* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: नाझारेथचा ज्यू येशू / The Jew Jesus of Nazareth

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२३/६/२५

नाझारेथचा ज्यू येशू / The Jew Jesus of Nazareth

क्षणभर रोमन लोकांची खुनाखुनी बाजूस ठेवून आपण जरा दूर जाऊ या.रोमन लोकांची ती भांडणे,ते कोलाहल,ते गदारोळ तसेच सोडून आपण पूर्वेकडच्या अधिक शांतताप्रिय राष्ट्राकडे जरा जाऊ या.इकडे अलेक्झांडर,हॅनिबॉल,सीझर जगाला आपल्या महत्त्वाकांक्षांनी व खाटिकखान्यांनी हैराण करीत असता पूर्वेकडील हिंदू,चिनी व ज्यू राष्ट्र शांतीचे महात्मे जगाला देत होती.


हिंदुस्थानात थोर सम्राट अशोक होऊन गेला.ख्रि.पू. २६४ ते ख्रि.पू.२२७ पर्यंत त्याने राज्य केले.एका मोठ्या युद्धात त्याला विजय मिळाला होता.युद्धातील क्रूरता व भीषणता प्रत्यक्ष पाहून त्याला युद्धाचा वीट आला व पुन्हा म्हणून युद्ध करावयाचे नाही.असे त्याने ठरविले व युद्धाऐवजी सदिच्छेचा, बंधुभावाचा व प्रेमाचा संदेश जगभर पसरविणे,हेच आपले जीवनकार्य निश्चित केले.


नाझारेथचा बहिष्कृत ज्यू येशू,मानवजाती कथा,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन 


चीनमध्ये कन्फ्यूशियसचे अनुयायीही शांतिप्रसार करीतच होते.कुआंगत्से,मेंन्सियस,मोटी,इत्यादी चिनी शांतिदूतांनी आपल्याच बांधवांची प्रेते तुडवीत जाण्यापेक्षा निराळ्याच मार्गाने जीवन कसे कंठावे हे शिकविले.त्यांनी शांतीचा मार्ग शोधला.

कधीकधी मेन्सियसची वाणी प्रेषिताच्या वाणीप्रमाणे भासे.तो म्हणतो,"श्रीमंतांच्या घरात चरबी आहे,मांस आहे.तर गरिबांच्या पोटाच्या दामट्या वळल्या आहेत ! श्रीमंतांच्या तबेल्यांत धष्टपुष्ट घोडे आहेत, तर दरिद्री लोक भुकेने मरत आहेत ! जिकडे तिकडे उपाशी मेलेल्या लोकांचे मुडदे पडलेले आहेत!... श्वापदे माणसांना व माणसे एकमेकांना खातील.


एपिक्यूरसने स्वार्थाचाच उपदेश केला;पण अविरोधी, शहाण्या स्वार्थाचा मेन्सियसने तेच ध्येय चिनी जनतेपुढे ठेवले.तो उपदेशितो,"सुख खुशाल भोगा,स्वतःच्या सुखासाठी जरूर खटपट करा,पण दुसऱ्यांच्या सुखाआड येऊ नका,

म्हणजे झाले." एपिक्यूरसप्रमाणे व येशूप्रमाणे मेन्सियसलाही लहान मुले फार आवडत. तो लिहितो,"ज्याचे हृदय लहान मुलाच्या हृदयासारखे असते,तोच खरा मोठा."


मेन्सियसच्या शब्दांपेक्षाही मोटीची उपदेशवाणी अधिक सुदंर आहे. उदाहरणार्थ, पुढील उतारा पाहा - 


