* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/२/२३

क्रांतिकारी मानवी मनाच्या जाणीवेचा वैचारिक असा मार्गदर्शक ग्रंथ शोध संत रविदासांचा...!

ब्रिटिश डॉक्टर फ्रँक रायन यांनी आपल्या, 

( Ryan 2002, Page 16 ) 'डार्विन्स ब्लाइंड स्पॉट'या पुस्तकात जीवसृष्टीत 'सिंबायोटिक' म्हणजेच सहजीवी नातेसंबंध असतात.या अनुषंगाने उदाहरण दिले आहे.गोबी मासा आणि एक प्रकारचा शिंपला एकमेकांच्या सहाय्याने राहतात. शिंपला अन्न मिळवतो,तर गोबी मासा संरक्षण पुरवतो.'हर्मिट' खेकड्याची एक प्रजाती एका गुलाबी ॲनेमोन प्राण्याला स्वतःच्या कवचावर राहू देते.मोठे मासे ऑक्टोपस हर्मिट खेकड्याला खाऊ पाहतात,तेव्हा ॲनेमोन हा प्राणी आपले चमकदार रंगीत तंतू फिस्कारून त्यातील विष त्या शत्रूंवर उधळतो,त्यामुळेच त्या भक्षक प्राण्यांना हर्मिट खेकड्याचा नाद सोडून पळ काढावा लागतो,हे सर्वज्ञात आहे. या विलक्षण सुरक्षेबद्दल ॲनेमोनला खेकड्याने खाऊन उरलेले अन्न मिळते.जे त्याला पुरेसे असते.


'द बायोलॉजी ऑफ बिलीफ'

हे पुस्तक समजून घेवून हातातून बाजूला ठेवले...!


आणखी परत सुरु झाला अंगावर रोमांच उभा करणारा नवीन जीवन सत्य समजून सांगणारा पुस्तकातील मोकळ्या दोन ओळींतील प्रवास..


सहजच व्हाट्सअप स्टेटस बघत असताना.आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय शितल खाडे साहेब व प्रभावी लेखक डॉ.रवींद्र श्रावस्ती यांचे छायाचित्र पाहिले.त्यामध्ये डॉक्टर साहेब खाडे सरांना 'शोध संत रविदास' यांचा ग्रंथ भेट देत आहेत.यासोबतच ग्रंथाचे मलपृष्ठ व मुखपुष्ट यांचा फोटोही पाठवला होता. मी मलपृष्ठ वाचले डॉक्टर व तत्वज्ञान हा विषय मला फारच वेगळा वाटला.मी फोन करुन ग्रंथ मागवून घेतला.लेखकांनीही तो त्वरित पाठवून दिला.


पान उघडले कृतज्ञतेच्या सुगंधकोशी वाचत असताना.

लेखकांचा नम्रपणा,लवचिकता विनयशीलता जाणवली.


जे तुम्ही शोधत असता ते देखील तुमच्या शोधात असते.


बा रविदासा ! शोध चालू आहे.! या प्रकरणांमध्ये या ग्रंथ निर्मिती मागील कळवळा उत्कंठा ध्यास कष्ट समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही संवेदनशील उच्च भावना लेखकांच्या मोकळ्या मनाचे दर्शन घडवते.


गुरू रविदास,संत रविदास,संत रैदास,संत रायदास व संत रोहितास ही संत रैदासांचीच नावे आहेत.संत रैदास हे निष्ठूर व्यवस्थेविरुद्ध सभ्य,शालीन शब्दात अभिव्यक्त होतात त्यांच्या या व्यक्त होण्याची तुलना फक्त फुलांच्या कोमलतेशीच करता येईल ! रैदासांनी घाव घातलेत पण रक्त वाहत नाही की जखम होत नाही ! रैदासांच्या विचारांची फुले ही साधीसुधी फुले नाहीत,ती अग्निफुले आहेत ! असे रजनीश ओशो म्हणतात.


रैदास पोकळीतून निर्मान होत नसतात! समाजव्यवस्थेत धग असते,आग असते,अन्याय असतो,अत्याचार असतो,त्यातून विद्रोह भडकून रैदात तयार होतात!


रैदासांची वाणी ही अशी वाणी कि ज्यात धग आहे पण ती आग लावणारी नाही,त्यात आग आहे पण ती प्रकाश देणारी आहे.गारठलेल्या मनाला उब देणारी ती आग आहे.ती आग आणणारी आग आहे! ती समाजमन जागविणारी आग होती! ती सर्जनशील आग होती. नव निर्माण करणारी ती आग होती. आगीचे हे प्रकार वाचून मी थक्क झालो.


चरित्रनायक रैदासांचे चरित्र गायब आहे.तसं ते संत कबीर व इतर संतांच्या बाबतीतही आहे.वैष्णवांचा प्रसिद्ध ग्रंथ 'राम पटल' या ग्रंथात रामानंद संप्रदायातील तेहतीस ( डॉ. सूरजमल यांच्यामते ५२ ) संतांचा उल्लेख केला गेला आहे. त्यात कबीर, पीपा,नामदेव यांच्या नावाचा उल्लेख आहे पण संत रैदासांचा नाही.हेही एक कोडेच आहे. पण त्याच बरोबर हेही आश्चर्यकारक आहे की कबीर,

त्रिलोचन,सधना,सेन,पीपा,पलटूवास,धर्मदाय यांनी कुणीही आपल्या रचनांमध्ये स्वामी रामानंद यांचा गुरु म्हणून निर्देश केलेला नाही


त्यांच्या पत्नीचे नाव लोनी होते.एकुलता एक विजयदास नावाचा पुत्र होता.त्यांच्या मृत्यूचे कोडेच आहे.त्यांच्या अंतिम समयी ते काशी म्हणजे वाराणसीमध्ये राहत होते,असे काही अभ्यासक मांडतात.तर काही अभ्यासक चितोड गडावर त्यांना कपटाने मारले गेले,असे प्रतिपादन करतात.ते १२० वर्षापेक्षा जास्त जगले असेही मानले जाते.


रविदास वाणीचे सर्वात जुने व प्रामाणिक संकलन शिखांच्या 'आदिग्रंथा'त आहे.गुरु अर्जुन देव यांनी इ.स.१६०४ मध्ये 'आदिग्रंथा' चे संकलन केलं.रविदास यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ शतकाने हे संकलन केले आहे, ही गोष्ट नमूद केली पाहिजे.


आदिग्रंथा' मध्ये त्यांची ३९ पदे व १ साखी यांचा समावेश केला गेला आहे.त्यात एकच पद दोन वेळा किरकोळ फरक करून संकलित केलं आहे.त्यामुळे त्याला धरून ४० पदे व एक साखी त्यात आढळते.


आख्यायिका आणि गुरू रविदास प्रकरणांमध्ये जगभर Mythology म्हणजे दंतकथा, आख्यायिका किंवा पौराणिक कथा यांचा अभ्यास केला जातो.


इंग्रजी वंशशास्त्रज्ञ बी.मिलीनोव्हस्की या मिथक कथा विषय मत मांडताना म्हणतात,'पौरानिक कथा (ही) विचारांचे कोडिकीक्षण करते,नैतिकतेला बळकट करते,वर्तनाचे काही नियम आणि मंजूर विधी प्रस्तावित करते,सामाजिक संस्थांना तर्कसंगत ठरवते आणि न्याय ठरवते.पौरानिक कथा संपूर्ण मानवी इतिहासाला,विचार विश्वाला कवेत घेऊ शकत नाही या संदर्भात खूपच प्रभावी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे.


हे वाचत असताना मला मनापासून वाटत होते.हा ग्रंथ माझ्यासाठी 'मी जिथे आहे तिथून मला जिथे जायचे आहे तिथे कसे पोचावे हे सांगत आहे.'


एकदा संत रविदास चितोडच्या महाला जवळील एका कच्च्या रस्त्याने जात असताना त्यांना उन्हामुळे भरपूर तहान लागली.तिथेच काही महिला पाणी भरत होत्या.त्या महिलांमध्ये चितोडची कुलवधू राजकुमारी मीरा पण रविदास म्हणाले,'मुली,थोडे पाणी पाज,तुझे कल्याण होईल!'मीराने लगेच त्यांना प्रेमभराने पाणी पाजले आणि त्यांचा परिचय विचारला.संत रविदास यांनी माहिती दिली,'मी काशी चा रहिवासी असून माझे नाव संत रैदास आहे.माझी जात चमार आहे.मीराने पण आपली ओळख करून दिली,म्हणाली,'स्वामीजी मिराबाई! माझ्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच आहे.त्यामुळेच माझे जीवन नरकासमान झाले आहे! कृपया मला आपली शिष्या बनवून मला या दुःखातून मुक्त करा,स्वामी!'


संत रविदास यांनी दयापूर्ण अंतकरणाने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला आपली शिष्या म्हणून स्वीकारले.


(संदर्भ - रविदास - रामायन - लोककथा )


शब्दकोशात 'संत' या शब्दाचा अर्थ साधू,विरक्त, किंवा त्यागीपुरुष असा सर्वसाधारणपणे सांगितला जातो.


सत्याचे आचरण करणारा,आत्मज्ञानी (सत्यज्ञानी) असा अर्थ त्याच्या 'सत' शब्दावरून सांगितला जातो. ईश्वराचे भक्त, धार्मिक पुरुष, विवाह करून ग्रहस्थी सदाचारी जीवन जगणारा असे संत या शब्दाचे आणखी अर्थ सांगितले जातात.


गाथा : ३८१


पामोज्ज बहुलो भिक्खु पसन्नो बुध्द सामने !


अधिगच्छे पदं सन्तं संखारुपासमं सुखं !!


भावार्थ - प्रमोदाने ( आनंदाने ) फुललेला,बुध्द शासनात ( बुद्धांची शिकवण आणि सिद्धांत यांत) प्रसन्न राहणारा भिक्खु संस्काराचा उपशम करणाऱ्या सुखदायी शांत पदाला ( संत पदाला ) पोहोचेल.


वर उद्धृत केलेल्या गाथांचा अभ्यास केल्यानंतर एव्हाना स्पष्ट झाले की संतांचा धर्म चिरकाल टिकणारा,प्रकाशदायी आहे;


संत मिथ्या धारणा नष्ट करून शांती प्राप्त करणारे,काया वाचा व मन याद्वारे तिन्हीत शांती सामावून (शांती प्राप्त करून) लौकिक लाभ,तृष्णा त्यागून मिथ्या धारणा सोडून सुखदायी असे शांत पद (संतत्व) प्राप्त करणारे लोक म्हणजे संत होत.


इथे संत या शब्दाची डॉ.बड़थवाल यांनी प्रतिपादलेली दोन्हीही रुपे दिसतात.ग्रहस्थी धर्मात राहूनही विरक्त,विरागी,निवृत्तीमार्गी आयुष्य जगणारे संत इतिहासात होऊन गेलेत.त्यावर महानुभावांनी सत्यावर विश्वास ठेवला,सत्याचा अनुभव घेतला आणि सत्याचा अनुभव घ्या असे लोकांना परोपरीने सांगितले.तसा आग्रह धरला !


