* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जाणून घेऊ काही नोंदी...! Let's know some records..|

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

४/२/२४

जाणून घेऊ काही नोंदी...! Let's know some records..|

वाळवी,मुंगी-मुंगळे,मधमाशा हे आहेत तीन सर्वांहून प्रगत संघप्रिय कीटक.ह्यांच्यात आघाडीवर आहेत आग्या माशा - या आकाराने सर्वात मोठ्या मधमाशा.ह्या दरडींवर,

झाडांवर, मोठ्या इमारतींच्या वळचणीला मोठमोठी पोळी बांधतात.त्यांच्या पोळ्यांतल्या मधाच्या साठ्यावर डल्ला मारायला अस्वले,माणसे सरसावतात.या शत्रूवर आग्या माशा हल्ला करतात.त्यांना नांगीने डंख करतात.ती नांगी तुटते.त्याबरोबर कोथळा बाहेर पडून त्या मृत्युमुखी पडतात.पण असे आत्मघातकी हल्ले चेवाने करतात.

मधमाशा फुलांतल्या मधावर,परागांवर उपजीविका करतात.तो गोळा करण्यासाठी लांब-लांब जायला त्यांची तयारी असते.त्यात भरपूर कष्ट असतात.कदाचित जिवाला धोका असला,तरी त्यांना पर्वा नसते.तेव्हा एखादे झाड कित्येक किलोमीटर दूर अंतरावरही फुलले तरी तिकडे धाव घेतात.असे समृद्ध अन्नस्रोत बरोब्बर कुठे आहेत हे एकीला कळल्यावर बाकीच्या भगिनीमंडळाला ते ठिकाण व्यवस्थित सांगता आले तर मोठ्या झुंडीने तिथे पोचून मध-पराग गोळा करणे फारच लाभदायक ठरणार,

अशी माहिती एकमेकींना नेटकेपणे पुरवण्यासाठी मधमाशांनी एक प्रतीकात्मक नाचबोली विकसित केली आहे. एखादे घबाड सापडून तिथून मध,पराग गोळा करून एखादी मधमाशी पोळ्यावर परतली की ती पोळ्याच्या पृष्ठभागावर नाचायला लागते. तिचा उत्साह पाहात,त्याने आकर्षित होऊन दुसऱ्या मधमाशा तिची नक्कल करत,तिच्या मागेमागे स्वतःही नाचतात.या नाचाच्या दिशेतून मधाच्या स्रोताची दिशा कळते - कारण या स्रोताचा आणि सूर्याकडे पाहिल्यास सूर्याच्या दिशेचा जो कोन होतो,तो नाचाच्या दिशेशी नेटकेपणे जोडलेला असतो.नाचताना मधमाशा आपला पृष्ठभाग हलवत असतात.या कंबर घुसळण्याच्या वेगाचा आणि किती अंतरावर मधाचा स्रोत आहे याचाही संबंध नेटकेपणे जोडलेला असतो.मूळ स्रोत सापडवणारी माशी नाचत असताना तिने आणलेला मध,पराग यांच्या सुगंधावरून हे कोणत्या जातीचे झाड आहे याचाही अंदाज येतो. अशा त-हेने मागे-मागे नाचून इतर मधमाशा हा नवा, आकर्षक स्रोत कसला, कोणत्या दिशेला, किती अंतरावर आहे हे ताडतात आणि तडक तो हुडकायला निघतात.


सामान्यतः प्राण्यांचे संदेश इथे आणि आत्ता पुरते मर्यादित असतात.त्यांच्यात जास्त खोलवर अर्थ फार क्वचित दिसून येतो.पण मधमाशांच्या नाचबोलीतून त्या बऱ्याच वेळापूर्वी सापडलेल्या,दूरवरच्या मध-

परागांच्या स्रोताची माहिती एकमेकींना पुरवतात.हे साधू शकते कारण मानवी भाषेप्रमाणेच मधमाशांची नाचबोली ही एक सांकेतिक भाषा आहे. 


