* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: हसा व हसू द्या व्हॉल्टेअर …

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

४/८/२३

हसा व हसू द्या व्हॉल्टेअर …

त्याच्या इतर अद्भुत कथाही सर्वांना 'हसा' म्हणून सांगत आहेत.स्वतःची मनुष्याच्या दुःखे व स्वत:चा मूर्खपणा पाहून हसा,असे तो लोकांना सांगत आहे. 'निसर्गाचा विद्यार्थी' (The Pupil of Nature) या पुस्तकात अशिक्षित व जंगली निरोगी मनाची सुधारलेल्या माणसाच्या विकृत व गुंतागुंतीच्या मनाशी तुलना केली आहे.एक हुरॉन इंडियन फ्रान्समध्ये आला आहे.त्याच्या आत्म्याचा उद्धार व्हावा म्हणून मिशनरी त्याला ख्रिश्चन करू पाहतात.तो नव्या कराराचा अभ्यास करून म्हणतो,

'माझी सुंताही करा व मला बाप्तिस्माही द्या.बायबलातील सर्वांची सुंता केली आहे.ख्रिश्चन होण्याआधी प्रत्येकाने ज्यू झाले पाहिजे!' त्याला सर्व उलगडा करण्यात येतो व तो पुढचे पाऊल टाकण्यास तयार होतो. बाप्तिस्म्यासाठी तो मानेपर्यंत नदीच्या पाण्यात शिरतो.ख्रिश्चनांना अशा रीतीने बाप्तिस्मा द्यायचा नसतो,असे जेव्हा त्याला सांगण्यात येते,तेव्हा तो आपले खांदे उडवतो व पुन्हा कपडे घालून पापांची कबुली देण्यासाठी धर्मोपदेशकाकडे जातो.

पापांचा पाढा वाचून झाल्यावर तो त्या धर्मोपदेशकास खुर्चीवरून खाली ओढतो.तो इंडियन त्या धर्मोपदेशकाला आग्रहपूर्वक म्हणतो, "बायबलात असे सांगितले आहे की, एकमेकांनी एकमेकांजवळ आपापली पापे कबूल करावीत.' "पुन्हा गोंधळात पाडणारी विवरणे त्या इंडियनास सांगण्यात येताच तो तुच्छतापूर्वक म्हणतो, "बायबलात न सांगितलेल्या अनंत गोष्टी तुम्ही येथे करीत आहात आणि त्यात जे करा म्हणून सांगितले आहे,तेच नेमके तुम्ही करीत नाही. मला हे कबूल केलेच पाहिजे की,हे सारे पाहून मला आश्चर्य वाटते व रागही येतो."

गोष्ट पुढे चालू राहते.हुरॉनचा संस्कृतीशी संबंध आल्यामुळे कोणकोणत्या संकटांतून व आपत्तींतून त्याला जावे लागते,याची सारी हकिकत सांगण्यात आली आहे.नाना साहसाच्या गोष्टी हुरॉनला कराव्या लागतात.तो शेवटी अशा निर्णयाला येतो की,सैतानाची इच्छा होती म्हणून त्याने आपणास सुसंस्कृत ख्रिश्चन केले.तो म्हणतो,'या सुसंस्कृत ख्रिश्चनांनी मला ज्या रानटी पद्धतीने वागवले,

