' गुहांचा उल्लेख होतो,त्या डॉ.वाकणकरांनीच शोधून काढलेल्या आहेत.
डॉ.वाकणकर त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात इंग्लंडला गेले होते.तिथे एका संग्रहालयात त्यांना वास्को-डी-गामाची दैनंदिनी ठेवलेली दिसली.ती त्यांनी बघितली आणि त्याचा अनुवाद वाचला.त्यात वास्को-डी-गामाने तो भारतात कसा पोहोचला याचे वर्णन केले आहे.वास्को-डी-गामाचे जहाज जेव्हा आफ्रिकेतील जान्जीबारला आले,तेव्हा त्याने तिथे त्याच्या जहाजाच्या तिप्पट आकाराचे मोठे जहाज बघितले.
उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..