* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अँटहिलमधले मुंग्यांचे महासाम्राज्य

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/५/२३

अँटहिलमधले मुंग्यांचे महासाम्राज्य

अँटहिलचा नायक रॅफला,तो अभ्यास करत असलेल्या मुंग्यांच्या जातीत आर्जेन्टीनी मुंग्यांत झाले तसेच एक जनुकीय परिवर्तन झाल्याचे आढळले.मग ह्यातून काय हाहाकार झाला त्याचे बारकाईने केलेले वर्णन हा त्याच्या संशोधन निबंधाचा महत्त्वाचा भाग बनतो.


ओढा-मुंग्या विजयाची फळं चाखत असतानाच फार पूर्वेला घुबड तलावाच्या कडेला एक मोठी पर्यावरणी घटना घडली.तलावाच्या किनाऱ्यावरचे पक्ष्यांचे,कीटकांचे आवाज बंद पडले.खारींची कचकच,उंदीर - चिचुंद्र्यांची चुकचुक,सारंच मंदावलं.वनस्पतींचं परागीकरण करणारी फुलपाखरं नष्टप्राय झाली.आणि कारण होतं,मुंग्यांच्या गणसंख्येतला स्फोट.हा बदल- मुंग्याही पायवाट - वारूळ,

ओढा वारूळ प्रजातीच्याच होत्या.नोकोबी परिसरात या प्रजातीची अनेक वारुळं होती.पण या मुंग्यांच्या जनुकांमध्ये काही कारणानं एक बारीकसा बदल झाला होता.त्यामुळे मुंग्यांची सामाजिक वागणूक पार बदलून गेली.बदल इतका मोठा होता,की जणू एक नवीन प्रजातीच घडली होती.पूर्वी एकेका वारुळात एक राणी-मुंगी आणि दहाएक हजार मुंग्या असायच्या.त्या प्रकारच्या वारुळाला आपण महाप्राणी म्हटलं होतं.आजही तसे महाप्राणी होते,पण सोबतच एक नवा महासमाज घडत होता.त्यात हज़ारो राणी- मुंग्या आणि कोट्यवधी इतर मुंग्या असायच्या.


प्रत्येक राणीचं वारूळ म्हटलं तर वेगळं असायचं,पण बदल- मुंग्यांची ही अनेक वारुळं जमिनीखालून भुयार-बोगद्यांनी जोडलेलीअसायची.या वारुळांमध्ये अन्नासाठी स्पर्धा नव्हती.त्यांच्यातल्या मुंग्या शक्तिप्रदर्शनाचे सामनेही भरवत नसत.फक्त एक महाप्रचंड, खादाड मुंग्यांचा तो समूह बनला होता. महासमाजाची क्षेत्रं वाढवायची पद्धत साध्या वारुळांच्या पद्धतीपेक्षा फार वेगळी होती.बदल- मुंग्या नवीन क्षेत्रांत बिळं खोदायच्या,आणि या नव्या ठाण्यांपासून गस्ती तुकड्या आणखीनच नव्या क्षेत्रात पाठवायच्या.या 


तुकड्या फार दूर जायच्या नाहीत,त्यामुळे शत्रू भेटलाच तर कुमक मागवणं सोपं जायचं.अन्न सापडलं,तर तेही लवकर घरी नेता यायचं.कोणी शत्रू भेटलाच,तर पुरेसं सैन्य जमा होईपर्यंत बदल-मुंग्या वाट पाहायच्या,आणि मग सामने शक्तिप्रदर्शन वगैरे न करता थेट हल्ला करायच्या.


ओढा-मुंग्यांना पूर्वेकडच्या सीमेवर पहिली गस्ती तुकडी भेटली,आणि लवकरच अनेक गस्ती दळं भेटू लागली.

ओढा - मुंग्यांनी एक सामना घेऊन शक्तिप्रदर्शन करायचं ठरवलं.त्यांच्या प्रजातीची ती पूर्वापार चालत आलेली पद्धत होती.तेव्हा महासमाजाचं गस्ती दळ भेटताच ओढा- मुंग्या पोट फुगवून,पाय ताठ करून त्यांना धमकावू लागल्या.


पण तसा कोणताच राजनैतिक व्यवहार न करता बदल- मुंग्यांची गस्ती दळं पळून गेली.ती गेली होती कुमक आणायला.कुमक येईपर्यंत जर ओढा-मुंग्यांचं शड्डू ठोकणं चालूच राहिलं,तर कुमक येताच धमकावणं,घाबरवणं,बोलाचाली, असं काहीही न होता बदल- मुंग्या पळायच्या तरी,नाही तर शर्थीचा हल्ला करायच्या.


होता होता आता या क्षेत्रात एकच शांत,स्थिर साम्राज्य होतं एकाच प्रजातीच्या मुंग्यांची वारुळं, त्यांचे सीमावाद,

त्यांची युद्धं,सगळं संपलं होतं. कोणी लढायचं,कोणी नवी वारुळं घडवायला राजकुमारी पैदा करायच्या,हे प्रश्न संपले.आता महासमाजाच्या अनेक राणुकल्या मोठ्या,

सुट्या राण्यांची जागा व्यापत होत्या.त्यांच्यापैकी दोनचार मेल्या,तरी महासमाजावर मोठा परिणाम होत नसे.क्षेत्रभर शांतता.सर्व मुंग्या समान,साम्राज्य अमर झालेलं.सगळे एका लहानशा जनुक स्थित्यंतराचे,त्यानं घडवलेल्या सामाजिक वागणुकीतल्या बदलाचे परिणाम.


समाजरचना बदलली.शासनपद्धती बदलली. प्रजेच्या जीवनाचा दर्जा बदलला.शांतता,समता,वाढ,सगळं असूनही महासमाज खऱ्या अर्थानं निरोगी नव्हता.तो आपल्या परिसरातल्या निसर्गाशी जुळून,संतुलित झालेला नव्हता. त्याची प्रचंड,घनदाट प्रजा परिसराला झेपत नव्हती.बदल- मुंग्यांच्या क्षेत्रातल्या काही वनस्पती,काही प्राणी कमी व्हायला लागले. काही तर नष्टच झाले.सर्वांत आधी संपल्या बदल-मुंग्यांसारख्या इतर मुंग्या;ओढा-वारूळ,पायवाट-वारूळ पद्धतीनं जगणाऱ्या.


जितकी एखादी जीवजात बदल- मुंग्यांना जवळची,

तितकी ती झपाट्यानं नष्ट झाली. बदल-मुंग्यांसारखंच अन्न खाणाऱ्या मुंग्यांची उपासमार व्हायला लागली.बदल- मुंग्यांच्या संख्येमुळे त्या अन्नावर आधी हात मारायच्या; आणि तसलंच अन्न खाणाऱ्यांना अन्न कमी मिळायचं.

त्यांच्या गस्ती मुंग्या,मावा किड्यांना दोहणाऱ्या मुंग्या यांची बदल-मुंग्यांशी भांडणं व्हायची.आणि संख्याबळामुळे नेहमी बदल- मुंग्याच जिंकायच्या.


नोकोबी परिसरातले मुंग्या खाणारे जीवही त्रासात होते.कोळी,बीटल भुंगे हे मुंग्या खाणारे जीव आता मुंग्यांच्या संख्येमुळे स्वतःच भक्ष्य व्हायला लागले. त्यांची संख्या घटल्यानं बदल- मुंग्यांची संख्या अधिकच वेगानं वाढू लागली.


महासमाजानं आपला परिसर कह्यात घेतला होता;शत्रू आणि स्पर्धकांवर मात केली होती; आपलं भौगोलिक क्षेत्र आणि अन्नक्षेत्र वाढवलं होतं;नवे ऊर्जास्रोत शोधले होते आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून मुंग्याची पैदास विक्रमी पातळीवर नेऊन ठेवली होती.पण घुबड तलावाच्या किनाऱ्यावरची महासमाजाची पकड टिकाऊ नव्हती.


परिसरशास्त्राच्या दीर्घ कालगणनेच्या मापांत महासमाज फारतर मूठभर वर्षे टिकणार होता.क्षेत्र वाढवतानाच त्याच्या बदल्यात महासमाजानं शाश्वतीचा बळी दिला होता.जे जनुक स्थित्यंतर यशाकडे नेणारे वाटले होते,ती खरं तर एक घोडचूक होती! परिसराचा ऱ्हास करणं ही महासाम्राज्याच्या स्थापने-साठी,वाढीसाठी दिलेली जबर किंमत होती.


असे आहे अँटहिल कादंबरीतले रूपक.मानवाने जनुकीय नाही,तर स्मरुकीय,निर्मुकीय बदलातून आपापसातले कलह कमी करून,आपली संख्या भरमसाट वाढवून जीवसृष्टीवर जबरदस्त आक्रमण केले आहे.हे परिवर्तन यशाकडे नेणारे भासत असले तरी ती खरं तर एक घोडचूक आहे.! परिसराचा ऱ्हास करणं,ही मानवी वर्चस्वाच्या स्थापनेसाठी दिलेली जबर किंमत आहे.


१८ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..