* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जेरिमिया इतिहासातील युद्धविरोधी… Anti-War in Jeremiah History...

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/२/२४

जेरिमिया इतिहासातील युद्धविरोधी… Anti-War in Jeremiah History...

जेरिमियाचा खटला झाला.सुरू झाला.न्यायाधीशासमोर तो उभा होता.त्याच्यावर ज्यांनी आरोप लादले होते,

त्यांच्यासमोर तो उभा होता. बोललेल्या शब्दांपैकी एकही शब्द मागे घ्यावयास तो तयार नव्हता.परंतु जे न्यायाधीश होते,त्यांचा जे आत्मा राजाच्या आत्म्यापेक्षा अधिक उदात्त होता.त्या धर्मात्म्याचे अलौकिक धैर्य पाहून ते विरघळले.

त्या महान संस्फूर्त पुरुषाने न्यायाधीशांना आपलेसे केले.त्यांनी दोषमुक्त ठरविले.


काही काळ जेरिमिया जेरुसलेम सोडून स्वतःच्या जन्मगावी जाऊन राहिला.परंतु तिथेही त्याला शांती नव्हती.त्याच्या क्रांतिकारक जहाल मतांमुळे भटभिक्षुक त्याच्यावर दातओठ खात होते.त्या भटभिक्षुकांनी काही गुंड हाताशी धरले. एकदा जेरिमिया एकटाच जात होता.रस्त्यात कोणी नव्हते.त्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला.जेरिमिया मोठ्या मुश्किलीने वाचला.तो कसातरी जिवानिशी सुटला.पॅलेस्टाईनमधील संस्कृतिसंरक्षक,नीतिधर्मरक्षक निराश झाले. परंतु त्यांनी जेरिमियाचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी जेरिमियाच्या घरातील नोकरांना वश करण्याचे प्रयत्न केले.

जेरिमियाच्या अत्रात विष कालवले जावे,म्हणून त्यांनी उद्योग केले.परंतु तो कट जेरिमियाच्या लक्षात आला आणि तो वेळीच वाचला.तो पुन्हा जेरुसलेमला आला.


आपल्या देशबांधवांच्या दुष्टपणासमोर आरसा धरण्याचे स्वतःचे जीवितकार्य त्याने पुन्हा सुरू केले.


मंदिरात पुन्हा एकदा एक महोत्सव चालला होता.पुन्हा हा देवाचा खलिफा तिथे अकस्मात गेला.या वेळेस त्याच्या हातात मातीचा एक नवा खुजा होता.'प्रार्थना बंद करून माझ्या पाठोपाठ या',असे तो त्यांना म्हणाला.नंतर तो खुजा एखाद्या झेंड्याप्रमाणे हातात उंच धरून तो बाहेर पडला.ते मडके उंच धरून शहरातील सारी घाण जिथे नेऊन टाकीत असत,तिथे तो गेला. त्याच्याभोवती आता चांगलीच गर्दी जमली. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ तो गेला.त्याने ते मडके तिथे फोडले व त्याचे तुकडे त्याने त्या कचऱ्यात फेकले,नंतर लोकांकडे तोंड करून तो म्हणाला,"याप्रमाणे तुमचे,तुमच्या या शहराचे मी तुकडेतुकडे करील." शांतताभंग करणारा, अव्यवस्थित वागणारा म्हणून त्याला अटक करण्यात आली.

घोड्याच्या चाबकाने त्याला फटके मारण्यात आले.रात्रभर त्याला खोडा देण्यात आला.सकाळी त्याला सोडून देण्यात आले.सुटल्याबरोबर पुन्हा तो लोकांसमोर उभा राहिला.ती शापवाणी त्याने पुन्हा उच्चारली. सर्वांना विस्मय वाटला.त्या पागल प्रेषिताची ती बंडखोरी,तो आडदांडपणा,ती निःशक,निर्भय स्पष्टोक्ती थांबविण्याचा उपाय त्यांना सापडेना.याच सुमारास उत्तरेकडून इजिप्त व दक्षिणेकडून बाबिलोन पॅलेस्टाइनचा चुराडा उडविण्यासाठी तयारी करीत होते.जात्याच्या दोन तळ्यांच्या मध्ये मूठभर दाण्यांचा चुरा व्हावा,तसे पॅलेस्टाइनचे होणार होते.जेरुसलेमच्या गादीवर या वेळेस झेडेका हा राजा होता.तो मागील राजांप्रमाणे नव्हता.

झेडेका शांतिप्रिय होता. परंतु तो दुबळ्या मनाचा होता.

सल्लागार जो जो सल्ला देतील, तसा तो वागे.नवे सल्लागार आले, तर पुन्हा निराळा विचार.त्याला'स्वतःचे'

निश्चित असे,मतच जणू नव्हते.पॅलेस्टाइन या वेळेस नावाला का होईना; परंतु बाबिलोनच्या अधिसत्तेखाली होते.बाबिलोनचे हे जू जणू काही फार जड नव्हते.

