* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२१/३/२५

पातीवरल्या बाया / Ladies on the floor

सरतेशेवटी सगळे मरणारच असले तरी 'जिंदगी बडी होनी चाहिये,लंबी नहीं। - मुसानियस रूफस


मनाचा समतोल साधणारा काव्यसंग्रह पातीवरल्या बाया


'डू इट टुडे'आजचं काम आजच करा आजचं काम आजच करा या पुस्तकात डारियस फरु आपल्या वैयक्तिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.या बाबत म्हणतात.


" वुहू! मी माझं कॉलेज पूर्ण केलं.व त्या जुन्या पुस्तकांना कायमचा टाटा ! "


तुम्ही असं म्हणणाऱ्यांपैकी असाल,तर तुमचं वय कितीही असो,

तुम्ही मूर्ख आहात! एकच गोष्ट शिकून कोणीही शिक्षण कायमचं थांबवेल का? आपल्या डोक्यात ही कल्पना कोणी घालून दिली,

हेही मला कळत नाही.मी नेहमी असा विचार करायचो,की शाळा संपली की शिक्षणही संपतं.पण,जेव्हा तुमचं शिक्षण थांबतं,तेव्हा आयुष्यही थांबतं,हे सत्य आहे.


हा संदर्भ या ठिकाणी येण्यासाठीचे कारणही तसे खास आहे.


माझ्या लाडक्या मित्राचा व माझ्यासाठी जिवाभावाचा असणारा काव्यसंग्रह पातीवरल्या बाया.. चला मग जाणून घेऊया याबद्दल..!


मित्र म्हणून जीवनाच्या एका वळणावरती माधव गव्हाणे यांच्यामुळे मनातील एक हळवा कप्पा बनलेले कवी सचिन शिंदे,तसा कवितेचा आणि माझा दूरचा संबंध..पण कमी जागेमध्ये समजून सांगण्याचा कवितेचा आवाका खूप मोठा असतो.सचिन सरांमुळे कविता मागील कविता मला समजायला लागली.वारंवार भेटी होत गेल्या,कविता कशी तयार होते, कवितेचे प्रकार यावर आमच्या भरपूर चर्चा व्हायच्या.या सुसंवादातून कवी हळूहळू समजत गेला आणि कळत नकळत मला कविता कधी समजायला लागली हेच कळालं नाही.


प्रत्येकाला कोणी ना कोणी बनायचं आहे किंवा बनवायचं आहे.हे सर्व बनत असताना आपण वाचक बनलो पाहिजे हे फार कमीजणांना वाटतं.या फार कमी मधला मी एक.. एक वेळ जेवण नाही मिळाला तरी चालेल तुमचं शरीर तुम्हाला जिवंत ठेवू शकतं,पण जर तुम्ही अर्धा तास दररोज वाचन नाही केलं तर या जगापासून तुम्ही दहा वर्षे मागे जाल.इतकं जग झपाट्याने बदलत आहे.जवळजवळ एक वर्ष होत आले.पातीवरल्या बाया या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मला सन्मानित आग्रहाचे निमंत्रण होतं.वाचकाला केंद्रबिंदू ठेवून वाचकांसाठी जागा रिकामी ठेवणारा हा माझ्या आयुष्यातील एकमेव असा कवी लेखक आहे.


मी अनेक विद्वानांसोबत असतो अनेक पुस्तक वाचलेली आहेत.व यातून मला जे सत्य समजलं ते फक्त एका ओळीचं आहे.ते म्हणजे मी अज्ञानी आहे..


ल्युसियस ॲनियस सेनेका निरो सम्राटाचा सल्लागार याने हे अतिशय छान सांगितले आहे.


अखेरीस तुम्ही ज्ञानाचा वापर करा अथवा नका करू,ज्ञान हा जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग आहे.तुम्हाला त्यामुळे ऊर्जा मिळते आणि तुमचं आयुष्य बदलत.चांगलं काय असतं?जीवनाच ज्ञान.वाईट काय असतं?जीवनाबद्दलचं अज्ञान.जीवनाबद्दल ज्ञान असणं, पुस्तकातून,लेखातून आणि त्याच मार्गावरून चालणाऱ्या लोकांशी परस्पर संवाद करून त्यातून ज्ञान मिळवणं.


पातीवरल्या बाया हा काव्यसंग्रह,अष्टगंध प्रकाशनचा ६९ कवितांचा व ११२ पानांचा भरगच्च कवितांचा सदाबहार संवेदनशील मानवी मनाचा नजराणा,माणूस म्हणून विचार करायला लावणारा आहे.


 भरगच्च कवितांचा सदाबहार संवेदनशील मानवी मनाचा नजराणा,माणूस म्हणून विचार करायला लावणारा आहे.नदी आणि पुराच्या कविता,गुरांच्या आणि दुष्काळाच्या कविता,बाईच्या कविता,गावशिवाराच्या कविता,अवांतर कविता या विभागात असणाऱ्या या कविता काहीतरी सांगत आहेत.


जे आपल्याला माहित आहे,पण धावपळीच्या या जगात त्यावर साठलेली धुळ झटकण्याचे काम हा काव्य संग्रह अगदी डौलाने करीत आहे.मनोज बोरगावकर यांचा पाठिवर असणार हात मलपृष्ठावर उठून दिसतो आहे.ज्यांनी बाई पूर्णपणे जाणलेली आहे,याउलट ज्यांच्या आत मध्ये बाईचं एक हळवं मन आहे.असे किरण येले यांची प्रस्तावना या कवितेतील अस्सलपणा निदर्शनास आणते. प्रस्तावनेमुळेच हा काव्यसंग्रह वजनदार झालेला आहे.


नदी वाहे वळणाने,दु:ख घेत उदरात

गाव निजते खुशाल,दान घेते पदरात 


नदी या कवितेतील ओळी माणूस आणि नदी यांचे सनातन नाते उलगडून दाखवते.फार पूर्वीपासून सगळी माणसं नदीकिनारी राहत असायचीत.त्यांना नदी व आपलं नातं कळालं होतं.कारण त्यांनी थोडी थोडी नदी वाचली होती.


खोल डोहाच्या तळाशी,दिशे शिंपल्यांचा खच

पाय ठेवून पाण्यात,थोडी थोडी नदी वाच


अपेक्षांवर फिरलेलं पुराचं पाणी २००५ च्या महापुराची आठवण करून देणारा ठरलं.ही कविता त्यावेळेला घडलेल्या घटनेच्या वास्तवाचं प्रतिबिंब आहे.


अविरत वाळूचा उपसा चालू असायचा..नदीच्या गाभ्यापर्यंत जखम करणारा! 'किती खोलवर इजा होत असेल नदीला!ॲबॉर्शनमुळे स्त्रीला होणार्‍या इजेसारखीच!' आपल्यालाही स्त्रीच्या गर्भापर्यंत जाता आले,पण गाभ्यापर्यंत कुठे जाता आले ? स्त्रीच्या उदरात राहता आले, पण तिच्या काळजापर्यंत कुठे पोहोचता आले? म्हणूनच वाटते आपल्यासाठी आई असते कलेजाचा तुकडा,पण आईसाठी मात्र आपणच अख्खे काळीज!एवढाच काय काळजीभर फरक आपल्या अन् आईच्या प्रेमात होमोओपॅथीतले 'सिलिका'हे औषध वाळूपासूनच तयार होते.निष्णात सर्जनचे हात देखिल जिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचून हे औषध काम करते. काय गुणधर्म असतील या नदीचे..! ' नदीष्ट ' मनोज बोरगावकर यांनी लिहिलेल्या कांदबरीतील या नोंदी माझ्या समोर उभ्या झाल्या.'पातीवरल्या बाया' मधील शेवटची नदीची कविता वाचली आणि मला पुन्हा आठवण  झाली.त्या 'नदी किनारी असणाऱ्या बहात्तर पायऱ्यांची ज्यांनी अजूनही माणुसकी जोडलेली आहे.' 


नदी म्हणजेच निसर्गाचा अविभाज्य श्वास..या संदर्भात काही थोर लोकांचे थोर विचारू पाहू..


