▶ जागतिक विक्रम प्रस्थापित करणं हा काही आमच्या प्रयोगामागचा हेतू नव्हता.साप हा उपद्रवी आणि भयप्रद प्राणी नसून तोही माणसाचा मित्रच आहे.त्याला त्रास दिला तरच तो चावतो,हे लोकांच्या मनावर ठसवणं हा आमचा उद्देश होता. सापांच्या बाबतीत लोकांवर अंधश्रद्धांचा सर्वाधिक पगडा होता.त्यामुळे दरवर्षी असंख्य साप विनाकारण मारले जात होते.या अंधश्रद्धा नष्ट करणं,सापांबद्दलची अतार्किक भीती कमी करणं हे आमचं काम होतं.अण्णाच्या विक्रमानंतर ते आम्ही अधिक जोमाने सुरू केलं.
शहराशहरांमध्ये जाऊन प्रत्यक्ष साप दाखवणं, विषारी-बिनविषारी सापांची माहिती देणं,ते ओळखायला शिकवणं,सापांबाबतचे गैरसमज दूर करणं आणि साप आढळला तर शक्यतो त्याला मारून न टाकता सर्पमित्रांना बोलावण्याची सवय लोकांना लावणं असं मोठंच आव्हानात्मक काम होतं हे.त्यासाठी गावोगावी सापांसोबतची प्रात्यक्षिकं करून दाखवायची आणि अनुभवाच्या आधारे लोकांच्या मनातली भीती काढायची असं आम्ही ठरवलं.अर्थातच त्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती.आमच्याकडे एवढा पैसा कुठून यायला ! त्यामुळे सुरुवातीला आम्ही वेगवेगळ्या संस्थांची मदत घ्यायचं ठरवलं.लायन्स क्लब,रोटरी क्लब,जेसी क्लब अशा आंतरराष्ट्रीय संस्थांच्या आर्थिक मदतीने आम्ही सोलापूर,कोल्हापूर,सातारा,लातूर,
मुंबई,ठाणे आणि त्याबरोबरच राज्याबाहेर इंदौर, हैदराबाद अशा ठिकाणी सर्पप्रदर्शनं भरवली.
या सगळ्या ठिकाणी आम्ही जिवंत विषारी बिनविषारी साप घेऊन फिरायचो.त्यासाठी आवश्यक असणारा परवाना आम्ही रीतसर मिळवला होता.त्यासाठी आम्ही एक जुनी मेटॅडोरही भाड्याने मिळवली होती.त्यात सापांचे पिंजरे ठेवण्यासाठी जागा करून घेतली होती.ही गाडी होती अरुण नावाच्या एका कलंदर मराठी तरुणाची. नोकरीपेक्षा ट्रान्सपोर्टचा धंदा करून बघावा म्हणून बँकेचं कर्ज काढून त्याने ही मॅटॅडोर विकत घेतली होती.साप आणि पिंजरे घेऊन गावोगावी जाण्यासाठी पुण्यातल्या बऱ्याच वाहतूकदारांनी आम्हाला न परवडणाऱ्या भाड्याची मागणी केली होती.त्याच दरम्यान माझी अरुणशी ओळख झाली.तो स्वतःहून आनंदाने आमच्या कामात सहभागी झाला.अगदी कमी भाड्यात त्याने गाडी तर दिलीच,पण बहुतेकदा तो स्वतः ही आमच्यासोबत असायचा.मी,अण्णा,आमचा विश्वासू सहकारी दिनमहंमद पीरमहंमद शेख ऊर्फ दीनू मदारी आणि अरुण अशी आमची टीम होती. सापांचे पिंजरे,माहिती लिहिलेले फलक-पाट्या आणि बाकी काहीबाही सामान हा आमचा फिरता संसार.सापांचे पिंजरे,माहितीफलक आणि आमचा बाडबिस्तारा यामुळे मेटॅडोर गाडी भरून जात असे. पुढे गाडीत चालवणारा एक आणि त्याच्या शेजारी क्लीनरच्या जागी एक माणूस.त्यामुळे चौघांपैकी दोघांचीच सोय या मेटॅडोरमध्ये होत असे.