* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: डॉयलॉग - गॅलिलिओ गॅलिली.. Dialogue - Galileo Galilei

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/२/२४

डॉयलॉग - गॅलिलिओ गॅलिली.. Dialogue - Galileo Galilei

गॅलिलिओनं (१९३२) लिहिलेलं 'डायलॉग कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टम्स' हे पुस्तक जगभर गाजलं.याचंच सुटसुटीत नाव म्हणजे 'डॉयलॉग'! या पुस्तकात कोपर्निकसची पद्धती आणि आधुनिक गतिशास्त्र यांच्यातला संबंध खूपच सोप्या रीतीनं गॅलिलिओनं उलगडला. 'डायलॉग' हे पुस्तक बुद्धिवंताला ज्या प्रमाणात समजेल आणि आवडेल,त्याच प्रमाणात सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजेल याची काळजी घेत गॅलिलिओनं यात वैज्ञानिक दृष्टिकोन,रंजक आणि रसाळ भाषा आणि नर्मविनोदी पद्धत यांचा वापर केला.गॅलिलिओ एक भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि एक तत्त्वज्ञ असं सगळंच काही होता! गॅलिलिओला 'आधुनिक खगोलशास्त्राचा आणि भौतिकशास्त्राचा पितामह' असंही म्हटलं जातं.इतकंच नाही तर 'आधुनिक विज्ञानाचा पितामह' म्हणूनही अख्खं जग गॅलिलिओला ओळखतं.त्या काळी गॅलिलिओला 'ताऱ्यांचा ख्रिस्तोफर कोलंबस' असंही म्हणत.प्रत्यक्ष निरीक्षण आणि तर्कशुद्ध विचार यांची सांगड घालून निष्कर्ष काढणारा गॅलिलिओ हा पहिलाच शास्त्रज्ञ म्हणता येईल.


गॅलिलिओ वैज्ञानिक तर होताच, पण तो एक उत्तम लेखक आणि कुशल वाक् पटूही होता.! 'सगळे प्राकृतिक नियम हे गणिती नियमांचं पालन करतात'असं पहिल्यांदा गॅलिलिओनं म्हटलं.


जवळजवळ १६ व्या शतकापर्यंत फारसे मोठे वैज्ञानिकही नव्हते.कोपर्निकस आणि केप्लर यांचा अपवाद सोडला तर ख्रिस्तपूर्व ३८४ साली जन्मलेल्या ॲरिस्टॉटलपासून ते गॅलिलिओच्या जन्मापर्यंत जवळजवळ २००० वर्ष ॲरिस्टॉटल आणि टॉलेमी यांचं तत्त्वज्ञान अणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रचंड पगडा पाश्चात्त्य विचारसरणीवर खूपच मोठ्या प्रमाणात होता.


सूर्य पृथ्वीभोवती फिरतो किंवा दोन वस्तू खाली सोडल्या तर त्यातली जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा आधी जमिनीवर पडते,असं ॲरिस्टॉटल म्हणायचा.


 टॉलेमीनं त्याच्याच सुरात सूर भरला होता.ॲरिस्टॉटलनं मांडलेल्या विचारांच्या विरोधात किंवा चर्चच्या विरोधात बोललं तर लगेचच त्याच्यावर कारवाई करून त्याच्या कृतीला धर्मद्रोह ठरवून कठोरातली कठोर शिक्षा होत असे.ॲरिस्टॉटल आणि टॉलेमी या दोघांना विरोध करण्याची त्या काळी कोणामध्येच हिंमत नव्हती.ती हिंमत पहिल्यांदा वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गॅलिलिओनं दाखवली.पृथ्वी सूर्याभोवती फिरते,असं त्यानं म्हटलं.


गॅलिलिओच्या आधी पोलंडमधल्या निकोलस कोपर्निकस आणि योहान केप्लर यांनी ॲरिस्टॉटलच्या मांडणीला विरोध केला.सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात,असं कोपर्निकस यानं मांडलं आणि ते लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात,असं केप्लर यानं मांडलं.मात्र चर्चच्या विरोधात जाण्याची ताकद त्यांच्यातही नव्हती.