या ठिकाणी एका कथेची आठवण झाली.


एका जपानी कथेनुसार एकदा एका भांडखोर समुराई योध्याने एका झेन गुरूंना आव्हान दिले की, त्यांनी स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय, हे स्पष्ट करून द्यावे; पण त्या साधूने त्याला तुच्छतेने उत्तर दिले," तू तर एक आडमुठा रासवट आहेस.

तुझ्यासारख्या माणसाला वेळ देण्याइतका मी रिकामा नाही,झाले ! त्या योद्ध्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला,त्याच्या डोक्यात राग भडकला आणि त्याच तिरिमिरीत त्याने आपली तलवार उपसली आणि किंचाळला," तुझ्या या उद्धटपणाबद्दल मी तुला ठार करीन."तेव्हा तो साधू शांतपणे एवढेच म्हणाला, " हा नरक आहे."आपण ज्या संतापाच्या वणव्यात सापडलो होतो त्याकडे गुरु बोट दाखवत आहेत हे सत्य पाहिल्यावर तो योद्धा शांत झाला.आपली तलवार पुन्हा म्यान केली आणि वाकून साधूला नमस्कार केला. त्याने दाखवलेल्या अंतर्ज्ञानाबद्दल त्याचे आभार मानले.आणि हा स्वर्ग आहे," साधू म्हणाला


जे अनावश्यक म्हणून फेकून दिले जाते, त्यातूनही जीवनाचे सत्व शोध महाराज संत साधक असतात.याचा अर्थ जे किरकोळ वाटते, साधे भासते त्यातच सुंदर तत्त्व असते,त्यातच आयुष्य सुंदर बनवण्याचे तंत्र असते!असे जीवनमूल्य शोधणारे संत असतात.


सत्याचा शोध घेणं,सत्याला प्रस्थापित करणे हे संतांचे जीवित ध्येय होते. म्हणून संत सत्याला आपल्या विचारसरणीत महत्त्व देतात सत्याला इतके महत्त्व देतात कि सत्य हाच त्यांचा ईश्वर आहे म्हणून संत रविदास म्हणतात.


सत्य ईश का रुप है सत्य शक्ति अपार !


रविदास सत्य कूं धारणा देई है पाप निवार !!


सत्याला ईश्वराइतचे महत्त्व देणाऱ्या संतांचा प्रवास हा सत्यशोधनाचा प्रवास आहे.पण सत्य म्हणजे स्वानुभवातून प्राप्त होते ते!संत सत्याबाबत असेच मांडतात तेच खरे ज्ञान असे त्यांचे प्रतिपादन असते‌


एका ऐतिहासिक सत्याजवळ येऊन मी थांबलो. करुणा,सेवाभाव,समर्पण भाव ही बौद्ध विचारधारेने या जगाला दिलेली पहिली देणगी आहे नंतर इतरांनी ती उचलली..!


युटोपिया आणि संत रविदास यामध्ये बेगमपूर कविता आहे.दुःख विरहित शहर ही कविता १५ व्या शतकातली आहे पण त्यातला विचार अगदी आजचा आधुनिक असा आहे,डॉ.गेल ऑम्वेट या रचनेचा 'भूतलावरचा युटोपिया'असा गौरव करताना दिसतात.


प्राचीन गण व्यवस्था ही प्रथम स्त्रीसत्ताक होती.कॉ. शरद पाटील यांनी त्यांच्या 'दास शूद्रांची गुलामगिरी' या पुस्तकाचे साधार सिद्ध केले आहे.'राज्ञी' किंवा 'राष्ट्री' हा बहुमान ( किताब ) राज्यकर्त्या स्त्रीला दिला जायचा. या 'राष्ट्री' शब्दातील 'राट्' या शब्दाचा अर्थ 'राज्य करणारी स्त्री' असा आहे.'निघण्टु' या संग्रहाचा हवाला देऊन कॉ.शरद पाटील सिद्ध करतात की राजपदाची उत्पत्ती स्त्रीपासून झाली.भगवान महावीर भगवान बुद्धांनी स्त्रियांना आपल्या धर्मात - धम्मात प्रवेश दिला. ही अभूतपूर्व घटना होती.वैदिक धर्मात काही धर्मवादीनी स्त्रियांची वर्णने आढळतात.पण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होते,असे म्हणता येणार नाही. 


गार्गी - याज्ञवल्क यांच्यातील संवाद पुरेसा बोलका आहे. इथून पुढे काही बोललीस तर तुझे शिर धडा वेगळे होईल,असे याज्ञवल्क्य तिला म्हणतो. तुझे शिर धडापासून वेगळे केले जाईल,तोडले जाईल,असाच त्याचा अर्थ होतो. स्त्री स्वतंत्र,चिकित्सक होती,त्याचबरोबर 

स्त्रियांना धमकावले जात होते.हे इथे दिसून येते.


जैन व बौद्ध धर्मात स्त्रियांना उपासिका,भिक्षुनी, - भुक्खुनी होता येत होते.जगातील पहिले स्त्री- वाड्मय म्हणजे या बौद्ध भिक्खूंनीनी लिहिलेल्या 'थेरी - गाथा होत. तसेच शरण व शरणी यांनी 'वचन साहित्य निर्माण केले.१२ शतकात पन्नास वर्षांहूनही कमी कालावधीत उच्च व नीच अशा समाजाच्या सर्व थरातून आलेल्या,स्वतःचा वेगळा 'स्वर' असलेल्या तीनशेहून अधिक कवींना या शरण आंदोलनाने लिहिते केले. इतिहासातील ही अभूतपूर्वच घटना आहे‌. या आंदोलनाने ३३ वचनकार कवयित्री तयार शिक्षणाचा अधिकार नसलेल्या शूद्र, अतिशूद्र व स्त्रिया यांनी जे क्रांतिकारी साहित्य निर्माण केले त्याला इतिहासात तोड नाही.


चेन्नबसवण्णा,सिद्धाराम,सकलेश मादरस,मोळीगेय मारय्या आदी संत अक्कमहादेवी,अक्कनागम्मा,गंगाबिका,

नीलम्मा आदी शरणी संतांनी वचन साहित्य लिहिले.भुक्खुनी कुठेही एकट्या संचार करत असत.स्वतंत्रपणे धम्मप्रचार करत असत. कित्येक भिक्खुनींनी कठीण असे अर्हत पद व निर्वाण प्राप्त केले होते.


संत चळवळीने स्त्रियांना आपल्या वारकरी संघात घेतले.त्यांनाही लिहिण्यास चालना दिली. त्यातूनच मुक्ताबाई, जनाबाई,सोयराबाई,निर्मळा लाडाबाई,लिंबाई या स्त्रिया लिहू लागल्या जनाबाई तर आद्य विद्रोही कवित्री म्हणता येईल अशी कोणतीही भीडभाड न बाळगता लिहिणारी संत आहे.


संत कबीर व संत रोहिदास ज्या काळात जीवन कंठत होते त्या काळात कडवट मुस्लिम सत्ता व कर्मठ हिंदू पातशाही राज्य करत होती. अशा कठीण,स्फोटक काळात कुठल्याही धर्मावर भाष्य करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ करण्यासारखेच होते.एक तर पाशवी कैद किंवा यातनामय देहदंड! दोन्हीही शिक्षा म्हणजे साक्षात मृत्यूच! अशाही परिस्थितीत हे दोन्ही महापुरुष धर्मचिकित्सेचा काटेरी मार्ग तुडवत होते.फरक एवढाच होता,कबीराचा हल्ला तिखट,बेगुमान,आणि धारदार होता तर रैदासांचा शांत,सयंत पण शत्रूच्या गंडस्थळावर नेमका वार करणार होता.त्यासाठी त्यांनी स्वतंत्र संप्रदाय निर्माण केले.चळवळ उभी केली साहित्य निर्माण केले.त्यांचे जे तुटपुंजे साहित्य आज जे उपलब्ध आहे ते सारे लोकांना उद्देशून लिहिलेले आहे ‌ त्यांनी विविध पदे साखी निर्माण केल्या.ते त्यांचे साहित्य म्हणजे विविध विषयांवर केलेली त्यांची भाष्येच आहेत. पवित्र समजलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यापेक्षा हृदयात वसत असलेल्या स्वतःला जाणा असा सल्ला देतात.रैदास इथे जणू श्रद्धांचीच शव परीक्षा अगदी सौम्यपणे पण मार्मिक शब्दात ते मांडतात,भेटी देऊन काय उपयोग? तिथे ईश्वर भेटत नाही. स्वतःच्या मनात ( दिल) स्व:ला शोधा,तिथेच दिलदार मिळेल.

( तिथेच मनाच्या मुक्तीचा मार्ग दिसेल ) खरे तर ती अतिशय मनोज्ञ अशी भावनिक,बौद्धिक - तार्किक आवाहने आहेत.हे सर्व वाचत असताना मी किती अज्ञानी असत्याला सत्य म्हणणारा आहे याची तीव्र जाणीव झाली.


योग याग म्हणजे भक्ती नव्हे,घरदार सोडून जाणे ( कुल कानि गोलाई),आहार कमी करणे ( उपास-तापास), वैरागी होऊन फिरणे,वेद - शास्त्रे यांची वारेमाप स्तुती - फुशारकी मारत फिरणे, मुंडन करणे आदी बाह्याचार करणे म्हणजे भक्ती करणे नव्हे,असे बजावून रैदासांनी स्पष्ट शब्दात खोट्या भक्तीला नाकारले आहे.


यासंदर्भात एक छान वाक्य आहे-'भगति न कथै ज्ञान' याचा सरळ साधा अर्थ 'भक्ति ज्ञान देत नाही'.वरील प्रकारच्या तथाकथित भक्तीमुळे ज्ञान वाढत नाही.भक्ती ज्ञान सांगत नाही.भक्ती केल्याने ज्ञानाची निर्मिती किंवा प्राप्ती होत नाही. हे त्यांचे वाक्य म्हणजे बॉंब गोळच आहे.भक्ती ज्ञानाचे प्रतीक होऊ शकत नाही हा या वाक्याचा गर्भितार्थ आहे.


विचारांच्या,बुद्धीच्या,जाणिवेच्या घनदाट जंगलामध्ये वाचकाला फक्त पुस्तक सोबत घेऊन प्रवास करावा लागतो. पण हा सत्य सांगणारा वैचारिक संवेदनशील भावनिक गुंतागुंत असणारा हा ग्रंथ वाचत असताना मी या जंगलामध्ये एकटा नव्हतो तर स्वतः लेखक माझ्या सोबत होते अशा भावनेने माझे मन उचंबळून येत होते.


