* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: शोध 'शून्या' च्या उगमाचा -The search for the origin of 'zero' - भाग - २

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२२/८/२३

शोध 'शून्या' च्या उगमाचा -The search for the origin of 'zero' - भाग - २

यावरून इसवी सनाच्या दहाव्या शतकात इथल्या गणितींची किती प्रगती झाली होती हे स्पष्ट होतं.ज्याअर्थी दहाव्या शतकात एवढी प्रगती होती त्याअर्थी त्या प्रगतीला त्याआधी काही शतकं तरी सुरुवात झालेली असावी असं यातून स्पष्ट होत होतं.खजुराहो इथे मिळालेले जादुई चौरस आणि वेगवेगळे आकडे म्हणजे भारतीय अंकांचे ठोस पुरावे आहेत.असेच आकडे भारतात इतरत्रही सापडतात.याबद्दल इतरांचं म्हणणं वाचून ॲक्झेल यांनी मांडलेलं मत प्रचलित विचारांशी मिळतंजुळतं आहे.

भारतात आकडे आणि एकंदरीतच गणिताचा उगम धार्मिक कृत्यांशी संबंधित आहे.वेदांमध्ये आणि वैदिक काळातील आख्यायिकांमध्ये यज्ञकुंडं,मंदिरं,यज्ञात बळी द्यायच्या पशूंची संख्या आदी गोष्टींकरता अंकांची आणि भूमितीची नक्कीच आवश्यकता होती. प्राचीन भारतीय संस्कृतीचा इतिहास अभ्यासून त्यावर संशोधन करणाऱ्या जॉन मॅक्लिश या तज्ज्ञाच्या मते- 'भारतातील आद्य संस्कृतींच्या रहिवाशांमध्येसुद्धा आकड्यांची जाण असल्याचं दिसून येतं.सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात भरभराटीस आलेल्या हडप्पाच्या संस्कृतीत

सुद्धा दशमान पद्धतीची प्राथमिक जाणीव होती.भारतीय लोक इजिप्त,बॅबिलॉन आणि मायसेनिया इथल्या लोकांपेक्षा गणनपद्धतीबाबत खूप पुढे होते.वैदिक संस्कृतीत यज्ञवेदी रचण्यासाठी जी काटेकोर अचूकता लागत होती ती आकडेमोडीची व भौमितिक प्रमेयांची माहिती असल्याशिवाय शक्यच नव्हती.' असं असलं तरी ॲक्झेल यांना लिखित पुरावा हवा होता.प्रत्यक्ष ते शून्य पाहिल्याशिवाय त्यांचं समाधान होणार नव्हतं. भारतातही ते वेगवेगळ्या राज्यांतील प्राचीन मंदिरांत आणि संग्रहालयांत फिरून आले.त्यांना सर्वांत जुनं लिखित शून्य ग्वाल्हेर इथल्या एका विष्णू मंदिरात सापडलं.हे मंदिर इ. स. ८७६ मध्ये बांधण्यात आलं होतं.पण इ. स. ८७६ मध्ये अरब व्यापारी त्या वेळच्या ज्ञात जगात सर्वत्र फिरत होते.शून्याचा शोध पूर्वेत कुठे तरी लागला आणि अरब व्यापाऱ्यांनी ते पश्चिमेकडं आणलं, तसंच ते सागरामार्गे भारतात नेलं ही शक्यता नाकारता येत नव्हती.त्याबरोबरच,अरबी गणितज्ञांनीच शून्य निर्माण केलं आणि अरब व्यापाऱ्यांनी ते पश्चिमेकडे त्याचबरोबर पूर्वेकडे नेलं,ही शक्यतासुद्धा होतीच.जोपर्यंत आधीच्या शतकांतले शून्याचे पुरावे मिळत नाहीत,तोपर्यंत हिंदूंनी शून्याचा शोध लावला,या म्हणण्याला अर्थ नाही,असं ॲक्झेल यांना वाटत होतं.सिंधू संस्कृतीत शून्य वापरलं जात असेलही;पण जोपर्यंत त्यांच्या लिपीचा उलगडा होत नाही, तोपर्यंत भारतातल्या लिखित पुराव्यावरून अरबी व्यापाऱ्यांनी शून्य पाश्चात्त्य देशांत नेलं असं म्हणायला वाव नव्हता.यानंतर अमीर ॲक्झेल भारतातून परतले खरे,पण ते असमाधानी होते.' शून्याच्या मुळाशी जाण्यात अपयशी ठरलो ' हे सत्य स्वीकारणं त्यांना जड जात होतं. हिंदू-अरब आकड्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून जगात इतरत्र असलेल्या आणि आता कालौघात नष्ट झालेल्या इतर गणनपद्धतींबाबत विचार करावा किंवा हे सर्व सोडून दुसराच एखादा संशोधन प्रकल्प हाती घ्यावा याचा ते विचार करू लागले.

त्यांच्या पत्नीला त्यांची अस्वस्थता कळत होती. त्यामुळे इतर गणनपद्धतींचा अभ्यास करण्याच्या नव्या प्रकल्पांचा ॲक्झेलने विचार करायला हवा,असं तिलाही वाटत होतं.

अमीर यांनी या सूचनेस मान देऊन युरोपातील एटुस्कन संस्कृतीच्या गणनपद्धतीचा अभ्यास करायचं ठरवलं.ही संस्कृती इ.स.पूर्व आठव्या शतकात उदयास आली आणि इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात लयास गेली.पण त्या अभ्यासात अमीर यांचं मन रमत नव्हतं.ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलीच.दोघंही नोकरी करत असल्यामुळे आठवड्यातील एका ठराविक दिवशी दुपारी ते एकत्र येऊन जेवण घेत असत.त्या वेळी ॲक्झेल यांची पत्नी म्हणाली, "अमीर, तू परत भारतात जा आणि ग्वाल्हेरच्या शून्याबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न कर.'

अमीर कामाला लागले.बिल कॅसलमन नावाच्या एका गणितीने ग्वाल्हेरच्या शून्याचा अभ्यास करून त्याबद्दल बरीच माहिती मिळविल्याचं अमीर यांच्या लक्षात आलं. हे कॅसलमन ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनीही आकड्यांवर बरंच संशोधन केलं होतं. अमीर यांनी कॅसलमनशी दूरध्वनी - मैत्री प्रस्थापित केली.

कॅसलमननी त्यांच्याजवळच्या माहितीचा खजिनाच उघडला आणि अमीरना  नवा मार्ग दाखवला.त्यांनी सांगितलं, "जॉर्ज कोडेस या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याने ग्वाल्हेरच्या आधीच्या काळातलं शून्य कंबोडियामध्ये पाहिल्याचं फार पूर्वीच लिहून ठेवलं होतं.तेव्हा अमीरने भारतात न जाता कंबोडियात जाऊन या शून्याबद्दल अधिक माहिती मिळवावी." लोट्झीने ॲक्झेल लहान असताना ज्या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याबद्दल सांगितलं होतं त्याच्याबद्दलच कॅसलमन बोलत होते.ते ऐकल्यावर अमीरना बऱ्याच गोष्टी आठवल्या आणि इतके दिवस त्या विस्मरणात गेल्याबद्दल पश्चात्तापही झाला.एके ठिकाणी ते प्रांजळपणे लिहितात, 'मी असा कसा वागलो? मी कित्येक वर्ष शून्याचं मूळ शोधायचा प्रयत्न करत होतो.

माझ्या टेबलावर जॉर्ज इफ्राचं 'द युनिव्हर्सल हिस्टरी ऑफ नंबर्स' हे पुस्तक हाताशी लागेल असं ठेवलेलं होतं.


त्यात कोडेस यांच्या कार्याचे अनेक संदर्भ आहेत.लोट्झीने मला योग्य ती दिशा पूर्वीच दाखवली होती.मीच तिकडे दुर्लक्ष केलं होतं.' कोडेस ही एक वल्ली होती.तो गणिती नव्हता, तर पुरातत्ववेत्ता आणि भाषाशास्त्रज्ञ होता.मात्र, गणित अभ्यासक सोडले तर तो फारसा कुणाला ठाऊक नव्हता;तेसुद्धा गणिताचा इतिहास त्याने जगापुढे आणला म्हणून स्वतः गणितज्ञ नसताना त्याने गणिताच्या इतिहासाचं ज्ञान जगाला दिलं होतं.त्याला अनेक भाषांचं सखोल ज्ञान होतं. बारीक बारीक गोष्टींची माहिती घेऊन त्यातून तो अर्थपूर्ण निष्कर्ष काढत असे.वेगवेगळ्या घटकांचे परस्परसंबंध काय असावेत हे जाणून घेण्याची अनोखी दृष्टी त्याला प्राप्त होती. पूर्वगृहदूषित वृत्तीने निष्कर्ष काढून ते जगासमोर मांडणाऱ्या अनेक विद्वानांचं पितळ त्याने उघडं पाडलं होतं.कारण तो खरा इतिहासप्रेमी होता. ग्वाल्हेर इथल्या शून्याच्या किती तरी आधीच लिखित शून्य त्याने जगासमोर आणलं होतं. त्यामुळे आकड्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला होता.कोडेसचं हे काम दुसऱ्या महायुद्धापूर्वीचं होतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर कंबोडियात बरीच उलथापालथ झाली होती. विसाव्या शतकाच्या उत्तराधांत 'ख्मेर रुज' नावाच्या संघटनेने कंबोडियावर ताबा मिळवला होता.