जेरुसलेममधील काही चळवळ्यांनी बाबिलोनच्या राजाविरुद्ध बंड पुकारावे असे राजाला सुचविले.परंतु ही गोष्ट होऊ नये म्हणून जेरिमियाने आकाशपाताळ एक केले.तो पुरतेपणी जाणत होता,की बंड होताच बाबिलोनचा राजा जेरुसलेमला वेढा घालील. त्या वेढ्यात जेरुसलेम टिकाव धरणार नाही ही गोष्टही स्पष्ट होती.

कोकराने सिंहांशी झुंजावे, तसा तो प्रकार झाला असता.

जेरुसलेममधले उतावळे लोक बंडासाठी फार मोठी किंमत द्यायला तयार होते.ते स्वतःचे प्राण द्यावयास तयार होते.इतकेच नव्हे;तर स्वतःच्या बायकामुलांचेही बलिदान करावयास ते सिद्ध होते.जेरुसलेम शहराचे केवळ स्मशान झालेले जेरिमियाच्या प्रखर कल्पनाशक्तीस दिसत होते. सर्वत्र प्रेतांचे खच पडले आहेत,तरुण स्त्रियांची विटंबना होत आहे.मुले पाण्याचा घोट मिळावा,भाकरीचा तुकडा मिळावा म्हणून दीनवाणी हिंडत आहेत,तहानलेले कुत्रे धन्याचे रक्त चाटीत आहेत,रस्त्यावर मृतांची व मृत प्राण्यांची शरीरे राशीवारी पडली आहेत,असे हे भीषण दृश्य जेरिमिया कल्पनाचक्षूनी पाहात होता.


त्या काळातील वेढा म्हणजे काय वस्तू असे,ते जेरिमिया ओळखून होता.म्हणूनच स्वतःचे सारे वक्तृत्व उपयोगी आणून त्या बंडाविरुद्ध तो प्रचार करीत होता.जेरिमिया म्हणाला, "बाबिलोनच्या राजाला सोन्याची खंडणी देणे पत्करेल,परंतु रणदेवतेला रक्ताचा नैवेद्य देणे नको."


थोडा वेळ राजा झेडेकाने जेरिमियाचे ऐकले, परंतु त्याच्या प्रमुख सल्लागारांचे मत लढाईला अनुकूल होते.याच सुमारास इजिप्तमधून एक लष्करी शिष्टमंडळ आले होते.सल्लागार राजाला म्हणाले,"इजिप्तच्या या लष्करी अधिकाऱ्यांस मेजवानी द्या. इजिप्तची मदत आपणास मिळावी म्हणून प्रयत्न करा."जेव्हा इजिप्तचे प्रतिनिधी जेरुसलेममध्ये आले,तेव्हा जेरिमिया मानेवर जू घेऊन रस्त्यावर आला.इजिप्शियन लष्करी अंमलदारांचे गणवेश झगमगत होते.त्यांची ती शस्त्रे लखलखत होती.आणि हा जेरिमिया कसा होता? भुरेभुरे केस,मेंढ्याच्या कातड्याचा तो गबाळ वेश आणि मानेवरील जड जोखडाने वाकलेली अशी त्याची ती करूणास्पद मूर्ती होती! तेथील तो विरोध डोळ्यांत भरण्यासारखा होता.लोकांनी विचारले, "मानेवरील या जोखडाचा अर्थ काय?'जेरिमिया म्हणाला,

"तुमच्या मुलाबाळांचा तलवारीला व दुष्काळाला बळी देण्यापेक्षा बाबिलोनचे जू परवडले हा याचा अर्थ.

"कितीतरी आठवडे जेरिमिया मानेवर जू घेऊन रस्त्यावरून जात होता.


 शेवटी एके दिवशी लष्करी पक्षाचा एक उत्साही सभासद हनानिआ याने ते जू ओढून घेतले व त्याचे तुकडे केले. ते मोडीत असता हनानिआ म्हणाला,"याप्रमाणेच बाबिलोनचे सर्व राष्ट्रांच्या मानेवर असलेले जू मी मोडून मोडून फेकून देईन."शेवटी लष्करी पक्षाचे धोरण विजयी झाले.झेडेकाने इजिप्तशी करार केला आणि इकडे बाबिलोनशी त्याने लढाई पुकारली.मूठभर लोक जेरिमियाच्या मताचे होते.परंतु राष्ट्रात सर्वत्र युद्धोत्साह संचरला होता.सारे युद्धाने कसे बेहोश झाले होते! अशा या गदारोळात जेरिमिया व त्याची मूठभर शांतिसेना यांचे कोण ऐकणार ?


