'द सेल्फिश जीन' हे पुस्तक उत्क्रांतीचा जनुककेंद्रित प्रवास सांगणारं असून आज उत्क्रांतीच्या अभ्यासातला मैलाचा दगड समजलं जातं.या संपूर्ण प्रवासात सजीवांमधला जीन हा अत्यंत स्वार्थीपणे वागतो हे सूत्र मांडणारं 'द सेल्फिश जीन' हे पुस्तक वैज्ञानिकांसाठी बायबल आहे.अनेकांच्या आयुष्याचा कायापालट या पुस्तकाच्या वाचनानं झाला असल्याचं सांगितलं जातं.रिचर्ड डॉकिन्सच्या मते,"शुद्ध परहित जोपासणं,उत्तम संस्कृती,नव्या पिढीचं उत्तम पालनपोषण याची मनुष्य म्हणून आपण 'आता' चर्चा करू शकतो;परंतु जगाच्या संपूर्ण इतिहासात या सगळ्यांचं अस्तित्व पूर्वी अगदी प्राथमिक काळात कधीच नव्हतं.' "
१९७६ साली 'द सेल्फिश जीन' नावाचं एक देखणं,रंगीत मुखपृष्ठ असलेलं पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं प्रकाशित केलं.पुस्तकाचं शीर्षक ऐकून अनेकांच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या;पण त्याच वेळी त्या पुस्तकावर असलेलं लेखकाचं नाव वाचून त्यांची त्या पुस्तकाविषयीची उत्सुकताही चाळवली गेली,कारण त्या लेखकाचं वैशिष्ट्यच असं होतं की,त्यानं हे पुस्तक लिहिलंय आणि या पुस्तकाचं शीर्षक 'द सेल्फिश जीन' आहे म्हणजे यामागे काही तरी कारण असणार,असा लोकांचा ठाम विश्वासही होता.शिवाय या पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार केलं होतं,विख्यात प्राणिशास्त्रज्ञ डेस्मंड मॉरिस यानं विज्ञानविश्वातली उत्सुकता ताणणाऱ्या २२४ पानं असलेल्या या पुस्तकाच्या लेखकाचं नाव होत रिचर्ड डॉकिन्स ! चार्ल्स डार्विननंतर उत्क्रांतिवादी जीवनशास्त्रज्ञ म्हणून त्याचं नाव मानानं घेतलं जातं.
वर्षभरातच 'द सेल्फिश जीन' हे पुस्तक जगातल्या पहिल्या उत्कृष्ट १०० पुस्तकांच्या यादीत जाऊन बसल.जे पुस्तक जॉर्ज विल्यम्स यांनी १९६६ साली मांडलेल्या अनुकूलन आणि निसर्गनिवडीच्या सिद्धांतावर आधारित चर्चा करणारं होतं.पुस्तकाची सुरुवातच मुळी रिचर्ड डॉकिन्स यांनी जॉर्ज विल्यम्स यांच्या निसर्गनिवडीच्या सिद्धांतावर युक्तिवाद करत केली आहे.दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार या गोष्टी कोणत्याही सजीवाच्या ग्रुप बेनेफिट म्हणजेच गटाच्या फायद्याचा परिणाम नसून एखाद्या दुर्मीळ परिस्थितीत जनुकानं केलेल्या निसर्गनिवडीवरच आधारित आहे.थोडक्यात काय तर कोणत्याही जनुकाच्या जेव्हा अनेक प्रती तयार होत असतात आणि नव्या प्रतीमध्ये बदल घडत असतात त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं.म्हणजेच उत्परिवर्तन होत असतं त्या वेळी जी निसर्गनिवड जनुकाकडून केली जाते.ती खरं तर त्या सजीवाच्या संपूर्ण गटाच्या फायद्याथी आहे की नाही याचा विचार झालेला नसतो.जनुक त्या वेळी केवळ स्वकेंद्रित,स्वत: पुरताच विचार करून हे बदल घडवतं.म्हणजेच त्या क्षणी केवळ जनूकाच्या फायद्याचे निकष लावले जातात संपूर्ण सजीवाच्या जातीचा विचार केला जात नाही.थोडक्यात, या वेळी जनुक म्हणजेच जीन अत्यंत स्वार्थीपणे वागत असतं. कुठल्याही परिणामांचा विचार न करता उपलब्ध परिस्थितीत उपलब्ध असलेल्या रेणूंचा वापर स्वतःसाठी करणं इतकच काय ते त्या जीनला समजत असत.