आपल्या भाषेत वेगवेगळे आवाज आणि अर्थ यांचा असाच सांकेतिक संबंध जोडलेला असतो. दोन वेगळ्या भाषांत एकाच ध्वनीचा अगदी वेगळा अर्थ असू शकतो.तो ठराविक संबंध संकेताची माहिती असल्यानेच समजतो. मी कर्नाटकात प्रथम गेलो आणि कानडी भाषा शिकण्याचा मनापासून प्रयत्न करायला लागलो. तेव्हा एका शब्दाने चक्रावलो.एका विद्यार्थिनींच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती.मुली जोरात उत्साहात भाषणे करत होत्या. सगळ्या मधूनमधून जोरात म्हणायच्या - हागु,हागु,

कानडीत हागु म्हणजे तसेच,मराठीत तर विष्ठा आणि हेच दोन ध्वनी उलट्या क्रमाने म्हटले, गुहा,तर त्याचा अर्थ आणखीच वेगळा.सगळे ध्वनी केवळ चिन्हे,खुणा,

निशाण्या आहेत. रूढीने त्यांना वेगवेगळे अर्थ चिकटतात. माणसाच्या दहा कोटी वर्षे आधी मधमाशा असे संकेत वापरू लागल्या होत्या!


मोराचा ह्या कसा पिसारा फुलला ?


आजन्म ब्रह्मचर्य पत्करलेल्या,आत्मसमर्पण करणाऱ्या कामकरी मुंग्या मधमाशांचे जनुक निसर्ग निवडीत का टिकून राहतात ह्या डार्विनच्या पहिल्या कूटप्रश्नाचा असा अंशत: उलगडा झालेला आहे.त्याला दुसरे गूढ वाटत होते ते होते मोराच्या पिसाऱ्याचे लोढणे काही धोका डोकावला तर सुटसुटीत लांडोरी चट्कन् उडू शकतात.पण मोरांना हे जमत नाही.त्यांना धावपट्टीवरच्या विमानासारखे पळत जाऊन,वेग घेऊन मगच उडता येते. 


शिवाय दर वर्षी एवढी पिसे वाढवण्यात भरपूर शक्ती वाया जाते.निसर्ग ही उधळपट्टी का सहन करतो? डार्विननी सुचवले की लांडोरी भला मोठा पिसारा फुलवणाऱ्या मोराकडे जास्त आकर्षित होत असाव्यात.स्वयंवरात अशा विशालपुच्छ मोरांना इतरांहून अधिक बायका मिळत असणार,आणि म्हणून जरी त्यांना मृत्यूचा जास्त धोका असला तरी त्यांचे गुणधर्म पुढच्या पिढीत अधिक प्रमाणात उतरत असणार. डार्विनच्या शब्दात अशी 'लैंगिक निवड' 'निसर्ग निवडी'वर मात करताना दिसते.(मधुमक्षिका,वारूळ पुराण नंदा खरे )


पण लांडोरी निष्कारण स्वतःचा जीव धोक्यात लोटण्याचा वेडगळपणा करणाऱ्या मोरांकडे का आकर्षित होतात ? आमोट्झ झहावी नावाच्या इस्रायली शास्त्रज्ञाने ह्याचे रहस्य समजावून दिले आहे.तो म्हणतो की लांडोरींना असे विशालपुच्छ मोर भावतात कारण त्यांचे भलेमोठे पिसारे हे ते भरभक्कम नर आहेत असे सिद्ध करतात. त्याच्या ह्या मांडणीला लोढण्याचा किंवा जोखडाचा सिद्धान्त अथवा धुरातत्त्व - handicap principle असे नाव दिले गेले आहे.कमकुवत नरांना मोठे लोढणे वाढवणे, पेलणे कुठून जमणार? इतर काही सोंगे घेता येतील,पण प्रचंड पिसारा बाळगायचे सोंग घेता येणार नाही - मोठा पिसारा हे बळकटपणाचे लक्षण असणारच.मोरांच्या स्वयंवरात लांडोरी ठरवतात की भपकेदार पिसारा फुलवणारा मोर सगळ्यात दणकट असला पाहिजे,अशा जोडीदाराचे आनुवंशिक गुण आपल्या पिल्लांत उतरले पाहिजेत,अन् त्याला पसंत करतात.जरी अशा मोराच्या डोईवर मोठा भार असला तरी त्याला भरपूर जोडीदारणी मिळाल्याने असे तोऱ्यात दिमाख दाखवणारे सौंदर्य जीवसृष्टीत फैलावत राहतो.थव्यात - घोळक्यात राहणाऱ्या सगळ्या पशु-पक्ष्यांत मोरासारखीच इतरांवर कुरघोडी करण्याची खटपट अखंड चालू असते. कारण ह्यात सरशी होणारे प्राणी जगण्या-फळण्यात जास्त यशस्वी ठरतात.म्हणून समाजप्रिय पशू असे सच्चे संदेश पुरवणारी नानाविध लोढणी गळ्यात बाळगून वावरत असतात - त्यांचा भपका ऐटीने मिरवत फिरत असतात.मोरांकडून धडे घेऊन थिओडोर व्हेब्लेन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने मानवाच्या चंगळवादी जीवन शैलीचे इंगित आपल्याला समजावून दिले आहे.व्हेब्लेन म्हणतो की हातात अतोनात पैसे खुळखुळायला लागले की माणसाला आपल्याला खरेखुरे उपयोगाचे काय आहे याचा विसर पडतो.त्याच्या डोक्यात येते की जगातले खरे सौंदर्य आहे दिमाखात,जीवनातली खरी खुमारी आहे दुसऱ्याला हिणवण्यात.मग तो आपण किती श्रीमंत आहोत,बेपर्वाईने किती अपव्यय करू शकतो हेच दाखवण्याच्या मागे लागतो.मानवी समाजात मोठी जोखीम सांभाळणाऱ्यांना धुरंधर असे बिरुद दिले जाते. गुरुचरित्रात सरस्वतीगंगाधर म्हणतो ना : होईल सुख संसारी । राज्य दिधले धुरंधरी ।। धुरंधरचा शब्दश: अर्थ आहे जोखड पेलणारा,लोढणे ओढणारा.असे लोढणे वागवण्यातून प्रतिष्ठा लाभते. संदेश : खरे आणि खोटे


