* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: द प्रिन्स - निकोलो मॅकियावेली (१५३२)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

४/५/२३

द प्रिन्स - निकोलो मॅकियावेली (१५३२)

निकोलो मॅकियावेलीच्या मृत्यूनंतर म्हणजे १५३२ साली 'द प्रिन्स' हे पुस्तक प्रसिद्ध झालं.मात्र,

तेव्हापासून आत्तापर्यंत हे पुस्तक 'बेस्ट सेलर' म्हणूनच गाजतं आहे.यातली भाषा खूप भिडणारी आहे.या पुस्तकात त्यानं जे काही सांगितलंय.ते एखाद्या राज्यकर्त्यासाठी जितकं उपयुक्त आहे,

तितकंच ते एकविसाव्या शतकातल्या प्रचंड मोठ्या कंपन्यांनाही लागू आहे.वरवर बघता डावपेच किंवा राजकारण आणि सत्तास्पर्धा या गोष्टी मॅकियावेलीच्या 'द प्रिन्स' मध्ये सापडतात;पण खोलवर बघता त्यामध्ये व्यवस्थापनासाठी चांगले धडेही आपल्याला आढळतात.!


'कॉम्पिटिंग फॉर द फ्युचर' या व्यवस्थापनावरच्या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक गॅरी हॅमेल एकदा म्हणाला होता,'नेतृत्व (लीडरशिप) आणि डावपेच (स्ट्रॅटेजी) या गोष्टींचा 'शोध' आपल्याला विसाव्या शतकात लागला,ही आपली समजूत चुकीची आहे.याची आपल्याला वारंवार आठवण करून द्यावी लागते.'खरं तर या कल्पना खूप जुन्या आहेत.या गोष्टी पूर्वी उद्योगधंद्यांपेक्षा राजेरजवाड्यांनाच जास्त गरजेच्या पडत.आजच्या ज्ञानार्थ व्यवस्थेत (नॉलेज इकॉनॉमी) कुणाला असं वाटेल की, सत्तेला किंवा त्यातल्या स्पर्धेला काहीच स्थान नाही;पण आज रेडस्टोन,जेफ बेझॉस,बिल गेट्स,रुपर्ट मरडॉक किंवा टाटा यांना विचारलं, तर ते या मताशी मुळीच सहमत होणार नाहीत.आणि यामुळेच निकोलो मॅकियावेलीची पुस्तकं ५०० वर्षांनंतरही बाजारात पटापट विकली जाताहेत.त्यानं सांगितलेल्या यशस्वी राज्यकारभारा-

विषयीच्या किंवा कुठलीही सत्ता मिळवून ती टिकवण्या- विषयीच्या तत्त्वाचं महत्त्व जगाला आज कळतं.


मॅकियावेली १४६९ ते १५२७ अशी ५८ वर्षे जगला.हा काळ रेनेसान्स म्हणजेच प्रबोधन काळ होता! रेनेसान्स १४०० सालापासून इटलीमध्ये सुरू झाला आणि पुढे युरोपभर पसरला.


शिक्षणाचा प्रसार,परमेश्वर निष्ठेपेक्षा माणसाच्या विकासावर भर,सगळ्याच कलांमध्ये आमूलाग्र बदल आणि भरभराट,व्यक्तिवाद आणि 'नफा मिळवणं चांगलं आणि त्यात काहीही वाईट नाही' या गोष्टींची रुजवणूक असं सगळं या काळात घडलं. 


हा व्यापारी वर्ग आणि चर्च यांच्यातला एक प्रकारे झगडाच होता.व्यापाऱ्यांच्या हातात या काळात बराच पैसा खुळखुळत होता.तसंच त्यांना तो आणखी वाढवायचा होता.मग यातून बरीच तत्त्वं,दृष्टिकोन बदलत गेले.याच काळात आजच्या सिंगापूरसारखंच एक एक शहर म्हणजेच एक एक राज्यच (सिटी स्टेट्स) असायचं.फ्लॉरेन्स,रोम,नेपल्स,व्हेनिस आणि मिलान वगैरे ठिकाणी अशी छोटी छोटी सिटी स्टेट्स तयार झाली.