त्यामुळेच या पुस्तकाचं शीर्षक समर्पक ठरले आहे.
अत्यंत टोकाच्या परिस्थितीतही हे जीन्स स्वतःच्या प्रती तयार करायला चुकत नाहीत.अत्यंत उच्च अशा पातळीवर उत्क्रांत होत राहाणं हे आणि इतकंच त्या जीन्सना समजतं.खरं तर विचार करणं या प्रक्रियेसाठी जीन्सना मेंदूसारखा अवयव नाही.नवी वंशावळ तयार करणं इतकंच ते जाणतात.
रिचर्ड डॉकिन्स या लेखकानं आपल्या 'द सेल्फिश जीन' या पुस्तकात काही उदाहरणंदेखील दिली आहेत.हरणांच्या जातीत ते आपले चारही पाय हवेत फिरवून उंच उडी मारून ठरावीक आवाज काढून आपल्या जातिबांधवांना संकटाचा इशारा देतात,
जेणेकरून होणाऱ्या हल्ल्यापासून ते वाचू शकतील.दुसरे उदाहरण म्हणजे डॉल्फिन मासा जर जखमी झाला.तर इतर मासे त्याला समुद्राच्या किनारी येण्यासाठी मदत करतात.त्यामुळे त्याला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होऊ शकतो याची जाणीव त्यांना असते.तिसरं उदाहरण म्हणजे वटवाघळ आपलं अन्न इतर अन्न न मिळालेल्या वटवाघळांबरोबर वाटून घेतात.तसंच मधमाश्यांमध्ये कामगार माश्या आपला स्वतःचा पुनरुत्पादनाचा हक्क सोडून राणीमाशीला सुरक्षा देणं,तिला अन्न पुरवणं आणि घर बांधणं अशी कामं करतात.
अशा प्रकारच्या उदाहरणावरून प्रत्येक सजीव जमात ही एकमेकाचे संरक्षण करण्याकरता एकमेकांना मदत करत असते.
असं करत असताना एकीकडे त्यांच्यामधली निःस्वार्थ वृत्ती आपल्या लक्षात येते,पण ही वृत्ती केवळ त्यांच्या जमातीपुरतीच मर्यादित असते.प्रसंगी स्वतःपुरता त्रास किंवा नुकसान सहन करूनही संबंधित जमात जगवली जाते.याचं एकमेव कारण म्हणजे वंश टिकवणं हेच असतं. म्हणजेच आपल्या जीन्सना पुढे ढकलणं.थोडक्यात,
जीन्सना स्वतः च्या अस्तित्वासाठी काही सजीवांचे बळी द्यावे लागले तरी चालतील,पण वंश टिकवला पाहिजे,ही भूमिका त्यामागे असते.जीन टिकवणं अत्यंत गरजेचं असतं. समजा,एका स्त्रीला तीन तरुण मुलं आहेत आणि त्या स्त्रीचं वय ६० वर्ष आहे.या चारपैकी एकाचा मृत्यू गृहीत धरायचा असल्यास तर त्यात पहिल्यांदा ही ६० वर्षांची स्त्री मृत्यूसाठी तयार होईल.या वेळी प्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवून बघितलं तर जीवशास्त्रानुसार ती स्त्री आता पुनरुत्पादनासाठी योग्य नाही;पण त्याच वेळी तिची तिन्ही मुलं वंश टिकवण्याच्या दृष्टीनं सक्षम आहेत आणि या गोष्टीकरिता आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ती स्त्री स्वत:चा मृत्यू ओढवून घेऊ शकते.यामध्ये समान सजीव जातींमध्ये परोपकार,निःस्वार्थीपणा दिसून येतो;पण जीन मात्र या ठिकाणी स्वार्थी ठरतं.अशा प्रकारचं सजीवांचं वागणं त्या त्या प्रजाती टिकवण्याकरिता आवश्यक असतं.समान प्रजातींमध्ये तसं न झाल्यास त्यांच्या त्यांच्यात भांडण होऊन ती ठरावीक प्रजाती नष्ट होण्याची शक्यता वाढते.