सिद्धार्थ पूर्वीची यात्रा हरमान हेसे या पुस्तकात खूप छान जीवनतत्व सांगितलेलं आहे.गोविंद व सिद्धार्थ यांच्यातील हा संवाद आहे.गोविंद बुद्धाला शरण गेला आहे.व ते त्यांचे शिष्य आहेत.तर सिद्धार्थ स्वानुभवातून शिकत आहे शिकलेला आहे.


सगळ्या गोष्टींचा प्रतिकार न करता जगावर प्रेम करता यावं,कुठल्यातरी कल्पनारचित,

मनोवांछित,परिपूर्ण सृष्टीशी या जगाची तुलना करण्याचा मोह न व्हावा आहे,तसंच ते ठेवून आणि काही काळ आपण त्याचे रहिवासी झालो याचा आनंद मानीत त्याला अखेरचा मुजरा करीत प्रेमानं त्याचा निरोप घ्यावा.


सिद्धार्थने जमिनीवरचा एक दगड उचलून घेतला.तो हाताळत त्यांन म्हटलं,'हा दगड आहे,कालावधीत त्याचं मातीत रूपांतर होईल त्या मातीतून तो कदाचित वनस्पतीचं,पशुच वा मानवाचं रुप घेईल.

यापूर्वी मी म्हटलं असतं:हा नुसता दगड आहे,तो कवडी किमतीचा आहे.माया जगताचा घटक आहे.परिवर्तनाच्या चक्रात फेरे घेतो तोही कदाचित मनुष्य होईल,चित् स्वरूप होईल,म्हणून दगडही महत्त्वाचा आहे.


पण आता मी असा विचार करतो : 


हा दगड आहे,त्याचवेळी तो प्राणी आहे,ईश्वर आहे.आज ती एक वस्तू आहे आणि उद्या ती वेगळेच काही होणार आहे म्हणून तिच्याकडे प्रेमादरानं मी पाहतो असं नव्हे,तर आधीपासून ती सर्व काही आहे आणि निरंतर ती सर्वच काही असणार आहे. या दृष्टीने मी तिच्याकडे पाहतो.

तो दगड आहे आणि या क्षणी मला दगडाच्या रूपात दिसत आहे एवढंच माझ्या प्रीतीला पुरेसं आहे.त्यावरच्या खाणाखुणा,खाचा आणि खवले,त्याचा पिवळसर करडा रंग,त्याचं काठिन्य,आपटला असता त्यातून निघणाऱा ध्वनी,त्याच्या पाठीवरचा कोरडेपणा अगर ओलावा या सर्वासर्वांत मला मूल्य आणि अर्थ दिसतो.कित्येक दगडी असे असतात की,त्यांचा स्पर्श तेलासारखा किंवा साबणासारखा लागतो. कित्येक पानांसारखे रेषाळा किंवा वाळूसारखे रवाळ दिसतात.प्रत्येक भिन्न असतो.आणि त्याच वेळी आपल्या रीतीनं दगड असतो,याचाच मला मोठा आनंद होतो होतो अपूर्व नवलाईचा आणि पूजनीय वाटतो.!


हा ग्रंथ वाचनाचा प्रवास म्हणजे स्वतःसाठी स्वतःहून केलेला प्रवास.


सत्य हाच ईश्वर - 'सत्य ईश का रुप'


निर्गुण परंपरेचा पाया सत्यावर आधारित होता.'सत्य विद्या को पडो. सदा प्राप्त करो ज्ञान'असे जे रैदास म्हणतात,त्याला भरपूर महत्त्व आहे. ज्ञान घेतानासुद्धा सत्यावर आधारित,सत्याचे अधिष्ठान असलेले ज्ञान घ्या असे कसे बजावतात.असत्य,गोटे असे कोणतेही संस्कार ते टाळायला सांगतात.


सत्याला ईश्वराच्या ठिकाणी प्रतिष्ठित करणे म्हणजे त्याद्वारे ईश्वराची प्रतिष्ठा वाढविणे नव्हे ! सत्य हे महान मानवी मूल्य आहे! उलट ईश्वराला सत्याच्या ठिकाणे मानने, प्रतिष्ठित करणे म्हणजे ईश्वराची प्रतिष्ठा वाढविण्यासारखेच आहे. म्हणूनच निर्गुण परंपरा सत्यालाच ईश्वर मानते आणि सत्यात अपार शक्ती आहे असे ठामपणे सांगतात.


सत्याच्या आश्रयाने जगा,सारे जग जर एका बाजूला झाले,जगाने साथ जरी सोडली तरी सत्याच्या जगणे सोडू नका,असा मौलिक सल्ला रैदास देतात.खरंच किती उच्च जीवनातील तात्विक सत्याची खोली वाढणारं जीवन तत्व संत जगत असतात.या ग्रंथामध्ये सर्वांगीन जीवनाचे धर्माची सत्याची परिभाषा समजावून सांगितली आहे.यामधील संतांना,या ग्रंथाच्या भेटी मधून मला लवचिकता नम्रता शिकायला मिळाली.ते या ग्रंथाचे लेखक डॉ.रवींद्र श्रावस्ती यांच्यामुळे,ग्रथांच्या मलपृष्ठावरील शब्दरूपी आरसा मनस्वीपणाने डोळ्यापुढे धरून ग्रंथाबाबत उच्चकोटीचे भाष्य करणारे डॉ. सूर्यनारायण रणसुभे,व नाग - नालंदा प्रकाशन या सर्वांचे मनःपूर्वक आभार जीवनातील सत्य समजावून सांगण्यासाठी यांनी केलेले अपार कष्ट, हे म्हणजे धाडसी पाऊलच सर्वांना विनम्र धन्यवाद..


बुद्धाने तर दुःख विमुक्तीचा महामार्ग दिला. जीवनाला जसं आहे तसं जाणा,त्याला सामोरे जा.दुःखाचे कारण शोधा म्हणजे त्यातच त्याचा उपायही सापडेल,असे सांगून ते थांबले नाहीत तर दुःख मुक्तीसाठी त्यांनी नवा मार्ग दाखविला,प्रज्ञा, शील आणि समाधी याद्वारे दुःख मुक्ती शक्य आहे,असे दाखवून दिले. 


सृष्टीच्या घटकांविषयी ज्ञान आणि त्यातून आलेला व्यापक दृष्टिकोन ही प्रज्ञा आहे. चांगल्या उपजिविकेसाठी कोणते कर्म केले पाहिजेत,कोणते टाळले पाहिजेत;

आपली उपजीविका करताना दुसऱ्याला दुःख,वेदना,इजा होणार नाही हे पाहणे हेच शील आहे.प्रज्ञापूर्ण आणि शीलमय आयुष्य जगण्यासाठी चांगले प्रयत्न करत राहणे:जागृती,विवेकी जगने आवश्यक असते.हे सर्व जगत असताना आपण हे असेच करत आहोत ना? दुष्कर्म आपल्या हातून घडत नाही ना?आपल्याकडून कुशल कर्मेच होत आहेत ना,हे सारं पुन्हा पुन्हा बघणं अत्यावश्यक असते.सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे सम्यक समाधी,समाधी म्हणजे फक्त ध्यानधारणा नव्हे.समाधीचा अर्थ जागृती असाही होतो.सम्यक समाधी म्हणजे व्यक्तीने समाजाशी आनंदाने समन्वित व तल्लीन होणे.हे सर्व समजून घेण्यासाठी आणि ते सर्व आपल्या व्यक्तिमत्वात एकरूप होण्यासाठी म्हणून तर संत रैदास 'निरंजन ध्यावो' चा सल्ला देतात. ध्यान लावून बसणे म्हणजे निष्क्रियता नव्हे. आपण जे कार्य हाती घेतले आहे त्या कार्याप्रती सदैव एकनिष्ठ राहता यावे,स्वत:ला बाहेरील अनावश्यक दबावापासून ताणापासून मुक्त राहता यावे म्हणून ध्यान,समाधी आवश्यक असते.स्वतःला कार्यप्रवण,निर्भय,दोषरहित बनविण्यासाठी साधक ध्यानाची विशिष्ट तंत्र आत्मसात करतात.'निरंजन'अवस्था प्राप्त 'निरंजन' ही स्थिती किंवा अवस्था काय आणि माया (मन) यावर नियंत्रण करुन,शून्यतेचा बोध होऊन शक्य होते.हेच निरंजन अवस्था प्राप्त करण्याचे मर्म.रैदास म्हणतात.'कह रैदास मरम जू पाऊ,देव निरंजन सतकरि ध्याऊ!


या ग्रंथामध्ये अनेक अज्ञात असणाऱ्या,असत्य सत्य म्हणून सांगणाऱ्या,परंपरा ह्या सगळ्याच गोष्टींबाबतचे सत्य क्रांतिकारकपणे मांडले आहे. 


यासंदर्भात बरेच साहित्य नष्ट झालेले आहे. (केलेले आहे) यातील सिद्धांत,पुरावा,संदर्भ खरोखरच अलौकिक अभ्यासपूर्ण व जीवणाला एक नवीन दृष्टिकोन देण्यासारखे आहे. प्रत्येक मनुष्याने आपल्या स्वत:साठी हा ग्रंथ एकदा नक्कीच वाचावा.हा ग्रंथ आपल्या सोबत असणे म्हणजे इतिहास आपल्या जवळ आहे. 


असे वाटते,कबीर,गोरखनाथ,सुफी पंथ, बुध्द धम्म,महानुभाव पंथ,संत नामदेव,संत तुकाराम सर्व संतांची धर्माची,संतांची अभ्यासपूर्ण मांडणी यामध्ये आहे.


संत साहित्यात गीता,भागवत पुराण व योगसूत्रे यांचा उल्लेख आढळतो.भगवद्गीता हा ग्रंथ महाभारताचा एक भाग आहे. त्यात पिंपळमहात्म्य,वेदविरोध,अर्हताचेगुण,

अहिंसा,यज्ञविरोध इत्यादी बौद्ध धर्माच्या वैचारिक विश्वातील गोष्टी आढळतात.जर्मन विद्वान गार्ब त्यांनी गीतेचा काळ इ.स.२०० मांनला आहे.अनेक विद्वानांनी महाभारत आणि पर्यायाने भगवद्गीता ही बुध्दोत्तर आहे असे मांडले आहे.


एक भिक्खु भिक्षा मागून जगण्यासाठी,तगून राहण्यासाठी त्याला ९० समर्थक घरे असावी लागतात. रोज तीन घरे याप्रमाणे भिक्षा मागून एक भिक्खु तीस दिवस गुजराणकरू शकत असे.नव्या परिस्थितीत लोक घाबरून उघडपणे भिक्षा देईनासे झाले त्यामुळे अशा भिक्खूंना गृहस्थी जीवण जगावे लागले परंतु त्यांनी धम्मप्रचार,

धम्मदेशना सोडली नाही,तर नव्या रूपात बौद्ध धम्माला ते मांडत राहिले.