त्यामुळे बहुतेक वेळा मी आणि अण्णा आमच्या बजाज सुपर स्कूटरवरून मेटॅडोरच्या पुढे-मागे राहत आलटून पालटून ड्रायव्हिंग करत मुक्कामास पोहचत असू.अगदी इंदौरपर्यंतही आम्ही अशीच मजल दरमजल करत प्रदर्शनं भरवली.रस्ता खराब असेल तर आणखीच फजिती व्हायची. खाचखळग्यांमधून गाडी धडधडून दोन-तीन पिंजऱ्यांच्या काचा हमखास फुटत असत.मुक्कामी गेल्यावर आमच्यासाठी तो पहिला भुर्दंड, म्हणजे वेलकम एक्सपेन्स असे. मुक्कामी पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहराचे महापौर किंवा आयोजक क्लबच्या अध्यक्षांच्या हस्ते वगैरे आमच्या सर्पप्रदर्शनाचं उद्घाटन होत असे.त्यानंतर पुढचे दोन-तीन दिवस प्रचंड गर्दी,व्याख्यानं,प्रात्यक्षिकं, शंकानिवारण यामध्ये निघून जात.दिवसभरात जेवायलाही वेळ मिळत नसे.प्रदर्शन गुंडाळून थकून भागून लांब पल्ल्याचा प्रवास करून आम्ही पुण्यात पोहोचत असू.या काळात आमच्या नोकऱ्या सुरू होत्याच.अण्णा 'हॉटेल ब्ल्यू डायमंड' मध्ये रिसेप्शनिस्ट आणि मी टेल्कोत.त्यामुळे तिथे रजा टाकून आम्हाला ही हौस भागवावी लागे.रजा मिळवण्यासाठीही बरीच खटपट करावी लागे. बऱ्याचदा खूप वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या आमच्या आजी-आजोबांना पुन्हा जिवंत करून त्यांच्या आजारांची आणि निधनाची कारणं देऊन आम्ही सुटी मिळवत असू.सुरुवातीच्या दिवसांत अनेकदा बिनपगारी रजा काढूनही आम्ही हे दौरे केले.पण पुढे पुढे आम्ही रजा घेऊन काय उद्योग करतो हे लोकांना कळू लागल्यावर दोघांच्याही वरिष्ठांनी आम्हाला खूपच सहकार्य केलं.
या दौऱ्यांच्या काही आठवणी अविस्मरणीय आहेत. एकदा आम्ही प्रदर्शनासाठी नांदेडला निघालो होतो. मी आणि अण्णा स्कूटरवर होतो.बीडला पोहोचेपर्यंत चांगलंच अंधारून आलं;पण तरीही आम्ही गाड्या तशाच नांदेडच्या दिशेने दामटत राहिलो.आमची स्कूटर मेटॅडोरच्या खूप पुढे होती. अण्णा चालवत होता,मी मागे बसलो होतो. स्कूटरच्या हेडलाइटच्या प्रकाशात अण्णाला अचानक समोर काही तरी दिसलं म्हणून त्याने दोन्ही ब्रेक मारून गाडी थांबवली.रस्त्याच्या मधोमधच एखादा प्राणी बसल्यासारखं दिसत होतं. गाडीवरून उतरून हळूहळू दबकत दबकत पुढे गेलो.स्कूटरच्या प्रकाशात नेमकं काय आहे हे दिसत नव्हतं.तेवढ्यात मागून आलेल्या मेटॅडोरचा हेडलाइट पडला आणि कळलं,की कोणी प्राणीबिणी नसून ते पोह्याने भरलेलं पोतं होतं. त्यामुळे आकाराच्या मानाने जडही नव्हतं.काही न बोलता अरुण आणि दिनूने ते सरळ गाडीत टाकलं. नांदेड गाठून मुक्काम केला.सकाळी नेहमीप्रमाणे पिंजऱ्यांच्या फुटलेल्या काचा आणायला अरुण आणि दिनू बाजारात गेले आणि पोतंभर पोहे विकून आले.