विज्ञान या विषयातलं असलं तरी 'द सेल्फिश जीन' हे पुस्तक आपल्याला अंगावर थरार उठतील अशा वाचनाचा अनुभव देतं.रिचर्ड डॉकिन्सनं या पुस्तकात अनेक उदाहरणं देत अनेक प्रकारची गुंतागुंत उलगडून दाखवली
आहे.उत्क्रांतीचा जनुककेंद्रित प्रवास सांगणार हे पुस्तक आजही उत्क्रांतीच्या अभ्यासातला मैलाचा दगड समजलं जातं.जीवसृष्टीच्या उत्पत्तीचं आणि विकासाचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारी उत्क्रांतीची अभ्यासशाखा मानवाच्या जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा विषय आहे.
या आदिम रहस्याच्या उकलीच्या प्रवासाची मुहूर्तमेढ खरं तर डार्विननं १८५९ सालीच रोवली.या प्रवासात उत्क्रांतीवर अभ्यास करणाऱ्या अनेक अभ्यासकांनी आपल्या ज्ञानानं, बुद्धीनं आपापलं ज्ञान जगासमोर मांडलं,पण या संपूर्ण प्रवासात सजीवांमधला जीन हा अत्यंत स्वार्थीपणे वागतो,हे सूत्र मांडणारं 'द सेल्फिश जीन' हे पुस्तक वैज्ञानिकांसाठी बायबल आहे.अनेकांच्या आयुष्याचा कायापालट या पुस्तकाच्या वाचनानं झाला असल्याच सांगितलं जातं.रिचर्ड डॉकिन्सच्या मते 'शुद्ध परहित जोपासणं,उत्तम संस्कृती,नव्या पिढीचं उत्तम पालनपोषण याची मनुष्य म्हणून आपण आता चर्चा करू शकतो,परंतु जगाच्या संपूर्ण इतिहासात या सगळ्यांचं अस्तित्व पूर्वी अगदी प्राथमिक काळात कधीच नव्हतं.' शिवाय या पुस्तकावर अभिप्राय म्हणून किंवा टीका म्हणून प्राइमॅटॉलॉजिस्ट फ्रान्स डी वॉल म्हणतात,
'मानवाने बुद्धिमत्ता आणि मानवतेच्या आधारावर या स्वार्थी प्रतिकृतींवर विजय मिळवला आहे.' यावर रिचर्ड डॉकिन्स असं म्हणतो,की कुठल्याही नैतिकतेबद्दल या पुस्तकात चर्चा केलेली नाही, तर सजीवांच्या उत्क्रांतीविषयीच्या गुणधर्मांवर चर्चा केली आहे.
शिवाय या पुस्तकाच्या ३० व्या वर्धापनदिनी डॉकिन्सनं असंही म्हटलं की,या पुस्तकाचं नाव बदलण्याची संधी मिळाली तर याचं नाव मी इमॉर्टल जीन असं ठेवीन.
त्यामुळे कदाचित या नावामुळे वाचकांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ टाळता येऊ शकेल.सगळ्यात महत्त्वाच म्हणजे (एमईएमई)
मेमे नावाचा शब्द डॉकिन्सन या पुस्तकात सर्वप्रथम वापरात आणला.
मीम ही एक कल्पना,ही एक शैली किंवा एक वर्तन आहे जे एखाद्या संस्कृतीतल्या व्यक्तीच्या अनुकरणातून पसरते आणि बरेचदा एखाद्या घटनेचं,संकल्पनेचं प्रतिनिधित्व करते.एखादी सांस्कृतिक कल्पना प्रतीक किंवा सराव यासाठी एक युनिट म्हणून वापरलं जाऊ शकतं.
'सेल्फिश जीन' हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिणाऱ्या रिचर्ड डॉकिन्स या लेखकाचा जन्म २६ मार्च १९४१ या दिवशी नैरोबी म्हणजे आताच्या ब्रिटिश केनिया इथे झाला.