त्यांनी वीस लाख नागरिकांची खुलेआम कत्तल केली होती.अनेक पुरातन पुतळे फोडून त्यांनी त्याची खड़ी करून रस्त्यांवर भर म्हणून वापरली होती.त्यामुळे ज्या शिलालेखात सर्वांत प्राचीन लिखित शून्य कोडेस यांनी पाहिलं होतं तो शिलालेख तरी शिल्लक आता असेल का, हा प्रश्न अमीर यांना सतावत होता. मेकाँग नदीकाठी असलेल्या सांबोर नावाच्या गावी कोडेसना हा शिलालेख १९२५ च्या आसपास मिळाला होता. त्यांनी त्या दोन शिळांना के १२७ आणि के- १२८ हे क्रमांक दिले होते.


अनेक ई-मेल आणि अनेकांकडे चौकशा करून अमीर यांना अँडी ब्रोअर नावाच्या कंबोडियात स्थायिक असलेल्या माणसाचा दूरध्वनी क्रमांक मिळाला.अँडीला भेटायला अमीर ॲक्झेल नॉमपेन्हला पोहोचले.त्यांनी अँडीला शिलालेखाबद्दल सांगितलं.सध्या तो कुठे आहे हे शोधायला मदत करावी,अशी विनंतीही त्यांनी अँडीला केली.अँडी आणि अमीर दोघांनी काही जाणकार बौद्ध भिक्खूंची मदत घ्यायचं ठरवलं. त्यासाठी अमीर यांना लुआंग प्रबांग या शहरी जावं लागणार होतं.

दरम्यान,अँडीने रोटानाक यांग नावाच्या मित्राची भेट घ्या,असं अमीर यांना सुचवलं.यांगचा पुरातन वस्तूंचा अभ्यास होता. के-१२७ आणि के-१२८ हे दोन शिलालेख दुसऱ्या महायुद्धपूर्व काळात नॉमपेन्ह इथल्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात शिलालेख विभागात होते,असं यांगने अमीरना सांगितलं;पण तिथेही त्यांना एक सुंदर वस्तुसंग्रहालय बघितल्याचं समाधान मिळालं एवढंच.

त्यांच्या कामात कोणतीही प्रगती झाली नव्हती.

अमीर बँकॉकला परतले.बँकॉकमध्ये नुसतं बसून राहण्यापेक्षा अँडीने सुचवल्याप्रमाणे लाओसमध्ये जाऊन यावं,तोपर्यंत अँडी किंवा इतर कुणी जाणकार काही संदेश पाठवेल त्यावर नंतर काम करावं,असं त्यांनी ठरवलं.

त्यांनी आपल्या पत्नीला,डेब्रालाही तिथे बोलावून घेतलं.

दोघं मिळून लुआंग प्रबांगला गेले.तेथील झिआँग थाँग या पॅगोडात एका भिक्खूला अमीर यांनी प्रश्न केला, "शून्यत्व म्हणजे काय ?" या प्रश्नाला त्या भिक्खूने विस्तृत उत्तर दिलं.ते विवेचन ऐकून अमीर यांची खात्री पटली,की इतका खोलवर विचार करणाऱ्या प्राचीन लोकांनीच 'शून्य' आणि 'अनंत' अशा कल्पना केल्या असणार.

ॲक्झेल पती-पत्नी बँकॉकला परतले.तिथे रोतानाक यांगचा संदेश त्यांची वाट पाहत होता. यांगचे वडील 'अंगकोर जतन संस्थे'चे संचालक होते.त्यांना इंग्रजी येत नव्हतं.त्यांच्या संस्थेत अनेक कंबोज शिलालेख,पुतळे आणि इतर वस्तू जतन करून ठेवलेल्या होत्या.