यांच्यामध्ये लहानमोठी युद्धं, मारामाऱ्या,खून वगैरे गोष्टी बऱ्याच चालत. यामुळे प्रत्येक राज्यकर्त्याला प्रजेला सुखी ठेवतानाच राज्याचं संरक्षण करण्यासाठीची पावलंही उचलावी लागत आणि ही सगळी कसरत सांभाळण्या-

साठी त्याला चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता भासत असे.अशा वातावरणात मॅकियावेली वाढला.


या निकोलो मॅकियावेलीला ब्रिटिश इतिहासकार 'ओल्डनिक' असं संबोधायचे.इतिहासात ओल्डनिक या शब्दाचा अत्यंत तुच्छतेनं उल्लेख करण्यात येत असे.

त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी म्हणजेच १५३२ साली जेव्हा त्याचं बहुचर्चित 'प्रिन्स' हे पुस्तक प्रकाशित झालं,तेव्हा त्याचं नाव फसवणूक,कपट,संधिसाधूपणा,

स्वार्थ आणि दुष्टपणा अशा सगळ्या दुर्गुणांशी जोडलं गेलं. इतक की, 'फ्रेडरिक द ग्रेट' सारख्या कित्येक हुकूमशहांनीसुद्धा या पुस्तकावर कडाडून टीका केली होती.या सगळ्या काळात 'मॅकियावेली-निझम' ही एक शिवीच झाली होती.दोन गट किंवा दोन पक्ष एकमेकांवर या शिवीची बरसात करत. (म्हणजे तू मॅकियावेलिनिस्ट आहेस अशी.) मात्र आज व्यवस्थापनाच्या जगात याच निकोलो मॅकियावेलीचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. हा मॅकियावेली होता तरी कोण ?


निकोलो मॅकियावेलीचा जन्म १४६९ साली फ्लॉरेन्समध्ये एका कायदेपंडित सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबात झाला.त्याच्या लहानपणाविषयी खूपच कमी माहिती उपलब्ध आहे.त्याचं वाचन दांडगं होतं,पण तो सगळ्यात जास्त शिकला ते अनुभवातूनच! इटालियन राजकारणातल्या उलथापालथींनी मॅकियावेलीच्या आयुष्यातही खळबळच माजवली.यातल्या फ्लॉरेन्स या सगळ्यात प्रबळ राज्यात 'मेडिची' या कुटुंबाचं बरंच वर्चस्व होतं. मॅकियावेलीही फ्लॉरेन्सचाच होता.त्याच्या पूर्वजांनी मेडिची कुटुंबातल्या लोकांना एके काळी विरोध केला असल्यानं मॅकियावेलीला मेडिचींच्या राज्यात कुठलीही सरकारी नोकरी मिळाली नाही.इटलीवर १४९४ साली फ्रान्सच्या आठव्या चार्ल्स राजानं आक्रमण केलं आणि पुढची पाच दशकं इटलीमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली.


१४९४ सालीच मेडिचींची सत्ता जाऊन तिथे गिरोलामो सावोनारोला नावाच्या एका मठातल्या भिक्षुकाची (फ्रायर) सत्ता स्थापन झाली;पण १४९८ साली सावोनारोलाला मृत्युदंड होऊन त्याला ठार करण्यात आलं.तेव्हा मॅकियावेली फक्त २९ वर्षांचा होता. मेडिचींच्या जागी आलेल्या राज्यसत्तेत मॅकियावेलीमधले प्रशासकीय गुण ओळखून त्याला तिथे चॅन्सलरची नोकरी मिळाली.फ्लॉरेन्सच्या विदेश खात्यामधलीही जबाबदारी मॅकियावेलीवर टाकण्यात आली.


यानंतर १४ वर्ष मॅकियावेलीनं सरकारची खूप इमाने-

इतबारे नोकरी केली.या काळात त्यानं फ्रान्स,जर्मनी आणि इटली इथल्या अनेक शहरांमध्ये अनेकदा प्रवास केला.ही त्याची वर्ष खूप आनंदात गेली.अनेक प्रकारच्या वाटाघाटींमध्ये त्याला भाग घेण्याची संधी मिळाली.