त्याचे वडील क्लिंटन जॉन डॉकिन्स आणि आई जीनमेरी यांनी आपल्या या मुलाचं नाव क्लिंटन रिचर्ड असं ठेवलं होतं.पुढे क्लिंटन हे नाव कागदोपत्री बदलून रिचर्ड डॉकिन्स हेच नाव रूढ झालं. रिचर्ड डॉकिन्सला सारा नावाची एक लहान बहीणही होती.रिचर्ड डॉकिन्सच्या वडिलांची पूर्वापार वारसाहक्कानं मिळालेली खूपच मोठी शेतजमीन होती.ते एक व्यावसायिक शेतकरी होते.बालपणीच्या रिचर्डच्या आयुष्यात विशेष असं काही सांगण्यासारखं नाही.रिचर्डच्या आई- वडिलांना निसर्गविज्ञानात खूपच रस होता.रिचर्ड डॉकिन्सच्या विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना आनंदच मिळत असे.घरात विज्ञानाला पोषक असं वातावरण असलं तरी ते सगळे नियमित चर्चेलादेखील जात असत.मात्र घरात विचार करण्याचं,चर्चा करण्याचं स्वातंत्र्य होतं.
खरं तर वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत रिचर्ड डॉकिन्स चर्चमध्ये जाऊन प्रार्थना म्हणत असे आणि परमेश्वरावरही त्याचा नितांत विश्वास होता.वयाच्या १५ व्या वर्षी त्यानं डार्विनचं उत्क्रांतीवादावरचं लिखाण वाचलं आणि त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.त्यानं चर्चमध्ये जाणं सोडलं, कारण त्याच्या मनाला अनेक प्रश्न पडायला लागले.ज्या लोकांचा 'परमेश्वर' या संकल्पनेवर विश्वास आहे ते लोक जीवशास्त्रातल्या गूढ़ रहस्याबद्दल इतके मागासलेले कसे काय असू शकतात?तसंच विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांचा परमेश्वर नावाच्या गोष्टीवर विश्वास कसा काय असू शकतो ? काही भौतिकशास्त्रज्ञ विश्वातल्या विस्मयकारक गोष्टींना 'परमेश्वर' असं संबोधन देतात;पण त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ आणि गैरसमज निर्माण होऊ शकतो.
१९५४ ते १९५९ दरम्यान शालेय शिक्षण संपल्यानंतर रिचर्ड डॉकिन्स यानं ऑक्सफर्ड इथल्या बेलिऑल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या काळात त्यानं विख्यात साहित्यिक,गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ सर बर्टांड रसेल याचं 'व्हाय आय अॅम नॉट अ ख्रिश्चियन' नावाचं पुस्तक वाचलं आणि तो पूर्णपणे नास्तिक बनला. १९६२ साली डॉकिन्सनं प्राणिशास्त्रातली पदवी मिळवली.शिकत असताना रिचर्ड डॉकिन्सला निकोलस टीनबेर्गन नावाचे नोबेल विजेते नीतिशास्त्रज्ञ शिकवत असत.पदवी मिळवल्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रिचर्ड डॉकिन्सन एमए आणि त्यानंतर फिलॉसॉफीमध्ये डॉक्टरेटही मिळवली.१९६७ ते १९६९ या काळात रिचर्ड डॉकिन्सनं कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रोफेसर म्हणूनही काम केलं.
उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आणि प्रोफेसर म्हणून काम करत असतानाच डॉकिन्सनं लिखाणही केलं.१९६७ साली 'सेल्फिश जीन' नंतर १९८२ साली 'द एक्स्टेंडेड फिनोटाइप',तर १९८६ साली 'द ब्लाइंड वॉचमेकर',२००६ साली 'गॉड डिल्यूजन',२०११ साली 'द मॅजिक ऑफ रिअॅलिटी' नावाची अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरची पुस्तकं लिहिली.
त्याचं 'गॉड डिल्यूजन' म्हणजेच 'देवनामाचा भ्रम' हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच लोकप्रिय झालं. अल्पावधीत या पुस्तकाच्या ३० लाखांपेक्षाही जास्त प्रती विकल्या गेल्या.यात अनेक धार्मिक विश्वासांवर डॉकिन्सनं टीका केली आहे.त्याच्या मते या पद्धतीची विश्वासाची भावना तर्कहीन आहे.
