जलालुउद्दीन अकबराच्या सत्तेचं चोविसावं वर्ष चालू असताना विजापूरच्या अदिलशाहच्या तख्तावर दहा वर्षांच्या एका मुलाला बसवण्यात आलं.'इब्राहिम द्वितीय' हा तो मुलगा मुघल बादशाहपेक्षा वयाने कित्येक वर्षं लहान होता.पण या दोघांची भेट झाली असती,तर त्यांना एकमेकांच्या संगतीत फार आनंद लाभला असता. त्यांच्यात भौगोलिक अंतर होतंच;पण त्याचबरोबर पिढ्यांचंही अंतर होतं.तसं असूनही मोगल बादशाह आणि दख्खनचा हा सुलतान यांच्यात खूप साम्यही होतं.दोघंही कलेचे आश्रयदाते होते,कर्तबगार होते आणि करिष्माई होते.तसंच
आपल्या आजच्या काळाशी जुळणारी अशी त्या दोघांची कुठली गोष्ट असेल तर त्या दोघांनी ज्या समाजावर राज्य केलं, त्या समाजांच्या वैविध्यपूर्ण सहजप्रेरणांना त्यांनी कवेत घेतलं. असं करून त्यांनी एका भव्य, देखण्या युगाला जन्म दिला. त्यांनी अशा एका मार्गावरचे दिवे उजळवले जे अजूनही, म्हणजे या दोघांनाही थडग्यात जाऊन शतकं लोटली, तरीही प्रकाशमान आहेत.
अकबराच्या धार्मिक दृष्टिकोनांचं लोकांनी आकलन करून घेतलं आणि त्याविषयी लेखनही केलं. त्यामागे त्याचा धाक होता.परंतु या बादशाहच्या सावलीमध्ये 'इब्राहिम द्वितीय' हा तुलनेने लहान राजा मात्र इतिहासाच्या विस्मृतीतच गेला.
गणिका,महात्मा,आणि एक इटालियन ब्राह्मण,भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या,एस.पिल्लई,अनुवाद-
सविता दामले
विजापूरचा 'इब्राहिम आदिलशाह द्वितीय' हा फारच आश्चर्यकारक माणूस होता,ते केवळ तो नखं लाल रंगाने रंगवायचा म्हणून नव्हे,लहानपणीच त्याची भेट एकदा काही शिवभक्तांशी झाली,तेव्हा त्यांच्याशी आलेल्या संवादाचा त्याच्यावर एवढा प्रभाव पडला की,त्यामुळे त्याच्या मनात हिंद परंपरांविषयी आयुष्यभर पुरेल आकर्षण निर्माण झालं.म्हणजे औपचारिकरीत्या तो सुन्नी मुस्लीम असला तरी तो मेला तेव्हा त्याचा खरा धर्म कुठला याविषयी एवढा संशय निर्माण झाला होता की,सर्व संबंधितांना आश्वस्त करण्यासाठी त्याच्या कबरीवरील शिलालेखावर कोरण्यात आलं,"नाही, सत्य हेच आहे की इब्राहिम हा ज्यू नव्हता की ख्रिश्चनही नव्हता.तो मुस्लीमच होता,त्याची श्रद्धा विशुद्ध होती.तो मूर्तिपूजक तर नक्कीच नव्हता." आता ही शेवटची ओळ तर पूर्ण खोटीच होती. कारण आदिलशाहचं विश्वच मुळी हिंदू प्रभावाने ओतप्रोत भरलेलं होतं.त्याच्या कारकिर्दीत त्यानं बऱ्याच मंदिरांना देणग्या दिल्या,यात्रेकरूंना सुप्रसिद्ध तीर्थस्थानांवर जायचे अधिकार बहाल केले आणि हिंदू देवतांना राजभक्तीच्या उंचीवर जाणीवपूर्वक नेलं.
