सातव्या शतकात अशक्यप्राय वाटणारा सोळा हजार किलोमीटर पायी प्रवास करून भारतात आलेल्या ह्युएन त्संग या चिनी प्रवाशाबद्दल आपण साऱ्यांनी वाचलेलं असतं,पण त्याच्या या प्रवासाबद्दल आणखी जाणून घ्यावं असं आपल्यापैकी कितीजणांना वाटतं?
ह्युएन त्संगने झपाटलेल्या एका महिलेने तेराशे वर्षांनंतर त्याच्या इतिहासाचा माग काढत त्याच्याच मार्गाने प्रवास केला.त्याची ही गोष्ट.
इ.स. ६२७ आपल्याला ह्युएन त्संग नावाने परिचित असलेल्या (मूळ चिनी उच्चार श्वेन झांग) चीनमधल्या तरुण बौद्ध भिक्खूने बौद्ध धर्माबद्दल सखोल ज्ञान मिळवण्यासाठी भारताच्या दिशेने प्रस्थान ठेवलं.त्या काळी बौद्ध पौथ्यांचे चिनी अनुवाद अगदीच यथातथा असत. विशेषतः ह्युएन त्संगला रस असणाऱ्या योगकार पठडीतल्या ग्रंथांचे अनुवाद अनाकलनीय होते. त्यामुळेच ह्युएन त्संगची उत्सुकता चाळवली गेली.बौद्ध धर्म नेमका कसा आहे,त्याचे विचार काय आहेत हे स्वतः जाऊन समजून घेतलं पाहिजे,या विचाराने तो झपाटला होता.
बौद्ध धर्माविषयीची आस्था आणि एका प्रकारच्या साहसाचं आकर्षण यातून तो एके दिवशी भारताच्या दिशेने चालू लागला.भारतात दहा वर्षं मुक्काम,एकूण सोळा हजार किलोमीटरचा प्रवास करून अठरा वर्षांनी तो पुन्हा चीनमध्ये परतला.कोणत्याही सोई-सुविधा नसताना, जगाच्या नकाशाचं ज्ञान नसताना त्याने हा प्रवास कसा केला असेल या विचारानेही आपण थक्क होतो.भारतातल्या मुक्कामात संस्कृत भाषा शिकून ह्युएन त्संगने बौद्ध धर्माचा अभ्यास केला.त्याचा बहुतेक काळ तो नालंदा विद्यापीठात शीलभद्र नावाच्या तत्त्वज्ञाच्या सहवासात होता.चीनमध्ये परतल्यानंतर तो तिथे बौद्ध मत शिकवू लागला.त्याच्या लिखाणामुळे प्रथमच चिनी भाषेत बौद्ध सूत्राचं अचूक भाषांतर झालं.चीनमधील बौद्ध मताला लेखी आधार मिळाला.पण ह्युएन त्संगचं महत्त्व फक्त चीनपुरतं मर्यादित नाही;त्याने आपल्या विस्तृत प्रवासाबद्दल लिहिलेल्या टिपणांमधून आज आपल्याला त्या काळातला भारत समजून घेण्यासही मोठी मदत होते.ह्युएन त्संगने उचललेलं साहसी पाऊल आपल्याला चीनशीच नव्हे.तर आपल्याच इतिहासाशीही जोडतं.
ह्युएन त्संगबद्दलची ही माहिती म्हणजे आपल्यासाठी एखाद्या पुस्तकातलं एखाद प्रकरण.जे वाचून पुस्तक मिटवायचं आणि पुढच्या विषयात शिरायचं;पण पत्रकार लेखिका मिशी सरण मात्र तसं करू शकली नाही.जन्माने भारतीय असणारी मिशी अमेरिकेत लहानाची मोठी झाली.आपल्या उच्च शिक्षणासाठी 'तिने 'चीनची संस्कृती' हा विषय निवडला. त्यानंतर बीजिंग आणि नानजिंग इथे पुढच्या अभ्यासासाठी तिने दोन वर्षं वास्तव्य केलं.तिथे तिने 'मँडारिन' या प्रमुख प्रमाणित चिनी भाषेवर प्रभुत्व मिळवलं.या काळातच तिची ह्युएन त्संगशी जवळून ओळख झाली.या तरुण साहसी चिनी प्रवाशाने मिशीचा जणू ताबाच घेतला.पुढे १९९४ मध्ये ती वास्तव्यासाठी हाँगकाँगला गेली. तिथे ती वार्ताहर म्हणून काम करत होती.वयाची तिशी पार केल्यावर आपण फारच चाकोरीबद्ध आयुष्य जगतोय ही भावना तिला छळायला लागली.अशाच एका आत्मपरीक्षणाच्या उदास संध्याकाळी तिच्या मनात अनेक दिवसांपासून रेंगाळणारा एक विचार पुन्हा वर उफाळून आला ह्युएन त्संग ज्या मार्गाने भारतात गेला त्या मार्गाने आपणही का जाऊ नये? हा विचार बरेच दिवस तिच्या मनात येत होता;पण त्याकडे दुर्लक्ष करत तिची दैनंदिन कामं चालू होती.पण एके दिवशी आतला आवाज ऐकत तिने ह्युएन त्संगच्या पावलावर पाऊल टाकत हा प्रवास करण्याचा निर्णय घेतला.ह्युएन त्संग चीनमधून भारताकडे निघाला त्यानंतर तब्बल तेरा शतकांनंतर मिशी सरणने तितकंच धाडसी पाऊल उचललं होतं. 'चेजिंग द मॉक्स शॅडो अ जर्नी इन द फुटस्टेप्स ऑफ ह्युएन त्संग' हे पुस्तक म्हणजे ह्युएन त्संग आणि मिशी सरण या दोघांच्या प्रवासाची गुंफण आहे.
