परिस्थिती वाघाच्या नियंत्रणाबाहेर जाते,तेव्हा
कोणताही वाघ परिस्थिती अनुरूप आहार
स्वीकारतो.थोडक्यात सांगायचं,तर तो स्वतःहून नरभक्षक झालेला नसतो,तर तसं होणं त्याच्यावर लादलं गेलेलं असतं.
परिस्थितीमुळे वाघ नरभक्षक होतात,हे अधिक स्पष्ट करून सांगायचं,तर दहापैकी नऊ प्रकरणांमध्ये वाघ जखमांमुळे,तर एका प्रकरणामध्ये वृद्धापकाळामुळे नरभक्षक झाल्याचं आढळलं आहे.शिकारीदरम्यान शिकाऱ्यांनी निष्काळजीपणे केलेल्या गोळीबारामुळे वाघाला जखमा झाल्याचं दिसून आलं आहे.अशा वेळी संबंधित शिकाऱ्याने माग काढत जाऊन त्या जखमी वाघाला कायमचं वेदनामुक्त करणं गरजेचं असतं,पण शिकाऱ्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाघ नरभक्षक झाल्याचं नरभक्षक वाघाशी संबंधित एका प्रकरणामध्ये निदर्शनास आलं.त्याचबरोबर साळिंदराची शिकार करताना वाघाला झालेल्या जखमांमुळे तो नैसर्गिक पद्धतीने शिकार करू शकत नसल्याने नरभक्षक झाल्याचंही आढळून आलं आहे.'माणूस' हे काही वाघाचं नैसर्गिक अन्न नाही,पण वृद्धत्वामुळे किंवा जखमांमुळे वाघ जेव्हा शिकार करू शकत नाही, तेव्हा तो जगण्यासाठी नाइलाजाने माणसाची शिकार करून त्यावर गुजराण करायला सुरुवात करतो.
कोणताही वाघ नैसर्गिक पद्धतीने शिकार करतो, तेव्हा तो आपल्या शिकारीचा पाठलाग करतो. किंवा शिकार त्याच्यापर्यंत येण्याची वाट बघतो.भक्ष्यावर आक्रमण करताना वाघ आपला वेग, दात आणि नखं या गोष्टींवर अवलंबून असतो.त्यामुळेच बाघ जखमी असतो,त्याचे दात तुटलेले असतात किंवा सदोष असतात,त्याची नखं तुटलेली असतात,तेव्हा तो नैसर्गिक पद्धतीने शिकार करू शकत नाही.जे प्राणी त्याचं खाद्य असतात,त्यांची शिकार तो करू शकत नाही, तेव्हा स्वतःची भूक भागवण्यासाठी तो माणसाची शिकार करायला सुरुवात करतो. 'वाघाने आहारासाठी प्राण्यांकडून माणसांकडे वळणं' हा बदल बहुतांश प्रकरणांमध्ये अपघाताने घडलेला आहे,असं माझं निरीक्षण आहे.'अपघाताने' असं म्हणाताना मला नेमकं काय म्हणायचं आहे,हे स्पष्ट करण्यासाठी मी 'मुक्तेसर या नरभक्षक वाघिणीच उदाहरण देतो.
तुलनेने तरुण असताना एकदा या वाघिणीचा साळिदराशी सामना झाला.त्या झटापटीत तिचा डोळा तर गेलाच,शिवाय साळिंदराचे पन्नासेक काटे तिच्या शरीरात रुतले.एक ते नऊ इंचाचे हे काटे तिच्या पुढच्या,उजव्या पायात घुसले.काही काटे तर तिच्या हाडांपर्यंत जाऊन 'यू' या इंग्रजी अक्षराप्रमाणे उलट होऊन बाहेर आले.त्यामुळे त्यांचा पुढचा भाग आणि शेवटचा भाग जवळजवळ आला.ती भुकेल्या अवस्थेत गवतावर तिच्या जखमा चाटत पहुडली होती.नेमक्या त्याच ठिकाणी एक स्त्री तिच्या गुरांसाठी चारा घ्यायला म्हणून गवत कापण्यासाठी आली. आधी वाघिणीने त्या स्त्रीची साधी दखलदेखील घेतली नाही,पण वाघीण जिथे पडली होती, तिथलंच गवत त्या स्त्रीने कापायला सुरुवात केल्यावर वाघिणीने त्या स्त्रीच्या डोक्यावर एक पंजाचा फटका मारला.तो आघात एवढा जबरदस्त होता की,त्या स्त्रीची कवटीच फुटली. त्या स्त्रीला इतका लगोलग मृत्यू आला की, तिला शोधणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला,तेव्हा 'एका हातात कोयता आणि दुसऱ्या हातात कापलेलं गवत' या अवस्थेत ती पडलेली होती.ती स्त्री जिथे पडली होती,तिथे तिला तशीच टाकून वाघीण तिथून उठली आणि तिने मैलभर अंतरावर जात एका पडलेल्या झाडाचा आसरा घेतला.त्या झाडाखाली तयार झालेल्या पोकळीत ती बसून राहिली.दोन दिवसांनी एक माणूस त्या पडलेल्या झाडाचं लाकूड सरपणासाठी घेऊन जाण्यासाठी आला, तेव्हा झाडाखाली असलेल्या वाघिणीने त्याचाही जीव घेतला.तो मृत माणूस झाडाखाली तसाच पडून राहिला.
लाकूड कापायचं असल्यामुळे त्याने त्याचा सदरा काढून ठेवला होता. वाघिणीने त्याला मारताना त्याच्या पाठीवर मारलेल्या फटक्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त वाहिलं.
तिची भूक भागवू शकणारं काहीतरी त्याच्या शरीरात असल्याची जाणीव त्याच्या रक्ताच्या वासामुळे तिला सगाळ्यात आधी झाली असणार,त्यामुळे तिथून उठून निघून जाताना तिने कदाचित त्याच्या पाठीचा काही भाग खाल्ला असावा.
त्यानंतर एखाद्या दिवसानंतर कोणतंही कारण नसताना तिने तिसरा माणूस मारला असावा. त्यानंतर ती सराईत नरभक्षक झाली आणि तिला तिच्या कृत्यांची शिक्षा देईपर्यंत तिने एकूण २४ माणसं मारली.एखादा वाघ जखमी असेल,तो त्याच्या शिकारीचा फडशा पाडत असेल किंवा एखादी वाघीण तिच्या बछड्यांबरोबर असेल आणि तिला जाणीवपूर्वक त्रास दिला गेला किंवा वाघ जे काही करत असेल,त्यात अडथळा आणला गेला,तरच तो माणसाला मारतो.अशा वाघांनादेखील 'नरभक्षक' म्हटलं जात असलं, तरी प्रत्यक्षात ते 'नरभक्षक' नसतात.अशा वाघांना नरभक्षक ठरवण्याआधी मी त्यांना संशयाचा फायदा देईन आणि ते प्रकरण वाघ किंवा बिबट्या यांच्या बळीचं प्रकरण म्हणून नोंदवलं जाणार असलं,तरी तसं ठरवण्याआधी त्या बळीचं शवविच्छेदन करण्याचा आग्रह धरीन.'वाघ,बिबटे,
लांडगे,तरस यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या माणसाच शवविच्छेदन'ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते.आत्ता मला त्या संदर्भातली उदाहरणं देता येत नसली,तरी अशा तऱ्हेने झालेल्या मृत्यूंच्या काही प्रकरणांमध्ये 'नरभक्षक प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी' अशी चुकीची नोंद झाल्याचं मला माहीत आहे.
सगळेच नरभक्षक वाघ वयोवृद्ध,गांजलेले, हतबल असल्याचा एक लोकप्रिय गैरसमज आहे.माणसाच्या शरीरातल्या मिठामुळे त्यांना त्वचेचा आजार होत असल्याचंही मानलं जातं.माणसाच्या किंवा प्राण्याच्या शरीरात मीठाचं प्रमाण नेमकं किती असतं,या संदर्भातलं उत्तर देण्याइतकं ज्ञान मला अर्थातच नाही,पण मी एवढं मात्र नक्कीच सांगू शकतो की,माणसाचं मांस खाणाऱ्या नरभक्षक वाघांची कांती अतिशय तुकतुकीत असल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.
नरभक्षक वाघांबद्दलचा आणखी एक गैरसमज म्हणजे,त्यांचे बछडेदेखील आपोआपच नरभक्षक होतात.हा अर्थातच एक अंदाज आहे आणि तो समजण्यासारखा आहे,पण तो अभ्यासातून,
निरीक्षणातून पुढे आलेला नाही.नरभक्षक वाघांचे बछडे आपोआपच नरभक्षक होत नसण्यामागचं कारण म्हणजे,बिबटे किंवा वाघ यांच 'माणूस'
हे नैसर्गिक अन्न नाही.वाघीण किंवा बिबटीण शिकार करून जे आणून देते,तेच तिचे बछडे खातात.