१६२९ च्या नोव्हेंबर महिन्यात गॅलिलिओनं लिहिलेलं' 'डायलॉग कन्सर्निंग टू चीफ वर्ल्ड सिस्टिम्स' या शीर्षकाचं पुस्तकजगभर गाजलं. याचंच सुटसुटीत नाव म्हणजे 'डायलॉग' ! हे पुस्तक लिहिताना गॅलिलिओनं खूपच सावध भूमिका घेतली होती.आपलं म्हणणं थेट मांडण्याऐवजी टॉलेमी आणि कोपर्निकस यांच्यात होणाऱ्या संवादाच्या स्वरूपात त्यानं हे पुस्तक लिहिलं.

यामुळे तत्कालीन धर्ममार्तंड आपल्याला त्रास देणार नाहीत,असं गॅलिलिओला वाटलं.त्यानं सुरुवातीलाच कोपर्निकसच्या सिद्धान्ताची एक गोष्ट यात मांडली असून त्यात कोपर्निकसन ती गोष्ट गृहीत धरा,असं म्हटल्याचं लिहिल होतं,असं लिहिलं. थोडक्यात,चर्चनं आक्षेप घेतलाच तर आपण कोपर्निकस बरोबर असल्याचं कुठे ठामपणे म्हणतोय,असं सांगायचं असं त्यानं ठरवलं.हे पुस्तक लिहिताना कुठेही टोकाची भूमिका घ्यायची नाही,टीका करायची नाही,असं बरंच काही ठरवूनही जेव्हा गॅलिलिओ लिहायला लागला,तेव्हा मात्र त्याचा मुळातला टिंगलखोर स्वभाव जागा झाला आणि त्याचे संवाद चांगलेच परखड,रोखठोक आणि मसालेदार झाले, गॅलिलिओला लॅटिन आणि ग्रीक या दोन्ही भाषा उत्तम येत असल्या तरी त्यानं 'डायलॉग कन्सर्निंग टू चीफ वर्ल्ड सिस्टिम्स' हे पुस्तक मुद्दामच इटालियन प्राकृत भाषेत लिहून प्रकाशित केलं.हे पुस्तक त्यानं त्या काळच्या लॅटिन या तथाकथित उच्चभ्रूच्या भाषेत न लिहिता जाणीवपूर्वक मातृभाषेतून लिहिलं होतं.


'डायलॉग' या पुस्तकात कोपर्निकसची पद्धती आणि आधुनिक गतिशास्त्र यांच्यातला संबंध खूपच सोप्या रीतीनं गॅलिलिओनं उलगडला.या पुस्तकातले संवाद किंवा संभाषण चार दिवसांमध्ये विभागलेले दाखवले होते.

पहिल्या दिवशी ॲरिस्टॉटलच्या पद्धतीमध्येपृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातल्या मूलतत्त्वामध्ये दाखवलेला फरक,दुसऱ्या दिवशी पृथ्वीचं रोजचं परिभ्रमण,

तिसऱ्या दिवशी पृथ्वीचं सूर्याभोवतीचं वर्षाचं फिरणं आणि चौथ्या दिवशी समुद्राची भरती-ओहोटी असं या पुस्तकाचं स्वरूप होतं. या पुस्तकात तीन माणसांचा संवाद मोठ्या नाट्यपूर्ण तऱ्हेने लिहिला होता.

'सिंप्लिसिओ' नावाचा एक जुनाट माणूस त्यात चितारला होता.तो त्या वेळच्या पोपप्रमाणेच काही तरी चुकीचं अवैज्ञानिक बोलतोय असं त्यात दाखवलं होतं; पण त्याचबरोबर सॅल्व्हिएटी नावाचा एक मनुष्य खगोलशास्त्रातले,कोपर्निकसचे आधुनिक विचार मांडताना दाखवला होता आणि सॅग्रडो नावाचा एक निवेदक दाखवला होता.सिंप्लिसिओ आणि सॅल्व्हिएटी यांच्यातल्या वादविवादात गॅलिलिओनं चातुर्यानं सिंप्लिसिओ जिंकतो असं वरवर दाखवलं असलं तरी 'सॅल्व्हिएटीचेच युक्तिवाद खरं तर बरोबर कसे आहेत असंच त्यातून व्यक्त होत होतं.चर्चच्या दृष्टीनं हे मात्र अतिच झालं होतं!या त्या वेळी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मुख्य चर्चची परवानगी घ्यावी लागत असे.

त्यामुळे ३ मे १६३० या दिवशी 'डायलॉग' पुस्तकाला चर्चची परवानगी मिळवण्यासाठी गॅलिलिओ स्वतः

आपल्या पुस्तकाचं बाड घेऊन रोमच्या दिशेनं निघाला; पण चर्चला गॅलिलिओचे निष्कर्ष न पटल्यामुळे पुस्तकाची प्रस्तावना आणि त्यातले निष्कर्ष पुन्हा चर्चच्या सूचनेप्रमाणे लिहावेत आणि मग गॅलिलिओनं या तात्पुरत्या स्वरूपात पुस्तक प्रकाशित करावं अशी चर्चनं त्याला परवानगी दिली.त्याच वेळी नेमकी प्लेगची साथ सगळीकडे थैमान घालत पसरत चालली होती.या धुमश्चक्रीतही गॅलिलिओनं अथक प्रयत्नांनी पुस्तकाच्या तीस प्रती छापल्या.याच पुस्तकात कूपमंडूक,संकुचित विचारसरणीच्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा सिंप्लिसिओ म्हणतो, 'आम्ही ॲरिस्टॉटल काय म्हणतो हे मानायचं नाही तर मग आम्हाला मार्गदर्शन कोण करणार?' त्या वेळी गॅलिलिओचं संग्रडो हे पात्र उत्तर देतं, 'आपल्याला अशा मार्गदर्शनाची गरजच का पडावी? आपल्याला कान,नाक, डोळे, हात आणि विचार करायला लावणारी बुद्धी मिळाली आहे.आपण स्वतंत्रपणे विचार करून यांचा वापर करायला हवा हे महत्त्वाचं नाही का?' अशा प्रकारचे संवाद लिहिताना गॅलिलिओला सगळ्या बाजू मांडताना,प्रत्येक बाजू बरोबरच आहे असं वाटण्याची ताकद त्या त्या संवादामध्ये असली पाहिजे याची जाणीव होती.'डायलॉग' हा ग्रंथ म्हणजे वाचकांसाठी बौद्धिक मेजवानीच होती.गोष्टीवेल्हाळ गॅलिलिओनं 'डायलॉग'मध्ये अनेक विषय हाताळले.

त्यामुळे त्याची व्यापकता वाढून तो एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला.


'डायलॉग' हे पुस्तक बुद्धिवंताला ज्या प्रमाणात आवडेल,त्याच प्रमाणात सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजेल याची काळजी घेत गॅलिलिओनं यात वैज्ञानिक दृष्टिकोन,रंजक आणि रसाळ भाषा आणि नर्मविनोदी पद्धत यांचा वापर केला.गॅलिलिओनं लिहिलेलं 'डायलॉग' हे इतकं लोकप्रिय झालं की,त्या काळच्या पंडितांनाही ते पुस्तक वाचावं लागलंच. हे पुस्तक वाचताना गॅलिलिओनं काहीही स्पष्ट लिहिलं नसलं तरी लोक मात्र 'अरेच्च्या, हे पात्र हुबेहुब आपल्या पोपसारखंच आहे'असं म्हणायला लागले.


त्यातून पंडितांनी ते पुस्तक वाचून पोपचे कान भरायला सुरुवात केली.पोपच्या दरबारातले अनेक जण गॅलिलिओवर तसेही जळत होतेच. त्यांना गॅलिलिओची लोकप्रियता खटकत होतीच.गॅलिलिओच्या वादंग उठवणाऱ्या 'डायलॉग' या पुस्तकावर अखेर बंदी टाकण्यात आली.तसंच गॅलिलिओला रोमच्या पोपसमोर हजर होण्याचा आदेश निघाला.रोममध्ये पोहोचताच गॅलिलिओला पकडून सरळ तुरुंगात टाकण्यात आलं.त्या काळी चर्चचं स्वतंत्र न्यायालय असे.त्यामध्ये धर्माविरुद्ध कृती केलेल्यांचे खटले चालत.आरोप सिद्ध होण्यापूर्वी तुरुंगात डांबलेल्यांचा अतोनात छळही केला जात असे.

गॅलिलिओ हा धर्मद्रोही आणि पाखंडी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.गॅलिलिओला कबुलीपत्रावर स्वाक्षरी करायला सांगितलं.आपण स्वाक्षरी केली नाही तर अतिशय क्रूरपणे ते आपल्याला ठार मारतील हेही त्याला दिसत होतं.तरीही सुरुवातीला सुनावणीच्या वेळी गॅलिलिओनं आपल्या छळाला न घाबरता आपण कुठल्याही वाईट हेतूनं हे पुस्तक लिहिलं नसून आपल्याकडून तसं कबूल करून घेणार असल्यास मी मृत्यूला जवळ करेन,असं स्पष्टपणे सांगितलं;पण शेवटी परिस्थितीसमोर गॅलिलिओनं हार मानली आणि


 दुसऱ्या सुनावणीच्या वेळी कबुलीपत्रावर अखेर स्वाक्षरी केली आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते,असं आपण पुन्हा कधीही म्हणणार नाही अशी बायबलवर हात ठेवून शपथ घेतो, असंही वचन दिलं; पण गॅलिलिओच्या कबुलीपत्रानंही पोपचं समाधान झालंच नाही.


त्याला अंधारकोठडीत डांबण्याचा आदेश पोपनं काढला.आयुष्याच्या शेवटी गॅलिलिओची दृष्टी पूर्णपणे गेली.जो माणूस ग्रहतारे बघायचा,विश्वाचं रहस्य उलगण्याचा प्रयत्न करायचा,माणसाला सत्याकडे नेण्याचा मार्ग दाखवायचा त्याच्या सभोवती फक्त अंधार आणि अंधारच उरला होता.


गॅलिलिओच्या अखेरच्या काळात अंधारकोठडीचा अस्कानिओ हा जेलर गॅलिलिओचा निस्सीम चाहता बनला होता.त्यानं अनेक नियम धाब्यावर बसवून गॅलिलिओला दुर्बीण बनवण्यासाठी एक चांगल भिंग उपलब्ध करून दिलं.त्यामुळे गॅलिलिओ न संपणाऱ्या रात्रीमध्ये आकाशातल्या ग्रहताऱ्यांचं निरीक्षण करू लागला.तसंच त्यानं गॅलिलिओच्या बुद्धीची कोंडी होऊ नये यासाठी अनेक वैज्ञानिक,कवी आणि संगीतकार यांना एकत्र करून गॅलिलिओबरोबर बोलण्यासाठी मोकळीक दिली.अस्कानिओच्या सहकार्यामुळेच गॅलिलिओच्या मनानं पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेतली आणि 'डिस्कोर्सेस (मीमांसा)' या अजरामर ग्रंथाची निर्मिती केली.


'डिस्कोर्सेस (मीमांसा)' या ग्रंथात गॅलिलिओनं पृथ्वीवरच्या पदार्थांना गती कशी मिळते याविषयी लिहिलं.हा ग्रंथ विज्ञानाच बायबल समजलं जातं.त्यानं काळ आणि अवकाश याबद्दल लिहिलेलं लिखाण वाचलं तर थक्क व्हायला होतं.त्यात गतीचे नियम आणि द्रव्याचे गुणधर्म यावर त्यानं लिहिलं.दृष्टी अधू झालेली आणि वृद्धत्वामुळे शरीराची साथ नाही अशा परिस्थितीतही गॅलिलिओच्या लिखाणाला कुठलीच शक्ती अडथळा आणू शकली नाही. त्याचं हे पुस्तक त्याला 'सगळ्यात आनंददायी' वाटायचं.'डायलॉग' मधलीच सॅल्व्हिएटी,

सॅग्रडो आणि सिम्प्लिसिओ ही पात्रं त्यानं 'डिस्कोर्सेस'

मध्ये घेतली आणि या पात्रांना सजीव करत आपलं म्हणणं मांडलं.हा ग्रंथ लॅटिन आणि इटालियन भाषेचे मिश्रण आहे.यात पदार्थांच्या गुणधर्माबरोबरच स्थापत्यशास्त्र,लष्करासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान याविषयीही लिहिलं आहे.हा ग्रंथ वाचताना वाचकाजवळ केवळ कुतूहल असून उपयोगाचं नाही,तर त्याचं गणित आणि भूमिती या विषयांतलं आकलन चांगलं पाहिजे,कारण यातल्या युनिफॉर्म मोशनविषयीचं लिखाण गणिती भाषेत मांडलं आहे.'डिस्कोर्सेस'चं लिखाण पूर्ण होताच आता ते प्रसिद्ध करायचं कसं,हा मोठ्ठा प्रश्न गॅलिलिओसमोर होता.एके दिवशी फ्रेंच राजदूत काऊंट फ्रान्सिस द नोइ यानं चर्चची खास परवानगी काढून गॅलिलिओची भेट घेतली; पण काऊंट नोइला गॅलिलिओ भेटल्यावर नेमकं काय घडणार आहे हे ठाऊक नव्हतं. 


गॅलिलिओची भेट होताच गॅलिलिओनं मोठ्या विश्वासानं आपल्या आयुष्याची पुंजी म्हणता येईल असा महत्त्वाचा 'डिस्कोर्सेस' हा ग्रंथ त्याच्या हाती सोपवला.काऊंट नोइनं पॅरिसला पोहोचताच तो ग्रंथ तिथल्या लुडविक एल्गेवीर या डच प्रकाशकाच्या हातात दिला.१६३८ मध्ये तो लिडन इथे प्रसिद्ध झाला.चर्चनं गॅलिलिओच्या ज्ञानावर इतकी बंधनं घातलेली असताना गॅलिलिओचे अफाट परिश्रम,

चिकाटी आणि तीव्र इच्छा यांच्या जोरावर तो प्रसिद्ध झाला.याच काळात गॅलिलिओनं गणितावरचा 'द आसेयर' नावाचा ग्रंथ लिहिला.या ग्रंथात गणितासारख्या रुक्ष विषयावरची मांडणी अत्यंत रसाळ,समर्पक अणि रोचक भाषेत केलेली आहे.यातली चिकाला या कीटकाची गोष्ट तर खूपच मंत्रमुग्ध करणारी आहे.रोमच्या पोपलादेखील गॅलिलिओची ही चिकाल्याची गोष्ट खूपच आवडली होती.रोमच्या पोपला साहाय्य करणारा धर्मशास्त्राचा प्राध्यापक (पुढे तो फादर झाला) रिकार्डी यानं तर गॅलिलिओच्या या ग्रंथांची प्रशंसा करताना म्हटलं होतं, 


'गॅलिलिओच्या 'द आसेयर'नं या युगाचं वैभव वाढवण्यात मोलाची भर टाकली असून या ग्रंथात बावनकशी सोन्यासारखं सत्य युक्तिवादाच्या आधारानं मांडलेलं असून ते बघताना मी या काळात जन्माला आल्याचा मला अभिमान वाटतो.'


 'द आसेयर' या ग्रंथात गॅलिलिओनं विज्ञान आणि गणित यांचं ज्ञान मानवी आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे सांगून प्रत्येकानं या ग्रंथाची गणिती भाषा शिकली पाहिजे याचा आग्रह धरला.या ग्रंथात त्रिकोण,वर्तुळ आणि अनेक भौमितिक आकृत्या यांच्या भाषेत गॅलिलिओनं आपलं म्हणणं मांडलं होतं.त्याच्या प्रत्येक लिखाणातून त्याची युक्तिवाद करण्याची शैली आणि हातोटी लक्षात येते.

गॅलिलिओ म्हणायचा, 


'आकांडतांडव करून आपलं म्हणणं खरं करणारे लोक जास्त आणि सुसूत्र आणि सुबद्ध पद्धतीनं आणि युक्तिवादानं आपलं म्हणणं निष्कर्षापर्यंत पोहोचवणारे लोक खूप कमी असतात.माणसांना जितकी कमी माहिती असते,जितकं त्यांना कमी कळतं तितके ते लोक जास्त आत्मविश्वासानं बोलतात; पण याउलट ज्या लोकांना खूप ज्ञान मिळवायचं असतं,खूप गोष्टी शिकायच्या असतात आणि समजून घ्यायच्या असतात,ते लोक आपले शब्द नेमके,मोजके आणि खूप सावधगिरीनं वापरतात.' त्याचं हे वाक्य नंतर खूपच लोकप्रिय झालं.त्या काळी हॉलंडमध्ये गॅलिलिओचंच नाव झळकायला लागलं,कारण 


एके दिवशी हॉलंडच्या दरबारात समुद्रावरचे अचूक अक्षांश-रेखांश सांगणाऱ्या शास्त्रज्ञाला ३० हजार सुवर्णमुद्रा बक्षिसीदाखल मिळतील, असं जाहीर झालं.गॅलिलिओच्या कानावर ही बातमी पडताच त्यानं आपली जुनी बाडं शोधून त्यातलं नौकानयनावर लिहिलेलं आपलं लिखाण उघडलं.त्यात त्यानं सिलाटोन नावाच्या शिरस्त्राणाचा शोध लावला होता आणि त्याची निर्मितीही केली होती.गॅलिलिओनं डचांना ते कळवताच त्यांच्या सरकारनं ते विकत घेतलंच,पण बक्षिसीच्या रकमेबरोबरच ५०० सुवर्णमुद्रांनी गुंफलेला एक हार गॅलिलिओला सन्मानादाखल पाठवला.इतक्यावरच ते थांबले नाहीत,तर ॲमस्टरडॅमच्या ॲथेनाईयममध्ये त्याच्या नावाचं खास सिंहासन निर्माण केलं आणि गॅलिलिओ

विषयी आपल्याला वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त केलं.ज्या गॅलिलिओला रोमनं धिक्कारलं,ज्याचा छळ केला,त्याच गॅलिलिओला हॉलंडमध्ये इतकं नावाजलं जातंय बघून चर्चची मान शरमेनं खाली झुकली;

पण पराभव मान्य करण्याइतकं उदार मन त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी गॅलिलिओला परदेशी सोनं स्वीकारता येणार नाही असं सांगितलं.


गॅलिलिओनं 'डायलॉग','द आसेयर' याबरोबरच 'द लिट्ल बॅलन्स','ऑन मोशन','मेकॅनिक्स','द स्टारी मेसेंजर','लेटर ऑन सनस्पॉट्स','लेटर टू द ग्रँड डचेश ख्रिस्तिना','डिसकोर्स ऑन द टाईड् स,'डिसकोर्स ऑन द कॉमेट्स' आणि 'डिसकोर्स अँड मॅथमॅटिकल डेमॉन्स्ट्रेशन रिलेटिंग टू न्यू सायन्सेस' एवढं प्रचंड लिखाण केलं.


दान्तेच्या 'गेट ऑफ हेल' मधल्या नरकाचं स्वरूप दाखवण्यासाठी गॅलिलिओनं विज्ञानाचा आधार घेत मांडणी केली होती आणि ऐकणारे चकित झाले होते! गॅलिलिओवर विज्ञानाचा इतका प्रचंड पगडा होता की,सर्वसामान्यां- पर्यंत सोप्या भाषेत ते कसं पोहोचवता येईल याचाच ध्यास त्याला लागलेला असे.त्याचं लिखाण नेमकं,मुद्देसूद,तर्कशुद्ध याबरोबरच तितकंच रसाळ,रंजक आणि सौंदयांन भरलेलं होतं.त्याचं लिखाण वाचताना वाचकांसमोर अमर्यादित असा शब्दभांडार अनुभवायला मिळतो. विज्ञानाबरोबरच तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञाना

बरोबरच विनोद आणि उपहासानं भरलेलं सामाजिक व्यंग तो अतिशय सुंदर वाक्यरचनेतून उलगडून दाखवत असे. गॅलिलिओच्या लिखाणाबद्दल भाष्य करताना,


 इटालियन टीकाकार नतालिनो सॅपेनो यानं म्हटलंय,'गॅलिलिओन आपल्या लिखाणातून मानवी मूल्यं मांडताना प्रभावी आशयघन शैलीचा वापर केलाय.गॅलिलिओनं अशा प्रकारचं लिखाण करून इटालियन साहित्यिकांच्या भावी पिढ्यांसाठी आदर्श घालून दिला आहे. वाचकाच्या मनःपटलावर ठसा उमटवणारा गॅलिलिओ- सारखा दुसरा साहित्यिक दुसरा होणे नाही.'


(जग बदलणारे,ग्रंथ दीपा देशमुख,मनोविकास प्रकाशन


अशा या आधुनिक विज्ञानाचा जनक समजल्या जाणाऱ्या गॅलिलिओचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ साली इटली

मधल्या टस्कनी प्रांतातल्या पिसा इथे विन्चॅन्सो गॅलिली आणि ज्युलिया अमान्नाती या जोडप्याच्या पोटी झाला.


उर्वरित भाग नंतरच्या लेखामध्ये…!