माणूस हा परिस्थितीचे अपत्य नसून परिस्थिती माणसाचे अपत्य असते.बेंजामिन डिझरेलीचे हे जगण्याचे सुत्र कसं जगायला हवं याचं आत्मभान देतं.
काही दिवसांपूर्वी मला श्रावण सर हा काव्यसंग्रह श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर यांच्याकडून मिळाला. हे आमचे परममित्र आहेत,पण अजूनही आमची प्रत्यक्षात भेट झालेली नाही,तरीही पण फोनवरील सुसंवादातून आम्ही जानी दोस्त बनलेलो आहोत. ( हि भेट घडवून आणणारे अवलिया म्हणजे आमचे माधव गव्हाने सर ) विचारांची देवाणघेवाण यातून विचारांची प्रस्तावना समजलेलीआहे.
या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ मानवी जीवनातील स्थितंतर याबद्दल सांगत आहे.हे उत्कृष्ट कवी विष्णू थोरे यांनी तयार केलेला आहे व यातून त्यांचे थोरपण दिसून येते.
संकल्पना-सौ.वंदना श्रावण भवर यांची आहे.अर्पण पत्रिका बाप,मोठी आई,आई यांना समर्पित केलेली आहे.लीला शिंदे सुप्रसिद्ध बाल साहित्यिक,नारायण पुरी,
श्री.किशोर शितोळे (अध्यक्ष-देवगिरी नागरी सहकारी बँक लि.औरंगाबाद,अध्यक्ष-जलदूत NGO.औरंगाबाद)
प्रा.संजय गायकवाड,यांचे संदेश व अभिप्राय या काव्यसंग्रहाला लाभले आहेत.
मुखपृष्ठावर माणूस,संवादशील संवाद,सुसंवाद याची सांगड घालून एक परिपूर्ण समाज निर्माण करण्याचा,
तंत्रज्ञान स्वीकारत असताना माणुसकीची नाळ अखंड राहिली पाहिजे.हा कवीचा प्रामाणिक अट्टाहास वाखाणण्याजोगा आहे.
यामध्ये ७४ कविता आहेत.ज्या मानवी जीवनातील सर्वांगाला स्पर्श करून जातात.तर पृष्ठ संख्या 'मोकळ्या' पानासहीत ११४ आहे.मोकळी पानं ठेवणं हे धाडसाचं काम आहे याबद्दल संबंधितांचे आभार! प्रकाशक शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद यांची आकर्षक मांडणी शब्दांचा,आकार मोठा यासाठी त्यांचे आभार..
तू कोण ? या कवितेमध्ये जगातील चाललेल्या घडामोडीचे वास्तव मांडलेले आहे.सर्वांसाठी करता करता माझं माझ्यासाठी जगायचं राहिलं हे सांगायला कवी मात्र विसरलेले नाहीत.
माणूस भुकेला झाला! हि कविता भावनांचा माणूसकीचा सडा रोजच पडतो इथं पैशापाई, प्रसिद्धी पाई,प्रत्येक जण नडतो इथं,रक्ताच्या नात्याचं मोल,आज खुजं झालं या कवितेत सध्या माणूस माणसाशी कसा वागतो याचं फसवं पण सत्य असं प्रतिबिंब आहे.
मही माय आईचं मोठेपण सांगते.मह्या मायनं, कधीच स्वप्न पाहिलं नाही.. कारण ती स्वप्नासाठी,कधी झोपलीच नाही.कामाच्या थकव्यानं तिला भाकरीच्या तुकड्याच्या शोधातच झोपवलं मह्या मायनं.कधीचं स्वप्न पाहिलं नाही.संसाराच ही मांडणी वेदना देणारी आहे.
पैसा पैसा काय करू शकतो याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे.पैशानं बरचं काही मिळतं पण पैशांन सर्व काही मिळत नाही.पैसा देवासारखा वाटला तरी देव पैशाला मानू नका.अंतिम क्षणी माणसाचं येतात कामा जेव्हा पैसा देतो धोका.पैसा बोलतो असे म्हणणे योग्य आहे; पण पैसा पिचलेली भाषा बोलतो.त्यापेक्षा ह्रदय अधिक चांगले,स्पष्ट आणि शहाणपणाची भाषा बोलते.या पुस्तकात वाचलेल्या वैचारिक शहाणपणाची ही कविता वाचताना आठवण झाली.
संवाद मुका झाला..! यामध्ये राम ते हिटलर प्रवास अतिशय मार्मिकपणे मांडला आहे.
जी कवीचा वाचल्यामुळे या नात्याबद्दल पुन्हा खोलात जाऊन विचार करावासा वाटला ती कविता म्हणजे रक्षाबंधन
धागा कुणाचा सप्तरंगी तर,
कुणाचा विविध रंगात,
नात्यात रंगलेला
श्रावणमासात,
भाऊ-बहिणीच्या मनात,
आपुलकीनं बांधलेला
धागा नुसता रेशीमबंध नाही,
ती एक नात्यांची नाळ आहे.
