* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सप्टेंबर 2025

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२९/९/२५

अशी ही आई / Such a mother

एप्रिल चा पहिला आठवडा ! 

रस्त्यांवर लाॕकडाउन मुळे भयाण शांतता.नाही म्हणायला पोलीस जागोजागी... ! 

मी भिक्षेक-यांचा डाॕक्टर ... माझं काम रस्त्यावरच !

लाॕकडाउन च्या काळात ज्यांना घरं होती, ्मग भले ती झोपडपट्टीत का असेनात,त्यांना घरी रहायला बजावुन सांगितलं...! 

ज्यांना घरं नाहीत अशांना काॕर्पोरेशनने निर्माण केलेल्या निवारा केंद्रात पाठवुन दिलं.आता माझ्या भिक्षेकरी वर्गापैकी रस्त्यांवर कुणी नव्हतं.तरीही चुकुन कुणी सापडतंय का हे बघत मी रस्त्यांवरुन फिरत होतो. फिरता फिरता एका मंदिरापाशी आलो.
मंदिराबाहेर शुकशुकाट. मंदिराची दारं बंद...ना भिक्षेकरी...ना भक्त !

मी तिथुन निघणार तेव्हढ्यात भिक्षेकरी बसतात त्या ठिकाणी एक आजी बसलेली मला दुरुन दिसली.हि माझ्या ओळखीची नव्हती.कपडे ब-यापैकी नीटनेटके..! 

भिक्षेकरी वाटत नव्हती...! 

मग हि इथं का बसली असेल ? माझी उत्सुकता वाढली.मी जवळ गेलो... 

हा आता आपल्याला काहीतरी देणार या आशेनं तीनं आपसुक हात पुढे केला. 

मला आश्चर्य वाटलं... भिक्षेकरी तर वाटत नाही...मग हात का पुढे करावा हिने ? 

वय असेल साधारण 70-75 वर्षे.डोईवरचे सर्व केस पांढरे,डोळे खोल गेलेले,चेह-यावर सुरकुत्यांचं जाळं... हाताच्या बोटापर्यंत पसरलेलं... ! 

या जाळ्यात मध्येच लुकलुकणारे दोन डोळे,चेह-यावर अजीजी,करुण भाव ... !

'आजी इथं का बसलाय ?' मी विचारलं. 

'काही नाही,बसल्येय हो देवळाच्या दारात,आपण पोलीस आहात का? बोलणं मृदु आणि स्वच्छ !

माझी खात्री झाली,आजी भिक्षेकरी नाही. 

तरीही तीला म्हटलं,'देवळाच्या दारात बसलाय म्हणता, आणि इथं बसुन मागता.बरोबर ना ? मघाशी हात पुढं केलात,बघितलं ना मी...तीनं चमकुन माझ्याकडं पाहिलं,डोळ्यात पाणी तरारलं... पण बोलली काहीच नाही. 

'उठा आजी असं उघड्यावर बसु नका,सध्या काय चालु आहे माहित आहे ना ? जा घरी...कुणी येणार नाही काही द्यायला'.मी पुन्हा बोललो. 

ती ओशाळली, म्हणाली,'तसं नव्हे हो ! जाते मी इथुन .... कुणी येणार नाही काही द्यायला...काय करणार नशीबच फुटकं...! 

मला या वाक्याचा अर्थ कळला नाही. 

ती उठली... जायला निघाली. 

मनात नसतांनाही ती जायला उठली,पण तीला थांबायचं होतं अजुन...माझ्याकडं तीनं ज्या केविलवाण्या नजरेनं पाहिलं त्यात मला ते स्पष्ट जाणवलं. मलाच वाईट वाटलं.म्हटलं, 'आजी,मी डाॕक्टर आहे,काही औषधं लागत असतील तर सांगा,दुसरी काही मदत हवी असेल तर सांगा...! 

पण कुणाला भीक मागायला लागु नये यासाठी मी काम करतोय,शिवाय तुम्ही चांगल्या घरातल्या वाटताहात...आणि ...

ती चालता चालता थबकली, वळुन हसत म्हणाली... चांगलं घर,वाईट घर असं पण असतं का ?

'नाही तसं नव्हतं म्हणायचं मला...' मी काहीतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

ती हसली;काहीतरी विचार करुन म्हणाली,'केळी आहेत का तुमच्याकडे ?' 

मला काही कळेचना, ब-यापैकी परिस्थिती वाटते, भिक्षेकरी तर वाटत नाही,तरी इथं मंदिरात काही मिळेल या आशेनं ती इथं बसली होती,हटकल्यावर निघाली, आता जातांना केळी मागते...! 

मानसिक रुग्ण असावी का ? 

उलगडा होईना. 

उत्सुकता अजुन चाळवली. 

मी तीच्या मागं गेलो,'म्हणालो आजी... काय झालं... इकडे कुणाची वाट पहात होता का ? काही हवं होतं का... ?'

'मला केळी द्याल...?' पुन्हा तीनं भाबडेपणानं विचारलं.

मी डायरेक्ट मुद्द्यावर आलो, 'आजी झालंय काय ? नीट सांगाल, तर मी नक्की काहितरी मदत करेन...!' 

हो- ना करता,कळलं ते असं...

... हि आजी आपल्या यजमानांसह रहात होती. यजमान नोकरीला...ही गृहिणी ! 

मुलबाळ होत नव्हतं.खुप वर्षांनंतर तीच्या वयाच्या चाळिसाव्या वर्षी मुल झालं...! 

या वयात झालेल्या मुलाला जन्मजात व्यंग होतं... कमरेखाली त्या बाळाला संवेदनाच नव्हत्या.. हा धक्का तीनं पचवला. पुढे कळलं बाळाच्या हृदयाला छिद्र आहे... तो ही धक्का तीने पचवला... आणखी काही काळानं कळलं... मुल मतिमंद आहे... ! 

आता ती ढासळली ! 

गाडी कशीबशी सुरु होती. 

पुढे हार्ट अॕटेकने यजमान गेले... एक मोठा आधार गेला. 

मतिमंद मुलाचं करता करता दिवस सरत होते,पेन्शन पुरत नव्हती.मुलाचं दुःखं पहावत नव्हतं... तरीही मनोभावे त्याचं सर्व ती करत होती. ...अशातच अचानक मुलगाही गेला तीला सोडुन ...!

सगळीकडेच अंधार... ! 

ती एकटी ...!

आजीची बहिण टिबी ने आजारी होती,तीच्या शेवटच्या काळात ती आजीला म्हणाली... बिनबापाचं माझं पोरगं पदरात घे... मी जास्त दिवस राहणार नाही...

तो शब्दही खरा झाला.बहिण गेली...बाप नसलेल्या तीच्या एकुलत्या एक मुलाची जबाबदारी आता आजीने घेतली त्यावेळी... ! 

बहिण गेल्याचं दुःखं होतंच...पण तीच्या मुलाच्या रुपानं पुन्हा आजीला मातृत्व मिळालं... 

बहिणीमाघारी तीनं त्या मुलाचं सर्व काही केलं.त्याच्या शिक्षणासाठी दागदागिने मोडले,राहतं घर विकलं, स्वतः भाड्याच्या घरात राहुन मुलाला बाहेरगावी होस्टेलला ठेवलं.त्या वयातही चार घरची कामं करुन मुलाचं संपुर्ण शिक्षण पुर्ण झालं.शिक्षण झाल्यावर मुलानं परस्पर तिकडेच नोकरी पाहिली,घरोबाही केला.तो हिच्याकडे परत आलाच नाही.म्हणायचा, 'तु काय खरी आई आहेस का माझी... ? 

आजीनं इतके मृत्यु पाहिले होते,इतकं दुःखं पचवलं होतं... या सा-या धक्क्यांतुनही ती सावरली ... 

पण या वाक्याचा आघात सहन झाला नाही... "तु काय खरी आई आहेस का माझी... ?"

मी खरी आई नव्हते तर कोण होते रे बाळा तुझी ? 

ती प्रश्न विचारायची... पण उत्तर द्यायला कुणीच नसायचं...!

आई होण्याचं भाग्य दोन्ही वेळा लाभलंच नाही... !

दिवस सरत होते, ्मृत्यु नेत नव्हता आणि आयुष्यं जगु देत नव्हतं... ! 

बहिणीच्या मुलाला स्वतःचाच समजुन,त्याच्यासाठी होतं नव्हतं ते सर्व आजीनं घालवलं होतं... नंतर मुलानं नातं नाकारलं. आजी आता राहते कुठल्याशा चाळीतल्या एका खोलीत...

पंधरा दिवसांपुर्वी हिला खोकतांना चाळीत कुणीतरी पाहिलं,यंत्रणेला कळवलं... सरकारी कर्मचाऱ्यांनी आजीला दवाखान्यात नेलं,कोरोनाची तपासणी केली, दोन दिवस दवाखान्यात ठेवलं... हिला घरी सोडलं... !

हिला खुप आशा होती,आपल्याला कोरोनाचा आजार व्हावा,त्यातच आपला अंत व्हावा... पण इथंही निराशाच पदरी आली... टेस्ट निगेटिव्ह ! 

हिला घरी सोडलं... ! 

जगण्याने छळलं होतं... !!! 

ती परत चाळीत आली होती... ! 

'आजी,वाईट वाटलं ऐकुन...' पाणावलेल्या डोळ्यांनी मी तीला म्हणालो. 

'वाईट काय वाटायचं डाॕक्टर ? भोग असतात,ते भोगावेच लागतात.'

'पण तुम्ही सांभाळलेल्या मुलानं योग्य नाही केलं हे...'

'असु द्या हो,आपण आपलं कर्तव्य करायचं... गीतेत सांगितलं आहे... मोह नको... कर्म करत रहा... फळाची अपेक्षा नको...' 

'म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत !' 

