* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: हसणारा व्हॉल्टेअर..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/८/२३

हसणारा व्हॉल्टेअर..

आपल्याच हाताने मानेला फास लावून घेऊन आत्महत्या करण्यासाठी पाळी येऊ नये.म्हणून हसणारा व्हॉल्टेअर हा रिस्टोफेन्स व रॅबेल्स, ल्यूथर व सैतान या सर्वांचे अजब मिश्रण होता. त्याची प्रतिमा व त्याची बुद्धी या परस्पर

विरोधी गुणांनी बनल्या होत्या.तो मानवजातीचा तिरस्कार करी.पण मानवांवर त्याचे प्रेमही असे. तो धर्मोपदेशकांची टर उडवी,तरीपण त्याने आपले एक पुस्तक पोपला अर्पण केले आहे. राजा महाराजांची तो हुर्रेवडी उडवी,तरीपण त्याने फ्रेडरिक दि ग्रेटने दिलेले पेन्शन स्वीकारले. त्याला धर्मांधपणाची चीड असे;पण ज्यूंच्या बाबतीत तो अनुदार होता.संपतीजन्य ऐटीचा तो उपहास करी,तरी त्याने स्वतः मात्र पुष्कळ धनदौलत मिळवली व तीही सगळीच काही प्रामाणिकपणे मिळवली नाही.ईश्वरावर त्याचा विश्वास नव्हता,तरी तो जन्मभर ईश्वराचा शोध करीतच होता.

त्याला धर्माबद्दल आदर नसे,पण त्याने हास्याच्या आनंदाचा नवाच धर्म निर्मिला.


जगातल्या थट्टा व टिंगल करणाऱ्यांचा तो राजा होता.हे जीवन म्हणजे एक मोठे हास्यरसोत्पादक नाटक आहे,असे तो मानी.तो लोकांना म्हणे, "जीवन हा फार्स समजा आणि मिळवता येईल तितकी गंमत मिळवा." जीवन चांगल्या रीतीने जगता यावे,अनुभवता यावे,त्यातील गंमत मिळवता यावी म्हणून अज्ञान,अन्याय,रूढी व युद्धे ही सर्व नष्ट करून टाकली पाहिजेत.या दुष्ट वस्तू जीवनाची ट्रेजिडी करून टाकीत असतात. या दूर केल्या तरच जीवन हे एक कॉमेडी होईल.दुसऱ्या शब्दात हेच सांगायचे तर असे म्हणता येईल की,व्हॉल्टेअरने लोकांना विचार कसा करावा हे शिकवले.तो म्हणे,'राष्ट्र एकदा विचार करायला लागले म्हणजे मग त्याला थांबवणे अशक्य होईल.' तो स्पायनोझापेक्षा कमी चारित्र्यवान होता.तरी त्यानेच जगावर त्या ज्यू तत्त्वज्ञान्यांपेक्षा अधिक परिणाम-सुपरिणाम केला.तो व्यवहार्य गोष्टींवरच लिही व तेही लहान मुलांनासुद्धा समजावे,अशा भाषेत.त्याच्या संशयवादी तत्त्वज्ञानामुळे डायनॅमाइटवर ठिणगी पडली व असा प्रचंड भडका उडाला की,राजांचे दंभ व धर्मातील भोळसट रूढी यांचे भस्म झाले. जुन्या जगाचा पाया त्याने उडवून टाकला व नव्या जगाचा पाया घालण्यासाठी बाव करून दिला. 