युरोपमधल्या अनेक राज्यकर्त्यांना जवळून बघण्याचा योग त्याला आला.हे सगळं अनुभवल्यामुळे तो खूप काही शिकला.याच काळात त्याचे अनेक गोष्टींबद्दलचे विचारही पक्के झाले.इथे त्याचं राजकारणातलं खरं शिक्षण त्याला मिळालेल्या अनुभवातून झालं. सरकारं कशी चालतात,

तसंच ती कशी आणि का पडतात याचा तो या वयात शांतपणे अभ्यास करत होता.ही सगळी निरीक्षणं त्याच्या पुढच्या लिखाणात उपयोगी पडणार होती.


१५०२ हे वर्ष मॅकियावेलीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरलं.एक तर या वर्षी त्यानं मारिएट्टा कॉर्सिनी हिच्याशी लग्न केलं. मारिएट्टा त्याच्या मृत्यूनंतरही २६ वर्ष जगली.

याच वर्षी त्याला रोममध्ये बोर्जियाकडे दूत म्हणून पाठवलं.


याच काळात बोर्जियानं आपल्याला सोडून गेलेल्या चौघांना कपटाने लाच दाखवून कसं परत बोलावलं आणि नंतर त्यांना कसं निर्घृणपणे नरडी दाबून मारून टाकलं हे मॅकियावेलीनं स्वतः बघितलं आणि अनुभवलं, राज्य करताना कपटाचा वापर करण,खोट बोलणं,फसवणं अशा गोष्टींचं मॅकियावेलीनं आपल्या 'द प्रिन्स' मध्ये जे समर्थन केलं होत यामागे त्याचे असेच अनेक अनुभव होते.


या काळात इटलीच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी होत होत्या.पोप सहावा अलेक्झांडर याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे बोर्जियाचं वर्चस्व संपुष्टात आलं आणि मग अनेक घटना घडल्या आणि फ्रेंचांनी इटलीवर पुन्हा आक्रमण केलं.रवीना इथे झालेल्या लढाईत फ्रेंचांना पिटाळून लावण्यात यश आलं आणि इटलीत पुन्हा मेडिचीचं राज्य आलं. या घटनांचा मॅकियावेलीच्या आयुष्यावर खूपच मोठा परिणाम होणार होता.याचं कारण मेडिचींचं राज्य पुन्हा सुरू होताच मॅकियावेलीची सगळी सरकारी पदं काढून घेण्यात आली.यानंतर त्याचा खूप छळ करण्यात आला.त्याला तुरुंगातही टाकण्यात आलं.शेवटी त्याला फ्लॉरेन्समधून हद्दपार करण्यात आलं.अशा तऱ्हेनं त्याची राजकीय कारकीर्द त्याच्या वयाच्या ४३ व्या वर्षीच संपुष्टात आली.


अशा प्रतिकूल काळातही निकोलो मॅकियावेलीनं 'द प्रिन्स' हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं.खरं तर त्यानं ते पुस्तक म्हणून लिहिलंच नव्हतं.मेडिची घराण्याची मर्जी संपादन करण्याच्या खटाटोपातून हे लिहिलं गेलं होतं.तसंच हे पुस्तक त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे १५३२ साली प्रसिद्ध झालं.मात्र तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे पुस्तक 'बेस्ट सेलर' म्हणूनच गाजतं आहे.


यात खूप लहान लहान अशी २६ प्रकरणं आहेत. यातली भाषा खूप भिडणारी आहे.त्याच्या 


जिवंतपणी हे पुस्तक म्हणून बाहेर आलंच नाही. ते केवळ एक हस्तलिखित म्हणून अनेकांकडे फिरत राहिलं.


या पुस्तकात त्यानं जे काही सांगितलंय ते एखाद्या राज्यकर्त्याला जितकं उपयुक्त आहे तितकंच ते २१ व्या शतकातल्या प्रचंड मोठ्या कंपन्यांनाही लागू आहे.ते सर्वप्रथम 'अँन्थनी जे' या लेखकानं १९७० साली 'मॅनेजमेंट अँड मैकियावेली' या आपल्या पुस्तकात लिहिलं आणि मॅकियावेली हा कॉर्पोरेट जगतात एकदम हिरो बनला.! वरवर बघितलं तर अमेरिकेतल्या 'डलास' किंवा 'डायनॅस्टी' अशा टेलिव्हिजनच्या सोप सीरियल्समध्ये किंवा आपल्याकडच्या 'कॉर्पोरेट' या सिनेमात जसे दाखवतात तसेच डावपेच किंवा राजकारण आणि सत्तास्पर्धा हे आपल्याला मॅकियावेलीच्या 'द प्रिन्स' मध्ये सापडतात; पण खोलवर बघता त्यामध्ये मॅनेजमेंटसाठी चांगले धडे ही आपल्याला आढळतात!