उदाहरणार्थ,येशूने पाण्याची वाइन बनवली किंवा सूर्य कोरड्या पाण्यावर पडतो किंवा चंद्राची विभागणी केली वगैरे.या विश्वात कोणतीही अतींद्रिय शक्ती नाही.तसंच विश्वाची रचना केवळ मानवकेंद्रित असल्याचं मानणंदेखील बालिशपणाचं आहे,असं डॉकिन्सचं मत आहे
.ज्योतिषशास्त्र मानणं म्हणजे खगोलशास्त्राचा अपमान असल्याचं तो म्हणतो.
आस्तिक लोक परमेश्वर आहे,पण तो असल्याचं सिद्ध करता येत नाही,असं म्हणतात. परमेश्वर नाही ही गोष्ट तुम्ही सिद्ध करून दाखवा,असं त्यांचं म्हणणं असतं.यावर रिचर्ड डॉकिन्स अत्यंत रोचक पद्धतीनं उदाहरण देत म्हणतो,लहान असताना आपण सगळेच पऱ्यांच्या गोष्टी ऐकतो आणि वाचतो.त्या वेळी परी खरोखरच असते असंच आपल्याला वाटत असतं;पण पुढे जसजसे आपण मोठे होत जातो तसतशी ही परी अस्तित्वात नसते हे आपल्याला कळत.थोडक्यात,परी नाही हे सिद्ध होण्याची वाट बघायची की आपली सारासार बुद्धी वापरायची,असा प्रश्न तो वाचकांना करतो.
विज्ञानवादी असणारा रिचर्ड डॉकिन्स धर्म आणि धर्मग्रंथ यावरही परखडपणे आपली मत मांडतो.
धर्माची झापड लावणाऱ्यांना झापडबंद अनुयायीच हवे असतात.त्यांनी कशाचीही चिकित्सा न करता डोळे मिटून आपल्या धर्मग्रंथांवर विश्वास ठेवला पाहिजे.हेच त्यांना हवं असतं.रिचर्ड डॉकिन्सच्या मते अशा धर्माची आपल्याला काहीही आवश्यकता नसून आपल्याला प्रेम,शांतता,सदाचार ही मूल्य जागवणारं वातावरण हवं आहे.निवृत्तीची शिकवण देणारा धर्म आपल्या जीवित असण्याचा एक तऱ्हेनं अपमान आहे.
'सत्य हे आपल्या सोयीचं नसतं.ते अनुकूल असू शकतं किंवा प्रतिकूल असू शकतं.ते जर सत्य म्हणून सिद्ध झालं तर स्वीकारलं पाहिजे.आजवरच्या धर्मग्रंथांनी केवळ पाप-पुण्याचा हिशोब केलाय,पण प्रत्यक्षात देवीसारख्या रोगांवर विज्ञानातल्या संशोधनामुळेच लस शोधता आली आहे,'असं ठणकावून रिचर्ड डॉकिन्स सांगतो.
त्यानंतर व्हिएटनाम युद्धाला विरोध म्हणून रिचर्ड डॉकिन्स यानं कॅलिफोर्निया सोडून ऑक्सफर्ड इथे शिकवायला सुरुवात केली.१९७० सालापासून ऑक्सफर्ड इथेच डॉकिन्स फेलो म्हणूनही रुजू झाला.अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यानं व्याख्यानं दिली.त्यातली डॉकिन्सची गाजलेली व्याख्यानं म्हणजे
१९८९ मध्ये दिलेलं हेन्री सॅडविक मेमोरियल लेक्चर,१९९० मधलं एरॅसमस डार्विन मेमोरियल लेक्चर,१९९१ मधलं द मायकेल फॅरेडे लेक्चर,
डॉकिन्सन अनेक जर्नल्ससाठी संपादकाचंही काम बघितल.'एन्कार्टा सायक्लोपीडिया' आणि 'एनसायक्लोपीडिया ऑफ इव्हाल्यूशन' यासाठी सल्लागार संपादकाचं मोठं काम त्यानं केल.
कौन्सिल फॉर ह्यूमॅनिझमसाठी सीनियर कॉलमिस्ट म्हणून त्याचं नेहमीच नाव घेतलं जात असे.फॅरेडे अॅवॉर्ड, ब्रिटिश अॅकॅडमी टेलिव्हिजन अँवार्ड यातल्या जज पॅनेलसाठीही परीक्षक म्हणून रिचर्ड डॉकिन्सनं काम बघितलं.
