उपनिषदात सत्यकाम आणि गौतम ऋषी यांची गोष्ट आहे.सत्यकामाला शिकविण्या अगोदर परीक्षा पाहण्यासाठी गौतमांनी चारशे गाई त्याच्या स्वाधीन केल्या व 'ह्यांना अरण्यात चरण्यासाठी घेऊन जा' असं सांगितलं.असल्या कामात शिष्याची बुद्धी किती आहे,हे दिसून येत असे.अरण्यात जाताना तो म्हणाला की, "ह्या चारशेच्या हजार गाई होतील तेव्हाच मी परत येईन."
चारशे गाईंची संख्या हजार व्हायला अनेक वर्षे लागली. इतकी वर्षे जंगलात राहिल्यावर निसर्गानंच त्याला अनेक गोष्टी शिकविल्या.सत्यकामाला पक्ष्यांपासून पुष्कळ ज्ञान झालं.हंस आणि मम्दु म्हणजे करोता पक्ष्यांनी त्याला ईश्वराविषयी ज्ञान दिलं होतं.
ऋग्वेदात एक सुंदर प्रार्थना आहे :
परमेश्वररूपी सुंदर पक्ष्याचं
गूढरम्य रूप ज्या कोणाला ठाऊक असेल
त्यानं ते मला सांगावं
म्हणूनच ऋषिमुनींच्या आश्रमात इतर विद्यांबरोबर पक्ष्यांची भाषा देखील शिकवीत असल्याचा उल्लेख महाभारतात आला आहे.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण पक्ष्यांपासून शिकत असतो.आज्ञाधारकपणा हा गुण पक्ष्यांपासून घेण्यासारखा आहे.पाखरांची पिलं मोठी आज्ञाधारक असतात.
मातापित्यांच्या आज्ञेचं पालन न करणं म्हणजे त्यांच्या नशिबी मृत्यूच होय. 'आज्ञापालन म्हणजे जीवन' असं त्यांचं सूत्र आहे.शत्रू कोण? मित्र कोण? चांगलं काय? वाईट काय? हे सारं त्यांना लहानपणापासून शिकविलं जातं.( पक्ष्यांपासून माणसाला काय शिकता येईल?निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर ) पाखरांत शिस्त आहे,
म्हणूनच ती एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर करतात. स्थलांतर करताना बाणाच्या आकारात व्यूहरचना करतात.टोकाला वृद्ध आणि शहाणा पक्षी असतो.तो साऱ्या थव्याचं संचालन करतो.मार्ग दाखवितो.त्याला आकाशातील ग्रहताऱ्यांविषयीचं ज्ञान असतं.त्याला हवामानाचा अंदाज असतो.त्याच्या सूचनेप्रमाणे इतरांना शिस्तीत वागावं लागतं.जर शिस्तीनं वागलं नाही,तर एवढा दीर्घ प्रवास करणं त्यांना शक्य होणार नाही.
शिस्तीबरोबर एकीचं बळ येतं.पंचतंत्रातील एका कथेप्रमाणे एकदा चित्रग्रीव नावाचा कबुतरांचा राजा आपल्या थव्याबरोबर पारध्याच्या जाळीत सापडला, परंतु त्याच्या सूचनेप्रमाणे साऱ्या कबुतरांनी सर्व शक्तीनं त्या जाळीसह हवेत उडून प्राण वाचविले.
'मैना आणि सात बहिणी यांच्याजवळ ना तीक्ष्ण चोच,ना अणकुचीदार पंजे;पण साप आणि मुंगुसासारखे शत्रू दिसताच त्या एकत्रित जमून मोठा कोल्हाळ करतात. त्यांच्यावर हल्ला करतात आणि शत्रूला पळवून लावतात.
बगळे,ढोकरी आणि पाणकावळे यांची प्रामुख्यानं तळ्याकाठच्या चिंचेवर पावसाळ्यात वीण होते.त्यांची पिलं वाढविण्यासाठी या काळात लहान माशांची गरज असते.दरवर्षी त्यांची संख्या दुप्पट होत असते;परंतु नव्यानं जन्माला आलेले पक्षी,मर्यादित क्षेत्रात अन्नाचं दुर्भिक्ष निर्माण होऊ नये म्हणून आपलं जन्मस्थान सोडून अन्नाच्या शोधात दुसरीकडे स्थलांतर करतात किंवा विणीवर नियंत्रण ठेवतात.पक्षी आपलं कुटुंबनियोजन हजारो वर्षांपासून करीत आले आहेत.
