याचा अर्थ पृथ्वीवर आता जिवंत असलेले,भूतकाळात होऊन गेलेले आणि भविष्यात जन्माला येणारे अशी सगळी माणसं मानवप्राण्याच्या अस्तित्वापासूनच जर्म सेल्समध्ये कठे ना कुठे अस्तित्वात होती! या संकल्पनेला 'प्रिफॉर्मेशन' असं भारदस्त नावही होतं । जर्म सेल म्हणजे 'बीजपेशी.' बीजांडं आणि शुक्रजंतू या दोन्हींनाही आपण जर्म सेल म्हणू शकतो.मजा म्हणजे ही संकल्पना चुकीची असूनही,यातही स्त्रियांच्या बाजूनं बोलणारे आणि पुरुषांच्या बाजूनं बोलणारे असे दोन गट होते.यातले स्त्रियांच्या बाजूनं बोलणारे ही 'सूक्ष्म माणसं' बीजांडात असतात असं म्हणायची तर पुरुषांच्या बाजूनं बोलणारे 'सूक्ष्म माणसं' पुरुषाच्या शुक्रजंतूमध्येच असली पाहिजेत असं म्हणत होती. 'निकोलस हार्टसॉकर' यानं तर मायक्रोस्कोपखाली अशी सूक्ष्म मुलं तरंगताना बघितल्याच्या चक्क बढाया मारल्या होत्या.गंमत म्हणजे बरेच लोक त्याच्यावर विश्वासही ठेवत होते.एकूणच हा सगळा गोंधळ आणि कल्पनांचा खेळ होता.हे अगदी आता आतापर्यंत म्हणजे साधारणपणे गेल्या तीनशे-साडेतीनशे वर्षांपर्यंत चालू होतं.पण नंतर जेव्हा मायक्रोस्कोपचा शोध लागला तेव्हा खरी गोष्ट उघड झाली !
त्याचं असं झालं की 'कास्पर फ्रेडरिक वूल्फ' (१७३३-१७९४) या वैज्ञानिकानं कोंबड्यांच्या फलित झालेल्या अनेक अंड्यांचा मायक्रोस्कोपखाली अभ्यास केला.तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं,की त्या कोंबड्यांच्या पिलांचं हृदय अगदी सुरुवातीला एका लहानशा बिंदूसारखं दिसतं आणि नंतर ते वेगवेगळा आकार घेत वाढत जातं.शिवाय,सुरुवातीला अंड्यामध्ये कोणतेही अवयव नसतात.ते सगळेच अवयव नंतर तयार होतात असं दाखवून देऊन वूल्फनं प्रिफॉर्मेशनची थिअरी खोडून काढली आणि परंपरावाद्यांना चांगलाच धक्का दिला.यालाच नंतर 'एपिजेनेसिस' म्हणजेच 'नव्यानं निर्माण होणं' असं नाव मिळालं.पण आश्चर्य म्हणजे अॅरिस्टॉटलनं 'प्रिफॉर्मेशन' चुकीचं असून, 'एपिजेनेसिस' हेच बरोबर असण्याची शक्यता याआधीच दोन हजार वर्ष व्यक्त केली होती ! पुरुष आणि स्त्री यांच्या समागमानंतर पुरुषाचा शुक्रजंतू आणि स्त्रीचं बीजांड एकत्र येऊन गर्भधारणेला सुरुवात होते.सोळाव्या शतकात आता स्त्रीच्या प्रजननाच्या अवयवांची माहिती नव्यानं तपासून त्या माहितीचा पुन्हा अभ्यास व्हायला लागला होता.१५५९ मध्ये अॅनॅटॉमिस्ट रिआल्डो कोलंबो यानं 'क्लायटॉरिस' शोधल्याचा दावा केला होता! त्यानं क्लायटॉरिसला 'इंटर्नल पेनिस' असं म्हटलं होतं.शिवाय,त्यानं हेही सांगितलं होतं,की गर्भधारणा होताना त्या स्त्रीला कदाचित लैंगिक सुख मिळत नसावं,याच शतकाच्या शेवटी गॅब्रिएल फॅलोपिओ यानं फैलोपियन ट्यूब्जचा शोध लावला होता.या ट्यूब्जचं नावही त्याच्याच नावावरून पडलं होतं.