आपल्या आईला माणसाची शिकार करायला मदत करणारे बछडेदेखील मला माहीत आहेत,पण आईवडलांच्या छत्रछायेतून बाहेर पडल्यानंतर किंवा आईवडील मारले गेल्यानंतर भूक भागवण्यासाठी माणसाची हत्या करायला सुरुवात केलेल्या एकाही बछड्याचं उदाहरण मला माहीत नाही.
कोणत्याही जंगली श्वापदाकडून एखादा माणूस मारला गेला,तरी हा नरबळी वाघाने किंवा बिबट्यानेच घेतला असल्याचं कायम गृहीत धरलं जातं.पण याबाबतचा एक सर्वसाधारण नियम असा आहे की,दिवसाढवळ्या होणाऱ्या मानवी शिकारी वाघाकडून झालेल्या असतात, तर बिबट्या रात्रीच्या अंधारात माणसांचा जीव घेतो.या नियमाला मी आजवर एकही अपवाद बघितलेला नाही.
हे दोन्ही प्राणी जंगलात राहतात. रात्र आणि दिवस या दोन्ही काळात त्यांचा संचार सुरू असतो.त्यांच्या बहुतेक सगळ्या सवयी सारख्या असतात.त्यांची शिकार करण्याची पद्धत एकसारखीच असते.ते आपली मानवी शिकार खूप लांब अंतरापर्यंत वाहून नेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या शिकारीच्या वेळादेखील सारख्याच असणं अगदी नैसर्गिक आहे,पण तशा त्या नसतात.यामागचं कारण म्हणजे,या दोन्ही प्राण्यांच्या धाडसी वृत्तीमध्ये असलेला फरक! वाघ नरभक्षक होतो,तेव्हा त्याला वाटणारी माणसाबद्दलची सगळी भीती संपलेली असते.रात्रीच्या अंधारात माणसाचा वावर कमी असतो.
त्याऐवजी माणूस दिवसाउजेडी जास्त मोकळेपणाने भटकंती करतो.त्यामुळे वाघाला त्याच्या सावजाची शिकार दिवसाउजेडी सहजपणे करता येते.त्यासाठी त्याला माणसाच्या वसतिस्थानाच्या परिसरात रात्री जाण्याची गरज नसते.
त्याउलट बिबट्याचं असतं.त्याने कितीही नरबळी घेतले,तरी त्याची माणसाबद्दलची भीती जराही कमी होत नाही.त्याला दिवसाउजोडी माणसाचा सामना अजिबातच करायचा नसतो.त्यामुळे माणूस रात्रीच्या वेळी बाहेर पडला की,बिबट्या त्याची शिकार करतो किंवा रात्रीच्या वेळी मानवी वस्तीमध्ये शिरून बिबट्या नरबळी घेतो.माणसाबद्दलची भीती संपल्यामुळे वाघ दिवसा नरबळी घेतो,तर बिबट्याला माणसाबद्दल वाटणारी भीती काही केल्या कमी होत नसल्याने तो रात्रीच्या अंधारात माणसावर हल्ला करतो. या दोन्ही प्राण्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे नरभक्षक बिबट्याच्या तुलनेत नरभक्षक वाघाची शिकार करणं सोपं जातं.
नरभक्षक वाघ ज्या परिसरात वावरतात,त्या परिसरात त्यांना उपलब्ध असलेल्या नैसर्गिक अन्नाच्या उपलब्धतेवर,ते नरभक्षक होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या त्यांच्या शारीरिक अकार्यक्षमतेच्या स्वरूपावर आणि हे नरभक्षक म्हणजे बछड्यांसह वावरणारी मादी आहेत की नर आहेत यांवर नरभक्षक वाघांच्या शिकारीची वारंवारिता अवलंबून असते.
एखाद्या विषयामधलं आपलं ज्ञान कमी असेल आणि त्याआधारे आपल्याला एखादं मत तयार करता येत नसेल,तर आपण दुसऱ्याच्या ज्ञानाचा आधार घेतो.
त्यासाठी वाघाइतकं चपखल उदाहरण देता येणार नाही.इथे मी नरभक्षक वाघांबद्दल नाही,तर एकूण सगळ्याच वाघांबद्दल बोलतो आहे. ( कुमाऊँचे नरभक्षक - जिम कॉर्बेट,अनुवाद - वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स,लेखकाचे मनोगत )
'वाघासारखा क्रूर','वाघासारखा रक्तपिपासू' असे उल्लेख मी वाचतो,तेव्हा मला हातात गन घेतलेला एक लहान मुलगा डोळ्यांसमोर दिसायला लागतो.जिथे प्रत्येकी दहा दहा वाघ होते अशा तेराई आणि भावरच्या जंगलांमध्ये हा मुलगा हुंदडत असायचा.जंगलात फिरताना रात्र झाली की,तो तिथेच कुठेतरी उबेला छोटीशी शेकोटी पेटवून झोपून जायचा.कधी लांबून कुठूनतरी,तर कधी अगदी हातभर अंतरावरून कानावर पडणाऱ्या वाघाच्या हाकाऱ्यांनी (कॉल्स) त्याला जाग यायची.जवळच्या शेकोटीमध्ये आणखी एखादं लाकूड टाकून,कूस बदलून,जराही अस्वस्थ न होता तो पुन्हा झोपून जायचा.त्याच्या स्वतःच्या छोट्याशा अनुभव विश्वातून,त्याच्याप्रमाणेच जंगलात दिवसचे दिवस भटकंती करायची आवड असणाऱ्यांच्या अनुभवातून त्याला कळलं होतं की,तुम्ही जर वाघाच्या वाट्याला गेला नाहीत,त्याला त्रास दिला नाहीत,तर तोही तुमच्या वाट्याला जात नाही.दिवसाच्या वेळेत वाघ दिसला,तर त्याला टाळायचं असतं आणि ते शक्यच नसेल,तर तो समोरून निघून जाईपर्यंत अत्यंत स्तब्ध उभ राहायचं असतं,हेही त्याला या अनुभवी लोकांकडून समजलं होतं.एकदा हा मुलगा मोकळ्या रानात उघड्यावर चरत असलेल्या जंगली कोंबड्यांच्या मागावर होता.तिथेच असलेल्या,त्याच्याच उंचीच्या आलुबुखारच्या झुडपातून रांगत जाऊन त्या जंगली कोंबड्यांकडे तो डोकावून बघत असताना ते झुडुप हललं आणि एक वाघ बाहेर आला.
वाघाच्या चेहेऱ्यावर जे भाव होते,त्यांतून जणू तो त्या मुलाला विचारू इच्छित होता, 'अरे बाळा, तू इथे काय करतो आहेस ?' त्यावर कोणतंही उत्तर मिळालं नाही, तेव्हा तो वळला आणि एकदाही मागे न बघता तिथून अगदी शांतपणे निघून गेला.त्याचबरोबर शेतात काम करणारी,जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत कापणारी,सरपण गोळा करणारी हजारो माणसं मला आठवतात,जी वाघ आराम करत असलेल्या एखाद्या ठिकाणाच्या जवळपास या कामांमध्ये दिवसचे दिवस घालवतात आणि रात्री आपापल्या घरी अगदी सुखरूप परत येतात. अशा वेळी तथाकथित 'क्रूर' आणि 'रक्तपिपासू' वाघ त्यांच्या जवळपास असतो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवूनही असतो,पण हे त्यांच्या गावीदेखील नसतं.
तो मुलगा आलुबुखारच्या झुडपात डोकावला असताना तिथून वाघ बाहेर आल्याच्या घटनेला आता पन्नासेक वर्षं उलटून गेली आहेत.त्या मुलाची बत्तीसेक वर्षं नरभक्षक वाघाचा माग काढण्यात गेली आहेत.वाघाने घेतलेल्या नरबळींची अनेक भयंकर दृश्यं मी आजवर बघितली असली,तरी वाघाची कुणी खोड काढली नसेल किंवा त्याला किंवा त्याच्या बछड्यांना भूक लागली नसेल,तर वाघ जाणीवपूर्वक,क्रूरपणे वागला असल्याचं किंवा रक्तपिपासू झाला असल्याचं एकही उदाहरण मी आजतागायत बघितलेलं नाही.
निसर्गाच्या साखळीमध्ये समतोल राखण्यासाठी 'वाघ' हा महत्त्वाचा दुवा ठरतो.त्याचं नैसर्गिक खाद्य माणसाकडून हिरावून घेतलं जातं तेव्हा किंवा अगदी दुर्मीळ प्रसंगांमध्ये खरोखरच गरज म्हणून तो माणसांना मारतो.त्याचं नैसर्गिक भक्ष्य त्याला मिळालं नाही,तर तो ज्या गायीगुरांना मारतो,त्यांचं प्रमाण दोन टक्के आहे.असं असताना या संपूर्ण प्रजातीवरच 'क्रूर', 'रक्तपिपासू' असे शिक्के मारणं चुकीचं आहे.
शिकाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या भटकंतीमधून, अनुभवांतून त्यांची मतं झालेली असतात.त्यामुळे ते त्यांच्या मतांबाबत आग्रही असतात.वाघाची शिकार मचाणावर बसून करायची,हत्तीच्या पाठीवर बसून करायची की जंगलात फिरून करायची याबाबत शिकाऱ्यांमध्ये एक वेळ एकमत नसेल,पण माझ्या एका मुदद्याशी मात्र झाडून सगळे शिकारी सहमत असतील आणि तो म्हणजे,
वाघ हा असीम असं धैर्य असलेला,मोठ्या मनाचा,सहृदय असा उमदा प्राणी आहे.प्राप्त परिस्थितीत त्याच्या बाजूने लोकमताचा रेटा उभा राहिला नाही आणि तो जर कायमचा नष्ट झाला,तर आपला देश प्राणिसंपदेमधला हा मानबिंदू कायमचा गमावून बसेल!
आमच्या या डोंगराळ भागात प्रामुख्याने हिंदू समाजातले लोक राहतात.हिंदू लोकांमध्ये मृत्यूनंतर मृतदेह जाळण्याची पद्धत आहे.हे अंत्यसंस्कार सहसा एखाद्या झऱ्याच्या किंवा नदीच्या काठावरच होतात.कारण त्यानंतर ती राख नदीच्या पाण्यात सोडली जाते.या नद्या पुढे गंगा नदीला जाऊन मिळतात आणि गंगा नदी समुद्राला जाऊन मिळते.या परिसरामधली बहुतेक गाव उंचावर वसलेली आहेत आणि नद्या या गावांपासून कित्येक मैलांवर असलेल्या दऱ्याखोऱ्यांमधून वाहतात.त्यामुळे गावांमधून एखादा मृतदेह उचलून अंत्यसंस्कारासाठी नदीकाठपर्यंत नेण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते.चितेसाठीचं सामानही तिथपर्यंत वाहून न्यावं लागतं.या सगळ्यासाठी खर्चही भरपूर येतो.गावांमध्ये राहणाऱ्या साध्या,गरीब कुटुंबांना हा सगळा खर्च परवडू शकत नाही.सामान्य परिस्थितीत खिशाला कात्री लावून हा खर्च करून अंत्यसंस्कार नीट पार पाडले जातील, असं बघितलं जातं.पण एखादी साथ येते आणि माणसं पटापट मरायला लागतात,तेव्हा खाली खोऱ्यात,नदीकाठी मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार केले जात नाहीत.त्याऐवजी एक अगदी साधा विधी केला जातो. संबंधित मृतदेहाच्या तोंडात पेटता निखारा ठेवला जातो आणि तो मृतदेह कड्यावरुन खाली भिरकावला जातो.
बिबट्या ज्या परिसरात वावरतो,त्या परिसरात त्याच्या नैसर्गिक अन्नाची कमतरता असेल आणि त्याला हे मानवी देह सहजपणे उपलब्ध व्हायला लागले,तर त्याला मानवी मांसाची फार चटकन सवय लागते.रोगराई संपली आणि परिस्थिती पूर्ववत झाली,तरी त्याला त्या परिसरात त्याचं नैसर्गिक अन्न उपलब्ध होत नाही,तेव्हा तो नरबळी घेतो.
कुमाऊंच्या नरभक्षक बिबट्यांपैकी ज्या दोन बिबट्यांनी एकूण ५२० माणसं मारली, त्यांच्यापैकी एक बिबट्या कॉलराच्या साथीच्या मोठ्या उद्रेकानंतर नरभक्षक झाला,तर दुसरा १९१८ साली भारतात पसरलेल्या, 'वॉर फीवर' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचित्र तापाच्या साथीनंतर नरभक्षक झाला.