एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला. 'चंदन' नावाचा तो भारतीय व्यापारी अत्यंत साध्या वेषात खाटेवर बसला होता.जेव्हा वास्को-डी-गामाने भारतात येण्याची इच्छा दाखविली,तेव्हा सहजपणे त्या भारतीय व्यापाऱ्याने सांगितले,'मी उद्या भारतात परत चाललोय.तू माझ्या मागोमाग ये...' आणि अशा रीतीने वास्को-डी-गामा भारताच्या किनाऱ्याला लागला..!!
दुर्दैवाने आजही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांत 'वास्को-डी- गामाने भारताचा 'शोध' लावला असा उल्लेख असतो..!!'
मार्को पोलो (१२५४ - १३२४) हा साहसी दर्यावर्दी समजला जातो. इटलीच्या ह्या व्यापाऱ्याने भारतमार्गे चीनपर्यंत प्रवास केला होता.हा तेराव्या शतकात भारतात आला. मार्को पोलोने त्याच्या प्रवासातील अनुभवांवर एक पुस्तक लिहिलंय - 'मार्व्हल्स ऑफ द वर्ल्ड'. याचा अनुवाद इंग्रजीमधेही उपलब्ध आहे. या पुस्तकात त्याने भारतीय जहाजांचं सुरेख वर्णन केलेलं आहे.त्यानं लिहिलंय की,भारतात विशाल जहाजं तयार होतात.
लाकडांचे दोन थर जोडून त्याला लोखंडी खिळ्यांनी पक्के केले जाते. आणि नंतर त्या सर्व लहान- मोठ्या छिद्रांमधून विशेष पद्धतीचा डिंक टाकला जातो,ज्यामुळे पाण्याचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध होतो.
मार्को पोलोने भारतात तीनशे नावाड्यांची जहाजं बघितली होती.त्यानं लिहिलंय,एका एका जहाजात तीन ते चार हजार पोती सामान मावतं आणि त्याच्या वर राहण्याच्या खोल्या असतात. खालच्या लाकडाचा तळ खराब होऊ लागला की त्याच्यावर दुसऱ्या लाकडाचा थर लावला जातो.जहाजांचा वेग चांगला असतो. इराणपासून कोचीनपर्यंतचा प्रवास भारतीय जहाजांमधून आठ दिवसांत होतो.पुढे निकोली कांटी हा दर्यावर्दी पंधराव्या शतकात भारतात आला.याने भारतीय जहाजांच्या भव्यतेबद्दल बरंच लिहिलंय.डॉ. राधा कुमुद मुखर्जी यांनी आपल्या 'इंडियन शिपिंग' या पुस्तकात भारतीय जहाजांचं सप्रमाण सविस्तर वर्णन केलंय.पण हे झालं खूप नंतरचं.म्हणजे भारतावर इस्लामी आक्रमण सुरू झाल्या- नंतरचं.याच काळात युरोपातही साहसी दर्यावर्दीचं पेव फुटलं होतं.युरोपियन खलाशी आणि व्यापारी जग जिंकायला निघालेले होते. अजून अमेरिकेची वसाहत व्हायची होती.हाच कालखंड युरोपातील रेनेसाँचा आहे.त्यामुळे सर्व प्रकारच्या इतिहासलेखनामधे,
विकीपिडियासारख्या माध्यमांमध्ये युरोपियन नौकानयन शास्त्राबद्दलच भरभरून लिहिलं जातं.पण त्याच्याही दीड-दोन हजार वर्षांपूर्वीचे भारतीय नौकानयनाच्या प्रगतीचे पुरावे मिळाले आहेत.
आपल्याकडे उत्तरेत इस्लामी आक्रमण सुरू होण्याच्या काळात,म्हणजे अकराव्या शतकात, माळव्याचा राजा भोज याने ज्ञान-विज्ञानासंबंधी अनेक ग्रंथ लिहिले किंवा लिहून घेतले.त्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे 'युक्ती कल्पतरू.' हा ग्रंथ जहाजबांधणीच्या संदर्भातला आहे. जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी लहान - मोठी,
वेगवेगळ्या क्षमतेची जहाजं कशी बनवली जावीत याच सविस्तर वर्णन ह्या ग्रंथात आहे. जहाजबांधणीच्या बाबतीत हा ग्रंथ प्रमाण मानला जातो.वेगवेगळ्या जहाजांसाठी वेगवेगळं लाकूड कसं निवडावं यापासून तर विशिष्ट क्षमतेचं जहाज,त्याची डोलकाठी यांचं निर्माण कसं करावं ह्याचं गणितही ह्या ग्रंथात मिळतं.