पण या ट्यूब्जचं काम काय असतं हे अजून कुणालाही कळलेलं नव्हतं.याच दरम्यान मोठ्या प्रमाणात शवविच्छेदनं (डिसेक्शन्स) व्हायला लागली आणि मानवी शरीरातले अनेक अवयव शोधले जायला लागले. आणि त्यांना ती शोधणाऱ्या वैज्ञानिकांची नावं दिली जायला लागली.आपल्या शरीरातल्या किमान ३/४ गोष्टींना तर या फैलोपिओचंच नाव आहे.
उदाहरणार्थ, हेनलेज लूप,फैलोपियन नव्हं,ब्रोकाज एरिया,बोअमन्स कॅप्सूल.या यादीत पुढे शंभर-दीडशे वैज्ञानिक येतात। अशा प्रकारे एक एक वैज्ञानिक आपण शोधलेल्या अवयवाला आपली नावं द्यायला लागला.
याच शोधांमध्ये ओव्हरीजचा शोध लागला.बीजकोषाचा (फॉलिकल) शोध मात्र रेग्नियर डी ग्राफ या डच वैज्ञानिकाला अपघातानंच लागला.त्यानं त्याला 'ग्राफायन फॉलिकल' हे नाव दिलं.आता हे नाव जास्त कुणी वापरत नाही,आपण याला बीजकोष (फॉलिकल) म्हणतो.यातच बीजांड असतं.खरं तर फॉलिकल हे ओव्युलेशनच्या दरम्यान अर्धा ते दोन सेंटिमीटरपर्यंत मोठं होऊ शकतं.त्यामुळे ते सापडणं त्यामानानं सोपं होतं.आणि नंतर फॉलिकल फुटून त्यातून बीजांड (एग) बाहेर येतं.बीजांड मात्र ०.१ मिलिमीटर इतक्याच आकाराचं असतं. त्याचा शोध नंतर लागणार होता.
विल्यम हार्वेनं (१५७८-१६५७) स्त्रियांच्या प्रजननाच्या अवयवांचा बराच अभ्यास केला होता.त्यानं तर राजाच्या पाळलेल्या हरणांवर अनेक प्रयोग केले होते. त्यातून त्यानं प्राण्यांमधल्या अंड्याचा शोध लावला होता.हार्वेचं वैद्यकशास्त्रातलं काम हे विज्ञानाच्या प्रगतीला बऱ्यापैकी वेग देणारं असल्यामुळे हार्वे हा जुने तात्त्विक विचार आणि नवे प्रयोगशील शोध यांच्यामधला दुवा मानला जातो.आता स्त्रीच्या शरीरात बीजांड तयार होते असा शोध लागल्यानंतर काही लोकांना माणसाचा जन्म अंड्यातून होतो असं वाटत होतं.या सगळ्या नाट्यात आता अँटोनी फॉन लेव्हेनहूक (१६३२-१७२३) यानं माणसाचा जन्म हा अंड्यातून होत नसून अॅनिमलक्युल्समधून होतो आणि हे अॅनिमलक्युल्स पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात असं सांगून जगाला हादरवूनच सोडलं ! याचं कारण माणसाच्या वीर्यातले स्पर्ज त्यानं चक्क मायक्रोस्कोपखाली पाहिले होते.लेव्हेनकनं माणसाच्या स्पर्जचा खूपच अभ्यास केला होता. त्यानं आपल्या अनेक शोधांबद्दल रॉयल सोसायटीला अनेक पत्रं लिहून कळवलं होतं. स्पर्जबद्दल १६७७साली तो लिहितो,
"स्पर्म हे माणसाच्या सीमेनमध्ये (वीर्यात) असणारे जिवंत प्राणी आहेत आणि ते वेगात हालचाल करत असतात."यावर रॉयल सोसायटीनं त्याला इतर प्राण्यांच्या सीमेनमध्येही असे स्पर्ज दिसतात का हे शोधायला सांगितलं होतं.
त्यानंतर निकोलस हार्टसॉकर यानं कोंबड्याच्या वीर्यामध्ये आपण हे अॅनिमलक्युल्स आधी पाहिले असल्याचा दावा केला.पण त्यानं ते लेव्हेनहूकच्या नंतर काहीच महिन्यांनी १६७८ मध्ये पाहिले होते. त्या पाठोपाठ पॅरिसच्या एका नियतकालिकात ख्रिश्चन हायगेन यानंही १६७८ मध्येच आपण अॅनिमलक्युल्स पाहिल्याचा दावा केला होता.गंमत म्हणजे या दोघांनीही आपापले शोधनिबंध जाहीर करण्यापूर्वी रॉयल सोसायटीला आलेलं लेव्हेनहूकचं पत्र वाचलेलं होतं,हे नंतर सिद्ध झालं!