त्याचे सारे जीवन म्हणजे विरोधाभास होता.तो जन्मताच त्याची आई मेली.२१ नोव्हेंबर १६९४ रोजी तोही मरणार असे वाटले,पण तो जगला. त्याची प्रकृती नेहमी मरतुकडी होती.तरीही तो त्र्याऐंशी वर्षांचा होईतो वाचला.जेसुइट स्कूल मध्ये शिकून तो ग्रॅज्युएट झाला.त्याने जेसुइटांचे सारे वर्चस्व झुगारून दिले.त्याचे शरीर हाडांचा नुसता सांगाडा होता.त्याचे नाक लांब होते,त्याचे डोळे बारीक पण तेजस्वी होते.तो पॅरिसमधला सर्वांत कुरूप तरुण होता.तरीही तो साऱ्या स्त्रियांचा लाडका होता.त्या त्याला जणू देव मानीत.तो कपटी व उपहास करणारा होता.त्याचे खरे नाव फ्रँकॉइस मेरी अरोट असे होते.पंधराव्या लुईच्या रीजंटचा अपमान केल्याबद्दल बॅस्टिलच्या तुरुंगात शिक्षा भोगीत असता त्याने नाव बदलून व्हॉल्टेअर हे नाव घेतले.अकरा महिन्यांचा तुरुंगवासात त्याने नाव्हेरचा राजा हेन्री याच्यावर महाकाव्य लिहिण्यात वेळ खर्चिला. तुरुंगातून सुटला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता.त्याचा बाप व्यवहारचतुर होता.त्याने त्याला तीन गोष्टींबाबत सावध राहण्यास सांगितले,वाड् मय स्त्रिया व जुगार.शाळेत असता तो जेसुइटांचे मनापासून ऐके..त्याचप्रमाणे त्याने बापाचा हा उपदेश लक्षपूर्वक ऐकला.पण जेसुइटांच्या शिकवणीप्रमाणेच बापाचीही शिकवण तो पुढे विसरला.

त्याने काही नाटके लिहिली व ती यशस्वी ठरली.त्याला पैसे बरे मिळाले.वॉलस्ट्रीटमधील एखाद्या ब्रोकरप्रमाणे त्याने आपले पैसे मोठ्या हुशारीने गुंतवले.फ्रेंच सरकारने काढलेली लॉटरीची सारी तिकिटे एकदा व्हॉल्टेअरने घाऊकरित्या खरेदी केली. मॅनेजरच्या हे लक्षातच न आल्यामुळे सारी बक्षिसे व्हॉल्टेअरला मिळाली.


तो तत्त्वज्ञानी तसाच व्यावहारज्ञही होता.सूक्ष्म विचार करणारा व धंद्यात हुशार असा पुरुष क्वचितच आढळतो.

व्हॉल्टेअरची बुद्धी मोठी विलक्षण होती.तत्त्वज्ञानातील अमूर्त व सूक्ष्म विचार तो प्रत्यक्ष व्यवहाराशी बेमालूम मिसळी. मूर्त- अमूर्त दोहोंतही त्याची बुद्धी सारखीच खेळे.व्यवहार्यता व सूक्ष्म अमूर्ततता दोन्ही त्याच्या ठायी होत्या.इतर नाना उलाढाली करूनही त्याला पॅरिसमधील प्रतिष्ठित व रुबाबदार मंडळींत मिसळण्यास भरपूर वेळ असे.पॅरिसमधील बेछूट,स्वच्छंदी व विलासी जीवनाचा तो मध्यबिंदू होता.त्याच्याभोवती पॅरिसमधील प्रतिष्ठित नबाब व पंडित जमत. तत्त्वज्ञान,व्यवहार व या बैठकी अशा त्रिविध चळवळींचा त्याच्या बुद्धीवर ताण पडे व त्यामुळे त्याचे दुबळे शरीर थके.एकदा त्याला देवी आल्या.

डॉक्टरांना तो मरणार असे वाटले.पण तो नेहमीप्रमाणे बरा झाला व अधिकच उत्साहाने जीवनाच्या आनंददायी गोंधळात सामील झाला.पुन्हा या सुखी व विनोदी संसारात बुडी घेता झाला.त्याची प्रकृती यथातथाच होती.दुबळ्या प्रकृतीच्या जोडीला तिखट जिभेची आणखी एक अडचण असल्यामुळे त्याला नेहमी त्रास होई. एकदा तो म्हणाला, "जे वाटते ते स्पष्टपणे बोलणे हा माझा धंदा आहे." तत्त्वज्ञानक्षेत्रातच त्याचे विचार होते,तोपर्यंत सारे ठीक होते.पण माणसांविषयी आपणास काय वाटते हे तो सांगू लागला व विशेषत: सरदार जमिनदारांविषयी लिहू लागला,तेव्हा भानगडी सुरू झाल्या,त्रास होऊ लागला.एकदा त्याने लिहिलेले एक तिखट व झणझणीत वाक्य कॅव्हेलियर डी रोहन याला झोंबले.त्याचा अहंकार दुखावला गेला.त्याने काही गुंडांना व्हॉल्टेअरला चांगले चोपून काढावयास सांगितले.दुसऱ्या दिवशी व्हॉल्टेअरने त्या सरदाराला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. व्हॉल्टेअरची तलवारही त्याच्या जिभेप्रमाणेच तिखट असेल असे त्या बड्या सरदाराला वाटले, म्हणून त्याने पोलिसांच्या मुख्याकडे संरक्षण मागितले.पोलीस अधिकारी त्याचा चुलतभाऊ होता.व्हॉल्टेअर याला पुन्हा बॅस्टिलच्या तुरुंगात अडकवण्यात आले.त्याची मुक्तता होताच त्याला फ्रान्समधून निर्वासित करण्यात आले.