त्या काळी आजच्यासारखे जीपीएस मॅप्स नसल्यामुळे रस्ता चुकणं,दोन गावांमधल्या अंतरांचा अंदाज चुकणं अशा गोष्टी हमखास घडत असत. असंच एकदा इंदौरचं प्रदर्शन संपवून त्याच रात्री माघारी फिरण्याच्या तयारीत होतो.प्रदर्शनाच्या संयोजकांवर खर्चाचा भार पडू नये म्हणून आम्ही शक्यतो प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशीच आमचा परतीचा प्रवास सुरू करत असू.नेहमीप्रमाणे सामानसुमान गाडीत भरून,खाणंपिणं उरकून आम्ही निघालो.खांडव्याला मेटॅडोर पंक्चर झाली. पंक्चर काढण्यात दोन-तीन तास गेले.अजून खूप अंतर कापायचं होतं.साप,पिंजरे,मेटॅडोर,स्कूटर आणि आम्ही सगळे एवढा सगळा लवाजमा घेऊन मध्येच कुठे तरी हॉटेलमध्ये मुक्काम करणंही शक्य नव्हतं आणि आम्हाला ते परवडणारंही नव्हतं. थकल्यामुळे अण्णा मेटॅडोरमध्ये बसला.दिनूला मागे घेऊन मी स्कूटर दामटली.सहा-सात तासांच्या प्रवासानंतर मध्यरात्री कधी तरी मध्य प्रदेशची हद्द ओलांडून आम्ही महाराष्ट्रात प्रवेश केला.मी आणि अण्णाने पुन्हा जागा बदलल्या.त्यानंतरचा रस्ता मात्र खूपच भयंकर होता.प्रचंड खाचखळगे.त्यात आम्ही सगळेच थकलो होतो.पेंग येत होती. ..आणि अचानक धाडकन आवाज होऊन आमची मेटॅडोर रस्ता सोडून डाव्या बाजूला घुसली.प्रसंगावधान राखून अरुणने तत्परतेने ब्रेक मारून गाडी
थांबवली. गाडी जवळपास डावीकडे कलंडण्याच्या बेतात होती.थांबून पाहिलं, तर या अपघातामुळे आतल्या पिंजऱ्यांच्या काचाही मोठ्या प्रमाणात फुटल्या होत्या,पण सुदैवाने कुणालाही लागलं नव्हतं.सापही व्यवस्थित होते. खाली उतरून पाहिलं,तर आमच्या गाडीचा अॅक्सल तुटला होता. आवाज ऐकून जवळचे गावकरी आले.तिथल्याच एका धाब्यावर चहा-बिस्किटं खाऊन रात्र काढली. दुसऱ्या दिवशी गाडी दुरुस्त करून पुणं गाठलं. सुखरूप पोहोचलो खरे,पण या सगळ्या गोंधळात आर्थिक फटका मोठाच बसला.पिंजऱ्यांच्या काचा तुटल्या,त्यात गाडीचाही खर्च उपटला.त्यामुळे पुढचे बरेच दिवस आम्हाला पुढचा दौरा काढता आला नाही.शिवाय असे दौरे किती दिवस काढत राहणार? त्यापेक्षा काही तरी वेगळं,अधिक समाधान देणारं काम करायला हवं असं आमच्या मनाने घेतलं.आणि त्याच दरम्यान आमचं आयुष्य हादरवून टाकणारी एक घटना घडली.
केवळ साप आणि वन्य जीवांच्या सेवेत झोकून द्यायचं,असं बऱ्याच दिवसांपासून अण्णाच्या डोक्यात घाटत होतं.त्यानुसार अखेर इंदौरच्या दौऱ्यानंतर काही दिवसांनी अण्णाने नोकरी सोडली.माझी टेल्कोची नोकरी मात्र सुरू होती. अण्णाने स्वतःला सापांना वाहून घेतलं.आमच्या बंगल्यातील सर्पकुंडाची व्यवस्था अण्णाच पाहत होता.शहरातील विविध भागांतून पकडून आणलेल्या सापांची देखभाल करणं,त्यांचं खाणंपिणं,कात काढणं,उन्हें दाखवणं आणि थोड्या दिवसांनी त्यांना सुरक्षित सोडून देणं अशी कामं तो मनापासून करत होता.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि ब्रिटिश कौन्सिलच्या ग्रंथालयात जाऊन साप आणि सरपटणाऱ्या सापांविषयी पुस्तकं मिळवून वाचून काढण्याचाही त्याने सपाटा लावला होता.पॉप्युलर बुक हाऊसच्या गाडगीळांमार्फतही त्याने इंग्लंड-अमेरिकेतून खूप पुस्तकं मागवली आणि वाचून काढली.सापांबरोबर वावरण्याचा अनुभव तर त्याला होताच,आता त्याचा अभ्यासही जोरात सुरू झाला.
(सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन)
- आणि नेमकी त्याच सुमारास अण्णाचंच नव्हे,तर माझंही आयुष्य बदलवून टाकणारी एक घटना घडली.२३ मे १९८२. रविवार होता.मी दुपारी ४ वाजता कामावरून घरी आलो. पायांतले बूट काढण्यापूर्वीच घरात काही तरी घडलंय असं जाणवलं.छोट्या बहिणीने रडवेल्या आवाजात अण्णाला घोणस चावल्याचं सांगितलं.आतल्या खोलीत आई रडत बसली होती.दादांनी रिक्षाने अण्णाला ससून हॉस्पिटलला नेलं होतं. बहिणीने आणलेला चहाचा कप तसाच ओट्यावर ठेवून मी स्कूटरने ससून गाठलं.एका बेडवर अण्णा झोपला होता. बाइट होऊन दोन-तीन तास तरी सहज झाले असावेत.त्याचा डावा हात खूपच सुजला होता. शिरेवाटे हळूहळू एएसव्हीचा डोस चालू होता. घोणसाच्या विषाचा गंभीर परिणाम झाला होता.ती रात्र आम्हा सर्वांसाठी खूप भयंकर होती.अण्णाला प्रचंड वेदना होत होत्या.झोप लागणं तर शक्यच नव्हतं.दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दंश झालेला त्याचा डावा हात सुजून कमरेएवढा झाला होता. त्याच्या हाताला गँग्रीन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.गॅग्रीन म्हणजे साक्षात यमदूतच ! परिणाम झालेल्या जागेवरून,उदाहरणार्थ,हाताच्या बोटांच्या पहिल्या पेरापासून सुरू झालेलं गँग्रीन क्षणाक्षणाला मुख्य शरीराच्या जवळ पोहोचतं. अशा वेळी रुग्णाचा प्राण वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणून त्याचा गँग्रीन झालेला अवयव त्वरित कापून वेगळा करावा लागतो.त्याला अॅम्प्युटेशन' म्हणतात. अण्णाच्या हाताचा प्रवास तिकडेच चालला होता. दिवस उजाडूनही आमची काळरात्र संपली नव्हती.
अण्णाच्या हाताचा पंजा आणि पाचही बोटं काळी पडली होती.डॉक्टरांनी त्याच्या हातावर फॅशिओटॉमी करण्याचा निर्णय घेतला. फॅशिओटॉमी म्हणजे सुजलेल्या अवयवावर उभे आडवे छेद घेणं.या प्रक्रियेमुळे त्यामध्ये जमा झालेलं पाणी,पू,साकळलेलं रक्त वाहून जातं आणि त्यानंतर तो छेद पुन्हा शिवून टाकला जातो.
'अॅम्प्युटेशनची वेळ येऊ नये म्हणून केला जाणारा हा उपाय.अण्णाच्या हाताची फॅशिओटॉमी झाली खरी;पण त्याचा उपयोग झाला नाही.दरम्यान, अण्णाच्या हाताचं गँग्रीन कोपराच्याही वर,पार दंडापर्यंत पसरू लागलं होतं.संपूर्ण हात जणू मृत झाला होता.अण्णाला तर काय चालू आहे हेही नीटसं कळत नव्हतं.तो संवेदनाहीन होऊन असहायपणे इकडे-तिकडे पाहत होता. एखाद-दुसरा शब्द उच्चारायचा,तोही असंबद्ध. आता तातडीने काही निर्णय घेणं भाग होतं.
