▶ कात्रजच्या प्राणिसंग्रहालयातल्या एका बिबट्याला काही कारणाने आमच्या पार्कमध्ये हलवायचा निर्णय झाला.आम्ही सगळे आनंदून गेलो.या बिबट्याचं नाव होतं राजा. पुढच्या काही दिवसांत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून राजा आमच्याकडे आला.हा आमच्या प्राणिसंग्रहालयातला पहिला बिबट्या.लवकरच राजा आमच्या प्राणिसंग्रहालयाचं आकर्षण ठरला आणि शहरातील आबालवृद्धांचा लाडका झाला. एक वर्षाचा राजा होताच रुबाबदार,इतर बिबट्यांपेक्षा देखणा.
अंगावरचा चकाकणारा कोट तर फारच अफलातून ! डोळे किंचित घारे आणि चेहऱ्यावर कायम बोलका भाव ! (सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन पुणे.)
काही वर्षांपूर्वी कोणाला तरी शेतात एक बिबट्याचं पिल्लू सापडलं.अण्णाने त्याला रेस्क्यू करून कात्रजच्या अनाथालयात ठेवलं.अनाथालयातल्या बाबा पटवर्धन नावाच्या कीपरने त्याला खूप छान सांभाळलं.त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी पिल्लालाही बाबा म्हणायला सुरुवात केली.पुढे त्याला पेशवे पार्कला हलवलं.बाबा पुणेकरांचा लाडका होता. वयात आल्यावर तिथे त्याचं एका देखण्या मादीशी सूत जमलं आणि तिच्या पोटी राजा जन्माला आला.राजाची आई प्राणिसंग्रहालयातच लहानाची मोठी झाली होती.त्यातच पहिलटकरीण असल्याने तिचं बछड्याकडे नीट लक्ष नव्हतं.त्यामुळे पेशवे पार्कचा प्रमुख आणि आमचा मित्र डॉ.विनय गोऱ्हे
याने त्या पिल्लाला अण्णाकडे सोपवलं.तोवर या पिल्लाचे डोळेही नीट उघडलेले नव्हते.पण कात्रजच्या अनाथालयात आल्यावर हरीश घाटगे या कीपरने त्या बछड्याला स्वतःच्या पोरासारखं सांभाळलं.गाईच्या दुधात निरनिराळी प्रोटीन्स आणि पाणी मिसळून त्याला देत असत.थोड्याच दिवसांत राजाला चिकन मटणाच्या खिम्याचा खुराकही सुरू झाला.मग काय,राजा सणसणीत वाढला.सुट्टीच्या दिवशी माझी कात्रजला नेहमी चक्कर होत असे.तिथे गेलं की राजाशी खेळण मस्ट ! त्याशिवाय परत येताच येत नसे.
खूपच खेळकर होता तो.माझे बूट पळवून त्यांची वाट लावणं हा त्याचा आवडता उद्योग.नेहमी भेटी होत असल्यामुळे आमची चांगली गट्टी होती. त्यामुळे राजाच्या आगमनासाठी मी विशेष उत्सुक होतो.राजा आमच्याकडे आला तेव्हा वर्षाचा होता. आमच्याकडच्या इतर प्राण्यांपेक्षा बिबट्या हा जास्त ताकदीचा,चपळ आणि खरोखर वन्य प्राणी होता. त्याच्यासाठी खास पिंजरा तयार करणं गरजेचं होतं. परदेशीसाहेबांनी नव्या पिंजऱ्यासाठी १० लाख रुपये मंजूर केले.पण नवा पिंजरा तयार होईपर्यंत एका बऱ्यापैकी पिंजऱ्यात राजाची तात्पुरती व्यवस्था केली.त्याच दरम्यान प्राणिसंग्रहालयाच्या कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. ती संधी साधून सेंट्रल झू अॅथॉरिटीचे मेंबर सेक्रेटरी एस.सी.शर्मा यांना भेटलो आणि त्यांना बिबट्यांसाठी पिंजरा उभारण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यांनी चंदिगढच्या प्राणिसंग्रहालयाचं नाव सुचवलं. तिथले बिबट्यांचे पिंजरे बघून त्यावरून आरेखन करण्याची सूचना केली.त्यांच्या सूचनेनुसार त्याच रात्री टॅक्सी करून चंदिगढ गाठलं.तिथले अधिकारी,कर्मचारी आणि इंजिनियर मंडळींची भेट घेतली,चर्चा केली. बिबट्याच्या पिंजऱ्याचे फोटो काढले,ड्रॉइंग्ज पाहिली आणि पुण्याला परतलो.
