घटनाक्रमाची एक साखळी संपली.घुबड तलाव परिसराच्या इतिहासात या टप्प्यात मुंगी-संस्कृतीत काय काय झालं? मूळ पायवाट वारूळ क्षेत्रानं दोन महायुद्धं पाहिली.आणि त्यानंतर एका झाड-देवांचा प्रकोप,एक महामारी पाहिली.अखेर नोकोबी परिसराचा हा तुकडा जसा होता तसाच राहिला.पण हा सगळा इतिहास झाला.आज या क्षेत्रात एक नवं वारूळ उभं आहे. ते महासमाजासारखं नाही,तर मूळ पायवाट वारुळाचं पिल्लू आहे.एकूण परिसरानं ताणतणाव भोगले,पण त्यातून त्याचा टिकाऊपणा नव्यानं दिसला.हजारो वर्षं ही घटनाचक्रं गरगरत आहेत.पण हे बदलू शकतं.आता चहूकडे झाड-देव आहेत.ते आले आणि पसरले.त्यांच्याकडे जबर शक्ती आहेत,एका झटक्यात सर्व काही हिरावून नेऊ शकणाऱ्या. नोकोबीच्या इतिहासात प्रथमच मुंग्या,महाप्राणी,पूर्ण परिसर टिकणं- न टिकणं हा जुगार झाला आहे
हिवाळा आला.पाऊस जमिनीत मुरला आणि थंडीनं जमिनीतच गोठला.वारुळाच्या घुमटावर बर्फाचा टोप चढला.वारुळाची सर्व प्रजा आत शांत,सुस्त गुच्छ बनवून ऊब राखत होती.हिवाळ्यात झोप काढून वसंत येण्याची स्वप्नं पाहात होती.आणि वर झाड-देव त्या क्षेत्रात फिरत होते.मोजमाप करत होते.आपल्या त्या विचित्र भाषेत एकमेकांशी बोलत योजना आखत होते.('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )
कायदा आणि विकास
पदवी कमावून रॅफ हार्वर्ड विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घ्यायला गेला.उत्तम मार्कांनी पदवी परीक्षा पास झाला होता.आणि नेमकं काय शिकायचं,त्या शिक्षणाचा काय उपयोग करायचा,हेही ठरत होतं.सर्व सुट्ट्यांमध्ये घरी जाणं,सायरसमामा,फ्रेडकाका यांना भेटणं सुरू होतं.
जेप्सन लोक अजूनही नोकोबी परिसर विकायला तयार नव्हते,पण विकासासाठीचा दबाव वाढत होता.रॅफची पर्यावरणवादी मतं जगजाहीर होती,आणि विशेषतः सायरसमामा त्यांच्यामुळे अस्वस्थ होता.तो पडला पक्का विकासवादी !
"बघ,रॅफ.तुला जेप्सन-नोकोबी परगणे नेहमीच गांवढळ राहून हवेत का? एक पाहा,सगळ्या भागात विकास होणारच.
आपला भाग भरपूर सूर्यप्रकाशाचा,सौम्य हिवाळ्याचा आहे.त्याला 'सूर्यपट्टा' म्हणायला लागले आहेत ! आणि मोबील,पेन्साकोला हे तर सूर्यपट्ट्यातही विकासाच्या वेगासाठी प्रसिद्ध होताहेत. राईट?"
रॅफ दबला हळूच उत्तरला, "येस्सर!" त्याला सायरसमामाचं म्हणणं पटत नव्हतं,पण सभ्य,सौम्य असं उत्तरही नव्हतं त्याच्यापाशी.
"काय होतं पूर्वी,आणि आज काय आहे?" मामानं हल्ला सुरू ठेवला. "तुझे आजोबा लहान असताना मोबीलच्या दक्षिणेला काहीच विकास झाला नव्हता.डॉग नदीपासनं सीडार पॉइंटला गेलात,तर दोनपाच घरं फक्त भेटायची. रस्त्याच्या शेवटच्या भागात तर डांबरीकरणही केलं नव्हतं, हो ना?"
रॅफनं नुसतीच मान होकारार्थी हलवली.
"आणि सीडार पॉइंटला धडपडत पोचलं,की डॉफिन बेट दिसायचं.सुंदर होतं ते ! छान वाळवंटी किनारपट्टी! एका टोकाला यादवीच्या काळातला किल्ला.पण बोट भाड्यानं घेऊन जावं लागायचं.बहुतेक बेट रिकामं होतं. आणि आज पाहा.सगळा इथून तिथला भाग विकसित झाला आहे.उद्योगधंदे बहरताहेत.डॉफिन बेटावर जायला पूल झाला आहे.अॅलाबामा राज्याच्या अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा भाग आहे,तो.याला विकास म्हणतात,रॅफ ! प्रगती आहे ही!"
रॅफ हरला होता.
"अमेरिका बुडावर बसून थोर नाही झाली,रॅफ ! कठोर होऊन,युद्ध खेळून आपण मोठे झालो.इतिहास वाच तू तो शाळांमध्ये शिकवतात तो बायल्यांचा,डाव्यांचा इतिहास नाही.खरा इतिहास ! देवानं जे आपल्याला दिलं,ते घ्यायला रेड इंडियनांना हाकलावं लागलं.
मेक्सिकोशी लढून पॅसिफिक किनारा गाठता आला. देश दुप्पट झाला त्या लढाईनं.चांगलं वाईट ठरवत नाही मी. मी जग कसं चालतं ते सांगतो आहे,तुला.वाढत जा, नाहीतर नष्ट व्हा ! "आपण राष्ट्रीय उद्यानांमध्ये बसून कविता लिहून नाही मोठे झालो.तू सेमीजपैकी आहेस.तुझ्यात ते रक्त आहे ! उगीच काहीतरी उदारमतवादी स्वप्नं पाहत भरकटू नकोस!"
तर पुढे काय करायचं यातल्या अडचणी भोगत रॅफ कायदा शिकत गेला.अगदी ठरवून त्यानं विशेष अभ्यासासाठी पर्यावरणासंबंधीचे कायदे निवडले. त्यातला तज्ज्ञ बनून रॅफ वकील झाला.
परत येऊन त्यानं मोबीलला सायरसमामाला गाठलं. म्हणाला,"मला इथल्या सगळ्यांत मोठ्या बिल्डर-
डेव्हलपरकडे नोकरी करायची आहे,संडरलंड असोसिएट्सकडे."
"खरं सांगतोयस,की हा काही हार्वर्डछाप विनोद आहे?"
"अगदी गंभीरपणे बोलतो आहे मी,मामा."
"हे बघ,ड्रेक संडरलंडला मी खूप वर्षं ओळखतो.त्याची तुझ्या नोकोबीवर पूर्वीपासून नजर आहे.त्यानं घुबड तलावाजवळ काही जमीन घेतलीही आहे.
ज्या क्षणी जेप्सन लोक नोकोबी विकायला काढतील, त्या क्षणी ड्रेक ती घेऊन डेव्हलप करायला लागेल. त्याला मदत करणार आहेस तू?"
"हो.मला त्याच्यासाठी काम करायचं आहे."
"बेइमानी नाही ना करणार आहेस तू?"
"नाही मामा.सगळं इमाने इतबारेच करेन,सर्वांचं समाधान करेन,आणि नोकोबीही वाचवेन !"
असा रॅफ संडरलंड असोसिएट्सचा विधी-सल्लागार झाला.सोबतच मोबील-क्लेव्हिल् भागातल्या पर्यावरणवादी गटांशीही रॅफचा घनिष्ठ संबंध होता.पण दोन्ही पक्षांपासून रॅफची विरुद्ध बाजू कधी लपवली गेली नाही.संडरलंडकडचं खूपसं काम सरळसोट,पर्यावरणाशी संबंध नसलेलं असायचं.रॅफ ते उत्तमपैकी हाताळायचा. यामुळे वाचणाऱ्या वकिलांच्या 'फी'ज किती,हेही तो आडवळणानं ड्रेक संडरलंडपर्यंत पोचवायचा!
दुसरीकडे पर्यावरणी गट,वार्ताहर यांच्याकडून पुढे काय होऊ शकतं याच्या आगाऊ सूचना मिळून बचावाची धोरणं आखणारा,अशी रॅफनं ख्याती मिळवली. कोणत्या पक्षाच्या माहितीचा कोणापासून बचावासाठी वापर होतो,याबद्दल दोन्ही पक्ष जराजरा साशंक असायचे.ही तारेवरची कसरत करत असतानाच रॅफला एक नवा छंद जडला.पूर्वीही तो थोडाफार व्यायाम करतच असे.आता त्यासोबत ०.२२ रायफलची नेमबाजीही तो शिकला !
ही कलेसाठी कला होती.आठवड्यातून दोनतीनदा 'हेन्रीज गन्स अँड शूटिंग गॅलरी'त जाऊन तो नेमबाजी करायचा.शिकार करण्यात मात्र त्याला मुळीच रस नव्हता.त्याच्या काही पर्यावरणवादी मित्रांना हे समजत नसे.अशा एका मित्राला - बिल् रॉबिन्सला रॅफ म्हणाला
"एक बघ,मी बंदुका हाताळणाऱ्या लोकांमध्ये जन्मलो आणि वाढलो.माझा नेम नेहमीच चांगला होता.मी अश्राप प्राणी,पक्षी मारत नाही.तुला माहीत आहे ते.पण अधूनमधून एखादं बाग खंदळणारं हरीण मारावं लागतं. आपण हरणांचे सगळे भक्षक मारले.आता त्यांची संख्या स्फोटासारखी वाढते आहे.बरं,गावांच्या कडेला राहणाऱ्यांना लांडगे आणि कूगर्स चालत नाहीत.त्यांना मारणारे शिकारी चालतात.मग अधूनमधून हरणं मारणंही चालायला हवं."