मॅकियावेलीनं माणसाच्या स्वभावाविषयी काही निरीक्षणं करून काही विधानं केली होती. त्यावरच 'द प्रिन्स' मधली निरीक्षणं आणि विधानं प्रिन्स'मधली अवलंबून होती.ती निरीक्षणं अशी होती.


 मनुष्य हा स्वार्थी,धोकेबाज,कपटी आणि पैशांच्या मागे धावणारा आहे;स्वार्थ,अहंकार आणि कपट यातच तो अडकतो.मनुष्य एक वेळ वडिलांचा मृत्यू विसरेल,पण संपत्तीतला वाटा विसरणार नाही;संपत्ती आणि जीवन यांच्या सुरक्षिततेसाठी जनता राज्यकर्त्याचं नियंत्रण स्वीकारते;राजानं माणसाचा हा स्वभाव लक्षात घेऊन प्रेमापेक्षा भीतीनंच राज्य चालवावं; दंडशक्ती वापरली तरच माणसाच्या स्वार्थाला लगाम लागू शकतो;मनुष्य म्हणजे दुर्गुणांचा पुतळा आहे,त्याला कितीही शिकवलं तरी तो सुधारू शकत नाही.


राज्य कसं मिळवावं आणि ते कसं टिकवावं,या प्रश्नाभोवतीच 'प्रिन्स' हे पुस्तक फिरतं. राज्यकारभार करण्यासाठी कुठले मार्ग निवडावेत म्हणजे यश मिळेल हे त्यानं या पुस्तकात सांगितलंय,हे मार्ग योग्य आणि नैतिक आहेत का याचा मॅकियावेलीचा काडीमात्र संबंध नव्हता,याचं कारण


 "कुठलंही ध्येय एकदा ठरलं की ते गाठण्यासाठी कुठलाही मार्ग निवडला तरी चालतो.म्हणजेच 'द एन्ड जस्टिफाइज द मीन्स' अशी थिअरी तो मानत असे.


राज्यकर्ता कसा असला पाहिजे याचं मॅकियावेली वर्णन करतो.त्याच्या मते राज्यकर्ता सिंह आणि कोल्हा या दोघांसारखा असला पाहिजे.युद्ध करायची वेळ आली तर तो सिंहासारखा बलवान तर हवाच,पण युद्ध केव्हा करावं आणि ते करायचं नसेल तर ते कसं टाळावं हे कळण्यासाठी त्याच्याकडे कोल्ह्यासारखा धूर्तपणा,हुशारी आणि व्यवहारी स्वभाव असला पाहिजे,असं तो म्हणे.


आजकाल तर सगळा देखाव्याचा जमाना आला आहे.'आपल्याला जे वाटतं आणि भासतं तेच खरं असतं (परसेप्शन इज रिअॅलिटी)' वगैरे गोष्टींवरच भर दिला जातो.त्यामुळे प्रत्यक्ष चांगलं असण्यापेक्षा चांगलं भासणं कसं जास्त जरुरीचं आहे.हे आज महत्त्वाचं मानलं जातं;पण हेही मॅकियावेलीनं त्या वेळीच म्हणून ठेवलंय. 


त्यामुळे जर राज्यकर्त्याकडे एखादा गुण नसेल तरी तो आपल्याकडे आहे असा त्यानं दिखावा करावा,असंही चक्क मॅकियावेली या पुस्तकात म्हणतो.आश्चर्य म्हणजे राज्यकर्त्यानं सद्गुणांच्या मागे लागू नये,असाही तो स्पष्ट इशारा देतो. 'जो माणूस सतत सद्गुणानं (व्हर्च्यूअस) वागतो. त्याचाही इतिहासात अनेकदा सर्वनाश झालेला दिसतो,असं मॅकियावेलीनं म्हटलंय.थोडक्यात, मॅकियावेली नैतिकता आणि राजकारण यांच्यात पूर्णपणे फारकत घेतो.