ह्युएन त्संगच्या मार्गावरून प्रवास करण्याचं ठरलं,पण ते प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार होता.ह्युएन त्संगभोवती निर्माण झालेली दंतकथांची जळमटं दूर करून त्याच्याबद्दलची,तसंच त्याच्या प्रवासाबद्दलची यथातथ्य माहिती शोधून मगच तिला खऱ्या प्रवासाची तयारी करता येणार होती.पण तिने कंबर कसली आणि कामातून वेळ काढून एक दिवस ती हाँगकाँगहून बीजिंगला जाऊन धडकली.बीजिंगमध्ये चौकशी केल्यावर तिला माहिती कळली,की तिथे एक संस्था ह्युएन त्संग,त्याचं कार्य,त्याचं लेखन आणि त्याचा विचार यांचा अभ्यास करते. ती तडक त्या संस्थेत पोहोचली. तिथले भारताविषयीचे दोन तज्ज्ञ व्हांग शिचुआन आणि सुन बावगांग तिच्या शंकासमाधानासाठी सज्ज झाले.दोघंही भारतात राहून आलेले होते. 'खरं तर तू आमच्याकडे याआधीच यायला हवं होतंस !' या वाक्याने त्यांनी मिशीचं स्वागत केलं. दोघांच्या बोलण्यातून ह्युएन त्संगबद्दलचा त्यांना वाटणारा अभिमान प्रतीत होत होता.त्यांनी मिशीला ह्युएन त्संगची चरित्रकहाणी ऐकवली. 'चिनी संस्कृती समजून घ्यायची तर त्या संस्कृतीवरचा भारतीय प्रभाव जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल,' या वाक्याने त्यांनी आपल्या मार्गदर्शनाचा शेवट केला. त्यांनी मिशीला कुणाकुणाशी संपर्क साधायचा त्या संस्था आणि व्यक्तींचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दिले आणि तिच्या धाडसी उपक्रमाला तोंडभरून शुभेच्छाही दिल्या.मिशीचा ह्युएन त्संगच्या शोधाचा प्रवास सुरू झाला लुओयांग इथून.
लुओयांग हे ह्युएन त्संगचं जन्मगाव. इ.स. ६०० मध्ये ऐन हिवाळ्यात त्याचा जन्म झाला.त्याचं जन्मनाव होतं चेन यी चेन यी म्हणजे चेन नदीच्या काठी जन्माला आलेला.
योग्य वेळी बौद्ध भिक्खूंनी चेन यीच्या डोक्यावरचे केस भादरले.त्याला दीक्षा देऊन नवोदित म्हणून त्यांच्या पंथात दाखल करून घेतलं.त्या वेळी त्याचा नवा जन्म झाला, म्हणून त्याला ह्युएन त्संग हे नवं नाव दिलं गेलं.