'माफ करणारी मी कोण ? कुणाचा तरी सांभाळ कर अशी माझ्यावर कुणीतरी जबाबदारी टाकली होती,आई म्हणुन मी ते कर्तव्य केलं... आता त्याने माझा सांभाळ करावा असा हट्ट मी का धरु ? 

मुलानं माझी परतफेड करावी असं वाटणं...तिथंच आईपण संपतं... !' 

'हो ना पण,मुलाला त्याचं कर्तव्य कळु नये ?' 

'डाॕक्टर,रस्त्यांत खडे टोचतात म्हणुन रस्त्यांवर कुणी गालिचा अंथरत नाही,आपण आपल्या पायात चप्पल घालावी. त्याला त्याचं कर्तव्य कळेल न कळेल... आपण कशाला कुणाला शिकवायला जायचं ? आपलं काम करत रहायचं,फळाची अपेक्षा न धरता... !' 

गीतेच्या ग्रंथाला हातही न लावता,गीतेतला एक अध्याय मला आज्जीकडुन समजला होता. 

'चला डाॕक्टर,निघते मी... माझं पोरगं घरी एकटंच असेल... मला जायला हवं आता...!' 

'क्काय...???' मी जवळपास किंचाळलो असेन... कारण या वाक्यावर ती दचकली होती. 

'अहो आज्जी,आत्ताच तर म्हणालात ना... एक मुल लहानपणीच वारलं, बहिणीचा सांभाळलेला मुलगा सोडुन गेला... आता हे काय... ?

ती मंद हसली. म्हणाली, 'सांगेन पुन्हा कधी भेट झाली तर... आधी मला केळी घ्यायला पाहिजेत कुठुनतरी...' 

'नाही आज्जी,आत्ताच सांगा... प्लिज... माझ्या मनातनं हे जाणार नाही...' 

ती शांतपणे म्हणाली, 'अहो डाॕक्टर,कोरोनाच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते,तेव्हा ठरवलं होतं, चाचणी पाॕझिटीव्ह असेल तर उत्तमच नाहीतर येतांना सरळ एखाद्या गाडीखाली झोकुन द्यायचं.' 

'मग...?' आवंढा गिळत मी म्हटलं. 

'मग काय ? जगायचं कसं आणि मरायचं कुठं हा विचार करत पडले असतांना माझं लक्ष शेजारच्या खाटेवर गेलं...साधारण चाळीशीचा एक मुलगा त्या खाटेवर होता. कमरेखाली अधु ! 

मी त्याच्याकडे पाहिलं... ! 

डोळे मिचकावत मला म्हणाला... "काय होनार नाय मावशी तुला,काळजी करु नको... अगं आजुन लय आयुष्यं हाय तुला"...! हा कोण कुठला ? स्वतःच्या जगण्याची खात्री नाही आणि मला जगण्याचं बळ देतो... ? मावशी म्हणतो... ? 

हा निराधार अपंग... रस्त्यांवर राहतो... माझ्यासारखाच तपासणीसाठी आणलेला...! 

मरण्याचे विचार घेवुन वावरत असतांना वाटलं... आज माझं मुल जिवंत असतं तर याच्याच एव्हढं नक्की असतं. ज्या काळात तो गेला... त्याचकाळात त्याच्याऐवजी समजा मीच गेले असते तर त्याचीही अवस्था आज अशीच अपंग आणि निराधार झाली असती... तो ही आज रस्त्यावरच असता...! 

डाॕक्टर ,त्या अपंग मुलात,मला माझं मुल दिसलं. 

आमच्या दोघांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यावर मी त्याला माझ्याकडे घेवुन आले.

त्या दिवशी मी परत आई झाले हो... मरायचं म्हणुन ठरवुन गेलेली मी... येताना आई होवुन, लेकरु घेवुन आले.'मला काय बोलावं सुचेना. डोळ्यांतुन माझ्या झरझर पाणी वाहु लागलं. 

'आज्जी,आधीच तुमची कमाई काही नाही, पेन्शन पुरत नाही... त्यात अजुन एका व्यक्तीला घेवुन आलात सांभाळायला...?' मी आश्चर्याने विचारलं. 

'डाॕक्टर,आईला आपलं मुल सांभाळायला पैसे लागत नाहीत.आईला व्यवहार कधीच कळत नाही... !

शिवाय पैसा जगायला लागतो...जगवायला नाही...!' 

'म्हणजे ... ?' मी आ वासुन विचारलं. 

'म्हणजे,जो स्वतःचा विचार करत स्वतःपुरता जगतो त्याला पैसे लागतात...पण आपण जेव्हा "स्व" सोडुन दुस-याला जगवायचा विचार करायला लागतो... त्यावेळी त्या दोघांची काळजी कुणी तिसराच करत असतो...्आपण फक्त त्या तिस-यावर विश्वास ठेवायचा !' 

मी हे तत्वज्ञान ऐकत मुकपणे उभा होतो. 

'मोठी झालेली मुलं,आपल्या आईला त्यांच्या घरात राहण्याचं भाडं मागतीलही कदाचित् ... पण नऊ महिने गर्भाशयात राहण्याचं भाडं आईनं कधी मागितल्याचं माहित आहे का ?' 

आईला व्यवहार कधीच कळत नाही डाॕक्टर !

मी शहारलो हे ऐकुन... ! 

'आज्जी, धीचे दोन वाईट अनुभव बघता, हा पण गेला सोडुन तर ? पुढं तुमचं काय ?' मी चाचरत बोललो. 

'डाॕक्टर हा सोडुन गेला तरी,तो माझं आईपण घेवुन जावु शकणार नाही ना ?

एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देतो... त्यावेळी नुसतं बाळच जन्माला आलेलं नसतं... एक आई पण जन्म घेते त्याचवेळी... !

दोन जीव जन्मतात त्यावेळी... एक मुल आणि एक आई ! 

जन्माला आलेल्या त्या बाळाने आईला, 
आईपण हे त्याच्या जन्मावेळीच बहाल केलेलं असतं... हे लाभलेलं आईपण कोण कसं काढुन घेईल ?

मी काय बोलणार यावर... ? 

मी स्तब्ध झालो...!

स्वतःच्या जगण्याची भ्रांत असतांना,कटु अनुभव गाठीशी असतांना,पुन्हा ती कुणाचीतरी आई होण्याचा प्रयत्न करते...! हे वेडेपण आहे कि आई व्हायला आसुसलेल्या मातेची गाथा... ?

'चला निघु मी डाॕक्टर ? 
केळी घ्यायचीत मला...' आजीच्या वाक्यानं मी भानावर आलो. 

'आता केळी कशाला...? नाही म्हणजे कुणाला... ?' 
मी अजुनही धक्क्यांतुन सावरलो नव्हतो. 

'अहो, तो काल मला म्हणाला,केळ्याचं शिकरण खाऊशी वाटतंय.मग मी सकाळी पैसे घेवुन निघाले केळी आणायला... पण लाॕकडाउन मुळे सगळंच बंद, केळी कुठंच मिळेनात.आता घरी जावुन त्याला कुठल्या तोंडानं सांगु,केळी मिळाली नाहीत म्हणुन...! 

मग आठवलं... मंदिरात येतांना लोकं केळी सफरचंद वैगेरे फळं घेवुन येतात देवाला वाहण्यासाठी... जातांना यातलंच एखादं फळ भिका-यांना देवुन जातात... ! 

म्हटलं बघु,पैशानं नाही तर भीक मागुन तरी मिळेल एखादं केळ...! शिकरण करुन देईन हो,पोराचं मन तरी मोडणार नाही...!' 

भरलेल्या डोळ्यांनी मला आता मंदिर दिसेना,देव दिसेना... दिसत होती फक्त एक आई... ! 

रस्त्यावरल्या अपंग पोरामध्ये आपलं पोर पाहणारी ही बाई...!निराधाराला पदराखाली घेणारी ही बाई...!

हातात पैसे असुनही कुणाच्यातरी आनंदासाठी भीक मागायलाही तयार झालेली ही बाई...!

याच बाईत मला दिसली आई !!!

भरल्या डोळ्यांनी मी तीचे पाय धरायला वाकलो,तीने पाया पडु दिलं नाही... ! 

'आज्जी, म तुमची एखाद्या वृद्धाश्रमात सोय करु...? दाटल्या गळ्यानं मी विचारलं. 

यावर डोळे बारीक करत तीनं विचारलं होतं,'पण वृद्धाश्रमात दोघांची एकत्र सोय होईल आमची... ?' 

'नाही आज्जी,वृद्धाश्रमात तुमची सोय होईल,मुलाचं मग बघु काहीतरी... !' 

माझं बोलणं उडवुन लावत, माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाली... ,'काय डाॕक्टर,मग काय फायदा...? माझ्यावाचुन तो कसा राहील ? बरं निघते मी... अजुन केळ्याची सोय करायचीय मला...' 

असं म्हणत, ती निघाली केळी शोधायला...! 

मी इकडं तिकडं आसपास पाहिलं... सर्व बंद. 

आज कुणाच्या हातात मला केळी दिसली असती तर मीच जावुन मागुन आणली असती...

मला दोघांचं भविष्य दिसत होतं... आजी कुठवर त्या मुलाचं करेल किंवा तो अपंग मुलगा तरी आजीला किती आणि कशी साथ देणार...या विचारानं आज्जीला शेवटचं विचारलं, 'आज्जी वृद्धाश्रमाचं काय करु...?'

यावर ती हसत म्हणाली होती, 'अहो या वयात मोठ्या मुश्किलीने पुन्हा आई झाल्येय मी ... आता कशाला मायलेकरांची ताटातुट करता... ? 

या आधी दोन ल्येकरं गमावलीत मी.... आता तिसऱ्याला तरी माझ्याबरोबर राहु दे...त्याच्या अंतापर्यंत किंवा माझ्या अंतापर्यंत ...!

ती झराझरा चालत माझ्यासमोरुन निघुन गेली...!