" एका राज्याने दुसऱ्या राज्यावर हल्ले चढविणे,एका कुटुंबाने दुसऱ्यास लुबाडू पाहणे,माणसांनी एकमेकांस लुटणे,राजांनी निर्दय असणे,प्रधानांनी अप्रामाणिक असणे,पिता-पुत्रांत वात्सल्याचा व पितृभक्तीचा अभाव असणे,इत्यादी गोष्टी साम्राज्याला अपायकारक असतात.परस्पर सहानुभूती व प्रेम दर्शविण्याचा सद्गुण सर्वांच्या जीवनात येईल तर केवढी मौज होईल!राजे एकमेकांवर प्रेम करू लागतील,तर रणांगणाची जरुरीच भासणार नाही.सर्वत्र प्रेम असेल तर कुटुंबातील कोणीही एकमेकांस लुबाडणार नाहीत.सर्वत्र प्रेम असेल तर माणसे चोऱ्या करणार नाहीत,राजे व त्यांचे प्रधान उदार होतील, आई-बाप व मुले यांचे संबंध प्रेमळ होतील,भावाभावांत मेळ व प्रेम राहील,ते भांडणे पटकन विसरतील.माणसे परस्परांवर प्रेम करतील,तर बलवान दुर्बलास चिरडणार नाहीत वा खाणार नाहीत, बहुसंख्य लोक अल्पसंख्यकांना लुटणार नाहीत.श्रीमंत गरिबांचा अपमान करणार नाहीत.सरदारवर्ग गरीब घराण्यात जन्मलेल्या श्रमजीवी वर्गाचा उपमर्द करणार नाही,त्याच्याशी अरेरावीने वा अहंकाराने वागणार नाही. कपटी लोक साध्या,सरळ लोकांना फसविणार नाहीत, वा त्यांच्या डोक्यावर बसणार नाहीत."


चिनी ऋषीची ही वाणी हिब्रू भाषेत भांषातरिली,तर हेच शब्द प्रेषित,इसैया,अ‍ॅमॉस किंवा हिल्लेल यांचेही आहेत, असे आढळेल.ही चिनी वाणी अरॅमिक भाषेत भाषांतरिल्यास ती गॅलिलीतील निळ्या नभाखालच्या पर्वतांच्या व्यासपीठावरून उपदेश करणाऱ्या तदनंतरच्या ज्यू धर्मसंस्थापकांचीच वाणी वाटेल.


गॅलिलीचा तो सौम्य पुरुष! तो फकिराप्रमाणे हिंडणारा महात्मा ! त्याला कोणी देव तर कोणी पागल बनविले आहे! कोणी त्याला जादूटोणा करणारा समजत,तर कोणी त्याला ढोंगी बुवा म्हणत ! कोणी तर त्याला 'अमेरिकन पद्धतीचा प्रचारक' मानतात.पण तो यांपैकी कोणीही नव्हता.प्रेमाने द्वेष शमवावा,क्षमेने सूड जिंकावा,

नम्रतेने अहंकार जिकांवा;शांतीने रक्तपात जिंकावा,असे शिकविणारे जे अनेक महात्मे पूर्वेकडे झाले,त्यांच्याच परंपरेतील व त्याच मालिकेतील तोही एक होता.त्याचे खरे चित्र आजपर्यंत काढले गेलेले नाही व पुढेही कधी काढले जाईलसे वाटत नाही.कारण, त्याच्या प्रत्येक चरित्रकाराने जणू स्वतःचेच चित्र काढून त्याला ख्रिस्ताचे नाव दिले आहे,स्वतःला ख्रिस्तावर लादले आहे! बायबलात जसा येशू चमत्कार करणारा दिसतो;


त्याच्याभोवती जसे तेजोवलय शोभते,तद्वतच रेनन,पापिन,

वूस बार्टन वगैरेंनी लिहिलेल्या चरित्रांतही येशूच्या बाबतीत प्रकार आढळतात.ख्रिस्ताच्या आपणांसमोर असलेल्या चित्रांत खूप विरोधाभास आहेत ! एका गालावर मारले असता दुसरा गाल पुढे करण्यास सांगणारा येशू मंदिरात जमलेल्यांस फटके मारून बाहेर हाकलीत आहे असे दिसते! एका क्षणात तो पृथ्वीवर शांतता आणणारा आढळतो; तर दुसऱ्या क्षणी तो तरवार परजीत आहेसे दिसते ! 


सुखाचे व शांतीचे उपनिषद सांगणारा तो सुखी लोकांची टिंगल उडवितो ! (जे तुम्ही आज हसत आहात,तेच उद्या रडाल,आक्रोश कराल,समजले?) तो शत्रूना क्षमा करतो; पण शत्रूना प्रभूने ठार करावे म्हणून प्रभूला आळवितोही ! स्वर्गाच्या राज्याची घोषणा करणाराच तो अनेक जातीच्याजाती नरकात लोटतो!आपला उपहास करणारांनाही आशीर्वाद देणाराच तो.अंजिराचे झाड अंजीर देत नाही (अंजिरांचा मोसमच नसताना कोणता शहाणा मनुष्य अंजिराच्या झाडापासून अंजीर अपेक्षील?) म्हणून त्याला शिव्याशाप देण्यासही मागेपुढे पाहत नाही! असे हे परस्परविरोधी तुकडे एकत्र करून त्यांवरून जिंवत माणसाचे खरेखुरे चित्र तयार करता येईल का ?


