१५१६ साली थॉमस मो(अ)रचं 'युटोपिया' हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तकात त्या वेळची आर्थिक,
सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याचं चित्र मोरनं 'युटोपिया'मध्ये रंगवलं होतं. 'युटोपिया' हे दोन भागांत किंवा दोन पुस्तकांच्या रूपात विभागलं गेलं आहे.पहिला भाग 'डायलॉग ऑफ कौन्सिल' या नावानं ओळखला जातो.तर दुसऱ्या भागाला '
डिस्कोर्स ऑन युटोपिया' असं म्हटलं जातं.या पुस्तकात गाव,प्रवास,व्यापार,वाहतूक,धर्म,लष्कर
(किंवा सैन्य) अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबद्दल बोललं गेलंय.
कॅथलिक चर्चचा सेंट थॉमस मोर हा एक इंग्रज कायदेतज्ज्ञ,मानवतावादी,सामाजिक तत्त्ववेत्ता आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होता.'युटोपिया' या काल्पनिक बेटावरच्या राजकीय व्यवस्थेबद्दलचं 'युटोपिया' हे त्याचं पुस्तक प्रचंड गाजलं.या पुस्तकात त्यानं जे मांडलं ते सगळं काल्पनिक होतं.तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं आणि थॉमस मोरलाही!या पुस्तकाकडे एक सामाजिक-राजकीय टीकात्मक,उपहासात्मक लिखाण म्हणून बघितलं जातं.
१५१६ साली थॉमस मोरचं 'युटोपिया' हे पुस्तक प्रकाशित झालं.या पुस्तकात त्याचे विडंबनात्मक विचार काळाच्या खूप पुढे जाणारे होते.त्या वेळची आर्थिक,सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याचं चित्र मोरनं युटोपिया मध्ये रंगवलं होत.लॅटिनमध्येच संवाद साधत आणि लिखाणही करत त्यामुळेच 'युटोपिया'च लिखाण लॅटिन भाषेत केलं गेलं.'युटोपिया'च्या पहिल्या आवृत्तीनंतर प्रोटेस्टंट रीफॉर्मेशनचा काळ सुरु झाला.कॅथलिक चर्च आणि सुधारक यांच्यात खडाजंगी सुरू झाली.परिणामी आगीत तेल ओतल्यासारखे होईल या भीतीन युटोपिया ची पुढची आवृत्ती काढणं पुढे ढकललं गेलं. १५५१ साली 'युटोपिया' चं इंग्रजीत भाषांतर केलं गेलं. १६८५ साली त्याचं पुन्हा एकदा इंग्रजी भाषेत भाषांतर झालं.या दोन्ही आवृत्त्यांमधली भाषा जुनाट आणि क्लिष्ट होती.त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सोप्या पद्धतीनं कळावं म्हणून 'युटोपिया'चं पुन्हा एकदा आजच्या वापरात असलेल्या सोप्या इंग्रजीत भाषांतर केले गेलं
युटोपिया म्हणजे एक प्रकार आदर्श व्यवस्था! वेबस्टरच्या शब्दकोशानुसार 'जिथे आदर्श राजकीय आणि आर्थिक समस्या आहे असं एक काल्पनिक बेट' अशी 'युटोपिया' ची व्याख्या केली होती.या पुस्तकात युटोपिया नावाचं एक काल्पनिक बेट दाखवलं आहे आणि या बेटावर राहणान्या लोकांना युटोपियन्स असं संबोधलं आहे.या पुस्तकाची गंमत म्हणजे यात लेखक थॉमस मोर हा स्वत:ही एक पात्र म्हणून सामील झाला होता. 'युटोपिया' हे दोन भागांत विभागलं गेलं आहे.पहिला भाग 'डायलॉग ऑफ कॉन्सिल या नावानं ओळखला जातो,तर दुसऱ्या भागाला 'डिस्कोर्स ऑन युटोपिया' असं म्हटलं जातं.या पुस्तकात गाव,प्रवास,व्यापार,वाहतूक, धर्म,लष्कर (किंवा सैन्य) अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबद्दल बोललं गेलंय.