राज्यकर्त्यानं दयाळूपणाचा बुरखा घेऊन आपलं कौर्य झाकावं,राज्यकर्त्यानं बहुरूप्याचं सोंग चांगल्या प्रकारे वठवावं,राज्यकर्त्यानं समाजातल्या रूढी आणि परंपरा यांच्यात लुडबुड करू नये;अप्रिय गोष्टी हाताखालच्यां-

कडून करून घ्याव्यात आणि जर लोक चिडले, तर त्यांच्यावरच दोष ढकलावा,शेजारच्या राष्ट्राशी मैत्री करावी;पण योग्य संधी मिळाल्यावर ते राष्ट्र गिळंकृत करावं.धार्मिकतेचं प्रदर्शन करावं, भावनेच्या आहारी जाऊ नये;राज्यकर्त्यानं संयमी आणि दृढ असावं;स्तुतीला भाळून जाऊ नये; बुद्धिमान लोकांना जवळ ठेवावं,

असा त्यानं राजाला उपदेश केला.चांगलं-वाईट,नैतिक- अनैतिक,धर्म-अधर्म,इहलोक-परलोक वगैरे विचार फक्त भित्रे लोक करतात.वेळ पडली तर राज्यकर्त्यानं छळ,पक्षपात,धोकाधडी,हत्या,बेइमानी,संधिसाधूपणा,खोटारडेपणा,फसवणूक अशापैकी कुठलाही मार्ग स्वीकारावा,असंही तो म्हणतो.राज्यकर्त्यानं लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून आपण दया,धर्म,श्रद्धा आणि प्रेम यांचंच मूर्तिमंत प्रतीक आहोत असं भासवावं,पण शेवटी आपल्या फायद्याप्रमाणेच वागावं,असं मॅकियावेलीनं म्हटलंय.


पूर्वीही अशी व्यवहारी विधान अनेकांनी केली होती,पण मॅकियावेलीच महत्त्व असं की,त्यानं हे विचार सुसूत्रपणे इतक्या प्रभावीपणे मांडले की,हे पुस्तक ५०० वर्ष झाली तरी अजूनही गाजतंय! 


अशी काही अत्यंत आक्षेपार्ह किंवा अनैतिक विधानं सोडली तरीही मॅकियावेलीची काही विधानं त्याची प्रगल्भता दाखवतात उदाहरणार्थ, राज्यकर्त्याबरोबर जी माणसं फिरत असतात, ज्यांची संगत त्याला मिळते,

त्यावरून राज्यकर्त्याची किंमत ठरते.व्यवस्थापनाच्या जगात हे खूप महत्त्वाच विधान आहे.कुठल्याही कंपनीत सीईओ जशी आपली मॅनेजमेंट टीम निवडतो आणि त्यांच्यावर काम सोपवतो (डेलिगेशन) त्यावरून त्याचं यश ठरतं आणि त्याचं मूल्यमापनही होतं.


मॅकियावेली 'द प्रिन्स' मध्ये म्हणतो,

 'जो काळाची पावलं ओळखून त्यानुसार वागतो आणि आपल्या योजना आखतो,तोच यशस्वी होतो.कालबाह्य कल्पनांना चिकटून बसणारा कधीच यशस्वी होत नाही!' 


आजकाल व्यवस्थापनात 'चेंज मॅनेजमेंट' वर जे विवेचन आहे,त्याची सुरुवात तिथे झाली होती.मॅकियावेलीनं या पुस्तकात आपल्या हाताखालचे कर्मचारी आणि सैन्य यांना कसं निवडायचं, त्यांना सुखी कसं ठेवायचं,याच विवेचन केलं आहे.आपल्याला फितूर होऊन ते शत्रूपक्षाला जाऊन मिळू नयेत.हा त्यामागचा उद्देश होता! आजकालच्या सतत आणि भराभर नोकऱ्या बदलण्याच्या जगात आणि विशेषतः सॉफ्टवेअरच्या कंपन्यांना यातून बरंच शिकण्यासारखं आहे यात शंकाच नसावी. आपला 'मार्केट शेअर' कसा टिकवावा,सगळे कर्मचारी ज्यामुळे ते प्रेरित होतील असं एक ध्येय कसं निर्माण करावे.या

विषयीही चर्चा 'द प्रिन्स' मध्ये आहे.आजच्या 'व्हिजन आणि मिशन'ची मुळ मॅकियावेलीमध्ये सापडतात.