नव्यानंच पुन्हा आई झालेल्या,म्हातारपणानं वाकलेल्या त्या माऊलीच्या पायात इतकं बळ आलं कुठुन ... ? 

आईला वय कुठं असतं...?
ती कधीच म्हातारी होत नाही, हेच खरं ! 

गरीब असण्याचा श्रीमंत असण्याचा,तरुण असण्याचा, वृद्ध असण्याचा,पैसे असण्याचा,पैसे नसण्याचा कशाचाही संबंध नसतो आई होण्याशी... ! 

ती फक्त आई असते !

पोराची एक इच्छा भागवण्यासाठी ती भीकही मागु शकते... ! 

पोरासाठी मागितलेली एक भीक एका पारड्यात आणि सढळ हातानं केलेली हजारो दानं दुस-या पारड्यात ! 

दोन्हीचं वजन सारखंच...!!! 

यानंतर मी त्या जागेवर,केळी घेवुन ब-याचदा गेलो... पण ती दिसत नाही !

हातात केळी घेवुन माझी नजर तीला शोधत असते...

का कोण जाणे...तीला शोधतांना मंदिराचा कळस झुकलाय असा मला भास होतो...! 

का कोण जाणे...तीला शोधतांना दारातली ती तुळस मोहरली आहे असा मला भास होतो...!

का कोण जाणे...तीला शोधतांना तीने उच्चारलेला शब्द न् शब्द आज अभंग झाला आहे असा मला भास होतो...!का कोण जाणे...तीला शोधतांना मी पुन्हा बाळ झालो आहे असा मला भास होतो...!

का कोण जाणे...!!!

डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स…


२७/९/२५

विज्ञान संप्रेषण व जागरूकता science communication and awareness

संप्रेषण म्हणजे कल्पना,विचार,भावना,माहिती किंवा सदेश एका व्यक्तीकडू दुसऱ्या व्यक्तीकडे,किंवा गटाकडून दुसऱ्या गटाकडे पोहचविण्याची प्रक्रिया..

" विज्ञान हे ज्ञात 'तथ्ये' तयार करण्याबद्दल नाही.
विचित्र प्रश्न विचारण्याची आणि त्यांना वास्तविकता तपासण्याची ही एक पद्धत आहे,ज्यामुळे आपल्याला जे काही चांगले वाटते त्यावर विश्वास ठेवण्याची मानवी प्रवृत्ती टाळली जाते." टेरी प्रचेट यानी म्हटलेलं आहे.

पूर्वीच्या काळी आपल्याला 'उचकी' लागली की आपण म्हणायचं 'कुणीतरी' आपलं नाव काढलं.यातूनच टेलिफिती आपल्याला समजलेली आहे.आपण जर मनापासून एखाद्या व्यक्तीची नाव काढलं आठवण काढली तर नेमके त्या व्यक्तीकडून आपल्याला काही संदेश किंवा निरोप किंवा पत्र यायचे.आपण भटक्या अवस्थेत होतो त्यावेळी शिकार करून फळ खाऊन आपण आपलं उदरनिर्वाह करत असू. वडिलांनी शिकार केलेल्या जनावरांच्या कातड्यापासून आई कपडे तयार करायची.त्यांचा मुलगा जंगलात दिवसभर खेळायचा त्याचा खेळ म्हणजे नवनवीन वनस्पती शोधणे,फळांच्या चवी घेणं,जंगलामध्ये आसपासच्या परिसरामध्ये झालेल्या बदलांची नोंद घेणे. शिकार करण्यासाठी तयार करायला जी आयुधे लागतात ती स्वतःतयार करणे आणि स्वतःला सुरक्षित करण्याचं तंत्र या खेळातून निर्माण करणे.

जॉन पँकसेप यांनी त्यांच्या Affective Neuroscience: The Foun- dations of Human and Animal Emotions यात साधारण अशाच प्रकारचा निष्कर्ष काढला आहे.त्यांनी असं लिहिलं आहे की,एक गोष्ट अगदी खात्रीलायकपणे सांगता येते,ती म्हणजे प्राणी खेळत असतात,त्या वेळी अधिक लवचीकपणा आणि निर्मितीशील पद्धती वापरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो."

एडवर्ड एम.हॅलोवेल हे एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत,आणि मेंदूच्या कार्यासंबंधात त्यांचा खास अभ्यास आहे.ते म्हणतात की,खेळामुळे मेंदूच्या अंमलबजावणी करण्याच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होतो.त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय,मेंदूच्या अंमलबजावणी कार्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गोष्टी आहेत,त्या म्हणजे योजना आखणं,त्यांचे अग्रक्रम ठरवणं,कोणतं कार्य कधी करायचं ते ठरवणं,
कामासंदर्भातल्या अपेक्षा ठेवणं,प्रतिनिधिक गोष्टी ठरवणं,निर्णय घेणं,विश्लेषण करणं थोडक्यात सांगायचं तर व्यवसाय उत्तम तऱ्हेने चालवण्यासाठी एका कार्यकारी अधिकाऱ्याला प्रभुत्व मिळवण्यासाठी गरजेची असलेली जवळ जवळ सगळीच कौशल्यं मेंदूजवळ असतात आणि खेळामुळे ही कौशल्यं अधिक उजळून निघतात.

हॅलोविल लिहितात : पृथ्वी गोल आहे हा शोध कोलंबसला लागला तेव्हा तो खेळातच रमलेला होता. सफरचंदाच्या झाडावरून एक सफरचंद खाली पडताना न्यूटनने पाहिलं आणि गुरुत्वाकर्षणाच्या ताकदीचा शोध त्यांना लागला,त्या वेळी तेही काहीतरी खेळतच होते. वॅटसन आणि क्रिक डी.एन.ए.मॉलिक्यूलच्या संभाव्य आकाराबद्दल खेळकरपणे चर्चा करत होते,त्याच वेळी त्यांना डबल हेलिकसच्या संरचनेची कल्पना आली. Iambic meter या संकल्पनेशी शेक्सपिअर आयुष्यभर खेळले.मोझार्ट यांनी त्यांच्या हयातीतला जागेपणीचा एक क्षणही खेळाशिवाय वाया घालवला नाही.
आईनस्टाईन यांचे 'थॉट एक्सपरिमेंटस्' हे स्वतःच्या मनाशी खेळण्याचं उत्तम उदाहरण आहे.

शिकारीसाठी भरपूर वेळ लागायचा.या गरजेतूनच शोध लागत गेले.शेवटी गरज ही शोधाची जननी असते.शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे,की प्राण्यांना केवळ पन्नासच्या आसपास शब्द कळू शकतात.पण म्हणून त्यांच्याशी न बोलणे किंवा संवाद साधण्याचा प्रयत्नदेखील न करणे चुकीचे आहे.केवळ मनुष्यच एकमेकांशी संवाद साधू शकतात,असा विचार करणे पूर्णपणे चूक आहे.दोन जीवांमधला संवाद हा भाषेच्या मर्यादा ओलांडून जातो शब्द पोहोचले नाहीत तरी भाव नक्की पोहोचतो.प्राणी कोणता का असेना,पाळीव कुत्रा असो नाहीतर जंगली हत्ती,नुसते त्यांच्यासमोर उभे राहून संवाद साधला जात नाही,तर त्यांना प्रतिसाद देणे तितकेच महत्त्वाचे असते.त्यांना प्रतिसाद दिला,की तुमचा संवाद पूर्ण होतो.इतर सगळ्यांसारखाच प्राण्यांमध्ये संवाद हा दोन्हीबाजूंनी,विचारांची,संभाषणाची देवाणघेवाण करून होतो.जर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले नाहीत,तर संवाद पूर्ण होत नाही.इतकी ही साधी गोष्ट आहे,पण लक्षात लवकर येत नाही.

'जमात' (Community) हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. माणूस एकटा राहत नाही.तो जमावात,समाजात राहणारा प्राणी आहे.त्यामुळे भाषा हे महत्त्वाचे संपर्क साधन आहे.पृथ्वीतलावरील एकमेकांशी संपर्क साधण्याची सर्वोत्तम क्षमता असणारा 'मानव' हा प्राणी आहे.संवाद ही आपल्याला उत्क्रांतीने दिलेली देणगी आहे.आपला आवाज,कान यांचा वापर करून आपण माहितीची देवाणघेवाण करतो. १९६० पर्यंत ५०% लोक वाचायला शिकले.त्यामुळे संपर्काचे सगळ्यात उत्तम साधन म्हणजे 'बोलणे' हे विसरून आपण लेखनाकडे वळू लागलो आहोत.लिहून आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवू लागलो आहोत.

समूह एकत्र येऊन शिकार करू लागले.एकोप्याची ताकद त्यांच्या लक्षात आली.समूहाने राहिल्यामुळे रोगांची संख्या वाढली,त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं व मग भिती मधून अंधश्रद्धे मधून अलौकिक शक्तीला शरण जाणं आलं.

माणसा-माणसातील नाते हे वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होत असते.उदा.हस्तांदोलनाने सुरू होणाऱ्या वाटाघाटी यशस्वी होण्याची अधिक शक्यता असते.
मेंदूच्या कार्याविषयी झालेल्या संशोधनात असे आढळले की, आमने सामने (फेस टू फेस) प्रत्यक्ष संभाषण झाले तर ते स्वीकारण्यासाठी आवश्यक ती मानसिकता तयार होणे वा समोरच्या व्यक्तीचे विचार वा भावना समजून घेणे यासाठी मेंदू अधिक सक्रीय होतो, सहानुभावासाठी,दुसऱ्याला समजून घेण्यासाठी ही क्षमता आवश्यक असते आणि ती फक्त मनुष्य जातीलाच मिळाली आहे.