प्राण्यांच्या जगातही फसवाफसवी चालतेच. सगळ्याच फुलपाखरांच्या थोड्या जातीच खास आकर्षक रंगांनी नटलेल्या असतात.ह्या एक तर असतात विषकन्या,नाही तर मायावती ! सुरवंटांपासून आपला बचाव करण्यासाठी रुईसारख्या काही वनस्पती विषारी चीक,किंवा इतर विषारी रसायने बनवतात.अशा वनस्पती बहुतेक जातीची फुलपाखरे टाळतात.पण असेही बहाद्दर सुरवंट आहेत,की जे हे विष सहन करू शकतात.म्हणजे पचवत नाहीत,पण आपल्या शरीरात साठवून ठेवतात.हे साठवलेले विष प्रौढ फुलपाखरांच्या शरीरात उतरते,आणि त्यामुळे कीटक

भक्षक पक्षीही त्यांच्या वाटेस जात नाहीत.मग अशा जातींत जोडीदारांना आकर्षित करून घेण्यासाठी रंगीबेरंगी बनले तरी पक्षी-सरड्यांना बळी पडण्याची किंमत मोजावी लागत नाही.पण निसर्ग संधिसाधू आहे.विषारी फुलपाखरे पक्ष्यांच्या तावडीतून सुटतात म्हटल्यावर त्यांच्या सारख्याच दिसणाऱ्या,पण बिनविषारी तोतयांचीही उत्क्रांती सुरू झाली.ह्या तोतयांना असतो दुहेरी फायदा,विष साठवायचे कष्ट नाहीत,तरीही शत्रूपासून बचाव होतो.ह्या सुंदऱ्या विषारी नाहीत,पण मायावी आहेत.काही डोकेबाज माकडांनी खोटे संदेश देण्यात ह्यापुढे मजल मारली आहे.माझे मित्र राणा सिन्हा ह्यांनी लालतोंड्या माकडांचा खोलात अभ्यास केला आहे.एकदा ते त्यांच्यातल्या एका प्रेमाच्या त्रिकोणाचे निरीक्षण करत होते.दोन नर एका माजावर आलेल्या मादीला वश करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.शेवटी तिने एकाच्या बाजूने कौल दिला.


दुसरा नर निराश होऊन झाडावर चढला.आणि त्याने काय केले?त्याचा प्रतिस्पर्धी आणि त्या मादीचे मीलन सुरू होणार,तेवढ्यात त्याने जोरात बिबट्या आला रे आला,अशी धोक्याची आरोळी दिली.बिचारे प्रेमी सैरावैरा दोन दिशांनी दोन वेगवेगळ्या झाडांवर चढायला धावले.आणि हे महाशय? आपण शांतपणे झाडावरून उतरले!जर त्याला खरेच बिबट्या आला अशी आशंका असती तर तो कधीच झाडावरून उतरला नसता.उलट आणखी शेंड्यावर गेला असता. तो चक्क थापा मारत होता..!