रिचर्ड डॉकिन्सच्या वैयक्तिक आयुष्यात त्यानं तीन वेळा लग्न केली.तिसरं लग्न त्यानं १९९२ साली कॅल्ला वार्ड या अभिनेत्रीशी केल.२०१६ साली त्यांचा घटस्फोट एकमेकांच्या संमतीनं आणि मैत्रिपूर्ण रीतीनं झाला.रिचर्ड डॉकिन्सला एक मुलगी आहे.
६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी रिचर्ड डॉकिन्सला मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलं,पण वर्षभरातच त्याची प्रकृती चांगली झाल्याचं सांगण्यात आलं.
स्वतःला नास्तिक म्हणवून घेणारा रिचर्ड डॉकिन्स हा नीतिशास्त्रज्ञ,प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारा अभ्यासक,उत्क्रांतीविषयी अभ्यास करणारा जीवशास्त्रज्ञ आजही मानवतावादी दृष्टिकोन ठेवून वयाच्या ८० व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहानं काम करत असतो.अनेक पुस्तकं लिहिलेली असताना,कित्येक मानाचे पुरस्कार मिळालेले असताना,किंचितही गर्व किंवा अहंकार रिचर्ड डॉकिन्समध्ये नाही.त्याच्या 'सेल्फिश जीन' या पुस्तकानं 'द गार्डियन्स'च्या यादीत पहिल्या शंभरांत स्थान पटकावलं आहे.२०१७ साली 'द सेल्फिश जीन' हे सगळ्यात प्रभावी पुस्तक ठरलं.चार्ल्स डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पीशीज आणि न्यूटनचं 'प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका' या पुस्तकांपेक्षाही 'द सेल्फिश जीन'नं प्रचंड लोकप्रियता मिळवली.
२००८ सालच्या सप्टेंबर महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्रोफेसर या पदावरून रिचर्ड डॉकिन्स निवृत्त झाला असून रिचर्ड डॉकिन्स फाऊंडेशन फॉर रिझन अँड सायन्स (RDERS) नावाची संस्था त्यानं स्थापन केली आहे.ही संस्था वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित संशोधनासाठी पैसा पुरवण्याचं काम करते.
तसंच मानसशास्त्र, धर्म यावर आधारित संशोधनांनाही पाठबळ देते. दरवर्षी या संस्थेमार्फत 'नास्तिकता' या विषयावर काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.२०२० साली हा पुरस्कार भारतातल्या जावेद अख्तर यांना देण्यात आला हे विशेष.डॉकिन्स हा पूर्णतः नास्तिक विचारांचा असून वेगवेगळ्या नास्तिक,
धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी संघटनांचा समर्थक आहे.आपल्या सडेतोड वागण्यामुळे रिचर्ड डॉकिन्स नेहमीच एका वलयात असतो.त्यानं आपले विचार पसरवण्यासाठी शेकडो व्हिडीओज् उपलब्ध केले आहेत.शिवाय उत्क्रांती आणि निरीश्वरवाद या विषयांवरची त्याची व्याख्यानं जगभर सुरू असतात.त्याचं हे अफाट काम बघून त्याचे टीकाकार त्याला मिलिटंट अथिस्ट म्हणतात.
द सेल्फिश जीन' या थरार निर्माण करणाऱ्या पुस्तकाचा शेवट रिचर्ड डॉकिन्सन खूप सुरेखरीत्या केला आहे.
तो म्हणतो,'आम्ही जीन मशीन म्हणून तयार आहोत आणि मेम मशीन्स म्हणून सुसंस्कृत आहोत,पण आपल्या निर्मात्याविरुद्ध फिरण्याची शक्ती आपल्यात आहे.आम्ही एकटेच पृथ्वीवरच्या स्वार्थी प्रतिकृती आणणाऱ्यांच्या जुलमाविरोधात बंड करू शकतो.'
समजून न घेताच समाधानी राहा असं धर्म सांगतो,म्हणून मी धर्माच्या विरोधात आहे.
२६ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग