* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: संघप्रिय कीटांतील स्पर्धा..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२२/५/२३

संघप्रिय कीटांतील स्पर्धा..

संघप्रिय कीटकांच्यातही प्रामुख्याने झगडा चालतो,तो असतो टापूंसाठी.मुंग्यांचा एकेक परिवार एक राणी व तिची संतती - ही आपापल्या वारुळांभोवतीचा जमेल तेवढा मोठा टापू आपल्या ताब्यात ठेवतात.आपल्याच जातीच्या इतर वारुळांच्या मुंग्यांना तिथून हाकलतात,

आणि ज्यांच्याशी आहाराबाबत स्पर्धा होऊ शकेल अशा इतर जातींच्या मुंग्यांनाही.अशा स्पर्धेत मुंग्या काही एकदम हातघाईवर येत नाहीत.सुरुवात होते नुसत्या शक्तिप्रदर्शनाने.वारूळ पुराणात रॅफच्या अभ्यास निबंधातले विस्तृत उतारे आहेत.


हे दोन वारुळांमधले मुंग्यांचे गट भेटले आणि एकमेकांपुढे नाचायला लागले.पण हे काही शृंगारिक नृत्य नव्हते.तो तर एक सामना होता, दोन वारुळांमधला आपापला मुलूख काबूत ठेवण्याबद्दलचा.दोन्ही बाजूच्या मुंग्या विरोधी पक्षाची ताकद आजमावत होत्या.जोखताना स्वतःच्या ताकदीची जाहिरातही करत होत्या. असं करण्यात कोणत्याच मुंगीला धोका नव्हता; मृत्यूचा सोडाच,पण जखमांचाही.हे होतं शत्रूला जोखणं आणि आपली शक्ती दाखवणं; पहेलवानांनी एकमेकांपुढे शड्डू ठोकण्यासारखं. ह्यात आपली सरशी होईल,आपला टापू सांभाळून राहता येईल,असं दोन्ही वारुळांच्या मुंग्यांना वाटत होतं.


हे शक्तिप्रदर्शन ही काही युद्धाची सुरुवात नव्हती. माणसांची सैन्यं जशी एकमेकांना दरडावायला मिरवणुका काढतात,आपापसातच सराव-युद्ध खेळतात,तसा हा प्रकार होता.भारत-पाक सीमेवर 'वाघा बॉर्डर' ठाण्यावर जसे रोज थाडथाड पाय आपटत दोन्हीकडचे सैनिक एकमेकांवर गुरकावतात,तसा हा खेळ.दोन्ही वारुळांना आपली ताकद दुसऱ्याला दाखवायची होती,एवढंच सामान्यतः एकांडे पशू अशा शक्तिप्रदर्शनावरच मिटवतात.दोघा प्रतिस्पर्ध्यांपैकी एक कोणीतरी आपल्याला हे भांडण जड जाईल असे ठरवून पड घेतो.. परस्परांना इजा करायचे टाळतो.कोणीच दुसऱ्याला जिवे मारायचा विचार करत नाही. 


पण निसर्गाच्या रहाटगाडग्यात संघप्रिय जातींनी हा संयम सोडून दिला आहे.आप्त निवडीच्या गणितात एकेका वैयक्तिक प्राण्याला काही खास किंमत नसते.

पुऱ्या परिवाराचाच विचार असतो. तेव्हा आपापल्या संघाच्या हितसंबंधांसाठी त्याचे सदस्य शिर तळहातावर घेऊन लढायला तयार असतात.

आपापल्या टापूचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव गमावायला सज्ज असतात,आणि अर्थातच जोडीने प्रतिस्पर्ध्याचा खून पाडायला.एकांड्या पशूंत स्वार्थत्यागाला जशी सक्त मर्यादा असते,

तशीच क्रौर्यालाही मर्यादा असते. 


ह्याउलट संघप्रिय पशूंत जसा शर्थीचा स्वार्थत्याग पाहायला मिळतो,तसेच अपरिमित क्रौर्यही.म्हणून अशा मुंग्यांच्यात शक्तिप्रदर्शन संपले की धुमश्चक्री सुरू होऊ शकते.रॅफच्या अभ्यासनिबंधात ह्याचेही वर्णन आहे.