त्या वेळी डॉ.सुभाष पत्की नावाचे निष्णात शल्यविशारद के.ई.एम.हॉस्पिटलच्या सर्जरी विभागाचे प्रमुख होते.ते आमच्या थोरल्या मेव्हण्यांचे मित्र.आम्ही तातडीने त्यांना भेटलो. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ससूनमधून डिस्चार्ज (अगेन्स्ट मेडिकल अॅडव्हाइस) घेतला आणि अण्णाला के.ई.एम.मध्ये आणलं.तिथे त्याला थेट ऑपरेशन थिएटरमध्येच नेण्यात आलं,आणि डॉ. पत्कींनी तातडीने त्याच्या हाताचं ग्युलेटिन
अॅम्प्युटेशन केलं.मी,दादा,माझा मित्र विनोद पावशे,अण्णाची होणारी बायको नंदिता,आमची थोरली बहीण अक्का,तिचे पती दादासाहेब आणि आणखी काही मित्र के.ई.एम. मध्ये बसून होतो - छातीवर मणाचं ओझं घेऊन.तासाभराने तोंडावर मास्क लावलेले डॉ.पत्की ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि त्यांनी मला विश्रामबागवाड्यामधून 'वैकुंठा'चा पास आणायला सांगितला.त्यांचा निरोप मला नीटसा कळला नाही. अण्णा गेला असं वाटून मी स्तब्ध झालो आणि मटकन जमिनीवर बसलो.माझ्या सोबत तेव्हा संजीव कडेकर हा मित्र होता.त्याने प्रसंगावधान राखून डॉ. पत्कींना स्पष्ट विचारलं,तेव्हा कळलं,की हा पास अण्णाच्या मुख्य शरीरापासून काढून टाकलेल्या हातासाठी हवा होता.अण्णा वाचला होता.सुटकेचा निःश्वास टाकत आम्ही पास काढायला गेलो आणि अण्णाच्या हाताला अग्नी देऊन आलो.जिवंत माणसाच्या मृत अवशेषाचं दहन करून आलो.एकीकडे अण्णा वाचला याचा आनंद आणि दुसरीकडे त्याचा हात गेला याचं दुःख याने आम्ही सारे हबकून गेलो.अण्णाला मात्र या सगळ्या उलथापालथीचा पत्ता नव्हता.तो वाचला खरा;पण आता कुठे त्याची खरी लढाई सुरू होणार होती.बेशुद्ध अवस्थेतील अण्णाला ऑपरेशन थिएटरमधून वॉर्डमध्ये आणलं.आता अण्णासोबत मी,विनोद आणि नंदिता होतो.नंदिताला काही तरी कारणं सांगून घरी पाठवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला;पण ती ठाम होती.जराही विश्रांती न घेता ती आमच्या बरोबरीने रात्रंदिवस अण्णाच्या सेवेमध्ये रुजू झाली.
ऑपरेशन आटोपून रात्री डॉ.पत्की के.ई.एम. हॉस्पिटलजवळ असलेल्या त्यांच्या घराकडे चालत निघाले होते.मीही त्यांच्यासोबत निघालो. माझ्याबरोबर नंदिताची आई,तारा वॉरियर होत्या. त्यांनी डॉक्टरांना स्पष्ट शब्दांतच विचारलं, "हा माणूस मरणार तर नाही ना?" डॉ.पत्की थोडेसे हसले आणि म्हणाले,"नाही. ही इज नाऊ आऊट ऑफ डेंजर.बट स्टिल,कीप युवर फिंगर्स क्रॉस्ड फॉर द नेक्स्ट फ्यू डेज...!" त्यामुळे पहिल्या तीन-चार दिवसांत आम्ही सगळ्यांनीच अण्णाची प्रचंड काळजी घेतली.हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली आणि आम्ही अखेर कीप युवर फिंगर्स क्रॉस्डच्या मुदतीबाहेर पडलो.
अण्णाचा डावा हात कोपराच्या वर दंडातूनच काढून टाकला होता.दरम्यान,ऑपरेशननंतर बहुतेक वेळा अण्णा ग्लानीत असल्याने आपला हात कुठे आहे हे त्याला कळत नव्हतं.तो सतत त्याच्या डाव्या हाताचा शोध घेत असायचा.बऱ्याचदा विनोद स्वतःचा हात तिथे ठेवून 'हा काय तुझा हात' असं खोटंच सांगून अण्णाचं तात्पुरतं समाधान करायचा. शुद्ध आल्यावर त्याला सत्य समजणार होतंच.तसं ते समजलंच.त्याने ते कसं सहन केलं त्याचं त्यालाच माहीत ! तेव्हा त्याचं वय अवघं अठ्ठावीस होतं.
