* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/१२/२२

जोहानस केप्लर Johannes Kepler (१५७१ - १६३०)

टायको ब्राहेने कोपर्निकसचा सिद्धांत चूक ठरवण्यासाठी मदतनीस म्हणून घेतलेल्या केप्लरने मात्र कोपर्निकसचीच बाजू घेतल्याचे त्याच्या निरीक्षणावरून दिसते. 


कोपर्निकसचा सिद्धांत पूर्वापार चालत आलेल्या टॉलेमीच्या सिद्धांतापेक्षा नक्कीच सोपा आणि सुटसुटीत आहे याची प्रचिती केप्लरला येत होती.


कोणत्याही तऱ्हेचे लौकिक सुख लाभलेले नसताना,सतत निरीक्षण,सत्यज्ञानावरती श्रद्धा या त्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याने खगोलविज्ञानात मोलाची भर घातलेली आहे.केप्लरची कल्पनाशक्ती विलक्षण होती.ग्रहांच्या गतीचे नियम त्याने शोधून काढले.

त्याच्या पहिल्या नियमाप्रमाणे ग्रह सूर्याभोवती दीर्घवर्तुळाकृती कक्षेत फिरतात आणि सूर्य त्या कक्षेच्या नाभीस्थानी असतो.दुसऱ्या नियमाप्रमाणे ग्रहांची गती ही त्यांच्या कक्षेत वेगवेगळी असते किंवा ग्रह समान काळात समान क्षेत्रफळ पार करतात. ग्रहाला स्थान १ पासून २ पर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागतो तेवढ्याच कालावधीत तो स्थान ३ पासून ४ पर्यंत जातो.त्यामुळे ग्रह ज्यावेळेस सूर्याजवळ असेल त्यावेळेस त्याचा वेग जास्त असतो.हे दोनही नियम त्याने १६०१ मध्ये शोधून काढले.१६१८ मध्ये त्याने शोधून काढलेला तिसरा नियम ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर आणि ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी यांच्यातील संबंधावर आधारित आहे.

तिसऱ्या नियमाप्रमाणे ग्रहांच्या सूर्यापासूनच्या अंतराचा वर्ग आणि त्यांच्या प्रदक्षिणाकाळाचा घन हे नेहमी प्रमाणात असतात.याच केप्लरच्या नियमांमुळे न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची सिद्धता तपासून पाहता आली.पृथ्वीवर राहून दुसऱ्या ग्रहांच्या कक्षेबद्दलचे नियम केवळ निरीक्षणावरून शोधून काढण्यासाठीची केप्लरची कल्पनाशक्ती आणि शोधकता किती प्रगल्भ असेल याची कल्पना येते.


३ डिसेंबर २०२२ मधील लेखाचा पुढचा भाग..

३/१२/२२

टायको ब्राहे Tycho Brahe (१४ डिसें. १५४६ - २४ ऑक्टो. १६०१)

कोपर्निकसच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी आणखी एका खगोलवैज्ञानिकाचा प्रवेश झाला.तो म्हणजे टायको ब्राहे.डेन्मार्कचा राजा फ्रेड्रिक याच्या मदतीने टायकोने संशोधनास सुरुवात केली. कोपर्निकसच्या सिद्धांताला विरोध करणारा हा एक खगोलविंद,सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते असे सांगणाऱ्या कोपर्निकसकडे त्यावेळेस पुरावा नव्हता.पुराव्याशिवाय केलेले विधान हे गृहितकच मानले पाहिजे.ते सत्य म्हणता येणार नाही असे विज्ञान सांगते.


त्यामुळे ओसियांडरने कोपर्निकसच्या पुस्तकामध्ये केलेल्या प्रस्तावनेतील विधान आक्षेपार्ह म्हणता येणार नाही.


परंतु तसे मत असण्यामागची भूमिका चुकीची आहे.पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला धार्मिक विचारवंतांनी पुरस्कृत करून प्रतिष्ठा मिळवून दिलेली होती.धर्मामध्ये जे सांगितलेले आहे त्याला विरोध करणे योग्य नाही ही भूमिका व्यवहार्य नाही.किंबहुना ती समाजाला घातकही आहे.


टायको ब्राहेने कोपर्निकसच्या सिद्धांताला विरोध धार्मिक दृष्टिकोनातून केलेला नव्हता तर तो स्वतः केलेल्या निरीक्षणावर आधारित होता. आकाशनिरीक्षणासाठी एक परिपूर्ण वेधशाळा त्याने डेन्मार्कमधील यूरानिबोर्ग येथे वसवली होती.