सुफी संतांची परंपरा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या उदयापूर्वीपासूनची परंपरा आहे,असे ओशोसहीत अनेक विद्वानांचे मत आहे, त्याचे कारण सुफींचे विचार व आचारसंहिता इस्लाम धर्मातील प्रथा-परंपरा यापेक्षा काही बाबतीत भिन्न आहे. पण तरीही सुफी परंपरा इस्लामचा भाग आहेच. प्रेम,भक्ती,क्षमाशीलता सहिष्णुता,ज्ञानाचा प्रसार व प्रचार यांना महत्त्व दिले आहेच.


ज्या ठिकाणी मी नम्र,नतमस्तक झालो तो प्रसंग या ठिकाणी लिहुन मी थांबतो.


संत कबीर व संत रैदास यांचे एक संयुक्त चित्र बादशहा* शहाजहान यांचा थोरला पुत्र ' दारा शुकोह ' यांनी

तयार करून घेतले होते. ते त्यांनी आपल्या पिताश्रींच्या दरबारी चित्रकारांकडून म्हणजे फकीर उल्ला यांच्याकडून सन १६४० मध्ये करवून घेतले होते. सध्या हे पेंटिंग दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये ठेवले आहे.दारा शुकोह यांचे त्यासाठी आपण ऋणी असले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे हा ठेवा आज उपलब्ध राहू शकला.दारा शुकोह हा सुफी तत्त्वज्ञ होता. तो फक्त राजपुत्र नव्हत;तर कवी,बहुभाषा कोविद,ग्रंथकार,अनुवादक होता. सुरुवातीच्या काळात तो सुफी चळवळीतल्या चिश्ती पंथाचा अनुयायी होता. नंतर तो कादरी पंथाच्या प्रभावात आला व त्याने या पंथाचे अनुयायीत्व पत्करले.त्याची सुफी संतांशी घनिष्ठ मैत्री होती. त्याचबरोबर त्यांची हिंदू धर्मातून पुढे आलेल्या संतांशी देखील चांगले सख्य होते. तो या दोन्ही धर्माचा समन्वयवादी म्हणूनही ओळखला जातो.


जाता .... जाता...


हा ग्रंथ वाचत असताना स्वतःमध्ये बदलाचा स्वानुभव मी घेत होतो. चिंतन करत होतो, मनन करत होतो,समजून घेत होतो.गंभीरपणे विचार करत होतो स्वतःला समजून घेणं,'जाग्यावर असणं म्हणजे काय?' या प्रश्नाचे उत्तर मला नक्कीच मिळाले.


तुमच्या आशा कधीही सोडू नका.एकच पान जंगलाची सुरुवात असू शकते… 


या विचाराची प्रगल्भता दाखवणारा हा ग्रंथ ..

एकवेळ अवश्य वाचून आपल्या संग्रही जतन करून ठेवावा असा आहे.

३/२/२३

भारताच्या प्राचीन कला- १

जगाच्या पाठीवर कुठलीही संस्कृती जर टिकून रहायची असेल तर ती परिपूर्ण असणे आवश्यक आहे.परिपूर्ण याचा अर्थ,त्या संस्कृतीनं सर्वांगानं मानवी मनाचा विचार करायला हवा. समाजमनाचा विचार करायला हवा.आणि या कसोट्यांवर आपली भारतीय संस्कृती पुरेपूर उतरते.म्हणूनच फाळणी- नंतर पाकिस्तानचा राष्ट्रकवी झालेल्या इकबालने म्हटलं होतं


यूनान,मिस्र,रोमा,सब मिट गये जहाँ से ... ! 

कुछ बात हैं की हस्ती मिटती नहीं हमारी..!!


ही 'हस्ती' म्हणजे आपली परिपूर्ण जीवनपद्धती. जगण्याच्या सर्वच आघाड्यांवर आपण पुढे होतो. फार, फार पुढे होतो.... जाता जाता एक लहानसं उदाहरण देतो -


सन १९९४ मधे मी सर्वप्रथम अमेरिकेला गेलो. त्यापूर्वी जपान आणि युरोप बऱ्यापैकी फिरलो असल्याने अमेरिकेचं तसं फार कौतुक नव्हतं. पण तरीही अमेरिकेतल्या अनेक गोष्टी अंगावर येतच होत्या.माझी तिथली व्यवस्था बघणारा माणूस सुदैवानं भारतीय होता.बंगाली बाबू. त्यामुळे तो मला अमेरिकेतलं प्रत्येक अप्रूप दाखवत होता.तो मला 'ड्राईव्ह-इन'ची गंमत दाखवायला लागला- की,बघ,अमेरिकेत कसं सर्वदूर ड्राईव्ह-इनची सोय असते.मेक डोनाल्डमधे गाडीत बसल्या बसल्याच पैसे द्यायचे आणि गाडीत बसल्या बसल्याच आपलं खाण्याचं पॅकेटही घ्यायचं.ड्राईव्ह-इन एटीएम सुद्धा त्याने दाखवले.


मी थोडा फार तरी नक्कीच इम्प्रेस झालो होतो.

पुढे पाच / सहा वर्षांनी रायगडावर गेलो. त्या विस्तीर्ण पसरलेल्या होळीच्या माळावर ते पुरुषभर उंचीचे,एका रांगेत बसवलेले चबुतरे बघितले अन् त्या गाईडला विचारलं, 'हे काय रे बाबा..? असे उंच चबुतरे कशाला?' अगदी सहज स्वरात तो गाईड म्हणतो,"हा बाजार आहे. अहो,त्या काळी घोडेस्वार बाजार-हाट करायला आले की घोडे कुठं ठेवतील ? म्हणून


घोड्यावर बसूनच बाजार-हाट करायची सोय महाराजांनी केली होती.... खरं सांगतो,अंगावर सर्रकन काटा उभा राहिला..! कोण मॉडर्न ?


साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या रयतेसाठी, सैनिकांसाठी 'ड्राईव्ह-इन' बाजाराचे निर्माण करणारा आमचा शिवाजी राजा मॉडर्न,की गेल्या पन्नास- साठ वर्षांत ड्राईव्ह-इनची कसरत केलेले हे अमेरिकन्स मॉडर्न ?


पण हे फार पुढचं उदाहरण झालं.आपण भारतीय पूर्वीपासूनच पुढारलेले होतो.आपल्या समग्र जीवनशैलीसह आपण पुढारलेले होतो. ज्ञान-विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या बरोबरच आपल्या देशात कला,संगीत हे विषय निर्माण झाले,प्रगत झाले अन् पुढे कालांतराने प्रगल्भ झाले. कलेला एक निश्चित स्वरूप देण्याचं काम भारतानं केलंय.


अगदी आपली गायन/ वादन परंपराच घेऊ.ही खूप प्राचीन आहे.देवी सरस्वती ही प्राचीन देवता मानली जाते.तिच्या हातात वीणा दिसते.नवव्या शतकात शृंगेरीत बांधलेलं शारदाम्बा देवीचं मंदिर म्हणजेच सरस्वतीचं.गदगचं सरस्वतीचं प्राचीन मंदिर हे अकराव्या शतकात बांधलंय.पण सरस्वतीच्या मूर्ती त्याहून आधीच्या आढळतात. सरस्वतीची सर्वांत प्राचीन आढळलेली मूर्ती ही भारहून येथे सापडली आहे,जी पहिल्या शतकातली आहे.काही नृत्य-शारदाही दिसतात. पण अधिकांश मूर्ती ह्या वीणा घेतलेल्या

आहेत.म्हणजे वीणा हे वाद्य किती जुनं ? तर काही हजार वर्षं तरी नक्कीच..! म्हणजे बघा, संगीताचे उल्लेख आपल्याकडे प्राचीन काळापासून आढळतात !


सरस्वतीनं धारण केलेलं 'वीणा' हे तंतुवाद्य किमान चार हजार वर्षं तरी जुनं असावं असा अंदाज आहे. पूर्वी ही 'एकतंत्री वीणा' असायची. भरतमुनीने 'आपल्या' नाट्यशास्त्रात' 'चित्रा' (७ तारांची ) आणि 'विपंची' (९ तारांची )


ह्या प्रमुख वीणांचा उल्लेख केलेला असून घोषा, कच्छभी अशा दुय्यम वीणा सांगितल्या आहेत.


पण संगीताचे उल्लेख आपल्या वेदकाळापासून बघायला मिळतात.ऋग्वेदाला प्राचीनतम मानलं जातं,जो पाच हजार वर्षं जुना आहे.ऋग्वेदात संगीताचे उल्लेख येतात.यजुर्वेदाच्या ३० व्या कांडात १९ आणि २० व्या मंत्रांत अनेक वाद्य वाजवण्याचा उल्लेख येतो.अर्थात त्या काळात वाद्य वाजविणे' ही कला असावी.वाण,वीणा, कर्करीया तंतुवाद्यांबरोबरच अवनद्ध 'वीणा' - हे प्राचीन वाघ् वाद्यात दुंदुभी,गर्गरा तर सुषिर वाद्यात बाकुर,नाडी,तुणव,शंख यांचे उल्लेख येतात.


मात्र 'सामवेदात' संगीताचे विस्ताराने वर्णन मिळते. त्या काळात स्वरांना 'यम' म्हटले जायचे. सामवेदातल्या 'साम' चा संगीताशी घनिष्ठ संबंध होता. इतका की, 'छांदोग्योपनिषद' मध्ये प्रश्न विचारलाय,


कां साम्नो गतीरिती ? स्वर इति होवाच अर्थात 'साम' ची गती काय आहे ? उत्तर आहे स्वर.


वैदिक काळात तीन स्वरांच्या गायनाला 'साम्रिक' (आजच 'सामूहिक' ?) म्हणायचे. हे स्वर होते - ग,रे.स.पुढे हे सप्तसूर झाले. स्वरांचा क्रमांक . ठरवून जो समूह निर्माण झाला त्याला 'साम' म्हणायला लागले. पुढे युरोपमधे त्यांच्या संगीतातील अशा क्रमाला 'स्केल' हे नाव मिळाले.


याचाच अर्थ आपल्याकडे किमान तीन ते चार हजार वर्षांपूर्वी विकसित झालेले संगीत नांदत होते.पुढे भरतमुनींचे नाट्यशास्त्र आपल्याला मिळाले.अन् भारतीय संगीताच्या प्राचीनत्वावर शिक्कामोर्तब झाले.


ह्या भरत मुनींचा कालखंड इसवी सनापूर्वी साधारण पाचशे वर्षं मानला जातो.पण त्याबद्दल काहीसा विवाद आहे.कोणी त्यांचा जन्म इसवी सनापूर्वी शंभर वर्षं झाला असंही म्हणतात. ते काही असलं तरी भरत मुनींच्या नाट्यशास्त्राने एक मोठी गोष्ट केली.


भारतीय कला ह्या विकसित स्वरूपात,अगदी 'वैज्ञानिक रीत्या' अस्तित्वात होत्या हे निश्चितपणे सिद्ध झालं.