तो इंग्लंडमध्ये गेला.या वेळी त्याचे वय बत्तीस वर्षांचे होते.तो तिथे तीन वर्षे राहिला.त्याचे मन देशकालातीत होते.इंग्लंडमध्ये त्याला घरच्या सारखेच वाटले.तो इंग्रजी भाषा चांगलीच शिकला.एका वर्षात त्याने शेक्सपिअर

खेरीज बाकी सारे साहित्य आत्मसात केले.पण शेक्सपिअर हे इंग्लंडचे सर्वोत्कृष्ट फळ होते.शेक्सपिअ-

रची मनोबुद्धी हा आनंदी तत्त्वज्ञानी समजू शकला नाही.

इंग्लंडातही मोठमोठ्या तत्त्वज्ञान्यांना उत्कृष्ट फ्रेंच मनोबुद्धी समजू शकत नसे.व्हॉल्टेअर शेक्सपिअरला 'जंगली' म्हणत असे आणि पुढे शंभर वर्षांनी कार्लाइलने व्हॉल्टेअरला जंगली म्हणून त्याचा सूड घेतला. पण भूतकाळातला महाबुद्धिमान शेक्सपिअर जरी व्हॉल्टेअरला जाणता आला नाही,तरी समकालीन इंग्रजांत त्याला बरेचसे अनुकूल मनोबुद्धीचे लोक भेटले.इंग्रजांचे विचारधैर्य पाहून त्याला आश्चर्य वाटे. इंग्रज लोक आपले विचार धैयनि मांडतात हे पाहून तो त्यांचे कौतुक करी,

व्केकरांशी त्याचा चांगला परिचय झाला. त्यांची शांतिमय मते त्याला लगेच पटली.तोही म्हणाला की,समुद्र ओलांडून आपल्याच बंधूंचे गळे कापायला जाणे हा केवळ मूर्खपणा होय. 'गाढवाच्या कातड्यात दोन काठ्या मारून आवाज होतो'आणि सारे मारामारीला धावतात.

स्विफ्टची व त्याची भेट झाली.त्या शतकातले सर्वांत मोठे असे दोन उपहासलेखक एकत्र बसले,बोलले,खरोखरच तो प्रसंग देवांनासुद्धा मोठ्या मेजवानीचा वाटला असता.

व्हॉल्टेअरची 'छोटामोठा' ही मनोरम कथा 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स' पासूनच स्फूर्ती मिळून लिहिली गेली असावी. स्विफ्टच्या उपहासातील तिखटपणाइतका तिखटपणा व्हॉल्टेअरमध्ये नसे,व्हॉल्टेअरची लेखणी गुदगुल्या करी.

स्विफ्टची लेखणी भोसकी.पण व्हॉल्टेअरची प्रतिभा अधिक समृद्ध व श्रीमंत होती.छोटामोठा - मायग्नोमेगस हा सिरियस बेटाचा रहिवासी होता.तो पाच लक्ष - फूट उंच होता. त्याला शनीवरचा एक अगदीच लहान,केवळ पंधराच हजार फूट उंच गृहस्थ भेटतो. उभयता अनंत अवकाशातून भ्रमंती करण्यासाठी बाहेर पडतात.

सॅटर्नियनचे ( शनीवरील गृहस्थाचे) लग्न नुकतेच झालेले असते.त्याची पत्नी त्याला जाऊ देत नाही.कारण त्यांनी केवळ दोनशेच वर्षे मधुचंद्र भोगलेला होता.इतक्या लवकर ताटातूट! पण सॅटर्नियन तिचे समाधान करतो व म्हणतो, "रडू नको.मी लवकरच परत येईन." दोघे मित्र धूमकेतूच्या शेपटीवर बसून विश्वसंचारास निघतात.ते ताऱ्यांमधून जात असतात.संचार करताकरता ते पृथ्वी नावाच्या एका लहानशा ढेपळावर उतरतात.भूमध्य समुद्र म्हणजे त्यांना गंमत वाटते.ते त्यातून गप्पा मारीत चालत जातात.त्यांना वाटेत एक गलबत भेटते.त्या गलबतावर ध्रुवाची सफर करून आलेले काही तत्त्वज्ञानी असतात.

