* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: बिबट्यांचा गोतावळा / Leopard dive

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/12/26

बिबट्यांचा गोतावळा / Leopard dive

बिबट्यांच्या कुटुंबामध्ये सुरुवातीला राजाचा आहार सर्वांत जास्त होता.त्याला साधारणपणे अडीच ते तीन किलो चिकन रोज लागत असे.त्या खालोखाल जेरी, त्यानंतर तारा आणि सर्वांत कमी म्हणजे साधारणपणे दीड किलो चिकन निकी खात असे.दररोज साधारणपणे आठ ते साडेआठ किलो चिकन आम्हाला लागायचं. बिबट्यांना खाऊ घालणं हा स्पेशल इव्हेंट असे. दुकानातून आणलेलं चिकन एका बादलीत घेऊन आम्ही 'लेपर्ड केज'वर जायचो.त्या वेळी चारही बिबटे बहुधा आऊटडोअर सेक्शनमध्ये असत.

इनडोअर सेक्शनमध्ये एकूण चार पिंजरे होते.चिकनचं आमिष दाखवून एकेका बिबट्याला आम्ही एकामागोमाग इनडोअर सेक्शनमध्ये बंदिस्त करत असू.त्यानंतर प्रत्येक बिबट्याला त्याच्या गरजेनुसार जेवण देत असू.प्रत्येक फीडिंग सेक्शनला दोन दारं होती.एक आतलं आणि एक बाहेरचं.बाहेरचं दार कधीतरीच म्हणजे फक्त साफसफाईच्या कामासाठीच उघडलं जात असे.

एकदा मात्र चांगलीच गंमत झाली.मी आणि संपत पुलावळे बिबट्यांच्या फीडिंगला गेलो होतो.खरं तर संपत हा माकडांचा कीपर;पण बिबट्यांचा नेहमीचा कीपर रजेवर असल्याने मी त्याला सोबत घेतलं होतं. राजा,निकी,तारा,जेरी सगळे आपापल्या इनडोअर सेक्शनमध्ये आले.मी सर्वांना रोजच्यासारखं जेवण दिलं.सर्वांनी रोजच्यासारखं पटकन गट्टम करून टाकलं. त्या सर्वांचं खाणं झाल्यावर त्यांना पुन्हा एकापाठोपाठ आऊटडोअरमध्ये सोडायला सुरुवात केली.

राजा,तारा, जेरी बाहेरील पिंजऱ्यात स्वतःहून गेले.शेवटी फक्त निकी राहिली होती.संपतला मी तिच्या पिंजऱ्याचं आतलं, आऊटडोअर सेक्शनकडे जाणारं दार उघडायची सूचना केली.त्याने चुकून बाहेरचं,पिंजऱ्याबाहेरचं म्हणजे प्राणिसंग्रहालयाच्या आवारातलं दार उघडलं. माझ्यासमोर निकी मोकळी उभी होती.त्या दाराबाहेर पडून ती गावभर फिरू शकली असती.प्रसंग बाका होता.प्रसंगावधान राखून मी निकीच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि संपूर्ण ताकदीने तिला हलकेच दुसऱ्या दाराच्या दिशेने आत रेटली.संपतला बाहेरचं दार बंद करण्याची सूचना केली.संपतने लागलीच ते दार बंद केलं आणि निकी तिच्या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा ट्रॅप झाली.मी सुटकेचा निःश्वास सोडला.

राजा आमच्याकडे येऊन जवळपास १२-१३ वर्षं झाली होती.आता जेरीही चांगलाच आडदांड झाला होता. त्याचा स्वभाव मुळातच चिडका आणि आक्रमक होता. काही वर्षांपूर्वी राजा कुटुंप्रमुख आणि जेरी हा त्या कुटुंबातला बछडा होता.पण आता जेरीही वयात आला होता.काही दिवसांपासून आम्हाला राजा आणि जेरी यांच्यामध्ये एक सुप्त ताण जाणवू लागला होता.जणू त्यांच्यात सत्तेसाठी शीतयुद्ध सुरु झालं होतं.पुढे या शीतयुद्धाचं रूपांतर शारीरिक मारामाऱ्यांमध्ये होऊ लागलं.पुढचा धोका टाळण्यासाठी आम्ही त्या दोघांना एकदिवसाआड-एक दिवस आऊटडोअरमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला.ते एकमेकांसमोर आलेच नाहीत,तर मारामारीला कारणच मिळणार नाही,असा आमचा अंदाज होता.दरम्यान,जेरीची आई निकी मात्र शांत असायची.याउलट,तारा मात्र जेरी आणि राजामधल्या संघर्षामुळे गांगरून जायची.आईच्या, म्हणजे निकीच्या सहवासामध्ये मात्र ती निवांत आणि कम्फर्टेबल असायची.