लाडक्या भाऊरायाच्या हाती,
बांधते ताईचं हृदय आभाळ आहे
कधी भाऊ, कधी बाप,
तर कधी माय बनून जपते ताई
आपल्या लहान-मोठ्या भावाखातर,
स्वतः दिव्यासारखी तपते ताई
कधी गुरु बनून शिकविते,
तर कधी समईसारखी जळते ताई
बहिणीचं जगणं फक्त,
तिच्या संसारापुरतं राहत नाही,
सासरी असूनही माहेरची आस,
शेवटपर्यंत तुटत नाही
घराचं घरपण माय,
तर बहीण घरातील देव्हारा
बहिणीविना सुनासुना,
कुटुंबाचा गाभारा
मायनंतर माया लावणारं,
जगात दुसरं कुणीच नाही
लय थोर नशीब लागत भाऊ,
ज्या घरात असते ताई
दरसाल पौर्णिमेला मन गहिवरून येते,
बहीण नसल्याची सल मनात सलत जाते
मजबूत बांधा असला तरी,
मनगट माझं ढिसूर आहे.
बहिणीच्या राखीखातर,
मन अजूनही आतुर आहे
मन अजूनही आतुर आहे.
ही कविता वाचून मी स्तब्ध झालो होतो या कवितेमुळे एक नवीन दृष्टिकोन मला मिळाला.
राजा शिवछत्रपती हि कविता संपुर्ण पराक्रमी इतिहास सांगुन गेली व मी माणुस म्हणून का आहे याचं उत्तर देवून गेली.
सोनेरी सूर्य घायाळ झाला
त्या क्षणाला,त्या क्षणाला शिवनेरीवर,
महाराष्ट्राचा मानबिंदू जन्मला
सह्याद्रीच्या पानापानात,
मातीच्या कणाकणात,
महाराष्ट्राच्या मनामनात,
अन् कालचक्राच्या क्षणाक्षणात
नवचैतन्य निर्माण झालं
महाराष्ट्राच्या मातीचं,
कुलदैवत जन्माला आलं
माँसाहेब जिजाऊच्या साधनेला,
शहाजीराजेंच्या समिधेला शिवराय,
फळ आलं अन् अवघ्या महाराष्ट्राचं,
जन-मन आनंदात न्हालं
आधुनिक पहाट ! हि कविता सध्या लोकांचे ढासळलेलं आरोग्य व दवाखान्यातील वारी,तपासणीच्या
नावाखाली होणारी लूट पण अजूनही दवाखान्याला देऊळ,डॉक्टरला देव मानलं जातं ही श्रध्दाच विश्वास ठेव म्हणून सांगते.ही श्रद्धा माझी ही श्रध्दा आहे.
बाप कधी निवांत असतो का ?
जिन्याखालचं जिनं
लोकल टू ग्लोबल व्हाया संवाद !
काळाचा घाला
हसरा बुद्ध ..दासरा माणूस
भीमा तुझ्यामुळे
आधुनिक रावण
रंग बोलके
श्रावण सरी !
आनंद शोधता आला पाहिजे !
न्यू वर्ष नव हर्ष
किमान मास्तर हवा !
सावधान! घर मुकं होत आहे !
माय मराठी
या कविता वाचल्या आणि..
" भावना हाच नियम आणि नियम हीच भावना.भावना हा शक्तीचा स्तोत्र आहे.त्यामुळे एखादी गोष्ट प्राप्त करायची असली तर आपल्या भावना समृद्ध असायला हव्यात."
'मनोविज्ञानाचे गुरू थॉमस ट्रॉवर्ड' यांची प्रखरपणे आठवण झाली.
हा काव्यसंग्रह वाचला आणि बाजूला ठेवला.जणू हा काव्यसंग्रह बोरिस पास्तरनाक
यांचे खालील वाक्यच सांगत आहे.
जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,
जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे.
शेवटी जाता जाता
कवी श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर यांनी जो अट्टाहास केला आहे.आपुलकी,आत्मीयता आपल्या हातून आपल्या डोळ्यादेखत सुटत चालली आहे.हे धरुन ठेवण्याचे कार्य हा श्रावण सर काव्यसंग्रह नक्कीच करेल.
अश्रू म्हणजे मानवाला लाभलेले भावना व्यक्त करण्याचे अनोखे चिन्ह,ॲमिग्डाला जवळच्या विशिष्ट अश्रुग्रंथीमुळे अश्रू निर्माण होतात.रडणाऱ्याला जवळ घेतले,थोपटले किंवा इतर मार्गाने आश्वासन दिले म्हणजे हा भागच हुंदके थांबवतो..
इमोशनल इंटेलिजन्स मधील हा सत्य वैचारिक विचार मांडणारा काव्यसंग्रह आहे.
धन्यवाद व आभार