हो.ते तयार करणे शक्य आहे असे मला वाटते.सजीव येशूचे चित्र हवे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की,कितीही झाले,तरी मानव,मर्त्य होता.त्याचा स्वभाव हळूहळू विकसत गेला.त्याच्या जीवनात हळूहळू उत्क्रांती,वाढ होत गेली.इतर मानवांप्रमाणेच त्याचेही चारित्र्य हळूहळू फुलत गेले.नव्या करारांतील कालगणना आपण दूर फेकून देऊ या.त्यांच्या चरित्रातल्या ज्या अनेक कथा चार पुस्तकांत आल्या आहेत,

त्यांनाही फारसे महत्त्व नाही.त्या तोंडोतोंडी आलेल्या लोककथा आहेत.मानसशास्त्राचे किंवा इतिहासाचे ज्ञान नसणाऱ्यांनी त्या गोष्टी गोळा करून लिहून काढल्या आहेत.एखाद्या चिनी कोड्याप्रमाणे हे तुकडे बायबलात इकडे,तिकडे,चोहोंकडे,सर्वत्र पसरलेले,विखुरलेले आहेत.ते गोळा करून त्यांची नीट जुळणी करून पुनर्रचना करता आली,तर ज्याचे आकलन करता येईल,ज्याच्यावर प्रेम करता येईल, ज्याचे पूजन करता येईल असा पुरुष आपणास खास निर्मिता येईल,एका मर्त्य व्यक्तीचे सुंदर व सहृदय चित्र खचित उभे करता येईल.


हा पुरुष कशा प्रकारचा होता? प्रारंभी तो बंडखोर व तापट डोक्याचा होता,तो प्रतिष्ठितांच्या समाजाचा द्वेष करी;

आपल्यासारखे जे परित्यक्त वा दरिद्री होते, त्यांच्यात तो मिसळे,भोवतालचे जीवन पाहून तो असंतुष्ट झाला होता.अधिक चांगले जीवन सर्वांना लाभावे म्हणून झगडावयाला,लढा करावयाला तो तयार होता.त्याचा स्वभाव जहाल व जलाल होता.तो मारण्यासाठी हात उगारी;शाप देण्यासाठी जीभ उचली. जग सापांनी व सैतानांनी भरलेले आहे,असे त्याला वाटे. जग म्हणजे चोरांचे व लुटारूंचे माहेरघर व दरोडेखोरांची गुहा आहे,असे त्याला वाटे.या सर्वांना शुद्ध करणे किंवा हाकलून देणे हे आपले कर्तव्य आहे,अशी त्याची समजूत होती.थोडक्यात म्हणजे,उत्युत्कट क्रांतिकारक जॉन दि बॅप्टिस्ट याचा तो श्रद्धाळू शिष्य होता.


पण तो मानवांवर अपरंपार प्रेम करी,म्हणूनच त्यांच्यावर दातओठही खाई;त्यांचा द्वेषही करी.ज्यू प्रेषितांचा क्रोध व त्यांची करुणा ही दोन्ही त्याच्या ठायी होती.प्रथम काही असंतुष्ट भिकारडे लोकच त्याच्याभोवती गोळा झाले.पण जसजसे त्याचे अनुयायी वाढू लागले,त्याचे शिष्य त्याची पूजा करू लागले,तसतसा त्याच्या स्वभावातील मधुरतेचा स्तुत्य व उदात्त भाग अधिकाधिक प्रकट होऊ लागला,मातीचे सोने होऊ लागले.तो असंतुष्ट जनतेचा देवही बनला.आणि नंतर त्याचे मरण! पण आपण त्याचे चरित्र अधिक जवळ जाऊन पाहू या व त्याचा स्वभाव निरखू या.


