* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: बर्फाळ बेटावरचा संघर्ष Clash on the Ice Island

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/13/26

बर्फाळ बेटावरचा संघर्ष Clash on the Ice Island

नोव्हेंबर येतो.हिवाळा वाढत जातो.मधल्या काळात अति शीत वातावरणात तग धरून राहण्यासाठी त्यांनी आणखी एक निवारा बांधलेला असतो,तिथे आता ते राहायला जातात.बेटावरचा मुक्काम आता हळूहळू खडतर बनत चाललेला असतो.थंडी वाढत जाते आणि प्राण्यांची संख्या मात्र कमी होत जाते.आता मांस जपून वापरणं गरजेचं होऊन बसतं.अ‍ॅडाच्या परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नसतो.रडणं,काम न करता बसून राहणं किंवा क्रॉफर्डकडे बघत झुरत राहणं..एके दिवशी तर ती कॅम्पवरून अचानक गायब होते ती कित्येक तास उगवतच नाही.क्रॉफर्ड आणि नाइट तंगडतोड करून तिला शोधून आणतात.या चौघांवर भार बनून राहण्यापेक्षा जीव दिलेला बरा,असा विचार करून ती दिशाहीन भरकटत गेलेली असते.खरं तर आता हिवाळा आणखी वाढत जाणार असतो,निर्दयी बनत जाणार असतो.आता अ‍ॅडाने त्यांच्यासाठी कपडे शिवायला घेणं गरजेचं असतं,बूट दुरुस्त करणं गरजेचं असतं;पण तिचा वेडाचार कमी व्हायला तयार नसतो.ते तिला जेवण द्यायचं नाकारतात,घराच्या बाहेर ठेवून पाहतात,हरतऱ्हा करून पाहतात.काही दिवसांनी अ‍ॅडा पुन्हा गायब होते.दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा प्रचंड पायपीट करून ते तिला परत घेऊन येतात.आता रँगल मोहीम जणू अ‍ॅडाच्या वेडाचाराभोवतीच केंद्रित झालेली असते.तिची मदत होणं लांबच;उलट तिच्यामुळे या चौघांना आपापली कामं करणंही अवघड होऊन बसतं.


अ‍ॅडाअसं का वागत असते ?अ‍ॅडाला स्वतःला काय किंवा त्या चौघांना काय,कुणालाच त्या वेळी हे कळत नसतं की तिला 'आर्क्टिक हिस्टेरिया' झालेला आहे. अति थंड ठिकाणी प्रतिकूल आणि एकाकी जगणाऱ्यांना अनेकदा अशा हिस्टेरियाला सामोरं जावं लागतं.अ‍ॅडाला वेड लागलेलं नसतं,तर मरणाची थंडी आणि एकटेपणा तिला वेड्यासारखं वागणं भाग पाडत असतो.आणि आता तर २१ नोव्हेंबरला सूर्यास्त झाला की एकदम दोन महिन्यांनी २० जानेवारीलाच सूर्य उगवणार असतो. 


६० दिवसांच्या रात्रीसाठी या रँगल बेटावरच्या रहिवाशांना सज्ज असणं भाग असतं.पुढचे काही दिवस कल्पनेच्या पलीकडले असतात.अ‍ॅडाचं वेड दिवसेंदिवस वाढत जातं.कधी कधी ती दिवस दिवस गायब होते. चारही तरुण हातातली कामं सोडून तिच्या शोधात फिरत राहतात.परत आली तरी ती एका जागी बसून राहत असते.ती ना इतरांसाठी काम करू शकत असते, ना स्वतः साठी.अखेर एक वेळ अशी येते की अगदी संयमी आणि मायाळू क्रॉफर्डलाही मोह होतो की हिला कुत्र्यांच्या तोंडी द्यावं !


डिसेंबरमध्ये हवा आणखी खराब होते.पुन्हा एकदा कित्येक दिवस सगळा चमू त्यांच्या बर्फघरात अडकून पडतो.सारीच मंडळी सुस्तावतात.दिवस दिवस कोणी अंथरुणातूनही उठत नाही.पण आश्चर्य म्हणजे जसजसा या चौघांच्या वागण्यात बदल होऊ लागतो,तसं अचानकच अ‍ॅडाचं वागणं सुधारू लागतं.ती सकाळी सहा वाजताच उठू लागते,स्वतःचं आवरून सर्वांसाठी जेवण तयार करू लागते आणि दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात गढून राहते.शिकार केलेल्या जनावरांची कातडी सोलून ठेवणं,शिवणकाम करणं, चौघांचे कपडे स्वच्छ करणं,कपडे शिवणं,भांडी घासणं असे नाना उद्योग ती एकापाठोपाठ एक करत राहते.या चौघांसोबतच्या तिच्या वागण्यातही बदल होऊ लागतो. पुन्हा एकदा ती सर्वांशी हसून-खेळून वागू लागते. क्रॉफर्डकडे बघून झुरणंही कमी होतं.


चौघंही आश्चर्यचकित होऊन तिच्यातल्या या बदलाकडे पाहत राहतात.हा जणू चमत्कारच असतो.आणि निसर्गाशी झुंजणाऱ्या त्या चौघांना अशा चमत्काराची अतोनात गरज असते.


अ‍ॅडा इतकी बदलते की तिच्याबद्दलचा राग तर गायब होतोच,पण आपल्या वागण्याने आणि कामाने लवकरच ती चौघांचं मन जिंकून घेते.सूर्यदर्शनाशिवायचे दोन महिने कसेबसे का होईना,पार पडतील,असा विश्वास त्या पाचजणांना वाटू लागतो.


अखेर दोन महिन्यांची रात्र सरते आणि २५ जानेवारीला सूर्य क्षितिजावर किंचित डोकं वर काढतो,पण हवा मात्र सुधारत नाही.बर्फाची वादळं येत राहतात.प्राणी कमी होत जातात.रँगल बेटाचे हे रहिवासी अजूनही निवाऱ्यातून बाहेर पडून बेटावर वावरू शकत नाहीत. फेब्रुवारीत सूर्य थोडा आणखी वर येतो;पण थंडी मात्र कमी होत नाही,उलट ती वाढतेच.फेब्रुवारीच्या अखेरीस तापमान उणे ४७.५ वर पोचलं.दिवस-रात्र स्टोव्हसमोर काढण्यावाचून गत्यंतर राहत नाही.


बेटावर येण्यापूर्वी मोहिमेचा आयोजक स्टीफन्सन याने त्यांना खात्रीपूर्वक सांगितलेलं असतं,की बेटावर प्राण्यांची संख्या भरपूर आहे.काही झालं तरी शिकार कमी पडणार नाही.पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी दिसत असते.प्राणी झपाट्याने कमी होत चाललेले असतात.अजूनही त्यांच्याकडे शिध्याचा साठा शिल्लक असला तरी आता त्यांना थोडी काळजी वाटायला सुरुवात होते.मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिने थंडीचे आणि घरात अडकवून ठेवणारेच ठरतात.अगदीच अत्यावश्यक कामांसाठी ही मंडळी बाहेर पडतात.आता प्रत्येकाच्याच मनात पुढे काय होणार याबाबत शंका येऊ लागलेली असते.शिधा संपण्याचा प्रश्न असतोच. पण बाहेर पडता आलं नाही तर संशोधनकार्य कसं चालू राहणार? आणि त्यासाठी तर ते जिवाची बाजी लावून इथे आलेले असतात.अखेर मे महिन्यात बर्फ वितळायला सुरुवात होते.तापमान किंचित वाढतं आणि आता जगणं थोडं सुसह्य होईल,अशी आशा पल्लवित होते.बर्फ वितळू लागल्याने त्यांच्या घराच्या भिंती ढासळू लागतात आणि पाण्याच्या डबक्यातच राहिल्यासारखी अवस्था होऊन जाते.अखेर त्यांना पुन्हा एकदा आपला मुक्काम हलवावा लागतो.ते करताना किती शक्ती खर्च होते हे त्यांचं त्यांना माहीत!तापमान वाढल्यावर पुन्हा एकदा प्राणी दिसू लागतील आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटेल,ही आशा मात्र फोल ठरते.


आता खरं तर पाचहीजण थकलेले असतात..विटलेले असतात.एकटेपणाला,थंडीला,अपुऱ्या आणि बेचव जेवणाला.त्यांना घरची आठवण येऊ लागलेली असते. इथे राहायचं असेल,संशोधन करायचं असेल तर किमान खाणं-पिणं मुबलक हवं असं त्यांना वाटू लागलेलं असतं.त्यामुळे हे चौघं घरी परतण्याचा विचार करत नसले तरी शिधा घेऊन येणाऱ्या जहाजाची मात्र आतुरतेने वाट पाहू लागले असतात.जहाज आलं की अ‍ॅडा परतणार हेही आता सगळ्यांनी गृहीत घरलेलं असतं.आता फक्त एखादा महिना काढायचा की संपली आपली परीक्षा,असं अ‍ॅडाला वाटत असतं.ते साहजिकही असतं.संशोधनाची,साहसाची, आव्हानाची झिंग नसेल तर कुणी कशासाठी आपला जीव असा धोक्यात घालावा ?