या ग्रंथात नाट्यशास्त्राबरोबरच इतर सपोर्टिव्ह कलांचीही व्यवस्थित माहिती दिलेली आहे. गीत-संगीतासंबंधी विस्तृत वर्णन यात आढळते.


जगातलं सर्वांत जुनं संगीत कोणतं? किंवा सर्वांत जुनं वाद्य कोणतं? असं म्हणतात की, इसवी सनापूर्वी ४००० वर्षे मिस्रच्या लोकांनी बासरीसारखी काही वाद्यं निर्माण केली. डेन्मार्कमधे इसवी सनापूर्वी २५०० वर्षे ट्रम्पेटसारखं वाद्य निर्माण केलं गेलं.


मात्र पाश्चात्त्य जगाला सुरांच्या विशिष्ट श्रेणीत बसवलं ते पायथागोरसने.म्हणजे इसवी सनापूर्वी ६०० वर्षे.त्याने स्वरांचे मंडल तयार केले आणि त्याला गणितीय परिभाषेत बसवले.


दुर्दैवाने भारतात जुनी कागदपत्रे आणि इतर अवशेष मुसलमानांच्या आक्रमणात नष्ट झाली, त्यामुळे आपला नक्की इतिहास सांगता येत नाही.पण इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षांच्या नोंदी सापडतात आणि त्यानुसार संगीताचा किंवा वाद्यांचा नवीन शोध लागला आहे असं वाटत नाही.एखाद्या विकसित कलेला शब्दबद्ध केल्यासारख्या त्या नोंदी आहेत.


मात्र ऋग्वेद आणि सामवेदातील उल्लेख बघता आपले संगीत हे किमान ५ हजार वर्षे तरी नक्कीच जुने असावे. आणि गंमत म्हणजे सामवेदातील सूत्रांमधे एक विकसित आणि प्रगल्भ संगीतव्यवस्था उलगडत जाते.


वेदांबरोबरच अनेक उपनिषदांतूनही गीत-संगीत आणि इतर कलांचा उल्लेख मिळतो. श्रोतसूत्रांपैकी कात्यायनाचे श्रोतसूत्र आहे. मुळात हा वैदिक कर्मकांडासंबंधीचा ग्रंथ आहे. मात्र यातही उत्सवप्रसंगी गायल्या जाणाऱ्या गीत-संगीताची रेलचेल आहे.या श्रोतसूत्राचा कालखंड साधारण तीन हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो.


पाश्चात्त्य संगीताचा विचार करता एक गंमत जाणवते.पाश्चात्त्य संगीतात दोन हजार / अडीच हजार / तीन हजार वर्षांपूर्वीचे उल्लेख ठामपणे केलेले आढळतात.मात्र त्या उल्लेखात नवीन काही शोधून काढण्याचं स्पष्टपणे मांडण्यात आलेलं आहे.


उलट भारतीय ग्रंथांमधे जी वर्णनं आढळतात ती एखाद्या विकसित संगीत पद्धतीची माहिती देतात.अगदी सामवेदाच्या सूत्रांतही विकसित झालेल्या संगीताचे उल्लेख आहेत.याचाच अर्थ भारतीय संगीत अगदी शास्त्रशुद्धपणे कितीतरी आधी विकसित झालेलं आहे. किती आधी ? सांगणं कठीण आहे..!


एक दुर्दैव असंही की,भारतीय कलांच्या इतिहासाबद्दल जे संदर्भ येतात ते अधिकांश पाश्चात्त्य संशोधकांचेच असतात.ब्रॉडीज, इ. वुईनडिश, व्ही. स्मिथ, पिशेल, याकोबी, हार्मन कीट.... वगैरेसारख्यांचाच बोलबाला आहे.. त्यामुळे भारतीय संगीताच्या इतिहासाला एका उपेक्षित नजरेनंच पाह्यलं गेलंय.


जसं गीत-संगीत, तसंच नाटकाचंही. भारतासारखंच विकसित नाट्यशास्त्र सर्वांगानं बहरलं ते ग्रीसमधे.मात्र एकोणिसाव्या शतकात ह्यावरून वाद उसळला की भारतीयांनी ग्रीसच्या रंगभूमीवरून सर्व कल्पना उचलल्या,ग्रीसची रंगभूमी भारतीय नाट्यशास्त्रानं प्रभावित झाली होती..! यात नक्की काय घडलं.. ? की

ते पुढील प्रकरणात बघुया.. !!


१ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..

१/२/२३

भारताचे प्राचीन खगोलशास्त्र..

साधारण दीड वर्षांपूर्वी,म्हणजे नक्की सांगायचं तर एप्रिल,२०१६ पासून मध्यप्रदेशाच्या उज्जैनमधे सिंहस्थ कुंभमेळा भरला.किमान २ ते ३ कोटी माणसं उज्जैन- सारख्या लहानशा शहरात महिना / दीड महिन्याच्या कालावधीत आली,त्यांनी क्षिप्रेत स्नान केलं अन् पुण्य गाठीशी बांधलं.याच उज्जैनमधे एक इतिहासकालीन आश्चर्य उभे आहे.ते म्हणजे - वेधशाळा.कुंभमेळ्याच्या भाविकांपैकी किती जणांनी ह्या वेधशाळेला भेट दिली,कोणास ठाऊक.पण ही वेधशाळा म्हणजे आपल्या प्राचीन ज्ञानाची किंचित खुली झालेली कवाडं आहेत.आणि ते ज्ञान आहे खगोलशास्त्राचे..!


सन १७३३ मध्ये राजस्थानातील आमेरचा राजा सवाई जयसिंग (द्वितीय) याने ही वेधशाळा बांधली.तेव्हा तो माळव्याचा सुभेदार होता. उज्जैन व्यतिरिक्त दिल्ली,काशी,मथुरा आणि जयपूरमधेही ह्या राजा जयसिंगने वेधशाळांची निर्मिती केली.त्याने पहिली वेधशाळा बांधली ती दिल्लीची.सन १७१० मध्ये बांधून झाल्यावर त्या वेधशाळेतील आकड्यांचे विश्लेषण केले आणि ते बरोबर आहेत असं समजल्यावर इतर चार वेधशाळा उभारल्या.


हा सवाई जयसिंग खगोलशास्त्राचा चांगलाच जाणकार होता.संस्कृतवर त्याचं प्रभुत्व होतं.


त्याचबरोबर,मोगलांबरोबर राहून त्याने अरबी आणि फारसी भाषाही शिकल्या होत्या.गंमत म्हणजे याला मराठी सुद्धा चांगली येत होती.याचा बराच काळ औरंगाबाद,दौलताबाद,नगर इत्यादी ठिकाणी गेला होता.संभाजीला परास्त करून,हिंदवी स्वराज्य संपविण्यासाठी औरंगजेब जी चतुरंग सेना घेऊन महाराष्ट्रात शिरला,त्या सेनेत सामील व्हायचं सवाई जयसिंगाला फर्मान सुटल.त्या वेळी त्याचं वय होतं अवघं १४ वर्षं. त्याने बरीच टाळमटाळ केली.शेवटी औरंगजेबाचे दूत आमेरपर्यंत आले,तेव्हा जयसिंगाला जावंच लागलं.


असं म्हणतात,सवाई जयसिंगाने महाराष्ट्रातल्या त्या धामधुमीच्या काळातही,तिथल्या ग्रंथांचं अध्ययन करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातून बरेच ग्रंथ गोळा करून नेले.


या जयसिंगाला खगोलशास्त्रात निपुण करण्याचं श्रेय जातं मराठी माणसाला.पंडित जगन्नाथ सम्राटाला.नावात सम्राट असलं तरी हा राजा जयसिंगाला वेद शिकविण्यासाठी नेमलेला ब्राम्हण होता.मात्र या जगन्नाथ पंडिताचा खगोलशास्त्राचा दांडगा अभ्यास होता.याने 'सिद्धांत कौस्तुभ' या ग्रंथाची रचना केली होती. आणि युक्लीडच्या भूमितीचा अरबीमधून संस्कृतमधे अनुवादही केला होता.


सम्राट जगन्नाथाच्या नेतृत्वाखाली सवाई जयसिंगने वेधशाळा बांधताना कुठेही धातूचा उपयोग केलेला नाही.


युरोपमधील वैज्ञानिकांनी धातूची उपकरणं वापरल्याने आणि धातूंमध्ये मोसमाप्रमाणे आकुंचन / प्रसरण होत असल्याने अनेकदा गणना चुकते.मात्र सवाई जयसिंगांच्या पाचही वेधशाळांमधे चुना विशिष्ट आकारात घडवलेले दगड,यांच्याच मदतीने सर्व यंत्रं उभारली आहेत.


दुर्दैवाने ह्या पाच वेधशाळांपैकी उज्जैन आणि जयपूरच्याच वेधशाळा आज ही काम करतात.मथुरेची वेधशाळा तर नष्टच झालेली आहे.तर काशीची अत्यंत जर्जर अवस्थेत आहे.उज्जैनच्या वेधशाळेत सम्राट यंत्र,नाडी वलय यंत्र,दिगंश यंत्र,भित्ति यंत्र आणि शंकु यंत्र बनलेले आहेत.ही वेधशाळा बांधण्याचा काळ हा मराठ्यांच्या माळव्यात प्रवेश करण्याआधीच्या काही वर्षांचा आहे.पुढे १९२५ मधे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांनी ह्या वेधशाळेची डागडुजी केली होती.


सवाई जयसिंगाच्या पाच वेधशाळांपैकी उज्जैनच्या वेधशाळेचं महत्त्व का..? तर पूर्वी, म्हणजे 


इसवी सनाच्या चारशे वर्षं पूर्वीपर्यंत अशी मान्यता होती की पृथ्वीची देशांतर रेषा (मध्यान्ह रेषा) ही उज्जैनमधून. जाते. शिवाय कर्कवृत्त रेषा ही देखील उज्जैनवरून जात असल्याने उज्जैनला भारतीय खगोलशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे..


आपल्या महाराष्ट्रातलं वाशीम म्हणजे जुन्या काळची वाकाटकांची राजधानी 'वत्सगुल्म'.ह्या वाशीममधे एक मध्यमेश्वराचे मंदिर आहे.असं मानतात की,प्राचीन काळी कल्पना केलेली पृथ्वीची देशांतर रेषा ही त्या मध्यमेश्वराच्या पिंडीच्या मधून जाते.गंमत म्हणजे पृथ्वीच्या वक्राकार पद्धतीने बघितलं तर वाशीम आणि उज्जैन ही दोन शहरं एकाच रेषेत येतात. भास्कराचार्यांनी त्यांच्या 'लीलावती' या ग्रंथात ह्या देशांतर रेषेचा उल्लेख केला आहे. ह्या उल्लेखाप्रमाणे उज्जैन (ग्रंथामधे उज्जैनला 'अवंती' ह्या जुन्या नावानेच संबोधलेलं आहे) आणि आज हरियाणामधे असलेल्या रोहतकमधून ही कल्पित देशांतर रेषा जाते.


