* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: म्होरक्याचा अस्त / Leader's level

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/27/26

म्होरक्याचा अस्त / Leader's level

मंकी हिलवर पुन्हा सगळं स्थिरस्थावर झालं होतं. माझं जाणं-येणं पुन्हा पहिल्यासारखंच सुरू होतं. गौरी-राणी-राजीही जणू काही घडलंच नाही असं वागत होत्या.

त्यांच्या दृष्टीने खरोखरच वेगळं काही घडलं नव्हतं.मी त्यांच्या पिल्लाला घाबरवलं होतं आणि त्यावरची प्रतिक्रिया म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता.ही घटना घडून गेल्यावर काही महिन्यांनंतरची गोष्ट असेल.पावसाळ्याचे दिवस होते.एके दिवशी प्रचंड पाऊस लागला होता.मंगळवारचा सुट्टीचा दिवस आणि पावसाचा जोर म्हणून आम्ही सगळ्या माकडांना उबदार इनडोअर सेक्शनमध्ये ट्रॅप करायला लागलो.आत त्यांच्यासाठी हीटिंग लॅम्प लावलेले होते.गौरी,संपत, राणी,राजी,पिल्लं सगळे आत गेले;पण आक्क्याला मात्र काही केल्या आत यायचं नव्हतं.त्याला काय झालं होतं कोण जाणे,दिवसभर तो झाडावरच मुसळधार पावसात भिजत राहिला.रात्रही तशीच गेली.सकाळी ज्याची भीती होती तेच झालं.मंकी हिलपाशी येऊन पाहिलं तर आक्क्या तापाने फणफणलेला.त्याला लगेच पार्कच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं;पण इतका वेळ पाण्यात भिजल्यामुळे त्याला न्युमोनिया झाला.काही केल्या ताप उतरेना.उलट वाढतच गेला.आमच्या ध्यानीमनी नसताना आठ दिवसांत तो गेलाच.

आक्क्याच्या जाण्याने मंकी हिल हादरून गेलं. आक्क्या बरा होऊन परत येईल,या आशेवर गौरी सतत हॉस्पिटलकडे डोळे लावून होती.आक्क्या गेल्यानंतर दोन-तीन आठवडे गौरीची आशा कायम होती. आक्क्याच्या जागेवर बसून ती आक्क्याला नेलं त्या दिशेकडे टक लावून बघत राहायची.आक्क्या आणि गौरीचं बाळ (म्हणजे मोबाइल) आता वर्षाचं झालं होतं. राजीचा चिकूही आईला सोडून थोडाफार हिंडू फिरु लागला होता.राणीचा भिकू मात्र तान्हाच होता.भिकू हा संपतचा मुलगा.तोही संपतसारखाच भित्रा होता. आक्क्याविना असतोच.तो साधारणपणे इतरांपेक्षा दाणगट,टग्या असतो.बहूधा तो नरच असतो.त्यामुळेच या पदाला अल्फा मेल असंही म्हणतात.टोळीचे महत्त्वाचे निर्णय त्यानेच घ्यायचे असतात.एखादा शत्रू आला तर त्यानेच हल्ला करणं अपेक्षित असतं.मंकी हिलवरच्या कुठल्याही पिल्लावर एखादी घार किंवा अन्य शिकारी पक्षी झेपावला,तर आक्क्याच त्याचा हल्ला परतवून लावत असे.आक्क्याची जागा घ्यायला भित्रा संपत सक्षम नव्हता.त्याचा पिंडच आज्ञा स्वीकारण्याचा होता.पांडू असता तर नक्कीच त्याने ही जागा भरून काढली असती.पण तो तर केव्हाच पळून गेला होता.आम्ही आता या टोळीकडे अधिक कुतूहलाने पाहू लागलो.आक्क्या आपल्या नेहमीच्या फांदीवर बसून रुबाबात फांदी गदागदा हलवत आपले वर्चस्व सिद्ध करत असे.त्या जागेवरून परिसराची टेहेळणी करत असे.आक्क्याच्या निधनानंतर गौरी आता त्याच्या जागेवर बसून राहू लागली.

एकदा पार्कबाहेरच्या रस्त्यावर भटकी कुत्री पकडायची गाडी आली आणि गौरीने त्याच जागेवरून आक्क्यासारखाच ख्व्यॉक व्यॉक आवाज काढून आपल्या कंपूला धोक्याचा इशारा दिला.

आम्हाला आश्चर्य वाटलं आणि तिच्या त्या समंजस वागण्याचा आनंदही झाला.एके काळची लाजरी-बुजरी गौरी आता चक्क टोळीची 'अल्फा' झाली होती.