पण तसं घडणार नसतं.तिकडे अमेरिकेमध्ये स्टीफन्सन रँगल बेटावर पाठवण्याचं सामान आणि ते नेणारं जहाज यांच्यासाठी पैसे उभे करण्याच्या मागे असतो;पण हवे तेवढे पैसे उभे राहणं अवघड जात असतं.मोहीमवीरांचे कुटुंबीयही त्यात त्याला मदत करत असतात.आपली तरुण पोरं जगाच्या टोकावरच्या त्या बेटावर कशी जगत असतील,या विचारानेही त्यांच्या जिवाचं पाणी पाणी होत असतं.इकडे जूनमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बर्फ वाढतो.तो महिना जहाजाची वाट बघण्यात जातो.जुलैमध्ये मात्र नाइटला कॅम्पवर अडकून राहणं असह्य होतं.तो एकटाच एका कुत्र्यासोबत बेटावर फेरफटका मारून येण्याचं ठरवतो.दक्षिणेकडच्या वॅरिंग पॉइंटपर्यंत जाऊन यायचं असा त्याचा विचार असतो. वाटेतली स्केलटेन नदी पूर्ण गोठलेली असते,त्यामुळे ती ओलांडणं अवघड जात नाही.पण वॅरिंग पॉइंटवर पोचताच आभाळ फाटल्यासारखा पाऊस सुरू होतो. भरीस भर म्हणजे नाइट तंबू आणायचा विसरलेला असतो.पाऊस सलग तीन दिवस कोसळत राहतो. संपूर्ण उघड्या बर्फाळ प्रदेशात नाइट आणि त्याचा कुत्रा मिळेल त्या आडोशाने कोरडं राहण्याची कसरत करत राहतात.तेवढ्या काळात नाइटला कसंबसं एक बदक मारता येतं.कुत्र्याला तर अन्नाचा कणही मिळत नाही. तीन दिवसांनी पाऊस थांबतो, तेव्हा कधी एकदा कॅम्पवर जाऊन पोचतो असं नाइटला झालेलं असतं. पण आता हा परतीचा प्रवास सोपा राहिलेला नसतो. येताना गोठलेली नदी आता वाहू लागलेली असते,हाडं गोठवणारं पाणी घेऊन.ती पोहत पार करण्याखेरीज दुसरा इलाजच नसतो.नाइट नदीत उतरतो,तेव्हा ती पार करण्याआधी असह्य थंडीने आपला जीव जाणार याची त्याला खात्री पटते.पण कसे कोण जाणे,तो आणि त्याचा कुत्राही सुखरूप पल्याड पोचतात आणि आणखी चार दिवसांनी पुन्हा कॅम्पवरही दाखल होतात. पण हा दौरा नाइटला चांगलाच महागात पडतो.


जुलैच्या अखेरीस बर्फ पूर्ण वितळून जातं.आता कुठल्याही क्षणी जहाज येऊन पोहोचेल या आशेने सर्वांचं लक्ष सतत समुद्राच्या दिशेने राहू लागतं. करायला शिकार नसते.होती नव्हती तेवढी सगळी पुस्तकं प्रत्येकाने पाच-सहा वेळा वाचून संपवलेली असतात. अनेकदा दुपारी दोन वाजताच त्यांचा दिवस संपून जात असतो.अ‍ॅडा मात्र काही ना काही काम करत बसलेली असते.कधी अ‍ॅडा आणि गेल जवळपास फिरायला जात असतात आणि नव्याने उगवलेल्या वनस्पती,फुलं कॅम्पवर आणून त्यांचा अभ्यास करत असतात.स्वयंपाकाचे थोडेफार प्रयोग करत राहणं हाही गेल आणि अ‍ॅडासाठी एक विरंगुळा असतो.


लवकरच त्यांना बेटावर येऊन वर्ष पूर्ण होणार असतं.वर्षभर रँगल बेटावर राहिलेली पहिली माणसं म्हणून त्यांचं नाव कायमचं इतिहासात कोरलं जाणार असतं. पण त्या वेळी त्यांच्या डोक्यात या कामगिरीचे नव्हे,तर फक्त शिधा घेऊन येणाऱ्या जहाजाचे विचार असतात.