उज्जैनची ही वेधशाळा म्हणजे प्राचीन खगोलशास्त्राचे किलकिले झालेले दार आहे.ह्या वेधशाळेने नवीन काहीच प्रस्थापित केलेले नाही. पण त्याचबरोबर,ज्या ग्रंथांच्या आधारे ही वेधशाळा उभी राहिली,त्या ग्रंथांची एक झलक आपल्यासमोर उभी राहते आणि आपण थक्क होऊन जातो.


वेधशाळा ही गोष्ट जगाला नवीन नाही किंवा त्याचे अप्रूपही नाही..सवाई जयसिंगने भारतात पाच वेधशाळा बांधण्याच्या काहीशे वर्षं आधी, म्हणजे तेराव्या शतकात इराणच्या मरागामधे क्रूरकर्मा चंगेज खानच्या नातवाने,हलागू खानने,विशाल वेधशाळा बांधलेली आढळते.जर्मनीच्या कासलमधे सन १५६१ मधे वेळ दाखवणारी वेधशाळा बनवली गेली होती.


मात्र भारतातल्या वेधशाळांचं महत्त्व हे की,त्या अत्यंत पद्धतीने,खगोलशास्त्राची विविध अंगं सांगणाऱ्या वेधशाळा आहेत.


उज्जैनच्या वेधशाळेत सेकंदाच्या अर्ध्या भागापेक्षा कमी फरकाने वेळ बघता येते.


मग हे ज्ञान आपल्याजवळ आलं कोठून.. जगन्नाथ सम्राट आणि राजा सवाई जयसिंग यांनी हे सर्व कुठून शोधून काढलं.. ? तर त्यासाठी आपल्याला बरंच मागं जावं लागेल.


आपल्या खगोलशास्त्राचे सर्वांत प्राचीन उल्लेख सापडतात ते लगध ऋषींच्या 'वेदांग ज्योतिष' या ग्रंथात. याच्या शीर्षकात जरी 'ज्योतिष' असा उल्लेख आला असला तरी हा ग्रंथ खगोलशास्त्राचेच विवेचन करतो. इसवी सनापूर्वी १३५० वर्षं हा लगध ऋषींचा कार्यकाल मानला जातो.या ग्रंथात 'तीस दिवसांचा एक महिना' ह्या मानकाचा उल्लेख आहे.अर्थात आजपासून साधारण ३३०० वर्षांपूर्वी भारतात खगोलशास्त्राचे बरेच ज्ञान होते.कदाचित याआधीही असेल.कारण लगध ऋषींचा हा ग्रंथ, आपण काही नवीन शोधून काढलं,असं कुठेही म्हणत नाही.म्हणजेच त्याआधीच्या काळातील आपल्याजवळ असलेल्या खगोल शास्त्रासंबंधीच्या ज्ञानाला हा ग्रंथ लिपीबद्ध करतोय.


दुर्दैवानं भारतात प्राचीन ग्रंथांपैकी अनेक ग्रंथ आज उपलब्ध नाहीत.मुस्लीम आक्रमणाच्या काळात अनेक महत्त्वाचे ग्रंथ नष्ट झाले. त्यानंतरही जे ग्रंथ शिल्लक उरले,त्यांच्यातील काही महत्त्वाचे ग्रंथ इंग्रज शासनाच्या काळात युरोपियन अभ्यासक घेऊन गेले.


असाच एक ग्रंथ आहे,खगोलशास्त्रावरील नारदीय सिद्धांताचा.भारतात हा मिळत नाही. पण बर्लिनच्या प्राचीन पुस्तकांच्या संग्रहालयात 'नारद संहिता' हा खगोलशास्त्रीय ग्रंथ सापडतो. (Webar Catalogue No 862),तसंच खगोलशास्त्रावरील धर्मत्तारा पुराणातील सोम - चंद्र सिद्धांतावरील दुर्मीळ ग्रंथही ह्याच पुस्तकालयात उपलब्ध आहे (Webar Catalogue No 840). प्राचीन खगोलशास्त्रात 'वसिष्ठ सिद्धांत' महत्त्वाचा मानला जातो.


सूर्य सिद्धांताशी मिळत्या-जुळत्या ह्या सिद्धांताचा ग्रंथ भारतात मिळत नाही..मात्र यातील संदर्भ कोटमब्रूक्स आणि बेन्टले (जॉन बेन्टले: १७५० - १८२४) ह्या खगोलशास्त्रज्ञांच्या ग्रंथात अनेक जागी येतात. 


विष्णुचंद्र ह्या भारतीय खगोलशास्त्रज्ञाची गणितीय संकलने ह्या वसिष्ठ सिद्धांतावर आणि आर्यभट्टच्या ग्रंथावर आधारित आहेत.जर हा ग्रंथ उपलब्ध नाही,तर कोटमब्रूक्स आणि बेन्टले यांना ह्यातील संदर्भ कुठून,असा प्रश्न पडल्यावर शोध घेतला असता हा ग्रंथ 'मेकॅजी संग्रहात विल्सन कॅटलोगमध्ये१२१ व्या क्रमांकावर मिळाला.बेन्टलेने आर्यभट्टच्या कार्यावर आधारित दोन शोधग्रंथ लिहिले आहेत.पहिला आहे,'आर्य सिद्धांत' आणि दुसरा आहे 'लघु आर्य सिद्धांत' इसवी सनाच्या पाचव्या शतकात झालेल्या आर्यभट (प्रथम) च्या 'आर्य अष्टक शतः' (ज्यात ८०० श्लोक आहेत) आणि दश गीतिका' (दहा सर्ग) ह्या दोन ग्रंथांना बेन्टले अनेकदा उद्धृत करतो.हे दोन्ही दुर्मीळ ग्रंथ बर्लिन पुस्तकालयात वेबर कॅटेलॉग क्र. ८३४ मध्ये उपलब्ध आहेत..!


पाश्चात्त्यांनी आपल्या हिंदू खगोलशास्त्रावर बरंच अध्ययन केलेलं आहे.१७९० मधे स्कॉटिश गणितज्ञ जॉन प्लेफेयरने हिंदू पंचांगावरील माहितीच्या आधारे (जी माहिती युरोपात १६८७ ते १७८७ ह्या कालावधीत पोहोचली) हे ठाम प्रतिपादन केले की,हिंदू कालगणनेची प्रारंभिक तिथी (किंवा जिथपर्यंत उपलब्ध ग्रंथांच्या आणि गणनेच्या आधारे जाता येते) ही इसवी सनापूर्वी ४,३०० वर्षं आहे..!


गंमत म्हणजे अठराव्या शतकातच,युरोपियन खगोलशास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं होतं की, प्राचीन हिंदू खगोलशास्त्रीय गणनेनुसार ग्रह-ताऱ्यांची जी दिशा आणि जे चलन होतंय त्यात एका मिनिटाचीही चूक नाही.


त्या काळात सेसिनी आणि मेयर यांनी ४५०० वर्षांपूर्वीच ताऱ्यांचे जे तक्ते आधुनिक पद्धतीने तयार केले ते प्राचीन हिंदू खगोलशास्त्रज्ञांनी केलेल्या तक्त्यांप्रमाणेच होते..!


प्लेफेयर,बेली आणि वर्तमान काळात 'नासा'मधे काम करणारे प्रो. एन. एस. राजाराम ह्यांनी हे प्रतिपादित केलंय की चार / पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू खगोलशास्त्रज्ञांनी तयार केलेले तक्ते हे प्रत्यक्ष ग्रह-ताऱ्यांच्या पाहणीवर आधारलेले होते आणि त्या आधारावरच खगोलशास्त्राची गणितीय सूत्रे तयार केली गेली.


बेली आणि प्लेफेयर ह्यांनी एक अजून कुतूहल वाढवेल असं निरीक्षण नोंदवून ठेवलं आहे. 


हिंदू खगोलशास्त्रज्ञांनी सात ग्रह-ताऱ्यांची गुरू, मंगळ, शुक्र, बुध, सूर्य आणि चंद्र) स्थिती आणि रेवती नक्षत्राच्या सापेक्ष त्यांचे स्थान,हे सर्व श्रीकृष्णाच्या मृत्यूच्या वेळेस नोंदवून ठेवलं आहे. आजची अत्याधुनिक साधनं तिथी काढली तर ती येते १८ फेब्रुवारी इसवी सनापूर्वी ३१०२. याचा अर्थ बेली आणि प्लेफेयर लिहितात की, त्या काळातील लोकांना आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे फार चांगले ज्ञान होते आणि प्रत्यक्ष निरीक्षणे नोंदवण्याची पद्धत त्या काळी होती. गंमत म्हणजे त्या काळात नोंदवलेल्या चंद्राच्या स्थितीत आणि आजच्या गणनेप्रमाणे केलेल्या चंद्राच्या स्थितीत अंतर आहे फक्त ३७ अंश,अर्थातच नगण्य..!


हे सर्व वाचून / बघून थक्क व्हायला होतं. प्राच्य खगोलशास्त्रातल्या अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की,भारतीय ग्रंथांमधे आढळलेल्या कालगणनेनुसार इसवी सनाच्या ११००० वर्षापर्यंत माहिती मिळते.म्हणजे आजपासून तेरा हजार किंवा त्याही पूर्वीपासून आपल्या पूर्वजांना अवकाशाचं हे ज्ञान असेल.मग मूळ प्रश्न शिल्लकच राहतो,हे असं अत्याधुनिक अद्ययावत ज्ञान,इतक्या हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांकडे कुठून आलं..?


३० जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..

३०/१/२३

भारतीय स्थापत्यशास्त्र - २

एखाद्या वस्तूची वॉरंटी,गॅरंटी किंवा हमी किती असू शकते? एक वर्ष,दोन वर्षं,पाच वर्षं,दहा वर्षं...? आपली झेप यापलीकडे जात नाही नं..? 


पण निर्माण किंवा स्थापत्य क्षेत्रातल्या भारतीय तंत्रज्ञांनी तयार केलेल्या विटेची गॅरंटी आहे,हमी आहे - ५,००० वर्षे..! होय.पाच हजार वर्षं.अन् ह्या विटा आहेत मोहन-जो-दारो आणि हडप्पा येथे सापडलेल्या पुरातन संस्कृतीच्या अवशेषांमधल्या !


भारतात जेव्हा १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची तयारी चाललेली होती,त्या काळात भारताच्या उत्तर पश्चिमेला (म्हणजे आजच्या पाकिस्तानात) इंग्रज रेल्वेचं जाळं उभं करण्याच्या खटपटीत होते.लाहोर ते मुलतान ही रेल्वे लाईन टाकण्याचं काम ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीतर्फे चालू होत.या कामाचे प्रमुख होते जॉन आणि विलियम ब्रुनटन हे ब्रिटिश अभियंते यांच्या समोर मोठं आव्हान होतं की,रेल्वे लाईनच्या खाली टाकण्यासाठीची खडी (गिट्टी) कुठून मिळवावी हे.


काही गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की, ब्राम्हनाबाद जवळ एक पुरातन शहर 'खंडहर' झालेल्या स्थितीत पडलंय.तिथल्या विटा तुम्हाला मिळू शकतील.


रेल्वे अभियंता असलेल्या ह्या दोघा भावांनी मग त्या अवशेषांमधल्या विटा शोधून काढल्या.त्या बऱ्याच होत्या.

लाहोर ते कराची ह्या सेगमेंटमधील रेल्वे लायनीत जवळपास ९३ किलोमीटरची लाईन ही या विटांनी बांधली गेली आहे.


या दोघा अभियंत्यांना हे कळलंच नाही की, एका अतिशय पुरातन आणि समृद्ध अशा हडप्पाच्या अवशेषांना आपण नष्ट करत आहोत!


पुढे बरीच वर्षं ह्या ऐतिहासिक विटांनी लाहोर-मुलतान रेल्वे लाईनला आधार देण्याचं काम केलं.


नवीन झालेल्या कार्बन डेटिंगच्या शोधाने हे सिद्ध झालंय की मोहन- जो-दरों,हडप्पा,लोथल इत्यादी ठिकाणची आढळलेली पुरातन संस्कृती ही साडेसात हजार वर्षं जुनी असावी. ह्या विटा जरा अलीकडल्या म्हटल्या तरी त्या पाच हजार वर्षं जुन्या होतात.अशा ह्या किमान पाच हजार वर्षं जुन्या विटा,१८५७ साली मिळाल्या तेव्हाही मजबूत असतात आणि त्या पुढे ८० / ९० वर्षं रेल्वेचे रूळ सांभाळण्याचं काम करतात...!! आज अशा विटा बनू शकतील..?


हडप्पा येथे सापडलेल्या ह्या विटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.ह्या भट्टीत व्यवस्थित भाजलेल्या आहेत. 


साधारण १५ वेगवेगळ्या आकारांत ह्या आढळतात.पण ह्या सर्व आकारांत एक साम्य आहे ह्या सर्व विटांचं - प्रमाण हे ४ : २: १ असं आहे. म्हणजे ४ भाग लांबी, २ भाग रुंदी आणि १ भाग उंची (जाडी). याचाच अर्थ ह्या विटा अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने तयार झाल्या असाव्यात.मग प्रश्न निर्माण होतो की,साधारण पाच ते सात हजार वर्षांपूर्वी हे बांधकामशास्त्रातलं प्रगत ज्ञान आपल्या भारतीयांजवळ कुठून आलं.. ? की भारतानंच हे शोधून काढलं ?


याचं काहीसं उत्तर आपल्याला जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये मिळतं.


तंत्रशास्त्राचे काही ग्रंथ वाचिक परंपरेमुळे आज उपलब्ध आहेत.त्यातील कपिल वात्सायनाचा ग्रंथ आहे.'मयमतम कला- मुला शास्त्रं' नावाचा.हा ग्रंथ बांधकामासंदर्भातील अनेक बाबी स्पष्ट करतो. यातील एक श्लोक आहे


'चतुष्पश्चषडष्टाभिमत्रिस्तद्विद्विगुणायतः ॥ व्यासार्धार्धत्रिभागैकतीव्रा मध्ये परेऽपरे ।

इष्टका बहुशः शोष्याः समदग्धाः पुनश्च ताः।।'


याचा अर्थ आहे -'ह्या विटांची रुंदी चार,पाच, सहा आणि आठ ह्या नंतर भाजून घटकांमधे असून लांबी ह्याच्या दुप्पट आहे.ह्यांची उंची (जाडी) ही रुंदीच्या एक द्वितीयांश किंवा एक तृतीयांश असावी.ह्या विटा वाळवून घ्याव्यात.'


हा श्लोक ज्या ग्रंथात आहे,तो ग्रंथ लिहिला गेलाय इसवी सनाच्या सहाव्या शतकात. म्हणजे आजपासून साधारण दीड हजार वर्षांपूर्वी. आणि हडप्पामध्ये याच प्रमाणात/ आकारात सापडलेल्या विटा आहेत पाच ते सात हजार वर्षं जुन्या.


याचा अर्थ स्पष्ट आहे.बांधकामशास्त्रातलं अत्यंत प्रगत असं ज्ञान ज्ञात इतिहासाच्या काळापासून भारताजवळ होतं आणि ते शास्त्रशुद्धरीत्या वापरलं जात होतं.


एक तुलनेनं अलीकडचं उदाहरण घेऊ. विजयनगर साम्राज्याच्या उत्तर काळात,म्हणजे सन १५८३ मधे बांधलं गेलेलं लेपाक्षी मंदिर. असं सांगितलं जातं की,जटायूने सीतेचं हरण करणाऱ्या रावणाबरोबर संघर्ष करून येथेच देह ठेवला होता.बंगलोरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर,पण आंध्र प्रदेशाच्या अनंतपूर जिल्ह्यात असलेलं हे मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.विजयनगर साम्राज्याच्या वीराण्णा आणि विरूपण्णा ह्या दोन सरदार भावंडांनी हे मंदिर बांधलेय.कूर्मशैल पठारावर म्हणजे कासवाच्या पाठीच्या आकाराच्या टेकडीवर बांधलेले हे मंदिर वीरभद्राचे आहे.सुमारे सव्वापाचशे वर्षं जुने हे मंदिर मात्र एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे.


सत्तर खांबांवर आधारलेल्या ह्या मंदिराचा एक खांब हा झुलता आहे..! अर्थात तो तसा वाटत नाही.जमिनीवर टेकलेलाच वाटतो.मात्र त्याच्या खालून पातळ कापड आरपार जाऊ शकते.वरती बघितलं तर त्याला बांधून ठेवणारी अशी कोणतीही रचना तेथे दिसत नाही.


बांधकामशास्त्रातल्या दिग्गजांना आणि शास्त्रज्ञांना सतावणारे हे गूढ आहे.हा खांब (स्तंभ) कोणत्याही आधाराविना झुलता कसा राहतोय हे कोणालाही सांगता येत नाही. इंग्रजांचे शासन असताना एका इंग्रज अभियंत्याने ह्या खांबावर बरेच उपद्व्याप करून बघितले.पण त्यालाही ह्या रचनेचे रहस्य शोधता आले नाही.


म्हणजेच पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत भारतात बांधकामशास्त्रातले हे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होते.पुढेही ते अनेक ठिकाणी दिसते. 


प्रतापगड आणि रायगड तर शिवाजींच्या काळातच बांधले गेले.पण इंग्रजांनी मुद्दाम केलेली पडझड सोडली तर आजही हे किल्ले बुलंद आहेत.


पण नंतर इंग्रजांनी आपले सिव्हील इंजिनिअरिंग भारतात आणले आणि 


स्थापत्य / बांधकामशास्त्रातील थोडेफार उरलेले भारतीय ग्रंथ बासनात गुंडाळले गेले आणि अडगळीत पडले.


भारतीय शिल्पशास्त्राचे (किंवा स्थापत्यशास्त्राचे) अठरा प्रमुख संहिताकार मानले जातात.ते म्हणजे भृगु,अत्री,वसिष्ठ,विश्वकर्मा,मय,नारद, नग्नजीत,

विशालाक्ष,पुरंदर,ब्रम्हा,कुमार,नंदिश, शौनक,

गर्ग,वासुदेव,अनिरुद्ध,शुक्र व बृहस्पती. या प्रत्येकाची शिल्पशास्त्रावरील स्वतंत्र अशी संहिता होती.मात्र आज फक्त मय,विश्वकर्मा,भृगु,नारद आणि कुमार यांच्याच संहिता उपलब्ध आहेत.अर्थात शिल्पशास्त्रातील एक तृतीयांशपेक्षाही कमी ज्ञान आज उपलब्ध आहे.इतर संहिता मिळाल्या तर कदाचित लेपाक्षी मंदिरातील झुलणाऱ्या खांबाच्या रहस्यासारखी इतर रहस्ये उघडकीला येतील.


भारतात उत्तरेकडून ज्या काळात मुसलमानांच्या आक्रमणांची तीव्रता वाढली,त्याच काळात, म्हणजे ११ व्या शतकात,माळव्याचा राजा भोज याने 'समरांगण सूत्रधार' हा ग्रंथ संकलित केला. यात ८३ अध्याय आहेत.आणि स्थापत्य - शास्त्रापासून ते यंत्रशास्त्रापर्यंत अनेक बाबींचे विस्तृत विवरण आहे.अगदी हायड्रोलिक शक्तीने टर्बाईन चालविण्याचा विधीही यात दिलेला आहे-


'धारा च जलभारश्च पायसो भ्रमणम तथा । यथेोच्छ्रायो यथाधिक्यम यथा निरन्ध्रतापिच । एवमादिनी भूजस्य जलजानीप्रचक्षते' ।। अध्याय ३१


अर्थात जलधारा वस्तूला फिरवते.आणि उंचावरून जलधारा पडली तर तिचा प्रभाव अधिक तीव्र असतो आणि तिच्या वेगाच्या आणि वस्तूच्या भाराच्या प्रमाणात वस्तू फिरते.


या समरांगण सूत्रधारावर युरोपमधे बरेच काम चालले आहे.मात्र आपल्या देशात या बाबतीत उदासीनताच दिसून येते.साधारण ८० च्या वर वय असलेल्या डॉ. प्रभाकर पांडुरंग आपटे यांनी या ग्रंथाचा चिकाटीने इंग्रजीत अनुवाद केला अन् पाश्चात्त्य जगाचे लक्ष या ग्रंथाकडे गेले.


हे असं स्थापत्यशास्त्रावरचं ज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणात अडगळीत पडलंय.त्याला बाहेर आणणं आवश्यक आहे.मंदिर स्थापत्यशास्त्र आणि मूर्तिकला या विषयांवर आपल्यापर्यंत झिरपत आलेलं साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचं 'भारतीय मूर्तिविज्ञान' या नावाचं अप्रतिम पुस्तक आहे.पण या विषयावर आजच्या काळात बरंच काम होणं आवश्यक आहे.


एकुणात काय,तर हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या ज्ञानाची कवाडं शोधणं आणि ती उघडणं याचाच हा सारा प्रवास आहे..!


२८ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग…

२८/१/२३

भारतीय स्थापत्यशास्त्र - १

जगातलं सर्वांत मोठं पूजास्थल कोणतं,असा प्रश्न विचारला की साधारणपणे त्याचं उत्तर हे व्हेटिकन सिटीमधलं एखादं चर्च / बेसिलिका किंवा स्पेनमधलं चर्च किंवा मस्कतची मशीद वा मक्का यांसारखी उत्तरं समोर येतात.पण जगातलं सर्वांत मोठं पूजास्थल हे हिंदूंचं मंदिर आहे हे अनेकांना माहीत नसतं.आणि हे मंदिर भारताबाहेरचं आहे ही माहिती तर बहुतेकांना नसतेच !