पण हे जे काही लिहिलं आहे ते लिहिताना या सभ्य (!) शहजाद्याच्या (अकबरासारख्याच) लष्करी अवताराकडे दुर्लक्ष करण्यासाठी नव्हे.या लष्करी पराक्रमात भावांना आणि वर्चस्व गाजवणाऱ्या पालनकर्त्यांना (बालवयाच्या राजाला सांभाळणाऱ्या लोकांना) ठार मारणं बसत होतं. पण तो सौम्य आणि तुलनेने अधिक विधायक मनःस्थितीत असे,तेव्हा तर हा इब्राहिम दुनियेला आपल्या मोहात पाडू शकत होता.त्याच्या बऱ्याच फर्मानांची सुरुवात हिंदू देवता सरस्वतीस आवाहन करून होत होती.त्याची ही या देवीवरची भक्ती एवढी उघड होती की,त्याच्या दरबारातल्या एका गटाची तर खात्रीच झाली होती की,हा सुलतान एक तर गुप्तपणे हिंदू धर्माचं पालन करत असला पाहिजे किंवा मग तो स्वधर्मत्यागाच्या उंबऱ्याशी पोहोचला असला पाहिजे.एका टप्प्यावर तर त्यानं विजापूरचं (मूळ विजयपूरचं) नाव 'विद्यापूर' ठेवलं होतं.त्यानं लिहिलेल्या एका कवितेत अशा काही संकल्पना व्यक्त केल्या होत्या की,कर्मठ मुस्लीमांना त्या मूळ इस्लामी विचारांपासून खूप दूर जाणाऱ्या आणि त्यांच्या कट्टर छापाच्या इस्लामविरोधी वाटल्या होत्या.उदाहरणार्थ,त्यानं कवितेत लिहिलं होतं की:
भाषा वेगवेगळ्या असतात;
पण भावनिक आवाहन एकच असतं.
मग तो ब्राह्मण असो की तुर्की,
ज्याच्याकडे पाहून विद्येची देवता (सरस्वती) हसते
तोच भाग्यवान ठरतो.
खरोखरच,या इब्राहिमने त्याचं सुप्रसिद्ध 'किताब इ नवरस' हे पुस्तक प्रसिद्ध केलं तेव्हा त्यानं जगाला चित्रपूर्ण शैलीचा.रूपकांनी भरलेला असा एक लक्षवेधी ग्रंथ तर दिलाच पण त्याच्या काळात जे वेगवेगळ्या धर्माचं मीलन होत होतं,त्याचं ओझरतं दर्शनही त्यानं त्यातून घडवलं.
हे पुस्तक राजकारणाच्या जगाचा संदर्भ तर देतंच; पण ते त्याच्या राजेशाही घराचंही दर्शन घडवतं. त्यात योद्धा राणी चांदबिबीसारख्या व्यक्तिरेखांचा उल्लेख आहे तसंच त्याचा पाळीव हत्ती अताश खान याचाही उल्लेख आहे.शिवपार्वतीसारख्या हिंद देवदेवता त्यात आहेत आणि महान संस्कृत महाकाव्यांचाही परिणाम त्याच्यावर झालेला दिसतो.लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे,त्यानं बरीच चित्रं काढवून घेतली त्यांत एक सरस्वतीचं चित्रही होतं.त्यात ती सोन्याच्या सिंहासनावर सोबत मोर,शंख,वीणा,कमळ इत्यादी सर्व पारंपरिक वाद्ये आणि प्रतीके यांच्यासह बसलेली दिसते.परंतु आजच्या तिच्या परिचित रूपापेक्षा किंवा पुरातनकालीन शिल्पांतील रूपापेक्षा इब्राहिमची सरस्वती शुभ्रवसना असूनही ती पटकन ओळखता येणाऱ्या हिंदू शैलीत न दिसता राजघराण्यातल्या मुस्लीम राजकुमारीसारखीच अधिक दिसते. त्याचप्रमाणे त्या चित्रात लिहिलेले पुढील शब्दही या इब्राहिम आदिलशाहला त्या देवीबद्दल केवढं प्रेम होतं ते व्यक्त करतात.तिथे लिहिलं आहे - इब्राहिम म्हणजे तोच ज्याचा पिता 'गुरू गणपती' असून माता 'पवित्र सरस्वती' आहे.त्यामुळेच तर दरबारातले काही लोक त्याच्यावर क्रुद्ध झाले होते यात काहीच नवल नाही.या इब्राहिम आदिलशाहचं चित्र बरेचदा गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेलं काढलं जात होतं,त्याच्या नाण्यांवरही संस्कृतमध्ये 'दुर्बलांचा रक्षक' असा दावा केलेला होता.अशा प्रकारे त्यानं सर्व समृद्ध हिंदू परंपरांचा स्वीकार केला होता;पण त्याच्या या धोरणावर व्यवहारातले काही परिणामही होत होते.१५६५ साली विजयनगर साम्राज्याचं पतन झाल्यावर मोठ्या संख्येने हिंदू कलाकारांची दैना उडाली,तेव्हा इब्राहिमने आपलं हृदय आणि खजिना त्यांच्यासाठी खुला केला आणि त्यांना विजापुरात आश्रय दिला.त्याच्या नोकरशाहीत मराठी ब्राह्मण तर आधीच मोठमोठ्या पदांवर होते,आता इब्राहिमनं तेलुगू आणि कन्नड व्यावसायिकांना कला,संगीत,वास्तुकला या क्षेत्रांची दारं उघडून दिली.