पुस्तकाची सुरुवात अतिशय रंजक तऱ्हेनं होते. थॉमस मोर हा नेदरलँडमध्ये राहत असतो.राजा हेन्रीचा अँबॅसॅडर म्हणून त्याचं काम असतं. त्याची पीटर जायल्स नावाच्या एका व्यक्तीशी दोस्ती होते.जायल्स हा अतिशय बुद्धिमान असतो.एकदा थॉमस मोर चर्चमधून आपल्या घरी परतताना तो पीटर जायल्सच्या घराकडे वळतो,तेव्हा त्याला जायल्स एका वृद्ध माणसाबरोबर बोलत असलेला दिसतो.लांब दाढी असलेल्या या माणसाचं नाव राफाएल हायदलोडे असं असतं.तो पोर्तुगालहून आलेला असतो आणि तो एक तत्त्वज्ञही असतो.जगभर भटकंती केल्याच्या खाणाखुणा त्याच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर पडलेल्या दिसत असतात. त्याच्याकडे बघताक्षणी तो ज्ञानी,बहुव्यासंगी असल्याचंही लक्षात येत असतं.
राफाएल हायदलोडेशी ओळख झाल्यावर थॉमस मोर,पीटर जायल्स आणि राफाएल हायदलोडे हे तिघं जण थॉमस मोरच्या घरी येऊन त्याच्या बागेत गप्पा मारत बसतात.गप्पांमधून राफाएल एक (अन्वेषक ) हिस्टॉरिकल एक्सप्लोरर असल्याचंही समजतं. तो जगातल्या अनेक ठिकाणी फिरल्यामुळे अनेक प्रकारचे लोक आणि अनेक प्रकारच्या संस्कृती यांच्याशी त्याचा जवळून संबंध आलेला असतो.याच प्रवासात त्याला युटोपियन्सबद्दल कळलेलं असतं आणि तो युटोपियातही जाऊन पोहोचतो.युटोपियाबद्दल तो थॉमस मोर आणि पीटर जायल्स यांना सांगायला लागतो तेव्हा ते दोघंही खूपच प्रभावित होतात.थॉमस मोर तर राफाएल हायदलोडेला तू राजपुत्राचा सल्लागार म्हणून काम करायला पाहिजेस,असं उत्साहाच्या भरात सांगतो.मात्र या गोष्टीवर हायदलोडे नापसंती दर्शवतो.राजपुत्राच्या हाताखाली काम करणारी यंत्रणा आणि ते लोक अहंकारी,आत्मलीन आणि भ्रष्ट असल्याचं तो सांगतो.
आपला त्यामागचा अनुभवही तो त्यांना सांगतो.
इंग्लंडमधली सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे,असं तो म्हणतो.त्याचबरोबर तिथल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावली जाते या गोष्टीकडे तो लक्ष वेधतो.
फाशी देऊन त्यांना संपवण्यापेक्षा त्यांच्यातल्या शक्तीचा कष्टप्रद कामासाठी योग्य उपयोग करून घेतला पाहिजे,असं तो म्हणतो.मात्र त्याच्या म्हणण्याकडे कोणीही त्या वेळी लक्ष दिलेलं नसतं.
युटोपिया बेटाबद्दल हायदलोडे माहिती सांगतो. या बेटाची राजधानी ॲमेरोट असते.तिथल्या लोकांचं वैयक्तिक मालकीचं काहीही नसतं. आपल्या जवळ असलेली सगळी साधनं, सगळ्या गोष्टी ते परस्परांमध्ये शेअर करत असतात.राहण्याच्या जागेपासून ते ब्रेड आणि वाइनपर्यंत सगळं काही ते एकमेकांमध्ये वाटून घेत असतात.खरं तर तिथे पैसा ही गोष्ट अस्तित्वातच नसते.तिथले लोक सोन्याचाही तिरस्कार करताना दिसतात.सोनं हा धातू कुठल्याही उपयोगाचा नाही,असं त्यांचं म्हणंन असतं.
युटोपियामधली कुटुंब मोठी असतात.प्रत्येक कुटुंबात कमीत कमी १०,तर जास्तीत जास्त १६ सदस्य असतात.
तिथली प्रत्येक व्यक्ती दिवसातले सहा तास काम करते,
तर काही व्यक्ती कामच करत नाहीत.ती सगळी माणसं फक्त खातात,पितात आणि आराम करतात पण त्यांना त्याबद्दल कोणी जाब विचारत नाही. अर्थात युटोपियामध्ये काही कायदे लागू असतात.एकदा गुन्हा केला तर तो माफ केला जातो,त्याबद्दल कुठली शिक्षा केली जात नाही. पण तोच गुन्हा पुन्हा दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीकडून घडला तर मात्र त्याला शिक्षाच ठोठावली जाते.खूपच अक्षम्य गुन्हा घडल्यास तिथल्या लोकांना गुलामासारखी कामं सोपवली जातात आणि त्याना राबवून घेतलं जातं, तिथल्या मजिस्ट्रेट्सना फिलार्च म्हणतात.ते लोकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करतात, मात्र त्याच्याकडून अयोग्य वर्तन झालं तर मजिस्ट्रेससाठीदेखील कायदे लागू होतात. युटोपियामधले कायदे,तिथली धोरणं,या समाजात बोकाळणारा भ्रष्टाचार आणि अयोग्य निर्णयप्रक्रिया तिथल्या नागरिकांना वाचवतात. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांसाठी युटोपियामध्ये शहरंदेखील राखून ठेवली असतात.
युटोपियामधल्या लोकांना युद्ध आणि लढाया यांचा तिटकारा असतो.ते शांतताप्रिय असतात.त्यांना जंगली जनावरांची झुंनदेखील आवडत नाही. मात्र आत्मरक्षणाची वेळ आली तर ते शस्त्र उचलण्यासाठी सज्ज होतात.
थोडक्यात, 'युटोपिया हा कल्याणकारी,आदर्श असा देश आहे.युरोपियन देशांमधल्या समस्येचं मूळ पैसा हे असून युटोपियामध्ये पैसाच नाही. त्यामुळे तिथे फार गंभीर अशा समस्याही नाहीत,'असं हायदलोंडे म्हणतो.युटोपियन लोकांसारखं जगणं आणि तिथली शांतता हायदलोडे युरोपातल्या इतर देशांमध्ये बघू इच्छितो,पण त्याच वेळी इतर ठिकाणी ते शक्य नाही हेही त्याला ठाऊक असतं.
खरं तर थॉमस मोरचा काळच वेगळा होता. कोलंबसन अमेरिकेचा शोध लावण्याअगोदर एकच वर्ष आधी आठव्या हेन्रीचा जन्म झाला होता.हेन्रीच्या भावाचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे हेन्रीचं लग्न त्याच्या भावजयीबरोबर हेन्रीच्या वडिलांनी लावलं.त्या वेळी समाजामध्ये श्रीमंत-गरीब अशी प्रचंड दरी होती.काही अतिश्रीमंत लोक वैभवात लोळत होते,तर काही लोक अतिगरिबी आणि कर्ज यात बुडालेले होते. त्यांना कर्ज फेडता आलं नाही तर थेट तुरुंगात टाकलं जात असे.
सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणं खूप कठीण झालं होतं.न्यायव्यवस्थेत खूप भ्रष्टाचार होता.त्या वेळी कॅथलिक चर्च नेहमीच श्रीमंत वर्गाची बाजू घेत असे.तसंच हे चर्च ख्रिस्ताच्या तत्त्वांचे पालन करत नसल्यामुळे ते खूप भरकटलंही होतं.तत्कालीन युद्धामुळे इंग्लंडची अर्थव्यवस्थादेखील कमकुवत झाली होती. त्यावर उपाय म्हणून सरकारनं जनतेवरचे कर वाढवले होते. त्यामुळे लोकांमधला असंतोष जास्तच वाढत चालला होता.