 कंबोडियाच्या उत्तर-पश्चिम सीमेवर असलेलं 'अंगकोर वाट' हे मंदिर म्हणजे जगातील सर्वांत मोठे पूजास्थल आहे.दक्षिणपूर्व आशियात 'वाट' चा अर्थ 'मंदिर' होतो.कित्येक मैल पसरलेल्या ह्या मंदिरात बांधलेली एक भिंतच मुळी साडेतीन किलोमीटर लांब आहे.मेरू पर्वताच्या प्रतिकृतीप्रमाणे बनविलेल्या ह्या मंदिराच्या आतील बांधकामाची लांबी-रुंदी दीड किलोमीटर बाय दीड किलोमीटर आहे.ह्या मंदिराचा एकूण परिसर चारशे चौरस किलोमीटर पसरलेला आहे.


ह्या मंदिराचं महत्त्व किती आहे? तर कंबोडियाच्या राष्ट्रध्वजात ह्या हिंदू मंदिराला जागा दिलेली आहे.हे मंदिर आपल्या देशाच्या हद्दीत रहावं म्हणून काही वर्षांपूर्वी कंबोडिया आणि थायलंड ह्या देशांमध्ये भलं मोठं युद्ध भडकणार होतं.युनेस्कोने ह्या मंदिराचा 'जागतिक वारशांच्या यादीत' समावेश केलेला आहे.आणि जगभरातल्या पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.


इसवी सन अकराशेच्या प्रारंभीच्या काळात ह्या मंदिराचे निर्माण झाले आणि अकराशेच्या मध्यावर ते पूर्ण झाले.त्या काळात हा प्रदेश 'कंबोज प्रांत' म्हणून ओळखला जात होता.


जावा,सुमात्रा,मलाया,सुवर्णद्वीप,सिंहपूर हा संपूर्ण प्रदेश हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली होता.कंबोजचा तत्कालीन राजा सूर्यवर्मा (द्वितीय) ने ह्या विष्णू मंदिराचे निर्माण केले. मुळात हे एक मंदिर नाही,तर हा मंदिरांचा समुच्चय आहे.संस्कृतमधे 'अंगकोर'चा अर्थ होतो - मंदिरांची नगरी.मंदिरांचा भव्य परिसर एका चौकोनी कालव्यामुळे किंवा खंदकामुळे सुरक्षित राहील अशी रचना केलेली आहे.ह्या खंदकावरचा पूल पार करून आपण मंदिरात प्रवेश करू लागलो की,एका एक हजार फूट रुंदीच्या,अक्षरशः भव्य-दिव्य अशा प्रवेशद्वाराने आपले स्वागत होते.ह्या मंदिरांच्या भिंतींवर रामायणातले प्रसंग कोरून ठेवलेले आहेत. समुद्रमंथनाचे अद्भुत दृश्य अनेक मूर्तीच्या मदतीने साकारलेले आहे.अंगकोरचे जुने नाव यशोधपुर होते.नंतर मात्र ह्या विशाल मंदिरांमुळे ते अंगकोर झाले.


ह्या मंदिराचे स्थापत्यशास्त्र आणि संपूर्ण मंदिर परिसराची रचना बघून मन थक्क होतं. 


सुमारे ९०० ते १,००० वर्षांपूर्वी इतके अचूक बांधकाम करणे त्या काळच्या हिंदू स्थापत्यकारांना कसे शक्य झाले असेल? ह्या मंदिराची केंद्रीय संरचना बघून हे अनुमान निश्चित काढता येतं की,त्या काळी मंदिर बांधण्यापूर्वी,ह्या मंदिर परिसराचे नकाशे काढले गेले असतील.त्यात 'सिमेट्री' साधली गेली असेल,अन् त्याप्रमाणेच नंतर निर्माणकार्य झाले असेल.इजिप्त आणि मेक्सिकोच्या स्टेप-पिरामिडप्रमाणे ही मंदिरं,जिन्यांच्या पायऱ्यांवर उठत गेली आहेत.ह्या मंदिरांवर पूर्णपणे चोल आणि गुप्तकालीन स्थापत्यशास्त्राचा प्रभाव जाणवतो.विशेषतः रामायणाचे प्रसंग ज्या नजाकतीनं दाखविले आहेत,ते बघून आपल्याला आश्चर्याचे धक्के बसत राहतात.


दुर्दैवाचा भाग इतकाच की ज्या देशाच्या राष्ट्रध्वजात जगातले सर्वांत मोठे हिंदू मंदिर आहे,त्या देशाशी भारताने आजवर कसे संबंध ठेवले ? तर अगदीच कोरडे.हे जगप्रसिद्ध मंदिर बघायला जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात.पण त्यात भारतीय पर्यटकांची संख्या अक्षरशः नगण्य असते.पण मूळ मुद्दा तसाच राहतो,तो असा की भारतीय (किंवा त्या काळात म्हटल्या गेल्याप्रमाणे हिंदू) स्थापत्यशास्त्राची ही कमाल भारताबाहेर प्रकटली तरी तिचे मूळ किती जुने आहे...? म्हणजे स्थापत्यशास्त्रात आपण भारतीय किती काळापासून पुढारलेले आहोत ?


भारतातील अनेक देवळे विदेशी आक्रमकांनी आणि विशेषतः मुस्लीम आक्रमकांनी नष्ट केली. त्यामुळे दोन / तीन हजार वर्षांपूर्वीची स्थापत्यकला आपल्याकडे दिसणं हे तसे दुर्मीळच.मात्र त्या कलेचे अंश झिरपत आलेले आहेत.


त्यामुळे अगदी हजार / दीड हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या देवळांमध्येही स्थापत्यशास्त्राचे अद्भुत चमत्कार दिसतात.विजयनगर साम्राज्याची राजधानी 'हम्पी'ला होती.या साम्राज्याला तीन मुसलमान पातशाह्यांनी मिळून पराभूत केल्यानंतर त्या सर्वांनी ह्या समृद्ध हिंदू साम्राज्याला मनसोक्त लुटले.अनेक मंदिर फोडली,नष्ट केली.मात्र जी काही उरली ती आजही स्थापत्यशास्त्राच्या अद्भुत खुणा मिरवताहेत.


हम्पीच्या एका मंदिरात प्रत्येक खांबामधून संगीताचे सा, रे, ग, म. असे वेगवेगळे सप्तसूर निघतात. 


हे त्यांनी कसं केलं असेल ? यासंबंधी काहीही लिहून ठेवलेलं नाही.असेल तरी ते आक्रमकांनी नष्ट केलंय.इंग्रजांनी ह्या स्थापत्य चमत्काराचे गूढ शोधण्यासाठी त्या संगीतमय सुरावटीतला एक खांब कापला (त्याचा क्रॉस सेक्शन घेतला). तो खांब पूर्ण भरीव निघाला..! त्याला बघून इंग्रजांचंही डोकं चालेना.अगदी एकसारख्या दिसणाऱ्या खांबांमधून संगीताचे वेगवेगळे सूर कसे उमटत असतील ? जगाच्या पाठीवर भारत सोडून इतरत्र कोठेही ही अशी खांबांमधून उमटणाऱ्या स्वरांची गंमत आढळत नाही.


फक्त इतकंच नाही,तर भारतातलं एकेक मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचं एक एक बुलंद उदाहरण आहे.ह्या मंदिरांचा वास्तुविशारद कोण, बांधकाम- प्रमुख कोण होता,ही मंदिरं कशी बांधली,ह्या सर्वांबद्दल काही म्हणता काहीही माहिती मिळत नाही.


मंदिरातील स्थापत्यशास्त्राविषयी आणि त्यातील विज्ञानाविषयी तसं अनेकांनी लिहिलंय.पण पुण्याच्या श्री. मोरेश्वर कुंटे आणि सौ. विजया कुंटे ह्या दम्पतीने दुचाकीवर फिरत महाराष्ट्राच्या अनेक दुर्लक्षित आणि उपेक्षित मंदिरांमधील 'स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आणि विज्ञानाचे अधिष्ठान'उजेडात आणले आहे.


ग्रीनविच ही पृथ्वीची मध्य रेषा आहे असे इंग्रजांनी ठरविण्याच्या बरेच आधी भारतीयांनी पृथ्वीचे अक्षांश/ रेखांश आणि मध्यरेषा यांची व्यवस्थित कल्पना केलेली होती.ती मध्यरेषा तेव्हाच्या 'वत्सगुल्म' (म्हणजे आताच्या वाशीम) मधील मध्येश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीतून जाणारी हीच रेषा पुढे उज्जयिनीत जात होती, जिथे मोठी वेधशाळा बांधण्यात आली.आजही उज्जैन आणि वाशीम हे एका सरळ रेषेत येतात. 


कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात विशिष्ट दिवशी सूर्याच्या किरणांचा प्रकाश सरळ देवीच्या मूर्तीवर पडतो हेही ह्या स्थापत्यशास्त्राच्या परफेक्शनचं उदाहरण.


स्थापत्यशास्त्रात आपण किती पुढारलेले होतो? तर ज्या काळात कम्बोडियात अंगकोर मंदिर बांधलं जात होत,त्याच काळात चीनच्या बीजिंग ह्या राजधानीची नगररचना एक हिंदू स्थापत्यशास्त्री करत होता..! होय,बीजिंग शहराचं आर्किटेक्ट हे एका हिंदू माणसाचं आहे. त्याचं नाव बलबाहू.सध्या नेपाळमधे असणाऱ्या पाटणचा हा रहिवासी.


पाटण हे कांस्य आणि इतर धातूंच्या ओतकामाबद्दल प्रसिद्ध होतं.या शहरातील लोकांनी घडविलेल्या बुद्ध आणि हिंदू मूर्तीना तिबेट आणि चीनमधे मागणी होती.बाराव्या शतकाच्या मध्यावर चिनी राजाने केलेल्या मदतीच्या विनंतीला मान देऊन पाटणमधील ऐंशी कुशल कामगार चीनकडे निघाले.त्यांचं नेतृत्व करत होता,बलबाहू,जो तेव्हा फक्त १७ वर्षांचा होता.


पुढे चीनमधे बलबाहूचे आरेखन आणि बांधणीतले कौशल्य बघून चीनच्या राजाने त्याला बीजिंग शहराची रचना करण्याचे काम दिले. बलबाहूने ते सफलतापूर्वक करून दाखवले. 


चिनी संस्कृतीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या, उतरत्या टोकदार,डौलदार व एकाखाली एक छपरांची परंपरा बलबाहूनेच सुरू केली.

चीनमधे बलबाहू 'आर्निको' नावाने ओळखला जातो. चिनी शासनाने १ मे सन २००२ मधे बलबाहू (आर्निको) च्या नगररचनेमधील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून बीजिंगमधे त्याचा मोठा पुतळा उभारलाय.


२६ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..