मुंग्या-मुंगळ्यांचे परिवार आपल्या शेजाऱ्यांशी सतत भांडत-तंडत असतात.प्रत्येक समूहाची एक राणी मुंगी आई,बाकी सगळ्या कामकरी, लष्करी मुंग्या एकमेकींच्या मुंगी बहिणी-बहिणी. सगळ्यांनी मिळून अन्न गोळा
करायचे,चावून चावून एकमेकींना भरवायचे.शिवाय राणी मुद्दाम पाझरते असे रस सगळ्यांनी चाटत राहायचे. ह्यातून प्रत्येक परिवाराचा एक विशिष्ट गंध साकारतो.आपला तो सुगंध,परक्या परिवारांचे झाडून सारे दुर्गंध.कोणी मुंगी भेटली की तिला हुंगायची,आपल्या साऱ्या भगिनी सुगंधा. दुर्गंधी असली तर ती आहे आपली हाडवैरीण.. शक्यतो त्यांना आपल्या टापूतून हाकलून द्यायचे,जमेल तेव्हा त्यांचा मुलूख काबीज करायचा,त्यासाठी
'आम्ही मुंगळ्यांच्या पोरी नाही भिणार मरणाला'
अशी शर्थीची लढाई करायची.मुंग्या-मधमाशांच्या परिवारांत इतर परिवार सदस्यांची ओळख केवळ आपल्याच सुगंधाची,आपल्यातलीच एवढ्यावर मर्यादित असते.
एक खाशी राणी मुंगी - मधमाशी सोडली तर
कोणीही कुणालाही बारकाव्याने वैयक्तिक पातळीवर ओळखत नसते.
दर वर्षी नेमाने विशिष्ट ऋतूंत एका जातीच्या सगळ्या परिवारांनी नव्या पंखवाल्या राजकन्या,आणि उड्डाणाला उत्सुक,प्रेमपिपासू पंखवाले नर वाढवायचे.उडता उडता त्यांनी जोडीदार शोधायचे.समागमानंतर नरांनी शांत चित्ते मृत्यूला सामोरे जायचे,तर आता फळलेल्या राण्यांनी आपले नवे कुटुंब स्थापायसाठी झटायचे.या कठीण प्रसंगातून पार पडून जर राणीच्या थोरल्या लेकी जगल्या वाढल्या,तर त्यांनी कामाला लागायचे,आपला भगिनी परिवार जोपासायचा.
ही होती मुंग्यांची सनातन रूढी.निसर्गाच्या परीक्षेत उतरलेली.गेल्या दहा कोटी वर्षांत नव्या-नव्या जीवनप्रणाली शोधून काढत मुंग्या- मुंगळे जगभर पसरले आहेत.एकजुटीमुळे मुंग्या-मुंगळ्यांना आपल्याहून खूप मोठ्या सावजांची शिकार करणे शक्य होते.
याचा फायदा घेत लष्करी डोंगळ्यांच्या अनेक जाती उपजल्या आहेत.यांची प्रचंड फौज कायमची एकाच वारुळात तळ ठोकून राहात नाही.मुक्काम करायचा झाला की पायात पाय गुंफवून ते आपल्या शरीरांचा तंबू बनवतात. या तंबूच्या आसऱ्यात राणीला,पिल्लांना सांभाळतात.मधूनमधून प्रजोत्पादन थांबवून दररोज कूच करत राहतात.नव्या नव्या मुलखात घुसून तिथल्या मोठ-मोठ्या किड्यांची,पैशांची, विंचवांची,बेडकांची शिकार करतात.
एक लक्ष वर्षांपूर्वी अवतरलेल्या मानवाच्या यशाचे मूलकारण टोळ्या टोळ्यांनी मोठ-मोठ्या सावजांची शिकार करणे हे होते असे समजतात.त्याच्या तब्बल दहा कोटी वर्षे अगोदर मुंग्यांनी मोठ्या कंपूंनी शिकार करायला सुरुवात केली होती.
शिकारीला मदतनीस म्हणून बारा-तेरा हजार वर्षांपूर्वी माणसाने कुत्र्याला माणसाळवले.
नंतर दुधासाठी,मांसासाठी माणसाळवले गाय, म्हैस,
मेंढी,बकरी.पण मुंगळ्यांच्या कित्येक जाती केव्हाच्याच पशुपालक बनल्या आहेत.गुराखी बिबट्या- लांडग्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण करतात
तशाच ह्या मुंग्या वनस्पतींचे अन्नरस शोषणाऱ्या मावे आणि इतर कीटकांच्या शत्रूंना हुसकावून लावतात.
या सेवेच्या मोबदल्यात हे कीटक शोषलेल्या अन्नरसातला काही हिस्सा मधुरसाचे मोठमोठे थेंब काढून,त्यात मुद्दाम जीवनसत्त्वे,अमीनो आम्लांची भर घालून आपल्या रक्षणकर्त्या मुंगळ्यांना पाजतात.
मानवाच्या शेतीची सुरुवात काही निवडक वनस्पतींना संरक्षण देण्यापासून नऊ- दहा हजार वर्षांपूर्वी झाली.मुंग्यांनी हे पण प्राचीन काळी आरंभले होते.आपल्या बळाच्या जोरावर मुंगळ्यांच्या काही जाती विशिष्ट जातींच्या झुडपांच्या संरक्षणाची जबाबदारी उचलतात.अमेझॉनच्या जंगलात बाभळींच्या काही भाईबंदांचे व मुंग्यांचे असे लागेबांधे आहेत.मुंग्यांच्या ह्या खास जाती बाभळींनी पोकळ काट्यांच्या स्वरूपात पुरवलेल्या निवासांत राहतात.याचबरोबर त्या वनस्पती मुंग्यांसाठी खास अन्न पुरवतात.ह्याची परतफेड म्हणून मुंग्या आपल्या यजमानांवर हल्ला करणाऱ्या किडींपासून,पशूंपासून त्यांचा बचाव करतात.एवढेच नाही तर झुडपाच्या बुंध्याजवळ दुसरी कोणतीही वनस्पती वाढू देत नाहीत.
पण शेतकरी मुंग्यांचे खास उदाहरण म्हणजे अमेझॉनच्या जंगलातील पानकाप्या मुंग्या. घराच्या एका खोलीएवढ्या प्रचंड वारुळांत ते आसपासच्या वृक्ष-वेलींची पाने तोडून आणून या पानांवर खास जातींची बुरशी जोपासतात.मग त्या बुरशीचा फराळ करतात.ही तर झाली खरी खुरी शेती.ती पण मुंग्यांनी माणसाआधी केव्हाच शोधून काढली होती.
१८ मे २०२३ या। लेखातील पुढील भाग..