अगोदर कुत्रा चावल्यानंतर लाखो लोक मरायचीत.हे सर्व होत असताना आपण विज्ञाकडे हळूहळू वाटचाल करीत होतो.जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा विज्ञान होतं फक्त त्याला नाव मिळायचं होतं.डॉक्टरांनी शास्त्रज्ञांनी मिळून त्यावर संशोधन केलं आणि रॅबिज या लसीचा शोध लागला.आणि या रोगाने फुकट मारणारी बुद्धिमान अशी प्रजाती मरायची थांबली.

समुद्री पक्षी जर चोचीत मासे घेऊन उडत असतील, तर जवळपास जमीन नक्कीच आहे याची खलाशांना खात्री पटायची.कारण पक्षी चोचीत मासे आपल्या पिलांसाठी घेऊन जातात आणि ती पिल्ले जमिनीवरच असतात.काही पक्ष्यांची उडण्याची क्षमता जास्त नसते. त्यामुळे ते जमिनीपासून फार लांब जात नाहीत. हा ही स्वभाव खलाशांच्या लक्षात आला होता.फ्लॉकी - वल्गॲडर्सन नावाचा एक दर्यावर्दी होता.आईसलंडच्या शोधाचे श्रेय यालाच दिलं जातं.तो आपल्याबरोबर रावेन नावाचे पक्षी घेऊन जायचा. जमीन जवळ आली आहे अशी शंका आली की पिंजऱ्यातला एक पक्षी सोडला जायचा जर जमीन जवळ असेल तर तो पक्षी जमिनीच्या दिशेने उडत जायचा आणि मग वल्गॲडर्सन आपल्या बोटी त्या पक्षाच्या मागोमाग न्यायचा.पण जमीन जवळपास नसेल तर मात्र तो पक्षी बोटीवरच घिरट्या घालून परत बोटीवर उतरायचा.

तांत्रिक ज्ञानाच्या बाबतीत चिंपांझी व आपण यांच्यात खूप फरक आहे हे खरं तरीही तंत्रज्ञानातील प्रगती ही फक्त १५०,०० वर्षे इतकीच जुनी आहे.उत्क्रांतीच्या प्रक्रियेच्या वेगापेक्षा तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग हा खूप जास्त आहे.आपला दिवस विज्ञान शिवाय सुरू होत नाही व संपतही नाही.पूर्वीच्या काळी असणारी सामाजिक परिस्थिती आणि आज असणारी सामाजिक परिस्थिती यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे.पूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज शक्य झालेल्या आहेत.

मोबाईल, संगणक,ए आय एप्लीकेशन,वेगवेगळे अँप ॲमेझॉन सारखी शॉपिंग सेंटर या शोधाने आपलं जीवन सुखाचं आणि आनंदाचं केलेलं आहे.आपण जगातील कोणत्याही टोकावरती असलेल्या माणसाची काही मिनिटांमध्ये संपर्क साधू शकता.गुगलवर आपल्याला हवी तेवढीच माहिती एका टच वर मिळवू शकतो. माहितीचा हा समुद्र आपल्याला हवी तेव्हा माहिती देण्यास तत्पर आहे.आता अंधारही पूर्वीसारखा अंधार राहिलेला नाही.रात्र सुध्दा आपण विजेचे बल्ब लावून पांढरी केलेली आहे.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत असणारे नाविन्यपूर्ण शोध त्यासोबत तंत्रज्ञानातील रोबोट्स यामुळे मानवी जीवनाला वेदना मुक्त होण्यास सुखकारक ठरत आहे. विज्ञानामुळे व तंत्रज्ञानामुळे मानवी आयुष्यामध्ये वाढ झालेले आहे आत्ताच्या जगामध्ये मृत्यू सहज होत नाही. प्रत्येक रोगावर इलाज आहे.जंगलापासून बहुमजली इमारतीपर्यंतचा प्रवास हा विज्ञानामुळे सहज सोपा झालेला आहे.तंत्रज्ञानामुळे हा प्रगतीचा वेग वाढला आहे पण तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या समस्या सोडण्या इतके आपण पूर्णतःसक्षम नाही.

तंत्रज्ञानाचा वारेमाप वापर आपणाला स्वतःपासून व समाजापासून खूप दुर घेऊन जात आहे.मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागलेले आहेत.यासाठी मोबाईल वापरणे बंद करायचं नसून त्याचा वापर मर्यादित ठेवायचा असा आहे.वयस्कर लोकांना या नवीन व्यसनामुळे त्यांच्यात विसरभोळेपणा,निर्णयक्षमता कमी होणे,मानसिक अस्थैर्य आणि अस्वस्थपणा,चिडचिड ही लक्षणं तर दिसतातच,पण मानदुखी,पाठदुखी,दिसण्याचा त्रास, चकरा येणे,डोकेदुखी,निद्रानाश असे अनेक विकारही होतात.नवीन संशोधनात असं दिसून आलंय की त्यांच्या मेंदूची झीजही वाढते.मानवी मेंदूला विविध प्रकारच्या संवेदना होणे,अनेक प्रकारच्या उत्तेजना (स्टिम्युलस) मिळणे आवश्यक आहे,ते न मिळाल्यास मेंदूच्या पेशींची वाढ खुंटते,आहेत त्याही पेशी निकामी व्हायला लागतात. दिवसभर स्क्रीन-मोबाईलकडे बघत राहणे हे एकच काम करण्यानं मेंदूला इतर कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा होत नाही. हे फार भयंकर आहे.
अगदी श्रीमंतांपासून ते गरीब-वंचितांपर्यंत, दीड-दोन वर्षांच्या बाळांपासून ते नव्वदीतल्या स्त्री-पुरुषांपर्यंत अनेकांना या व्यसनानं गिळून टाकायचा प्रयत्न चालवलाय.(डॉ.राजश देशपांडे न्यूरोलॉजिस्ट पुणे-मुंबई) त्यामुळे लवकरच हॅप्पी स्वीच ऑफ करा.

फ्रान्स दे वाल यांनी मला एका रशियन महिला शास्त्रज्ञाची गोष्ट सांगितली.त्यांनी एक चिंम्पाझीच एक पिल्लू पाळलं होतं.ते एकदा घराच्या छपरावर जाऊन बसलं.काही केल्या ते खाली उतरेना.तिने त्याला छानशा ताज्या फळांचं आमिष दाखवलं तरीही ते बघेना! मग तिने एक युक्ती केली.आपल्याला काहीतरी लागून वेदना होतायत,असं दाखवत ती खोटं खोटं रडत जमिनीवर मटकन बसली आणि काय आश्चर्य,ते पिल्ले धावत खाली येऊन,तिला मिठी मारून तिची समजूत घालू लागलं.जणू तिचं दुःख त्याला कळलं होतं. उत्क्रांतीतला आपला सगळ्यात जवळचा नातेवाईक. चिंम्पाझीमध्ये सुध्दा केळी खाण्यापेक्षा सहानुभावाची भावना अधिक जास्त प्रमाणात असते,हेच वावरून सिद्ध झालं.

जीवाश्मशास्त्रज्ञ (Paleontologist) सिमॉन कॉनवे मॉरिस यांनी बायबलमधील Love the neighbours (शेजाऱ्यांवर प्रेम करा), वचनाचा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असा अर्थ लावला आहे की हे वचन म्हणजे समाजातील जोडून राहण्याच्या प्रक्रियेतील एक पायरीआहे.पावित्र्य,संयम,दया,
परिश्रम,नैतिक बांधिलकी,नम्रता इ. गुण हे समाजात एकत्र राहण्यासाठी आवश्यक असणारे गुण आहेत.

इतिहासातील कुठल्याही धर्माची मूलतत्वे पाहिली तर दुसऱ्याकडून तुम्ही जशी वागण्याची अपेक्षा करता,
तसेच तुम्ही इतरांशी वागा.

शेवटी जाता जाता…

श्रीमती इला भट्ट या एक श्रेष्ठ दर्जाच्या आणि द्रष्ट्या आवश्यकतावादीक नेत्या आहेत.त्यांच्या कामाचा आणि उल्लेखनीय कामगिरीचा वारसाही तितकाच श्रेष्ठ दर्जाचा आहे. 'Indira Gandhi Prize for Peace' सारखा प्रतिष्ठित पुरस्कार तर त्यांनी मिळवलेला आहेच शिवाय भारतातल्या गरीब स्त्रियांच्या उद्धारासाठी,त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या डझनभराहूनही अधिक संस्था त्यांनी स्थापन केल्या आहेत.हिलरी क्लिंटन यांच्या काही 'पर्सनल हिरॉईन्स' पैकी एक म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जातं.त्या म्हणतात,

"माणसाच्या अनेक गुणांमध्ये त्याचा साधेपणा हा गुण मला सर्वाधिक प्रिय आहे.इतका जास्त प्रिय की साधेपणामुळेच अनेक वैयक्तिक आणि जागतिक समस्या सुटू शकतात,यावर मला मनापासून विश्वास ठेवावासा वाटतो.जीवनाकडे बघण्याचा एखाद्याचा दृष्टिकोन अगदी साधा असेल,तर त्याला वरचेवर खोटं बोलावं लागत नाही.त्याला कधी कुणाशी भांडावं लागत नाही,कधी चोरी करावी लागत नाही.
हेवेदावे,संताप, शिवीगाळ,कुणाचा जीव घेणं या गोष्टींची त्याला गरजच भासत नाही.प्रत्येकाला पुरेसं,भरपूर मिळू शकतं. त्यामुळेसाठेबाजी,सट्टेबाजी,
जुगार खेळणं,कुणाचा तिरस्कार करणं या गोष्टींची गरजच नाही.तुमचं चारित्र्य सुंदर असेल तर तुम्हीही सुंदरच असता. साधेपणाचं हेच सौंदर्य आहे."