ह्युएन त्संगच्या या गावात इ. स. ५०८ मध्ये बोधी ऋषीचं आगमन झालं होतं.सम्राटांच्या आज्ञेनुसार युंग-निंग मठात बसून त्यांनी ३९ ग्रंथांचा अनुवाद केला.त्यात लंकावतार सूत्र, कमल सूत्र,हीरक सूत्र यांच्याबरोबरच असंघ आणि वसुबंधू या दोन भावांनी रचलेले अनेक ग्रंथ होते.मिशी त्या गावी पोहोचली तेव्हा एके काळी भरभराटीला आलेल्या या गावाचं भकास दर्शन तिला घडलं आणि हाती घेतलेल्या प्रवासाबद्दल तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; पण तिचा निश्चय ढळला नाही. तेव्हा चीनमध्ये स्वातंत्र्याचे मर्यादित वारे वाहू लागलेले होते,पण तरी परक्या व्यक्तींकडे संशयाने बघण्याच्या वृत्तीत फारसा फरक पडलेला नव्हता.पासपोर्टधारी व्यक्तीला गावातल्या सर्वात महागड्या हॉटेलात ठेवायचं आणि दुभाष्या नेमायचा,ही प्रथा अजूनही पाळली जात होती.मिशीने मँडारिनमध्ये ती हाँगकाँगची रहिवासी आहे हे सांगून एका छोट्या हॉटेलात जागा मिळवली आणि दुभाष्याला हुसकून लावलं.सर्वप्रथम तिने ह्युएन त्संगच्या कुटुंबाची म्हणजे चेन कुटुंबीयांची गाठ घेतली. चेन झवेई हा ह्युएन त्संगच्या रक्ताचा अंश असलेला तरुण तिला भेटला.त्याने मिशिला ह्युएन त्संगच्या आई-वडिलांच्या समाधीकडे नेलं. त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध होती. ह्युएन त्संगची आई इ.स. ६०४ मध्ये, तर वडील इ.स. ६०९ मध्ये वारले होते. गावाजवळच्या एका शेतात त्यांना पुरण्यात आलं होतं. त्या वेळी ह्युएन त्संग खूपच लहान होता. गावात ह्युएन त्संगचे कपडे आणि कटोराही पुरलेले असल्याचं तिला कळलं.ह्युएन त्संगच्या आई-वडिलांची समाधी पाहून मिशी त्या ठिकाणी पोहोचली.तिथला पॅगोडा आता जवळजवळ भग्नावस्थेतच होता. पुढल्या प्रवासात हळूहळू मिशीच्या लक्षात येत गेलं, की गौतम बुद्धांच्या अवशेषांप्रमाणेच ह्युएन त्संगचे अवशेषही जगभरात विखुरलेले आहेत.
ह्युएन त्संगने आपल्या प्रवासाची साद्यंत हकीकत मृत्युपूर्वी शब्दबद्ध केली.बौद्ध धर्माच्या मूळ पोथ्यांचा अभ्यास करणं हा या प्रवासाचा मूळ हेतू होता.ही सर्व हकीकत तांग राजघराण्याच्या काळातील प्राचीन रूढ चिनी भाषेत नमूद करण्यात आली होती.अत्यंत काटेकोरपणे 'ता तांग शी युझी' म्हणजे 'ह्युएन त्संगने नोंदवलेली पश्चिमेकडच्या जगाची हकीकत' अशा शीर्षकाच्या या हकिकतीचं लिखाण इ. स. ६४८ मध्ये पूर्ण झालं.त्यात रस्त्यांबाबतचं मार्गदर्शन,एका स्थानापासून दुसऱ्या स्थळी पोहोचायला लागलेले दिवस,त्या काळात काटलेलं अंतर,वाटेत लागलेले जलप्रवाह,नद्यांच्या खोऱ्यांमधून घेतली जाणारी पिकं,वाटेत कळलेल्या स्थानिकांच्या हकिकती आदी अनेक बाबी अंतर्भूत आहेत.त्यामुळेच ही हकीकत म्हणजे एक महत्त्वाचा दस्तऐवज बनली आहे.ह्युएन त्संगच्या या प्रवासवर्णनातून पश्चिम चीन,मध्य आशिया,अफगाणिस्तान,वायव्य भारत आणि भारतातील तेव्हाच्या परिस्थितीचं तपशीलवार वर्णन आढळतं.तेव्हाचा वायव्य भारत म्हणजे आजच्या पाकिस्तानातील वायव्य सरहद्द प्रांत.ह्युएन त्संग भारतातून परतला आणि त्याच सुमारास भारतावर इस्लामी आक्रमणाची सुरुवात झाली.ज्या भूभागातून ह्युएन त्संग भारतात आला त्या मध्य आशियात आणि अफगाणिस्तानात इस्लामी प्रभाव वाढला.मात्र,मिशीच्या प्रवासाचा मुख्य आधार होता तो म्हणजे ह्युएन त्संगचा समकालीन आणि परिचित हुई लीने लिहिलेलं ह्युएन त्संगचं चरित्र.हे चरित्र चीनमध्ये पुराणग्रंथांच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे.या चरित्राचा चिनी अभिजात साहित्यावर प्रचंड प्रभाव पडलेला आहे.भारतीय आणि चिनी संस्कृतीत हा मोठा फरक आहे.भारतात मौखिक परंपरा असल्याने इतिहासात सांगोवांगीच्या गोष्टींची भर पडत राहते.त्यामुळे त्या घटना आधुनिक काळात पोहोचेपर्यंत त्यातली विश्वासार्हता नष्ट होऊन इतिहासाला दंतकथांचं स्वरूप प्राप्त होतं. चीनमध्ये मात्र गेल्या तीन हजार वर्षांचा इतिहास अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.त्याला दंतकथांची जोड मिळण्याची शक्यता दिसत नाही.ह्युएन त्संगने हुई ली बरोबर त्याच्या प्रवासासंबंधी अधूनमधून शिळोप्याच्या गप्पा मारल्या असणार हे उघडच आहे. हुई ली आपल्या मित्राच्या रोमहर्षक प्रवासवर्णनाने अतिशय भारावून गेला होता, हे त्याने लिहिलेल्या चरित्रावरून सहज स्पष्ट होतं. या चरित्रातली काही वर्णनं अतिशयोक्तिपूर्ण आहेत,पण ही वर्णनं ह्युएन त्संगच्या विस्तृत टिपणांशी ताडून पाहून ह्युएन त्संगचा वास्तव चरित्रपट आज तेरा शतकांनंतरही आपल्याला पाहता येतो.( हटके भटके,निरंजन घाटे, समकालीन प्रकाशन पुणे ) इ. स. ६१८ मध्ये चीनमधील सुई राजवंशाची सद्दी रक्तलांच्छित क्रांतीमुळे संपुष्टात आली.ह्युएन त्संग आणि त्याचा मोठा भाऊ लुओयांग हे जन्मगाव सोडून आधी चांग आन आणि तिथून चेंगडूला पळाले.चेंगडूला त्यांनी महायान संग्रह आणि अभिधर्म कोश यांचा अभ्यास केला. ह्युएन त्संगचं या अभ्यासाने समाधान झालेलं नव्हतं.त्याला योगाकारभूमी शास्त्र आणि परमार्थ सूत्राचा अभ्यास करायचा होता.त्या काळात चीनमध्ये भारतीय ग्रंथांचे वेगवेगळे अनुवाद उपलब्ध होते.एकाच ग्रंथाच्या दोन अनुवादांत सुसूत्रता आणि साम्य या दोहोंचाही अभाव होता.प्रत्येक अनुवादानुसार अनेक पंथ अस्तित्वात आले होते.यामुळेच ह्युएन त्संगने भारतात जायचं ठरवलं.आपल्या प्रवासात ह्युएन त्संग आधी सिचुआनला पोहोचला. तिथून पूर्वेकडे जिआंगसू आणि हेनानला गेला.इथल्या बौद्ध पीठांमध्ये त्याची प्रवचनं होत होती.त्याने या काळात बौद्ध तत्त्वज्ञानासंबंधीचे अनेक वाद जिंकले.बौद्ध तत्त्वज्ञानाचा जाणकार विद्वान म्हणून त्याची कीर्ती पसरू लागली. इ. स. ६२५ मध्ये तो चांग आनला परतला.पुढच्याच वर्षी चीनमध्ये परत एकदा क्रांती झाली आणि तांग साम्राज्याचा पाया घातला गेला.तांग साम्राज्याचा काळ चीनच्या इतिहासात 'सुवर्णकाळ' म्हणून नोंदवला गेला. ह्युएन त्संगसमोर फाही येन आणि ची येन या दोन विद्वानांचा आदर्श होता.त्यांनी भारतात जाऊन बौद्ध सूत्रांचा अभ्यास आणि अनुवाद केला आणि ती चीनमध्ये आणली. 'मलाही तेच करायला हवं' असं ह्युएन त्संगला वाटू लागल्याचं हुई लीने लिहून ठेवलं आहे.
मिशीनेही लुओयांगहून चांग आन गाठलं.चांग आनला आता झिआन असं म्हणतात.एके काळची तांग साम्राज्याची ही राजधानी आता चीनच्या शांगझी या प्रांतात आहे.ह्युएन त्संगचा प्रवास नक्की कुठून सुरू झाला ते पाहून तिथूनच मिशीलाही तिचा खरा प्रवास सुरू करायचा होता.चीनच्या १९५८ च्या सांस्कृतिक क्रांतीत ह्युएन त्संगचे अवशेष त्याच्या मूळ समाधीतून दुसरीकडे हलवण्यात आले.या नव्या जागेचे दर्शन घेऊन मिशीची भारत यात्रा सुरू झाली.
उर्वरित प्रवास पुढील लेखामध्ये…