आता कॅम्पवर नाइट आणि अॅडा दोघंच उरतात.एक नवी लढाई सुरू होते.सुरुवातीचे काही दिवस नाइट उसना जोर आणून काम करतो;पण लवकरच त्याचं अवसान ओसरतं आणि त्याची प्रकृती झपाट्याने ढासळू लागते.एकदा बाहेर लाकडं आणण्यासाठी गेलेला असताना तो बर्फातच पडून राहिलेला अॅडाला दिसतो.त्याची शुद्ध हरपलेली असते.त्याला जागं करून अॅडा कसंबसं त्याला कॅम्पवर आणते.पण तेव्हापासून तो अंथरुणला खिळतो तो खिळतोच.नाइट मेला तर आपलं काय,हा भयकारी विचार अॅडाचा ताबा घेतो आणि आधी त्याच्यापासून चार हात लांब राहणारी अॅडा.त्याच्या शुश्रूषेला वाहून घेते.आता सगळी कामं तिच्यावरच येऊन पडतात.बाहेर लावलेल्या सापळ्यांमध्ये एखादा प्राणी अडकला आहे का ते पाहणं,लाकडं गोळा करणं,स्वयंपाक करणं,भांडी घासणं,पिण्याच्या पाण्यासाठी बर्फ गोळा करणं आणि आणखी शंभरशे साठ कामं.मधूनच सापळ्यात अडकलेला एखादा कोल्हा सोडला तर शिकार जवळपास नसतेच.त्यांच्याकडे असलेले खाद्यपदार्थ कसेबसे पुरवत नाइट आणि अॅडा तीन महिने काढतात. प्रत्येक दिवस अंगावर काटा घेऊन उगवत असतो; आजच्यापेक्षा कालचा बरा होता,असं वाटायला लावत असतो.आता नाइटला उठणं तर लांबच,जागच्या जागीदेखील हालचाल करणं शक्य होईनासं होतं.पुढे काय होणार याची चिन्हं दिसू लागतात;पण अॅडा तो विचारही मनात आणायला तयार नसते.रँगल बेटावर एकट्याने राहणं ही तिच्यासाठी अशक्य कोटीतली गोष्ट असते.धीर धरून ठेवण्यासाठी ती नवी युक्ती काढते.बेटावर आल्यापासून ती सर्वांना रोजनिशी लिहिताना पाहत आलेली असते. अगदी मरणासन्न अवस्थेतही नाइट आपल्या डायरीत काही तरी खरडत असतोच.आपणही डायरीत नोंदी केल्या नाहीत तर बाकीचे तिघं गेल्यावर आपण कोणत्या परिस्थितीत दिवस काढले हे कुणालाच कळणार नाही याची जाणीव अॅडाला होते.त्यामुळे ती स्वतःला नोंदी लिखाणात गुंतवून घेते.जसजशी नाइटची प्रकृती खालावू लागते,तसा धीर सुटून तो अॅडाला अद्वातद्वा बोलू लागतो,शिव्या देऊ लागतो.खरं तर
अॅडा हा त्याचा एकमेव आधार असतो.तीच त्याची शुश्रूषा करत असते,त्याला जास्तीत जास्त खायला मिळावं यासाठी धडपडत असते;पण स्कर्व्हीने ताबा घेतल्याने नाइट हे सगळं समजण्याच्या पलीकडे गेलेला असतो.पण स्वतःच्या स्वार्थापोटी अॅडा त्याही स्थितीत तो जिवंत राहावा यासाठी प्रयत्न करत राहते.
