* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: विल्यम हॅमिल्टन आणि आप्त निवड..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१८/५/२३

विल्यम हॅमिल्टन आणि आप्त निवड..

जेबीएस हाल्डेन एका भोजन समारंभात इंग्लंडच्या चर्चचे प्रमुख,कॅन्टरबरीचे आर्चबिशप ह्यांच्या शेजारी बसले होते.धर्मगुरूंनी विचारले, 'हाल्डेनसाहेब,आपल्याला जीवसृष्टीची प्रचंड जाण आहे.मला सांगा,ही जीवसृष्टी निर्मिताना ईश्वराच्या मनात काय होते?' हाल्डेन म्हणाले, 'मी मनकवडा नाही,पण एवढे नक्की - ईश्वराला किडे-मकोडे अतिशय आवडायचे!अहो जगात किड्या- मकोड्यांच्या जितक्या चित्र विचित्र तऱ्हा आहेत,तितक्या दुसऱ्या कोणत्याही जीवकुळीच्या नाहीत!'


हे इतके किडे-मकोडे कसे अवतरले? त्यांना निसर्गात तऱ्हेतऱ्हेच्या भूमिका बजावणे शक्य झाले म्हणून,त्यांच्या छोट्या,काटक,चपट्या शरीरांनी ते जमिनीवरच्या अगणित खाचा-खोचांत राहू शकतात.वाळवीप्रमाणे लाकडापासून,डासांप्रमाणे माणसाच्या रक्तापर्यंत वेगवेगळी संसाधने वापरू शकतात.बहुतांश कीटक एकटे-दुकटे राहतात.पण त्यांतले काही मोठमोठ्या समूहांत राहू लागले.वाळव्या, मुंग्या-मुंगळे,कागद माशा,वाघ माशांसारख्या गांधिलमाशा,मधमाशा,जरी जगातील कीटकांच्या एकूण 


साडेसात लक्ष ज्ञात जातींतील केवळ तेरा हजार जाती समाजशील आहेत.


तरी त्यांची गणसंख्या,त्यांचा एकूण भार, एकांड्या कीटकांच्या कितीतरी पटीने जास्त आहे.टोळी- 'टोळीने शिकार,अळिंब शेती, माव्यासारख्या कीटकांचे जणू काय दुभत्या गाई असे पशुपालन अशा अनेक खुब्यांनी ते यशस्वी झाले आहेत.झाडांची पाने कापून त्यावर बुरशी वाढवून त्यांचा आहार करणाऱ्या ॲमेझॉनच्या वर्षावनातल्या पानकाप्या,ऑट्टा प्रजातीच्या मुंगळ्यांच्या एकेका परिवारात काही अब्ज मुंगळे असतात.


त्यांच्या वस्तीचा आकार दीड मीटर जमिनीत खोल,दोन-तीन मीटर व्यासाचे वर्तुळ एवढा अफाट असतो.त्यांच्यातली एक राणी तब्बल पंधरा-पंधरा वर्षे जगते.आयुष्यभरात अब्ज अंडी घालते.तिच्या मुलीबाळी स्वतःआजन्म ब्रह्मचारी राहतात.त्या सारख्या राबत असतात.त्यांचे आयुष्य केवळ काही महिन्यांचे असते.


