अठरावे शतक हे बंडखोरीचे शतक होते.सर्वत्र राजांची फर्माने व धर्मोपदेशकांचे हट्ट यांविरुद्ध बंडे होत होती.
राजा व धर्म दोहोंच्याही कचाट्यातून जनता मुक्त होऊ पाहत होती.सर्व जगभर क्रांतिकारक विचारांचा विद्युतसंचार होत होता.व्हॉल्टेअर पॅरिसला शेवटची भेट द्यावयास आल्यावेळी तेथील विज्ञानमंदिरात बेंजामीन फ्रँकलीन त्याला भेटला होता.दोघा बंडखोरांनी परस्परांना मिठ्या मारून चुंबने घेतली. भोवतालचे लोक म्हणाले, "सोलोन व सोफोक्लिस हेच जणू परस्परांना आलिंगन देत आहेत.किती सुंदर दृश्य हे !" ज्याने आकाश फाडून त्यातून विद्युत खाली आणली होती,ओढून घेणार होता,
असा तो अमेरिकन छापखानेवाला,विज्ञानवेत्ता व स्वतंत्र विचारवादी बेंजामीन या वेळी अमेरिकन क्रांतीला सोळाव्या लुईची सहानुभूती मिळवण्यासाठी आला होता.इंग्रजांच्या सत्तेवर आघात करण्यासाठी फ्रेंच राजा सदैव टपलेला असे.त्याने अमेरिकेशी करार केला.वस्तुतः त्याला त्या बंडखोरांना मदत देण्याची मनापासून इच्छा नव्हती.पण नाखुशीने का होईना,इंग्रजांची सत्ता नष्ट करण्यासाठी म्हणून त्याने मदत देण्याचे मान्य केले.
अमेरिकेतील विचार फ्रान्समध्येही येणार हे त्याला समजत नव्हते,असे नाही.पेन,जेफरसन,फ्रँकलीन,
वॉशिंग्टन वगैरे अमेरिकन क्रांतीचे पुढारी लुईच्या मते धोकेबाज होते.ते सारे बंडखोर होते,एवढेच नव्हे तर देववादी म्हणजे चर्च वगैरेंची जरूर न ठेवता देवाला मानणारे होते. 'चर्चची अडगळ कशाला?' असे ते म्हणत. नास्तिकतेकडे जाणाराच त्यांचाही रस्ता होता. व्हॉल्टेअरच्या मतांप्रमाणेच,या अमेरिकन क्रांतिकारकां -
चीही मते,राजांच्या दैवी हक्कांच्या तत्त्वावर उभारलेल्या सामाजिक रचनेचा पाया उखडून टाकू पाहणारी होती.
लुईने अमेरिकनांशी मैत्री जोडण्याचे कारण त्याचे अमेरिकनांवरील प्रेम नसून तो इंग्रजांचा द्वेष करीत असे,हे होते. त्याने अमेरिकनांना पैसे दिले,फौजा दिल्या.पण अमेरिकेतील क्रांतीची प्रगती मात्र तो सचिंत होऊन पाहत होता.लुईला वाटत असलेली भीती खरी ठरली.
१७८९ सालच्या वसंत ऋतूत,अमेरिकेत वॉशिंग्टनचे इनॉगरेशन होण्याच्या थोड्याच दिवस आधी लुईच्या स्वत: च्या देशात क्रांतीचा वणवा पेटला.फ्रेंच राज्यक्रांती बरीचशी रशियन राज्यक्रांतीसारखीच होती.प्रथम मिरोबाच्या नेतृत्वाखाली मध्यम वर्गाने राजाविरुद्ध बंड केले.रशियात केरेन्स्कीच्या पक्षाने झारविरुद्ध केलेल्या बंडासारखेच हे बंड होते.पण पुढे डान्टन, राब्सोरी,मरात वगैरे जहाल पुढारी लेनिन, ट्रॉट्स्की इत्यादी रशियन क्रांतिकारकांप्रमाणे अधीर झाले.त्यांना मवाळ पुढाऱ्यांचा मवाळपणा आवडेना,त्यांना दूर करून त्यांनी सत्ता स्वतःच्या हाती घेतली व राजाचा शिरच्छेद केला.
सरदारांचे विशिष्ट हक्क त्यांनी नष्ट केले. त्यांच्या पदव्या रद्द केल्या व अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याप्रमाणे मानवी हक्कांचा जाहीरनामा काढला.त्यांनी चर्चची मालमत्ता जप्त केली व ती सरकारच्या हवाली केली.