आता कोणत्याही प्राण्याच्या वीर्यात मोठ्या प्रमाणात हे
अॅनिमलक्युल्स असतात हे सिद्ध झालं होतं.पण हे कशासाठी असतात,ते इतक्या वेगात हालचाली का करत असतात आणि या प्राण्यांचा गर्भधारणेशी काही संबंध असेल का याचा शोध मात्र अजूनही खूप दूर होता.गंमत म्हणजे फॉलिकलचा (बीजकोषाचा) शोध लागूनही बीजांडाचा (एगचा) शोध अजून लागला नव्हता.सस्तन प्राण्यांमधल्या बीजांडाचा शोध १८२७ साली कार्ल अर्स्ट फॉन बेइर (Carl Ernst von Baer) यानं लावला. यानंच 'स्पर्मेटोझुआ' हा शब्दही पहिल्यांदा निर्माण केला होता.गंमत म्हणजे १८३५ साली अॅनॅटॉमिस्ट रिचर्ड ओवेन यानं स्पर्म म्हणजे चक्क पॅरासाइट्स असावेत असं वाटून त्यांना वळवळणाऱ्या प्राण्यांच्या गटात टाकून दिलं होतं! त्यानंतर १८४१ साली अल्बर्ट फॉन कोलिकर (Albert von Koliikar) यानं स्पर्मेटोझुआ हे काही पॅरासाइट्स नाहीत तर ते आपल्याच शरीरातल्या टेस्टीजमध्ये तयार होणाऱ्या आणि पुढे पुढे प्रवास करू शकणाऱ्या पेशीच आहेत हे दाखवून दिलं.पण तरीही गर्भधारणेमध्ये स्पर्मेटोझुआची भूमिका काय आहे हे अजूनही माहीत नव्हतं.आतापर्यंत 'प्रिफॉर्मेशनची थिअरी' म्हणजे स्पर्ममध्येच पूर्णाकृती मूल आधीच तयार असतं ही थिअरी बऱ्यापैकी मूळ धरून होती. स्वतःला वैज्ञानिक म्हणवणाऱ्या अनेकांनी स्पर्ममध्ये पूर्णाकृती लहान मूल पाहिलेलं असल्याचा दावा केला होता,पण या कल्पनेला लवकरच तडा जाणार होता.
इटालियन वैज्ञानिक लझारो स्पॅलान्झानी (१७२९-१७९९) यानं १७७० साली सस्तन प्राणी, मासे, आणि पाण्यात राहणाऱ्या अनेक प्राण्यांचं वीर्य (सीमेन) तपासलं होतं.त्यावर त्यानं अनेक प्रयोगही करून पाहिले होते.त्यानंतर त्यानं बेडकांवर प्रयोग करून बेडकांच्या ऊसाइट्स (अंडी) ही सीमेनशी संपर्क आल्यानंतरच फर्टिलाइझ (फलित) होतात हे पाहिलं होतं.त्यावरून फर्टिलायझेशनसाठी बीजांड आणि सीमेन म्हणजेच स्पर्ज ही दोन्हीही गरजेची असावीत असा निष्कर्ष काढला.गंमत म्हणजे हे प्रयोग त्यानं प्रयोगशाळेच्या उपकरणांमध्ये केले असल्यानं हे पहिलं 'इन व्हिट्रो फर्टिलायझेशन' (IVF) म्हटलं जातं !
त्यानंतरच्या प्रयोगांमध्ये त्यानं सीमेन गरम करून, त्यात व्हिनेगर,मीठ किंवा स्पिरिट असे वेगवेगळे पदार्थ घालून नंतर ते ऊसाइट्सवर (अंड्यांवर) सोडून पाहिलं तेव्हा असं प्रक्रिया केलेलं सीमेन ऊसाइट्स फलित (फर्टिलाइझ) करू शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं. पण आणखी मजा म्हणजे जर सीमेन बारीक फिल्टरमधून गाळलं आणि नंतर फिल्ट्रेटमध्ये (म्हणजे गाळणीच्या वर राहिलेला भाग) पाणी घातलं आणि ते ऊसाइट्सवर टाकलं तरीही त्यापासून बेडकाची अंडी फलित होतात हे त्यानं पाहिलं.