तिकडे कसाबसा निधी उभा करून जहाजाची व्यवस्था करण्यात स्टीफन्सनला यश येतं.२० ऑगस्टला टेडी बेअर नावाचं जहाज सगळी साधनसामग्री लादून रँगलच्या दिशेने कूच करतं;पण वाटेत या जहाजावरच्या कप्तान अन् खलाशांना आजवर कधीही पाहिला नाही एवढा बर्फ लागतो.एका टप्प्यावर तर रँगलकडे जाण्याचा मार्गच पूर्णपणे बर्फान अडवलेला असतो. वेगवेगळ्या दिशेने प्रयत्न करूनही पुढे जाणं त्यांना शक्य होत नाही,तेव्हा नाइलाजाने मोहीम गुंडाळून या जहाजाला मागे फिरावं लागतं.ही बातमी मोहीमवीरांच्या कुटुंबीयांसाठी घोर निराशा करणारी ठरते;पण स्टीफन्सन मात्र जराही विचलित होत नाही. त्यांच्याजवळची रसद आणि शिकार यांच्या आधारे मोहीमवीर बेटावर आणखी एक हिवाळा नक्की काढतील,हा त्याचा फाजील आत्मविश्वास अजूनही कायम असतो.पण या अपयशी जहाजाचा कॅप्टन बर्नाड याला मात्र धोक्याची जाणीव झालेली असते.या बेटावर राहणं शक्य असतं तर माणसांनी तिथे पूर्वीच वस्ती केली नसती का,एवढंच वाक्य तो बोलतो.त्याचं म्हणणं खरंच असतं.तिकडे स्टीफन्सन बिनधास्त असताना मोहीमवीरांची मात्र आता अस्तित्वाची लढाई सुरू झालेली असते.


सप्टेंबर उजाडतो,तसं मोहिमेच्या सदस्यांना कळून चुकतं की जहाज आता येणार नाही.जगाच्या एका टोकाला ते कायमचे अडकून पडले आहेत क्रॉफर्डन कॅमेरा सेट करून काढलेला ग्रुप फोटो धुऊन येतो तेव्हा लक्षात येतं की सगळ्यांचीच प्रकृती रोडावली आहे. विशेषतःनाइट तर पूर्ण खंगलेला असतो.स्केलटन नदी पार करून आल्यापासून त्याचं दुखणं खूपच बळावलेलं असतं.आधीच्या एका आर्क्टिक मोहिमेत त्याला व्हिटॅमिन 'सी'च्या कमतरतेमुळे होणारा 'स्कव्ही' आजार झालेला असतो.त्या वेळी भरपूर ताजं मांस खायला मिळाल्यामुळे तो त्यातून वाचतो.त्याच स्कव्हीने आता पुन्हा डोकं वर काढलेलं असतं.आणि इथे तर खायला ताजं मांसही नसतं.त्यामुळे नाइट जवळपास अंथरुणाला खिळतो.सतत चिडचिड करू लागतो, सहकाऱ्यांवर करवाद् लागतो.सगळ्यांपेक्षा कमी किंवा जवळपास शून्य काम करूनही त्याची सतत कशाबद्दल तरी तक्रार असते.सगळ्यात जास्त झोपूनही तो कमी झोप झाल्याबद्दल कुरकुरत राहतो.सगळेच त्याच्यावर वैतागून जातात.


नोव्हेंबरच्या मध्यात सूर्य पुन्हा गायब होण्याआधी अनेक दिवस खपून ते नवा कॅम्प वसवतात.जुन्या कॅम्पच्या आसपासची लाकडं संपल्यामुळे त्यांना जागा बदलणं भागच असतं.सूर्य नसण्याच्या काळात त्यांना जीव तगवून बेटावरच राहण्याशिवाय इलाज नसतो.पण जानेवारीत सूर्य उगवू लागल्यावर मात्र त्यांच्यातील काहीजणांना मदत बोलावण्यासाठी बाहेर पडावं लागणार हे सर्वांनीच गृहीत धरलेलं असतं.गोठलेल्या बर्फावरून चालत आपण सैबेरियापर्यंत जाऊ शकू असा त्यांचा अंदाज असतो.किमान तसा प्रयत्न करण्यावाचून गत्यंतर नाही,हे त्यांना कळून चुकलेलं असतं.त्यामुळे नव्या कॅम्पवर आल्या आल्या अ‍ॅडा नवे कपडे शिवण्याच्या आणि जुने दुरुस्त करण्याच्या मागे लागते. नव्या कॅम्पमधील घरं बर्फाने शक्य तेवढी पक्की करण्यात आणि शिकारीच्या प्रयत्नात त्यांचा बराचसा वेळ जातो.सर्वांच्या तब्येती आणखी खालावतात.


कसेबसे दोन महिने पार पडतात.जानेवारी महिना उजाडतो.क्रॉफर्ड आणि नाइट बाहेर पडून जवळच्या जमिनीच्या दिशेने चालत जाण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतात.सात जानेवारी १९२३ ला पाच कुत्र्यांच्या घसरगाडीवर सामान लादून ते बाहेर पडतात;पण लवकरच त्यांच्या लक्षात येतं की आपण सोबत आणलेल्या सामानावर बाहेर जीव तगवणं अशक्य आहे.थंडीचा कडाका असह्य असतो.त्यामानाने कपडे आणि खाणं अगदीच अपुरं.तेवढं सामान ओढण्याएवढीही ताकद कुत्र्यांमध्ये उरलेली नसते. कोणत्याही दिशेला शिकार मिळण्याची चिन्हं दिसत नसतात.पण दुसरा पर्याय दिसत नसल्याने ते ठरलेल्या वाटेवर पुढे पुढे जात राहतात.पण थोड्या दिवसांतच थंडी आणखी वाढते.पुरेसं खाणं नसल्याने दोघांचाही अशक्तपणा वाढू लागतो.चालणं,मुक्कामासाठी तंबू ठोकणं,सगळंच हळूहळू अशक्य वाटू लागतं.शेवटी आठवड्याभराने नाइलाज होऊन ते कॅम्पवर परतण्याचा निर्णय घेतात.पुन्हा आठवड्याभराची थकवणारी वाटचाल करत कसेबसे कॅम्पवर पोहोचतात.


आता मोहीमवीर चांगल्याच कोंडीत सापडलेले असतात.इथून बाहेर पडून मार्ग शोधणं जवळपास अशक्य वाटत असतं,तर दुसरीकडे सोबतचा शिधा आणि शिकार दोन्ही संपत आल्यामुळे एका जागी मुक्काम ठोकून राहणं म्हणजे मृत्यूची वाट पाहण्यासारखंच असतं.त्यामुळे टीमचा कॅप्टन म्हणून क्रॉफर्ड निर्णय घेतो,आता आणखी जय्यत तयारीनिशी आपण स्वतः,मॉरर आणि गेलने मदत शोधण्यासाठी बाहेर पडावं.नाइटच्या स्कर्व्हने इतकं भयाण रूप धारण केलेलं असतं की तो आता कुठेही प्रवास करू शकणार नाही हे साऱ्यांनाच कळून चुकलेलं असतं.मॉरर आणि गेल दोघांनाही खरं तर हा निर्णय मान्य नसतो; पण टीम लीडरचं ऐकायचं म्हणून ते काहीही न बोलता तयार होतात.दुसरीकडे अ‍ॅडालाही नाइटबरोबर एकटीने राहणं म्हणजे मोठंच धर्मसंकट वाटत असतं.नाइटबद्दलची तिच्या मनातली भीती कमी झाली असली तरी पूर्ण गेलेली नसते.एकट्या पुरुषाबरोबर राहिलो तर जग काय म्हणेल याचीही काळजी असतेच.शिवाय आजारी माणसाबरोबर या बेटावर आपला निभाव कसा लागणार,हे तिच्या बुद्धीपलीकडचं असतं.पण परिस्थिती अशी असते की हा निर्णय स्वीकारण्यावाचून इलाजच नसतो.तिघांची निघण्याची तयारी सुरू असताना तापमान आणखी घसरतं.उणे ५६ अंश सेल्सियसमध्ये सर्वजण कामाला जुंपून घेतात.शक्य तेवढं खाण्याचं सामान;कपडे,तंबू बांधण्यासाठी लागणारी साधनं असं सारं जमवून २९ जानेवारीला तिघं सैबेरियामार्गे नोमला जाता येतं का हे पाहण्यासाठी बाहेर पडतात.


आपण परतू की नाही याची शाश्वती नसल्यामुळे शिरस्त्याप्रमाणे सर्वजण आपापल्या घरच्यांसाठी आणि स्टीफन्सनसाठी पत्रं लिहून ठेवतात.


राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…..★★★