अशीच दोन वर्षं निघून गेली.दरम्यान राजा चांगलाच म्हातारा झाला होता.खूप थकलाही होता.त्याची भूकही मंदावली होती.कुटुंबप्रमुखाचं पदही त्याने मोठ्या मनाने सोडून दिलं.जेरी कुटुंबप्रमुख झाला.हे ट्रान्झिशन खूपच शांतपणे आणि आपसूक झालं.अत्यंत हॅण्डसम,देखणा असा आमचा राजा कायमचा रिटायर झाला. दरम्यानच्या काळात त्याच्या हालचालींत आणि सवयींतही खूपच बदल झाला होता.त्याच्या उमेदीत तो दररोज अडीच ते तीन किलो मटण पचवत असे;पण आताशा त्याचं जेवण दोन किलोवर आलं होतं.कधी कधी तर तो अगदीच कमी खाऊन झोपून जायचा, किंवा कधी कधी पूर्ण उपवासही करायचा.त्याच्या डोळ्यांतले नटखट भावही लोप पावले होते.हो,आमचा राजा आता म्हातारा झाला होता.

तारीख माझ्या आजही लक्षात आहे.१९ जुलै २००९. रविवारचा दिवस होता तो.मी सकाळी घरी वर्तमानपत्रं चाळत होतो.तेवढ्यात फोन वाजला.फोनवर विलास होता.विलास मोहोळ.त्या दिवशी तो पहिल्या पाळीच्या कामावर हजर होता.मी हॅलो म्हटल्यावर त्याने घाईघाईने बोलायला सुरुवात केली."सर,राजा कसंतरीच करतोय. म्हणजे काहीही करत नाहीय.नुसताच निपचित पडलाय.." या संवादापाठोपाठ त्याचा हुंदकाही मला ऐकू आला.लक्षात आलं,प्रकरण गंभीर आहे.मी तडक बिबट्याच्या पिंजऱ्यापाशी पोहोचलो.राजाच्या नटखट डोळ्यांतलं तेज संपून ते गारगोट्यांसारखे झाले होते. त्याची हालचाल थांबली होती.राजाच्या शरीरातून प्राण निघून गेले होते.आमचा राजबिंडा राजा माझ्या डोळ्यांसमोर अचेतन पडलेला पाहून मला रडू कोसळलं.सख्खा भाऊ किंवा पोटचा पोरच गेल्यासारखं मला वाटत होतं.माझ्यासाठी मोठाच धक्का होता तो. माझा जिवाभावाचा सखा मला सोडून निघून गेला होता.तो म्हातारा होत चालला होता हे आम्हाला दिसतच होतं,तरीही त्याच्या मृत्यूची तयारी माझ्या मनाने केली नव्हती.मी कसंबसं स्वतःला सावरलं. 

मी,विलास आणि तेजसने त्याला उचलून आतल्या पिंजऱ्यात नेलं.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावलं. तिथे प्राथमिक तपासणी झाली आणि राजाला पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलं.पोस्टमॉर्टमच्या अहवालानुसार राजाचा मृत्यू वार्धक्याने झाल्याचं स्पष्ट झालं.राजाच्या मृतदेहावर कायद्यानुसार अंत्यसंस्कार केले.त्याच्या निधनाची बातमी प्रेस नोट काढून माध्यमांना कळवली आणि घरी आलो.अचानक मला अतिशय रितं रितं वाटू लागलं होतं.रात्रीपर्यंत सतत कुणाचे ना कुणाचे फोन येत होते.ते मी यंत्रवतच घेत होतो.रात्री झोपलो तेव्हा अशक्य दमलेलो होतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली.आधी बाहेर जाऊन सगळी वर्तमानपत्रं घरी घेऊन आलो आणि शांतपणे राजाच्या मृत्यूबद्दल आलेल्या सगळ्या बातम्या वाचून काढल्या.राजाबद्दल काय काय छापून आलंय हे वाचण्याची मला उत्सुकता होती.शिवाय शक्य तितका वेळ त्याच्या आठवणींमध्ये रमूनच मला त्या दुःखातून बाहेर पडता येणार होतं.पण पेपर वाचता वाचता एक भलतीच बातमी समोर आली.