११ नोव्हें.१५७२ साली शर्मिष्ठा तारकासमूहातून झालेल्या तारकास्फोटाच्या त्याने केलेल्या नोंदी आजही खगोल अभ्यासकांना उपयुक्त ठरत आहेत.त्या तारका स्फोटाला 'टायकोचा सुपरनोव्हा' असे संबोधले जाते.


टायकोच्या मताप्रमाणे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना स्पष्ट दिसत असताना,सूर्य स्थिर आहे हे कोपर्निकस कशाच्या आधाराने म्हणू शकतो ? कोपर्निकसच खरे तर चुकीचा आहे हे ठरविण्यासाठी त्याने ग्रह ताऱ्यांच्या असंख्य नोंदी ठेवल्या.त्या निरीक्षणावरून गणिताच्या मांडणीतून'एक दिवस कोपर्निकसला खोटा ठरवेन' हा आत्मविश्वास त्याच्याकडे होता. गणिताच्या मांडणीसाठी त्याने जोहानस केप्लरला मदतनीस म्हणून घेतले.नवतारा, धूमकेतू,वेधसाधने इ. विषयावर टायकोने विपुल लेखन केले असून त्याचे 


समग्र लिखाण १५ खंडामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. 


निरीक्षणसामग्री आणि टायकोचा अनुभव याचा फायदा होईल या उद्देशाने केप्लरने तऱ्हेवाईक आणि भांडखोरवृत्तीच्या टायको बरोबर जुळवून घेत आपले संशोधनाचे काम सुरु ठेवले. 


वर्षभरात टायकोचे निधन झाले.पण मृत्यूसमयी केप्लरकडून आश्वासन घेतले की निरीक्षण करून कोपर्निकसला एक दिवस चूक ठरवेनच.


१ डिसेंबर २०२२ लेखामधील पुढील भाग..




१/१२/२२

जाणून घेऊ शास्त्रज्ञांचा प्रेरणादायी व अलौकिक जीवन प्रवास..

ॲरिस्टॉटल Aristotle (इ. स. पूर्व ३८४-३२२) ॲरिस्टॉटल इसवीसनापूर्वी होऊन गेलेला एक फार मोठा ग्रीक तत्त्ववेत्ता होता.जगज्जेत्ता राजा ओळखल्या गेलेल्या 'अलेक्झांडर द ग्रेट' चा ॲरिस्टॉटल गुरू,सृष्टीचे निरीक्षण करणे आणि तर्कशास्त्र,तत्त्वज्ञान,नीतिशास्त्र,राजकारण अशा विविध विषयावर आपले विचार मांडण्याचे महत्त्वाचे काम ॲरिस्टॉटल करत होता.आपल्या शौर्याच्या जोरावर जग जिंकायला निघालेल्या या अलेक्झांडर राजाने बहुतांश ठिकाणी प्रभुत्व मिळविलेले होते.अशा या जगज्जेत्त्या राजाचा गुरूसुद्धा महानच असला पाहिजे हा विचार सर्वसामान्यांच्यात दृढ झालेला होता. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य शतकभरसुद्धा टिकले नाही.पण ॲरिस्टॉटलच्या विचाराने मात्र सोळाव्या शतकापर्यंत आपले वर्चस्व अबाधित राखले.विचारांमध्ये किती सामर्थ्य आणि ताकद असते हे इतिहासाने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे.अर्थात तो विचार योग्य असो अथवा अयोग्य…!


क्लॉडियस टॉलेमी Claudius Ptolemy

 (इ. स.१२७ ते १६८)


इसवीसनानंतर ज्या खगोलशास्त्रज्ञाने आपल्या सिद्धांताचा ठसा सोळाव्या शतकापर्यंत उमटवला त्याचे नाव क्लॉडियस टॉलेमी,टॉलेमीने 'अल्मागेस्ट' नावाच्या पुस्तकामध्ये पृथ्वीकेंद्रित सिद्धांत मांडलेला होता.पृथ्वी स्थिर आहे आणि पृथ्वीभोवती सूर्यासहित सर्व विश्व फिरत आहे हाच त्या सिद्धांताचा गाभा..