माकडांच्या कंपूला आता गौरीच्या रूपाने 'अल्फा फिमेल' मिळाली आणि इतरांनीही बिनबोभाट तिचा स्वीकार केला.माकडांसाठी वाढलेल्या जेवणाचा पहिला मान गौरीला मिळू लागला.स्वभावाने लाजरी असली तरी मुळात ती अंगापिंडाने इतर माकडिंणींपेक्षा,अगदी संपतपेक्षाही तशी मजबूत होती.आश्चर्य म्हणजे टोळीचं म्होरकेपद स्वीकारल्यावर गौरीचा आहारही बदलला. सर्वांसाठी दिलेल्या खाण्यातले चांगलेचुंगले पदार्थ वेचून ती खाऊ लागली शिवाय आहाराचं प्रमाण वाढलं. त्यामुळे वजनही वाढलं.स्वभावात जरब आणि आक्रमकता आली.गौरी टीम लीडर झाल्यामुळे अर्थातच तिने मोबाइलवर लक्ष केंद्रित केलं.आक्क्याचा मुलगा असल्याने त्याला टोळीत विशेष स्थान होतं. त्यामुळे लवकरच त्याने आपल्या आईच्या डेप्युटीची जागा घेतली आणि संपत आपसूकच तिसऱ्या स्थानावर गेला.आणखी एक वर्ष गेलं. (सोयरे - वनचरे - अनिल खैर,समकालीन प्रकाशन)

या काळात गौरीने मोबाइलला चांगलंच तयार केलं. तिलाही न जमणाऱ्या कसरती त्याच्याकडून करवून घेतल्या;घार,घुबड व अन्य पक्ष्यांचे हल्ले परतवून लावायला शिकवलं.बापाचे नेतृत्वगुण त्याच्या स्वभावात होतेच.लवकरच मोबाइल पूर्ण प्रौढ झाला.रुंद खांदे, प्रचंड ताकद,चमकदार केसांचा कोट,अत्यंत सावध नजर आणि धाडसी स्वभाव.या टोळीचा पुढचा म्होरक्या हाच,हे आम्हाला कळून चुकलं.त्याप्रमाणे एके दिवशी सहजच त्याने आक्क्याच्या जागेवर जाऊन व्याँक.. ळ्याँक अशी आरोळी ठोकली आणि गौरीसकट सगळ्यांनी त्याच्या नेतृत्वाला मान्यता दिली आणि आमचा छोटा मोबाइल मंकी हिलचा अल्फा मेल झाला. 

थोडक्यात बचावलो…

नोव्हेंबर महिन्यातल्या एका गुरुवारी सर्पकुंडाचं काम करणाऱ्या गणपतची साप्ताहिक सुट्टी होती.राऊतलाही यायला आज उशीर झाला होता.सर्पकुंडामध्ये थोडा कचरा पडलेला दिसला.पाणीही गढूळ झालं होतं. म्हणून मी सर्पकुंडामध्ये उतरून साफसफाई करू लागलो.पाणी बदलून होत असतानाच चिखलीमधल्या मैला शुद्धीकरण केंद्रातील एक कर्मचारी घाईगडबडीत आला अन् म्हणाला,"साहेब,आमच्या प्लांटवर साप आल्याती.चला चला,लवकर चला." मी पिटबाहेर आलो,साप पकडण्याची हुक स्टिक घेतली आणि त्याच्यासोबत निघालो.मैला शुद्धीकरण प्लांटवर त्या वेळेस गांडूळखत प्रकल्प चालू होता.कुजणारा कचरा,पालापाचोळा,त्यातून निर्माण होणारे सूक्ष्म कृमी,ते खाण्यासाठी येणारे पक्षी, उंदीर आणि उंदरांच्या मागावर येणारे साप असं सगळं पोषक वातावरण होतं.तिथल्या पाचोळ्यामध्ये घोणस जातीच्या सापांची जोडी शांतपणे विसावली होती.नर साधारण तीन फूट लांबीचा होता.त्याला हुक स्टिकने अलगद पकडून पिशवीमध्ये ठेवला.त्या गडबडीत मादी तिथे पडलेल्या फूटभर व्यासाच्या सिमेंट पाइपमध्ये जाऊन दडली.तिथल्या लोकांना एका बाजूकडून पाइप उचलायला सांगून दुसऱ्या बाजूकडून साप बाहेर येण्याची सावधपणे वाट पाहू लागलो.