लहानपणी तो नेहमी भटके,कधीही स्वस्थ बसत नसे. त्याच्या स्वभाव बंडखोर होता.त्याला आईबापांनी जेरुसलेम येथे आणले,

तेव्हा तो त्यांना सोडून निघून गेला व ज्यूंच्या धर्ममंदिरात जाऊन तेथील धर्मगरूंशी वाद करीत बसला.इकडे आईबाप त्याला शोधीत होते. शेवटी तो जेव्हा सापडला तेव्हा त्यांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली.त्यांनी त्याला नाना प्रश्न विचारले. त्याची त्याने जरा रागानेच उत्तरे दिली.वडील मंडळींच्या म्हणण्याकडे तो दुर्लक्ष करू लागला.वडील मंडळीचे न ऐकण्याची प्रवृत्ती त्याच्या ठायी दिसून येऊ लागली.तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या सांगीप्रमाणे वागू लागला. पुढील अठरा वर्षांत त्याने काय काय केले ते समजत नाही.वयाच्या तिसाव्या वर्षी तो पुन्हा आईबापांना सोडून गेला व जॉर्डन नदीच्या तीरावर भटकत राहिला.


तिथेच तो जॉन दि बॅप्टिस्ट याच्या क्रांतिकारक पक्षास मिळाला.

जॉन हा एक संन्यासी होता.तो वृत्तीने आडदांड व क्रांतिकारक होता.तो द्वेषाचे उपनिषदच शिकवी. अननुतप्तांना वाचविण्यात त्याला विशेष आनंद वाटत नसे;तर अननुतप्तांना शिव्याशाप देण्यात व त्यांना शासन करण्यात त्याला खरा आनंद वाटे.

सुखोपभोग सुख म्हणजे त्याच्या मते पाप;व धनदौलत,इस्टेट असणे लाजिरवाणे.या जीवनात सुख मिळवू पाहणे म्हणजे पुढे कायम नरकाचा धनी होणे होय,असे तो सांगे.स्वतःचा उद्धार व्हावा असे वाटत असेल त्याने दारिद्र्याचे व्रत घ्यावे,अंगावर चिंध्या घालाव्यात,केस कसेतरी वाढवावे, स्वतःला असुखी करावे,

ईश्वराच्या आज्ञा पाळाव्यात व आपल्या (जॉनच्या) म्हणण्याप्रमाणे वागावे,असे जॉन दि बॅप्टिस्ट प्रतिपादत असे.


ही मतप्रणाली जरी प्रखर वैराग्याची व जरा असंस्कृत असली,

तितकीशी सुंदर नसली,तरी येशू तिच्याकडे ओढला गेला.

जॉनप्रमाणेच तोही बंडखोर होता, रूढींचा द्वेष्टा होता.त्याला आजूबाजूच्या लोकांच्या दंभाची मनस्वी चीड येई.जॉर्डन नदीच्या पाण्याने येशूला शुद्ध करून घेऊन नवदीक्षा देण्यात आली. तो जॉनचा मुख्य शिष्य,पट्टशिष्य झाला.पुढे जॉनला अटक झाली व येशू एकटाच राहिला.तो रानावनात भटकत राहिला.


मूसा, बुद्ध वगैरेंच्याप्रमाणेच त्यानेही केले.अनंत आकाश व निर्जन वन यांच्या सान्निध्यात राहून तो विचार करू लागला.

त्या गंभीर शांततेत त्याची विचारवेल फुलली व बहरली.तो आपल्या जन्मग्रामी परत आला.आपल्या लोकांना नवीन संदेश द्यावयास तो अधीर झाला होता.


पण त्याला धोंडे मारून त्याची हुर्रेवडी उडवण्यात आली! त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हाकलून दिले व 'त्याचा आमचा काहीही संबंध नाही,तो एक भटक्या व निकामी माणूस आहे',असे म्हटले.नाझारेथच्या प्रमुख नागरिकांनी 'जर येथील शांततेत तू व्यत्यय आणशील बिघाड करशील,तर तुला कड्यावरून खाली लोटून देऊ',अशी धमकी दिली.भटकून भटकून बाळ परत घरी आला,तो सारे दरवाजे आपणास बंद आहेत, असे त्याला आढळून आले.रानातील पशुंनाही गुहा असते,पक्ष्यांनाही घरटी असतात,पण नाझारेथच्या या परित्यक्त्त्याला मात्र डोके टेकवायला कोठेही जागा नव्हती.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!