विज्ञान संप्रेषणातून जागरूकता वाढवणे.डॉ.दिपक शेटे,गणितायन लॅबचे निर्माते,महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
























२५/९/२५

ग्राम बोली / village dialect

आरपाटा…

बैलगाडी ओढण्यासाठी दोन चाकांची गरज असते. चाक दणकट होण्यासाठी साठीच्या खाली एक बूट असतं,त्यावर लोखंडी कणा ठेवला जातो. तो कणा साठीच्या बाहेर गोलाकार लाकडू असते,त्याला मणी म्हणतात.त्या मण्यामध्ये कणा बसवला जातो.
मण्याला लहान-लहान भोकं असतात.त्यामध्ये आर लाकडाच्या उभ्या दणकट पट्ट्या बसवल्या जातात.
त्या आर्‍यामध्ये बसवतात.आर झिजू नयेत म्हणून त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते त्याला धाव म्हणतात. 

ढकली …

बैलगाडीच्या साठीच्या पुढच्या तोंडाला एक आडवं लांब लाकूड लावलं जाते त्याला ढकली म्हणतात.या ढकलीचा उपयोग बैल पाठीमागे सरकायला लागला तर तो ढकलीमुळे मागे सरकणे थांबतो. 

दांडी …

बैलगाडीसाठी चाकं तयार झाली की ती ओढण्यासाठी बुट्याला साठीच्याखाली जो चौकोनी लाकडाचा ठोकळा असतो त्याला तीन भोकं पाडली जातात त्यामध्ये तीन साठीपेक्षा ५/६ फूट लांबीची लाकडं बसवली जातात.त्यावर जू ठेवलं जात.जू आणि बूट याला यटक घातलं जातं.त्यात बैल जोडून गाडी ओढली जाते.

आळदांडी…

गाडीला ज्या तीन दांड्या बसवल्या जातात.त्यापैकी दोन ज्वापेक्षा थोड्या लांब असतात.तिसरी दांडी ज्वापेक्षा कमी लांबीची,पण ज्वापर्यंतच्या लांबीची असते.या आळदांडीमुळे जू मागे सरकत नाही आणि यटकामुळे पुढे सरकत नाही. 

पिळकावणं…

गाडीला किंवा कोणत्याही औताला जे यटाक घातलं जातं ते ढिले राहू नये म्हणून दोन-फूट लांबीचा लाकडाचा दांडा चरकात घालून पिळलं जातो, जेणेकरून यटाक ढिल होत नाही.त्याला पिळकावणं म्हणतात.

जूपणी,खिळ ….

जूला दोन्ही बाजूला शेवटच्या टोकाला दोन भोकं पाडलेली असतात.त्यात दोन-तीन फूट लांबीचा लाकडी दांडा घालून वरच्या बाजूला जराजाड ठेवला जातो. जुपणीला बारीक रस्सीनं विणलेला ३/४ फुटाचा पट्टा बांधलेला असतो.जेव्हा बैल गाडीला जुंपतात,तेव्हा जू उचललं जातं.बैल जू खाली घेतात ज्वाच्या भोकात दोन्हीबाजूला जुपण्या बसवतात व जुपणीला घेऊन जुपणीत अडकवला जातो.
जेणेकरून बैलगाडी चालू झाल्यानंतर बैल इकडं-तिकडं हलत नाहीत.बैल सरळ चालतात.त्यामुळे इकडे-तिकडे झाल्यास खिळ बसते म्हणून जुपणी किंवा खिळ म्हणतात.

बूट …

बैलगाडीच्या साटीला आधार व दोन चाक जोडण्यासाठी त्यावर कणा ठेवला जायचा.असे चौकनी लाकूड असायचे त्यालाच बैलगाडी ओढण्यासाठी दोन दांड्या जोडल्या जायच्या त्याला बूट म्हणायचे. 

हिसकी …

खाली वाय आकार असलेली परंतु लांब काठी असते. त्या काठीचा उपयोग कोणतीही वस्तू दाबून धरण्यासाठी केला जातो त्याला हिसकी म्हणतात. 

कोळप …

पिकाची आंतर मशागत करण्यासाठी व पिकातील तण काढण्यासाठी ज्या औताचा उपयोग केला जातो त्याला कोळप म्हणतात.

फड …

फड तीन प्रकारचे असतात जेथे तमाशा असतो तो तमाशाचा फड,जेथे कुस्त्या चालतात त्याला कुस्त्यांचा फड,जेथे ऊस तोडतात त्या शेताला ऊसाचा फड म्हणतात. 

पास …

पूर्वी शेतातील तण गवत काढण्यासाठी कुळव किंवा फरांदीचा वापर केला जायचा त्याला दोन जानावळी असायची त्याला पास जोडलेली असायची त्यामुळे जमिनीतून खालून गेल्याने गवत तण मरून जाते. 

वसाण …

शेतात कुळव चालवताना कुळवाच्या किंवा फरांदीच्या पासत गवत अडकून पास भरकटायची जे अडकलेले गवत असायचे त्याला वसाण म्हणत. 

उंडकी …

पूर्वी पेरताना तीन किंवा चार नळ असायचे.पेरताना एखाद्या नळातून बी पडत नसेल तर त्याला उंडकी 
म्हणायचे.

आडणा …

वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवं लाकूड लावलं जायचं जेणेकरून दरवाजाचं दार जोरात ढकललं तरी उघडू नये.

फण …

कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी भोकं असतात त्यात फण बसवला जातो.फणाला मध्येच एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो.त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात.चाड्यातून बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडतं.फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते.त्याला फासळ म्हणतात.

भूयट्या …

जमीन भुसभुशीत असेल तर औत,कुळक,फरांदी,कुरी दिंडावर उभं न राहता मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचं.त्याला भूयट्या म्हणतात.

रूमण …

औत भूयट्या चालवताना दिंडाला मधोध एक भोक असतं त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवं लाकूड लावलं जातं. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.त्याला रूमण म्हणतात.

उभाट्या …

जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवलं जातं त्याला उभाट्या म्हणतात.

खांदमळणी …

बैलांचा महत्त्वाचा सण बेंदूर.बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामं, खरीपाची पेरणी ही कामं उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट केलेले असतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते.बैलाच्या मानेला साद हणतात. खांद्याला त्रास झालेला असतो म्हणून खांद्याला तेल, हळद,तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.

कंडा …

बेंदरादिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला कंडा म्हणतात. 

चाळ …

बैलाच्या मानेएवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला चाळ म्हणतात. 

शेंट्या …

बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात.
बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात. 

झूल …

बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते.त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात.त्याला झूल म्हणतात.

आंबवणी,चिंबवणी …

शेतात कोणत्याही रोपाची कांदा,वांगी,कोबी,फ्लॉवर, ऊस,लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते.त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते.रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते म्हणून दुसरे दिवशी पाणी दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते त्याला चिंबवणी म्हणतात. 

वाफा,सारा …

कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे करतात. वाफा किंवा सारा म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहानआकाराचा असतो त्याला वाफा म्हणतात,तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.

मोट …

पूर्वी शेतीला पाणी पाजण्यासाठी इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटारीचा शोध लागण्यापूर्वी मोटेचा वापर करत असत.मोट म्हणजे जाड पत्र्याचे एक चौकोनी साधारण ५० लीटर पाणी बसेल असे भांडं तयार करायचे,त्याला खाली तळात एक चौकोनी बोगदा ठेवला जायचा.त्यावर आत मोटेमध्ये उघडझाप होईल असे झाकण असायचे.विहिरीच्या एका भिंतीला दोन उभी व एक आडवं लाकूड कायम केलेले असायचे. त्याच बाजूला जमिनीवर उताराचा भाग तयार केलेला असायचा त्याला धाव म्हणत.जे आडवं लाकूड असायचं त्याला एक चाक बसवलेले असायचं.मोटेच्या वरच्या बाजूला एक साखळी असायची त्याला नाडा बांधायचा. (नाडा म्हणजे जाड ५०/ ६० फूट लांबीचा कासरा) मोटेच्या खालच्या बाजूला एक साखळी असायची त्याला सोल बांधले जायचे नंतर मोट विहिरीत सोडायची.त्याला दोन बैल जोडलेले असायचे.बैल धावेवरून मागे सरत आले की मोट पाण्यात बुडायची. मोट पाण्यात बुडली की मोटेत आत उघडझाप होणारे जे झाकण असते ते उघडायचे.मोट पाण्याने भरली की नाडा,सोल यांना ताण यायचा.मोट भरली की बैल धावेवरून पुढे हाणायचे.मोट विहिरीच्या वर आली की पाणी थारोळ्यात पडायचे. (थारोळं - दगडी बांधकाम केलेला चौकोनी हौद) ते पाणी पाटात,शेतात जायचं. पुन्हा मोट मागे बैल सरकवत न्यायची. पुन्हा वर आणायची ही क्रिया दिवसभर चालवून शेताला पाणी दिलं जायचं.

पांद 

शेतात जाण्यासाठी दोन्ही बाजूला झाडी आणि मधून चिखलमातीचा जो रस्ता. 

व्हाण 

पूर्वी चटणी तयार करण्यासाठी किंवा कालवणाचा मसाला तयार केला जायचा ते जमिनीत रोवलेला मध्ये खोलगट भाग असलेला मोठा दगड असतो.खोलगट असून ते बारीक करण्यासाठी लाकडी मुसळाचा किंवा लोखंडी ठोंब्याचा वापर केला जायचा.

मांदान 

स्वयंपाक करताना खरकटं पाणी टाकण्यासाठी चुलीजवळ एक चौकनी खड्डा केला जायचा. त्याला पांढर्‍या मातीचे प्लॅस्टर केलं जायचं त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नव्हतं.त्या मांदानात खरकटं पाणी टाकलं जायचं त्याला मांदान म्हणत.

दुपाकी घर 

मध्ये उंच भाग त्याला आड म्हणतात.त्या आडाच्या दोन्ही बाजूला उतरता पत्रा किंवा कौलं टाकून पाणी पडण्यासाठी जे घर असते ते दुपाकी. 

पडचीटी…

दुपाकी घराला लागूनच एकाच बाजूला पाणी पडेल असा जो निवारा केला जातो. 

वळचण 

घराच्या उतरत्या भागावरून जे पाणी पडते तो पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला असतो त्यामुळे पाणी घरापासून लांब पडते. या वळचणीला जनावरे, लोक निवार्‍याला उभी राहतात.

गुंडगी …

गाडग्याचा सर्वात छोटा अवतार 

उतरंड …

घरात ज्या छोट्या-छोट्या वस्तू असायच्या त्या या गाडग्यात भरून उतरंडीला ठेवायच्या.उतरंडीची रचना सर्वात मोठं गाडगं तळात नंतर लहान,लहान असे ठेवत १०/११ गाडगी एकावर एक ठेवायची व शेवटच्या गाडग्यावर झाकण म्हणून गुंडगीचा उपयोग व्हायचा. 

पाभरी …

पितांबराच्या वर नेसण्याचे वस्त्र असते.

कणींग …

कळकाच्या कांब्यापासून पिंपासारख्या आकाराचे धान्य ठेवण्यासाठी केलेले असते त्याला आतून बाहेरून शेणाने सारवले जायचे. 

कणगूले …

कणगीचा छोटा आकार परंतु जाडीने जास्त. टोपलं - पूर्वी भाकरी ठेवण्यासाठी कळकाच्या कांब्यापासून घमेल्याच्या आकाराचे तयार केलेले असे.

चुलवाण …

उसापासून गूळ तयार करण्यासाठी गोलाकार आतून पोकळ उंच असा भाग बांधलेला असतो त्याच्या एका बाजूला जळण टाकण्यासाठी दरवाजा ठेवलेला असतो. 

काहिल …

काहिल चुलवाणावर ठेवली जाते.ऊसाचा रस तयार झाला की,तो काहिलीमध्ये टाकला जातो.नंतर चुलवाणाला खालून जाळ घातला जातो.पातळ रसाचे घट्ट गुळात रूपांतर होते.वाफा - गूळ तयार होत आला की,काहिलीला दोन लांब लाकडं अडकवली जातात आणि ७/८ लोकांनी ती काहिल ओढत आणून तयार झालेला गूळ वाफ्यात ओतला जातो. 

ढेपाळ …

गोलाकार पत्र्यापासून तयार केलेले असते. १किलो,५ किलो,१० किलो अशा वेगवेगळ्या आकाराची असतात. त्यामध्ये गूळ भरण्यापूर्वी आतून तेल लावले जाते. ढेपाळ्यात गूळ भरतात.ढेपाळ्यात गूळ थंड झाल्यानंतर ते ढेपाळे पालथे केले की ढेप बाहेर येते.

बलुतं …

पूर्वी वस्तूविनिमयाची पद्धत होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. सुतार,लोहार,तेली,माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना बलुतं म्हणत.या बलुत्यांना शेतकरी आपल्या शेतात जे पिकेल ते थोडं थोडं प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे. 

तरवा …

कोणत्याही रोपाची लागण करण्यापूर्वी वाफ्यामध्ये रेघा ओढून कांदा,वांगी,फ्लॉवर,कोबी जे पाहिजे त्याचं बी पेरलं जातं.पाणी दिल्यानंतर १०/१२ दिवसांनी ते दिसायला लागतं. त्याला तरवा म्हणतात. 

लोंबी …

गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये गहू तयार होतो त्याला लोंबी म्हणतात.

सुगी …

ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही पीक काढायला आली की तो काढणींचा काळ होता त्याला *सूगी* म्हणत. 

खळं …

कणसापासून ज्वारी तयार करण्यासाठी शेतात गोलाकार भागावरची माती काढून त्याच्या मधोमध एक लाकूड रोवलं जायचं.त्याला तिवडा म्हणत.माती काढल्यावर तिवड्याभोवती बैल गोलाकार फिरवला की जमीन कठीण व्हायची.नंतर त्यावर कणसं टाकून बैल गोलाकार फिरवून त्यातील सर्व ज्वारी निघाली की वावडीवर उभं राहून वाढवायची. 

माचवा …

पूर्वी ज्वारीच्या शेताची कणसं आल्यानंतर पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधलेला माळा.

वगळ …

ओढ्याचा छोटा आकार. 

शिंकाळं …

मांजर,उंदीर यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी दही,दूध, तूप हे तुळईला अडकवून ठेवण्यासाठी वाकापासून तयार केलेलं असत. 

गोफण …

शेतात ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांचे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी दगड-माती मारण्यासाठी रश्शीपासून तयार केलेली असायची. 

सपार / छप्पर ….

जनावरांच्या संरक्षणासाठी शेतात लाकडं व पालापाचोळ्यापासून तयार केलेलं घर. 

बाटूक …

ज्वारीच्या शेतात ज्याला कणसं येत नाहीत त्याला बाटूक म्हणतात. 

पिशी ….

ज्वारीच्या कणसाचा हुरडा काढल्यानंतर जो भाग राहातो त्याला पिशी म्हणतात. 

झापा …

शेतात जनावरांच्या संरक्षणासाठी जे सपार तयार केलेलं असतं त्याला लावायचे दार म्हणजे झापा.

माळवं …

शेतात केलेला भाजीपाला 

पावशा …

पूर्वी एखाद्या वर्षी पाऊस कमी असेल तर खेडेगावात सर्व मुलं एकत्र जमत.गावाबाहेर जाऊन एखाद्या मुलाला नग्न करायचे.त्याच्या कमरेभोवती लिंबाचा पाला बांधायचा.डोक्यावर पाट ठेवायचा.पाटावर पिंड काढायची आणि गावात येऊन प्रत्येक घरापुढे 'पावशा ये रं तू नारायणा' हे गाणं म्हणायचं,मग त्या घरातील स्त्री पाण्याचा तांब्या व भाकरी घेऊन बाहेर येणार पाणी पायावर ओतणार आणि भाकरी चटणी देणार.सर्व जमवलेल्या भाकरी शेतात जाऊन खायच्या. 

कोठी घर …

वाड्यातले धान्याचे कोठार. 

परस …

वाड्याच्या पाठीमागे मोकळी जागा असायची, 
त्यामध्ये छोटी-मोठी झाड असायची. 

पडवी …

वाड्यात मधल्या चौकासभोवार जो वाड्याचा भाग असायचा त्याला पडवी म्हणत. 

भंडारी ….

घराच्या भिंतीत,खूप रुंद असलेल्या भिंतीतच एक चौकनी पोकळ भाग ठेवला जायचा त्याला छोटी दार- कडीकोयंडा असायचा.यामध्ये घरातील महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जायच्या.

आगवळ …

लहान मुलींचे केस लोकरीच्या धाग्याने वेणीसारखे बांधावयाचा धागा. 

वज्री …

आंघोळ करताना अंग घासायची घासणी.

कथळी …

चहाची किटली. 

चौपाळे …

सार्वजनिक जेवणात वेगवेगळ्या वस्तू एकाच भांड्यात ठेवून वाढल्या जायच्या ते भांडे.

बारनी …

खिडकीचा छोटा प्रकार असायचा त्याला बारनी म्हणत.

शेजर …

पूर्वी ज्वारी,बाजरी,आरगड,गिडगाप अशी धान्याची पिकं काढली म्हणजे एकत्र ठेवली जायची.ती एकत्र ठेवण्यासाठी कडब्याच्या पेंढ्या बांधून पेंढ्या एकावर एक ठेवून खोलगट चौकोन तयार केला जायचा त्याला शेजर म्हणायचे. 

बुचाड …

पूर्वी पीक काढल्यानंतर वाटायला वेळ नसेल तर कणसासह कडबा एकत्र लावला जायचा तो लावताना कडब्याच्या पेंढ्या खाली कणसं आणि वर बुडके असे लावले जायचे त्याचा आकार खाली रुंद आणि वर निमुळते असे त्रिकोणी आकाराचे लावले जायचे. जेणेकरून पावसापासून संरक्षण व्हावे याला बुचाड म्हणतात. 

गंज …

पीक काढल्यानंतर त्यांची कणसं काढून झाली की पेंढ्या बांधल्या जातात.त्या पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या चार्‍यासाठी होतो म्हणून त्या पेंढ्या एकत्र केल्या जातात व त्या आयताकार रचल्या जातात. निम्म्यात गेल्यानंतर वरचा भाग त्रिकोणी केला जातो. जेणेकरून ऊन,वारा,थंडी,पाऊस यापासून त्याचे संरक्षण होते.त्याला गंज म्हणतात. 

तलंग …

कोंबडीच्या लहान पिल्लाला तलंग म्हणतात. 

कालवड …

गाईच्या लहान पिल्लाला स्त्रीलिंगी असले तर कालवड म्हणतात व पुल्लिंगी असेल तर खोंड म्हणतात. 

रेडकू …

म्हशीचे लहान पिल्लू स्त्रीलिंगी रेडकू आणि पुल्लिंगी असेल तर टोणगा /रेडा म्हणतात.

दुरडी …

दुरडी कळकाच्या कांब्यापासून तयार करतात त्यातून पाणी गळते... धान्यात माती,कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे दुरडीत पाणी घेऊन किंवा पाण्यातच दुरडी हालवायची त्यामुळे माती केर-कचरा निघून जातो. 

हारा …

कळकाच्या कांब्यापासून विणून तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपलं म्हणतात,मोठ असेल त्याला हारा म्हणतात. जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.

बाचकं …

धान्य भरण्यासाठी पोत्याचा उपयोग केला जातो त्यात छोटं पोतं असते त्याला बाचकं म्हणतात. 
 
झोळणा …

पूर्वी पंचमीला मुली नागोबाला जायच्या तेथे फेर धरून खेळ खेळायच्या जाताना लाह्या,फुटाणे,शेंगदाणे एकत्र करून झोळणा भरायचा व त्यातील भेटेल त्याला थोडं थोडं खायला द्यायचं.झोळणा म्हणजे झोळीच्या छोट्या आकाराचा असायचा.