निसर्गात जीवांची संख्या इतकी प्रचंड व अद्भुत आहे की या भुकेच्या यज्ञात अनेक जीवांची आहुती देण्यास त्याला सहज परवडते.एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो आणि तो अजून कुठल्यातरी.पण या पृथ्वीतलावर जे अपघात व युद्ध होतात त्याच्या तुलनेत याचे महत्व अल्प (किंवा जास्त ) असावे.सुज्ञ माणूस या सगळ्याला निसर्गाचा निरागसपणा समजतो.औषधांमध्ये विषांचाही काही उपयोग असतो आणि सर्व जखमांमुळे मृत्यू ओढवत नाही हेही समजून घेतले पाहिजे.अनुकंपेचा पाया बऱ्याच वेळा अस्थिर असतो त्यामुळे त्यावर अवलंबून किती निर्णय घ्यायचे याचा निर्णय एखाद्याला घ्यावा लागतो.अनुकंपा आणि दया हे त्यांच्या जागी ठीक आहेत.आपण एखाद्याच्या मृत्यूबद्दल शोक करू शकतो पण मृत्यू' वर आपण प्रेमच केले पाहिजे..! 


प्रयत्न केले तर आपण आपल्या स्वतःचा कडेच एका त्रयस्थ पण निरोगी नजरेने पाहू शकतो. थोडेसे अजून प्रयत्न केले तर आपले कर्म आणि त्यापासून मिळणारे फळ या दोन्ही पासून आपण अलिप्त राहू शकतो. तसेच झाले की चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपण निर्विकारपणे पाहू शकतो.आपण निसर्गाशी पूर्ण एकरूप होत नाही. नाहीतर मी खाली ओढ्यात वाहणारी एखादी काटकी असलो काय किंवा वरून त्या काटकीकडे पाहणारा,पाऊस पाडणारा इंद्र असलो काय,काहीच फरक पडत नाही.


 'वॉल्डन' हेन्री डेव्हिड थोरो यांच्या पुस्तकातील हा उतारा जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देतो.


हंगामी नदीचा कोपरान् कोपरा

हिंडतात बाया पाणी पाणी म्हणत

कधी रिकाम्या भांड्यासह परततात घरी

तरीही आटलेल्या नदीची खंत न करता

स्वतःच वाहतात अखंडपणे खळाळत

एखादी नदी होऊन

वाळूत चालणाऱ्या बाया


बाया नदी होतात ही कविता भरमसाठ पाण्याचा अस्ताव्यस्त अविचारपणे वापर करणाऱ्या लोकांना जल जीवन है,जल है तो कल है.. या तत्त्वांची गंभीरपणे आठवण करून देणारी आहे.

भूगर्भातील संपत आलेलं पाणी हे तुम्हाला येणाऱ्या दुष्काळाची जाणीव करून देत आहे.माणूस वेळेत सावध नाही झाला तर पाणी पाणी म्हणून आपला अंत निश्चित आहे.हे विसरू नये हे सत्य वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे.


बाई सुपारीच खांड,दोहो बाजूंनी चेंदते

बाई अंतरीचा धागा,मनामनाला सांधते


बाई राबणारे कर,सदा सृजनाचा मळा

कापे सरसर दु:ख,बाई धारधार विळा


बाई ही कविता शेवटी पुरुषाची शाश्वत उध्दारकर्ती स्त्रीच होय.हेच सांगत आहे.


संसाराची पीडा

वेदनेचा हातोडा

असह्य झाल्यावर

बाई जवळ करते नदीला


बाईला पोटात सांभाळून घेतल्यास दुःख 

भाळावर गोंदवून घेते नदी ही स्वतःच्या 

अन् वाहत राहते अखंड

 एक जखम घेऊन 

अश्वत्थाम्यासारखी भळभळणारी


कवी सचिन शिंदे या़ंची जखम ही कविता वाचली अन् अश्वत्थामाची भळभळणारी जखम बाईच्या जखमेपेक्षा कमीच वाटली.


बाई ग,एक लक्षात ठेव चालताना रस्त्यालगतच्या दुकानातून खूप साड्या मांडलेल्या दिसतात.त्यांतल्या काही साड्या आवडतातही आपल्याला.पण म्हणून त्या सगळ्या घेत गेलो तर घराचाच बाजार होऊन जाईल! एवढ्या वर्षांत तू जे शिकलीस ते तू सांगितलंस...

आता एवढ्या वर्षांत मी जे शिकले ते तुला सांगते, नीट ऐक आयुष्य हे असंच असतं बये.मनाची एक मागणी पूर्ण केली की दुसरी उगवणारच कुत्र्याच्या छत्रीसारखी कुठेही,कशीही.मन लहान मुलासारखं असतं.त्याला आवडेल ते मागत राहणार,हट्ट करणारच लहान मुलासारखं.कारण त्याला माहीत नसतं आईसक्रीम खाल्ल्यानं पडसं होतं,चॉकलेट खाल्ल्यानं दात किडतात.मनाला आपण समजावायला हवं की,आयुष्यात खूप गोष्टी दिसताक्षणी आवडतात,पण जवळ केल्यावर त्याचे परिणाम वाईट होतात. आणि प्रवाहीपणाचं म्हणशील तर सगळ्या गोष्टी त्या त्या परिघातच बदलतात.म्हणजे बदलायचं म्हणून चंद्र,सूर्य,तारे आकाश सोडून समुद्रात प्रकाशत नाहीत.फक्त जागा बदलत राहतात आकाशातच.बदलायचं म्हणून पृथ्वी उलटी फिरू नाही लागली कधी एवढ्या वर्षांत.फक्त कोन बदलत राहिली.झाडं जमिनीऐवजी आकाशात उगवली नाहीत कधी बदलायचं म्हणून.म्हणे प्रवाही असायला हवं!"असं म्हणत ती निघाली. बाई ग... आपण आपल्यावर वार होतो तीच बाजू जोजवत बसतो कायम.छातीवर वार झाला की तीच जागा दाखवत राहतो आणि पाठ विसरूनच जातो.उजव्या हातावर झाला तर डावा हात विरसतो.डावा डोळा जखमी झाला तर उजवा डोळा विसरतो.तेव्हा प्रत्येक गोष्टीला दुसरीही बाजू असते हे लक्षात ठेव.


आपण सगळेच आपल्याला समजतो तसे नसतो.आपल्या सगळ्यांचंच आतलं रुप वेगळं असतं.एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे गेल्यावरच ते आपल्याला कळतं.मोराची बायको किरण येले.


गावाकडच्या पोरी या कवितेतील खालील ओळी..


माहेराला कवेत घेणाऱ्या 

गावाकडच्या हासऱ्या कोवळ्या पोरी 

कधी बाया होतात कळतच नाही.


एकदा कोल्हापूरला सचिन शिंदे सर व पांढरा शुभ्र काळोख या काव्यसंग्रहाचे निर्माते कवी संतोष शेळके घरी आले होते.तेव्हा सचिन सर आमच्या सौ.ला माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले होते.विजय गायकवाड म्हणजे पदराला बांधलेला जणू विस्तवच..


नाही मायबाप दारी

ओस उंबरा पडतो

सूनसान घर सारे

कसा माणूस कुढतो


ओल मनाची सुकता

नाते कोसळत जाते

माया दुभंगते वेडी 

गाव ढासळत जाते.


गाव ढासळत जाते.ही कविता काय धरायला हवं आणि काय सोडायला हवं याचा फरक स्पष्ट करते.आत्ता चाललेल्या जगामध्ये आपली भूमिका कितपत आहे. याच प्रमाणही ही कविता सांगते.


साधुसंतांनी सांगितलेला विठ्ठल या काव्यसंग्रहामध्ये पान ९३ वर आपली वाट बघतो आहे.


ओल


मृगाचा पहिला पाऊस

पडून गेला की

गळक्या घराचा अंदाज येतो

उन्हाचे कवडसे

छप्पराच्या फटीतून

आत झिरपत राहतात


घरावरची छपरं अन्

अंगावरची कापडं सारखीच

गळकी काय नि फाटकी काय

धापा टाकतं दमलेलं घर

त्याच्याही मनात एक सलते 

सल

अन् पावसाळ्यात

भिताडातून घरात शिरते 

ओल


ही ओळ प्रत्येकाच्या ओळखीची आहे..खर ना ?


हा काव्यसंग्रह वाचून हातावेगळा केला.आणि चिंतन करीत बसलो….


तुम्ही जहाजांनं प्रवास करताना किनाऱ्यावर जाऊ शकता,तिथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता, शंखशिंपले वेचू शकता किंवा फुले वेचू शकता.पण तुम्हाला जेव्हा जहाजावर परत बोलावलं जात,तेव्हा तुम्हाला गोळा केलेला सगळ्या वस्तू तिथंच टाकून घाईनं परत जावं लागतं,नाहीतर जहाज तुम्हाला सोडून निघून जाईल.एपिक्टेटस


विजय गायकवाड - मॅट्रिक फेल


केवळ अभ्यासापूर्ता अभ्यास करणे हे स्वतःलाच फसविल्यासारखे होय,असं मत व्यक्त करीत समीक्षेची सुरुवात केली आहे. 


त्यातूनच शिकणं किती महत्त्वाचं आहे हेही अधोरेखित होतं.दुसरं म्हणजे कमी शब्दात मोठा अर्थ सांगणार्‍या कविता कशा लिहायच्या,त्याचे प्रकार काय आहेत,याबद्दल सचिन शिंदे या कवींसोबत झालेली चर्चा महत्त्वाची आहे.कारण, काहीही करायचे ठरविले,तर त्याला वाचनाची गोडी आणि सातत्यही आवश्यक आहे. 


याबद्दलही केलेला ऊहापोह वाचनाची जोड किती महत्त्वाची आहे,हे यातून ठळक होते.त्यासाठी एक वेळ जेवण नसले तरी चालेल;पण वाचन नसेल तर तुम्ही जगापासून दहा वर्षे मागे जाल,असे समीक्षकाला ठामपणे सांगायचं आहे.


मी अनेक विद्वानांसोबत असतो खूप विषय वाचले आहेत पण यातून जे सत्य समजलं ते म्हणजे मी अज्ञानी आहे,हे वाक्य मात्र गोंधळात टाकणार असले तरी त्याला अर्थ आहे


 निरो सम्राटाच्या सल्लागाराने सांगितलेल्या एका तत्त्वज्ञानाचा उल्लेख इथे आवश्यक वाटला.तो म्हणतो की,'ज्ञान तुमचे ऊर्जास्रोत आहे.त्याचबरोबर ते आयुष्यात बदल घडवून आणते. सकारात्मक जीवन घडवतं.' ज्यानिमित्त समीक्षा लिहिली आहे तो विषय आहे 'पातीवरल्या बाया' हा काव्यसंग्रह.हा काव्यसंग्रह सर्वच दृष्टिकोनातून बहारदार आहे.तसेच तो विचार करायला लावणारा आहे.यामध्ये नदी आणि पुराच्या कविता,गुरांच्या आणि दुष्काळाच्या कवितांचा समावेश आहे. त्यामुळे हा कवितासंग्रह निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणार आहे,असे समीक्षकाचे मत आहे. स्त्रीविषयी या कवितासंग्रहात केलेला ऊहापोह तिचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे हे दर्शवितो.

विशेष म्हणजे यामध्ये स्त्रीला जीवन जगताना कशाला महत्त्व दिले पाहिजे,हे अधोरेखित केले आहे.या कवितासंग्रहातून गावाकडच्या हसर्‍या कोवळ्या पोरी कधी बाया होतात कळत नाही,हे वास्तव दर्शविले आहे.मॅट्रिक फेल विजय गायकवाड यांच्या अभ्यासू आणि त्रयस्थ नजरेतून साकारलेले समीक्षण सत्यतेकडे नेते हे मात्र नक्की.


*** - भरत बुटाले ('लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.


प्रिय साहेब

कवी मित्र सचिन शिंदे यांच्या 'पातीवरल्या बाया ' या काव्यसंग्रहावर केलेले भाष्य आवडले. पातीवरल्या बाया या कवितासंग्रहातून सचिन सरांनी स्त्री ,नदी, गाव ,शेतकरी आणि शेती यांचे परस्पर संबंध अनंत काळापासून  कसे आहेत हे  कसदारपणे मांडले आहे.आजरोजी गावगाड्यातील सर्व मूलभूत घटकांचे  बदलत गेलेल्या मानवाच्या वृत्तीमुळे झालेली स्थिती सुद्धा सचिन यांनी कवितेच्या माध्यमातून सक्षमपणे वाचकांच्या समोर मांडली आहे. कविता संग्रह वाचताना वाचक शब्दांच्या नदीतून लयदार बोटीत बसून प्रवास करत जातो. प्रवास करताना त्याला नदी ,बाई, शेती, मातीने सहन केलेले दुःख, जीवन जगण्याची चिकाटी, संकटांशी केलेले दोन हात, पुढे पुढे जात राहण्यासाठीची जिद्द अशा महत्त्वपूर्ण किनाऱ्यावरील ठिकाणांना वाचक भेट देत पुढे जात राहतो. तुम्ही सचिन यांची कविता समजून घेतली आहे. समजून घेताना या कवितेला वैश्विक पातळीवरच्या विचारवंतांच्या चिंतनातून पडताळून पाहिल्याचे लेखातून दिसून येते. कवी सचिन यांच्या कवितेला तुम्ही सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन हा गुणवंत माणूस असल्यामुळेच तो कविताही चांगली लिहितो. चांगला माणूस होता आलं की चांगलं लिहिता येतं हे सचिनकडे पाहून वाटत राहतं. त्यांची कविता सर्वांना आवडतेय म्हणून पातीवरल्या बाया घराघरात जाऊन बसलेल्या दिसून येत आहेत. तुमच्या  चिंतनामुळे कवितेला अजून साज चढला आहे. 

    थोडसं तुमच्याविषयी... तुम्ही उत्तम वाचक आहात हे या लेखातून दिसून येते. मला असं वाटते की तुम्ही मॅट्रिक फेल न लिहिता फक्त विजय गायकवाड इतकं लिहिलं तरीही पुरेसं आहे.तुमच्या ,वागण्या - बोलण्यातून, वाचनातून - लिखाणातून तुम्ही खूप पुढचे आहातच. तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरक आहात.  हा शेर कुणाचा आहे माहिती नाही पण हा तुमच्यासारख्याकडे पाहूनच लिहिला असावा असे वाटते...


डिग्रियां तो तालीम के खर्चों की रसीदें हैं,

 इल्म तो वह है जो किरदार में झलकता है।


प्रिय मित्र सचिन यांच्या पातीवरल्या बाया या कवितासंग्रहाचे खूप कौतुक वाटते.एका गुणवान शिक्षकाला, चांगल्या कवीला आणि माणुसकी जपणाऱ्या  माणसाला माझ्याकडून मनःपूर्वक सदिच्छा.


सॉक्रेटिस... माधव गव्हाणे...


प्रिय विजयजी,


तुमच्या लेखणीचा अनुभव घेताना प्रत्येक वेळी एक वेगळीच अनुभूती मिळते." पातीवरल्या बाया " या कवितासंग्रहावर तुम्ही लिहिलेली समीक्षा वाचली आणि नकळतपणे माझं मन त्या शब्दांमध्ये गुंतत गेलं.तुमच्या शब्दशैलीत एक विलक्षण सहजता आहे,जी थेट वाचकाच्या मनाशी संवाद साधते.

तुमच्या लेखणीत केवळ शब्द नसतात,तर त्या शब्दांतून अनुभव,विचार, आणि संवेदना यांचं सुरेख मिश्रण असतं.


तुमच्या या लेखनात ग्रामीण जीवनाचा,विशेषतः स्त्रीजीवनाच्या संघर्षाचा आणि त्यातील बहराच्या क्षणांचा सुंदर आलेख उमटला आहे.स्त्री म्हणजे केवळ एक भूमिका नाही,तर तिच्या अस्तित्वाचा व्यापक पैलू तुमच्या मांडणीत दिसतो.तुम्ही केवळ कवितांचा आस्वाद घेतला नाही,तर त्या कवितांतून उमटणाऱ्या भावनांना, विचारांना,आणि वास्तवाला एका नव्या दृष्टीकोनातून मांडलं आहे.


तुमच्या लेखनाची जादू अशी आहे की,वाचक जणू त्या कवितांच्या भावविश्वात स्वतःला हरवून बसतो. कवितांचा अर्थ शोधताना तुम्ही त्यातील प्रत्येक शब्दाचा संदर्भ समाजजीवनाशी जोडला आहे,हे विशेष कौतुकास्पद आहे.तुमच्या लेखणीतून फक्त समीक्षा होत नाही,तर त्या कवितांचं सजीव चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.


" शाळा सोडली तरी शिक्षण संपत नाही" हे तुमचं म्हणणं केवळ एक विचार नाही,तर जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे,तर आयुष्यातील अनुभव,निरीक्षणं आणि चिंतन हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं,हे तुमच्या लेखणीतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं."


विजयजी,तुमचं लेखन हे केवळ शब्दांचा खेळ नाही,तर ते विचारांना चालना देणारं,अंतर्मुख करणारं,आणि मनाला समृद्ध करणारं आहे.तुमच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे तुम्ही केवळ कवितांचं रसग्रहण केलेलं नाही,तर त्या कवितांच्या मुळाशी जाऊन त्यातील आशय उलगडला आहे.तुमच्या शब्दांनी वाचकाच्या मनात विचारांची नवी पालवी फुटते,त्याला नवा दृष्टिकोन मिळतो,आणि कधी कधी तो स्वतःच्या अनुभवांशी त्या शब्दांना जोडतो. हीच तर तुमच्या लेखणीची ताकद आहे.


तुमच्या पुढील लेखनप्रवासाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!असेच विचारप्रवर्तक लेख आणि समीक्षा लिहीत राहा.तुमच्या शब्दांनी आमच्या विचारविश्वात नवी उमेद निर्माण होत राहो!


आपला मित्र,

विष्णू बाबासाहेब गाडेकर

रायपुर,जि.परभणी


कवी सचिन शिंदे यांच्या 'पातीवरल्या बाया' हा काव्यसंग्रह आमचे मित्र विजय गायकवाड साहेब यांनी वाचला आणि आज मला पहाटे सहाच्या दरम्यान संपर्क साधून या काव्यसंग्रहावर दोन-चार ओळी तुम्ही लिहा अशी विनंती केली.मी लागलीच त्यांना हो म्हणालो.कारण विजय गायकवाड साहेब आमचे केवळ मित्र नसून मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत. 'पातीवरल्या बाया' या काव्यसंग्रहावर विजयजी गायकवाड साहेबांनी जे छोटेखानी लिखाण लिहिलेले ते मी वाचले आणि त्यावरुन मला या काव्यसंग्रहातील ज्या कविता आहेत त्या कवितांची बरीच ओळख झाली बाई म्हणजे पुरुषांपेक्षा अनेक पट ऊर्जा असलेली परंतु नम्र आणि सोशिक बनलेली महिला असं तिचं वर्णन आहे.सोशिक महिला न बोलता,न थकता,न कंटाळता,न थांबता निरंतर काम करत राहणारी ही महिला पाण्यासाठी वणवण भटकणारी महिला बाई पणाचं एक मुर्तीमंत उदाहरण आहे.ही बाई अनेक कष्ट सोसते पण बोलत तर काहीच नाही,याविषयी तक्रार करत नाही.


नम्रपणे,निमूटपणे आपलं कार्य अगदी रेखीवपणे अत्यंत साचेबद्ध पद्धतीने करणारी महिला म्हणजेच बाई.बाई हा शब्द शिक्षिकेला अत्यंत आदराने वापरला जातो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अनेक पट ऊर्जा असते. या ऊर्जेचा वापर जर कौशल्याने बाई करते हे अतिशय कमी शब्दांमध्ये या काव्यसंग्रहात सांगितले आहे. बाईपणाचे सोस,बाईपणाचे कष्ट देखील या काव्यसंग्रहात सांगितले आहे,मांडलेले आहेत हे वाचताना बाई किती व्यस्त असुन तरीही ती संयतपणे सर्व परिस्थिती हाताळते हे समजून येते. पण समजून कोण घेणार? हा प्रश्न आहे. हे बाईपण समजून घ्यायला हवं...

बाईपणाला माझा त्रिवार मानाचा मुजरा. बाईसाहेबांना ग्रेट सॅल्युट.

🙏🏻🍁🌺🌷✍🏻

आपला स्नेहांकित,

श्री.शितल मिराबाई विठ्ठल खाडे,


आदरणीय स्नेही विजय गायकवाड सर 

सस्नेह नमस्कार !


पातीवरल्या बाया या कवितासंग्रहाच्या वर्षपूर्ती निमित्त आज आपण आपल्या चिंतनशील विचारशैलीतून प्रदीर्घ आस्वादक समीक्षा केलेली आहे.सदर पातीवरल्या बाया बद्दल नोंदवलेले निरीक्षणात्मक टिपण अत्यंत अभ्यासपूर्ण,वस्तुनिष्ठ आणि आशयाला अनुसरून तर आहेच मात्र आपल्यावर असलेल्या पश्चिमात्य साहित्य लेखकाचा आणि वाचनाचा प्रभाव इथे जाणवत आहे,म्हणून कविता हा प्रांत आपल्यासारख्या वाचनवेड्या माणसाला नव्या जाणीवाची अनुभूती देणारा असला तरी आपण मात्र कवितेच्या गाभ्यापर्यंत पोहोचलेला आहात.हेही तितकेच खरे !


लेखक पुस्तक लिहितो तेव्हा ते अपूर्ण आणि अर्धे असते मात्र वाचक जेव्हा त्या पुस्तकाला वाचतो तेव्हा ते खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाते.या आपल्या वाक्याने मला नेहमीच प्रभावित केलेलं आहे.ज्या भावनेनं लेखकाने आणि कवीने पुस्तक लिहिले आहे,

त्या भावनेनेच जर का वाचकाने ते वाचले तरच ते काळजात उतरते.ही आपली भावना पातीवरल्या बाया बाबत तंतोतंत लागू पडते इतके एकरूप होऊन या कवितासंग्रहावर भाष्य केलेलं आहे.आपल्यासारख्या पश्चिमात्य साहित्यवेड्या माणसाने मराठी कवितेची वाट चालावी आणि तिचे अनेक दुवे समजून घ्यावे हे माझ्यासाठी फार फार आनंदाची गोष्ट आहे.खरं तर तुमच्या तोंडून ऐकलेले पुस्तकाचे नाव आणि त्यांचे लेखक वगैरे माझ्यासाठी नवे असतात.मात्र जो विषय अत्यंत क्लिष्ट आणि किचकट वाटतो त्या विषयाशी तादात्म्य साधून त्याची उकल करण्यात आपल्याला नेहमीच अवर्णनीय आनंद मिळत आलेला आहे.


खरं तर पातीवरल्या बाया या कवितासंग्रहाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्त आपण पुस्तकावर केलेले चिंतन माझ्यासाठी प्रचंड सुखावणारी बाब आहे.आपल्या वाचनाची आणि चिंतनाची व्याप्ती पाहता आपण दिलेले मुसानियास रुफस, निरो,थोरो,एपिक्टेटस इत्यादी तत्वज्ञानी व्यक्तींबरोबर मा.किरण येले आणि मा.मनोज बोरगावकर सरांच्या साहित्याचा जाणीवपूर्वक केलेला उल्लेख हा आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा दृढ पुरावाच म्हणावा लागेल.मी शाळा सोडलेली आहे पण शाळेने मला सोडलेले नाही असे आपण पातीवरल्या बायाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान म्हणाला होतात.शाळा हे शिक्षणाचे औपचारिक माध्यम असते मात्र आपण शाळेबाहेरच बहुतांशी ज्ञान संपादन करत असतो याचे जिवंत उदाहरण आपण आहात.म्हणून आपल्या नावापुढे जरी आपण मॅट्रिक फेल असा नामोल्लेख केला असला तरी पदव्यांच्या ढिगाऱ्याचा आणि मनुष्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा काहीएक संबंध नसतो हे आपण सिद्ध केलेलं आहे.


पुराणामध्ये एखाद्या योध्याकडे असलेले अस्त्र आणि शस्त्र ही त्या योद्याची खरी ओळख समजली जायची.त्यागतच आपण माझ्या मित्रांपैकी अत्यंत निकटचे आहात ही खऱ्या अर्थाने माझी उपलब्धी तर आहेच मात्र ओळखही आहे.

पातीवरल्या बायांना एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद आपणही प्रदीर्घ चिंतनलेख लिहून साजरा केलात.आणि माझाही आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल आपले आभार न मानता कायम ऋणाईत ! 


आपला 

सचिन शिंदे


आदरणीय विजयराव गायकवाड सर.... 

आपण .......


जीवन जगण्याचं खरं तत्व पुस्तकात व वाचनात लपलेल आहे हे पुरेपूर जाणलेल आहे....


वरील वाचनातून माझ्या मानवी संवेदनाच्या ओलावा असलेल्या मनाला एवढच जाणवलं ...की बाई व नदी या दोन्हीही मानवाच्या खऱ्या अर्थाने जीवनदायी आहेत.... कुटुंबाचा समाजाचं वाईट ते पोटात घ्यायचं आणि कायम दातृत्व करत शेवटी सागर रुपी अनंतात विलीन व्हायचं..... म्हणूनच पुराणात सुद्धा सतीला निर्मितीचे केंद्रबिंदू मानलेल आहे आणि निसर्गाने सुद्धा निर्मितीची जबाबदारी ही पुरुषाला नव्हे तर स्त्रीला दिलेली आहे.... म्हणूनच स्त्री व नदी यांचं कार्य कर्तुत्व अतुलनीय आहे......


डॉ.संजय मोरे ,परभणी


" पातीवरल्या बाया " काव्यसंग्रह जीवनाचा अर्थ सर्वश्रेष्ठपणे उजागर करतो.सचिन शिंदे यांच्या लेखणीतील संवेदनशीलता व विचारशीलता वाचकाला खोलवर विचार करायला लावते.

प्रत्येक कविता एक नवा दृष्टिकोन देणारी आहे.उत्कृष्ट संग्रह! आणि त्यात तुमच्या लेखातून ते समजून घेण्यास खूप सहज आणि सोपा झाला आहे.


पार्थ राजे गाडेकर  रायपुर..


वाचक शोधतो अर्थ नवा,

लेखक विणतो शब्दरचना,

दोघांच्या या नात्यामध्ये,

साहित्याची होते साधना.


वाचक आणि लेखक त्यांच्या नात्यातील दृढ संबंध कवी सतीश शिंदे आणि मॅट्रिक फेल विजय गायकवाड यामध्ये दिसून आला.साहित्याचे साधनेत रूपांतर झाले आहे.हे विजयरावांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आले आहे. 


गुरु शिष्य नातं आपणास  सर्वश्रुत आहे.पण या प्रतिक्रियेमुळे लेखक व वाचक यांचा घनिष्ठ संबंध दिसून आला आणि तो पुनश्च अधोरेखित झाला आहे.


एक लिहितो,एक वाचतो !

दोघांतूनच साहित्य घडते !!


- डॉ. दिपक शेटे .

- महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त 2021


जग वाचणारा माणूस कविता समजून तिची अस्खलीत समीक्षा करतो हे वाचून 'दुध' साखरेविना खूप गोड आहे हे समजलं.. खूपच सुंदर हो साहेब


आदरणीय दादासाहेब ताजणे,सेलू,परभणी


पातीवरल्या बाया

नावातच वास्तव स्पष्ट होतं.

ती राबते हसत

दु:ख झेलते हसत

रडते हसत हसत

हसते हसत हसत


कष्टकरी स्त्रियांचं हे रोजचं जगणं अधोरेखित करणार्‍या काव्यसंग्रहाचा तुम्ही घेतलेला आढावा केवळ डोळे उघडत नाही तर खरी जाग आणून देतो.स्त्री समजून घ्यावी लागते.वरवर वाचण्यासारखी सोपीही नाही आणि समजून घेतली तर अवघडही नाही..पुरुष असून स्त्रीच्या मनाचा वेध घेणारा हा काव्यसंग्रह कवीच्या हळव्या मनाची आणि भावनांच्या मुक्ततेची साक्ष देतो.तरल,वेचक आणि वेधक शब्दांत स्त्री अस्तित्व मांडण्याची आणि सांगण्याची शैली तुम्हीसुद्धा तुमच्या विचारगर्भ शब्दातून सांगितली आहे.


तुम्ही करुन दिलेला  काव्यसंग्रहाचा  हा परिचय कवीच्या मनाजवळ आणि मनातल्या भावनांना आवाहन करणारा आहे.

वैयक्तिक व्यापात गुरफटलेल्या माणसाला स्त्रीचा ताप आणि तगमग ठळकपणे  जाणवून देणार्‍या काव्यसंग्रहाचा तुम्ही घेतलेला आढावा ती च्या अस्तित्वाबद्दलची जाणीव करुन देतो.


काव्यसंग्रहासाठी व कवींच्या लेखनकार्यासाठी मनस्वी शुभेच्छा..भास कथेचे लेखक,विष्णु सुतार (व्ही।जी)


आदरणीय विजय गायकवाड सर,सप्रेम नमस्कार.

जीवनाबद्दलच अज्ञान कमी करून थोडस ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करणारा एक सामान्य वाचक .


लिहीण्याचं कारण की,तुम्ही जे कविवर्य सचिन शिंदे सरांचा ' पातीवरल्या बाया ' हया कविता संग्रहावर केलेलं विवेचन वाचलं काही दिवसापूर्वी माझी पुतनी श्रृती गाडेकर हिने या कविता संग्रहा बदल छान प्रतिक्रिया लिहीली होती.आदरणीय गव्हाणे सरांनी तिला ते पुस्तक वाचण्यास दिल होते मी त्याचे केवळ त्यावेळी मुखपृष्ट बघीतले होते.


आज गायकवाड सरांची त्यावरील प्रतिक्रिया वाचली आणि या कविता संग्रहाची नव्यान ओळख झाली आणि वाचण्याची उत्सुकता वाढली आहे.सर अतिशय कमी शब्दात संपुर्ण कवितांचे सार लक्षात आले आणि शिंदे सरांविषयी आणखीनच जाणुन घ्यायची इच्छा झाली.


याविषयी सोशल मीडियावर बऱ्याच बातम्या आणि प्रतिक्रिया वाचल्या खुप छान सरांनी लिहलं आहे.नदी कविता मोबाईल वर मिळाली ती वाचून मला माझ्या लहानपणची मामाच्या गावची नही आठवली त्यातील मनसोक्त डुंबणे आठवली जीवलग मार्गदर्शक गव्हाणे सरां मार्फत गायकवाड सर तुमची ओळख झाली लोखंडाचे सोनं करणारा परिस असतो म्हणतात पण तुम्ही लोखंडाचा परिस करणारे आहात.


मी अगोदर पासुन वाचत होतो.पण तुमच्या मुळे जसा एखादा आहारतज्ञ काय,कसे,आणि किती खावे याचे मार्गदर्शन करतो तसेच सर तुमच्या मुळे मला काय आणि कसे वाचावे ते कळले तुमचे प्रत्येक ब्लॉग मी न चुकता वाचतो आणि त्यातुन मला प्रेय आणि श्रेय यातला फरक कळाला .


प्रत्येक पुस्तक वाचल्या नंतर त्याचे सार मला सर्वात अगोदर तुम्ही मला फोनवर सांगता त्यामुळे मला मी स्वतःला भाग्यवान समजतो.अनेक परकिय लेखकांची तुमच्यामुळे मला ओळख झाली.खरोखर तुमच्या मुळे प्रत्येक घटनेकडे आणि जीवनाकडे तटस्थ बघायचा प्रयत्न करतोय.निरोगी नजर आणखी वाढीस लागली.. तुमच्या मुळे गीतेचा ' कर्मण्यवाधिकारसे ' हा श्लोक लवकर लक्षात आला.


'नदी होतात बाया ' यातुन खरचं पाण्याचा किती वाईट पध्दतीने आपण वापर करतो ते समजते आणि आदरणीय सतिश खाडे सरांचे अग्रोवन मधिल सर्व लेख आठवले..पाण्याच्या थेंबा थेंबाचा हिशोब ठेवणारा जलदुत माहीत झाला.आणि खाडे सरांची प्रत्यक्ष संवाद साधता आला तुमच्या मुळेच.


'असह्य झाल्यावर बाई जवळ करते नदीला.' हे वाचुन जीव कासाविस झाला.साड्यांच्या उदाहरणावरून खरोखरच सर थोड्यात गोडी ही म्हण आठवली .


दुःखाचे कारण तृष्णा हे बुद्धांनी सांगीतले होते.ते आज ह्या उदाहरणामुळे सोप झालं.बदल (परीवर्तन) काय आणि कशाचे हे खरचं छान समजल आणि मन हलकं झालं.


'मृगाचा पहिला पाऊस वाचल्यावर माझं जुनं गळणार घर आठवलं आणि पावसात प्रत्येक गळणाऱ्या थेंबा खाली घरातल भांड आणि त्यावर पडणाऱ्या थेंबाचा आवाज आठवला .


यातील प्रत्येक ओळ खरचं ओळखीची होती परंतु आता सिमेंट च्या घरामुळे त्यावर धुळ बसली होती.ती आठवण तुमच्या मुळे स्वच्छ झाली सर .


जहाजाचे उदाहरण वाचुन वाटले मुठीत मावेल तेवढेच घ्यावे खुप छान लिहताय सर तुम्ही,अनोळखी परंतु आवश्यक जगाची सफर करण्याचं भाग्य मला मिळालं.


अशीच तुमची सोबत राहो ...


हे लिहणे सुद्धा तुमच्या मुळे आणि तुमच्याच शब्दांमुळे .

बाकी मोडकं तोडकं थांबवतो.


 लक्ष्मण विठ्ठलराव गाडेकर

मु रायपूर ता.सेलु जि.परभणी
























१९/३/२५

जोन ऑफ आर्क / Joan of Arc

विशुद्ध करणारे नवयुगाचे वारे जरी अशा रीतीने वाहू लागले,तरी अद्यापि मध्ययुगातील दुष्टतेचे भूत पश्चिम युरोपच्या मानगुटीस बसलेच होते.हे वारे आले,तरी हे दुष्ट धुके पश्चिम युरोपच्या मुखमंडलास आच्छादून राहिलेच होते.पंधराव्या शतकभर फ्रान्स,

जर्मनी,इटली, स्पेन,बोहेमिया,इत्यादी देशांत हजारो स्त्री-पुरुषांस जिवंत जाळण्यात येत होते.मानवी चरबी सर्वत्र जळत होती व तिची घाण चोहोंकडे भरून राहिली होती. धर्मांध आचार्यांना टीकेचे तोंड बंद करण्यास फारच सोपा उपाय सापडला होता.तो म्हणजे टीकाकारांना ठार मारण्याचा.जे जे चर्चशी सहमत नसत,अगर ज्यांची ज्यांची संपत्ती पाहून पोप-प्रभृतींचा स्वार्थ जागृत होई, त्या साऱ्यांना जिवंत जाळून त्यांची धनदौलत जप्त करण्यात येई!चर्चशी सहमत नसणारे तेवढेच नव्हेत, तर राजकीय गुन्हेगारही 'नास्तिक' म्हणून जाळण्यात येत असत.पोप व राजे हातात हात घालून जात होते. 


राजधर्माला धर्माचा व धर्माला राजाचा पाठिंबा असे. राजाविरुद्ध वर्तन ईश्वराविरुद्धच समजण्यात येई.जणू ईश्वरच राजांना अभिषेक करतो.असे मानण्यात येत असे.चर्चने मान्यता दिलेल्या शासनसंस्थेस विरोध करणे हे देहान्त शिक्षेचा गुन्हा करण्यासारखे गणण्यात येई.हा गुन्हा केवळ शासनसंस्थेविरुद्ध नसे,तर चर्चच्याही विरुद्ध असे.जोन ऑफ आर्कची जीवितकथा समजून घेण्यासाठी चर्च व स्टेट यांच्यातील हे परमैक्य लक्षात ठेवणे आवश्यक आहे.चर्चचे अधिकारी त्याला धार्मिक गुन्हा समजत,तो हातून घडल्यावर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे धार्मिक गुन्ह्याच्या सदराखाली तिचा खटला चालणे क्रमप्राप्तच होते व नास्तिक म्हणून तिला जाळण्यात येणार हेही ठरलेलेच होते.आजच्या चिकित्सक मनाला जोन ऑफ आर्कचे सारे जीवन विश्वासार्ह वाटत नाही;पण पंधराव्या शतकातल्या भोळ्या श्रद्धाळू मनाला तिचे जीवन विचित्र वाटत नसे आणि तत्कालीन परिस्थितीत तिला ज्या प्रकारचे मरण आले,त्या प्रकारचेच येणे साहजिक होते.


मध्ययुगात प्रत्येकजण देवदूतांशी बोले,प्रत्येकाचा चमत्कारांवर विश्वास असे.पॅरिसमध्ये रिचर्ड नावाचा कोणी एक साधू होता,तो आपणास स्वर्गाचा अप्रत्यक्ष आवाज ऐकू येतो व आपणास देवाच्या इच्छेचा अर्थ समजतो असे म्हणे.त्याने साऱ्या पॅरिस शहराला वेड लावले.श्रद्धाळू धर्मभावनांना वाटे की,पॅरिसमध्ये त्याने जणू समुद्रच उंच बनविला! दुसरा एक कार्थेलाईट पंथी थॉमस कॉनेटा नावाचा साधू होता,तो स्वर्गातील देवदूतांनी आपणास धर्माची किल्ली दिली आहे,असे म्हणे.फ्रान्समध्ये व बेल्जियममध्ये त्याच्या प्रवचनास पंधरा ते वीस हजारांपर्यंत श्रोते जमत.ब्रिटनीमधील पिएरेटीनामक एक स्त्री आपल्या बंधुभगिनींस म्हणे, "मी नेहमी ख्रिस्ताशी बोलत असते." एका फ्रेंच धनगराचा एक मुलगा होता,त्याच्या अंगातून रक्ताचा घाम बाहेर येई,असे सांगत.ज्यांच्या अंगात येते,असे स्त्री-पुरुष प्रत्येक प्रांतात असत.आपण स्वर्गातील आत्म्यांशी सदैव बोलतो असे हे स्त्री-पुरुष मानीत व इतरांना मानवयास लावीत.


स्वर्गातील देवदूतांशी व आत्म्यांशी बोलता येते,अशा प्रकारच्या चमत्कारमय कथा छोटी जोन ऑफ आर्क आपल्या आईच्या तोंडून नेहमी ऐके.तिची आई धर्मशील होती.जोनला लिहिता-वाचता येत नव्हते.ते तिला शिकविण्यात आले नव्हते. 


धार्मिक दंतकथा व पऱ्यांच्या गोष्टी हेच तिचे शिक्षण. तिला या गोष्टी खऱ्या मानायला शिकविण्यात आले होते.फ्रेंच इतिहासकार मायचेलेट म्हणतो, "चर्चच्या भिंतीजवळ ती जन्मली होती.

चर्चमधील घंटांच्या नादावर ती पाळण्यात आंदुळली जाई,

झोपविली जाई. तिचे मन व तिची बुद्धी ही दंतकथांवर पोसली गेली होती.या सर्वांचा परिणाम म्हणजे,तीच एक जिवंत दंतकथा बनली.तिच्या बापाच्या घराजवळच जंगल होते, त्या जंगलात पऱ्या राहतात असे मानण्यात येई.वर आकाशात नाचणाऱ्या मेघमालांवर किंवा तेजस्वी रथात बसून देवदूत उडत्या पळत्या मेघांमधून जात आहेत, असे तिला दिसे.जेव्हा तिचा बाप शेतात काम करीत असे आणि आई घरकामात मग्न असे,तेव्हा उंबऱ्यावर बसून ती गावातील सारे आवाज ऐकत राही.सर्वांचा मिळून एक संमिश्र संमीलित आवाज होई.अतिमधुर व स्वप्नमय अशी ती अस्पष्ट वाणी तिला गुंगवी. 'माझ्याशी बोलणाऱ्या देवदूतांचाच नव्हे का हा आवाज ? हो, तोच.' असे तिला वाटे.परलोक व इहलोक यांची सीमान्त - रेषा कोठे,कशी,कोण काढणार? स्वर्ग व पृथ्वी जणू एकमेकांशी मिळूनच गेली आहेत व शेजारची माणसे रस्त्यावर एकत्र येऊन भेटतात,बोलतात, त्याप्रमाणे स्वर्गीय देवदूत व मानव एकमेकांस भेटू शकतील.परस्परांशी बोलू शकतील असे तिच्या बालनिर्मळ कल्पनेस वाटे.स्वयंपाकघरांतून आईने हाक मारणे जितके साहजिक,तितकेच देवदूतांनी बोलावणे वा हाक मारणेही साहजिक असून त्यांत चमत्कार वगैरे काही नाही,असे तिला वाटे. इतकेच नव्हे;तर उलट देवदूत देवाच्या या पृथ्वीवरील लेकरांबरोबर कधी बोलत नाहीत असे तिला कोणी सांगितले,असते तर तो मात्र तिला चमत्कार वाटला असता.थोडक्यात सांगायचे तर जोन अशा जगात जगत होती की,तिथे सत्य व असत्य, खरे व काल्पनिक यांत फरक करणे तिला अशक्यप्राय होते.देवदूत आपणास भेटावयास येऊ शकतील व आपणासही त्यांना भेटण्यासाठी वर नेले जाणे शक्य आहे,असे तिला वाटे.


ती अशा काल्पनिक पऱ्यांच्या सुंदर जगात,स्वतःच्या कल्पनारम्य जगात जगत होती.तिच्या या जगात प्रत्यक्ष सृष्टीतील एकच कुरूपता होती,एकाच दुष्ट गोष्टीचा डाग होता व ती म्हणजे,

इंग्रजांनी चालविलेली चढाई होय. फ्रेंच लोक इंग्रजांना 'देवाचा शाप' म्हणत,'नतद्रष्ट व प्रभुशापित लोक' मानीत.हे शापित इंग्रज फ्रान्सच्या दुर्दैवी राज्यावर हल्ले चढवीत होते,सारा प्रदेश उद्ध्वस्त करीत होते;इंग्रज टॉमी फ्रेंच शेतकऱ्यांची पिके कापून नेत होते,त्यांच्या घरादारांची राखरांगोळी करीत होते, गुरेढोरे पळवून नेत होते.कधीकधी मध्यरात्री आसपासच्या गावांहून आश्रयार्थ येणाऱ्या अनाथ स्त्री-पुरुषांच्या व मुलाबाळांच्या आक्रोशाने ती जागी होई.एकदा तिच्या आई-वडिलांसहित या लुटारूपासून रक्षणार्थ पळून जावे लागले.जेव्हा ती आई-वडिलांसहित परत आली,तेव्हा त्यांना काय आढळले? सारा गाव बेचिराख झाला होता,जोनचे घर लुटले गेले होते,चर्चची होळी शिलगलेली होती ! स्वर्गातील देवदूतांचा चांगुलपणा व फ्रान्सची अगतिक दयामय स्थिती या दोन गोष्टी त्या लहान किसानकन्येच्या जीवनात जणू जळजळीतपणे लिहिल्या गेल्या होत्या. 


या दोनच गोष्टी तिला दिसत होत्या.बाकी साऱ्याचा तिला जणू विसर पडला होता! 'फ्रान्स- माझा हा फ्रान्स देवाचा लाडका आहे.

माझ्या भूमीवर देवदूतांचे प्रेम आहे' असे तिच्या आईने तिच्या मनावर सारखे बिंबवले होते. फ्रान्सच्या पवित्र भूमीवरून लुटारू इंग्रज डाकूस घालवून देण्यासाठी देवदूत शक्य तितके सर्व करतील अशी तिची श्रद्धा होती;आणि अशी एक भविष्यवाणी सर्वत्र प्रसृत झाली होती की,एक तरुण कुमारी फ्रान्सला वाचवील.जादूगार मर्लिन व 'मी देवदूतांशी बोलते' असे सांगणारी ॲव्हिगगॉनची पवित्र बाई मेरी या दोघांनी हे भविष्य केले होते.आणि जोन आकाशाकडे दृष्टी लावून देवदूत फ्रान्समधून इंग्रजांना घालवून देणारा उद्धारकर्ता कधी पाठवितात.याची वाट पाहत बसे,ती या स्वप्नातच जणू मग्न असे.आणि उन्हाळ्यातील तो पवित्र दिवस आला होता.सारे श्रद्धाळू लोक त्या दिवशी उपवास करीत होते.

पूर्वी कधी आली नव्हती,इतकी स्वर्ग व पृथ्वी ही जवळ आली होती व जोनला भास झाला की, आसपासच्या निःस्तब्ध व पवित्र शांततेतून आपणास कोणीतरी हाक मारीत आहे.मुख्य देवदूत मायकेल याचा तो आवाज होता. मायकेल काय सांगत होता? तो म्हणाला, "जोन, तू चांगली मुलगी हो व नेहमी चर्चमध्ये जात जा." तिला जरा भीती वाटली;पण आश्चर्य वाटले नाही.देवदूत इतरांशी बोलतात असे तिने ऐकले होते. 


मग आपणाशी तो का नाही बोलणार,असा विचार तिच्या मनात आला.सेंट मायकेल हा तिला काही परका नव्हता.त्याची गोष्ट तिला माहीत होती.त्याचे चित्रही तिने पाहिले होते.गावातील धर्मोपाध्यायाने सांगावे, त्याप्रमाणे मायकेलने आपणास सांगितले असे तिला वाटले, 'चांगली मुलगी हो व चर्चमध्ये जात जा', असे मायकेलने सांगितले यात आश्चर्य ते काय ?


देवदूत आपणाशी बोलतात हा भ्रम तिला दिवसेंदिवस अधिक सत्य वाटू लागला.तिला आणखी देवदूत भेटू लागले.


मायकेलनंतर सेंट मार्गराइट व सेंट कॅथेराइन यांनी तिला भेटी दिल्या.जोनला त्यांचा परिचय होताच, तिला त्यांच्या मूर्ती जर हवेत दिसताच त्यांच्या चित्रांवरून तिने त्यांना पटकन ओळखले.


जोनला देवदूत प्रथम भेटले,त्या वेळी ती केवळ तेरा वर्षांची होती.ते तिच्याशी रोज बोलत.कधीकधी ते दिवसातून अनेकदा येत व बोलत.तिला ते स्पष्टपणे दिसत व त्यांचे आवाज स्पष्ट ऐकू येत.

चर्चमधील घंटा वाजत,तिला त्यांच्या मूर्ती दिसत व आवाज ऐकू येत. प्रथम प्रथम हे देवदूत तिच्याशी सामान्य गोष्टींबाबतच बोलत.

एके दिवशी देवदूत मायकेल तिला म्हणाला, 'फ्रान्सच्या राज्याविषयी मला दया वाटते,हे ईश्वराच्या कन्ये,आपला गाव सोडून फ्रान्सच्या साह्यार्थ जाण्याची तुझी पाळी आली आहे." मायकेलने तिला 'ईश्वराची कन्या' हे नाव दिले होते.पुन्हा दुसऱ्या एका वेळी 'तू फ्रान्सचे राज्य योग्य राजाला ज्या राजाचा कायदेशीर हक्क आहे,त्याला परत दे'असे त्याने तिला आग्रहाने सांगितले.


मर्लिनचे भविष्य खरे होणारसे दिसू लागले.डॉमरेमी गावची किसान कन्या जोन 'फ्रान्सची संरक्षणकर्ती' म्हणून प्रभूकडून निवडली गेली व हळूहळू जोनलाही तेच आपले जीवितकार्य,

असे वाटू लागले.ती शाळेत शिकलेली नव्हती.तिचे जीवन श्रद्धामय होते.तिची स्वतःची उत्कट इच्छा तिला जणू स्वच्छ,

स्पष्ट व मूर्त अशी दिसत होती.ती मध्ययुगातील प्रतिभासंपन्न बालिका होती,कविहृदयाची कन्यका होती.तिच्या मनातील विचारांनी जणू मूर्तरूप घेतले,त्यांना जणू पंखच फुटले ! तिला आपलेच विचार देवदूतांच्या स्वरूपात वर आकाशात दिसू लागले व ते प्रभूची आज्ञा तिला समजावून देऊ लागले.प्रभूची कोणती आज्ञा ? प्रभूचा कोणता आदेश ?


"तुझे घरदार सोड,सारी प्रिय आप्तमंडळी सोड,व जोन ! फ्रान्सच्या राजाच्या मदतीला जा",असा आदेश तिला ऐकू आला. तेव्हा तिने थरथरत विचारले,"मी एक क्षुद्र मुलगी आहे.मला घोड्यावर बसता येत नाही,लढावे कसे हेही माहीत नाही."तेव्हा सेंट मायकेलने तिला सांगितले, "रॉबर्ट डी बॉड्रिकोर्ट याच्याकडे जा.तो डॉमरेमी गावचा व व्हॉकूलर्स शहराचा स्वामी आहे.तो तुला सारी मदत देईल,माणसे देईल,साधने देईल.मग तू चिनॉन येथे जा. तिथे फ्रान्सच्या गादीचा वारस - तो भित्रा डॉफिन सातवा चार्लस्,जो देशाचा अनभिषिक्त राजा एका राजवाड्यात राहत आहे."जोन देवदूतांच्या सांगीप्रमाणे वॉड्रिकोर्टकडे गेली.पण तो साशंक होता.तो तिला मदत करीना. 


तथापि,सामान्य जनता तिच्याभोवती गोळा झाली, तिच्या मदतीला आली.ते मध्ययुगातील श्रद्धाळू ख्रिश्चन होते.त्यांचा तिच्या सांगण्यावर विश्वास बसला.देवदूत वगैरे सर्व त्यांना खरे वाटले.

लोकांनी तिला एक घोडा विकत घेऊन दिला व हत्यारी लोकांची एक टोळीही तिच्याबरोबर दिली.जनतेचा हा उत्साह पाहून बॉड्रिकोर्टही शेवटी उत्साहित झाला व त्याने जोनला एक समशेर बक्षीस दिली.आणि इ.स. १४२९च्या वसंत ऋतूच्या प्रारंभी सतरा वर्षांची ही किसानकन्या जोन पुरुषाच्या पोशाखात आपल्या सैनिकांसह दुःखीकष्टी फ्रान्सचे दुःख दूर करण्यासाठी,मायभूमीच्या जखमा बऱ्या करण्याच्या ईश्वरदत्त जीवनकार्यासाठी निघाली.


फ्रान्सचा कायदेशीर राजा सातवा चार्लस हा चंचल वृत्तीचा,

दुबळा,मूर्ख,भोळसट व श्रद्धाळू असा असंस्कृत मनुष्य होता.


जोन त्याच्यासामोर आली तेव्हा त्याचे दरबारी लोक त्याच्याभोवती होते;पण राजा कोणता हे ओळखण्यास तिला अडचण पडली नाही,कारण तो राजवाड्यातील अत्यंत कुरूप पुरुष होता. 


तो पंधराव्या शतकातील सर्व प्रकारच्या धार्मिक चमत्कारांवर व भोळसट कथांवर विश्वास ठेवणारा होता.त्याला जोनने आपली सर्व कथा निवेदन करताच, त्याचा तिच्यावर एकदम विश्वास बसला.मर्लिनचे व ॲव्हिगॉनच्या मेरीचे ते भविष्य त्यालाही स्फूर्ती देते झाले. 'एक कुमारी फ्रान्सला वाचवील' असे ते भविष्य होते,व त्याच्यासमोर ती कुमारी उभी होती.ती ईश्वराच्या आज्ञेने संबद्ध व राजाला विजय आणि मुकुट देण्याला सिद्ध होती.त्या किसान- किशोरीची ती उत्कट इच्छा सातव्या चार्लस राजाचीही इच्छा झाली.देवदूतांच्या,म्हणजेच तिच्या मनाच्या योजनेप्रमाणे तिला दोन गंभीर कर्तव्ये पार पाडायची होती.एक शापित इंग्रजांच्या हातून ऑर्लिन्स शहर मुक्त करणे व दुसरे, डॉफिनला हीम्स शहरी नेऊन राजा करणे,फ्रान्सचा फ्रान्सच्या राजघराण्यातला - पहिला ख्रिश्चन राजा क्लोव्हिस याला ज्या पवित्र तेलाने राज्याभिषेक करण्यात आला होता,त्याच तेलाने ती डॉफिनलाही राज्याभिषेक करू इच्छित होती.


ऑर्लिन्स येथील कुमारी जॉन ऑफ आर्क : फ्रान्सची माता,मानवजातीची कथा,हन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी


राजाने जोनचे ईश्वरदत्त कार्य मान्य केले व तिला सेनापती नेमले.जे काही सैन्य तो आपल्या निशाणाभोवती गोळा करू शकला,त्याचे आधिपत्य तिच्याकडे देण्यात आले.स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढणे,ही त्या काळात काही अपूर्व गोष्ट नव्हती.

अमीन्सच्या लढाईत तीस स्त्रिया जखमी झाल्या होत्या.

बोहेमियातील जोहान्स हस याच्या अनुयायांतील कित्येक स्त्रियांनीही लढाईत भाग घेतला होता.मध्ययुगातील असा एकही वेढा नसेल,की ज्यात एखाद्या स्त्रीने अपूर्व शौर्य गाजविले नव्हते - नाव केले नव्हते.जोनची लष्करी मदत घेणे ही गोष्ट चार्लसला चमत्कारिक वाटली नाही.त्याला ती गोष्ट साहजिक वाटत होती.त्याच्या दृष्टीने तिच्यात अनैसर्गिक असे काहीच नव्हते.जुन्या करारातील डेबोरा,जूडिथ व जेल या स्त्रिया त्याला आठवल्या.त्या स्त्रियांनी ईश्वराच्या मदतीने इस्रायलचे शत्रू पराभूत केले होते.तशीच आज ही जोन उभी राहिली होती.फ्रान्सच्या शत्रूना जिंकण्यासाठी देवदूतांनीच तिलाही बोलाविले होते. देवदूत मायकेल तिला मार्ग दाखवीत तिच्यापुढे चालला होता..तिच्या दोहो बाजूस सेंट कॅथेराइन व सेंट मार्गराइट होते.अशा रीतीने प्रभूचा आदेश पार पाडण्यासाठी निघालेली ही संस्फूर्त किसानकन्या इंग्रजांना हाकून देण्याच्या कामी आपणास नक्की मदत करील,

असे राजाला वाटले.तिने आठ हजार सैन्य उभे केले.त्या काळात आठ हजार सैन्य म्हणजे काही अगदीच लहान नव्हते.हे सैन्य बरोबर घेऊन ऑर्लीन्स शहराला वेढा घालणाऱ्या इंग्रजांवर तिने चाल केली. हिमधवल चिलखत घालून व काळ्या-काळ्या घोड्यावर स्वार होऊन सैन्याच्या अग्रभागी चालणाऱ्या या तरुणीची धीरोदात्तता,तशीच निर्भयता,पाहून जनता चकित झाली.

तिने तलवार व कुऱ्हाडी बरोबर घेतल्या होत्या.तिच्या हातात एक श्वेत ध्वज होता व त्यावर देवांची आणि देवदूतांची रंगीत चित्रे काढलेली होती.ती त्यांना स्वर्गातून उतरलेली अभिनव वीरांगना भासली.पण ती स्वभावाने युद्धप्रिया नव्हती.लढल्याशिवाय इंग्रजांना फ्रान्समधून घालवून देता आले तर किती छान होईल,असे तिला वाटत होते. तिने " मी आपल्या हातातल्या तलवारीने कोणासही मारणार नाही." अशी प्रतिज्ञा केली होती.ऑर्लीन्सला आल्यावर तुम्ही येथून जा असे तीन शब्दांचे पत्र तिने इंग्रजांस लिहिले.


ऑर्लीन्सच्या लढाईचा वृत्तांत सर्वांस माहीतच आहे. जोनने शेवटी इंग्रजांवर जय मिळविला.तो विजय म्हणजे चमत्कार नव्हता.

इंग्रजांचा सेनापती टाल्यॉट शूर; पण मतिमंद होता.त्याचे सैन्यही दोन-तीन हजारच होते व त्यात पुष्कळ फ्रेंचही होते.हे दोन-तीन हजार सैन्य आसपासच्या किल्लेकोटांच्या रक्षणार्थ अनेक ठिकाणी पांगलेले होते.हे किल्ले ऑर्लीन्सच्याभोवती होते.या पांगलेल्या सैन्यात दळणवळण नसल्यामुळे जोनला आपल्या संरक्षक सैन्यासह ऑर्लीन्स शहरात प्रवेश करता आला.फ्रेंच व इंग्रज दोघांसही जोनचे सैन्य संस्फूर्त वाटे.त्यांचा सेनानी जोन नसून जणू प्रत्यक्ष मायकेल होता,असे त्यांना वाटे. मग फ्रान्समधून इंग्रजांना हाकलून देण्यासाठी अवतरलेल्या या मायकेलच्या हल्ल्यासमोर कोण टिकणार?अर्थातच इंग्रजांचा पूर्ण मोड होणार,ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट होती.फ्रेंच सैनिक इंग्रज सैनिकांसारखेच दुष्ट व हलकट होते.युद्धाच्या उदात्ततेचे काव्य त्यांच्याजवळ नव्हते.युद्ध म्हणजे फायद्याचे,आनंदाचे काम असेच त्यांनाही वाटे.चाच्यांप्रमाणे किंवा डाकूंप्रमाणे त्यांनाही युद्ध ही एक लुटालुटीची बाब आहे असेच प्रामाणिकपणे वाटे.शिपाई सभ्य असणे वा सदृहस्थ असणे,ही गोष्ट केवळ अशक्य आहे;असे ते प्रांजळपणे कबूल करीत. युद्ध हा त्यांचा धंदा होता व त्या धंद्याला अनुरूप असे उघडउघड पशुत्वाचे प्रकार करण्यास ते मागेपुढे पाहत नसत.ऑर्लीन्स येथील जोनच्या सैन्याचा सेनापती ला हायर एकदा म्हणाला, "ईश्वर सैन्यात दाखल झाला,तर तोही दुष्ट व नीच बनल्याशिवाय राहणार नाही." 


पण अदृश्य देवदूतांचा अंश अशी जोन तिथे असल्यामुळे तिच्या अस्तित्वामुळे त्या सैनिकांतही जरा पावित्र्य आले.ते पवित्र शिपाई बनले.फ्रेंच शिपाई बनले. फ्रेंच सैन्यातील शेवटच्या शिपायापर्यंत सारे खरोखरच मानीत की,देवदूत आपल्या बाजूने लढत आहेत व इंग्रज सैनिकांसही तसेच वाटत होते.काही इंग्रजांना असे वाटत होते की,जोनच्या बाजूने देवदूत लढत नसून सैतान व भुते लढत आहेत.पण एका गोष्टीची इंग्रजांना खात्री होती ते अजिंक्य अशा सैन्यांशी लढत होते.पृथ्वीवरच्या शक्तींचा मुकाबला करण्यास इंग्रज तयार होते.पण स्वर्गातल्या वा नरकातल्या शक्ती विरुद्ध लढण्यास त्यांना बळ नव्हते.थोडक्यात म्हणजे फ्रेंचांच्या सैन्याधिकामुळे तद्वतच दैवी शक्तीच्या भीतीमुळे इंग्रज ऑलॉन्समधून हाकलले गेले.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…