महापालिकेतले कार्यक्षम कार्यकारी अभियंता मदनमोहन सावळे यांच्याकडे आमच्या प्राणिसंग्रहालयाच्या विकासकामांची जबाबदारी होती.याच कामासाठी रामदास तांबे नावाचा उत्साही आणि अभ्यासू स्थापत्य अभियंता कार्यरत होता.मनोज तातुसकर नावाचा तरुण आर्किटेक्टदेखील आमच्या टीममध्ये सामील झाला.आम्ही चौघांनी बिबट्याच्या सवयी, आवडी-निवडी आणि स्वभाववैशिष्ट्यांचा अभ्यास करून पिंजऱ्याचं डिझाइन फायनल केलं.खर्चाला महापालिकेची मान्यता घेऊन टेंडर काढलं.प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नगरकर यांना हे टेंडर मिळालं.त्यांनी मुदतीच्या आतच पिंजऱ्याचं काम पूर्णही केलं.सत्तर फूट लांब,तीस पस्तीस फूट रुंद आणि एकवीस फुट उंचीचा प्रशस्त पिंजरा राजासाठी तयार झाला.
पिंजरा तयार झाल्याच्या दिवशीच राजाला आम्ही नव्या पिंजऱ्यातील इनडोअर सेक्शनमध्ये हलवलं. आऊटडोअर सेक्शनमधील पाण्याच्या हौदाचा सिमेंट गिलावा पूर्ण करून त्या संध्याकाळी गवंडी मंडळी निघून गेली.दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर नेवाळेने राजाला आऊटडोअरमध्ये सोडलं.राजाने
पिंजराभर आनंदाने फेरफटका मारला आणि अजूनही ओल्या असणाऱ्या सिमेंटच्या गिलाव्यावर तो स्वतःच्या पाऊलखुणा उमटवून आला.यानंतर जेव्हा केव्हा पिंपरी-चिंचवड परिसरात एखाद्या बिबट्याचं आगमन व्हायचं,तेव्हा त्याच्या ठशांची तुलना करण्यासाठी राजाचे ठसे येऊन अभ्यासायचे असा एक प्रघातच पडला.
राजा आमच्याकडे आला आणि त्याला लवकरच नेवाळेचा लळा लागला.तो नेवाळेसोबत खूप खेळायचा,दंगामस्ती करायचा.संध्याकाळी त्याला इनडोअरमध्ये बंद करायला गेलं की तो हमखास नेवाळेच्या खांद्यावर उडी मारून त्याला वॉटर पाँडमध्ये पाडायचा.हा त्याचा आवडता खेळ होता. पण चुकूनही त्याने नेवाळेला इजा केली नाही.
पुढे सेंट्रल झू अॅथॉरिटीने प्राणिसंग्रहालयामध्ये कुठल्याही प्रजातीचा एकटा प्राणी प्रदर्शनासाठी ठेवायला बंदी घातली.त्यामुळे एक तर राजासाठी जोडीदार शोधणं भाग होतं.अन्यथा,त्याला इतरत्र हलवावं लागलं असतं.त्या वेळेपर्यंत पेशवे पार्कमधलं प्राणिसंग्रहालय कात्रजच्या नव्या, विस्तीर्ण आवारात शिफ्ट झालं होतं.हाच नियम त्यांनाही लागू असल्याने तिथल्या तत्कालीन प्रमुख डॉ.काझवीन उम्रीगर अस्वलाच्या मादीच्या शोधात होत्या.आमच्याकडे त्यांच्यासाठी मुन्नी,तर त्यांच्याकडे निकी नावाची बिबटीण.मुन्नीला कात्रजला हलवायचं आणि निकीला आमच्याकडे आणायचं असं ठरलं.हा निर्णय झाला तेव्हा निकी गरोदर होती.पण नेहमीप्रमाणे सरकारी कागदपत्रं प्रत्यक्षात हातात येईपर्यंत मध्ये बराच वेळ गेला आणि निकी आमच्याकडे आली ती थेट दोन बछड्यांसहित.