सिरियनला ते गलबत इतके लहान वाटते की दुर्बिणी

शिवाय ते त्याला दिसत नाही.तो ते गलबत उचलून आपल्या बोटाच्या नखावर त्याचे नीट परीक्षण करण्यासाठी ठेवतो, पण त्या गलबतात सजीव अणु

परमाणू पाहून त्याला आश्चर्य वाटते.हे अणू त्याच्याशी बोलतात व त्याला म्हणतात,आम्ही लहान असलो तरी आमच्यात अमर आत्मा आहे.हे ऐकून त्या पाच लक्ष फूट उंच माणसास व त्याच्या मित्रास अधिकच आश्चर्य वाटते.ते सजीव अणू आणखी सांगतात."आम्ही ईश्वराची प्रतिकृती आहोत, विश्वाचे मध्यबिंदू आहोत." ते अधिकच आश्चर्यचकित होतात.ते दोघे या मानवी अणूंना विचारतात, "तुम्ही कसे जगता? वेळ कसा घालवता?" ते मानवी अणू सांगतात, "आमचा पृथ्वीवरचा बराचसा वेळ एकमेकांना मारण्यातच जातो." एक तत्त्वज्ञानी त्यांना सांगतो, "या क्षणी आमच्या जातीचे एक लाख जंतू डोक्यावर टोप्या घालून डोक्यावर पागोटी घालणाऱ्या दुसऱ्या एका लाखांस मारीत आहेत." तो मानवी अणू पाहुण्यांना पुन्हा सांगतो, "ही कामगिरी पॅलेस्टाइन नावाच्या एका वारुळासाठी चालली आहे." पुन्हा तो सांगतो, "जे लाखो लोक एकमेकांचे गळे कापीत आहेत,त्यांना त्या पॅलेस्टाइनच्या ढेपळावर सत्ता नाहीच मिळवायची.ते पॅलेस्टाइन सुलतानच्या ताब्यात असावे की युरोपीय राजाच्या ताब्यात असावे यासाठी ही मारामारी,ही खुनी कत्तल!आणि अशा कत्तली अनादी कालापासून पृथ्वीवर सारख्या चालू आहेत." पृथ्वी नावाचा हा ग्रह म्हणजे वेड्याचे घर आहे असे या पाहुण्यांना वाटते व त्या मानवी अणुपरमाणूंना सोडून ते आपल्या विचारवंत लोकी त्वरेने प्रयाण करतात.


व्हॉल्टेअरच्या इंग्लंडच्या भेटीतून 'मायक्रोमिडास' हे एकच पुस्तक जन्मले नाही,तर 'इंग्रजांसंबंधी पत्रे' हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे पुस्तक निर्माण झाले.अर्थातच ते तितके मनोरंजक नव्हते,हे खरे.या पत्रांमध्ये त्याने फ्रेंचांच्या गुलामीची इंग्रजांच्या स्वतंत्र वृत्तीशी तुलना केली नाही.

इंग्लंडच्या नियंत्रित राजेशाहीचा गौरव केला आहे व तसेच सरकार फ्रेंचांनी फ्रान्समध्ये स्थापावे,असे प्रतिपादन केले आहे.त्याने जवळजवळ 'आपला राजा फेकून द्या' असेच लिहिले आहे. 'तत्त्वज्ञानाची कथा' या आपल्या पुस्तकात डॉ.ड्यूरांट लिहितो, 'व्हॉल्टेअरला माहीत असो वा नसो,त्याचा हेतू असो वा नसो, त्याची पत्रे म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या कोंबड्याचे पहिले आरवणे होते.' व्हॉल्टेअरला हद्दपारीतून परत बोलवण्यात आले.ही पत्रे प्रसिद्ध व्हावीत अशी त्याची इच्छा मुळीच नव्हती.