अपेक्षेप्रमाणे ती मादी माझ्याकडच्या बाजूला वेगाने बाहेर आली.सुमारे साडेतीन फूट लांबी,त्रिकोणी डोकं,तपकिरी रंग आणि त्यावर ठळक बदामी रंगाचे ठिपके.अतिशय चपळ होती ती.मी आजवर हाताळलेल्या घोणसांपेक्षा ती जरा वेगळीच वाटली.हुक स्टिकच्या साहाय्याने तिला उचलेपर्यंत ती तीनदा निसटली.मोकळ्या जागेतून ही बया झाडाझुडपांमध्ये गायब झाली असती तर पुन्हा सापडणं अवघड झालं असतं.म्हणून मी एका झटक्यातच डाव्या हाताने तिचं शेपूट धरून तिला मोकळ्या जागेत आणली.हुक- स्टिक तिच्या समोर धरली.तेवढ्यात ती झटकन वळली आणि हुक-स्टिकला चकवून तिने माझ्या गुडघ्यावर हल्ला केला. तिचा उजवा विषदंत पँटच्या कापडातच अडकला,पण डावा विषदंत मात्र पँटमधून गुडघ्यापर्यंत पोचलाच. तिला चावण्यासाठी म्हणावी तशी ग्रिप मिळाली नसली तरी थोडं तरी विष पसरलं असणारच.मी एका क्षणात पँट काढली आणि शेजारीच असणाऱ्या अनिल राऊतकडे स्टिक दिली.साप पकडण्याचं काम त्याच्यावर सोपवून मी बाहेर धावलो.

दरम्यान,तिथल्या प्लांटवरचे एक अभियंता संजय खाबडे त्यांची कार घेऊन आले. गाडीत मी कसाबसा बसलो.त्यांच्या मोबाइलवरून मी आधी अण्णाला फोन लावला.वायसीएमला अ‍ॅडमिट व्हायला सांगून त्याने मला धीर दिला आणि सूत्रं हातात घेतली.त्यानंतर तो सतत खाबडेसाहेबांच्या संपर्कात होता.

दरम्यान,मी पालिका आयुक्तांच्या ऑफिसमध्ये फोन करून जे घडलंय त्याची कल्पना दिली.हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी अण्णाचा पुन्हा फोन आला, वायसीएमएला अँटिव्हेनम इंजेक्शन तयार आहे. त्यापाठोपाठ आयुक्तांच्या पीएचाही फोन,डॉ.फडणीस आणि इंजेक्शन्स तयार आहेत.लवकरात लवकर पोहोचा.पंधरा मिनिटांत आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो.तोवर उजवा पाय पूर्ण आखडून गेला होता. मला स्ट्रेचरवरूनच आत न्यावं लागलं.

अँटिव्हेनम देण्याआधी त्याची टेस्ट करावी लागते.त्यानुसार टेस्ट डोस देऊन अर्ध्या-पाऊण तासाने इंजक्शन दिलं गेलं. डॉ.फडणीस सोबत होतेच.अण्णाही सतत फोनवर होता.थोड्या वेळात आमचा मित्र डॉ.अमित कामतही दाखल झाला.'सर,काळजी करू नका सर्व काही ठीक होईल.मी आता तुमच्यासोबतच थांबणार आहे', असं त्याने म्हटल्यामुळे मी खरोखरच शांत झालो.

अजूनही माझं रक्ताभिसरण,हृदयक्रिया आणि मूत्रपिंडाचं कार्य सगळं व्यवस्थित चालू होतं.ते पाहून डॉ.फडणीस म्हणाले "विषाचा परिणाम आता म्हणावा तसा राहिलेला नाही.धोका टळलेला दिसतोय.पण तरी पुढच्या अड्डेचाळीस तासांसाठी कीप युवर फिंगर्स क्रॉस्ड !"

अड्ठेचाळीस तासही उलटले.मी त्या सर्पदंशातून सुखरूप बचावलो.साप हाताळण्याचा इतक्या वर्षांचा अनुभव असला तरी प्रत्येक प्रसंगातून काही तरी शिकता येतं.कारण कितीही सावधगिरी बाळगली तरी सर्पदंशाला सामोरं जावं लागू शकतं.मग तुम्ही साप हाताळत असा किंवा नसा.पण तशी वेळ आली,तर

मानसिक संतुलन बिघडू न देता शांत राहणं महत्त्वाचं असतं.वेळ न दवडता हॉस्पिटलमध्ये जाणं अत्यावश्यक असतं.त्या दिवशी गुडघ्याच्या वाटीऐवजी आजूबाजूला दुसऱ्या विषदंताचा दंश झाला असता तर माझ्या शरीरात दुप्पट विष भिनलं असतं.नाग आणि मण्यार यांचं विष मज्जासंस्थेवर परिणाम करणारं असतं,तर घोणस आणि फुरसं यांचं विष शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम करतं.निसर्गप्रेमींच्या,पशू-पक्षी-प्राणी आणि सर्पमित्रांच्या जागरुकतेमुळे वन्य-जीवांचं संरक्षण मोठ्या प्रमाणात होत आहे.पण त्याचबरोबर वन्य जीव हाताळताना त्यांनीही खूपच सावधगिरी बाळगण्याची गरज असते. माझ्याच उदाहरणावरून मी हे नक्की सांगू शकतो. "

●●● समाप्त ●●●