सत्ता केंद्रित असावी की विकेंद्रित असावी याविषयीही मॅकियावेली बोलून गेलाय.आजच्या परिस्थितीत कुठलीही संघटना बांधताना ती मोठी होत चालली की हे सगळे प्रश्न पुढे ठाकतातच.इथेही मॅकियावेली मदतीला धावून येतो.


दुसरे राज्य जिंकल्यानंतर तिथल्या लोकांची मनं कशी जिंकावीत या विवेचनामध्ये आपल्याला मॅकियावेलीकडून 'मर्जर्स अँड ऑक्विझिशन्स (एम.अँड ए.)'च्या संदर्भात शिकायला मिळेल. मॅकियावेली म्हणे,


'आहे ती परिस्थिती,त्या कल्पना,समजुती बदलून नवीन काही प्रस्थापित करणं सगळ्यात कठीण काम आहे.' आजच्या 'चेंज मॅनेजमेंट'वर भाषणं देणाऱ्यांनी मॅकियावेली जरूर वाचावा.नेतृत्व (लीडरशिप) याविषयीही मॅकियावेली बरंच बोलून गेलाय. 'सर्वच माणसं चांगली नसतात.हे गृहीत धरूनच चाणाक्षपणे वागावं' किंवा 'चांगलं वागणं हे ठीक आहे,पण नेत्याला वेळप्रसंगी वाईटही वागावं लागतं' किंवा 'कुठल्याही माणसाला कायम मित्र किंवा कायम शत्रू मानू नये.

'यांसारखी विधानं पाहा.तो म्हणतो,'चांगल्या नेत्याबद्दल प्रेम आणि भीती दोन्ही वाटलं पाहिजे;पण दोन्ही एकत्र असणं तसं कठीणच.त्यामुळे प्रेमापेक्षा भीती वाटली तरी चालेल!'


राज्यकारभाराविषयी इतका सल्ला देऊनही मॅकियावेली मेडिचींची मर्जी संपादन करू शकला नाही.


त्यानं मेडिचींकडे आपल्याला सरकारमधली नोकरी आणि पद पुन्हा देण्यात यावं यासाठी या काळात असंख्य पत्रं लिहिली; पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही.यामुळे राजकारणाचा पूर्ण संन्यास घेऊन तो लिखाणाकडे वळला. त्यानं 'द डिस्कोर्सेस ऑन

द फर्स्ट टेन बुक्स ऑफ लिव्ही हे पुस्तक लिहिलं.

यामध्ये तो आपल्याला 'द प्रिन्स' पेक्षा वेगळ्या रूपात भेटतो आणि लोकसत्ताक राज्यपद्धतीविषयीही बोलतो.

त्यानं 'आर्ट ऑफ वॉर','हिस्ट्री ऑफ फ्लॉरेन्स'अशीही पुस्तकं लिहिली.मॅकियावेलीचं लिखाण फक्त राजकीय गोष्टींपुरतं मर्यादित नव्हतं.त्यानं याच काळात मान्द्रागोल नावाचं इटालियन भाषेत एक विनोदी विडंबनही लिहिल.

ते रेनेसाँसमध्ये एक मास्टरपीस म्हणून गाजलं.