मोतीचूर …

हा एका ज्वारीचाच प्रकार आहे.परंतु हा मोतीचूर तव्यात टाकून भाजला की त्याच्या पांढर्‍या लाह्या तयार होतात.लाह्या तयार होताना त्याचा ताडताड आवाज येतो.त्या तव्याच्या बाहेर जाऊ नयेत म्हणून त्याला फडक्याने दाबून धरले जाते.

इराक्तीला,मुतायला ..

पूर्वी लघवी हा शब्द प्रचलित नव्हता.त्या वेळी स्त्रिया लघवीला जायचं म्हटलं की इराक्तीला म्हणायच्या.

वटकावण,सोबणी …

भाकरी भाजीत भिजू नये म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या बाजूला उंचवटा करायचा.हा उंचवटा करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा असायचा.त्यालाच वटकावण किंवा सोबणी म्हणत. 

खंडी …

२० मणाची खंडी. 

मण ….

४० शेराचा मण. 

पायली …

दोन आदुल्या म्हणजे पायली. 

आदुली …

आठ चिपटी म्हणजे एक आदुली.

मापटं …

एक शेर म्हणजे मापटं. 

चिपटं …

दोन चीपटं म्हणजे एक मापटं. 

कोळव..

दोन कोळवी म्हणजे एक चीपट.

संग्रहित ठेवून संस्कृती जपूया.....
श्री.भागवत सोमेश्वर भंगे

'तरीपण केलया धाडस मी' अनिल फारणे

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खूप वर्षांनी आठवली!

शाळा तर कधीचीच संपलीय,पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहिलीय!!

"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेच!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेच!
आता समानार्थी भाव,विरुद्धार्थी बनलेत,
अन् अर्थांचे अनर्थ झालेत!!

"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्न पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्र,
आजही रिकाम्याच राहिल्यात!!

पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्याच!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्न,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..

"संदर्भासहित स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

"कवितेच्या ओळी पूर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्न!
आजही शोध सुरू आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पूर्णत्व आयुष्याला!!

"निबंध लिहा", किंवा "गोष्ट लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरून गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्र नियतीच ठरवणार!!

तेव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्न "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्र नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्न ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खूप वर्षांनी आठवली...
तेव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!

१४.०५.२०२४ या लेखातील दुसरा शेवटचा भाग…




२३/९/२५

सुखाचा चहा / happy tea

"रस्त्यातच त्याला पावसाने गाठलं,.आधीच सकाळपासून वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली,..रस्ता तसा रोजचा परिचयाचा पण कधी थांबाव लागलं नव्हतं,..ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला,..पत्र्याच्या शेड खाली,..छोटीशी चहाची टपरी होती,.. तसही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातावरणही छान होतं,..हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता,....."


टपरीवर एक जोडपं आणि छोटं मूल होतं,.. ते मूल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं,.. मध्येच ओला हात आई बाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ हे दोघे हसून बघत होते,..,..त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला,..एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला,.. त्याच त्यालाच छान वाटलं,..समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागे उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर,....चिंब पावसात धूसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला,....बायकोचाच त्याने कट केला सकाळपासून हा पाचवा फोन तिचा. काहीतरी चुका करत राहते आणि आपला मूड घालवते लग्नाला अजून चार महिने नाही झाले पण बोअर झालं हे सहजीवन या भावनेने त्याने फोन कट केला,..,.


तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरीवाला समोर आला,...आणि तितक्यात त्या बाई कडून काही ग्लास सुटले हातातून आणि त्या शांत वातावरणात खळकन आवाज झाला,..ते मुल क्षणभर थबकलं पाण्यात खेळताना,..तर त्या माणसाने हाताने आणि मानेनेच इशारा केला त्याला काही नाही खेळ तू,..आणि तो काचा भरू लागला,..तिने आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली,..तर त्याने फक्त डोक्यावर हात ठेवला,..एकूण चार पाच ग्लास फुटले होते म्हणजे आजची कमाई नक्की शून्य,..पण तो माणूस शांत होता,..आता ह्याची बेचैनी अजून वाढली,..ह्याला सकाळचा प्रसंग आठवला,..आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती चिडलो,....


बोललो तिला पण ती शांत होती,.. ह्या वातावरणासरखी आणि आपण ह्या चहासारखं गरम,.. शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातून निघत होत्या,..आपलं तर फारस नुकसानही नव्हतं,..पण आपण किती रिॲक्ट झालो,...त्यामुळे दिवसभर देखिल आपला मूड खराब होता,... आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला,..खूप काही शिकल्यासारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून,..तो पैसे द्यायला काऊंटर जवळ आला,..वीसची नोट देताच चहावाला म्हणाला,"सर सुट्टे नाही माझ्याकडे 10 रु द्यायला.... तुमच्याकडे असतील तर बघा,....त्याने खिसा तपासला पण नव्हते सुट्टे,.. चॉकलेट देऊ चहावाला म्हणाला,"त्यावर हसून ह्याने नकार दिला,..आणि म्हणाला,.." असू द्या तुम्हाला नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिली,..ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरात,.."


 चहावाला हसून म्हणाला,.."तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करते कधीतरी चूक होणारच आपल्याकडूनही होते फक्त आपल्याला रागावणार कोणी नसतं,.... आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर अस रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी,..आयुष्य क्षणभंगूर आहे होत्याचं नव्हतं कधी होऊ शकतं,..आता हिलाच बघा ना लग्नाच्या वेळी डोळस होती ती आणि  एकाएकी दृष्टी गेली,...डॉक्टर म्हणाले," येईल दृष्टी परत.." पण कधी ते नक्की नाही,...खूप वाईट वाटलं,..माझी चिडचिड होत होती,...एकदिवस तिनं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणाली,"आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा,..मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे,..त्या दिवसापासून ठरवलं किती नुकसान झालं तरी तिला रागवायच नाही,...माणूस नेहमी स्वतःच्या बाजूनी विचार करतो ना सर,..थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येत सगळं,..."


ह्याला आता जास्त आश्चर्य वाटलं अंध बायको असून किती शांतपणे स्वीकारलं आहे सगळं,... आपण तर जणू चिडणं हा आपला अधिकार आहे अश्या अविर्भावात असतो सतत,....आपली बायको सकाळी किती घाबरली होती,...त्याला आठवलं खरंतर रात्रभर पाय दुःखतात म्हणून कुठले तेल घेऊन मालिश करत बसली होती,.. मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो त्यालाच एकदम भरून आलं,.... त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मघापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबलापाशी आली आणि म्हणाली,"दहा रुपये सुट्टे नाहीत तर हा गजरा घ्या,....कुणाचे फुकट पैसे नाही ठेवत आम्ही,..

तसही कपाने महाभारत झालं म्हणता घरात ह्या गजऱ्याने मिटवून टाका,..कसं आहे कपातलं वादळ लवकर मिटलं तर संसारात, म्हणजे मजा असते नाही का,....?"


 इतक्या बारीक चुका पकडून जर संसार केला तर संसारात एकमेकांना जी मोकळीक द्यायची ती दिली जाईल का,..? साहेब याच रोडवरून रोज येणं जाणं असेल तर येत जा अधून मधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला,..तो बघतच राहिला त्या जोडप्याला,..एकमेकांना शारिरीक गुणांनी विसंगत असलं तरी समजून घेणार जोडपं,...आता मुलाला आंनदी होड्या बनवून देत होत आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीने ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती,...हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं,.....


 त्याने गजरा घेतला आणि वीस रुपयात खूप काही मिळालं ह्या भावनेने निघाला,.. गाडीला किक मारताना सहजच टपरीची पाटी बघितली,..त्यावर नाव होतं "सुखाचा चहा..." 


स्टोरी लॉकडाऊन ची.. 

स्टोरी कोल्हापूरकरांच्या माणुसकीची.. 


पुणे रिटर्न असल्यामुळं, सीपीआर मध्ये पहिला स्वॅब घेतला..दोन दिवसांनी रिपोर्ट निगेटिव्ह आला..पण ताप असल्यामुळं १४ दिवसांचा इथंच क्वारंटाईन चा शिक्का बसला..

गावी यायचं होत लगेच मला.. पण शिक्का बसल्यामुळं इथंच थांबाव लागलं.. मुंबई मध्ये सध्या राहणाऱ्या माझ्या कोल्हापूरच्या मित्राला हे समजल्यावर त्याचा कॉल आला,

बोलला, "भावा नागाळा पार्कात माझा फ्लॅट हाय.. बिल्डिंग मध्ये बाकी कोणी नसतंय त्यामुळं तू बिनधास्त जाऊन राहा तिथं..

आणि काय लागलं तर पहिला सांगायचं काय.. भाऊ आहेस तू आपला.. काकींशी ( माझ्या आईशी ) पण बोलतो मी.. पत्ता पाठवतो तुला.."इतकं बरं वाटलं ना या धीर देणाऱ्या त्याच्या शब्दांमुळं.. मग इथल्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि गेलो तिथं.. आता आलोय इथं तर म्हटलं, जेवणाचं कसं करायचं.. हा प्रश्न होता.. मित्राला बोलायच्या आधी बघूया म्हटलं इथ जवळपास कुठून पार्सल मिळतंय का ते..


गॅलरीत उभा होतो.. खालून एक वयस्कर काका चाललेले..

त्यांना हाक मारली आणि सांगितलं कि,

"काका असं असं आहे न मी बाहेर पडू शकत नाही..इथं

जवळपास कुठून जेवणाची सोय होईल का?"

त्यांनी मास्क काढला.. वर माझ्याकडे बघितलं.. चेहऱ्यावर स्मितहास्य आणून खिशातून लगेच मोबाईल काढला.. 