अण्णाच्या हाताच्या जखमेवर पुढे बरेच दिवस उपचार सुरू होते.डिस्चार्ज मिळाल्यानंतर सात-आठ महिन्यांनी जखम पूर्ण बरी झाली.त्या काळात माझा मित्र डॉ. सुहास बुलबुले दिवसाआड आमच्या घरी येऊन ड्रेसिंग करून देत असे.मी आणि विनोद सुहासला मदत करत असू.कधी कधी नंदिताही येत असे.ड्रेसिंगच्या वेळी साहजिकच अण्णाची काही ना काही कुरकुर व्हायची. साधी ठेच लागली तरी आपल्याला आई आठवते, अण्णाचा तर अख्खा हातच काढलेला होता. त्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच केलेली
बरी.पण नंदिता सोबत असली की तो शांत राहत असे.पण अण्णा खरंच ग्रेट.त्याने हे सगळं मोठ्या धीराने आणि चिकाटीने सहन केलं. एवढी प्रचंड सहनशक्ती त्याच्यात कुठून आली, असा प्रश्न मला तेव्हा कायम पडायचा. जखम भरून आल्यावर वानवडी येथील मिलिटरीच्या कृत्रिम अवयव केंद्रामध्ये (आर्टिफिशियल लिंब सेंटर) त्याचं नाव नोंदवलं. आमच्यापुढे दोन पर्याय ठेवण्यात आले. एक तर संपूर्ण भारतीय बनावटीचा जयपूरमध्ये बनलेला कृत्रिम हात घ्यायचा,किंवा हाताचं मोजमाप थेट जर्मनीला पाठवून तिथूनच टेलरमेड हात बनवून घ्यायचा.पहिल्या प्रकारातील हाताचं वजन खूपच जास्त असतं.मात्र,जर्मनीमध्ये बनलेल्या हाताचं वजन साधारणपणे मानवी हाताएवढंच असल्याने आम्ही जर्मन हात मिळण्यासाठी अर्ज केला. तो मिळण्यासाठी बारा ते अठरा महिन्यांचा वेटिंग पीरियड होता.त्यामुळे त्या काळात अण्णाचं आयुष्य सुरळीत सुरू व्हावं यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न चालवले. आठवड्यातून एकदोनदा मी आणि अण्णा रात्रीच्या सिनेमाला जाऊ लागलो.अण्णा लोकरीची शाल लपेटून रुबाबात माझ्या मागे बसून पिक्चरला येत असे. त्या वेळी आम्ही किती सिनेमे पाहिले त्याला गणतीच नाही. सिनेमे बघणं महत्त्वाचं नव्हतं. शेवटचा शो संपल्यावर थिएटरपासून घरी येतानाचा स्कूटरवरचा प्रवास आमच्यासाठी महत्त्वाचा होता. सिनेमा संपून थिएटरमधल्या सगळ्या गाड्या बाहेर पडल्या की मग आमची स्कूटर सुरू होत असे. फक्त माझ्याऐवजी पुढच्या सीटवर अण्णा बसत असे. मागच्या सीटवर बसून मी डाव्या हाताने स्कूटरचं डावीकडचं हँडल धरायचं आणि अण्णाच्या सूचनेनुसार क्लच दाबून गिअर बदलायचा,अशी कसरत करत आम्ही घरी यायचो.सुरुवातीला गोंधळ झाले;पण थोड्याच दिवसांत आमचं कोऑर्डिनेशन इतकं जबरदस्त जमून गेलं की आम्ही हळूहळू दिवसाही याच पद्धतीने स्कूटरवरून फेरफटका मारू लागलो. शाल गुंडाळून स्कूटर चालवणाऱ्या या माणसाला डावा हात नाहीये हे कुणाला कळतही नसे.अण्णाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट होतं,आणि ते नक्कीच साध्य झालं.