"पण तीतर-बटेर,बदकं आणि टर्कीजचं काय?" बिल् न विचारलं.
"ए ! भाषणबाजी नको करूस ! तू आणि मी काही तीतर-बटेरांवर नेमबाजी नाही दाखवत. आणि कायदे पाळून शिकार करणारे आपले आणि पर्यावरणाचे मित्रच असतात.तुला हे माहीत आहे.त्यांना त्यांच्या शिकारींचं क्षेत्र टिकून हवं असतं.ते आपल्याइतक्याच हट्टानं जंगलतोडीला विरोध करतात."
"जंगलतोड थांबली की झालं?"
"हो.कूपर्स घारीनं तीतर मारणं आणि एखाद्या शिकाऱ्यानं मारणं सारखंच.पण घारी आणि तीतरांना हवं असलेलं जंगल टिकवण्यात शिकाऱ्यांचीही आपल्याला मदत असते."
"ठीक आहे, रॅफ.पण ते नॅशनल रायफल असोसिएशनचं स्टिकर तरी काढ,तुझ्या गाडीवरचं.'
"असू दे रे ! तो इमानदारीचा प्रकार आहे.मला खरंच नेमबाजी आवडते! "
आणि या छंदानं रॅफला नोकोबीत रस असणाऱ्या एका वेगळ्याच प्रकारच्या माणसाची भेट घडवली.त्याची शूटिंग गॅलरीतली नेमबाजी पाहून दोन माणसं त्याच्याशी बोलायला आली.
एकजण होता चाळिशीचा,नीट दाढी केलेला,पण निळा सूट नीट अंगासरसा न बसणारा.गळ्यातल्या टायवर राष्ट्रध्वजाचं डिझाइन होतं,आणि डाव्या कॉलरवर सोनेरी क्रूस होता.चेहऱ्यावर स्मित होतं,पण नजर सावध, मोजमाप करणारी होती.
याच्यामागे होता निळ्या जीन्स आणि लालपांढरे उभे पट्टे असलेल्या शर्टातला माणूस.टोकं खाली वळवलेली डाकू-छाप मिशी,आणि तीन दिवसांचे दाढीचे खुंट. उजव्या डोळ्याखाली अश्रू गोंदलेला,आणि मानेच्या दोन्ही बाजूंना ज्वाळा गोंदलेल्या.सतत चूइंग्-गम चघळणारा जबडा.
"मी वेन लेबो,आणि हा बो रेनी." पहिला माणूस म्हणाला.रॅफ हस्तांदोलन करीत असताना रेनीनं पुस्ती जोडली, "हे रेव्हरंड वेन लेबो."
दोघांनी रॅफला सोबत एका बियरवर गप्पा मारायला बोलावलं.बऱ्याच उत्तरेच्या मॉन्रोव्हिल्हून आले होते दोघं. त्यांना रॅफची बरीच माहिती होती. रॅफला आश्चर्यच वाटलं याचं. उदाहरणार्थ, रॅफ हार्वर्डला शिकायला का गेला,जवळपासची विद्यापीठं असताना,यात त्यांना रस होता !
"शिकलो थोडं,हार्वर्डमध्ये.का विचारता आहात?"
"वेल्, तू मोबीलमध्ये महत्त्वाचा माणूस होतो आहेस. आमच्या काही धार्मिक लोकांना जरा कुतूहल आहे तुझ्याबद्दल." लेबो म्हणाला. रॅफनं उत्तर द्यायच्या आधीच रेनीनं विचारलं, "उत्क्रांती शिकवतात, हार्वर्डला?"
रॅफला त्यांचा रोख कळला. "हो तर.हार्वर्डला उत्क्रांतीबद्दल शिकवतात.चांगलं विज्ञान आहे ते,भरपूर पुरावे असलेलं.मला कल्पना आहे,की इथल्या अनेकांना ते पटत नाही. अमेरिकाभर काही लोकांना ते पटत नाही." वाद सोडवायचं पहिलं तत्त्व,'निष्कारण विरोधकांना चिडवू नका'.
"बायबलही शिकवतात?" लेबोनं विचारलं.