मे महिना उजाडतो.आसपास अॅडाला काही पक्षी दिसू लागतात.ते पकडण्यासाठी ती जंग जंग पछाडते.१० मे. त्या दिवशी अॅडाचा पंचविसावा वाढदिवस असतो;पण एखादा जास्तीचा पावाचा तुकडा आणि बड्या मुश्किलीने पकडलेल्या पक्ष्याचं मांस यावरच तो साजरा होतो.नाइटच्या तब्येतीत अजूनही सुधारणा नसतेच. आणखी एक महिना याच संघर्षात जातो. हळूहळू अॅडाला पक्ष्यांची शिकार जमू लागते.पण पक्षी असतातच किती? सहा जूनला नाइटचा तिसावा वाढदिवस असतो;पण तो दिवस उगवतो नाइटचा मृत्यू जवळ असल्याची बातमी घेऊनच.आज की उद्या? रात्री की दिवसा? नेमका कधी,एवढाच आता प्रश्न असतो. रोज सकाळी जाग आल्यावर नाइटपाशी येऊन पाहताना अॅडाचं काळीज लकलकत असतं.२१ जूनला नाइट पुन्हा एकदा बेशुद्ध पडतो.त्याचे रागरंग काही ठीक दिसत नसतात.अॅडा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत राहते.रडत-भेकत राहते.'प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नकोस',असं म्हणत आक्रंदत राहते.थोड्या वेळाने नाइट डोळे उघडतो आणि आपण आता ठीक असल्याचं अॅडा ला सांगतो;पण तो ठीक नाही हे आता उघड असतं.त्या रात्री अॅडा घाबरतच झोपी जाते. सकाळी उठून ती आधी नाइटच्या बिछान्याकडे धाव घेते.तिची भीती खरी ठरलेली असते.त्याचा श्वासोच्छवास थांबलेला असतो.रात्रीतून कधी तरी नाइटचे प्राण गेलेले असतात.आता पुढे काय ?अॅडाला पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे नाइटच्या मृत्यूची नोंद करायला हवी.गेल्या काही दिवसांपासून तिने गेलचा टाइपरायटर वापरायला सुरुवात केलेली असते.त्यात नवीन कागद घालून ती नाइटच्या मृत्यूची तारीख व वेळ नोंदवून ठेवते.
नाइटचा मृतदेह तिथून हलवणं अॅडासाठी अशक्य असतं.त्याला उचलण्याएवढी शक्ती तर तिच्या अंगात नसतेच,पण त्याच्यावर अंत्यसंस्कार करून बेटावरची उरलीसुरली मानवी सोबत नष्ट करण्याचं धाडसही तिच्यात नसतं. मेलेल्या का असेना पण माणसाची सोबत तिला हवी असते;पण मृतदेहासोबत त्याच खोलीत राहणं शक्य नसल्याने ती आपला मुक्काम स्टोअररूममध्ये हलवते.
आता मात्र अॅडा पूर्ण एकटी पडते.हजारो चौरस किलोमीटरच्या बेटावर पूर्ण एकटी.तिच्या डोक्यात हाच एक शब्द सतत घुमत राहतो.त्यातून बाहेर पडण्यासाठी ती स्वतःला रोजच्या कामात अडकवून घेते.जणू नाइट मेलाच नाही,असं मानून ती आधीचंच रूटिन चालू ठेवते.अगदी रोज संध्याकाळी आज दिवसभरात काय काय केलं ते नाइटला येऊन सांगण्यासकट.सकाळी खाणंं धुंडाळण्यासाठी बाहेर पडण्याआधी टाइपरायटरवर बसायचं आणि दिवसभर आपण काय काय करणार आहोत,कुठे कुठे जाणार आहोत,कधी परतणार आहोत याची नोंद करून ठेवायची.न जाणो चुकून-माकून नेमके आपण कॅम्पपासून लांब गेलेलो असताना जहाज आलं आणि आपल्याला न घेताच परत गेलं तर?
सकाळी बाहेर पडून किनाऱ्यापर्यंत जायचं आणि गोठलेल्या समुद्राकडे बघत बसायचं,हा तिचा एकमेव विरंगुळा बनतो.न जाणो आपण अशी वाट पाहत असतानाच क्षितिजावर आपली सुटका करायला आलेलं जहाज दिसेल,अशी दिवास्वप्नं तिच्या मनात रेंगाळत असतात.याच किनाऱ्यावर त्यांची स्किन बोट लाब्लेली असते.बेटाला वळसा घालून बेटावरच्याच दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी मोहीमवीर या बोटीचा वापर करत असत.अॅडानेही ही बोट एक-दोनदा वापरलेली असते. पण प्रत्यक्ष कुठे जाण्यापेक्षा ही स्किन बोट म्हणजे अॅडाच्या दृष्टीने मानसिक आधार असतो.या बेटावरून आपली सुटका होऊ शकते,असं त्या बोटीकडे पाहून तिला वाटत असतं.एके दिवशी सकाळी शिरस्त्याप्रमाणे
अॅडा किनाऱ्यावर येऊन पाहते,तर बोट गायब.रात्रीतून सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात बोट वाहून गेलेली असते.ते पाहून अॅडाचं अवसानच गळतं.त्या बोटीचा खरं तर तिला काहीही उपयोग नसतो.ती बोट घेऊन अॅडानोमला पोहोचू शकत नसते;पण तरीही नाइट गेल्यावर जसं भयाण,एकाकी वाटलं होतं तसंच तिला आत्ताही वाटतं.सलग दोन दिवस अॅडा त्या दुःखात बुडून राहते,रडत राहते.ना शिकारीसाठी बाहेर पडते,ना लाकडं गोळा करायला.पण लवकरच तिच्या लक्षात येतं,की हात-पाय हलवले नाहीत तर आपण खंगून मरू,बाकी काहीही घडणार नाही.मुलासाठी तरी आपल्याला जिवंत राहण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वतःची कीव करून काहीही उपयोग नाही.एका क्षणी ती ठरवते की स्किन बोट पुन्हा तयार करायची.ही बोट चौघा मोहीमवीरांनी तयार केलेली असते.अॅडाने फक्त ती तयार होताना पाहिलेलं असतं.पण आता ती इरेला पेटते.जणू तिचं जीवन-मरण त्या बोटीवरच अवलंबून असतं.कित्येक दिवस खपून,चुकत माकत अखेर ती पूर्ण निरुपयोगी बोट तयार होते,तेव्हा कुठे अॅडा सुटकेचा निःश्वास सोडते.पण हे काम संपल्यावर रँग्लर बेटावरचं एकाकीपण पुन्हा तिला घेरून येतं.वाऱ्याच्या आवाजाशिवाय तिथे सारं काही निःशब्द असतं.अॅडा काम करत असताना होणारा आवाज,
टाइपरायटरची किटकिट आणि मोहिमेतल्या मांजरीशी अॅडाने मारलेल्या गप्पा,एवढेच काय,ते आवाज.ही मांजरच आता अॅडाची एकमेव साथी असते.तिच्यासोबत अॅडा सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी बोलत राहते.तिच्या बोलण्यात मुख्य दोनच विषय असतात एक, तिचा मुलगा आणि दुसरा,नोमच्या दिशेने जाण्यासाठी बाहेर पडलेले तिघे मोहीमवीर.आतापर्यंत ते नोमला पोहोचले असतील आणि लवकरच जहाज घेऊन आपल्या सुटकेसाठी इकडे येतील अशी तिला खात्री वाटत असते.वाटेत त्यांचं काही बरंवाईट झालं असेल, हा विचार मनात आणण्याचीही अॅडाची तयारी नसते.
अॅडाडाला आता शिकार जमू लागलेली असते. दोन-चार दिवसांनी एखादा पक्षी पकडण्यात तिला यश येत असतं.किंवा कधी तरी एखादा सीलही तिच्या जाळ्यात गावत असतो.पण प्राण्यांची संख्याच अजून तुटपुंजी असते.आणि खाण्याचा साठा तर जवळपास संपत आलेला असतो. २० ऑगस्टला ती आपल्याकडचा शेवटचा बिस्किटांचा पुडा फोडते.ही बिस्किटं संपली की तिला फक्त शिकारीवरच अवलंबून राहणं भाग असतं.क्रॉफर्ड आणि कंपनी आपल्याला घेण्यासाठी येईल का याबद्दल तिला अचानक शंका वाटू लागते.ते आले तरी त्याआधीच आपण उपासमारीने मरणार असं तिला वाटू लागतं.आपलं मरण इथेच लिहिलेलं आहे असं ती मनाने घेते.