ईश्वराच्या पूजेविरुद्ध एक फतवा काढून ईश्वराच्या पूजेऐवजी त्यांनी 'बुद्धीची दैवी पूजा' सुरू केली.त्यांनी बुद्धीला ईश्वराच्या सिंहासनावर बसवले.येथपर्यंत
क्रांती बरीचशी रक्तहीनच झाली.पण १७९१ साली प्रशियाचा राजा व ऑस्ट्रियाचा सम्राट पिल्लिट्झ येथे भेटले.फ्रेंच क्रांतीविरुद्ध प्रतिक्रांती सुरू करण्यासाठी ते जमले होते. हद्दपार केलेले फ्रेंच सरदार व इतर राजनिष्ठ लोक यांचे सैन्य त्यांनी गोळा केले व सर्व जगाच्या कल्याणासाठी पुन्हा राजेशाही सुरू झालीच पाहिजे असे जाहीर केले.या घोषणेमुळे फ्रेंच क्रांतिकारकांच्या भावना पेटून उठल्या.ते जणू चवताळले!घरच्या राजेशाहीची नावनिशाणी नष्ट करायची एवढेच नाही,तर सर्व युरोपमधील राजेशाही नष्ट करून साय युरोपचेच रिपब्लिक करायचे,असे त्यांनी ठरवले.त्यांनी तुरुंग फोडले व शेकडो कैद्यांना ठार केले.त्यांनी सर्व रेन ऑफ टेरर' सुरू केले. त्यांनी सुरू केलेला मरणमारणाचा कारभार अक्षम्य होता.युद्धाचा मार्ग आजपर्यंत कधीही प्रगतीचा ठरला नाही. खुनाखुनी करून मिळवलेला कोणताही विजय महत्त्वाचा नसतो.लाखोंच्या प्राणांचे मोल देण्याइतका मूल्यवान विजय कोणताच नसतो. फ्रेंच क्रांतिकारकांनी हिंसेचा अवलंब केला व शेवटी अपरिहार्य ते झालेच.जयाचे परिवर्तन पराजयात झाले. पण फ्रेंच राज्यक्रांतीतील या दुदैवी घटनेला उगीच नावे ठेवण्यात अर्थ नाही. ही भीषण राजवट सुरू करणारे घाबरून गेले होते.त्यांची डोकी ठिकाणावर नव्हती.त्यांनी हे सर्व आत्मरक्षणासाठी केले.नवीनच मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे ते मस्त झाले होते.पण ते स्वातंत्र्य जाणार की काय,अशा भीतीने ते वेड्यासारखे झाले.आपण काय करीत आहोत,
हे त्यांना कळेना.एच. जी. वेल्स लिहितो की, 'राजाचा कैवार घेणाऱ्यांनी क्रांतिकारकांच्या अत्याचारांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने केली आहेत.त्याच्या मते आपण फ्रेंच क्रांतीत मारल्या गेलेल्यांची इतकी वर्णने ऐकतो याचे कारण ते जरा बड़े व प्रतिष्ठित लोक होते.जास्तीत जास्त चार हजार लोक मारले गेले असतील आणि त्यांपैकी बरेचसे क्रांतीच्या विरुद्ध होते.फ्रेंच रिपब्लिकविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत ते खुशीने सामील झाल्यामुळे त्यांना लढाईची फळे भोगावी लागली.एच. जी. वेल्स म्हणतो," १९१६ मधील
सोम आघाडीवरच्या लढाईच्या वेळी ब्रिटिश सेनापतींनी संबंध फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात जितके लोक मारले गेले होते,त्यापेक्षा अधिक एका दिवसात मारले!" इतिहासाच्या अंगणात गरिबांच्या विव्हळण्यापेक्षा श्रीमंतांच्या रडण्याचेच प्रतिध्वनी अधिक मोठे उमटत असतात.
पण एकाने अन्याय केला म्हणून काही दुसऱ्याने केलेला अन्याय क्षम्य ठरत नाही.फ्रेंच राज्यक्रांतीती 'रेन ऑफ टेरर' एकंदरीत लज्जास्पदच होते.एवढेच नव्हे;तर त्यासाठी किंमतही जबर द्यावी लागली.क्रांतिकारकांना स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसावे लागले.त्यांनी रिपब्लिकच्या रक्षणासाठी टाकलेल्या पावलांतून इतिहासातील एक अत्यंत चढाऊ युद्ध निर्माण झाले.