दुसऱ्या शतकात मांडलेल्या या सिद्धांताने सोळाव्या शतकापर्यंत न अडखळता मजल मारलेली होती.धर्माचे अधिष्ठान पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला मिळाल्यामुळे विरोध करण्याचे अथवा तपासण्याचे सामर्थ्य सर्वसामान्यांच्यात नव्हते.भूगोलविषयक आठ पुस्तके टॉलेमीने लिहिली आहेत.तसेच माहीत असलेल्या स्थळांचे बिनचूक नकाशेही त्याने तयार केले होते.


आज आपण आनंदी,सुखी,आयुष्य जगत आहोत.हे सुखी आयुष्य जगत असताना अनेक ज्ञात अज्ञात महान लोकांनी आश्चर्यकारक,प्रेरणादायी,सर्वोच्च असे जीवन जगून आपल्याला सुखाच्या सावली प्रदान केली.त्या सर्वांचा जीवन प्रवास जाणून घेत असताना.

आपण जर दुःखात असलो,तर त्या दुःखाचे रूपांतर सुखात होते व आपण जर सुखात असलो तर सुखाचे रूपांतर दुःखात होते.हे सर्व जाणून घेत असतानाच मनापासूनच अचंबित,अलौकिक व अविस्मरणीय भावना व्यक्त व प्रकट होतात.


निकोलस कोपर्निकस,सॅमोसचा ॲरिस्टार्कस,

ॲरिस्टॉटल,क्लॉडियस टॉलेमी,टायको ब्राहे,जोहानर केप्लर,गॅलिलेई गॅलेलियो,फिलीपो ब्रूनो,आयझॅक न्यूटन,अल्बर्ट आईन्स्टाईन,आर्यभट्ट,वराहमिहीर,ब्रह्मगुप्त,

भास्कराचार्य,डॉ.सुब्रह्मण्यम चंद्रशेखर,डॉ.जयंत नारळीकर यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

(सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे,नाग-नालंदा प्रकाशन)


१४.१०.२०२२ रोजी ॲरिस्टार्कस,२१.११.२०२२ रोजी निकोलस कोपर्निकस,यांचा जीवन प्रवास समजून घेतलेला आहेच.उर्वरित या लेखामधून पुढे जाणून घेवू.


क्रमशः



३०/११/२२

मानवी भावनिक हाकेला संवेदनशील ओ देणारा ' व्यवस्थेचा बइल '

रोज सकाळी आपलं नैसर्गिक घड्याळ सेट करण्यासाठी आपल्या डोळ्यांना सकाळच्या कोवळ्या उन्हाची गरज असते.जर सकाळी हे घड्याळ सेट झालं तर रात्री शांत झोप लागते. पण हा प्रकाश खिडकीच्या काचेतून किंवा गॉगलमधून मिळालेला नसावा. सरळ सूर्यप्रकाश मिळण्यासाठी सकाळचा काही वेळ काढा किंवा ऑफिसला जाताना गाडीच्या काचाखाली करून सुर्याचे दर्शन घ्या आणि कवळ्या सूर्यप्रकाशाचा लाभ घ्या.

इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकातील वाक्य वाचून जरा थांबलोच.


असाच व्हॉट्सॲपचा स्टेटस बघत होतो.एका ठिकाणी डॉ.प्रभाकर शेळके यांचा ग्रामीण जीवनाचा ' सत्य ' सांगणारा कथासंग्रह या कथासंग्रहावर आमचे मित्र शरद ठाकर यांनी लिहिलेली वृत्तपत्रातील समीक्षा वाचली. त्यांनी आदरणीय डॉ.प्रभाकर शेळके यांचा भ्रमणध्वनी नंबर दिला.या समिक्षेवर व कथासंग्रहाबाबत लेखकांसोबत सर्वोच्च आत्मिय सुसंवाद झाला.बैल व बइल,देव व दैव या मानवी जीवनातील शब्दांमागची इमोशनल भावना,या संबधी अवर्णनीय अशी माहिती त्यांच्या ओजस्वी वाणीतून प्रकट झाली.साहेबांनी माझ्या सन्मित्र हाकेला पुस्तकरुपी ओ दिली,भेटस्वरुप म्हणून व्यवस्थेचा बइल हे पुस्तक मला मिळाले.प्रथमत:त्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद


१२ कथांचा हा संग्रह संपुर्ण ग्रामीण जीवनाचे जीवंत दर्शन घडवितो.यातील कथा,पात्र ही प्रत्येक माणसाची जिंदगी आहे.