आता दिखाऊ शक्तिप्रदर्शन संपले.कोणतीच मुंगी ताठ उभी राहून उंची वाढवेना,की पोट फुगवून आकार वाढवेना.आता एकमेकींवर चढून आपल्या करवती

सारख्या जबड्यांनी शत्रूचे वेगवेगळे अवयव तोडायचा प्रयत्न होऊ लागला. कवच नसलेल्या भागांना दंश करून विषाचा मारा होऊ लागला.जखमी झालेल्या शत्रूंची खांडोळी उडवली जाऊ लागली.लवकरच सगळं क्षेत्र मेलेल्या आणि जायबंदी मुंग्यांनी भरून गेलं. बहुतेक मेलेल्या मुंग्या पायवाट-वारुळाच्या होत्या.त्यांच्यात राणीची सेवा करणारी,नंतर वारूळ सावरायला मदत करणारी पुढारी मुंगीही होती.तिला ओढा-मुंग्यांनी मारून तिचे तुकडे केले होते.


जर लढाईच्या वेळी पायवाट-राणी जिवंत असती आणि ओढा-मुंग्यांनी तिला पकडलं असतं,तर तत्क्षणी तिच्या खांडोळ्या उडवल्या गेल्या असत्या.


हरलेल्या वारुळांच्या राण्यांना क्षणभरही जिवंत ठेवलं जात नाही.एक म्हणजे एकच राणी चालू शकते.त्या बाबतीत मुंग्यांची मनं कठोर असतात. एकच एक म्होरक्या खपणार,बाकी सगळ्यांनी निमूटपणे त्याच्या सांगण्यानुसार वागायचं असतं! 


म्हणूनच दोन वारुळांमध्ये कधीच तह होत नाही की मैत्री होत नाही... वारुळाची जागा एकाच परिवाराच्या हुकमतीखाली राखणं हे अटळ, अपरिहार्य असतं.आणि वारुळाचं क्षेत्र काहीही करून,प्रसंगी जीव देऊनही राखावं लागतं.


आर्जेन्टीनी मुंग्यांची अगडबंब महानगरी..


मुंग्यांचे सगळे आचरण,एका बाजूनी परक्या परिवारांच्या मुंग्यांना आपल्या टापूतून हाकलणे, जमेल तेव्हा परक्या परिवारांचा मुलूख काबीज करणे,त्यासाठी जरूर तर शर्थीची लढाई करणे, असे खटाटोप,आणि दुसऱ्या बाजूनी आपल्या परिवारात एकच राणी हवी,एकीच्याच आधिपत्याखाली सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळायला पाहिजेत असा अट्टाहास,सारे सारे पूर्णत: उपजत प्रवृत्तींवर अवलंबून असते.सारे स्वाभाविक,

संस्कारजन्य असे काहीही नाही.सारे त्यांच्या जनुकांच्यात नोंदून ठेवलेले गोंदवून ठेवलेले.अर्थातच जनुकांत स्थित्यंतर होऊन ते बदलूही शकते.परंतु, ह्या भांडकुदळ व एकीलाच राणी मानण्याच्या प्रवृत्तींतून मुंग्यांच्या कुलाची भरभराट झाली आहे.त्यांना भूमितलावर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. म्हणून ह्या साऱ्या प्रवृत्ती सर्वप्रचलित झाल्या आहेत.पण अपवाद नसेल तर ती जीवसृष्टी कुठली? ह्या दोनही प्रवृत्ती सोडून दिलेली एक मुंग्यांची जात अलीकडे आढळली आहे - ह्या आहेत एक महापरिवार स्थापन करणाऱ्या आर्जेन्टीनी मुंग्या.ह्या आहेत मूळच्या आर्जेन्टिनातील पराना नदीखोऱ्याच्या रहिवासी. इथे प्रत्येक परिवाराच्या सदस्याच्या शिंगांवर त्यांचा त्यांचा खास वास चोपडलेला असतो.त्या वासामुळे आर्जेन्टीनी मुंग्या इतर मुंग्यांप्रमाणेच परक्या परिवारांच्या सदस्यांशी फटकून वागतात, आपापला टापू राखून ठेवतात. ह्या मूलप्रदेशातल्या आर्जेन्टीनी मुंग्या एका परिवारात एकाच राणीला जगू देतात.


पण गेल्या काही दशकांत आर्जेन्टीनी मुंग्या मूळच्या निवासस्थानातून बाहेर पडून जगभर समशीतोष्ण प्रदेशात पसरल्या आहेत.तिथे त्यांच्यात कायनु-बायनु जनुकीय परिवर्तन झाले आहे हे नक्की,पण नेमके काय ह्याचा अजून उलगडा झालेला नाही.