त्यातच फ्रेंच रिपब्लिक नष्ट होऊन त्यातून नेपोलियनच्या साम्राज्यशाही तृष्णा जन्माला आल्या.
नेपोलियनच्या लढायांचा आरंभ रिन ऑफ टेरर मधून झाला.नेपोलियन मूळचा इटलीमधला. १७६९ साली कॉर्सिका बेटावर त्याचा जन्म झाला.फ्रान्समधील लष्करी विद्यालयात त्याचे शिक्षण झाले.मुसोलिनीप्रमाणे,तोही आरंभी क्रांतिकारक व जहाल होता.तो गबाळ व केसाळ होता.त्याचे केस कधी नीट विंचरलेले नसत. पावडर वगैरे कुठलीतरी,कशीतरी फासलेली असायची.त्याला घरी नीट शिक्षण मिळाले नाही. तो पॅरिसच्या रस्त्यातून अहमन्यतेने भटकत फिरे.क्रांतीचे शत्रू नष्ट करून क्रांती वाचवण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या शिरावर घेतली. आपणच हे काम करू शकू असे तो म्हणे.त्यावेळी त्याचे वय फक्त सत्तावीस वर्षे होते. पण लढवय्या म्हणून त्याने आपली योग्यता आधीच दाखवली होती.ती म्हणजे १७९५ साली राजाची बाजू घेणाऱ्यांचे बंड मोडून त्याने रिपब्लिकविषयी आपली निष्ठा दाखवली होती. तेव्हा क्रांतीच्या नेत्यांनी नेपोलियनला सैन्य देऊन सांगितले, "ही सेना घे व साऱ्या जगाला जिंकून त्याची फ्रेंच रिपब्लिकच्या धर्तीवर पुनर्रचना कर." पण हातात शस्त्र घेणारे आजपर्यंत कधीच जगाचे उद्धारक ठरले नाहीत.जगाला वाचवू शकले नाहीत.नेपोलियन आणि त्याच्या फौजा यांनी जगाचा धुव्वा उडवला.आपले मनोरथ पूर्ण करून घेण्यासाठी नेपोलियनने क्रांतीचा साधन म्हणून उपयोग करून घेतला.त्याने पहिली स्वारी इटालियनांविरुद्ध केली.आपण त्यांची बंधने तोडण्यासाठी जात आहोत असे त्याने जाहीर केले.पण इटलीवर तुटून पडणाऱ्या आपल्या शिपायांना तो म्हणाला, "आपण या देशावर दोन कोटी फ्रैंक खंडणी लादू (म्हणजेच तितकी संपत्ती लुटून नेऊ).
जगातील अत्यंत समृद्ध मैदानात मी तुम्हाला नेत आहे.
तुम्हाला तिथे गेल्यावर यश,संपत्ती,मानसन्मान सारे काही मिळेल." त्यानुसार वरील सर्व मिळाले.पण त्याच्या शिपायांना मात्र मरणच लाभले.
इटलीतील विजयामुळे नेपोलियन फुगला.तो आपणास ज्युलियस सीझरच्या प्रमाणात पाहू लागला.पूर्वेकडील देशात आपणही आपले वैभव दाखवले पाहिजे.आपला दरारा तिकडील राष्ट्रांवरही बसवला पाहिजे असे त्याला वाटले. म्हणून त्याने इजिप्तमधील लोकांना आता मुक्त केले पाहिजे.हे आपल्या देशबांधवांना पटवून दिले व आपल्या आज्ञाधारक क्रांतिकारक कोकरांना इजिप्तमध्ये नेऊन त्यांना तेथील उंच पिरॅमिड्स दाखवले.त्यांच्या भावना पेटवल्या, त्यांनी मरावयास तयार व्हावे म्हणून तो म्हणाला, "तीस शतके त्या पिरॅमिड्सवरून तुमच्याकडे पाहत आहेत!" इतिहासातील अती प्रसिद्ध व अत्यंत मूर्खपणाचे हे वाक्य आहे.या वाक्यात लष्करशाहीचे स्वरूप प्रतीत होत आहे. लष्करशाही जिवंत व प्रगतीपर वर्तमानकाळाला भूतकाळाशी जखडून टाकून प्रगती होऊच देत नाही.लष्करशाही आम्हाला आपले जीवनाचे नाटक जणू भुतासमोर करावयास लावते.चार हजार वर्षे- मृतांची चार हजार वर्षे - तुमच्याकडे पाहत आहेत,म्हणून मारा व मरा असे ही सांगत असते.एका वेडपटाचा मूर्खाच्या पिढीला हा उपदेश आहे.तो मूर्खानी ऐकला मानला व ते मेले.त्या वेडपटाचे वैभव व त्याची कीर्ती वाढवण्यासाठी ते मूर्ख मातीत पडले.
नेपोलियन फक्त स्वतःची पूजा करी व बाकी साऱ्या दुनियेला तुच्छ मानी,कृतज्ञतेशी त्याचा परिचय नव्हता.
मानवी दुःखाविषयी त्याला सहानुभूती नसे.इजिप्तमधील जखमी शिपायांना परत स्वदेशी आणणे हे फार त्रासाचे होते.म्हणून त्यांना क्लोरोफॉर्म देऊन त्याने ठार मारले. नेपोलियन वंचक व असत्यवादी होता.त्याला सत्य ठाऊक नव्हते.तो दंभाचा पुतळा होता. फसवणूक करणे हा तर त्याचा धर्म होता.ज्या ध्येयांवर त्याची श्रद्धा नव्हती तीही आपली आहेत,असे तो खुशाल सांगे.पाळावयाची नसलेली वचनेही तो खुशाल देई.चढाऊ वीराचा तो आदर्श नमुना होता.जगावर सत्ता गाजवू पाहणारे तलवारबहाद्दर असेच असतात.मानवी प्राणी म्हणजे मातीची डिखळे,असे तो मानी व तो आपली लहर तृप्त करण्यासाठी या मातीला मन मानेल तसा आकार देई वा फोडून टाकी.
आपल्या कारकिर्दीच्या आरंभी त्याने 'आपण मानवजातीचे मित्र आहोत' असे ढोंग केले. युरोपभर अनेक रिपब्लिके स्थापून त्याने ती स्वतःच लुटली.
क्रांतीच्या नावाने लढत असता तो स्वतःचेच घोडे कसे पुढे दामटता येईल,हेच खरोखरी पाहत असे.सैन्यावर आपला पूर्ण ताबा बसला आहे असे दिसल्यावर त्याने १८०४ साली पोपला बोलावून आणून त्याच्याकडून 'फ्रान्सचा ईश्वरनियोजित सम्राट' असा अभिषेक आपणास करून घेतला. कार्लाईल म्हणतो, "त्या राज्याभिषेकात कशाचीही वाण नव्हती. पाच लाख लोक त्यासाठी मेले नव्हते का? मग आणखी कोणते भाग्य हवे?" आतापर्यंत तो 'पददलितांचा कैवारी' म्हणून मिरवला. पण आता तो अत्यंत रानटी व जुलमी हडेलहप्पी बनला.युरोपातील साऱ्या रिपब्लिकांच्या पुन्हा राजेशाह्या करून स्वतःच्या भावात व आप्तेष्टांत त्याने सारे युरोप जणू वाटून टाकले.
पण हे भावांवर व आप्तेष्टांवर त्याचे प्रेम होते म्हणून नव्हे,तर राजे बनवणे व नष्ट करणे हा आपला खेळ आहे.
आपल्या तळहाताचा मळ आहे असे त्यांना दाखवून दिपवून टाकण्यासाठी,आपण 'कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम' असे सत्ताधारी आहोत हे तो दाखवू इच्छित होता.एखाद्या उकिरड्यावर ऐटीने बसणाऱ्या कोंबड्याप्रमाणे उद्ध्वस्त जगाच्या विनाश राशीवर तो बसला होता.आपणास अद्यापीही या कोंबड्याचे कुकूऽ कू सर्व राष्ट्रांतील मुलांच्या वर्गातून शिकवण्यात येत असते व या नवयुवकांतून पुढच्या चढाईचे शिपाई तयार करण्यात येत असतात.
जीवनाच्या सुरुवातीला नेपोलियन नास्तिकवादाकडे झुकत होता.पण आता तो धार्मिक झाला."धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्या युक्तिवादाने 'आपल्या दारिद्र्यातच समाधान माना' हे गरिबांना पटवून देता येईल बरे?" असे तो म्हणे. एक अपचनाने आजारी आहे,तर एक भुकेने मरत आहे हा जगातील भेद,ही जगात दिसणारी विषमता मनुष्याने सहन करावयास पाहिजे असेल तर, कोणीतरी असे सांगणारा हवाच की, 'ईश्वराचीच तशी इच्छा आहे. जगात गरीब व श्रीमंत हे भेद असावे असा ईश्वरी संकेतच आहे!' असे सांगितले तरच लोक गप्प बसतील.नेपोलियन ईश्वराचा भूतलावरील अधिकृत प्रतिनिधी बनला. 'दरिद्री व पददलित असूनही प्रजेने शांत राहावे, समाधान मानावे.' यासाठी जणू नेपोलियनचा अवतार होता.इतर सर्व गोष्टींप्रमाणे त्याने धर्माचेही प्रबळ लष्करी शास्त्र बनवले व परकीयांवर हेरगिरी करण्यासाठी परदेशात मिशनरी पाठवले.तो म्हणे, "आशिया,आफ्रिका, अमेरिका इत्यादी ठिकाणी या मिशनऱ्यांचा मला खूप उपयोग होईल.त्या त्या देशांची हकिकत मला या मिशनऱ्यांतर्फे मिळेल.त्या पाद्र्यांचा धार्मिक पोशाख त्यांचे रक्षण करील व त्यायोगे त्यांचे व्यापारी व राजकीय हेतू कोणास कळणार नाहीत.
"त्याला आता एकाच ध्येयाचा स्वतःच्या सत्तेचा ध्यास लागला होता. सत्ता कोणत्या मार्गांनी मिळवायची याचा विधिनिषेध त्याला नसे.मार्ग कोणताही असो,सत्ता हाती राहिली म्हणजे झाले,असे तो म्हणे.जुन्या क्रांतिकारक सहकाऱ्यांचा 'कल्पनावादी' अशी टिंगल करून ते स्वातंत्र्य व सुधारणा या ध्येयांचा पुरस्कार करीत.म्हणून त्याने त्यांना दूर केले.स्वातंत्र्याचा हट्टच धरून बसणाऱ्यांना तो तुरुंगात टाकी. त्याला टीकेची भीती वाटे म्हणून तो टीकाकारांना दया दाखवीत नसे.'साऱ्या जगाला थक्क करणे, दिपवून टाकणे' हे त्याचे त्याचे ध्येय असल्यामुळे त्याने प्रत्येक विरोधी आवाज दडपून टाकण्याचे ठरवले.
आपण वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य दिल्यास आपली सत्ता तीन दिवसही टिकणार नाही,असे त्याला वाटे.
नेपोलियन एक क्षुद्र वृत्तीचा जाहिरातबाज होता. त्याने केलेल्या युद्धांचा हेतू जगाला गुलाम करणे एवढाच नसून जगाला दिपवणे,थक्क करणे हाही होता.जय कोणी का मिळवीना,टाळ्या व श्रेय मात्र नेहमी तोच घेई.तो स्वत:ची स्तुती स्वतः करणारा होता.त्याला मोठा आवाज करणे आवडे.तो म्हणतो,कीर्ती व प्रसिद्धी म्हणजे काय? जो जास्त आवाज करतो,तोच प्रसिद्ध होतो.जितका अधिक मोठा आवाज केला जाईल,तितका अधिक दूर तो ऐकू जातो.कायदे, संस्था,स्मारके,राष्ट्रे सर्व नष्ट होतात.पण आवाज मात्र टिकतो पुढच्या काळात,पुढच्या युगातही टिकतो.आणि म्हणून नेपोलियन जगासमोर मोराप्रमाणे नाचत होता.तो दरोडे घालीत,निंदा करीत,फसवीत,खून करीत,वल्गना करीत, पराक्रम दाखवत होता.स्वतःच्या मोठेपणाची स्तुतिस्तोत्रे तो स्वतःच गाई. व्हिक्टर ह्यूगो म्हणतो, "देवालाही जणू त्याचा कंटाळाच आला!" तो आणखी म्हणतो, "पुरे झाला नेपोलियन! फार झाली त्याची चव ! विटलो, विटलो आता! ( मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)
आणि नंतर त्याचा अध:पात झाला.स्वतः च्या फाजील महत्त्वाकांक्षेमुळेच त्याचा नि:पात झाला.आपल्या साम्राज्यात रशिया व इंग्लंड यांचाही समावेश करायला तो उत्सुक होता. म्हणून सहा लाख सैन्य घेऊन तो मॉस्कोवर स्वारी करण्यास निघाला.पण पुढे कित्येक महिन्यानंतर काही हजार दरिद्री,भिकार, मरतुकड्या,निःसत्त्व व निरुत्साही शिपायांसह पराभूत होऊन परत आला.त्याला जय मिळत होते,तोपर्यंत त्याच्या यशोज्योतीभोवती पतंगाप्रमाणे मरण्यास ते तयार होते.पण मॉस्कोहून ही जी अनर्थकारक पिछेहाट झाली, तिने फ्रेंचांचे डोळे उघडले.
नेपोलियन हा जगाला दिपवू पाहणारा एक शुद्ध वेडपट आहे हे त्यांनी ओळखले.त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या रोगाने लाखो तरुण शिपायांना नाहक मृत्यूमुखात लोटले होते. नेपोलियनने पुन्हा असला काही खोडसाळपणा करू नये.
म्हणून त्याचे देशबांधव व्यवस्था करू लागले.या मूर्खपणाला आळा बसला पाहिजे, असे त्यांना वाटू लागले.म्हणून त्यांनी त्याला एल्बा बेटावर हद्दपार केले.
पण तो अकरा महिन्यांनी तेथून निसटला व स्वत: च्या वेड्या व चढाऊ लष्करशाहीने पुन्हा एकदा जगात दरारा बसवण्याची खटपट करू लागला.तथापि सुदैवाने या वेळचे त्याचे हत्याकांड अल्पायुषी ठरले.ही खुनाखुनी,ही लूटमार फार दिवस चालली नाही.पळून आल्यापासून नव्वदच दिवसांनी वॉटर्लू येथे त्याचा पराभव झाला. त्याने गलबतातून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला.पण इंग्रजांनी त्याला पकडून सेंट हेलेना बेटाच्या निर्जन किनाऱ्यावर स्वतःच्या गुन्हेगार वृत्ती- भोगेच्छा व आकांक्षा
मनात खेळवीत बसायला पाठवून दिले.आयुष्याची शेवटची सात वर्षे त्याने येथे आपल्या आठवणी लिहिण्यात घालवली.या स्मृतीत त्याने स्वतःला जवळजवळ महादेव बनविले आहे. १८२१ साली तो कॅन्सरने मरण पावला व जगाला थोडासा विसावा मिळाला. फ्रेंच राज्यक्रांती करणाऱ्या पुढाऱ्यांनी एक फार मोठी चूक केली.त्यांनी तलवारीच्या जोरावर आपल्या कल्पनांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.जगाला मुक्त करण्यासाठी त्यांनी सैन्य उभे केले.पण हेच साधन हाती घेऊन नेपोलियनने स्वतः च्याच देशाला गुलाम केले.
यशासाठी हिंसेवर विसंबून राहणाऱ्या फ्रेंच क्रांतीचा गळा शेवटी हिंसेनेच दाबला जाणे अपरिहार्य होते व ते नेपोलियनने केले.नेपोलियनने फ्रान्सची मर्यादा, तीच युरोपची मर्यादा करण्याची खटपट केली. कारण त्याला स्वत:च्या क्षुद्र दिमाखासाठी सारे युरोप रंगभूमी म्हणून हवे होते.पण सारे करून तो सेंट हेलेना बेटावर जाऊन बसला,
तेव्हा युरोपचे स्मशान झाले होते.फ्रान्स पूर्वीपेक्षा लहान झाला.नेपोलियनवर स्वतःच्या जीवन-नाटकातील शेवटचा प्रवेश उष्ण कटिबंधातील एका अज्ञात आणि निर्जन बेटावर करावा लागला.अनंत आकाश व अफाट सागर हेच तेवढे प्रेक्षक होते.
अलेक्झांडर खूप दारूची मेजवानी झोडून मेला. हॅनिबॉलने शत्रू सारखे पाठीस लागले म्हणून आत्महत्या केली.सीझरला सर्वांत मोठा विजय मिळवायचा होता.त्याच दिवशी तो मारला गेला आणि नेपोलियनला एखाद्या क्रूर,वन्य श्वापदाप्रमाणे कैद करून मरण्यासाठी दूर ठेवण्यात आले.इतिहासातील या सर्वांत मोठ्या चार सेनापतींपैकी एकाच्याही हातून जगाच्या सुखात किंवा संस्कृतीत तिळमात्रही भर पडली नाही व खुद्द त्यांनाही सुख लाभले नाही,अशा हडेलहप्पींशिवायच जगाचे नीट चालेल.