मी माझाच उधळत गेलो.मस्तवाल बैलासारखा.मी या व्यवस्थेचा उधळलेला बैल हे 'प्रामाणिक मनोगत काळजाची ठाव घेते.डॉ.दादा गोरे यांची प्रस्तावना स्वतःला स्वतःसाठी स्वतःमध्ये कसं तटस्थपणे बघायचा 'आरसा' च आहे.या प्रस्तावनेमुळे हे पुस्तक समजण्यास सोपे जाते.


व्यवस्थेचा बइल,चांदणफुला,मुलडा,मिरग,जटायू,दंडुका,कंदुरी,

कुरण,खुरमुंढी,उमश्याचा बाप,भदपड्या,कुब्जा,संट्या अशा विचारांच्या या वेगवेगळ्या कथा,या कथा माणसात,मानसिकतेत झालेला बदल,गावांचं झालेलं शहरात रुपांतर,मुलभूत गरज व दिखाऊ गरज,

माणसाच्या माणुसकीचा होणारी घुसमट,प्रत्येक ठिकाणी स्वार्थीपणाने विविध पातळ्यांवर होणारी पिळवणूक,काय केलं व काय करायला हवं होतं याची भुमिका स्पष्ट करणारी सुक्ष्म रेषा म्हणजे हा कथासंग्रह


माय, तु मला जन्म दिला.तुझ्या पदराच्या सावलीत नाही विसावलो.तुझ्या दुधाचे उपकार कसे फेडू ? घरच्या दरिद्री परिस्थितीमध्ये बदल करुन सुखाचे चार घास खाण्यासाठी लवकरच मोठा झालेला लेक परिस्थितीतीचे चटके खातो.नोकरीसाठी गाव सोडावं लागतं.गावशिवारात राहिला नाही 'गोतावळा' उडाला 'पाचोळा' मनातली 'धग' घेवून शहरातल्या भोंगळ 'कोसल्या'मध्ये आणि म्हणून वाट्याला येतं आहे जगण्यातली 'काचवेल'.. नोकरीसाठी शिक्षण पदव्यांचा ढिग पण नोकरीच नाही.मी उध्वस्त आत्म्याचा कैदी ..शिंगे खिलार आहे,खांदा,रंग,शेपूट,दात सगळं चांगलं आहे.एकीकडे मनात सुगंधाशी लग्न करावं,एकीकडे बेकारीने तळपतो.ह्या व्यवस्थेत मी दीन झालेला नंदीबइल..विशाल मनाचं दर्शन होतं.


चांदणफुला जयर्‍याच्या प्रेमाचा झालेला चुराडा ही प्रेमकहाणी जीवनातील क्षणभंगुरता दाखविते.इकडे जयर्‍याचा वळू गावभर सैराट होऊन पळतो आहे.तिकडे संजीचा चांदणफुला आभाळ गोदतो आहे.


माणसं पैशासाठी काम करत्यात की,मरण पुढं लोटण्यासाठी कळतं नाही.हे कळण्यासाठी मुलडा प्रत्यक्ष वाचलाच पाहीजे.


शेतकर्‍यांचा उपाशी संघर्षमय जीवन प्रवास उपाशी पोटाने केली जाणारी बियाणांची खरेदी पाचशे एकावन्न रूपयाची खरेदी झाली.ते देण्यासाठी बगलखिशात हात घातला तर सगळं जगणंच थांबलेलं हे सर्व भयावह वास्तव आहे.मिरुग आहे.


तो,आयुष्याची काही लक्तरे बांधून जगतो आहे.गावशीव सोडून शहराच्या गुर्‍हाळात चिपाड होऊन.त्यानं घालवलेलं असतं आपलं मरणप्राय आयुष्य मी सुद्धा जटायू आहे याची जाणीव झाली.


नोकरीवरुन अचानक कारणाशिवाय काढून टाकल्यानंतर झालेली अनेक जीवांची घालमेल गावकरी,सरपंच यांनी न्यायासाठी दिलेला लढा प्रेरणादायी आहे.जगण्यासाठीचा दंडुका


कंदुरी माणसाच्या जगण्याचे वैविध्यपूर्ण स्वभाव मान,सन्मान,अपमान,प्रेम,जिव्हाळा,यांच आध्यात्मिक दर्शन देणारी कथा भावनेला हात घालते.


जग रडून ऐकतो हसून सांगतो हे जगण्याचं मर्म सांगणारं कुरणं सत्याच्या जवळ घेवून जाते.


खुरमुंढी व्यसनाधीनता व त्याचे परिणाम यावर भाष्य करणारी कथा बरंच काही सांगून जाते.


उमश्याचा बाप विचारांच्या पलिकडे विचार करायला लावतो.