बोलले, "थांब नंबर देतो तुला.."

"गणेशरावांचा नंबर आहे हा.. त्यांचं जवळच हॉटेल आहे इथं.. ते करतील जेवणाची तुझी सोय "

इतकं बोलले आणि गेले ते.. 

मी फोन केला त्या नंबर वर त्यांनी पत्ता विचारून लगेच जेवणाची सोय केली.. आता महत्वाचं कि,

१४ दिवस काढायचे होते इथ मला.. खिशात पैसेही थोडेच.. ४ दिवस गणेश रावांकडून मागवलं मी जेवण..

५ व्या दिवशी बघतोय तर पाकिटात पैसे थोडेच शिल्लक.. विचार करत करत गॅलरीत आलो.. 

नेहमीप्रमाणे ते काका तिथून जात होते.. 

त्यांनी हाक मारली मला.. बोलले, काय कस काय चाललंय?


मी म्हटलं ठीक काका.. आणि परत पुढचा विचार करत बसलो.. 

काकांना बहुतेक कळालेलं कि कायतर प्रॉब्लेम आहे.. 

म्हणून खोचून विचारलं आणि त्यांनी.. मग सगळं सांगितलं मी त्यांना.. 

काकांनी विठोबासारखं दोन हात कमरेवर ठेवले आणि म्हणाले, "माझा मुलगा आर्मीत आहे मुला.. तुझ्याएवढाच.. तो जर तिथं राहून देशाची रक्षा करत असेल तर मी काय इथं माझ्या मुलांची रक्षा करू शकत नाही.."

लगेच फोन करून त्यांनी त्या गणेश रावांना बोलवून घेतलं तिथं.. 

दोघे बोलत होते.. मला इतकं काही ऐकू येत नव्हतं वर.. 

बहुतेक माझी सगळी परिस्थिती सांगत होते ते त्यांना..

काका बोलले, मी बोललोय यांना थोड्यावेळात तुझं जेवण येईल.. आणि खरच एका तासात गणेशराव माझ्या बिल्डिंग च्या खाली.. पार्सल घेऊन.. 

त्यांना कळकळीनं मी म्हटलं,दादा सध्या तुम्हाला द्यायला माझ्याकडं पैसे नाहीत ओ..

त्यानंतर सेम त्या काकांसारखं.. 

वर बघून, स्मितहास्य देऊन त्यांचे ते शब्द,

"पैश्याचं काय एवढं घेऊन बसलाय दादा.. माणुसकी आहे कि तेवढी आमच्यात.."

त्यावर काय पुढं बोलावं मलाच समजेना..

५ व्या दिवसापासून ते १४ व्या दिवसापर्यंत.. सलग १० दिवस पार्सल येत होत त्यांच..

कुठला कोण मी त्यांच्या ओळखीचा ना पाळखीचा..

ते काका पण रोज जाताना विचारपूस करायचे.. 


१५ व्या दिवशी मी माझ्या गावी आलो..

घरी आई बाबांना ही सगळी स्टोरी सांगितली.. 

बाबांनी लगेच माझ्या त्या मित्राला, त्या काकांना ज्यांचा नंबर घेऊन आलेलो मी आणि गणेशरावांना कॉल केला, सर्वांचे आभार मानले आणि गणेशरावांचे  गुगल पे वरून जेवणाचे १० दिवसाचे पैसे लगेच ट्रान्स्फर केले..


खरं सांगायचं तर.. हो नक्कीच, कोरोना मूळ आपल्या सगळ्यांवर एक वाईट वेळ आलेली आहे.. 

पण जोपर्यंत आपण आपली माणुसकी टिकवून आहे ना.. तोपर्यंत कोरोनाच काय.. अशा कितीतरी महामारी आल्या तरी त्या आपल्याला हरवू शकत नाहीत..


" विसरलेले पाकीट ! "


असाच एके दिवशी ऑफीसला निघालो. किल्ली, रूमाल, लॅपटॉप, टिफीन सगळं घेतलंय...जाताना बायकोला एक फ्लाईंगही दिलाय. तीही नई नव्हेली दुल्हनसारखी लाजलीये... 

दिवसाची लई भारी सुरवात...


गाडी सुरू केली. पेट्रोलच्या काट्यानं मान टाकलेली. पम्पम् करत गाडी पेट्रोल  पंपावर...


" दोनशेचं टाक रे."


त्यानं गाडीच्या टाकीत भुरूभुरू पेट्रोल ओतायला सुरवात केली. मी पँटच्या खिशात हात घातला. तिथली जागा रिकामी! आयला...


पाकीट विसरलो.


वरच्या खिशात हात घातला.

तो ही रिकामा...


आयला.... फोनही विसरलो. माझा चेहरा पार ऊतरला. आजूबाजूला पाहिलं कुणीही ओळखीचं दिसेना. प्रचंड लाज वाटायला लागली. तसा हा पंप ओळखीचा. घरापासून दीड किलो मीटरवर गेली वीस वर्ष इथंच पेट्रोल भरतोय...


पण हे एकतर्फी प्रेमासारखं !


आता पंप ओळख देईल, याची गॅरंटी वाटत नव्हती. दातओठ खावून निर्णय घेतला... ठरलं... गाडी इथंच लावायची. इथं साली रिक्षाही मिळत नाही. जाऊ दीड किलोमीटर चालत. घरनं फोन आणि पैसे घेऊ. बायको सोडेल इथपर्यंत...


प्रॉब्लेम एकच होता. पंधरा मिनटात क्लायंट ऑफिसला पोचणार होता. बॉस पेट्रोल शिवाय पेटला असता. माझं टेन्शन माझ्या चेहर्यावर  ओघळू लागलं. पंपावरचा माणूस खुदकन् हसला...


" होतं साहेब असं कधी कधी.. ऊद्या द्या पैसे."


माझ्या जीवात जीव. मी मनापासून त्याला थँक्स  म्हणलं. पुन्हा त्याला दिलसे थँक्स म्हणलं... 


ऑफीस गाठलं. मी पोचलो अन् पाचच मिनिटांत क्लायंट आला. दीड तास त्याच्याच सेवेत. तो पटला. गटला. मोठ्ठी ऑर्डर मिळाली. बॉसही हसला. त्याचं हसू म्हणजे मोनालीसाच्या हसण्यासारखं. गूढ आणि दुर्मिळ... 


चलो चाय हो जाए.. ऑफीसच्या खाली सद्रुची टपरी. ऑफीसपेक्षा मला त्याच्याकडचा चहा आवडतो. मनप्रसन्न काही घडलं की मी तिथला चहा घेतो. मी जिना ऊतरून खाली. मस्त अद्रकवाली चाय. घुटक घुटक संपवली. खिशात हात घातला...


आपण पाकीट विसरलो हेही विसरलो


सद्रूनं माझा चेहरा वाचला. सद्रूला काही म्हणणार...


एवढ्यात त्यानंच माझ्या खिशात, शंभराच्या पाच नोटा कोंबल्या.


काय बी बोलू नका साहेब. रोजच्या गणगणीत विसरतं माणूस...


अजून लागले तर सांगा. तुमास्नी ऑफीसमधी कुणीबी दिले आस्ते. पर तुमी कुणाला पैसे मागावे, मला नस्तं आवडलं. उद्या देतो, म्हणून मला तरास देवू नका. जावा बिगीबिगी. साहेब कावतील तुमचं...


मी चिडीचूप्प. हलक्या पावलानं ऑफीसला परतलो. वरच्या खिशाला पाचशेची ऊब होती...


त्या पाचशे रूपयांनी मी अंबानीहून श्रीमंत झालेलो.


दीड वाजत आला. लंचटाईम झाला. एवढ्यात बायको ऑफीसात. घामाघूम झालेली. तुम्हाला नाही, मलाच काळजी... पाकीट, फोन विसरलात...


तसं तुमचं पैशावाचून काही अडणार नाही म्हणा. सगळी तुमचीच माणसं आहेत आजूबाजूला.


पण मला खूप लागलं असतं. शक्यतो मागायची वेळ येवू नये, आपल्या माणसावर...घ्या तुमची ईस्टेट, शंभर फोन येवून गेलेत त्याच्यावर...अन् तुमच्या त्या 'बचपन की सहेली' चा सुद्धा. गेटटुगेदर आहे म्हणे. तुमच्या ९१ च्या बॅचचं निस्तरा काय ते. मी चालले...


बायको पी.टी. उषापेक्षा जास्त वेगाने गायब. पाकीट खिशात ठेवलं...


आता तर मी भलताच श्रीमंत झालेलो.


 लंचटाईमनंतर बॉसच्या केबिनमधे. दार हलकेच लोटलं. केबिनमधे शिरणार तोच कानावर काही पडलं. बॉस बायकोशी बोलत होता...


" जानू , तुझा ड्रेस आणला असता गं नक्की. आज नेमकं वॉलेट विसरलोय. तुला दिसलं नाही का घरी..? "


ऊद्या नक्की. प्लीज. रागवू नकोस. मी केबिनबाहेर वेळ काढला. पावणेदोन मिनटात फोनवरचं बोलणं संपलं. नॉक करून आत गेलो...


पाकीटातल्या दोन गुलाबी नोटा बॉसच्या हातात कोंबल्या.


"थँक्स म्हणू नका सर.." पटकन् मागे फिरलो...


बॉसच्या चेह-यावरचा सुटकेचा आनंद, मी पाठीवरल्या डोळ्यांनी, डोळे भरून बघितला...*श


माझं पाकीट पुन्हा रिकामं...


तरीही मी डबलश्रीमंत...


साला श्रीमंतीचा माज करावा, तो रिकाम्या पाकिटांनी... भरल्या पाकीटात ती मजा नाही...


व्हाट्सअप च्या माध्यमातून या कथा माझ्यापर्यंत आलेल्या त्या जशा आहेत तशा तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत.