* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/17/26

पावसाचं झाड : एक सुंदर संधिप्रकाश / Rain tree: a beautiful twilight

मी कोइमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये शिकत असताना १९५८ साली पावसाच्या झाडाचा पहिला परिचय झाला.दर आठवड्याला आम्हा वनाधिकाऱ्यांना वृक्षांच्या ओळखणीचे पाठ देण्यासाठी कोइमतूर शहराच्या परिसरात असणाऱ्या बागा,उद्यानं आणि कृषी महाविद्यालयं यांच्या आसमंतात नेलं जाई.

कोइमतूर तसं हरित शहर होतं.नारळींच्या झाडीतून डोकावणारी लाल कौलारू घरं,घरांपुढं फणसांची आणि आंब्यांची सावली,

बागेत लावलेली नाना त-हेची फुलझाडं,तसंच शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येक ऋतूत फुलणाऱ्या वृक्षांच्या रांगा आणि आल्हाददायक हवामान यामुळं माझं तेथील दोन वर्षांचं वास्तव्य मोठं आनंददायी झालं होतं.कोइमतूरमधील एका उद्यानात या पर्जन्य वृक्षाचं पहिलं दर्शन झालं.आमच्या वनाधिकारी शिक्षकानं या झाडाकडे बोट दाखवून त्याचं लॅटिन भाषेतील नाव सांगितलं : 'Pithecolobium saman.' यातील पहिल्या शब्दाचा अर्थ या झाडाला येणाऱ्या शेंगांशी संबंधित आहे.त्या माकडाच्या कानांसारख्या दिसतात. स्पॅनिश भाषेत त्याचं नाव आहे Zaman.त्याचा अपभ्रंश 'Saman.' त्या झाडाचं इंग्रजी नाव आहे 'रेन ट्री' म्हणजे पावसाचं झाड पर्जन्य वृक्ष.आमचे वनाधिकारी शिक्षक हरिसिंगानी सर वृक्षांची अशी काव्यमय ओळख करून द्यायचे.

त्यामुळं वृक्षांची शास्त्रीय नावं लक्षात ठेवायला अवघड असूनही ती सहज आठवणीत राहात.

मी त्या उंच भव्य झाडाकडं पाहात होतो.सारं झाड हिरव्यागार दाट पानांनी भरून गेलेलं.

तेवढ्यात सर म्हणाले,

'इतक्या दुरून पाहू नका.पुढं जा.त्या झाडाला स्पर्श करा.त्याची साल पहा.पानं हातात घेऊन त्यांची रचना पहा.फुलांचा रंग-आकार बघा.छताचं निरीक्षण करा.फांद्यांचे आकार पहा.एवढं जवळून निरीक्षण केल्यावर ते झाड तुमच्या कायमचं स्मरणात राहील.'

इथल्या रस्त्याच्या कडेनं लावलेली ही झाडं वाऱ्या वादळाला तोंड देत या झाडांनी आपला आकार कायम ठेवला होता.

हरिसिंगांनी सर पुढं सांगत होते,

'हे झाड वाढतंही जलद.मूळचं अमेरिकेतील.सिलोनी लोकांनी इकडं आणलं.तिथून ते भारतात आलं.त्याचं कारण वेगळं होतं.रेल्वेच्या इंजिनासाठी मंद गतीनं जळणारं इंधन लागतं,ते त्या झाडापासून उपलब्ध होतं.'माझ्यासमोरच्या झाडाची उंची आम्ही 'अ‍ॅबनी लेव्हल'नं मोजली,तर ती सत्तर फूट भरली. त्या झाडाचा आकार छत्रीसारखा,बुंध्यापासून निघालेल्या फांद्या छत्रीच्या काड्यांसारख्या उंच जाऊन त्यांनी वृक्षाच्या छताचा डोलारा तोलून धरला होता.पानोठ्याकडं पाहिलं,की हिरव्या मोरपिसाऱ्याची आठवण येई,पानं लांब असून देठाचा अभाव,शेवटी शेवटी ती अधिक मोठी आणि बाकदार होतात.

हवामानाप्रमाणं पानांची स्थिती बदलते.सूर्याच्या पूर्ण प्रकाशात ती जमिनीशी समांतर आडवी होऊन घनदाट छत उभं करतात.त्यातून क्वचितच एखादा उन्हाचा कवडसा पाझरतो.पावसाळी ढगाळ हवामानात आणि रात्री त्यांची पानं लाजाळूच्या पानांसारखी मिटलेली असतात.अशा रीतीनं पानं मिटली,की मला या देशात ते पावसाच्या आगमनाचं सूचक मानतात.म्हणून त्याचं नाव ‘रेन ट्री' किंवा पावसाचं झाडं.उन्हाळ्यात फांद्यांच्या अग्रावरील पुष्पदंडावर फिक्या गुलाबी मंजिऱ्यांचे गुच्छ दिसू लागतात.ते रेशमी गोंड्यासारखे वाटतात.या ऋतूत वृक्षाखालून येता-जाता फुलांचा मंद गंध दरवळू लागतो झाडाला येणाऱ्या शेंगांत मऊ,गोड गर असतो.म्हणून खारी या शेंगांबर फार लड्डू असतात.

महाराष्ट्रातील वनविभागाची वनात असणारी जुनी विश्रामगृहं पाहिली,तर आपल्या ध्यानात एक गोष्ट येईल की,ती मुख्य रस्त्यापासून आत एक-दोन किलोमीटर अंतरावर आहेत.ती उंचावर बसली आहेत.आत वनविश्रामगृहाकडं जाणारा रस्ता (अप्रोच) ही एक सुंदर कल्पना आहे.या वाटेनं चालू लागलात,की रस्त्याच्या दुतर्फा पावसाची जुनी झाडं उभी असतात.त्यात मधूनच शिरीष वृक्षांचं मिश्रण असलं,तरी तीही त्यात सहज विरून गेलेली असतात.ती दोन्ही झाडं दिसायला सारखी म्हणून पावसाचं झाड 'विलायती शिरीष' म्हणूनही ओळखलं जातं.पावसाच्या झाडाप्रमाणंच शिरीष वृक्षांवर नाजूक फुलांचा बहर आलेला असतो. झाडावरील गतवर्षाच्या शिरीषाच्या शेंगांच्या पापडीमधील बी हवेमुळं रुणुझुणु वाजत असतं. पुष्पांचा सुगंध आसमंतात दरवळलेला असतो.त्या वृक्षांच्या दाट सावलीतून मी हळूहळू विश्रामगृहाकडं जाऊ लागतो.दूर पावसाच्या झाडांच्या हिरव्यागार राईतून तांबड्या कौलांचं छप्पर डोकावू लागतं.

तिथं पोहोचल्यावर विश्रामगृहापुढील हिरवळीवर उभं राहून सुंदर हिरवळ पाहता पाहता डोळे निवू लागतात. अशी गालिच्यासारखी मुलायम हिरवळ फक्त पर्जन्यवृक्षाखालीच येऊ शकते.झाडाची ही उपयुक्तता आणि सौंदर्य ज्या वनाधिकाऱ्यानं जाणलं,तो सौंदर्यदृष्टीचाच असणार !

'हिरवळीवर वेताच्या खुर्चा ठेवलेल्या.प्रवासामुळं थकल्यानं मी खुर्चीत बसून समोर पाहतो,तर घनदाट जंगल असलेल्या पर्वतांच्या रांगा निळ्या होत होत क्षितिजावर विलीन झालेल्या,रानपाखरांची सुस्वर गाणी ऐकतच मी चहा घेत घेत समोरच्या दृश्याकडं पाहात असे.पावसाच्या वृक्षांनी सुशोभित असलेली राई बघत राहणं हा एक विलक्षण सौंदर्यानुभव आहे. 

हिवाळ्यातील एका सायंकाळी मी हिरवळीवर बसून या दृश्याकडं पाहात होतो.हिवाळ्यात सायंकाळी लवकर अंधारू लागतं,

संधिप्रकाश अल्पकाळ टिकतो.दिसतो, न दिसतो.तोच काळोखात विलीन होतो,परंतु मला समोर एक अभूतपूर्व देखावा दिसत होता.संधिप्रकाशाची वेळ निघून गेल्यावर पुन्हा तिथं जिकडे तिकडं सुंदर संधिप्रकाश दिसत होता.

मला कबीराच्या दोह्याची आठवण झाली.

सब अंधेरा हट गया। दीपक देखा माही।

हा अनुभव मी माझ्या रसिक मित्र-मैत्रिणींबरोबर घेतला आहे.परंतु त्यांना त्यातील गूढ सांगितल्याशिवाय सृष्टीतील ही किमया त्यांच्या लक्षात येत नसे.एकदा त्यांच्या ध्यानात आलं,की मग शब्दांची गरज नसे.सूर्य आकाशात प्रकाशत असताना एकाएकी आभाळ येऊन सूर्य दिसेनासा व्हावा,काही वेळानं विरळ ढगांआडून प्रकाश पाझरावा,पावसाचा नुसताच शिडकावा व्हावा,असा अलौकिक सुंदर परिणाम सभोवताली दृगोचर होत होता.त्यामुळंच पावसाच्या झाडाभोवतालचा सारा परिसर सदा हिरवागार दिसतो.

एकदा असाच मी सायंकाळी हिरवळीवर बसून समोरच्या दृश्याकडं पाहात होतो.इतक्यात माझ्या अंगावर पाण्याचे तुषार पडावे,तसा भास झाला.मी आजूबाजूला,वर आणि खाली आश्चर्यानं पाहू लागलो. खरं म्हणजे,ते पाण्याचे तुषार झाडावरूनच पडत होते. फांद्यांतून येणाऱ्या तिरप्या किरणांत ते जलतुषार आणखी सुंदर दिसत होते.

मी चौकीदाराला हाक मारली.तो अदबशीरपणे पुढं येऊन उभा राहिला.पाण्याचे तुषार त्याच्याही अंगावर पडत होते.तो देखील आश्चर्यानं आजूबाजूला पाहात होता.मी त्याला म्हणालो,

'झाडावर चढून पहा तरी,काय बरसतंय ते.'

तो झरझर वरच्या फांदीपर्यंत पोहोचला.आश्चर्यचकीत होऊन म्हणाला,

'अबब ! साहेब बघा तरी !'

त्यानं फांदी एका हातानं हलविली.तोच पंख असलेल्या कीटकांचा थवाच्या थवा भर्रकन वर उडाला.काही झाडाच्या खोडावर बसले.