त्याच सुमारास विनोदने टीव्हीएस फिफ्टी नावाची एक छोटी मोपेड टाइप टू व्हिलर विकत घेतली. अण्णाला ही गाडी खूपच आवडली.गाडी पाहून त्याच्या डोक्यात भलतीच आयडिया आली. एकदा त्या गाडीभोवती चक्कर मारून तो मला म्हणाला, "या गाडीच्या हँडलच्या उजव्या बाजूच्या लिव्हरला मागच्या ब्रेकची वायर जोड आणि डाव्या बाजूला पुढच्या ब्रेकची."
तो काय म्हणतोय हे कुणालाच कळलं नाही, फक्त माझी एकट्याचीच ट्यूब पेटली.त्याने सांगितल्यानुसार बदल केले आणि त्याला गाडी सुरू करून दिली.अण्णा ऐटीत शाल पांघरून पुढे बसला आणि मी मागे.आज मला काहीच काम नव्हतं.या गाडीला गियर नसल्यामुळे आणि मागच्या चाकाचा ब्रेक अण्णाच्या उजव्या हातात असल्यामुळे गाडी तोच चालवणार होता.आम्ही फिरायला बाहेर पडलो.मला वाटलं की आपण जवळच चक्कर मारून परत येऊ;पण अण्णाने गाडी थेट कात्रजच्या घाटातच नेली.समोरून येणाऱ्या बस,ट्रक वगैरे वाहनांना टाळून सुरक्षितपणे त्याने बोगदा पार केला.तिथून गाडी वळवून जवळपास दोन तासांनी आम्ही घरी पोहोचलो. अण्णा जिंकला होता! एका हाताने अतिशय आत्मविश्वासाने आणि सुरक्षितरीत्या गाडी चालवून तो परत आला होता. आता पुढे अण्णाचं त्या हातावाचून काही अडणार नाही याची मला त्यादिवशी खात्री पटली. मी निर्धास्त झालो.
अर्थात आमच्या अतिउत्साहामुळे कधी कधी घोटाळेही होत असत.एकदा असंच अण्णा स्कूटर चालवत होता आणि मी मागच्या सीटवर बसून त्याच्या सूचनेनुसार गियर बदलण्याचं काम करत होतो.घरी परतताना एका दुकानासमोर गाडी लावली आणि मी पटकन सामान आणायला रस्ता क्रॉस करून समोरच्या काका हलवाईच्या दुकानात गेलो.दुकानात पोचलो आणि मागे पाहिलं, तर स्कूटरसहित अण्णा डाव्या बाजूला पडलेला दिसला. मी पळतच त्याच्याकडे गेलो. गाडी उचलून स्टॅण्डवर लावली. मला कळेना, झोकात गाडी चालवणारा अण्णा स्कूटर थांबलेली असताना कसा काय पडला? अण्णाने सांगितल्यावर सगळा खुलासा झाला. डावा हात अजूनही जागेवरच आहे, असं फीलिंग अण्णाला अनेकदा व्हायचं. आणि नकळत तो प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या हाताचा वापर करायचा.आत्ताही तो पडला होता ते त्यामुळेच.हे साहजिकच होतं. एखाद्या माणसाने किंवा प्राण्यानेही हात किंवा पाय गमावल्यानंतर पुढचे कित्येक दिवस-महिने तो अवयव तिथेच असल्याचा भास त्याला होत राहतो. त्या प्रत्यक्षात नसलेल्या अवयवाकडून काम करून घेण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे अपघात होऊ शकतात. अशा प्रत्यक्षात नसलेल्या अवयवाला 'फँटम लिंब' म्हणतात.म्हणजे आभासी अवयव. अण्णाच्या आभासी हाताने त्याला बऱ्याचदा चकवलं; पण वर्षभरात अण्णाने या सगळ्या समस्यांवर मात करून महत्प्रयासाने स्वतःचं सामान्य आयुष्य सुरू केलं. तोवर आर्टिफिशियल लिम्ब सेंटरकडून त्याला स्वतःचा असा हातही मिळाला आणि त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.
समाप्त—-------------!!!!!
"ज्ञानाचा प्रसार हा उद्देश आहे; मूळ लेखकांचा सन्मान ही जबाबदारी आहे." — विजय गायकवाड
.