तरीही राजकारणाकडे मॅकियावेलीचा ओढा होताच;पण त्याला संधी मिळत नव्हती.शेवटी १५२७ साली मेडिचींची सत्ता उलथवून टाकली गेली,तेव्हा मॅकियावेली धावतच फ्लॉरेन्सला गेला आणि त्यानं सरकारी पदासाठी पुन्हा याचना सुरू केली;पण तोपर्यंत त्याच्या 'द प्रिन्स'चं हस्तलिखित अनेकांनी वाचलं होतं आणि अनेकांना तो दुष्ट आणि कपटी वाटल्यामुळे त्याचे फ्लॉरेन्समध्ये अनेक शत्रू निर्माण झाले होते.त्यामुळे 


कौन्सिलमध्ये बहुतेकांनी त्याच्याविरुद्ध मत दिलं,पण कौन्सिलचा निकाल ऐकायला मॅकियावेली जिवंत राहिला नव्हता.एका अर्थानं त्याचा अगोदरच मृत्यू झाला हे बरंच झालं,कारण ते ऐकून त्याला कदाचित मरणापेक्षा जास्त यातना झाल्या असत्या.!


'द प्रिन्स' हे खऱ्या अर्थानं क्रांतिकारी पुस्तक होतं.एक म्हणजे यापूर्वी राज्यशास्त्रावर (पोलिटिकल सायन्स) लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक जास्त शास्त्रशुद्ध होतं.यापूर्वी सेंट थॉमस अॅक्विनास आणि जॉन ऑफ सॅलिसबरी यांच्यासारख्यांनी केलेल्या आदर्शवादी (आयडिअॅलिस्ट) विवेचनापासून, धार्मिकतेपासून आणि नैतिकतेपासून या पुस्तकात पूर्णपणे फारकत घेतली होती.


'द प्रिन्स' मधल्या मॅकियावेलीचा कडवटपणा समजावून घ्यायचा असेल,तर आपल्याला १६ व्या शतकातली इटलीतली परिस्थिती समजावून घेतली पाहिजे.त्या वेळी इटली हा एकसंध देश म्हणूनही निर्माण झाला नव्हता.

व्हेनिस,जिनोआ आणि फ्लॉरेन्स यांच्यासारखी शहरं आणि कधीकधी पोप ही त्या वेळची सत्ताकेंद्र होती.या सगळ्यांमध्ये तर सतत वाद आणि युद्ध होत असतच,पण बाहेरूनही सतत आक्रमण होत असत.यातून राजकीय व्यवस्था संपूर्णपणे अस्थिर झाली होती.यामुळे फ्लॉरेन्सवर हल्ला करणाऱ्या 'रानटी' लोकांचा काहीही करून पाडाव केला पाहिजे,अशी भावना त्या वेळी तीव्र होती.या पार्श्वभूमीवर मॅकियावेलीची मतं बनत गेली आणि त्याचा राष्ट्रवादही उफाळून आला आणि तो टोकाचा कट्टर बनला.इतका की, जर्मनीमध्ये बिस्मार्क आणि नंतर हिटलर आणि इटलीत मुसोलिनी यांच्या विचार सरणीतही तो मोठ्या प्रमाणात डोकावला.


आजच्या दिखाऊ जगात आपल्याला जे वाटतं, जे भासतं,तेच खरं असतं (पर्सेप्शन इज रिअॅलिटी) वगैरे गोष्टींवरच भर दिला जातो. यामुळे प्रत्यक्ष चांगलं असण्यापेक्षा चांगल भासणं कसं जास्त गरजेचं आहे हे आज महत्त्वाचं ठरतं आहे.हेही त्या काळात मॅकियावेलीनं म्हणून ठेवलंय हे विशेष!


कुठल्याही ग्रंथालयात स्वतःला दोन मिनिटांत सुधारण्याची सेल्फ इंप्रुव्हमेंटची असंख्य पुस्तकं आपण बघतो,तसंच डेल कार्नेगीच्या 'हाऊ टू विन फ्रेंडस अँड इन्फ्लूअन्स पीपल' या पुस्तकाचं सोळाव्या शतकातलं रूप,असंच आपल्याला 'प्रिन्स'बद्दल म्हणावं लागेल,हे मात्र नक्की.!


"जो काळाची पावलं ओळखून त्यानुसार वागतो आणि आपल्या योजना आखतो तोच यशस्वी होतो.कालबाह्य कल्पनांना चिकटून बसणारा कधीच यशस्वी होत नाही." 


●निकोलो मॅकियावेली


जग बदणारे ग्रंथ - दीपा देशमुख

मनोविकास प्रकाशन मधून क्रमशः