इतके प्रयोग केल्यानंतर त्यानं खरं तर कोणत्याही प्राण्याच्या मादीच्या बीजांडाचा स्पर्मशी संपर्क आला तर ते बीजांड फर्टिलाइन (फलित) होतं असा निष्कर्ष काढायला हवा होता,पण स्पर्मेटोझुआ हे पॅरासाइट्स असतात ही त्याची समजूत अजूनही दव होती.त्यामुळे फिल्ट्रेटमध्ये ऊसाइट्सला फर्टिलाइझ करणारा दुसरा कोणतातरी भाग असावा असं त्याला वाटलं आणि त्यानं चक्क हे प्रयोग तिथेच सोडून दिले!
प्राण्यांमध्ये स्पर्म आणि वनस्पतींमध्ये पोलन ग्रेन यामध्ये पूर्ण जीव आधीच असतात. ते फक्त स्त्रीच्या बीजांडामध्ये इम्प्लांट (रोपण) झाले की त्यातून त्या आधीच असलेल्या जिवाची वाढ सुरू होते असं सतराव्या आणि अठराव्या शतकातल्या अभ्यासकांना वाटत होतं. हीच प्रिफॉर्मेशनची किंवा
अॅनिमलक्युल्सची थिअरी होती.
त्यानंतर एकोणिसाव्या शतकात मात्र स्विस फिजिशियन जाँ लुईस प्रिव्होस्ट (Jean Louis Prevost) आणि फ्रेंच वैज्ञानिक जाँ बाप्टिस्ट ड्यूमा (Jean Baptiste Dumas) या दोघा वैज्ञानिकांनी स्पॅलान्झानीचेच प्रयोग पुन्हा करून पाहिले.पण त्यांनी या वेळी प्रयोग करण्याच्या भांड्यात स्पर्मच्या संख्येपेक्षा जास्त बीजांडं ठेवली.मग त्यात जितके स्पर्म होते तितकीच बीजांडं फर्टिलाइझ होतात हे त्यांच्या लक्षात आलं.यातून आता मात्र त्यांनी स्पर्मेटोझुआ हे काही पॅरासाइट्स नाहीत तर ते फर्टिलायझेशन करणारे मुख्य घटक आहेत हे त्यांच्या लक्षात आलं.त्यानंतर त्यांनी एक स्पर्म एकाच अंड्याला फर्टिलाइझ करतो असं दाखवून दिलं.पण या दोघांनी स्पर्म हा फर्टिलायझेशन करतो हे जरी दाखवून दिलं असलं, तरी त्यांनी फर्टिलायझेशन कसं होतं ते मात्र पाहिलं नव्हतं. ते हेन्री नेल्सन यानं १८५२ साली पाहिलं.तो वर्णन करतो, "आज पहिल्यांदा बीजांडामध्ये स्पर्म अक्षरशः आपलं डोकं घुसवताना मी स्पष्टपणे पाहू शकलो!" त्यानंतर लगेचच १८५३ मध्ये जॉर्ज न्यूपोर्ट यानं पाण्यातल्या प्राण्यांमध्ये फर्टिलायझेशन होताना पाहिलं. त्यानंतर एडुवर्ड बेनेडिन (Edouard van Beneden) यानं १८७५ मध्ये आणि ऑस्कर हर्टविग यानं १८७६ मध्ये सस्तन प्राण्यांमध्ये फर्टिलायझेशन होताना पाहिलं.त्यानंतर प्रिव्होस्ट आणि ड्यूमा याच जोडगोळीनं ससा आणि कुत्रे यांच्यावर अनेक प्रयोग करून फर्टिलायझेशन हे फैलोपियन ट्यूब्जमध्ये होत असल्याचं पाहिलं.त्यातून मग फैलोपियन ट्यूब्ज या ओव्हम (बीजांड) युटेरसपर्यंत वाहून नेत असल्याचं लक्षात आलं.
आता नव्या जिवाचा जन्म होण्यापूर्वी गर्भधारणा नेमकी कशी होते, पुरुषाच्या वीर्याचं, स्पर्जचं, स्त्रीमधल्या ऊसाइट्सचं (बीजकोषाचं) आणि ओव्हम्सचं (बीजांड) काय महत्त्व आहे हे आता जवळपास लक्षात यायला लागलं होतं.
हा भाग संपला. - समाप्त