रविवारची दुपार होती.भरपेट जेवण करून पेपर वाचत पडलो होतो.तेवढ्यात फोन वाजला.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुण्यात काही दरवेश्यांना चार अस्वलांसह पकडलं होतं.त्या अस्वलांना पेशवे पार्कमध्ये नेलं गेलं.
डॉ.विनय गो-हे यांनी तीन अस्वलं पेशवे पार्कमध्ये ठेवून घेण्याची तयारी दाखवली.मग चौथं अस्वल आमच्या पार्कमध्ये घ्यावं,अशी विनंती करण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी मला फोन केला होता.मी ताबडतोब आयुक्त बंगल्यावर फोन लावला.रवींद्र सुर्वे नावाचे एक कार्यतत्पर अधिकारी त्या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त होते.त्यांनी लगेगच हे अस्वल मर्यादित कालावधीसाठी ठेवून घेण्याची परवानगी दिली.
आम्ही ताबडतोब पेशवे पार्क गाठलं.चारही अस्वलं खाऊन-पिऊन मजेत झाडाच्या सावलीत आराम करत होती.त्यांना सांभाळणारे दरवेशीही तिथेच बसून होते.त्या अस्वलांमधल्या मध्यम बांध्याच्या बोलक्या डोळ्यांच्या,
अत्यंत देखण्या मादीने माझं लक्ष वेधून घेतलं.पाहताक्षणी तिलाच सोबत न्यायचं असं मी ठरवून टाकलं.
वनाधिकाऱ्यांच्याच जीपमधून तिला पार्कमध्ये आणलं.
दुर्गा टेकडीवरून आणलेले दोन मोठे आणि एक छोटा पिंजरा जोडून तिच्यासाठी तात्पुरता पिंजरा तयार केला आणि तिला त्यात सोडलं.आल्या आल्या तिला केळी,
सफरचंद आणि दूध मिसळून छान शिकरण खायला दिलं.हा खाऊ आवडीने गट्टम करून ती झोपी गेली.तिचा मालकही तिच्यासोबतच आमच्याकडे आला होता. तो माझ्याच वयाचा आणि माझ्यासारखीच दाढी असलेला माणूस होता.माझ्या शिफारशीनुसार आयुक्त सुर्वेसाहेबांनी त्याला कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याची तयारी दर्शवली.
पण त्याला काय वाटलं कोण जाणे,तो दुसऱ्याच दिवशी निघून गेला.आमच्याकडे आलेल्या अस्वलीचं नाव होतं सिमरन,दरवेशी तिला लाडाने मुन्नी म्हणत असे.मुन्नी त्याच्या मुलांसोबत त्यांच्या कुटुंबातच वाढली होती.
त्यांच्यासोबतच गावोगाव फिरत होती.बघ्यांसाठी खेळ करत होती.त्यांचं भटके घर चालवण्यासाठी मेहनत करत होती. हीच मुन्नी आता आमच्या पार्कची सदस्य झाली होती.वास्तविक यापूर्वी माझा आणि अस्वलाचा काहीच संबंध आला नव्हता.प्राणिसंग्रहालयात किंवा दरवेशांसोबत पाहिलं असेल तेवढंच.जर्सीमध्ये दक्षिण अमेरिकी 'स्पेक्टॅकल्ड बेअर'च्या प्रजोत्पादनाचा प्रोजेक्ट जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं होतं;पण तिथेही माझा त्या प्रकल्पात प्रत्यक्ष सहभाग नव्हता.तसं पाहिलं तर अस्वलाशी माझं अप्रत्यक्ष नातं जुळलं ते दुर्गा भागवतांमुळे.त्यांचं 'अस्वल' हे पुस्तक मला अतिशय आवडून गेलं होतं.दुर्गाबाईंनी किती विलक्षण बारकाईने अस्वलांच्या सवयी आणि स्वभावाचं रेखाटन त्यात केलं आहे!अस्वलांच्या जाती,त्यांची वसतिस्थानं,आहार- विहाराच्या सवयी, स्वभाववैशिष्ट्यं,अस्वलाची वागणूक इत्यादी. धिप्पाड देह असूनही अस्वल आळशी नसतं. उलट,ते अत्यंत कष्टाळू अन् मेहनती असतं. शूर आणि दांडगं असतं.बऱ्यापैकी चंचलही असतं.त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल बऱ्याच ठिकाणी वाचनात आलं होतं.
त्यामुळे एकीकडे या प्राण्याबद्दल उत्सुकता होती आणि हा पूर्ण नवा ताकदवान लहरी प्राणी आपल्याला झेपेल ना,याची धाकधूकही वाटत होती.त्यातच रात्री प्रतिभाला मुन्नीने पिंजरा तोडल्याचं स्वप्न पडलं.उरलेली रात्र तिने जागून काढली.पहाट होण्याआधीच ती पिंजरा शाबूत असल्याची खात्री करून आली. सुदैवाने मुन्नीने असा कोणताही उद्योग केला नव्हता.आदल्या दिवशीच्या धावपळीमुळे ती थकून झोपून गेली असावी.सकाळी
उठल्यावर तिला दूध-पाव खायला घातला.
महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या नाकातील वेसण कापून काढली.तिला औषधपाणी केलं.सुदैवाने कोणताही त्रास न होता मुन्नी आमच्या पार्कवर रुळली.एवढंच नव्हे,तर पार्कमधल्या आणि पार्कमध्ये येणाऱ्या बालगोपाळांचं ती आकर्षण बनली.