त्या पद्धतीने माझ्या अमेरिकन बंधूंनी मला कधीही वागवले नसते.इंडियन रानवट असतील,सुधारलेले नसतील;पण या गोऱ्यांच्या देशातील लोक तर सुधारलेले पशू आहेत.!' व्हॉल्टेअरच्या सर्व गोष्टींतून हे असेच प्रकार आहेत.या गोष्टींशी तुलना करण्यासारखे वाड्मयात दुसरे नाही.या गोष्टींना संविधानकच नाही.व्हॉल्टेअरच्या तत्त्वज्ञानाच्या धाग्याभोवती गुंफलेली,नाना असंबद्ध संविधानकांची ही एक मालिका आहे.त्याच्या गोष्टींतील नायक शेतकऱ्यांच्या मुलींशी,राण्यांशी,मोठमोठ्या इस्टेटीच्या वारसदारणींशी लग्न करतात.त्यांचे डोळे जातात,तरीही ते सुखी असतात.ते म्हणतात, 'डोळे गेले तरी आम्ही तत्त्वचिंतन करीत बसू,अंतर्मुख होऊ.त्यांचा प्रेमभंग होतो. त्यांना दुःख इतकेच की,या बाबतीत ते तत्त्वचिंतन करू शकत नाहीत.संकटात सापडलेल्यांना ते साह्य करतात.पण त्यांच्यावर संकट आले असता त्यांना लाथा मिळतात.पण त्यानी गुन्हे केले म्हणजे त्यांना संपत्ती मिळते, मानसन्मान लाभतात.थोडक्यात सांगायचे,तर मानवी जीवनाच्या या सर्व लुटूपुटीच्या नाटकातील ही पात्रे व्हॉल्टेअरबरोबर हिंडतात. व्हॉल्टेअर दोऱ्या ओढून त्यांना आपल्या अती चपळ बोटांनी नाचवील तशी ती नाचतात. व्हॉल्टेअरचा विनोद म्हणजे अखंड वाहणारी विहीर आहे.

त्या विनोदाच्या विहिरीला अंतच नाही.पण या विनोदाच्या विहिरीत पाणी नसून मद्य आहे.त्याला जीवनातील विनोदाचा कैफ चढतो.तो आपल्या तेजस्वी विचारांनी साऱ्या जगाला गुंगवून टाकतो,दिपवून सोडतो.

'पण व्हॉल्टेअरची सर्वोत्तम बुद्धी तशीच प्रतिभा पाहू इच्छिणारांना अन्यत्र जावे लागेल,या गोष्टींमधील त्याची जीवनाविषयीची दृष्टी आनंददायक असली,तरी खोल नाही.जरा पोरकटपणाच वाटतो.त्याची लोकप्रियता फार होती म्हणून तो दु:खी असू शकत नव्हता.त्याची चलती होती म्हणून तो फार प्रखर व तिखट होऊ शकत नव्हता.

जीवनाचा अर्थ नीट समजण्या इतपत यथार्थ व पुरेसे

जीवन तो अद्यापि जगला नव्हता.तो अठराव्या शतकातील विनोदी पात्र आहे.तो युरोपचा खेळाडू आहे.

त्याचे मन अद्यापि अपरिपक्व आहे.त्याने अद्यापि फारसे दुःख भोगलेले नसते.मोठ्या मनुष्याच्या उंचीला तो अजून गेला नव्हता.विचारांची व भावनांची उच्चता तशीच गंभीरता त्याला अद्यापि आली नव्हती.मानवजातीला मार्ग दाखवणाऱ्या थोर पुढाऱ्यांपैकी एक होण्यासाठी दुःखाच्या सद्गुरूजवळ त्याने अजून कष्ट सोसणे जरूर होते.


१७४९ साली मॅडम डु चॅटलेट मरण पावली. जीवनात प्रथमच दुःख पाहून तो हसण्याचे विसरला.त्याची प्रकृतीही ढासळू लागली व कडेलोट म्हणजे त्याला पुन्हा फ्रान्समधून हद्दपार करण्यात आले.१७५५ साली लिस्बन येथे भूकंप झाला.या अपघातात तीस हजार लोक गडप झाले.त्या दिवशी सर्व संतांचा स्मृतिदिन होता. पुष्कळ लोक प्रार्थना करीत असतानाच ठार झाले.चर्च प्रार्थना करणाऱ्यांनी भरून गेले होते आणि भूकंप झाला व सारे गडप झाले.व्हॉल्टेअर आता जगाकडे निराळ्या प्रकाशात पाहू लागला.त्याचे लेखन अधिक गंभीर होऊ लागले.

त्याचे भव्य मन शेवटी एकदाचे परिपक्व झाले.त्याने एक भावनोत्कट प्रखर कविता लिहिली.ईश्वराची करुणा हे त्याचे ज्ञान याबद्दल त्याने शंका घेतली.आपल्या लेकरांना दुःखात लोटणारा हा कसला परमेश्वर ? आरोळ्या

ठोकून प्रार्थना करणाऱ्या साऱ्या भक्तांना त्या निष्ठुराचे मौन हेच उत्तर! 


अखेर व्हॉल्टेअरच्या लक्षात आले की,सुटसुटीत अर्थसुंदर नर्मवचने किंवा निश्चित हास्य यापेक्षा जीवन काहीतरी अधिक आहे.


मी हसतहसत विनोदाने जगातील सुखाची गीते, सूर्यप्रकाशाची गीते गात होतो.पण आता काळ बदलला आहे.माझ्या वाढत्या वयानेही मला नवीन दृष्टी दिली आहे.मानवजातीची क्षणभंगुरता मीही अनुभवीत आहे.

सभोवती अंधार वाढत आहे.मीही प्रकाश शोधत आहे. अशा वेळी मी दुःखी कष्टी होऊ नये तर काय करावे ?


लिस्बन येथील भूकंपाच्या बाबतीत प्रस्थापित चर्चची बेफिकीर वृत्ती पाहून तर व्हॉल्टेअरला धक्काच बसला!या घोर आपत्तींतही त्या फादरांना ईश्वराचे हेतू दिसत होते.

त्यांनी पापे केली म्हणून प्रभूने त्यांना मारून टाकले,असे हे धर्मोपदेशक खुशाल प्रतिपादीत छिन्नविछिन्न झालेल्या लोकांच्या वेदनांवर या धर्मातील भोळसट कल्पना आणखी मीठ चोळीत आहेत,असे पाहून या चर्चची व्हॉल्टेअरला चीड आली.चर्चबद्दलचा तिरस्कार त्याच्या मनात मरेपर्यंत होता. स्विझर्लंडमध्ये फर्ने येथे त्याने इस्टेट विकत घेतली.फ्रान्सच्या सरहद्दीच्या जरा बाहेर ही इस्टेट होती.येथे बसून त्याने संघटित धर्माविरुद्ध जोरदार लढाई सुरू केली.तो सांगू लागला की,जगातील साऱ्या दुःखांचे मूळ म्हणजे चर्च. चर्चची धर्मांधता तशीच असहिष्णुता,ती इन्क्विझिशन्स,ते बहिष्कार,त्या शिक्षा,ती युद्धे साराफापटपसारा आहे.असे हे चर्च म्हणजे मानवजातीला शाप आहे.अत:पर चर्चची सत्ता चालू ठेवणे म्हणजे सुधारणेला कलंक लावणे होय."चर्चला लागलेला हा कलंक धुवून काढा." अशी घोषणा त्याने केली." या निंद्य गोष्टी चिरडून टाका." हे त्याचे ब्रीदवाक्य झाले.त्याने मित्रांना लिहिलेल्या प्रत्येक पत्राच्या शेवटी 'चर्च चिरडून टाका' हे वाक्य लिहिलेले असे.


पुस्तकाचा व पत्रकांचा त्याने नुसता पाऊस पाडला.अत्यंत भावनोत्कटतेने त्याने हे सारे लिखाण लिहिले आहे.त्याचे लिहिणे जळजळीत निखाऱ्यासारखे आहे.या लिखाणात उदात्त भावनेची कळकळ आहे.हे सारे लिखाण केवळ मनुष्यांच्या अंधश्रद्धेतून होते असे नव्हे;तर त्यांच्या धार्मिक अत्याचारांविरुद्धही होते.बहुजन समाजाने 'ईश्वर आहे' असे मानणे ठीक आहे. 'ईश्वर नसेल तर एकदा शोधून काढावा लागेल. एपिक्यूरसचे ईश्वराशिवाय चालत असे,पण व्हॉल्टेअरला ईश्वर अजिबात रद्द करणे बरे वाटेना.ईश्वर म्हणून कोणी मानला म्हणजे बहुजन समाज जरा बरा वागतो,असे त्यांचे मत होते.ईश्वर असणे जरूर आहे,असे त्याला वाटे. इतर कोणत्याही कारणांसाठी नसेना का;पण निदान आपणास त्याच्याशी भांडता यावे म्हणून तरी तो त्याला हवा असतो.ईश्वर म्हणजे जगाचे परमोच्च ज्ञान,अनंतपट कार्यक्षम असा विश्वकर्मा.पण धर्मोपदेशक या ईश्वराला इन्क्विझिटर करतात.लष्करी अधिकारी त्याला शिक्षाप्रिय सार्जंट बनवतात व अशा रीतीने श्रद्धेचे भीतीत व धर्माचे भोळसटपणात रूपांतर करतात.व्हॉल्टेअर म्हणतो,"या रूढी-राक्षसीला आपण नष्ट करू या.ही रूढी धर्मातूनच जन्मते, पण धर्मालाच छिन्नविछिन्न करते.रूढीविरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेऊन उभे राहतील,ते सारे मानवजातीचे उपकारकर्ते होत.व्हॉल्टेअरने आपले उर्वरित जीवन धार्मिक रूढी व आंधळेपणा यांच्याशी दोन हात करण्यात दवडले.या रूढींतून निर्माण होणाऱ्या द्वेष, मत्सर,असहिष्णुता,

संकुचितपणा,अन्याय व युद्ध यांच्याविरुद्धही तो बंड करीत राहिला.युद्ध म्हणजे मोठ्यातला मोठा गुन्हा असे तो म्हणे.तो म्हणतो,"हा गुन्हा अधिकच लज्जास्पद व चीड आणणारा वाटतो.कारण सेनाधिपती होणारा प्रत्येक डाकू धर्माच्या नावाने जाहीरनामा काढून चोरी करावयास निघतो.व युद्धप्रिय देवांना आपल्या बाजूने लढावयास बोलावतो." जो आपल्या विशिष्ट धार्मिक समजुतीसाठी मारावयास उठतो,तो खरा धार्मिक नव्हे. शास्त्रज्ञांचे म्हणणे कोणी न मानले तर काय तो मारावयास उठतो ? भूमितीतील सिद्धांतांसाठी का कधी युद्ध झाले आहे? पण हे धर्मोपदेशक काही धार्मिक गोष्टींसाठी खुशाल खाटिकखाना सुरू करतात.त्यांच्या धार्मिक गोष्टी म्हणजे केवळ मृगजळ असते.तो मिथ्या काथ्याकुट असतो.त्यांचे धार्मिक सिद्धांत म्हणजे त्यांची स्वतःची काही विशिष्ट मते असतात.त्यासाठी मारामाऱ्या कशाला?व्हॉल्टेअर म्हणतो,

"हे असे लोक म्हणजे भयंकर प्रकारचे वेडे होत.काहीही किंमत पड़ो,यांच्या या विषारी चळवळी बंद पडल्याच पाहिजेत." जगातील धार्मिक असहिष्णुतेची पुंजी कमी व्हावी म्हणून व्हॉल्टेअरने भरपूर कामगिरी केली आहे.

धार्मिक बाबतीत कोणी ढवळाढवळ करू नये,हे तत्त्व त्याने कायमचे प्रस्थापित केले व चर्च आणि स्टेट यांची कायमची ताटातूट केली.त्याने धर्मोपदेशकांच्या हातातील तलवार काढून घेतली.व्हॉल्टेअरचे जीवनारंभकाळी 'हसा व हसू द्या' हे ब्रीदवाक्य होते.पण आता त्याने अधिक उच्च ब्रीदवाक्य घेतले,'तुम्ही विचार करा व इतरांनाही विचार करू द्या.' एका पत्रात तो लिहितो, 'तुम्ही जे काही म्हणता,

त्यातील एका अवाक्षराशीही मी सहमत नाही.पण तुम्हाला जे म्हणायचे आहे,ते म्हणण्याचा तुम्हाला हक्क आहे आणि या तुमच्या हक्काचे मी मरेतो समर्थन करीन.' व्हॉल्टेअरचे हे शब्द म्हणजेच त्याने मानवी सुधारणेत घातलेली मौल्यवान भर होय.अठराव्या शतकाची सुधारणेला मोठी देणगी असे,हे धीरोदात्त शब्द होत.


व्हॉल्टेअरच्या मनात अशी क्रांती चालू असता त्याचे बाह्य जीवन नेहमीप्रमाणे अशांतच होते. फ्रेडरीक दि ग्रेटचा साहित्यिक चिटणीस म्हणून त्याची नेमणूक झाली होती.

तो फ्रेडरिकशी भांडला व त्याला पुन्हा फ्रान्समध्ये पाठवण्यात आले.फ्रेंच क्रांतीचे वातावरण तयार करणारे डिडरो,ड'अलेबर्ट,कॉन्डॉसेंट वगैरे नास्तिक ज्ञानकोशकार मंडळींना व्हॉल्टेअरही मिळाला. डिडरोप्रभृती सारे लोक जुन्या विचारांना व जुन्या रूढींना धाब्यावर बसवणारे होते.ते जुन्या मूर्ती फोडून नवीन विचारमूर्ती देणारे होते.

व्हॉल्टेअरन 'स्वतंत्र विचारांचा ज्ञानकोश' तयार करण्याच्या कामी त्यांना मदत केली.ज्ञानकोशकार त्याला सनातनी म्हणत,आस्तिक म्हणत आणि सनातनी त्याला नास्तिक म्हणत आणि या दोघांच्या मध्ये तो उभा होता.त्याचे हात कामाने भरलेले होते. इतिहासाचे तत्त्वज्ञान,तत्त्वज्ञानाचा कोश वगैरे शेकडो पुस्तके लिहिण्यात तो मग्न होता.तरीही अन्याय व छळ दिसतील,तिथे तिथे लेखणी घेऊन लढायला तो सदैव सज्ज असेच.सेंट बूव्हे लिहितो,प्रत्येक जण व्हॉल्टेअरकडे येई.कोणी त्याचा सल्ला मागत,कोणी त्याला आपल्यावर होणारे अन्याय निवेदीत व त्याचे साह्य मागत.तो कोणासही नकार देत नसे,निराश करीत नसे.'


त्याला मनाने वा शरीराने बरेच दिवस विश्रांती घेणे अशक्य असे.वयाला ब्याऐंशी वर्षे होत आली,तरीही जीवनात प्रत्यक्ष धडपड करावी, स्वस्थ बसू नये असे त्याला वाटे.आपले मरण जवळ आले असे वाटून तो पॅरिसला अखेरची भेट घ्यायला म्हणून आला.पॅरिसमध्ये त्याचे स्वागत झाले,ते जणू ऐतिहासिकच होते!पण हा सारा प्रवास,हे भव्य स्वागत त्याच्या प्रकृतीस झेपले नाही.त्याच्या स्वागतार्थ रंगभूमीवर केल्या जाणाऱ्या एका नाटकाला डॉक्टर 'जाऊ नका' म्हणून सांगत असताही तो गेला.सार्वजनिकरीत्या त्याचे ते शेवटचेच दर्शन होते..


तो मृत्यूशय्येवर होता.एक धर्मोपदेशक त्याचा कबुलीजबाब घेण्यास आला.पण व्हॉल्टेअर म्हणाला,

"रोमन कॅथॉलिक चर्चवर माझी श्रद्धा नाही.मी ईश्वराची प्रार्थना व पूजा करीत मरतो.मित्रांवर प्रेम करीत;पण शत्रूचा द्वेष न करता,रूढींचा तिरस्कार करीत मी देवाकडे जातो."


पॅरिसमध्ये त्याला ख्रिश्चन धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार मिळाला नाही.इंग्रजांवरील पत्रात तो एके ठिकाणी लिहितो,"आयझॅक न्यूटन हा सर्वांत मोठा होय.तो सर्वांत मोठा का?कारण आपण त्याच्याचबद्दल मनात पूज्यबुद्धी बाळगतो,जो सत्याच्या जोरावर आपली मने जिंकतो.

बळजबरीने दुसऱ्यांची मने जिंकू पाहणारांना आपण मान देत नाही.' न्यूटनबद्दल व्हॉल्टेअरने लिहिलेले शब्दच व्हॉल्टेअरच्या मृत्यूलेखासाठी उपयोगी पडण्यासारखे होते.


२.८.२०२३ 'हसणारा व्हॉल्टेअर' या लेखाचा शेवटचा भाग..