स्वतः आदिलशाह दरबारात मराठी बोलणं अधिक पसंत करत होता हे बघून एक मुघल राजदूत तर आश्चर्याने थक्कच झाला होता.तसंच त्याच्या जनानखान्यातली आवडती राणीही रंभा नावाची मराठी नर्तिका होती.त्याच्या इराणी पूर्वजांची आणि उत्तरेकडील बादशाहची भाषा फारसी हिच्यापेक्षा इब्राहिमची अधिक पकड संस्कृतवरच होती हेही सर्वज्ञात आहे.
अधिक कट्टर लोकांना आदिलशाहचं हे 'स्थानिक' गोष्टींत रंगून जाणं म्हणजे मुस्लीम धर्माचा विश्वासघात केल्यासारखंच वाटत होतं.कारण केवळ काही पिढ्याच अगोदरचे त्याचे पूर्वज यापेक्षा पूर्णतया वेगळं वर्तन करत होते.ते फारसीला महत्त्व देत होते आणि स्थानिक प्रभावास तावातावाने नाकारत होते.अगदी सैनिकांनाही ते इराणी पद्धतीचे गणवेश घालायला आणि कवायती करायला लावत होते.
त्यामुळे कर्मठ मुस्लीमांकडून येणारी प्रतिक्रिया विजापूरच्या वळणावर येऊनच थांबली होती,यात आश्चर्य तर कसलं? अकबर हा खरा मुस्लीम धर्म पाळत नाही,त्याला तो कमी समजतो असं म्हणणारा बदायुनी उत्तरेला होता,तसंच अदिलशाहला हा फटका कर्मठ मुल्लांकडून नव्हे, तर सूफींकडून बसला.त्याचं असं झालं की एक सूफी अवलिया विजापुरात आला आणि त्याला समजलं की, राजाला हिंदू गाण्याबजावण्याची भुरळ पडली आहे. तेव्हा त्यानं हट्ट धरला की इब्राहिमने अशा देवाला न साजेशा लोकांच्या संगतीतून जाणीवपूर्वक दूर झालं पाहिजे.
तेव्हा सगळ्याच कटकट्या म्हाताऱ्यांना शांत करण्यासाठी तरुण मंडळी जसं म्हणतात की,मी प्रयत्न करतो,तसंच इब्राहिमनंही केलं आणि सरतेशेवटी त्या म्हाताऱ्या सूफी संताला पेन्शन देऊन जहाजाने मक्केला कायमचं पाठवून दिलं. आणखी एका सूफी संतचरित्रात म्हटलंय की आदिलशाहला एका हिंदू योग्याच्या तावडीतून सोडवा असं बऱ्याच लोकांनी त्याला विनंती केली. त्या कहाणीत लिहिलंय,की या कामात तो सूफी संत केवळ आदिलशाहलाच योग्य मार्गात आणण्यात यशस्वी झाला नाही तर त्यानं त्या योग्यालाही धर्मांतर करून मुसलमान बनवलं. या दाव्याची सत्यता संशयास्पद असली,तरी त्यातून चित्र स्पष्ट होतं,ते म्हणजे या राजावर बिगर मुस्लीमांचा भरपूर मोठा प्रभाव होता.त्यामुळे विजापुरातील सामर्थ्यवान गटांना चिंता वाटू लागली होती आणि आग्र्यातील मुघल सम्राटाच्या राजधानीतील लोकांच्याही ते लक्षात येऊ लागलं होतं.आज अकबर आणि 'इब्राहिम द्वितीय' हे राजे आपल्या जगाकडे बघण्यासाठी परतले तर त्यांना त्यांच्यासारखी कुतूहल आणि चैतन्य असलेली बरीच माणसं दिसतील.पण त्यांच्यासारखंच याही काळात त्यांना अशी माणसं दिसतील,जी दुसऱ्यांनी काय विचार करावा,कुणाची आज्ञा पाळावी यात हस्तक्षेप करणारी असतील.