बाबिलानच्या राजाचे नाव नेबुचदनेझर त्याने इजिप्शियनांना ताबडतोब शरण आणिले आणि जेरुसलेमला वेढा घातला.अशा वेळेस देशात शांतीची गोष्ट काढणे म्हणजे देशद्रोह होता.परंतु जेरिमिया शांतीचा संदेश देतच राहिला. तो म्हणाला, "युद्ध पुकारलेत,ही चूक केलीत.परंतु अजूनही बाबिलोनच्या राजाशी तह करण्यास हरकत नाही." तो याच्याही पुढे गेला.लढू न शकणाऱ्या सर्व नागरिकांस तो म्हणाला."मुलांनो,स्त्रियांनो,

म्हाताऱ्यांनो,दुर्बलांनो ! या शहरात उद्या उपासमारीने उंदराप्रमाणे मरण्याऐवजी तुम्ही खुशाल शत्रूकडे जा.तिथे तुम्हाला अन्नपाणी मिळेल,दवापाणी मिळेल. माझे ऐका." जेरिमिया हा पंचमस्तंभी आहे. बाबिलोनची बाजू घेणारा देशद्रोही आहे,असे सारे म्हणू लागले.खरे पाहिले तर जेरिमिया देशद्रोही नव्हता व बाबिलोनचा पक्षपातीही नव्हता.तो उदार हृदयाचा एक महात्मा होता. इतर सारे पिसाटाप्रमाणे वागत असता तो समतोल वृत्तीने वागत होता.युद्ध पुकारणाऱ्या राष्ट्रांना एक प्रकारचे आंधळेपण येत असते.जेरिमियाने स्वतःची दृष्टी निर्मळ ठेवली होती,डोके शाबूत ठेवले होते.लोकांनी जेरिमियाला पकडले.चौकशीचा देखावाही न करता राजवाड्याखालच्या एका अंधाऱ्या व दुर्गंधीमय अशा नरककुडांत त्यांनी त्याला टाकले.इकडे अद्याप वेढा होता.आणि तिकडे त्या नरकात जेरिमिया खितपत पडला होता.शेवटी गुप्तपणे राजाने त्याला बोलावले.राजा भ्याड होता.परंतु त्या निर्भय व उदार महात्म्याविषयी त्याला मनातल्या मनात आदर वाटे.जेरिमिया आपले विचार बदालावयास तयार नव्हता.सुटकेसाठी स्वतःच्या आत्म्याशी प्रतारणा करावयास तो तयार नव्हता. तो राजाला एवढेच म्हणाला,"या नरककुंडांतून काढून मला तुरुंगात ठेवा.मानवी प्राण्याला सडून मरायला या स्थानापेक्षा तुरुंग बरा."


राजाने ऐकले आणि राजवाड्यातच एके ठिकाणी त्याला स्थानबद्ध करण्यात आले. पुन्हापुन्हा तो झेडेकाना सांगत होता,की बाबिलोनच्या राजाला शरण जा.परंतु कोणी ऐकेना.त्या मूर्ख व हट्टी राजाचा अभिमान पार वाहून जाईल इतके रक्त अद्याप सांडले नव्हते.


नेबुचदनेझरने शहराभोवतालाचे पाश अधिकच आवळले.

शहरातील लोकांस काय करावे समजेना.आपला दुबळा राग कोणावरतरी काढावा,असे त्यांना वाटू लागले.त्यांना जेरिमियाच्या रक्ताची तहान होती.त्याच्या प्राणांवर ते उठले.स्वतःच्या हालअपेष्टातून आंधळे होऊन,जो एक पुरुष त्यांना या हालअपेष्टातून वाचवू पाहात होता,

त्याच्यावरच ते उठले.लोकांनी राजाला घेरले.जेरिमियाला पकडून चिखलाच्या खळग्यात टाका.असे ते म्हणाले.

चिखलाच्या एका खोल खळग्यात त्याला टाकण्यात आले.तो जसजसा धडपडे तसतसा, तो आणखी आणखी खाली जाई.त्याचे पाय वर निघतना जेरिमिया चिखलात बुडणार,गुदमरून मरणार ! सुदैवाने,एका निग्रो गुलामाला दया आली.त्याने जेरिमियाला चिखलातून दोरीने ओढून वर घेतले आणि वेळीच त्याचे प्राण वाचविले.जेरिमिया कोठे पळून गेला नाही. स्वतःचे जीवितकार्य त्याच्यासमोर होते.तो पुन्हा राजाकडे गेला.ही शेवटची वेळ होती. शत्रूजवळ,'ताबडतोब तह करा'असे पदर पसरून त्याने मागणे मागितले.परंतु झेडेकाने त्याला पुन्हा दूर घालविले,आणि वेढा चालूच राहिला.