भदपड्या,कुबदा,संट्या आवर्जून समजून,उमजून जीवन उलगडुन दाखविणार्‍या कथा अप्रतिम आहेत.


हा कथासंग्रह वाचत असताना त्याच्यासोबत मी दुसरं पुस्तक 'संन्यासारखा विचार करा'वाचत होतो.मी नेहमीच दोन पुस्तके वाचण्यास घेतो. या पुस्तकात एक प्रसंग आहे. लंडनमधील मंदिरात राधानाथ स्वामी व्याख्यान देत असताना त्यांच्याकडून सांगितलेली विचार पद्धत..! ज्यांनी मिठासारखं जगायला सांगितलं आणि आपल्या अन्नात खूपच मीठ असलं किंवा अगदीच कमी मीठ असलं तरच आपलं त्याच्याकडे लक्ष जातं याकडे आमचे लक्ष वेधलं,आत्तापर्यंत कोणीही कधीच असं म्हणत नाही की,'किती छान,या अन्नात अगदी योग्य प्रमाणात मीठ आहे.ज्या वेळी मिठाचा शक्य तितक्या उत्तम प्रकारे वापर केला जातो. त्या वेळी ते लक्षातही येत नाही.मिठ इतकं विनयशील असतं की, ज्यावेळी एखादा पदार्थ बिघडतो, त्यावेळी त्याचा दोषारोप ते स्वत:वर घेतं आणि ज्यावेळी काही सारं आलबेल असतं, त्यावेळी त्याचं श्रेय ते घेत नाही.


खरचं हा कथासंग्रह म्हणजे मानवी जीवनातील मिठच आहे.आदरणीय लेखक डॉ.प्रभाकर शेळके यांचे पुनश्च मनापासून आभार…!


● विजय कृष्णात गायकवाड




विजय कृष्णात गायकवाड

२९/११/२२

" करपलेली भाकरी मी व सौभाग्यवती..! "

माझी ही सकाळी सकाळी कामाला जायची लगबग चालली होती.( सौ. मेघा ) ही फारच गडबडीत होती.तव्यामध्ये भाकरी टाकली. व काही तरी कामासाठी ती बाहेर निघून गेली. मी सकाळी कामाला जाण्याअगोदरच जेवतो ..!


भाकरी तव्यामध्ये होती.मी सुक्ष्मपणे,चिंतनशीलपणे त्या भाकरीकडे पाहत होतो. हळूहळू भाकरी करपून धुर यायला सुरू झाला. काही वेळापूर्व संपूर्ण,सर्वश्रेष्ठ,

प्रकाशमय अशा भाकरीमध्ये अमूलाग्र बदल होत होता.भाकरी संपूर्ण काळी पडून करपरली यावेळेस 'तिचे' आगमन झाले...!


'तुम्हाला काय झालयं...? ही भाकरी दिसत नव्हती का..? मला हाक तरी मारायची ..? माझ्या वाटणीची भाकरी करपली ? तुम्ही हे मुद्दाम केलं आहे.दिसत असूनही तुम्ही गप्प बसलात,अवघड आहे या माणसाचं ..!


मी शांत निवांत करपलेल्या भाकरीचं तत्वज्ञान समजून घेतलं भाकरीला माणसाचा हात लागला नाही.तर अनपेक्षित असा तिच्यामध्ये आश्चर्यकारक बदल होतो.तिच्या अस्तित्वामध्ये असण्यामध्ये चिरंतन फरक पडतो.बदलनं,जागा सोडनं,उत्क्रांत होणं.जीवनातील हेच अटळ सत्य आहे." मग सूक्ष्मपणे विचार केला कि मी कधी बदलणार...!


"असाच काहीसा प्रसंग माझ्या नजरेसमोरून गेला.जो हेन्री डेव्हिड थोरो यांच्या सर्वोत्तम जीवनाशी निगडित आहे." ( जो हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र या पुस्तकातील आहे.)


" दोन दिवसांपूर्वी मला मारिया मावशीने डॉ.चॅमर्सचे चरित्र वाचण्यास सांगितले.मी अर्थातच तसे काही वचन तिला दिले नव्हते. 


कालच ती ओरडून शेजारच्या जेन मावशीला

( हिला कमी ऐकू येत असे ) सांगत होती,"काय माणूस आहे ! काल दिवसभर त्या बेडकांचे ओरडणे ऐकत उभा होता पण वाचायला सांगितली तर त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं त्याने...."


● विजय कृष्णात गायकवाड