... योगायोग म्हणजे नेमक्या त्याच दिवशी स्टीफन्सनने पाठवलेलं डोनाल्डसन हे जहाज घेऊन नॉइस हा खलाशी रँगल बेटावर पोहोचतो.बेटाला वळसा घालूनही त्याला कोणतीच मानवी चाहूल दिसत नाही.एका ठिकाणी त्याच्या सहकाऱ्यांना मोहीमवीरांचा जुना कॅम्प दिसतो;पण तिथे चिटपाखरूही नाही,हे पाहून त्यांची निराशा होते.या बर्फाळ बेटावर दोन वर्षं तग धरून राहणं अशक्य आहे असं नॉइसला आधीपासूनच वाटत असतं.बेटावरचा सन्नाटा पाहून तो विचार आणखीच बळावतो.बेटाला वळसा घालत एकदा दुर्बिणीतून पाहणी करायची आणि परत फिरायचं असं ते ठरवतात. त्यातल्या एका दुर्बिणीमध्ये अचानक एक मानवी आकृती चालताना दिसू लागतो.ती अॅडा असते.
जगण्याची आशा सोडून दिल्यानंतर तिच्या पुढ्यात अचानक माणसं येऊन ठाकतात.अॅडाचा खडतर संघर्ष अखेर यशस्वी झालेला असतो.
खरं तर अॅडा रँगल बेटावर गेलेली असते ती मोहीमवीरांना सहायक म्हणून;पण प्रत्यक्षात अॅडासोडून इतर साऱ्या मोहीमवीरांचा दुःखद शेवट होतो. नाइट आणि अॅडाला मागे ठेवून नोमच्या दिशेने गेलेल्या क्रॉफर्ड,मॉरर आणि गेल या तिघा मोहीमवीरांचा अखेरपर्यंत कुणालाही पत्ता लागत नाही.मानवी वस्तीवर पोहोचण्याआधीच टोकाच्या प्रतिकूल वातावरणाने त्यांचा बळी घेतला असणार हे उघड असतं.रँगल बेटावरून सुखरूप सुटका झाल्यावरही अॅडाच्या आयुष्यातला संघर्ष संपत नाही.
मोहीमवीरांपैकी ती एकटीच बचावलेली असल्याने बेटावर काय घडलं हे सांगू शकणारी ती एकमेव व्यक्ती असते.त्यामुळे तिच्या कथनावर शंका व्यक्त केली जाते. तिच्यावर नाइटचा खून केल्याचा आरोपही केला जातो. पण ती मात्र ते सारं सहन करून या चारही मोहीमवीरांच्या घरी जाऊन,त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या शेवटच्या दिवसांची हकीगत त्यांना सांगते.आता आपली सुटका झाली,असं त्यानंतरच तिला वाटतं.
अॅडा ब्लॅकजॅक पुढे अमेरिकेतच स्थायिक होते. १९८३ साली वयाच्या ८५व्या वर्षी तिचं निधन होतं.अॅडा चा मुलगा बिली ब्लॅकजॅक जॉन्सन याच्या मुलाखती घेऊन आणि अॅडा च्या डायरीसह रँगल मोहिमेतील अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून लेखिका जेनिफर निवेन हिने ‘अॅडा ब्लॅकजॅक : टू स्टोरी ऑफ सर्व्हयव्हल इन द आर्क्टिक' हे पुस्तक लिहिलं. ते २००३ साली प्रकाशित झालं.याशिवाय अॅडावर आणखीही काही पुस्तकं आणि असंख्य लेख लिहिले गेले आहेत.
◆◆◆ समाप्त ◆◆◆