पण ह्या ग्रंथाच्या पूर्वीही,हजार - दोन हजार वर्षं तरी,भारतीय जहाजं जगभर संचार करीत होतीच.म्हणजे हा 'युक्ती कल्पतरू' ग्रंथ,नवीन काही शोधून काढत नाही,तर आधीच्या ज्ञानाला 'लेखबद्ध' करतोय.कारण भारतीयांजवळ नौकाशास्त्राचं ज्ञान फार पुरातन काळापासून होतं.चंद्रगुप्त मौर्यच्या काळात भारताची जहाजं जगप्रसिद्ध होती.ह्या जहाजांद्वारे जगभर भारताचा व्यापार चालायचा. यासंबंधीची ताम्रपत्रं आणि शिलालेख मिळालेले आहेत. बौद्ध प्रभावाच्या काळात,बंगालमधे सिंहबाहू राजाच्या शासनकाळात सातशे यात्रेकरू श्रीलंकेला एकाच जहाजाने गेल्याचा उल्लेख आढळतो.कुशाण काळ आणि हर्षवर्धनच्या काळातही समृद्ध सागरी व्यापाराचे उल्लेख सापडतात.इस्लामी आक्रमकांना भारतीय नाविक तंत्रज्ञान काही विशेष मेहनत न घेता मिळून गेले.त्यामुळे अकबराच्या काळात नौकानयन विभाग इतका समृद्ध झाला होता की जहाजांच्या डागडुजीसाठी आणि करवसुलीसाठी त्याला वेगळा विभाग बनवावा लागला.
पण अकराव्या शतकापर्यंत चरम सीमेवर असणारं भारतीय नौकानयन शास्त्र पुढे उतरंडीला लागलं.
मोगलांनी आयत्या मिळालेल्या जहाजांना नीट ठेवलं इतकंच,पण त्यात वाढ केली नाही.दोनशे वर्षांचं विजयनगर साम्राज्य तेवढं अपवाद.त्यांनी जहाजबांधणीचे कारखाने पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही तटांवर सुरू केले आणि ८० पेक्षा जास्त बंदरांना ऊर्जितावस्थेत आणलं.पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं आरमार उभारलं आणि नंतर आंग्र्यांनी त्याला बळकट केलं.
पण अकराव्या शतकाच्या आधीचे वैभव भारताच्या जहाजबांधणी उद्योगाला पुढे आलेच नाही.त्याच काळात स्पेन आणि पोर्तुगाल यांनी जहाजबांधणीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली अन् भारत मागे पडला.पण तरीही,इंग्रज येईपर्यंत भारतात जहाजं बांधण्याची प्राचीन विद्या जिवंत होती.सतराव्या शतकापर्यंत युरोपियन राष्ट्रांची क्षमता अधिकतम सहाशे टनांचं जहाज बांधण्याची होती.
पण त्याच सुमारास त्यांनी भारताचे 'गोधा' (कदाचित 'गोदा' असावे. स्पॅनिश अपभ्रंशाने गोधा झाले असावे) नावाचे जहाज बघितले,जे १,५०० टनांपेक्षाही मोठे होते.भारतात आपल्या वखारी उघडलेल्या युरोपियन कंपन्या-म्हणजे डच, पोर्तुगीज,
इंग्रज,फ्रेंच इत्यादी - भारतीय जहाजं वापरू लागली आणि भारतीय खलाशांना नोकरीवर ठेवू लागली.
सन १८११ मधे ब्रिटिश अधिकारी कर्नल वॉकर लिहितो की,'ब्रिटिश जहाजांची दर दहा / बारा वर्षांनी मोठी डागडुजी करावी लागते.पण सागवानी लाकडापासून बनलेली भारतीय जहाजं गेल्या पन्नास वर्षांपासून डागडुजीशिवाय उत्तम काम करताहेत.
'भारतीय जहाजांची ही गुणवत्ता बघून 'ईस्ट इंडिया कंपनी' ने 'दरिया दौलत' नावाचे एक भारतीय जहाज विकत घेतले होते,जे ८७ वर्षं,डागडुजी न करता व्यवस्थित काम करत राहिले.ब्रिटिशांनी मराठ्यांकडून भारतावरील राज्य हिसकावून घेण्याच्या काही वर्ष आधीच,म्हणजे १८११ मधे एक फ्रांसीसी यात्री वाल्तजर साल्विन्सने 'ले हिंदू' नावाचे एक पुस्तक लिहिले.त्यात तो लिहितो,'प्राचीन काळात नौकानयनाच्या क्षेत्रात हिंदू सर्वांत अघाडीवर होते आणि आजही (१८११) ते या क्षेत्रात आमच्या युरोपियन देशांना शिकवू शकतात.'
इंग्रजांनीच दिलेल्या आकड्यांप्रमाणे १७३३ ते १८६३ मधे एकट्या मुंबईतल्या कारखान्यात ३०० भारतीय जहाजं तयार झाली,ज्यांतील अधिकांश जहाजं ब्रिटनच्या राणीच्या 'शाही नौदलात' सामिल करण्यात आली.यातील 'एशिया' नावाचे जहाज २,२८९ टनांचे होते आणि त्यावर ८४ तोफा बसविलेल्या होत्या. बंगालमधे चितगाव,हुगळी (कोलकाता),सिलहट आणि ढाकामधे जहाजं बनविण्याचे कारखाने होते.१७८१ ते १८८१ ह्या शंभर वर्षात एकट्या हुगळीच्या कारखान्यात २७२ लहान-मोठी जहाजं तयार झाली.अर्थात भारतीय जहाज-बाधणीच्या पडत्या काळात जर ही परिस्थिती असेल तर अकराव्या शतकापूर्वी भारताच्या जहाजबांधणी उद्योगाची स्थिती किती समृद्धशाली असेल,याचा अंदाज येऊ शकतो. मात्र अशा दर्जेदार गुणवत्तेची जहाजं बघून इंग्लंडमधील इंग्रज,ईस्ट इंडिया कंपनीला,ही जहाजं न घेण्यासाठी दबाव टाकू लागले.सन १८११मध्ये कर्नल वॉकरने आकडे देऊन हे सिद्ध केले की,'भारतीय जहाजांना फारशी डागडुजी लागत नाही.आणि त्यांच्या 'मेंटेनन्स'ला अत्यल्प खर्च येतो.तरीही ते जबरदस्त मजबूत असतात.' (ही सर्व कागदपत्रं ब्रिटिश संग्रहालयात, ईस्ट इंडिया कंपनीच्या अभिलेखागारात [आर्काईव्हल मध्ये सुरक्षित आहेत.) मात्र इंग्लंडच्या जहाज बनविणाऱ्या व्यापाऱ्यांना हे फार झोंबलं. इंग्लंडचे डॉ.टेलर लिहितात की,भारतीय मालाने लादलेलं भारतीय जहाज जेव्हा इंग्लंडच्या किनाऱ्याला लागलं,तेव्हा इंग्रजी व्यापाऱ्यांमध्ये अशी गडबड उडाली की,जणू शत्रूनेच आक्रमण केले आहे.लंडनच्या गोदीतील (बंदरातील) जहाज बांधणाऱ्या कारागिरांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाला लिहिलं की,जर भारतीय बांधणीची जहाजं तुम्ही वापरायला लागाल तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, आमची अन्नान्न दशा होईल..!
ईस्ट इंडिया कंपनीने त्या वेळी हे फार मनावर घेतलं नाही.
कारण भारतीय जहाजं वापरण्यात त्यांचा व्यापारिक फायदा होता.मात्र १८५७ च्या क्रांती-युद्धानंतर भारतातले शासन सरळ इंग्लंडच्या राणीच्या हातात आले.आणि राणीने विशेष अध्यादेश काढून भारतीय जहाजांच्या निर्मितीवर बंदी घातली.१८६३ पासून ही बंदी अमलात आली आणि एका वैभवशाली,समृद्ध आणि तांत्रिक दृष्ट्या पुढारलेल्या भारतीय नौकानयन शास्त्राचा मृत्यू झाला !
सर विलियम डिग्वीने या संदर्भात लिहिलेय की,'पाश्चिमात्य जगाच्या सामर्थ्यशाली राणीने,प्राच्य सागराच्या वैभवशाली राणीचा खून केला.आणि जगाला 'नेव्हिगेशन' हा शब्द देण्यापासून तर प्रगत नौकानयन शास्त्र शिकवणाऱ्या भारतीय नाविक शास्त्राचा,प्रगत जहाजबांधणी उद्योगाचा अंत झाला..!
१२.०२.२४ या लेखातील शेवटचा भाग..
अष्टगंध प्रकाशनाचं नवं पुस्तक....
पातीवरल्या बाया : सचिन शिंदे
बाई सुपारीचं खांड,दोहो बाजूंनी चेंदते बाई अंतरीचा धागा,मना मनाला सांधते
ठाव लागेना मनाचा,बाई कालिंदीचा तळ उठणाऱ्या वेदनेची,बाई दाबतेय कळ
वेदनेची गाणी गाते,बाई कंठातला सूर ढगफुटी तिच्या जगी,बाई आसवांचा पूर
दोन काठांना जोडते,बाई तरंगती नाव सुखासीन नांदणारं,बाई मायाळू गं गाव
बाई कोवळ्या मनाची,डुलणारी मऊ वेल जणू टणक देहाची,बाई बाभळीची साल
संथ भरलेला सदा,बाई नदीचा गं डोह तप्त ग्रीष्माच्या झळाचा,बाई पोळणारा दाह
बाई राबणारे कर,सदा सृजनाचा मळा कापे सरसर दुःख,बाई धारदार विळा
आमचे परममित्र कवी सचिन शिंदे यांची कलाकृती लवकरच हाती येईल.उत्सुकता वाचण्याची..!!