मी जवळून पाहिलं,तर ते रातकिडे होते.आता ते रातकिडे उडून दुसऱ्या झाडाकडं गेले,तसा वरून येणारा पाऊस थांबला. चौकीदारानं एक फांदी खाली टाकली.

खाली पडलेल्या फांदीची साल मी काढली.त्या फांदीचं 'पॉकेट लेन्स'मधून निरीक्षण केलं.तेव्हा असं आढळून आलं की,त्या फांदीवर रातकिड्यांनी सूक्ष्म छिद्रं आपल्या सोंडांनी पाडली होती.ते कीटक झाडांतून वाहणाऱ्या जीवनरसाचं शोषण करीत होते.शोषणक्रिया इतक्या वेगानं चालली होती,की सोंडेकडं येणारा रसाचा प्रवाह वेगानं वाहात येऊन पावसाच्या रूपात खाली पडत होता.तेव्हा माझ्या लक्षात आलं,की याला पावसाचं झाड का म्हणतात.(पाखरमाया,मारुती चितमपल्ली, प्रकाशक- साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर)

पावसाची ही झाडं कधी जंगलात आढळून येत नाहीत. विस्तृत अशा हिरवळीच्या वा मैदानाच्या कडेनं वाढणारं तसेच,शोभेचं आणि सावलीचं झाड असल्यामुळं उद्यानातून आणि बागांतून ते दिसून येतं रातकिड्यांचा हा खाद्यरस फक्त पावसाच्या झाडातच असतो,असं नव्हे.नवेगावबांध,नागझिरा आणि मेळघाट इकडील वनांतून भटकत असताना साग,धावडा,कुसुंब इत्यादी वृक्षांवरूनही असेच पाण्याचे तुषार अंगावर पडण्याचा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे.परंतु रातकिड्यांना पावसाचं झाड अधिक आवडत असावं.या कीटकांना आकर्षित करायचं,तर पावसाची झाडं लावायला हवीत. त्यामुळं आजूबाजूचा परिसर हिरवा राहीलच,परंतु रातकिड्यांच्या संगीताचाही लाभ घेता येईल.

◆◆◆ समाप्त ◆◆◆

5/15/26

छत्रपती शिवाजी महाराजांचं जग / The world of Chhatrapati Shivaji Maharaj

सन १६३० मध्ये मराठा सरदारकुळातल्या जिजाबाईंनी दुसऱ्या पुत्राला जन्म दिला,तेव्हा हा मुलगा सामर्थ्यशाली मोगल साम्राज्याच्या सामर्थ्याचे तुकडेतुकडे करील अशी कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नव्हती.(त्यांच्या पहिल्या पुत्राचं जन्मतःनिधन झालं होतं.)

ज्या प्रदेशात बालशिवाजीचं आगमन झालं होतं,तो दख्खन प्रदेश आधीपासूनच फार आकर्षक प्रदेश होता. त्याच्या जन्म होण्याच्या चार वर्ष अगोदर या दख्खन प्रदेशाचा नायक होता एक मुस्लीम योद्धा आणि त्याचं नाव होतं 'मलिक अंबर'.त्याची कारकीर्दच मुळी आफ्रिकेतल्या गुलामगिरीत सुरू झाली आणि भारतात सत्ता-वैभवाच्या कळसास पोहोचली.

गणिका,महात्मा,आणि एक इटालियन ब्राह्मण,भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या,एस.पिल्लई,अनुवाद-सविता दामले 

तत्कालीन अहमदनगरचा सुलतान होता निजामशाह. त्याचे पूर्वज ब्राह्मण होते.परंतु त्याच्या वंशात आफ्रिकन आणि पर्शियन (इराणी) स्त्रियांचे पत्नी या नात्याने स्वागत होत होते.शिवाजी महाराजांचे पित्याच्या घराण्यातील आजोबा मालोजीराजे भोसले यांचे मलिक अंबरशी आणि निजामशाही घराण्याशी जवळचे संबंध होते,तर त्यांच्या आजोळच्या घराण्याचे लोक आपली सेवा आग्याच्या मुघल बादशाहीच्या चरणी रुजू करत होते. त्या काळात संपूर्ण क्षितिजावर जणू न संपणारे लष्करी नाट्यच चालल्यासारखे भासत होते.शिवाजी महाराज बालवयातच असताना निजामशाहाचा शेवटचा वंशज मोगलांच्या किल्ल्यावर बंदिस्त झाला आणि त्याच्या वाडवडिलार्जित राज्याचे तुकडे सम्राट शाहजहान आणि त्याच्या फौजेने गिळंकृत केले.

त्याही आधी दख्खन प्रदेशात मोठ्या मोठ्या हिंदू राजघराण्यांची सत्ता होती.परंतु चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीसमोर त्यांचे काहीच चालले नाही. त्यातून पुढे बहामनी सल्तनतीची स्थापना झाली.या सुरुवातीच्या लष्करी संघर्षात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक विध्वंस झाला.परंतु लवकरच नवे राजे प्रस्थापित झाले आणि जुन्या राज्यातील प्रजेशी त्यांनी जुळवून घेतलं.बहामनी आणि महाराष्ट्रातल्या निजामशाहांसकट त्यांच्या वंशजांनी दख्खनला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या इस्लामी जाळ्याशी जोडलं. त्यातूनच या प्रदेशात फारसी दरबारी संस्कृती उदयास आली.त्याच वेळेस या नवागतांनी मराठा स्त्रियांशी विवाह केले,मराठी भाषेला आश्रय दिला.स्थानिक रूढी आणि प्रथांवरच त्यांचे संगोपन झाले.तसं त्यांना करावंच लागलं कारण प्रचंड विस्तृत आणि दुर्गम अशा ग्रामीण भागांवर वर्चस्व गाजवणाऱ्यांच्या स्थानिक अभिजनांच्या सहकार्याशिवाय त्यांना राज्यकारभार करणं अशक्य होतं.त्यामुळेच शाहणपणाने त्यांनी या भूमीवरील जुन्या सरदारांशी हातमिळवणी केली आणि त्या दोघांनी मिळून काहीतरी नवंच जन्माला घातलं.कित्येक शतके या नव्या संस्कृतीचं वैभव कायम होतं.परंतु औरंगजेब नामक उत्तरेकडील नव्या बादशाहच्या महत्त्वाकांक्षांनी त्याचं रूपांतर आणखी एका शोकात्म अध्यायात केलं.

मुस्लीम सत्तेच्या या कालखंडात मराठ्यांनीही त्यांची अस्मिता विकसित केली होती आणि भारतीय इस्लामिक परंपरेतील सर्वोत्तम ते स्वीकारलं होतं.शिवाजी महाराजांचे पिता शाहजी आणि काका शरीफजी या दोघांची नावं 'शाह शरीफ' या मुस्लीम संताच्या नावावरून ठेवली आहेत.वेरूळला भोसले घराण्याचं मूळ स्थान आहे. तिथे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे आणि अन्य नातेवाइकांच्या समाध्या आहेत.त्यांचं बांधकाम इस्लामी मकबऱ्यासारखे दिसत असल्याने ते निजामशाहा आणि तत्कालीन महानायक मलिक अंबर यांचेच मकबरे आहेत की काय,अशीच चुकीची समजूत सुरुवातीला झाली होती.मलिक अंबरने ज्या शहराची स्थापना केली (त्याचेच नामकरण नंतर 'औरंगाबाद' असं झालं.) 

त्या शहरातील कित्येक मोहल्ल्यांना त्यानं त्याच्या एकनिष्ठ मराठा सरदारांची नावं दिली होती.पोशाख, स्वयंपाक आणि भाषा यांवरही या सुलतानांनी आपली छाप सोडली आहे आणि कित्येक मराठा घराण्यांनी या मुस्लीम मालकांच्या सेवेत आपलं वैभवशाली आयुष्य दिलं आहे ते दिसून येतं.त्या सर्वांनी एकत्रित येऊन इतिहास निर्माण केला.१५६५ साली तालिकोटा येथील प्रसिद्ध लढाईत दख्खनच्या सुलतानांनी विजयनगरच्या राज्याचा पराभव केला,तेव्हा मुस्लीम शाहजाद्यांसाठी हजारो मराठा योद्धेच लढले होते.धर्माच्या विषयातही त्या काळात वादविवाद आणि चर्चा चालत होत्या.भक्तिमार्गी संत तुकाराम यांचे समकालीन मुंतोजी म्हणून होते.ते बहामनी घराण्यातील सर्वांत धाकटे वंशज होते.त्यांनी बिस्मिल्ला म्हणणे आणि रामाची आळवणी करणे हे 'समान'च आहे असे म्हटले. तर संत एकनाथांनी त्यांच्या भारुडात केवळ ब्राह्मण आणि महारच नव्हे;तर मुस्लीम आणि आफ्रिकनांनाही (हबश्यांनाही) जागा दिली.परंतु शिवाजी महाराजांनी सत्ता आणि तिचा आविष्कार यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं.सुलतानाने त्यांच्या पित्याला पुष्कळ पदव्या दिल्या होत्या -'अल दार अलजुरत वालेझामा' ('निर्भीडता आणि भव्यतेचे आश्रयस्थान') किंवा 'उम्द अल्दौलत अलेझिमा' ('पराक्रमी राज्याचा आधारस्तंभ') किंवा अगदी 'अब्नी' ('माझा पुत्र') अशा त्या पदव्या असल्या,तरी जेव्हा प्रादेशिक मुस्लीम सत्तेचा ऱ्हास होऊ लागला तेव्हा त्यात पूर्णतया नवीन स्वराज्य स्थापनेची संधी आहे हे केवळ शिवाजी महाराजांना दिसलं. 

त्या काळातल्या बऱ्याच मराठा घराण्यांना त्यात दोन पर्याय दिसले एक म्हणजे प्रादेशिक मुस्लीम सत्तेची पाठराखण करायची किंवा मुघल सत्तेची मालकी स्वीकारायची.परंतु शिवाजी महाराजांनी काहीतरी पूर्ण वेगळ्याच गोष्टीची इच्छा धरली.त्यांना असं नवं राज्य हवं होतं,ज्यात फारसी आणि इस्लामी प्रभाव जाणीवपूर्वक टाळले जातील,त्याऐवजी 'महाराष्ट्र धर्माची' स्थापना होईल.शिवाजी महाराजांनी या स्वराज्य मोहिमेत सामील होण्याची केलेली विनंती एका मोठ्या मराठा सरदाराने धुडकावून लावली आणि सांगितलं की, माझी निष्ठा मी मुस्लीम सरदाराच्या पायाशी वाहिलेली आहे.तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला आठवण करून दिली,की माझी मोहीमही बेइमानीची नाही तर ती उलट अधिक वरच्या अधिकारी स्थानाच्या चरणांशी म्हणजेच स्थानिक देवतेच्या चरणी वाहिलेली आहे.त्या देवतेच्या नावानेच 'हिंदवी स्वराज्य' आपण निर्माण केले पाहिजे. आता त्यांना फारसी बादशाहंचं श्रेष्ठत्व स्वीकारण्यात जराही रस नव्हता म्हणजे स्वतःलाच मराठा बादशाह बनण्याची आणि स्वतःचं राज्य स्थापन करण्याची शक्यता असताना तर तसं मुळीच करायचं नव्हतं.