सुर्वेसाहेबानंतर पर्यावरणप्रेमी प्रवीणसिंह परदेशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त झाले.त्यांनी आमच्या पार्कच्या विकासामध्ये खूपच रस घेतला.ते वरच्यावर सहपरिवार पार्कवर येत असत.त्यांची मुलंही सोबत असत. सगळी छोटी मंडळी पार्कमध्ये धमाल करत असत.विशेषतः मुन्नीसाठी फ्रुट सॅलड तयार करायचं आणि आम्हा कर्मचाऱ्यांपैकी कुणी तरी मुन्नीला ते खिलवत असताना पाहायचं,हा या बालस्वयंसेवकांचा आवडीचा उद्योग.बोराटे अण्णा हे मुन्नीचे पालक.त्यांनी भांडं स्वच्छ धुऊन त्यात दूध ओतलं की कुणी केळी,कुणी चिकू, कुणी इतर काही फळांचे तुकडे करून त्यात टाकत.
मग त्यावर मध ओतला की झालं मुन्नीचं 'फ्रुट सॅलड विथ हनी' तयार. पिंजऱ्यावर चढून बोराटे अण्णा सरकतं दार थोडंसं वर उचलायचे.अचूक टायमिंग साधून मी भांड पटकन आत सरकवायचो.दार खाली केलं की ओठांचा चंबू करून मुन्नी फ्रुट सॅलड भुरकणं सुरू करायची. खाऊन झाल्या झाल्या तिला लगेचच पाणी लागायचं.
त्याच भांड्यात आम्ही लगेच नळी धरत असू.खाणं-पिणं आटोपलं की पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला स्लीपिंग सेक्शनमध्ये जाऊन लोळणं हा मुन्नीचा आवडता कार्यक्रम.कधी कधी ती नाठाळपणा करायची,पण एरवी तिचा दिनक्रम शांतपणे चालू असायचा.
मुन्नी वयात आली आणि तिच्यात नैसर्गिक बदल दिसू लागले.आता तिला जोडीदाराची गरज होती.विणीच्या हंगामात ती खूपच वैतागलेली असायची.अशा वेळी खाणं-पिणं तिच्यादृष्टीने दुय्यम असायचं.कधी कधी ती आवडीचं खाणंही उलटवून टाकायची पिंजऱ्याचे अर्धा इंची लोखंडी गजांचे वेल्डिंग पॉइंट्स तोडून,ते वाकवून थयथयाट करायची.तिच्यासाठी दररोज दूध, पाव,केळी,
सफरचंद,मनुका,खजूर,मध अशा अत्यंत संतुलित आहाराची,मेजवानीची सोय आम्ही करत असू.
पुढे केंद्र सरकारच्या आदेशानुसार मुन्नीला पेशवे पार्कच्या जागेतून कात्रज इथे स्थलांतरित झालेल्या राजीव गांधी पार्कमध्ये हलवण्यात आलं.तिथे तिला अनुरूप जोडीदार मिळाला.त्यांना मुलंबाळं झाली.आणि तीही तिथे आनंदात नांदली.मुन्नीला कात्रजला हलवल्यानंतर कित्येक दिवस दर मंगळवारी मी तिला भेटायला जात असे.तिच्या पिंजऱ्याजवळ जाऊन हाक मारताच ती खंदकाच्या भिंतीजवळ यायची आणि मागच्या पायावर उभी राहून माझ्याकडे बघत बसायची. बराच वेळ आम्ही एकमेकांना न्याहाळत असू. मी तिच्याशी बोलत असे;तीही मजेत ऐकत असे.मी खंदकापासून तिच्या नजरेआड होईपर्यंत ती माझ्याकडे बघत असायची.पुढे पुढे माझं जाणं-येणं कमी झालं,पण तरीही मुन्नी माझी ओळख विसरली नाही.माझा एक जुना मित्र खूप वर्षांनी नागपूरहून भेटायला आला होता.त्याला घेऊन मी प्राणिसंग्रहालयात फिरायला गेलो.
सवयीने अस्वलाच्या पिंजऱ्याजवळ गेलो आणि मुन्नीला हाक मारली.मुन्नी काही दिसली नाही.मला वाटलं,की कदाचित तिला माझी हाक ऐकू गेली नसेल किंवा ती विश्रांती घेत असेल.मी थोडा वेळ थांबलो.इतक्यात एक छोटं अस्वल अगदी मुन्नीसारखंच दोन पायांवर उभं राहिलं.घशातून खाकखूक केलं आणि निघून गेलं.यापूर्वी मुन्नी सोडून तिथल्या कोणत्याही अस्वलाने मला असा प्रतिसाद दिला नव्हता.मी मनात म्हटलं, 'हे नक्कीच मुन्नीचं पोर असणार.पण मुन्नी कुठेय?' माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.दुसऱ्याच दिवशी अस्वलांचा केअरटेकर कौशिक भेटला.तो म्हणाला "सॉरी सर,तुम्हाला सांगायचं राहून गेलं.गेल्या आठवड्यात मुन्नी गेली!"
पण त्याने बातमी सांगण्याआधीच मुन्नीच्या पिल्लाने तिचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला होता..
पुण्याला परममित्र सतीश खाडे अभिनव जलनायक या पुस्तकाचे लेखक यांना भेटायला गेलो होतो.त्यावेळी त्यांनी भेट म्हणून भरपूर पुस्तके दिली.त्यातीलच एक 'सोयरे वनचरे',अनिल खैर,प्रकाशक - समकालीन प्रकाशन पुणे यांचे हे पुस्तक वाचत असताना.या कथेने घेतलेला मनाचा वेध..