"हो तर!" हे कर्मठ 'उजवे' लोक होते,तर ! बिल् रॉबिन्सनं सांगितलं होतं,यांच्यापासून सांभाळून राहायला."एक अख्खं कॉलेज आहे,'स्कूल ऑफ डिव्हिनिटी' नावाचं.गेली पावणेचारशे वर्षे हार्वर्ड धर्मगुरूंचं शिक्षण करतं आहे!"
तत्काळ आपलं चुकलं आहे,हे रॅफला जाणवलं.वाद सोडवायचं दुसरं तत्त्व,'गमजा मारू नका.
विरोधकांना कमी लेखता आहात,असं वाटू देऊ नका.नम्र,तटस्थ राहा'.
पण सोपं नव्हतं,हे.
"बायबलमधलं जे वाचतोस,त्याच्यावर विश्वास आहे तुझा?"
रॅफला राग यायला लागला होता.त्याला इतर कामं आहेत,असं सांगून उठून जायची इच्छा होत होती.पण त्यानं लेबोचा अपमान झाला असता.आणि लेबोला नेमकं काय हवं आहे हे समजून घ्यायचं होतं रॅफला.
"असं म्हणू या,की बायबलमधल्या काही गोष्टी खऱ्या आहेत.काही गोष्टी खऱ्या असतील,असं जरा वेगळ्या पद्धतीनं सांगितलं आहे.एकूण बायबल काय म्हणतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे."
"मी बोलतो वेगळ्या पद्धतीचं,जरा दम धर.मी,रेनी तुला भेटायला आलो आहोत.येऊ आम्ही मुख्य मुद्द्यावर. जरा सबुरीनं घे." लेबो म्हणाला. "बोला!" रॅफ म्हणाला.
"एक म्हणजे,'बायबल' म्हणणं थांबवू या.तो देवाचा शब्द आहे,त्याचा मुलगा येशू ख्रिस्त याच्यामार्फत आपल्यापर्यंत आलेला."
"माझी हरकत नाही,तसं म्हणण्याला.पण ज्यूंचे अनेक पंथ,ख्रिश्चनांचे अनेक पंथ बायबलचे वेगवेगळे अर्थ लावतात.म्हणूनच तर आपल्याकडे धर्मस्वातंत्र्य आहे. लोकशाहीत याला महत्त्व नको." "मी सांगतो महत्त्व काय आहे ते.तू देवाचा शब्द हे अखेरचं सत्य मानू शकतोस,किंवा वेगवेगळे अर्थ लावू शकतोस;तुला ज्यानं बरं वाटेल तसं."
रॅफला ना यातलं देवशास्त्र आवडत होतं,ना लेबोचा सूर. पण त्यानं संभाषण चालू ठेवायचं ठरवलं, "ओके ! जरा टोकाचं बोलता आहात तुम्ही,पण त्यातून ठरतं काय? कुठे पोचतो आपण?"
"रॅफेल एक खाजगी प्रश्न विचारू?"
"पहा,तुम्ही " रॅफेलला खाजगी प्रश्न नको होते खरं तर; पण त्यानं बोलण्याआधीच लेबो म्हणाला,"रॅफेल,तुला येशू ख्रिस्तानं वाचवलं आहे?"
"मी एपिस्कोपेलियन आहे,बरेचदा.पुरतं का तुम्हाला हे?" रॅफ म्हणाला.त्यानं मुद्दाम घड्याळही पाहिलं.
"तू त्या चर्चचा सभासद असशीलही रॅफ,पण त्यानं तू तुझा आत्मा येशू ख्रिस्ताच्या हवाली केला आहेस,असं ठरत नाही.त्या चर्चच्या सभासदत्वामुळे तू मेल्यावर स्वर्गाच्या राज्यात जाशील,हे ठरत नाही.तुला हे महत्त्वाचं नाही वाटत?" लेबो म्हणाला.
"मला पटत नाही तुमचं म्हणणं.खरं तर मला समजतही नाही,तुम्ही काय सांगता ते.मला खरं तर फिकीरही नाही या सगळ्याची.का बोलतो आहोत,आपण हे? प्लीज सांगा मला!"
"तू चांगल्या गटात आहेस.तुझा बहुतेक देवावर,त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास आहे. शतू पूजापाठ वगैरेही करतोस.पण तू वाचलेला नाही आहेस,दोस्ता; तू स्वतःला येशू ख्रिस्ताला अर्पण केलं नाही आहेस!"
बराच वेळ संभाषण या प्रकारानं चालल्यावर रॅफ उठला.तो बाहेर जाताना लेबो जवळ आला.
"माझं ऐक रॅफेल! वेळ आहे तोपर्यंत स्वतःला बदल!" लेबो म्हणाला.
हा भाग संपला.शिल्लक पुढील भागात…!!