अर्थात,असे बरेच लोक होते,ज्यांना आपली ताकद महाराजांच्या या मोहिमेस पाठिंबा देण्यात वाया घालवायची नव्हती.परंतु महाराज त्यांच्याकडे 'वाट चुकलेले' लोक म्हणून किंवा फारच झालं तर 'साप' म्हणून पाहायचे.या लोकांना एक तर आपण गोडीगुलाबीने किंवा (ते नाहीच जमलं, तर ताकद दाखवून) आपल्या बाजूला वळवू शकतो, असं त्यांना वाटत होतं.परंतु एक गोष्ट इथं स्पष्ट केलीच पाहिजे,ती म्हणजे शिवाजी महाराजांच्या या अभियानाला कुठल्याही प्रकारे 'जातीयवादी' लेबल लावता आलं नसतं.म्हणजे, अचानक लोक एके दिवशी मोठ्या संख्येने जागृत झाले की,आपण हिंदू आहोत आणि त्यांनी हाती शस्त्रं घेऊन 'मुस्लीम' या नावाने ओळखली जाणारी जमात नष्ट करून टाकली असं काही त्यात नव्हतं आणि झालंही नाही.तर या भूमीवरील राजकारणी अभिजनांत एका नव्या सिद्धांताचं त्यांनी रोपण केलं.

म्हणजे एकीकडे शिवाजी महाराजांनी मुस्लीमांना नोकरीवर ठेवलं,न्यायदानासाठी काझींना नेमलं,तरी तसं करताना संस्कृत परंपरेत रुजलेल्या नव्या राजकीय अभिव्यक्तीचा त्यांनी सक्रिय मागोवा घेतला. जनुकशास्त्रीय दाव्यांनी त्यांना उत्तरेकडील राजपुतांशी जोडलेलं होतं आणि जीवनाच्या अखेरीस त्यांनी लिहिलेली पत्रं फारसी या तत्कालीन दरबारी भाषेऐवजी संस्कृतात होती. त्यांनी 'राज्यव्यवहारकोश' हा शब्दकोश बनवण्याचा आदेशही दिला होता.त्यात असे म्हटले आहे की, अतिमहत्त्व दिलेल्या यावनी (परदेशी) शब्दांच्या जागी आता सुशिक्षित शब्दप्रयोग येतील.त्यांना व्यक्तिशः मुसलमानांबद्दल कसलाही आकस नसला,तरी त्यांनी इस्लामी आदर्शावर उभारलेल्या जुन्या व्यवस्था फेकून दिल्या आणि भारतीय उच्च परंपरांकडून प्रेरणा घेतलेली नवीन व्यवस्था शोधली.गोवळकोंड्याच्या कुतुबशाहशी (त्याचे मंत्री ब्राह्मण होते) त्यांनी दोस्ती केली,तर वेगवेगळ्या सुलतानांना निष्ठा वाहाणाऱ्या हिंदू मराठ्यांना त्यांनी आव्हान दिलं.एकदा तर त्यांच्या स्वतःवरच मोगल दरबारात सामील होण्याचा प्रसंग ओढवला,तेव्हा शिवाजी महाराज स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नांत होते.सभासद बखरीत तिचा उल्लेख 'नवी पद्धती' असा केला आहे.परंतु या राष्ट्रवादाची व्याख्या कुठल्याही प्रकारे जातीयवादी आधारावर होऊ शकत नव्हती.ती सरंजामशाही व्यवस्थाच होती.फक्त ती हिंदू मुळांतून आलेली सरंजामी व्यवस्था होती.अर्थात या स्वराज्य मोहिमेत बरेच विरोधाभास आढळून येतात.हल्लीच्या विविध अस्मिता आणि दुफळी पडलेल्या राजकीय अधिकाराच्या काळात आपण जी तत्कालीन 'स्व-प्रतिमा' पाहतो तिच्यातून त्या काळातील प्रत्यक्ष जमिनीवर जगलेले वास्तव प्रतिबिंबित होत नाही,हे तर साहजिकच आहे.म्हणजे अगदी मोगलही बरेचदा धर्माच्या नावाने 'आम्ही फार श्रेष्ठ आहोत,'असे शब्दप्रयोग करताना दिसून आले,

तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्यांनाही हिंदू सरदारांशी आणि उच्च अभिजनांशी सहकार्य करावं लागत होतंच.परंतु शब्दबंबाळ इतिहास लेखनाच्या आड हे जमिनीवरील वास्तव झाकोळून जातं हेही तितकंच खरं आहे.

उदाहरणार्थ,काफर शिवाजी महाराजांना वळणावर आणायला त्यांनी पाठवलेला मिर्झाराजे जयसिंग नावाचा सुप्रसिद्ध सरदारही स्वतः काफरच होता.

'शिवभारत' हे शिवाजी महाराजांच्या हातून घडलेल्या महान कृत्यांची प्रशंसा करणारे महाकाव्य त्यांच्या जीवनकाळातच लिहिलं गेलं.त्यात एकीकडे त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन दिसतो,तर दुसरीकडे प्रत्यक्ष व्यवहारातील मुस्लीम आणि हिंदू हितसंबंधांच्या दीर्घकालीन दुव्यांनाही मान्यता दिली जाते.

दरबारी कवींच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराज प्रत्यक्ष विष्णूचा अवतार होते.त्यांनी बेलगाम मुस्लीमांच्या मुसक्या वळल्या होत्या,ते 'गोब्राह्मणप्रतिपालक' होते आणि शत्रू सुलतानांवर हल्ला करण्यासाठीच या पृथ्वीवर त्यांनी अवतार घेतला होता.इस्लामी सत्ता ही दुष्ट शक्ती होती आणि "रानटी रूपाच्या आड दडून त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता.त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना आपल्या अधीन करणे गरजेचे होते. (परंतु त्या काळात समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलेल्या युरोपिअनांएवढे हे मुस्लीम दुष्ट नव्हते.युरोपिअन लोक तर दैवी अंदाजानुसार अधिकच खालच्या पातळीवरचे होते.) म्लेंच्छ धर्म (परदेशी धर्म) इथं वाढत चालले आहेत अशी तक्रार शिवभारतात करण्यात आली आहे. त्यामुळे सज्जन आणि न्यायी लोकांत खूपच भय निर्माण झालं आहे.ही सर्व मुस्लीम घराणी म्हणजे राक्षसांचे पुनरावतारच आहेत आणि त्यांचा स्वतःचा धर्म घेऊन पुरासारखी या पृथ्वीवर पसरत आहेत,"असंही त्यात लिहिलं आहे.असं सगळं वर्णन करून झाल्यावर समतोल राखण्याची शास्त्रीय संकल्पना प्रत्यक्षात आणणारी आणि न्यायाची संस्कृत परंपरा अमलात आणणारी व्यक्ती म्हणून शिवाजी महाराजांना सादर करण्यात आलं आहे.परंतु हे प्रखर चित्र एकीकडे उभारलेलं असलं तरी ती महत्त्वाकांक्षा औपचारिकरीत्याच व्यक्त केलेली आहे,प्रत्यक्षात शिवभारताने अधिक गुंतागुंतीच्या सांस्कृतिक विश्वाला मान्यता दिलेली दिसते.उदाहरणार्थ,त्यात म्हटलं आहे की,पुराणातील कार्तिकेय एका असुराशी लढताना त्याला जशी देवांनी मदत केली,त्याचप्रमाणे मलिक अंबरलाही मोगलांशी लढताना शिवाजी महाराजांचे पिता आणि अन्य सरदारांनी मदत केली.म्हणजे या ठिकाणी मलिक अंबर या आफ्रिकन मुस्लीमाला त्यांनी 'कार्तिकेय' या हिंदू देवाची उपमा देऊन उत्तरेकडील बलवान मोगल शत्रूला 'असुर' म्हटलं आहे.शाहजीराजे विजापूरच्या अदिलशाहकडे म्हणजे दख्खनच्या दुसऱ्या सुलतानाकडे जाण्यासाठी निजामशाहची नोकरी सोडतात तेव्हा निजामशाहसोबत एकत्र व्यतीत केलेल्या भूतकाळाबद्दल भावूक झालेले दिसून येतात.

त्यांनी तर निजामशाहच्या राज्याचं वर्णन 'रामराज्या सारखं केलं आहे.शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजेही निजामशाहचे सहकारी होते.त्याचं वर्णन तर या शिवभारतात 'धर्मात्मा' असं केलेलं असून तुर्काच्या विरुद्ध मारलेले टोमणे त्याला लागू होत नाहीत,असंही म्हटलं आहे.शिवाय जेव्हा शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी खास अफझल खानाला पाठवलं गेलं, तेव्हा त्याच्या सोबत जाधव,भोसले,नाईक,घोरपडे आणि अन्य बऱ्याच मराठ्यांना पाठवलं गेलं होतं.तर सिद्दी इब्राहिमसारख्या मुस्लीमांनी शिवाजी महाराजांच्या पायी आपली निष्ठा वाहिलेली दिसते.त्या काळातली मुस्लीम बाजू ही 'चांगल्या' आणि 'वाईट' अशा दोन्ही पद्धतींत विभागली जाऊ शकत होती.परंतु आधीपासूनच गृहीत धरलेल्या एकसारख्या रंगात त्यांना कधीच रंगवलेलं यात दिसत नाही.विजापूरचा अदिलशाह (दुसरा) हा सुन्नी मुस्लीम असूनही हिंदू देवतांची भक्ती करत होता,तर त्याचा वारस मात्र 'दुष्टबुद्धी' दाखवला गेला आहे.या सगळ्यांत मोगल मंडळीच स्वतःला खरेखुरे मुस्लीम मानत होती.त्यांच्या दृष्टीने दख्खनचे मुस्लीम इस्लामचे 'शत्रू' होते आणि मरहट्टे तर 'सैतानाचे दूतच' होते.

त्यामुळे सैद्धांतिकदृष्ट्या पाहता,शिवभारताने इस्लामी राजा नसलेलं 'हिंदवी स्वराज्य' नजरेसमोर पाहिलं असलं,तरी खुद्द शिवाजी महाराजांच्या कवीलाही या खळबळजनक कालखंडातील मुस्लीम-मराठा बंधांकडे डोळेझाक करता आली नव्हती.शिवाजी महाराजांच्या राजकीय पूर्वजांच्या दरबारी संस्कृतीपेक्षा ही विचारसरणी वेगळी होती आणि प्रत्यक्षातलं वास्तव हे एकमेकांच्या आधाराने उभं राहणारं मिश्र वास्तव होतं. त्यातलं एकही वास्तव पूर्णपणे एकट्याचाच प्रभाव पाडणारं असं नव्हतं.शिवभारताने आणखीही एक महत्त्वाची भूमिका बजावली,संस्कृताधारित पंरपरेवरील भर हा त्या भूमिकेत अंतर्भूतच होता.केवळ एक 'सरदार' या स्थानावरून 'अभिषिक्त राजा' म्हणून लोकांपुढे सादर करण्यासाठी राज्याभिषेक सोहळा आयोजला गेला.त्या सोहळ्याआधी वेळेवर लिहून पूर्ण झालेलं हे काव्य 'सार्वभौम राजा' म्हणून महाराजांची वैधता लोकांसमोर मांडण्यासाठी गरजेचं होतं.

अर्थात 'हिंदू' हा शब्द वापरून आपली स्व-प्रतिमा बनवण्याची संकल्पना काही मूळची नव्हती कारण विजयनगरच्या सम्राटांनीही तो शब्द स्वप्रतिमेसाठी वापरला होता,तरीही जराही विरोधाभास न बाळगता अन्य हिंदू राजांशी ते लढले होते आणि मुस्लीमांना तर त्यांनी हजारोंच्या संख्येने आपल्या नोकरीतही घेतले होते.अशाच एका तेलुगू ग्रंथात त्याचा उल्लेख या पुस्तकात पुढेही येणारच आहे - तर शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीही 'हिंदवी स्वराज्याची' संकल्पना मांडली आहे.त्यात काही मुस्लीम राजांची तुलना खुद्द सैतानाशी केली आहे आणि मोगलांना मात्र देवाचे आशीर्वाद मिळाले आहेत, असं लिहिलं आहे. इस्लामी ग्रंथांतही 'काफरांचा नायनाट' अशा अतिशयोक्त संकल्पना मांडलेल्या असतात हे मी मागच्या लेखात मांडलेच आहे;परंतु प्रत्यक्षातले वास्तव काहीतरी वेगळेच असते.त्या वास्तवाने जगाचे आकलन केले होते,ते केवळ काळ्या आणि पांढऱ्या अशा रंगांतूनच केलेले नव्हते.काही अभिजनांनी 'तुर्कांचे' स्वरूप मांडले होते,तर काहींनी हिंदूंचे स्वरूप मांडले होते.परंतु दोन्हींतील सीमारेषा ठाशीव,ठळक अशा नव्हत्या.

शिवभारताच्या एका अध्यायात खरोखरच असं म्हटलं आहे,की शिवाजी महाराजांना जी जी राज्ये जिंकायची होती,ती केवळ दुर्जन तुर्काचीच नव्हती तर मद्रास, कंदाहार,काश्मीर आणि केरळ यांचीही जिंकायची होती. तसंच बरीच लहानमोठी हिंदू राज्येही मुस्लीम राज्यांप्रमाणेच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेशी जुळणारी नव्हती.शिवाजी महाराज हे त्यांच्या काळातील प्रस्थापित यंत्रणेसमोर 'आव्हान' म्हणून उभे राहिले होते.कारण ती प्रस्थापित यंत्रणा 'फारसी' भाषेचे प्राबल्य असलेली इस्लामी होती.पण ते 'सिंह' होते आणि त्यांच्या विरुद्ध उभं राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम दोन्ही हत्तींना आव्हान देत होते.जाणीवपूर्वकच त्यांनी संस्कृताधारित आव्हान दिलं होतं हे नक्कीच;परंतु त्यांचं राज्य आजच्या काळातील व्याख्येशी कधीकधी जोडलं जातं,तसं ते 'हिंदुराष्ट्रवादी' राज्य खरोखरचं होतं का? की त्यांची दुनिया वेगवेगळ्या धर्मपंथांचा मिलाप करणारी एक सर्वसमावेशक दुनिया होती? तर या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी होती असं येतं.तिथली संस्कृती आणि लोकांची आयुष्ये हा सामाईक अनुभवांचा समुद्र होता.अभिजनांच्या राजकारणाने परस्पर स्पर्धा करणारे लेखनच खरं आहे असे प्रस्थापित केले.तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या भूमीतील निवडक पंरपरा आणि विचारधारेचे नैतिक बळ यांच्याकडून ऊर्जा घेऊन आपल्या मराठा साम्राज्याची स्थापना केली.ते ज्या दख्खनमध्ये जन्मले होते,तिथे हिंदू राजकुमारांनी मुस्लीम प्रभाव स्वीकारला होता आणि मुस्लीम राजे हिंदू दैवतांची पूजा करत होते.त्या भूमीने ब्राह्मण लोकांना सुलतान बनलेलं बघितलं आणि मुसलमानाने ब्राह्मणत्व स्वीकारलेलं पाहिलं.तथापि,आता मात्र भारताच्या इतिहासात एक नवीनच अध्याय उघडलेला दिसतो.त्यात ही भूमी मोगलांच्या आणि त्यांच्या पराक्रमी साम्राज्याचे कबरस्तान म्हणून दाखवली जाते आणि या महान परिवर्तनाच्या अग्रभागी उभे असतात, छत्रपती शिवाजी महाराज.... संस्कृत काव्यानुसार विष्णूचा अवतार आणि वास्तवात पाहता एक लढाऊ राजा !

■■■ समाप्त ■■■

5/13/26

नवा राज / ... Nava Raj

माणसांपैकी एखाद्या दर्यावर्दी प्रवाशानं एखाद्या निर्मनुष्य बेटावर पोचावं,तशा झुडूप-मुंग्या महासमाज क्षेत्रात पोचल्या.नुकत्याच उपासमारीला सामोरं जाणाऱ्या वारुळाला अमर्याद अन्नाचा खजिनाच सापडला.आणि सुरुवातीला तर झुडूप-वारुळाला इतर वारुळांपासून स्पर्धेचाही त्रास नव्हता.पण माणसांनी झाडांवरून खांद्याच्या उंचीवर लोंबणारी फळं तोडावी, तितकं मुंग्यांना अन्न धरणं सोपं नव्हतं.मुंग्यांच्या भक्ष्याला वेग असतो.त्यांची शरीरं,

त्यांची वागणूक,हे सगळं कोट्यवधी वर्षांच्या मुंग्यांशी आलेल्या संबंधातून उत्क्रांत झालेलं असतं.यातली काही बचावतंत्रं तर माणसांना अ‌द्भुत वाटणारी असतात.

झुडूप-मुंग्यांना ऑरिबॅटिड कोळी भेटले.खरं तर ते कोळी आणि वारूळ यांच्या संकरातून घडल्यासारखे जीव होते.त्यांना कठीण कवचं होती,मुंग्यांच्या जबड्यांनी सहज फोडता न येणारी.

सहस्रपाद किड्यांची वेगळीच कहाणी होती.ते सापडले,पकडता आले,मारता आले,तर भरपूर अन्न मिळायचं.पण त्यांच्या शरीरांच्या प्रत्येक मण्याला चिलखतासारखी कवचं असतात.ह्या कवचांचे पत्रे मागच्या पुढच्या कवचांना बिजागऱ्यांसारख्या सांध्यांनी जोडलेले असतात.त्यामुळे लवचीक असूनही हे जीव चिलखतधारी असतात.बरं, त्यांच्यावर हल्ला होताच ते सायनाईड आणि इतर विषारी पदार्थ शत्रूवर फवारतात ! अशा त-हेनं प्रत्येक कीटक,

अळ्या,किडे आपापली शस्त्रास्त्रं घेऊन हल्ल्यांना तोंड देतात.

मुंग्यांचंच अन्न खाणारे मुंग्यांचे मुख्य स्पर्धक म्हणजे जमिनीवर वावरणारे भुंगे.यांना कवचही असतं,ते विषही फवारतात,मुंग्यांचे तुकडे तोडण्याइतके त्यांचे जबडेही मजबूत असतात,आणि वेळप्रसंगी ते पंख पसरून उडूनही जाऊ शकतात.

तर विषारी नसलेलं.वेगानं पळू न शकणार,जबड्यांनी चावे न घेणारं,आकारानं मोठं,असं अन्न शोधत झुडूप-मुंग्या नव्या क्षेत्रात वावरू लागल्या.खरं तर आसपास संख्येनं भरपूर असायच्या सूत्रकृमी.पण त्या इतक्या लहान असायच्या की मुंग्यांना त्यांना खायची इच्छा होत नसे.वाघ जसा झुरळं किंवा चिचंद्रयांची शिकार करत नाही,तसंच हे.सुरवंट हे मात्र मुंग्यांचं आवडतं अन्न असत.

तर अन्न शोधत झुडूप-कामकरी मुंग्या फिरायच्या.अन्न सापडलं तर रस्त्यावर फेरोमेन-संदेश सोडत वारुळाकडे परतायच्या.भेटणाऱ्या प्रत्येक झुडूप-मुंगीला शिंगांनी स्पर्श करून "चल, अन्न" असा संदेश द्यायच्या.आणि पुरेसं संख्याबळ जमा झालं की भक्ष्य पकडून वारुळाकडे ओढायला सुरुवात करायच्या.

एकदा झुडूप-मुंग्यांना जमिनीत बिळं करून राहणाऱ्या एका नाकतोड्याचं पिल्लू सापडलं.जरी त्या पिल्लाची वाढ पूर्ण झालेली नव्हती,तरी मुंग्यांशी त्याचं प्रमाण माणसांशी गाईचं असतं,तसं होतं.त्याला मारायला डझनभर मुंग्या लागल्या.काहींनी त्याचे पाय धरून ताणले,तर काहींनी त्या ताणण्यानं जिथून चिलखत हटलं त्या भागांना दंश केले,आणि नाकतोडा-पिल्लू मारलं.असंच एका सुरवंटाला मारायला शंभरेक कामकरी आणि वीसेक सैनिक मुंग्या लागल्या.मुंग्यांना सुरवंट कसा वाटला,तर माणसांना देवमासा वाटावा, तसा ! बरं,अन्न सापडलं आणि घरी नेलं,इतकं सरळही नेहमी घडत नसे.एकदा एक मेलेला सरडा सापडला. संपूर्ण वारुळाचं पोट काही दिवस सुखानं भरेल,असं हे घबाड होतं.काही अभिजन-मुंग्यांना ते सापडलं,आणि लवकरच शेकडो इतर कामकरी मुंग्याही गोळा झाल्या.

पण याच वेळी काही आग्या-मुंग्यांच्या गस्ती टोळ्याही येऊन पोचल्या.आग्या मुंग्या चांगल्या लढायच्या, विशेषतः गटागटांनी.त्या झपाट्यानं येतात,आणि गटागटानं हल्ला करतात.तर लवकरच मेलेल्या सरड्याभोवती धुमश्चक्री सुरू झाली.दोन्ही प्रकारच्या मुंग्या कुमक बोलावत होत्या,आणि सरडा-परिसरात दोन्ही प्रकारच्या मुंग्यांचा खच पडत होता.अखेर झुडूप-मुंग्या जिंकल्या,कारण सरडा त्यांच्या वारुळाजवळ होता,आणि आग्या-वारुळाच्या दूर.

आणि झुडूप-मुंग्यांना खूपशा सैनिकांनाही बोलवावं लागलं,वारूळ लहानखुरं,कुपोषित असताना त्यात सैनिक-मुंग्याच नव्हत्या.भरपूर अन्न मिळाल्यावर मात्र राणी-मुंगीनं सैनिकांनाही जन्म दिला होता.

प्रत्येक सैनिक-मुंगी जोरदार युद्ध करू शकत असे.तिचं शरीर मोठं आणि बळकट असे.डोकं मोठं आणि बदामाच्या आकाराचं असे.शत्रूचं चायटिन-चिलखत फोडण्याइतके जबडे बळकट असत,बारीक आणि तेज दातांनी भरलेले.जबड्याच्या सर्वांत पुढच्या भागातला दात कट्यारीसारखा मोठा असे.यानं भक्ष्य किंवा शत्रूला धरून ठेवता येत असे.शरीराचे सांधे चिलखती काट्यांनी संरक्षित असत.आणि सैनिकांचे मेंदू नेहमी युद्धसज्ज असत.शत्रू भेटला,की त्याला चावतानाच सैनिक मुंग्या हवेत "धोका!" असं सांगणारे फेरोमोन्स फवारत.शत्रू सवालाला जबाब देणारा असला,

तर हे धोका-फेरोमोन्स शरीरं जास्त प्रमाणात घडवायची.बरं,सैनिक मुंग्या धोका-फेरोमोन क्षीण प्रमाणात असलं तरी ओळखायच्या.यामुळे एका सैनिक-मुंगीला विरोध झाला,तर लवकरच अनेक सैनिक मुंग्या तिच्या मदतीला यायच्या.धोका संदेश मिळताच सैनिक मुंग्या सर्व परक्या वस्तूंवर हल्ला चढवायच्या. "मेलो तरी बेहत्तर" अशा वृत्तीनं सैनिक मुंग्या लढायच्या.एकदा का झुडूप-वारूळ वेगानं वाढायला लागलं,की त्याला सैन्य उभारायची गरज भासायला लागायची. संख्येनं नगण्य असतानाच जर वारुळानं सैन्यबळ उभं करायचा प्रयत्न केला असता,तर ते जड गेलं असतं. मर्यादित अन्नपुरवठा वाढवण्याची गरज टाळून सैनिक उभारणं,यानं शत्रूना आमंत्रण दिलं गेलं असतं.शत्रूशी लढायला इतकी कमी सेना घडली असती,की पूर्ण वारूळच सहज नष्ट झालं असतं.त्यामुळे आधी अन्नपुरवठा वाढवायला कामकरी पैदा करून मगच सेनेचा विचार करता आला.अर्थात,सुरुवातीला संख्या कमी,सैन्य नाही,या स्थितीत जर हल्ला झाला असता,तरी वारूळ संपलं असतं.पण तो धोका पत्करूनही कामकरी वाढवणंच शहाणपणाचं होतं.नंतरही सैनिक किती उभारायचे,आणि कामकरी किती,हे सतत ठरवावं लागायचं.

जास्त सैन्य उभारलं, तर अन्न कमी पडून वाढ खुंटणार.दुसऱ्या टोकाला सैन्य कमी पडलं,तर शत्रूला सहज वाट मोकळी होणार,पण अनेक पिढ्यांच्या उत्क्रांतीतून वारुळाचा आकार आणि सैनिक कामकरी प्रमाणाचं गणित वारूळ सोडवू शकत होतं.जसं,एकूण संख्या दोनशेच्या जवळ पोचल्यावरच पहिली सैनिक-मुंगी जन्मली.नंतरही संख्या हजाराजवळ जाईपर्यंत सैनिक-मुंग्या घडल्या नाहीत.उन्हाळ्यात जेव्हा वारुळाची प्रजा दहा हजाराला पोचली.तेव्हा मात्र पाचशे सैनिकांची फौज घडली होती.आता वारूळ स्वतःचा जीव वाचवून वाढण्याइतकं सबळ झालं होतं. झाड-देवांचा कोप,किंवा आर्माडिलोंसारखे मुंग्या खाणारे प्राणी येणं,हे सोडता सर्व हल्ले वारूळ परतवून लावू शकत होतं.वारूळ उत्कर्षाच्या या अवस्थेला पोचलं तोपर्यंत त्याचं क्षेत्रही वाढलं होतं.थोडंथोडं करत कामकरी-मुंग्या महासमाज-क्षेत्रात दूरदूर जाऊ लागल्या होत्या.आणि सोबतच वारुळाची एकूण बुद्धीही वाढत होती.ही बुद्धी एकत्रित नव्हती.ती अनेक मुंग्यांमध्ये विखुरलेली होती.काही मुंग्यांना अन्नक्षेत्राचा एक भाग माहीत असायचा,तर काहींना दुसरा,काहींना पाऊस पडताना काय करणं योग्य ठरलं होतं ते आठवायचं,तर काहींना संगोपन दालनं कशी चालवायची ते माहीत असायचं.माणसांच्या मेंदूंमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी बुद्धीची क्षेत्रं असतात,तसाच हाही प्रकार होता.फक्त बाहेरून पाहणाऱ्याला सुट्या मुंग्या दिसायच्या,आणि त्यांच्यातून घडलेला महाप्राणी मात्र उशिरानं लक्षात यायचा.

महाप्राण्याचे वेगवेगळे भाग फेरोमोन संदेशांमधून एकमेकांशी बोलायचे,आणि परिस्थिती पाहून, तिच्याबद्दल विचार करून कृती केली जायची.एकूण पाहता महाप्राणी सुट्या भागांच्या बुद्धींच्या बेरजेपेक्षा बराच जास्त बुद्धिमान होता.भरभराट भोगत असतानाच झुडूप-वारुळाला त्या भरभराटीची किंमतही समजायला लागली.पहिली अडचण जाणवली ती जागेची.

प्रजेची संख्या वाढायला लागली,आणि मूळच्या वारुळात दाटी व्हायला लागली.वारूळ वाढवायला कामकरी-मुंग्या धडपडायला लागल्या.जबड्यात मावेल तेवढा मातीचा कण उचलून वर उघड्यावर नेऊन टाकायला लागल्या.पण जमीन जास्तच भुसभुशीत होती.जराशाही धक्क्यानं छत ढासळायचं.झुडपांची मुळंही वारूळ वाढवण्यात अडथळे आणायची.आणि मुख्य म्हणजे,झुडपांच्या दाट सावलीमुळे मूळ वारुळाजवळ अन्न कमी मिळायचं.अखेर काही मुंग्या बाहेर एखादी मोठ्या वारुळासाठी योग्य जागा मिळते का,ते पाहायला लागल्या.

महासमाज क्षेत्रात जुन्या भुयार-बोगद्यांचं जंजाळ होतं. त्या जंजाळाची वर्षभरात काही पडझडही झाली होती. काही दारं बुजली होती.माती ढासळून काही भुयारं भरून गेली होती.पण झुडूप-मुंग्यांना जंजाळाचे भाग सापडत असायचे.काही भाग नव्या घरासाठी योग्य आहेत,असंही काहींना वाटायचं,मग त्या परत येताना नवी जागा आणि वारूळ यांना जोडणारी वाट फेरोमोन्सनी रेखायच्या.जर भरपूर मुंग्यांना नवी जागा आवडली असेल,तर त्या जागेचा रस्ता भरपूर सुगंधित व्हायचा.जर एखादुसऱ्या मुंगीलाच नवी जागा आवडली असेल,तर वाटेवरच्या खुणा तुटक आणि अस्पष्ट असायच्या.तर अशा त-हेनं वेगवेगळ्या नव्या जागांसाठी मुंग्यांमध्ये मतदान व्हायचं.ज्या जागेला सर्वांत जास्त मतं,

तिच्याकडे जाणारी वाट फेरोमोन-खुणांनी ठळक व्हायची.अखेर उन्हाळा संपल्यावर दोनेक महिन्यांनी नवी जागा शोधणाऱ्यांना एक अत्यंत आकर्षक जागा सापडली.त्या जागेच्या जुन्या महासमाज-जंजाळाचं दार माती कोसळून बंद झालं होतं.

संशोधक-मुंग्यांनी ते मोकळं केलं,आणि आतली रचना तपासली.ती त्यांना आवडून त्या लगबगीनं पुन्हा वारूळ गाठून इतर मुंग्यांना बोलावून घेऊ लागल्या.लवकरच अनेक मुंग्या जाऊन जाऊन वाटेवरच्या फेरोमोन-खुणा रेखीव झाल्या. वारुळाच्या विखुरलेल्या मेंदूनं निर्णय घेतला,"ही जागा छान आहे!" लवकरच मीटरभर खोल उभं भुयार,दर थोड्या अंतरावर आडवी भुयारं,

त्यांच्यात दालनं,असं वारूळ साफ झालं.एखाद्या सापाचा सांगाडा उभा ठेवून पाहावा,तसं हे भूमिगत वारूळ दिसत होतं.उभा कणा आणि आडव्या बरगड्या.

वारूळ बदलण्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या अभिजन-मुंगीनं पुढाकार घेतला होता. खोदकामाला कामकरी मुंग्या गोळा करायला सुरुवात एखादी अभिजन-मुंगी करायची,

आणि मग इतर मुंग्या कामगार-भरतीला लागायच्या.

एखादा बोगदा एखादी अभिजन मुंगी साफ करायला घ्यायची,आणि मग इतर मुंग्या मदतीला धावून यायच्या.एकूणच कोणतंही नवं काम करायला घेणं,एखाद्या कामाचा वेग वाढवणं, सगळं अभिजन-मुंग्यांच्या पुढाकारानं केलं जायचं.

तर नवी जागा साफसूफ करून घेतल्यावर घर बदलण्याचा कार्यक्रम सुरू झाला.सगळी वाहतूक दिवसाढवळ्या संपवणं निकडीचं होतं,कारण रात्री वावरणाऱ्या शिकाऱ्यांपासून वाचण्याचा झुडूप-मुंग्यांना अनुभव नव्हता.आणि रात्री अधेमधे असण्यात नष्ट होण्याचा धोका होता.सुरुवातीला हलल्या आळशी मुंग्यांना वाहणाऱ्या कामकरी मुंग्या.हो, काम सुरू करणाऱ्या अभिजन-मुंग्या असतात,तशाच आळशी मुंग्याही असतात घाबरट,आणि बऱ्याच टोचणीनंतरच हालचाल करणाऱ्या! तर कामकरी-मुंग्या आळशी-मुंग्यांच्या जबड्यांना जबड्यानं धरून हलकेच ओढायच्या.यानं आळशी मुंग्या आणिकच शांत व्हायच्या.यानंतर आळशी मुंग्यांची शिंगं आणि त्यांचे पाय शरीरालगत सरकवले जायचे,मुंग्या कोषांत असताना असतात तसे. मग कामकरी-मुंगी हे गाठोडं पाठीवर घ्यायची,आणि नव्या वारुळाकडे चालायला सुरुवात करायची.

कोष,अळ्या यांना जबड्यात धरून नेलं जातं,पण नरमाईन,अंडीही अशीच तोंडात धरून नेली जातात. एकूण घर बदलण्यातला मोठा भाग वारुळाच्या आजी आणि माजी सभासदांच्या वाहतुकीचा असतो.यांत सगळ्यात महत्त्वाची सभासद म्हणजे राणी-मुंगी. आपलं अंड्यांनी भरलेलं पोट सांभाळत,संथ गतीनं, घाबरत,राणी हलू लागली.तिच्या अगदी जवळ दाईचं काम करणाऱ्या मुंग्यांचा घोळका होता,राणी इतरांच्या दृष्टीला पडू नये इतका दाट.यांपैकी काही राणीचा जबडा धरून तिला कोणीकडे जायचं ते खुणावत होत्या.इतर सगळ्या मात्र तिला ब्लॅक कॅट कमांडोंची झेड-सुरक्षा देत होत्या.तिचा आकार प्रचंड होता. तिचं वजन कामकऱ्यांच्या जथ्यालाही न पेलण्याइतकं जास्त होतं.पण तिचा संथ प्रवास हा नवं वारूळ गाठण्याचा सर्वांत महत्त्वाचा भाग होता.

एखाद्या सरड्यानं किंवा पक्ष्यानं तिला खायचा प्रयत्न केला असता,कारण ती छान भक्ष्य होती.एखाद्या शत्रू-मुंग्यांच्या सैन्यानंही असा हल्ला केला असता.असा एखादा प्रयत्न यशस्वी झाला असता,तर झुडूप वारुळाची ती मृत्युघंटा ठरली असती.

मुळात राण्या फारदा एकीकडून दुसरीकडे जात नाहीत. झुडूप-राणीचा हा प्रवास मात्र सुरक्षित आणि सुखाचा झाला.अंधार पडायच्या आत राणी आणि तिची बहुतेक प्रजा नव्या जागी स्थिरावली.काही शूर मुंग्या अजूनही फेरोमोन-वाटांवरून मागेपुढे करत होत्या,पण मुख्य काम झालं होतं.गेल्याच वर्षी मरू घातलेलं झुडूप-वारूळ आता या मुंग्यांच्या प्रजातींमधल्या मोठ्यात मोठ्या आकाराजवळ पोचलं होतं.

महासमाज क्षेत्र त्यांना झाड-देवाच्या कृपेनं मिळालं.ते पूर्णपणे व्यापणं झुडूप-वारुळाला शक्य नव्हतं.पण घुबड तलाव परिसरातल्या कोणत्याही वारुळापेक्षा झुडूप-वारूळ मोठं झालं होतं.पुढे काय होणार ते स्पष्ट होतं.पुढचा वसंत सुरू झाला, आणि मूळ वारुळापासून सर्वांत दूर जाणाऱ्या झुडूप-मुंग्यांना परक्या मुंग्या भेटू लागल्या.दर भेटीनंतर दोन्ही बाजूंच्या मुंग्या पुन्हा आपापल्या घरांकडे पळायच्या.झुडूप-मुंग्या तर फारच आश्चर्यचकित असायच्या,कारण त्यांना आपल्यासारख्या पण वेगळा वारूळ-वास असलेल्या मुंग्या माहीतच नव्हत्या !

नंतरच्या काही दिवसांमध्ये झुडूप वारुळाच्या मुंग्यांनी शत्रू दिसले होते त्या भागातली गस्त वाढवली.त्या बाजूला जाणाऱ्या वाटांवर जास्तजास्त फेरोमोन-खुणा सोडल्या गेल्या,नेमकं हेच सगळं शत्रूच्या बाजूनंही होत होतं.दोनही वारुळं तयारीत होती.

वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन 

मग सामने होऊ लागले.कामकरी मुंग्या पोटं फुगवून, पाय ताठ करून सैनिक असल्याचा आव आणू लागल्या.खड्या-काड्यांवर चढून उंची वाढवू लागल्या. यामागनं खऱ्या सैनिक मुंग्या आल्या.मिरवणं, एकमेकींभोवती वर्तुळं रेखणं,धक्के देणं,सगळे स्पर्धा सामन्यांमधले प्रकार होऊ लागले.दोन्ही बाजूंनी थेट हल्ल्याची तयारी मात्र नव्हती. दुसऱ्या बाजूच्या मिरवण्यातून कुठे कमकुवतपणा दिसतो का,यावर मात्र दोन्ही बाजू लक्ष ठेवून होत्या.एक अदृश्य सीमा आखली गेली,म्हणू या.याला फार महत्त्व नव्हतं.झुडूप-वारुळाची राणी तरुण होती.वारुळातली मुंग्यांची संख्या सरासरी वारुळांमधल्या संख्येपेक्षा जास्त होती.वारुळाचं क्षेत्र सुपीक होतं.ताकद,टिकाऊपणा यांना कोणता तात्कालिक धोका नव्हता.नंतरच्या उन्हाळ्यात झुडूप-वारूळ राजकुमारी आणि नर पैदा करू लागलं.योग्य वेळी,योग्य हवामानात राजकुमारी आणि नर उड्डाण करून संभोग करू लागले.मूळ क्षेत्राबाहेरही झुडूप-वारुळातल्या राजकुमारी पोचून,राण्या होऊन वारुळं वसवू लागल्या. झुडूप-वारूळ या महाप्राण्याला पिल्लं व्हायला लागली. उत्क्रांतीच्या खेळात झुडूप-वारूळ यशस्वी ठरलं.

वारुळाच्या एकत्रित मनाला आपण कसे घडलो, कशामुळे यशस्वी झालो,हे पूर्णपणे कळत नव्हतं.सर्वांत वयस्क मुंग्यांना पूर्वीचे शत्रू आठवत होते.ते एकाएकी मेले,नाहीसे झाले,हे आठवत होतं.एक सुपीक आणि विस्तृत क्षेत्र आपल्याला एकाएकी मिळालं,हे स्मरत होतं.या वयस्क मुंग्यांनी त्यांच्या तरुण सहकाऱ्यांसोबत हे क्षेत्र तपासलं होतं.त्या सगळ्यांच्या स्मरणात मिळून क्षेत्राचा एक नकाशाही होता.त्यांना जर हलत्या झाड-देवांचं अस्तित्व जाणवलं असतं,समजलं असतं, तर त्यांना आपल्या सौभाग्याचं कारण कळलं असतं. वादळं,वणवे,तसे झाड-देवही झुडूप-वारुळाला अनाकलनीय होते.

समाप्त—

5/11/26

टिबुकली / Tibukli

(परिचय : टिबुकली आकारानं कबुतराएवढी.गुबगुबीत.भुरा रंग.पोट कोशा रंगाचे.लहान टोकदार चोच.बिना शेपटीचा पाणथळ पक्षी.विणीच्या हंगामात डोके व मान गडद उदी तांबूस रंगाची.पंखांचा रंग तांबूस पिंगट.नर व मादी दिसायला सारखेच.झिलाण,तळी व बोडीतील पाणवनस्पतीत जोडीने अथवा थव्याने राहतात.नवेगाव तळ्यात पाहिलेल्या एका टिबुकली पक्ष्याच्या जोडीची ही कथा.)

उन्हाळा आला की नवेगाव बांध तळ्याकाठची हिरवीगार वनस्पती सुकू लागे.दिवसादिवसाला पाणी आटू लागे.पाणी आटलं की काळ्याभोर गाळाची जमीन उघडी पडे.सूर्याची प्रखर किरणं तळ्याच्या पृष्ठावर पडत.

त्याकडे पाहवत नसे. परावर्तित प्रकाशानं डोळे दिपून जात.अशा ह्या तापलेल्या उन्हात आठवण व्हायची ती श्रावण महिन्यातील हिरवळीची. पावसाच्या शिडकाव्याची.आणि पाहता पाहता चातकांचे थवे उंच आकाशातून पंख फडफडवीत उडताना आढळू लागायचे. त्यांचा टाहो रात्री-अपरात्री कानावर पडू लागायचा. आकाशही ढगांनी भरलेलं असायचं.आता लवकरच पावसाळा सुरू होणार याची खात्री पटायची.

अन् खरचं.पावसाला सुरुवात व्हायची.रात्री मी अंगणात उघड्यावर झोपलेला.वाऱ्यावादळासह पाऊस बरसायचा.मी अंगावर डोक्यापर्यंत पांघरुन घेऊन झोपी जायचा.अंगावर पावसाचे शितोंडे पडत.थोड्याच वेळात पांघरूण ओलं होई. अंगाला गार स्पर्श होई. पाऊस पडला की काळ्याभोर जमिनीतून हिरवे तृणांकुर बाहेर येऊ लागायचे आणि पाहता पाहता सारा आसंमंत हरित दिसू लागायचा.खिडकीजवळीच्या पलंगावर झोपून मी पावसाची शोभा पाही.त्याचा साद ऐकी.अन् साद ऐकता ऐकता श्रावणमास सुरू होई.

तळ्याचा काठ पुन्हा हिरवागार दिसू लागे.त्यातून पाणी डोकावू लागे.बेटासारख्या दिसणाऱ्या घरट्यात टिबुकली बसलेली असे.उंच वाढलेलं देवधान तिच्या घरट्यावर झुकलेलं असे.हिरव्या गादेतून थंडगार वाऱ्याची झुळूक वाहात असे.रानफुलं फुललेली असायची.वनस्पतींचा मंद मधुर गंधही सुखावून जाई.चंडोल पक्षी आनंदानं गात आकाशातून उडत असायचे रंगीबेरंगी मनोल्या चिवचिव करीत गात असायच्या.नाचऱ्या आपल्या शेपटीचा पंखा करून देवधानात नाचत नाचत गात असायच्या.

टिबुकली मात्र अजूनही घरट्यातील पाच अंड्यांवर बसलेली असायची.त्यांना घोळत असायची.मग पाठीवर मान विसावून डोळे मिटून स्तब्ध बसलेली दिसायची.

काही हातांवर जोडीदार तिचं संरक्षण करीत पोहत असायचा.माझ्या पायांची चाहूल लागताच धोक्याची सूचना देणारा आवाज काढायचा.मादी सावध व्हायची.

मोठ्या घाईनं चोच व पायांनी गवतपाला टाकून अंडी झाकी.लगेच ती पाण्यात उतरायची. डुबी मारून पोहत दूर जायची.बेटावरचं घरटं एखाद्या गवताच्या ढिगासारखं वाटे.अंडी तर अजिबात दिसायची नाहीत.मी दुर्बिणीतून काठावरून त्यांच्याकडेच पाहात असतो.यांचंही सारं लक्ष माझ्याकडेच असतं.मी दूर जाण्याची ते वाट पाहात असतात.मी दूर जातो.लपणात बसून त्यांच्याकडे पाहू लागतो.एकानं पाण्यात बुडी घेतली. घरट्याजवळ तरंग उठले.अन् थोड्याच वेळात चिमुकली मान दिसली.

त्यानंतर चेंडूएवढं तिचं शरीर वर आलं.थोडा वेळ तिनं आजूबाजूला जलविहार केला,अन् लगेच बेटावरील घरट्यात उडी घेतली.अंड्यांवरचा केरकचरा बाजूला सारला.पुन्हा अंड्यांची जुळवाजुळव केली,अन् त्यावर बसून ती अंडी उबवू लागली.पुन्हा बेटाभोवती तरंग उठले.तेवढ्यात घरट्याच्या काठावर उदी तांबूस रंगाचं डोकं दिसू लागलं.त्याच्या चोचीत चारा होता.मादीनं मान लांब करून हळूच तो प्रेमानं दिलेला घास चोचीत घेतला.तशी त्यानं पुन्हा बुडी घेतली.आपलं शरीर पाण्याखाली ठेवून नर मादीला भरवीत होता.

जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,,साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर

जवळजवळ वीस एकवीस दिवस हे नरमादी आळीपाळीनं घरट्यातील अंडी सतत उबवीत होते.मध्ये वारं वादळ व पाऊस येऊन गेला.अन् शेवटच्या दिवशी पाच काळीभोर चेंडूएवढी मखमली पिलं बाहेर आली.

अंगावर पांढरे ठिपके असलेली.त्या दिवशी सूर्याची कोवळी किरणं घरट्यावर पडली अन् आईच्या उबेतून बाहेर पडलेली काळ्या मानेची पाच पिलं मला दिसली.जवळच असलेल्या नरानं त्या पिलांना पाहिलं.नर दिसताच मादीनं घरटं सोडलं आणि ती नरासोबत पाण्यात उतरली.आता ती दोघं बेटाभोवती हळूवार आवाज काढीत पोहू लागली.ती त्यांना साद घालत होती.अन् ती बावरी पिलं त्यांच्याकडे धावली.धावताना पाण्यात पडली अन् लगेच पोहू लागली.दुसऱ्या दिवसापासून ती स्वतःच पाण्यात बुडी घेऊ लागली.पण लगेच ती पाण्यावर यायची.

घरट्यापासून दूर जाऊ लागली की ती आईची पिसं चोचीनं धरून तिच्याबरोबर तरंगत असायची.

काही दिवसांनी आई त्यांना उडणाऱ्या माश्या कशा पकडाव्यात,देवधानावर,बसलेले कृमिकीटक कसे टिपावेत, पारळाचं बी कसं खावं याचे पाठ देऊ लागली.

एकदा तिनं असंच पिलांना मासेमारीसाठी पाण्यात आणलं. ती छोटा मासा चोचीत पकडून त्यांच्यासमोर पुन्हा पाण्यात टाकायची. पिलं माशाला पकडू शकली नाहीत तर थोड्याच अंतरावर गेलेल्या त्या माशाला ती पुन्हा पकडायची. त्यांच्यासमोर तो टाकायची आणि तो त्यांना पकडायला लावायची. अशा रीतीनं पिलं मासे पकडण्यात प्रवीण होईपर्यंत ती त्यांना सतत मासे । पकडण्याचे पाठ देऊ लागली.त्या पिलांना पाण्यात तरंगण्यात मोठी मौज वाटू लागली,नुकतीच अंड्यांचं कवच फोडून बाहेर आलेली ती पिलं,पण आता त्यांना आभाळाचं कवच अपुरं पडू लागलं. त्यांना स्वैर व स्वच्छंद विहार करण्यात अपूर्व आनंद मिळू लागला.

त्यांना जगाचा काहीच अनुभव नव्हता.त्यांना माहीत नव्हतं की हे जग सुखदुःखानं भरलेलं आहे.त्यांना अनेक रहस्ये अजून समजायची होती.अल्लड अन् अजाण पिलांना संकटांची जाणीवही नव्हती.पण त्यांच्या अवतीभोवती संकटेच संकटे होती.सर्वत्र शत्रूच शत्रू होते.म्हणून नरमादी दोघंही अगदी सावधचित्त होते.जरा कुठं खुट्ट झालं की नर धोक्याची सूचना देई.सूचना मिळताच मादी आणि पिलं पाण्यात बुडी मारायचे.

ढांगोळ्या पायाचा सुकाणू करून ती आईजवळ पोहोचायची.एकामागून एक ते मखमली पाच गोळे तिच्या पाठीवर आरूढ व्हायचे.ती त्यांना आपल्या पंखात घ्यायची अन् पिलांसकट पाण्यात बुडी मारायची, त्यांना देवधानात लपविण्यासाठी.

श्रावणात क्षणात ऊन पडतं तर क्षणात पाऊस.जिकडे तिकडे पाखरांचं संगीत सुरू असतं.जलवनस्पतींना फुलांचा बहार आलेला असतो.पिलंपण दिवसा दिवसानं वाढत असतात. आता ती मातापित्यांपासून दूर जातात.

स्वतंत्रपणे नाचू बागडू लागतात.पण त्यांना आजूबाजूच्या संकटांची जाणीव नसते.एका सकाळी ते सारं पक्षिकुळ शांत पाण्यात चरत चरत जलविहार करीत होतं.इतक्यात नरानं धोक्याची सूचना दिली.पाहता पाहता एक शावक पाण्याखाली दिसेनासं झालं.हुदाळ्यानं ऑटरनं-त्याला आत ओढलं होतं. काही तरंग दिसले. ते उत्तरोत्तर वाढत होते अन् देवधानात विरून जात होते.

पिलं मोठी झाली.ती स्वतःची काळजी घ्यायला आता समर्थ झाली होती.एक दिवस मादी सतत पाण्यात डुंबत होती.वर येत होती.पाहिलं तर ती पुन्हा घरटं बांधत होती.तिनं अंडी घातली.एका महिन्यानंतर पुन्हा चार पिलं दिसली.आता पूर्वीची ती मोठी झालेली पिलं आपल्या भावंडांची काळजी घेत त्यांना वाढविण्यात मातापितरांना साहाय्य करीत होती.

समाप्त...



5/9/26

तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

व्हेन आय फेल फ्रॉम द स्काय' हे पुस्तक ज्युलियन कोपेक डिलर यांनी लिहिलं ते २०११ साली.म्हणजे अपघातानंतर तब्बल ४० वर्षांनी.हे पुस्तक केवळ त्यांच्या जंगलातल्या ११ दिवसांच्या अनुभवांचंच नव्हे,तर त्या काळात त्यांच्या मनात घडलेल्या खळबळींची आणि या घटनेनंतरच्या त्यांच्या आयुष्याचीही कहाणी सांगतं.

तिथल्या पक्ष्या प्राण्यांच्या अभ्यासासाठी आपण आयुष्यभर काम करायला हवं.तोच आपल्या आयुष्याचा अर्थ असू शकतो याची जाणीव तिला या प्रवासात होते. ज्युलियनचा हा प्रवास जसा मृत्यूकडून जीवनाकडे चाललेला असतो तसाच तो जगण्याचा अर्थ शोधण्याच्या दिशेनेही सुरू होतो हे विशेष.

जिथे तू अडकली होतीस त्या जंगलाचं पुन्हा तोंडही पाहू नये असं वाटणं साहजिक नाही का,असा प्रश्न पुढे ज्युलियनला अनेकदा विचारला गेला.तिला अर्थातच तसं कधीही वाटत नाही.उलट,अशा खडतर जीवन-मरणाच्या प्रसंगी माणसांच्या प्रतिक्रिया आपण मानतो तशा एका साच्यातल्याच नसतात,हेच ज्युलियनची गोष्ट आपल्याला सांगते.

एकीकडे ज्युलियनच्या मनात स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडण्याची इच्छा कायम असली तरी तिची शक्ती मात्र कमी कमी होऊ लागलेली असते.त्यातच आणखी एक समस्या डोकं वर काढते.

तिच्या खांद्याजवळ एक जखम झालेली असते.

अधूनमधून मान मागे वळवून ती जखम तपासण्याचा चाळा ज्युलियनला लागलेला असतो. एकदा तिच्या लक्षात येतं की त्या जखमेत अळ्या वळवळताहेत.

बहुतेक एक प्रकारच्या माश्यांनी त्या जखमेत अंडी घातलेली असतात आणि त्यातून अळ्या बाहेर आलेल्या असतात.ती जखम डोळ्यांसमोर नसल्यामुळे त्या अळ्या काढणं ज्युलियनसाठी अतिशय अवघड असतं.मान तिरकी करून एका काटकीचा चिमटा तयार करून ती त्या अळ्या काढण्याचा प्रयत्न करते;पण काटकीचा स्पर्श झाल्यावर त्या पुन्हा जखमेच्या आत गायब होतात.

ज्युलियनच्या घरच्या कुत्र्याच्या जखमेतही अशाच अळ्या झाल्याचं तिला आठवतं.तेव्हा त्याच्या जखमेवर केरोसीन टाकून त्या बाहेर काढलेल्या असतात.पण इथे तिच्याकडे ना केरोसीन असतं ना आणखी कुठलं औषघ.त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा काटकीने डिवचून त्या एकेक करून बाहेर काढण्याशिवाय पर्याय नसतो.सध्या तरी त्या अळ्यांमुळे काही त्रास नसला,तरी आपल्या शरीरात अळ्या वळवळताहेत ही जाणीव फारशी चांगली नसते.या अळ्या आपलं शरीर आतून पोखरून काढताहेत,अशी दृश्यं ज्युलियनला आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागतात.

आता नदीचा प्रवाह आणखी मोठा झालेला असतो आणि तो वाहता असल्यामुळे त्यात पोहत पोहत पुढे जाता येऊ शकेल असा शोध ज्युलियनला लागतो. त्यामुळे तिच्या प्रवासाचा वेग वाढतो आणि शक्तीही कमी खर्च होते.नदीत मध्ये मध्ये मोठाले ओंडके पडलेले असतात.त्यांच्यावर न आदळता पुढे जाण्याची कसरत तिला करावी लागते एवढंच.या टप्प्यात तिला नदीकिनारी अनेक प्राणीही दिसतात,पण त्यांची भीती वाटावी असं त्यात कुणीही नसतं.एकदा मात्र ज्युलियन संकटात सापडता सापडता बचावते.थोडा काळ नदीच्या काठी विश्रांती घेत असताना तिला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. छोट्या मगरीच्या पिल्लांचा तो आवाज असतो.ती पिल्लं नदीतून बाहेर येत अगदी तिच्या जवळ येऊन ठेपलेली असतात.पाहते तर त्यांची आईही नदीतून बाहेर पडण्याच्या बेतात असते.पिलांच्या सुरक्षेपोटी ती आपल्यावर जीवघेणा हल्ला करू शकते हे ज्युलियनला माहिती असतं.पण इथेही जंगलाबद्दलचं तिचं ज्ञान आणि अनुभव उपयोगी पडतो.

काठावर येणारी मगर दिसली की कुणीही तिच्यापासून दूर जंगलात पळून जाण्याचा विचार करणार.पण जंगलात घुसलं तर इतर प्राण्यांची भीती तर आहेच,

शिवाय वाट चुकण्याचा धोकाही मोठा आहे,हे ज्युलियनला माहिती असतं. त्यापेक्षा ती स्वतःच्या अनुभवावर विसंबून थेट पाण्यात शिरते आणि मगरीशेजारून पोहत पुढे पुढे जाते. आपण आपल्या मार्गाने गेलं तर मगर आपल्या वाटेला जाणार नाही,हा तिचा होरा बरोबर ठरतो आणि एक धोका टळतो.

आता पोहणं आणि चालणं ज्युलियनसाठी आणखी अवघड होऊ लागलेलं असतं.नजर आणखी धूसर होऊ लागते.आता आणखी तग धरायचा असेल तर काही तरी खायला हवं हे तिला कळत असतं.पण काय खाणार? पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे बेडूक ओरडत असतात.ते पकडून खावेत,असा विचार तिच्या मनात येतो.किळस बाजूला ठेवून ती बेडूक पकडण्याचा प्रयत्नही करते;पण काही केल्या तिला ते जमत नाही.शक्ती आणि चपळता दोन्ही कमी झालेली असल्यामुळे अगदी हातात येऊनही बेडूक तिच्या तावडीतून सुटतात.

दहावा दिवस उजाडतो.आता थोडा काळ विश्रांती घेतल्याशिवाय पुढचा प्रवास शक्य नाही,असं वाटून ती एका ठिकाणी किनाऱ्याशी थांबते.थोडं चालल्यावर तिला समोर एक बोट उभी दिसते.अगदी नवी कोरी करकरीत बोट. आपल्याला नक्कीच भास होतोय याची जणू ज्युलियनला खात्रीच असते;पण तरीही शंका नको म्हणून जवळ जाऊन हात लावून बघते,तर बोट खरीच असते.

किनाऱ्याकडे लक्ष जातं,तर तिथे एक छोटा तंबू उभारलेला तिला दिसतो.ती एका ओढीने त्या तंबूकडे जायला लागते;पण तिच्या अंगात त्राण इतके कमी असतात की शंभर फूट चालायला तिला काही तास लागतात.त्या तंबूत कुणी तरी माणूस असेल अशी तिला आशा असते;पण तिथे कुणीच नसतं.कुणी येऊन गेलंय अशी चिन्हंही नसतात.पण त्या तंबूमुळे ज्युलियनला किमान एक आसरा मिळतो.शिवाय तिथे तिला केरोसीनची बाटली मिळते.ती पाहिल्यावर तिला खांद्याजवळच्या जखमेत झालेल्या अळ्या आठवतात.

महत्प्रयासाने बाटलीचं बूच उघडून ती थोडं थोडं केरोसीन जखमेवर टाकते.प्रचंड वेदना होतात आणि पहिल्यांदा अळ्या आणखी आत जाण्याचा प्रयत्न करतात,पण नंतर मात्र त्या झपाट्याने बाहेर येऊ लागतात.ज्युलियन अशा ३० अळ्या मोजते.सगळ्या बाहेर आलेल्या नसल्या तरी तेवढ्या कामगिरीमुळेही ती स्वतःवर खूप होते.ज्युलियन इतकी थकलेली असते की तिथे मेल्यासारखी झोपून राहते.इतकी चांगली झोप फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही लागणार नाही असं तिच्या मनात येतं.

आता पुढे चालत राहावं की थांबून या तंबूचा मालक येईल याची वाट पाहावी हे ज्युलियनला कळत नाही. नदीच्या काठाशी लागलेली बोट घेऊन पुढे जावं असा मोहही तिला एकदा होतो;पण स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दुसऱ्या माणसाचा जीव धोक्यात घालणं तिला पटत नाही.शिवाय या अशक्त अवस्थेत ती बोट चालवू शकेल का याबाबतही शंका असतेच.त्यामुळे आणखी थोडी विश्रांती घेऊन चालणं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेते.

बाहेर पाऊस पडत असतो आणि आत ज्युलियन अर्धवट जागी अर्धवट ग्लानीत पडून असते.डोक्यात नाना विचारांचा गोंधळ उडालेला असतो.तिच्या मनात येतं,अपघाताला दहा दिवस नक्कीच उलटून गेले आहेत.आतापर्यंत नक्कीच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं गेलं असणार.

फक्त आपणच या जंगलात एकटे भरकटतोय.आपली सुटका होण्याआधीच आपण मरून गेलो तर आपला शेवट कुठे झाला हे जगात कुणालाही कळणार नाही.दहा दिवस आपण कोणत्या परिस्थितीतून गेलो,किती धीराने-किती कष्ट घेऊन चालत राहिलो हे जगात कधीच कुणाला कळणार नाही,ही भावना तिला व्यापून टाकते.कालपर्यंत आपल्या गोतावळ्यात असणारा माणूस असा अचानक कसा नाहीसा होऊ शकतो,या नियतीच्या खेळाचं तिला प्रचंड कोडं वाटत राहतं.या परिस्थितीचं नवल करत ती पडून राहते.... आणि तितक्यात बाहेरून माणसांचे आवाज ऐकू येतात.आधी ज्युलियनला हाही भासच वाटतो.पण हळूहळू ते आवाज जवळ येतात,तिच्या समोर येऊन उभे ठाकतात.त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, धक्का आणि भीतीचं मिश्रण असतं.त्यांनी काही विचारण्याआधीच ज्युलियन बोलू लागते,"मी लान्सा क्रॅशमधून वाचलेली मुलगी आहे.माझं नाव ज्युलियन, मी गेल्या दहा दिवसांपासून चालते आहे.आणि आता मरणाची दमले आहे."तिचं बोलणं ऐकल्यावर त्या माणसांचे चेहरे बदलतात.ते भराभर तिला हवं-नको ते बघायला लागतात.

आपल्याकडचं खाणं काढून तिला देतात.खरं तर त्या दिवशी या तंबूकडे येण्याचा त्यांचा अजिबात विचार नसतो;पण सहज म्हणून ते तिथे येतात आणि त्यांना ज्युलियन सापडते.

ज्युलियन सुखरूप हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचते. वडिलांना भेटते.पण लिन्साच्या अपघातात वाचलेले आपण एकमेव प्रवासी आहोत आणि आपल्या आईसह इतर सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याचं तिला कळतं.

आपण वाचल्याचा आनंद घ्यावा की आईच्या मृत्यूचं दुःख करावं अशा नव्या पेचात ती सापडते.हीच द्विधा अवस्था तिचे वडीलही अनुभवत असतात.मुलगी सापडली याचा आनंद तर असतोच;पण त्यांचं आपल्या पत्नीवर इतकं प्रेम असतं की त्या धक्क्यातून ते कधीच सावरू शकत नाहीत.त्यामुळे जंगलातल्या संकटातून वाचली असली तरी नव्या परिस्थितीत नव्या समीकरणांसह आयुष्याची घडी बसवण्याच्या नव्या आव्हानाला तिला सामोरं जावं लागतं.

ज्युलियन सुखरूप बचावल्याची बातमी जगभर पोहोचल्यावर आणि नंतरही ती किती धाडसी आणि असामान्य आहे असा कौतुकवर्षाव तिच्यावर झाला-अजूनही होत असतो.पण ज्युलियन म्हणते,'मी असामान्य अजिबातच नव्हते.आजही नाही.आई-वडिलांनी मला जंगलाच्या सान्निध्यात वाढवलं म्हणून मी तिथे तरू शकले;पण माझ्या जागी आणखी कोणी असतं तरी त्यांनीही तेवढंच धाडस दाखवलं असतं.असामान्य परिस्थिती आपल्याला त्या त्या वेळी असामान्य बनवते,हे त्यामागचं खरं कारण असलं पाहिजे.

माझ्या लाडक्या सर्व वाचकांचे आभार व धन्यवाद.मृत्यू पाहिलेली माणसं,मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या,संकटांच्या वावटळीत तग धरून राहणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांना,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन,आतापर्यंत आपण नऊ कहाण्या वाचल्या.ह्या कहाण्या व या पुस्तकाचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे.पण आपल्या सोबतचा हा वाचण प्रवास निरंतर सुरुच राहील.

… समाप्त