एका हिंदी वर्तमानपत्राने राजाच्या मृत्यूला मीच जबाबदार असल्याचं छापून टाकलं होतं.ही बातमी छापणारा वार्ताहर ना कधी पार्कमध्ये आला होता,ना कधी मला भेटला होता. आम्ही काढलेल्या प्रेस नोटच्या बाहेर जाऊन त्याने हा जावईशोध लावला होता. राजाला आम्ही रात्रीच्या वेळी लोखंडी साखळीने बांधून ठेवायचो आणि त्यामुळेच त्याच्या गळ्याला जखम झाली असावी.ती जखम चिघळून त्यात किडे पडून त्याच्या अंगभर पसरून त्याचा मृत्यू झाल्याची धादांत खोटी बातमी त्याने छापली होती.खरं तर दखल घ्यावी एवढीही त्या बातमीची लायकी नव्हती.पण सार्वजनिक जीवनात कधी कुठल्या गोष्टीमुळे आग लागेल हे सांगता येत नाही.त्यात मी महापालिकेच्या कायम सेवेमध्ये नसल्याने खोटी असली तरी निगेटिव्ह बातमी छापून येणं माझ्या करियरच्या आणि पर्यायाने आमच्या प्राणिसंग्रहालयाच्या भवितव्यासाठी धोक्याचं होतं.मला भीती होती तेच झालं.ती बातमी शहरात सगळीकडे वाचली गेली आणि राजाचा मृत्यू हा विषय महापालिकेच्या प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा बनला. नगरसेवक लगेच प्रश्न विचारू लागले.इतर पेपरमध्येही बातम्या छापून आल्या.हा गोंधळ आठवडाभर सुरू होता.हा अपप्रचार कसा थांबवायचा हे मला कळत नव्हतं.तेवढ्यात अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे यांनी निवडक पत्रकार,अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अचानक आमच्या पार्कला भेट दिली.त्यात खोटी बातमी देणाऱ्या त्या हिंदी पेपरचा दुसरा एक पत्रकारही होता.डुंबरेसाहेबांनी पार्कमधले सर्व पिंजरे,खाद्याचं स्टोअर,किचन,हॉस्पिटल,लायब्ररी सगळं जातीने तपासलं.आमच्या एस.ओ.पी. म्हणजे स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तपासून पाहिल्या.त्या भेटीदरम्यान सर्वांनाच, अगदी त्या पेपरच्या वार्ताहरालाही राजाच्या बाबतीतला आरोप खोटा असल्याचं पटलं.त्यानंतर डुंबरेसाहेबांनी पत्रकार परिषद बोलवून सर्वांच्या शंका दूर केल्या आणि या नाट्यावर एकदाचा पडदा पडला.प्रत्येक बिबट्याला स्वतंत्र कक्ष असताना त्यांना साखळीने बांधलं जातं असा आरोप करणारा तो पत्रकार मला पुन्हा कधीच भेटला नाही.प्रत्यक्षात त्याला विचारण्यासाठी माझ्याकडे काही बेसिक प्रश्न होते.उदा.बिबट्याला बांधण्यासाठी ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याला वापरण्यात येणारी साखळी पुरेल की त्यापेक्षा जास्त क्षमतेची लागेल? बिबट्याची साखळी कशाला बांधावी? झाडाच्या खोडाला की भिंतीवर ठोकलेल्या एखाद्या मोठ्या खिळ्याला ? पण तशी संधी मला मिळाली नाही.हळूहळू दिवस जात गेले तसं पार्कचं रूटिन पूर्ववत झालं.माझ्या मनावरचा ताणही निवळला.राजाच्या जाण्याने तयार झालेली पोकळी मात्र भरून निघणं अवघड होतं.

◆◆◆ समाप्त ◆◆◆◆