पाखरांइतके बुद्धिमान प्राणी क्वचितच आढळून येतात. पाण्यातील शंखशिंपले चोचीनं फुटत नाहीत म्हणून समुद्रपक्षी ते उंच आकाशात नेऊन तेथून खालच्या दगडावर सोडून फोडतात.गरुडपक्षी विषारी सर्पाची शेपटी धरून उंच आभाळातून त्याला खाली सोडून मारतात.
एकामेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ असंही पक्ष्यांचं वर्णन करता येईल.कोतवाल पक्षी ज्या झाडावर घरटी करतो त्याच झाडाच्या आश्रयानं इतर भीरू पाखरं आपली घरटी बांधतात.कोतवाल आपल्या घरट्याबरोबर आश्रयाला आलेल्या इतर पाखरांच्या घरट्यांचंही संरक्षण करतो.बहिरी ससाणा,घार आणि कित्येकदा गरुडालादेखील आपल्या घरट्याच्या जवळपास फिरकू देत नाही.
पक्षी हे सुखी दाम्पत्यप्रेमाचं प्रतीक आहेत.सारस, चक्रवाक आणि हंसाची जोडी एकदा तयार झाली की ते आयुष्यभर एकमेकांना साथ देतात.त्यातील एकाचा मृत्यू ओढवला तर दुसरा पक्षी आपल्या साथीदाराच्या विरहानं झुरून झुरून मृत होतो.पाखरांच्या जगात व्यभिचार नाही. एकपत्नीव्रत किंवा एकपतिव्रत आपण पाखरापासून शिकायला हवं.
जोडी जमली की पाखरं आपलं घरटं स्वतःच बांधतात. घरटं बांधताना गातात,नाचतात,इकडून तिकडे स्वच्छंदपणे उडतात.
मादी त्यात अंडी घालते.दोघं मिळून ती उबवितात.
पिलांचे संगोपन करतात.त्यांना पंख फुटेपर्यंत प्रेमानं वाढवितात.मादी दगावली तर नर त्यांचं संगोपन मातेच्या आत्मीयतेनं करतो.दोघंही दगावली तर शेजारच्या घरट्यातील पक्षी त्या पिलांना चारा भरवितात.पक्षी हे मूर्तिमंत वात्सल्याचं प्रतीक आहे.
स्वच्छता हा गुणदेखील आपण पक्ष्यांपासून घेण्यासारखा आहे.पक्षी घरट्यात कधीही घाण करीत नाहीत.पिलांची शीट बाहेर पडेल अशी व्यवस्था करतात.एवढी दक्षता घेऊनही घाण झाली तर चोचीनं ती बाहेर टाकतात.
निसर्गात तुम्हांला एखादा पक्षी घरट्यात आजारी पडून मेलेला कधीच दिसणार नाही.मृत्यू जवळ आल्याचं त्याला कळताच तो दूर अज्ञातस्थळी जाईल आणि कुणाला न कळता तिथे निष्प्राण होईल.मृत्यूबद्दल शोक नाही.सारं काही शांतपणे घडतं.
पक्षी हे कर्मयोग्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे.अगदी अनासक्त वृत्तीनं ते पिलांची वाढ करतात.त्यांच्यासाठी जीव द्यायलाही ते कमी करणार नाहीत.मात्र पिलं जाणती झाली की पालक त्यांचा त्याग करतात. मायामोहाच्या बंधनात ते पडत नाहीत.
असंग्रह वृत्ती हा त्यांचा आणखीन एक गुण वाखाणण्याजोगा आहे.माणसाप्रमाणे त्यांना उद्याची चिंता नाही.जगात प्रत्येक जण आपला संसार कसा चालेल या चिंतेत असतो.पाखरं आपल्यापेक्षा चांगली आहेत.ती सकाळी भुकेल्या पोटानं बाहेर जातात आणि सायंकाळी पोट भरून सुखानं परततात.तरीही ती किती आनंदी असतात!यजुर्वेदात 'सोमाय लवानालभते त्वष्ट्रे कौलीकान' असा मंत्र आहे.अर्थ असा : सौम्यभावाकरिता लावा पक्ष्याकडे पाहा,कारागिरीसाठी बाया पक्ष्याकडे बघा.बाया पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. अतिशय सुबक आणि सुंदर असतात.असंच सुंदर घरटं शिंपी पक्षी पानांनी शिवून तयार करतो.मानवाला आता खूप तंत्रज्ञान अवगत झालं आहे,परंतु बाया पक्ष्यांसारखं घरटं त्याला बांधता येत नाही.पुन्हा इतकं सर्वांगसुंदर घरटं बांधल्यावर पिलांची वीण झाली की ते घरटं सोडून जातात.त्यावर कसला लोभ नाही.पाखरांची घराबद्दलची ही उदासीन वृत्ती संत कबीरानं एका ठिकाणी मार्मिकपणे व्यक्त केली आहे :
ना घर मेरा
ना घर तेरा
दुनिया रैन बसेरा
असं जीवन जगत असताना पाखरं दुसऱ्याकरिता करीत असलेली कर्तव्यंदेखील मोठ्या निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पार पाडतात.