खासगीरित्या प्रचार व्हावा म्हणूनच त्याने ती लिहिली होती.पण एका अप्रामाणिक प्रकाशकाच्या हाती ती पडली व त्याने व्हॉल्टेअरची परवानगी न घेताच ती छापून टाकली.एका सरकारी अधिकाऱ्याच्या हाती एक प्रत आली.त्याने लगेच ते पुस्तक राजद्रोही, अधार्मिक आणि अनीतिमय आहे असे जाहीर केले.( मानव जातीच्या कथा हेन्री थॉमस,साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन ) ते पुस्तक जाहीररीत्या जाळण्यात आले व त्याला पकडण्यासाठी पुन्हा वॉरंट निघाले.


बॅस्टिलच्या तुरुगात पुन्हा जाऊन बसण्याची व्हॉल्टेअरची इच्छा नव्हती.बॅस्टिलच्या तुरुगाचे शिल्पकाम,त्याचा नकाशा,त्याचा आंतर भाग यांची आता त्याला पुरेपूर माहिती असल्यामुळे तो पोलिसांच्या हातून निसटून पळून गेला व आपल्या प्रियकरणीच्या बाहुपाशात जाऊन विसावला.या त्याच्या प्रेयसीचे नाव मार्किवसे डु चॅटेलेट.ती विवाहित होती.तिचा नवरा म्हातारा व सैन्याबरोबर दूर होता.त्याच्या गैरहजेरीचा व्हॉल्टेअरने पुरा पुरा फायदा घेतला.तो त्याची पत्नी व त्याचा किल्ला यांचा जणू धनीच बनला. मार्निवसे सुंदर तशीच चतुर होती.सिरे तिचा बंगला होता.ही जागा यात्रेचे,विलासाचे, आनंदाचे व मेजवानीचे स्थान बनली.येथे तत्त्वज्ञानाच्या चर्चा चालत,खानपानही चाले. प्राचीन ग्रीक लोकांचे वैभव जणू पुन्हा सजीव झाले.प्लेटोच्या काळापासून अशी भोजने झाली नव्हती,

की अशा चर्चाही झाल्या नव्हत्या.सिरे येथील हे स्थान युरोपभर विख्यात झाले. फ्रान्समधील नामांकित विद्वान व उत्तमोत्तम बुद्धिमान लोक व्हॉल्टेअरने येथे गोळा केले.

तो त्यांना सर्वोत्कृष्ट मध देई.त्यांच्यासाठी आपली नाटके करून दाखवी व आपल्या विनोदी टीकांनी त्यांना पोट धरधरून हसायला लावी. सिरे येथेच त्याने अत्युत्तम Cynical कथा लिहिल्या.कॅन्डिडे,The world as it Goes, Zading.The Pupil of Nature,The Princess of Balaglon वगैरे मनोरम कथा त्याने लिहिल्या.


या गोष्टीतील प्रमुख पात्रे म्हणजे रक्तमांसाची माणसे नाहीत.आपल्या मनातल्या कल्पनांनाच मानवी पोषाख देऊन त्याने उभे केले आहे.ही सारी पात्रे म्हणजे कल्पनांची प्रतीके आहेत.रूपके आहेत.किती रसभरित व भव्यदिव्य कल्पना! आणि त्यांना दिलेले पोशाखही किती कल्पनारम्य! या अद्भुत गोष्टींपैकी 'कॅन्डिडे' ही गोष्ट सर्वांत छान आहे.ही त्याने तीन दिवसांत लिहिली.ही लिहिताना त्याची लेखणी जणू अक्षरश: हसत होती.या पुस्तकात त्याने असे सिद्ध केले आहे की,या जगाहून अधिक वाईट जग असणे शक्य नाही.आपण राहतो ते जग शक्य तितके वाईट आहे.या गोष्टीसाठी त्याने घेतलेल्या विषयाहून अधिक खेदोत्पादक व उदास करणारा विषय सापडणे विरळा.पण व्हॉल्टेअरच्या जादूच्या स्पर्शाने निराशाही हसू लागते.निराशाही अत्यंत विनोदी वस्तू म्हणून गौरवावी,

पूजावी असे वाटते.कॅन्डिडे ही गोष्ट म्हणजे निराशेचे बायबल;पण वाङ्मयाच्या इतिहासातील हे अत्यंत आनंददायक पुस्तक आहे.


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..