या वेळी प्रबोधनकाळ (रेनेसान्स) उदयाला येत होता आणि अनेक कलांविषयी लोकांमध्ये खूपच रस निर्माण झाला होता. इटलीमध्ये सुरू झालेली प्रबोधनाची ही लाट इंग्लंडबरोबरच युरोपातल्या इतर देशांतही चटकन पसरली.
इरॅस्मस,मायकल अँजेलो,लिओनार्डो दा व्हिंची अशी अनेक माणसे आपापल्या कला क्षेत्रात भरीव कामगिरी करत होती.
अशा स्थित्यंतराच्या काळात,युटोपिया लिहिणाऱ्या थॉमस मोरचा जन्म ७ फेब्रुवारी १४७८ या दिवशी लंडनमध्ये मिल्क स्ट्रीट इथे जॉन मोर आणि अँग्नेस ग्रँजर यांच्या पोटी झाला.थॉमस मोरचे वडील सर जॉन मोर यांनी सुरुवातीला काही काळ वकिली केली आणि नंतर न्यायाधीश म्हणून काम केलं होत.सहा भावंडांपैकी थॉमसचा क्रमांक दुसरा होता.त्याचे शालेय शिक्षण सेंट अँथनी स्कूल या त्या वेळच्या सर्वोत्कृष्ट शाळेत झालं.
शालेय शिक्षण संपल्यावर मोरनं ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला.तिथे शास्त्रीय शिक्षणाबरोबरच तो लॅटिन आणि ग्रीक भाषांमध्ये पारंगत झाला.आपल्या मुलानं आपल्याप्रमाणेच कायदेतज्ज्ञ व्हावं,अशी जॉन मोरची इच्छा असल्यामुळे थॉमस मोरनं कायद्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. धर्माकडे ओढा असल्यामुळे थॉमस मोर काही काळ लंडनजवळच्या एका मठामध्ये आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहिला.याच काळात मोरनं प्लेटोचं 'रिपब्लिक' आणि सेंट ऑगस्टाईन यांचं लिखाण वाचलं आणि तो त्या लिखाणामुळे प्रभावित झाला.मोर उत्तम लिहायचा आणि बोलायचा.त्याची हुशारी, तर्कशुद्ध विचारसरणी आणि त्याचा प्रामाणिकपणा यामुळे त्याची प्रगती खूप चट्कन झाली.त्याचं गणित आणि लॅटिन भाषेचं ज्ञान आणि त्याचं कर्तृत्व यांच्यामुळे त्याची इंग्लिश पार्लमेंटमध्ये लंडन शहराचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली.याच काळात त्याच्या व्यक्तिमत्त्वानं आठवा हेन्री प्रभावित झाला आणि त्यानं १५२९ साली मोरची 'हाय चॅन्सलर' म्हणून नेमणूक केली.
खरं तर थॉमस मोर हा आठव्या हेन्रीचा एक विश्वासू सेवक आणि मित्र होता.त्यामुळे आपल्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा असलेल्या मोरला राजा हेन्री अनेक गोष्टी सांगत असे.. मोरचे विचार राजाला पटायचे आणि त्यामुळेच मोरनं त्याचा सचिव आणि वैयक्तिक सल्लागार म्हणूनही काम बघितलं.कित्येकदा राजा हेन्री मोरच्या घरी जेवायलाही जात असे.मोरच्या बागेत दोघं फिरायला जात.त्या वेळी खगोलशास्त्र,कला आणि देवधर्म अशा अनेक गोष्टींवर ते बरेचदा चर्चाही करत.
काही काळानंतर थॉमस मोरनं सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगायचं ठरवलं. १५०५ साली थॉमस मोरनं
जेन कॉल्ट हिच्याशी लग्न केलं.त्यांना मार्गारेट,
एलिझाबेथ,सिसिली आणि जॉन नावाची चार मुलं झाली.मात्र काहीच काळात जेनचा मृत्यू झाला.आणि आपल्या मुलांचं संगोपन चांगलं व्हावं या दृष्टीने थॉमस मोरनं अँलिस मिडल्टन या तरुण विधवेशी दुसर लग्न केलं. लग्नाच्या वेळी अँलिसला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी होती आणि तिचा सांभाळही थॉमस मोरनं पिता म्हणूनच पुढे केला.राजा आठवा हेन्री आणि थॉमस मोर या दोघांची मैत्री अगदी घट्ट असली तरी राजा हेन्री अत्यंत पराकोटीचा स्वार्थी आणि आत्मकेंद्री स्वभावाचा असून तो आपल्या जवळच्या माणसाचाही कधीही घातपात करू शकतो याची मोरला खात्री होती.
एकदा सर थॉमसचा जावई त्यांच्या राजाबरोबरच्या मैत्रीचं कौतुक करायला लागला,तेव्हा थॉमस मोर त्याला म्हणाला,जर माझ डोकं उडवून राजाला एखादा किल्ला मिळणार असेल,तर तो माझा शिरच्छेदही करायला मागेपुढे पाहणार नाही.
त्याच वेळी आठव्या हेन्रीची धार्मिकताही थॉमस मोरला कळून चुकली होती.जेव्हा मोरची चॅन्सलर म्हणून नेमणूक झाली,तेव्हा हेन्रीन आपलं कॅथरीनबरोबरचं लग्न रद्दबातल करायचं ठरवलं होतं.कॅथरीन ही आठव्या हेन्रीच्याच भावाची बायको होती;पण लग्नानंतर १८ वर्ष झाली तरीही त्याला मुलगा झाला नव्हता आणि त्या वेळी इंग्लंडमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी त्याची राजवट म्हणजे वंश पुढे चालायला पाहिजे,असं हेन्रीचं मत होतं.
शिवाय त्याचं अँन बोलेन या मुलींवर प्रेम बसलं होतं. म्हणून हेन्रीला कॅथरीनपासून सुटका हवी होती.
हेन्रीनं सातवा पोप क्लेमेंट याच्याकडे लग्नाच्या रदबदलीबद्दल विनंती केली;पण हा पोप पाचव्या चार्ल्सच्या आधिपत्याखाली होता आणि हा चार्ल्स हा कॅथरीनचाच पुतण्या होता.यामुळे पोपनं कॅथरीनबरोबरचं लग्न रद्दबातल करायला नकार दिला.त्याबरोबर चिडून जाऊन हेन्रीनं स्वतःलाच चर्च ऑफ इंग्लंडचा प्रमुख म्हणून जाहीर घोषित केलं आणि रोमन चर्च पासून स्वतःला विभक्त केलं.या वेळी राजा हाच चर्चचाही सर्वोच असल्याची शपथ सगळ्यांना घ्यावी लागली.मोर तोपर्यंत इतका लोकप्रिय आणि प्रभावशाली झाला होता,की त्याची यासाठी संमती मिळवणं राजाला गरजेचं वाटलं; पण मोरला राजाचं वागणं आणि म्हणणं न पटल्यामुळे त्यानं तशी शपथ घ्यायला नकार दिला आणि १५ मे १५३२ या दिवशी त्यानं आपल्या चॅन्सलर पदाचा राजीनामा दिला.