कबुतरं आणि पाकोळ्यांचा उपयोग युद्धकाळात टपालाची ने-आण करण्याकरिता केला जातो.हे पक्षी कधी शत्रुपक्षाला फितूर होत नाहीत. एका जर्मन औषध कंपनीनं कबुतरांचा उपयोग औषधी गोळ्यांची निर्मितीविषयक तपासणी करण्याकरिता केला आहे.मशिनमधून औषधी गोळ्या बाहेर येतात. कबुतर हे पाहत असतं.एखाद्या गोळीत जर दोष असेल तर ती चोचीनं बाजूला सारतं.पक्षी हे सौंदर्याचं प्रतीक आहे.पाखराइतकी रंगातील विविधता सृष्टीत इतरत्र तुम्हाला आढळून येणार नाही.एका कवीनं त्यांचं वर्णन केलं आहे :
सुंदर ही झाडे।
सुंदर पाखरें किती गोड बरे।
गाणे गाती
पक्ष्यांच्या शरीराची किंवा पंखाची मोडतोड झाल्याचं कधी आढळून येणार नाही.एकाच कुळातील पक्षी कसे एखाद्या साच्यातून काढल्याप्रमाणे एकसारखे दिसतात.
त्यांचं आरोग्य,रूप आणि शरीराचा डौलदारपणा हेवा वाटावा इतका सुंदर असतो.म्हणून पक्ष्याला खरोखरीचा योगी म्हटलं आहे.मयूरासन व क्रौंचासन इत्यादी आसनं आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी मोर आणि क्रौंच पक्ष्यांकडून घेतली आहेत.
भविष्याचं ज्ञान पक्ष्यांना उपजतच प्राप्त होतं.सहावं इंद्रिय प्राप्त झालेले ते अंतर्ज्ञानी आहेत.मानवाला मात्र ते ज्योतिषशास्त्राद्वारे प्राप्त करून घ्यावं लागतं
सृष्टीतील अनेक घडामोडींचं ज्ञान ती घटना घडण्यापूर्वी आपणाला मिळू शकत नाही.भूकंप होण्यापूर्वी त्याचं ज्ञान पाखरांना एक दिवस अगोदर होतं.त्या वेळी पाखरं अस्वस्थ होतात.आपल्या घरट्यांचा त्याग करून आभाळात सैरावैरा उडू लागतात.
समुद्रावरील वादळी पाखरू येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना देतं.चातक पक्षी पावसाचं आगमन सांगतात.कावळ्यांनी आपली घरटी निष्कंटक झाडावर बांधली तर त्या वर्षी पाऊस चांगला पडतो.परंतु एखाद्या वर्षी सावर-पांगारा-बाभूळ अशा काटेरी झाडांवर किंवा सुकलेल्या वृक्षांवर त्यांची कोटारं दिसू लागली की समजायचं की,त्या वर्षी अवर्षण पडणार.
पक्षी नसतील तर जगाचा विनाश होईल.पक्ष्यांचं कीटकांवर नियंत्रण नसेल तर वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी यांचं जगणं अशक्यप्राय होईल.भारतात कीटकांच्या पन्नास हजार जाती आहेत.त्यापैकी टोळ, भुंगेरा,पतंग,सुरवंट आणि वाळवी या तर शेती आणि वनासाठी मोठ्या पीडक आहेत.वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी ह्या दोन्हींवर आपली सारी राष्ट्रीय अर्थव्यवस्था अवलंबून आहे.बहिरी ससाणे आणि घुबडं हे उंदीर व घुशी यांवर नियंत्रण ठेवतात.त्यामुळे दहा टक्के ते पंचवीस टक्के शेतीचं नुकसान वाचतं.पक्षी फुलांचं परागीकरण व बियांचं विकरण करतात.तुती आणि चंदनाची जंगलं निर्माण होण्यात फळं खाणाऱ्या पक्ष्यांचा मोठा सहभाग आहे.तसंच समुद्रातील तरंगते सुरुंग आणि पाणबुड्या दिसताच गंगाचिल्लीसारखे पक्षी तिथे थव्यानं जमा होतात.त्यामुळे युद्धकाळात ते अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
★★★ समाप्त ★★★