पुढे अठरा महिन्यांनी शहर घेतले गेले.ज्यू राजाचे मुलगे ठार मारण्यात आले.पित्याच्या डोळ्यांदेखत पुत्रांचे वध झाले.नंतर झेडेकाचे डोळे काढण्यात येऊन त्याला शृंखलाबद्ध करून बाबिलोनला नेण्यात आले.

बाबिलोनच्या दरबारात जेरिमियाला मानाची एक जागा देऊ करण्यात आली.परंतु स्वतःच्या राष्ट्राचे तुकडे करणाऱ्या खुनी शत्रूशी त्याला काही एक कर्तव्य नव्हते.तो आपल्या देशबांधवांबरोबर वनवासात गेला.जेरिमियाला देशद्रोही समजून झेडेकाने छळले.बाबिलोनच्या राजाने मूर्ख म्हणून त्याला हाकलून दिले.


जेरिमियाचे शेवटी काय झाले ते नक्की माहीत नाही.परंतु काही प्राचीन इतिहासकारांचा पुरावा खरा मानला,तर जेरिमियाला इजिप्तमध्ये दगड मारून ठार करण्यात आले,असे म्हणावे लागते.रानवट लोकांना जेरिमियाने उपदेशिले,"तुम्ही सज्जन माणसे बना;तुमच्यापासून प्रभूला ही अपेक्षा आहे."परंतु त्या रानवटांना तो अपमान वाटला.त्यांनी त्याला ठार केले.


मायकेल एंजेलो या विख्यात चित्रकाराने जेरिमियाचे फार योग्य अशा स्थितीत चित्र काढले आहे.वृद्ध जेरिमिया निराश व भग्न हृदय असा बसलेला आहे.सभोवती सारे शहर उद्ध्वस्त झालेले आहे.शहराच्या त्या ढिगाऱ्यावरच जेरेमिया बसलेला आहे.त्याचे डोळे जमिनीकडे खाली जसे खिळलेले आहेत! आजूबाजूचे दुःख व विनाश पाहण्याचे त्याला धैर्य नाही.तो डोळे वर करू शकत नाही.


त्याचे जीवन म्हणजे उद्विग्न करणारी विफलता होती. त्याने शांतीचा संदेश दिला;परंतु जगाने तो ऐकला नाही.लक्ष न देणाऱ्या जगाला त्याने शांतीचे उपनिषद दिले. स्वतःच्या नगरीचे वैभव राहावे,राष्ट्राचा प्राण वाचावा म्हणून त्याने प्राणपर कष्ट केले.परंतु धूळ व राख यांच्या राशीखाली जेरुसलेम गडप झाले.आणि तेथील नागरिक वाळूच्या कणांप्रमाणे जगभर वारेमाप फेकले गेले.त्या थोर इटालियन चित्रकाराने जेरिमिया म्हणजे 'मृतप्राय जातीचा पराभूत व भग्नमनोरथ असा प्रेषितच' जणू रंगविला आहे.परंतु मायकेल एंजेलोचे हे चित्र कित्येक शतकांपूर्वीचे आहे.


आज जेरिमियाला आपण निराळ्या प्रकाशात पाहू शकतो.जुडा येथील टेकड्यांवर उभा राहून जेरिमिया विजयी मुद्रा धारण करून शेकडो,हजारो वर्षांच्या अंतरावरून पाहात आहे.२५०० वर्षांपूर्वी त्याने जी वाणी उच्चारली,ती वाऱ्यावर गेली.परंतु त्याचे ते शब्द आता पकडले गेले आहेत.ज्यू लोकांचे जे अविशिष्ट असे विस्कळीत राष्ट्र आहे,त्याने जेरिमियाचे ते शब्द परंपरेने आजपर्यंत आणून पोहोचविले आहेत.त्या शब्दांचा प्रतिध्वनी निःशस्त्रीकरणाच्या सभांतून,जागतिक न्यायमंदिराच्या विचारविनिमयातून,राष्ट्रसंघाच्या बैठकींतून ऐकू येत आहे.जेरिमिया उभा आहे. स्वत:च्या परिश्रमाला येणाऱ्या फळांकडे तो लांबून पाहतो आहे.त्याच्या सौम्य मुखमंडलावर विजयाचे मंद स्मित झळकत आहे.

जीवनाचा खरा मार्ग शांतीचा आहे,ही गोष्ट अस्पष्टपणे का होईना,आता मानवाच्या ध्यानात येऊ लागली आहे.


अत्याचाराचा प्रतिकार करू नका.असे सांगणारा जेरिमिया हा महान आचार्य होता.सर्व इतिहासातील अत्यंत प्रचंड व भव्य अशा चळवळीचा तो संस्थापक होता.


३१.०१.२४ या भागातील शेवटचा भाग..हा भाग संपला…