अखेरच्या काळात आपलं उत्पन्न कमी झाल्यामुळे आपलं जीवनमानही त्याप्रमाणे बदलायचं आणि चेल्सी या आपल्या आवडत्या ठिकाणी उरलेलं आयुष्य काढायचं असं मोरनं ठरवलं होतं;पण तोपर्यंत तो इतका प्रसिद्ध झाला होता,की त्याचं शांत बसणं हेही हेन्रीला धोकादायक वाटायला लागलं. जेव्हा अँनच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला मोर गैरहजर राहिला,तेव्हा राजा हेन्री खूपच चिडला होता.
थॉमस मोर हा कॅथलिक चर्चच्या बाजूने होता. प्रोटेस्टंट सुधारणावाद्यांचं बंड मोडून काढण्यात त्याचा सहभाग होता.त्याच्यावर लाचलुचपतीचे आरोप झाले.खरं तर त्यानं आपलं चॅन्सलरचं पद सोडल्यानंतर तो पूर्ण कफल्लक झाला होता. त्याच्याजवळ कुठलीही संपत्ती नव्हती.मोरनं राजाज्ञेचं पालन केलं नाही,असा आरोप मोरवर करण्यात आला.तसंच त्यानं शपथनाम्यावर स्वाक्षरी करावी म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्यात आला;पण मोरनं कुठल्याच दबावाला भीक घातली नाही.
अखेर राजानं १७ एप्रिल १५३४ या दिवशी मोरला शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी टॉवरमध्ये पाठवण्यात आलं.त्याच्यावर या काळात अनेक आरोप हे झाले.मात्र आपल्यावरचे आरोप त्यानं फेटाळून लावले.'मी राजाचा आज्ञाधारक सेवक आहे,पण त्याआधी मी परमेश्वराचा सेवक आहे.'असं थॉमस मोरनं त्याला त्याची मृत्युदंडाची शिक्षा भोगण्यासाठी नेताना म्हटलं होतं.
आठव्या हेन्री राजाला चर्चचा प्रमुख म्हणून जेव्हा नेमलं होतं.तेव्हा त्या शपथपत्रावर सही करायला नकार दिल्यामुळे थॉमस मोरला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
थॉमस मोर स्वभावानं खूप विनोदी आणि मिश्कील होता.आपण नेहमी आनंदानं जगलं पाहिजे,अशी त्याची धारणा होती.त्याला एका टॉवरमध्ये बंदिस्त करून ठेवलं, त्याच्यावर प्रचंड शारीरिक अत्याचार करण्यात आले.त्याच्या मृत्युदंडाची वेळ जवळ येत असतानाही त्याचा आनंदी आणि विनोदी स्वभाव काही बदलला नाही.
मृत्युदंडाच्या वेळी त्यानं जेव्हा आपलं डोकं त्या ब्लॉकवर ठेवलं,तेव्हाही त्यानं विनोद केला होता.तो म्हणाला,'तुमची कुऱ्हाड माझ्या दाढीला मात्र लावू नका;कारण तिनं काही राजद्रोह केलेला नाहीये.'त्याचे उद्गार ऐकून त्या मारेकऱ्याला हसावं की रडावं हेच कळेना!
आपल्या राजकीय कारकीर्दीत मोरचं मन सतत सतर्क होतं आणि त्यानं या काळात भरपूर लिखाण केलं.त्यानं प्रार्थना,कविता,पत्रव्यवहार आणि 'क्रॉनिकल ऑफ रिचर्ड','आपॉलॉजी' आणि 'डायलॉग्ज',असं बरंचसं लिखाणही केलं. या सगळ्यातून मोर एक प्रगल्भ मानवतावादी विचारवंत म्हणून वाचकाला भेटतो.
६ जुलै १५३५ या दिवशी थॉमस मोरचा मृत्यू झाला.जाताना आपल्या मागे आदर्श राज्याचं सुरेख स्वप्न दाखवणारं 'युटोपिया' मागे ठेवून गेला!
"युद्धाने मिळवलेल्या वैभवासारखं लज्जास्पद दुसरं काही नाही." - थॉमस मोर
पुढील भागात पाहू 'द प्रिन्स' -
निकोलो मॅकियावेली ( १५३२ )