पण इतर साऱ्या मुंगी जातींच्या मानाने नव्याने वसाहत केलेल्या प्रदेशातल्या आर्जेन्टीनी मुंग्यांत जनुकीय पातळीवर प्रचंड साधर्म्य आढळते,अगदी एकाच परिवारातल्या आया-बहिणींइतके नाही,तरी खूपच - खूप,मुख्य म्हणजे ह्या जनुकीय साधर्म्यामुळे त्यांच्या शिंगांवर चोपडलेला वासही अगदी एकासारखा एक असतो,आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या आर्जेन्टीनी मुंग्यांशी भांडणे बंद केले आहे.आपण सगळ्याच बहिणी- बहिणी अशा वृत्तीने त्या वागू लागल्या आहेत.ह्याच्या बरोबरच त्यांनी एक नवीच प्रजनन प्रणाली स्वीकारली आहे.बहुतेक साऱ्या मुंग्यांत विशिष्ट ऋतूत खास आहार देऊन नव्या राजकन्या व नर पोसले जातात.त्यांना पंख असतात,आणि एका मोक्यावर अनेक वारुळांतून ह्या राजकन्या आणि नर भरारी मारतात. तिथे एकमेकांना भेटतात,त्यांचा समागम होतो,आणि आता फळलेल्या आणि राणीपदाला पोचलेल्या माद्या पंख कापून नवे वारूळ स्थापतात,त्यात अंडी घालतात,मग अंड्यांतून बाहेर येणाऱ्या स्वतःच्या मुलींच्या मदतीने नव्या परिवाराची स्थापना करतात.ह्यात अर्थातच खूप खूप अडचणी येतात.दरम्यान आपले जीवितकार्य संपलेले नर तातडीने मृत्युमुखी पडतात.


आर्जेन्टीनी मुंग्यांनी हे सगळे सोडून दिले आहे. त्यांच्या राजकन्या हवेत भरारी न मारताच एखाद्या नराला भेटतात,त्याच्याशी समागम झाल्यावर आधीच्या परिवारातल्या पाच-दहा बहिणींच्या मदतीने नवा परिवार सुरू करतात. शिवाय अशा वेगवेगळ्या परिवारांच्यात स्पर्धा, भांडणे हीही भानगड नाही.सगळेच एका महापरिवाराचे सदस्य.ह्या अजब प्रणालीने नव-नव्या प्रदेशांत वस्ती स्थापन केलेल्या आर्जेन्टीनी मुंग्यांचे एक अचाट पेव फुटले आहे.टिचग्या,जेमतेम तीन मिलिमीटर लांब. कोणत्याही बारीकसारीक फटीतही सहज घुसू शकणाऱ्या.


पण भूमध्य समुद्राकाठी इटली,फ्रान्स,स्पेन व पोर्तुगाल ह्या चार देशांच्या किनारपट्टीवर सहा हजार किलोमीटर लांब,म्हणजे भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबईपासून कोलकात्यापर्यंत,एवढी त्यांची एक विशाल महानगरी पसरली आहे.शिवाय अशाच आणखी दोन शेकडो किलोमीटर लांब महानगऱ्या कॅलिफोर्नियात आणि जपानातही पसरल्या आहेत. 


त्यांत परार्धावधी मुंग्या राहतात,आणि सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे ह्या साऱ्या तीनही खंडांवरच्या आर्जेन्टीनी मुंग्या स्वतःला बहिणी - बहिणी मानतात,त्यांना सारखेच वास येतात,त्या एकमेकींशी भांडण-तंटा काही न करता जग जिंकत राहतात !


पण हा पराक्रम गाजवताना साहजिकच ते जो मुलूख काबीज करतात तिथल्या मूलवासियांचा निःपात करतात.आर्जेन्टीनी मुंग्या कॅलिफोर्नियात जशा पसरल्या,तशा तिथल्या आधीच्या रहिवासी मुंग्यांच्या अनेक प्रजाती अंतर्धान पावल्या.मग ह्या मूल रहिवासी मुंग्यांद्वारे परागीकरण होणाऱ्या काही वनस्पती,तसेच मुंग्यांना खाऊन जगणारे शिंगवाले सरडे पण नामशेष झाले.


१८ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..