तोवर राजाला खास त्याच्यासाठी तयार केलेल्या भल्या मोठ्या पिंजऱ्या एकट्याने राहण्याची सवय झाली होती.तिथे आपल्या मर्जीचा राजा होता तो. त्यात आम्हा सर्वांचा लाडका.त्यामुळे त्याच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या या नव्या पाहुण्यांचं आगमन त्याला सुरुवातीला फारसं मानवलं नाही. सतत गुरगुरत तो नापसंती व्यक्त करत असायचा. निकीलाही बहुधा त्याचा आडदांडपणा खुपत असावा.ती तारा आणि जेरी या आपल्या दोन बछड्यांच्या संगोपनात व्यस्त होती.काही दिवस पिल्लांसोबत निकी इनडोअरमध्येच राहिली. थोडया दिवसांनी आम्ही तिला आणि पिल्लांना आऊटडोअरमध्येही घेऊ लागलो.आता तारा आणि जेरी जोमाने वाढू लागले होते.एकत्र मिसळून राजाची सुरुवातीची नाराजी कमी झाली. सगळे एकत्र राहायला लागले आणि आपोआपच राजा कुटुंबप्रमुख झाला.
बिबट्यांचं हे कुटुंब आमच्या पार्कमध्ये चांगलंच स्थिरावलं.तारा आणि जेरी चार महिन्यांचे झाले होते.सुरुवातीला हे दोघं फक्त दूध पीत होते.ते हळूहळू मटण किंवा चिकनचा खिमा चापू लागले. आताशा चिकनचे तुकडेही ते मोठ्या आवडीने खायला लागले होते.निकी त्यांना वेगवेगळे खेळ शिकवण्यात मग्न झाली होती.त्यांची शाळा पाहण्यात राजाही बहुधा आनंदी होत असावा. आम्हाला आणि प्रेक्षकांनाही मजा येत होती.
एका शांत दुपारी गणपत धावत-पळत माझ्याकडे आला आणि धापा टाकत म्हणाला,"सर,तारा पिंजऱ्याच्या वरच्या अढीवर चढून बसली आहे आणि घाबरून वरच्यावरच फिरतेय." ताबडतोब तिथे गेलो आणि तिथलं दृश्य पाहून अवाक झालो. तारा पिंजऱ्याच्या चेनलिंकवरून चढून एकवीस फुटांवरच्या लोखंडी आढ्यावर जाऊन बसली होती! तिला खाली आणण्यासाठी आमच्यापैकी कुणाला तरी वर चढणं गरजेचं होतं.मीच ते काम करायचं ठरवलं.दोन लाकडी शिड्या एकमेकांना बांधून तिच्या जवळ पोहोचलो.तेवढ्यात ती दुसऱ्या आढ्यावरून चालत माझ्यापासून दूर गेली.खाली उतरून नवीन जागी शिडी लावली आणि पुन्हा एकदा चढून वरपर्यंत गेलो;पण तिने पुन्हा एकदा जागा बदलली.हा प्रकार दोन तास चालला.आता मात्र मी प्रचंड थकलो होतो.घामाने चिंब झालो होतो.त्यामुळे शर्टही काढला होता.प्रेक्षक मात्र खूपच खूष झाले होते.दोन रुपयांत भरपूर करमणूक ! घामाघूम झालेला 'बनियन मॅन' आणि त्याला खेळवणारं 'लेपर्ड कब'! थकून,हताश होऊन खूप वेळ एका ओंडक्यावर विमनस्क अवस्थेत बसून राहिलो.
वर पाहिलं,तर बहुतेक तारालाही आता या पळापळीचा कंटाळा आला असावा.एका जागी ती काही क्षण स्थिर झाली.समोरच्या लोखंडी अँगलवर तिने पुढचे पाय रोवले आणि मागचे पाय शांतपणे खाली सोडून ती तिथे लटकली.त्यानंतर पुढचा डावा पाय काढून उजव्या पायावर लटकली. त्यानंतर हलकेच एकेक नख मोकळं करत गेली आणि शेवटी एकाच नखावर तिचं संपूर्ण शरीर तोल धरून होतं.काही क्षण असेच गेले आणि हलकेच आपलं नख सोडवून ती खाली झेपावली आणि धपकन माझ्यासमोर अवतरली.जणू काही काहीच घडलं नसल्याच्या आविर्भावात माझ्या मांडीवर नेहमीसारखी शांतपणे येऊन बसली. माझ्याबरोबरचे सगळे कर्मचारी आणि प्रेक्षकही अवाक झाले.तारा आणि जेरीचे असे उपद् व्याप कायमच सुरू असत.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!!