अशा श्रमविभागणी केलेल्या,एकमेकांशी घनिष्ठ संबंध असलेल्या संघांत राहणे,ही प्राणि जीवनातली एक महत्त्वाची क्रांती आहे.मुख्य म्हणजे काही खास अपवाद वगळता अशा कीटसंघात एखादीच राणी संतती उत्पादन करते. बाकीच्या श्रमिक माद्या विणीच्या भानगडीत न पडता संघाकरता झटून काम करत राहतात.जर निसर्गनिवडीतून बळकट आत्मसंरक्षण,मुबलक पुनरुत्पादन हीच उद्दिष्टे साधतात,तर मग आजन्म ब्रह्मचारी राहणाऱ्या मुंग्यांची गुणवैशिष्ट्ये पुढच्या पिढीत न उतरल्याने ही प्रवृत्ती तातडीने नाहीशी कशी होत नाही?अशी प्रवृत्ती नाहीशी होत नाही,उलट फोफावू शकते, कारण प्रत्येक जीवाची जडण-घडण हजारो जनुकांच्या आधारावर चालते,आणि वैयक्तिक प्राणी नव्हे तर असे जनुक हेच निसर्गनिवडीचे मूलभूत लक्ष्य आहेत.कोणताही जीव स्वतःचे जनुक आपल्या संततीद्वारे पुढच्या पिढीत उतरवतोच,पण त्याखेरीज तिचे / त्याचे जनुक इतर रक्ताच्या नात्यातल्या आप्तांद्वारेही पुढच्या पिढीत उतरतात.तेव्हा निसर्गनिवडीचा एक भाग स्वत:चा जीव राखणे व स्वतःचे प्रजोत्पादन, ह्याच्या जोडीलाच रक्ताच्या नात्यातल्या आप्तांचे संरक्षण व प्रजोत्पादन हा असणार.


हा आहे निसर्ग निवडीची अधिक फोड करणारा आप्त निवडीचा सिद्धान्त;आणि तो विकसित केला.

इंग्लंडमधल्या हाल्डेनच्याच परंपरेत काम करणाऱ्या विल्यम हॅमिल्टनने.त्याने नेटके गणित मांडून दाखवून दिले की एखादा प्राणी स्वार्थत्याग करेल,पण हात राखून,

केवळ विशिष्ट प्रमाणात.तो एखाद्या भाईबंदासाठी कळ सोसेल, पण जर त्या भाईबंदाला पुरेसा लाभ होत असेल तरच.पुरेसा म्हणजे किती? 


सख्ख्या बहिणीला स्वतः सोसलेल्या हानीच्या दुपटीहून थोडा तरी जास्त लाभ झालाच पाहिजे,

सावत्र बहिणीला चौपटीहून जरा जास्त,चुलत बहिणीला आठ पटीहून जरा जास्त.तसेच मुलीला स्वतः सोसलेल्या हानीच्या दुपटीहून थोडा तरी जास्त लाभ झालाच पाहिजे,आणि नातीला चौपटीहून जरा जास्त.अर्थात जर एकदम चार-चार नातींना लाभ होत असेल तर दरडोई स्वतःच्या हानीइतकाच झालेला पुरे.


हे गणित साऱ्या प्राणिजगताला लागू आहे.मग मुंग्या-मुंगळे,गांधिलमाशा,मधमाशा ह्याच कीटकुलात इतक्या समाजप्रिय जाती का ? हॅमिल्टनने दाखवून दिले की ह्यामागे आहे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रजननप्रणाली.

सामान्यतः सर्व प्रगत प्राण्यांच्या देहपेशींत जनुकांचे दोन संच असतात एक आईकडून आलेला,एक बापाकडून.

केवळ मादीच्या अंड्यात व नराच्या शुक्रबीजांत ह्या दोन संचांची विभागणी होऊन एकच संच उतरतो.म्हणजे प्रत्येक अंड्यात किंवा शुक्रबीजात आई - बापांचे घुसळून - ढवळून दोघांचेही अर्धे अर्धे जनुक उचलले जातात.म्हणूनच - जनुक संच आई- मुलींत किंवा सख्ख्या भावंडांत निम्मे निम्मे जनुक समान असतात.


पण मुंग्या-मुंगळे,गांधिलमाशा,मधमाशा हे कीटकुल तऱ्हेवाईक आहे.त्यांच्यातले नर असतात बिनबापाचे.ह्या कीटकुलात शुक्रबीजाने फ..लेल्या,नेहमी सारख्या जनुकांचे दोन संच असलेल्या अंड्यांतून फक्त माद्या उपजतात,तर नर उपजतात न फ..लेल्या,जनुकांचे केवळ एक संच असलेल्या अंड्यांतून. ह्या तऱ्हेवाईकपणामुळे एकेका नराची सर्व शुक्रबीजे एकासारखीच एक,आवळी जावळी असतात; त्यांत काहीच वैविध्य नसते.यामुळे सख्ख्या बहिणी-बहिणीत बापाकडून आलेला जनुक संच अगदी सारखा असतो,इतर जीव -जातींप्रमाणे आईकडून आलेल्या जनुक संचात मात्र सरासरी अर्धे जनुक एकासारखे एक असतात.परिणामत: बहिणी-बहिणींत तीन-चतुर्थांश जनुक एकासारखे एक असतात, तर माय-लेकींत इतर जीवजातींप्रमाणे अर्धे. ह्याचाच अर्थ असा की आप्त निवडीच्या भाषेत आपल्या स्वतःच्या मुलींपेक्षाही बहिणींसाठी स्वार्थत्याग करणे शहाणपणाचे ठरते.हे आहे मुंग्या-मुंगळे,गांधिलमाशा,मधमाशा ह्याच कीटकुलांत इतक्या मोठ्या प्रमाणात समाजप्रिय जातींची उत्क्रान्ती होण्याचे रहस्य.


'हा मुंग्यांचा लोंढा आला,' मर्ढेकर म्हणतात, 'सहस्र जमल्या,लक्ष कोटिही,अब्ज अब्ज अन् निखर्व मुंग्या !' उत्क्रान्तीच्या पुराणातला ह्या अगणित समाजप्रिय कीटकांचा अध्याय हा वारूळ पुराणातल्या रॅफ ह्या नायकाच्या विद्यार्थिदशेतल्या प्रबंधाचा गाभा आहे. खरोखरच जगात वारेमाप मुंग्या आहेत. आफ्रिकेच्या माळरानात दर हेक्टरी पाच कोटी मुंग्या-मुंगळे सापडतात.हेच प्रमाण भारताला लावले,तर आपल्या देशात दहा हजार निखर्व- एकावर पंधरा शून्ये- इतक्या मुंग्या असायला पाहिजेत.इतक्या नाहीत,तरी शे-दोनशे निखर्व असतीलच असतील,म्हणजे 


प्रत्येक माणसामागे दहा कोटी.


समूहप्रिय किड्यांच्या ह्या वैपुल्याचे मूळ त्यांच्या स्वार्थत्यागी श्रमिकांच्यातल्या एकीच्या बळात आहे.

एकजुटीमुळे संघप्रिय कीटक एकांड्या कीटकांवर अनेक बाबतीत मात करू शकतात. संघर्षाचा प्रसंग आला तर एक-एकटे राहणारे कीटक जिवाला सांभाळून झगडतात.

कारण त्यांचे एखादे तंगडे तुटले की सगळेच संपले.पण समूहशील कीटकांना वारुळातल्या हजारोंपैकी दोन- चारशे मारल्या गेल्या तरी खपवून घेता येते.अशा संघशक्तीचा फायदा मिळून ('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


निसर्गातल्या टिकाऊ,उत्पादक संसाधनांवर मुंग्या मधमाशा- वाळव्या आपली निरंकुश सत्ता गाजवतात.उलट एकांड्या कीटकांना क्षणभंगुर, निरुत्पादक,अविश्वसनीय संसाधनांवर गुजराण करायला लागते.पण अशी कमी प्रतीची संसाधने नाना तऱ्हेची आहेत.याचा फायदा घेत,एकाकी कीटकांचे वैविध्य समाजप्रिय कीटकांच्या कितीतरी पट फोफावले आहे.वैविध्य आणि वैपुल्य यांचे असे उलटे नाते आहे.