इ.स.१९९० मध्ये ख्मेर रुजच्या गुंडांनी यातल्या बऱ्याच गोष्टी लुटल्या होत्या.त्या पैशासाठी त्यांनी परदेशात पाठवल्या होत्या किंवा तोडून तरी टाकल्या होत्या.तिथे पूर्वी के १२७ असण्याची शक्यता होती. त्यासंबंधी - अधिक माहिती फक्त शासकीय सांस्कृतिक मंत्रालयच देऊ शकत होतं. ती परवानगी मिळायला काही काळ जावा लागला.के-१२७ च्या अखेरच्या ज्ञात आश्रयस्थानाला आता भेट देणं बाकी होतं. ठरलेल्या वेळी अमीर त्या संग्रहालयात पोहोचले. संग्रहालयाचे संचालक वृद्ध होते.त्यांनी संग्रहालयाच्या दयनीय स्थितीबद्दल माफी मागितली.असंख्य तोडक्या मोडक्या पुतळ्यांचे तुकडे तिथे पडून होते.कित्येक शिलालेख भग्न अवस्थेत कसेबसे तग धरून होते.संग्रहालयात पंखे नव्हते.खूप उकडत होतं.अमीरने एक-एक शिळा तपासायला सुरुवात केली.अखेरीस घामाने डबडबलेल्या स्थितीत त्यांनी पुतळ्यांच्या मागील बाजूस ठेवलेल्या शिलालेखांची तपासणी करायचं ठरवलं. इथे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तपासायचं ठरवलेल्या पहिल्याच शिलालेखावर के-१२७ क्रमांक होता.क्षणभर अमीर यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.एक मोठ्ठा तांबूस खडकाचा तुकडा होता तो. त्यावर ख्मेर लिपीत ६०५ हा आकडा कोरलेला होता.त्यातलं शून्य आपण पाहतो तसं गोलाकार नव्हतं.ते नुस्तंच एक टिंब होतं.मुख्य म्हणजे

तो आकडा आणि तो ज्या मजकुराचा भाग होता त्या मजकुराचं कसलंही नुकसान झालेलं नव्हतं.सर्व मजकूर आणि तो आकडा स्पष्ट दिसत होते.इतकी वर्षं शून्याचा शोध घेत फिरल्यावर आता ते सापडलं तर पुढे काय करावं.हे अमीरना सुचेना या शोधात त्यांना अनेकांची मदत झाली होती.कंबोडिय शासनातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सचिव हाब टच, स्लोन फाउंडेशन या दोघांनी तर त्यांचा भार खूपच हलका केला होता.आणि अखेरीस अमीर ॲक्झेल त्या ज्ञात आद्य शून्याजवळ उभे होते. पण इथेच त्यांच्या हातून एक चूक झाली.'मला आद्य शून्य सापडलंय' हे जगाला सांगायच्या आधी जी काळजी घ्यायला हवी ती त्यांनी घेतली नाही.


ते के-१२७ कडे भक्तिभावपूर्वक आदराने आणि विस्मयाने बघत असताना तिथे दोन इटालियन स्त्रिया आल्या.आपण जे शोधत होतो ते सापडल्याचा आनंद बोलून दाखवावा,

या हेतूने त्यांनी या महिलांना त्या शिळेबद्दल सांगितलं. त्यांच्यापैकी एकीने हातातली काठी त्या शिळेवर मारली. "हे सांगितलंत ते बरं केलंत.आम्ही अशीच एखादी शिळा शोधत होतो. पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थ्यांना पुरातन गोष्टी पूर्ववत कशा करायच्या याचं प्रशिक्षण द्यायचंय, त्यासाठी ही शिळा अगदी योग्य वाटते." अमीर त्या कल्पनेने हादरले इतका महत्त्वाचा शिलालेख शिकाऊ विद्यार्थ्यांच्या हाती पडणार,ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती.त्यांनी त्या महिलांना समजवायचा खूप प्रयत्न केला,पण व्यर्थ! शेवटी बँकॉकला परत येऊन अमीर ॲक्झेल यांनी कॅसलमनची मदत घेतली.त्या दोघांच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि पत्रापत्रीनंतर त्या महिलांनी 'के- १२७ ला हात लावणार नाही,'असं ई- मेलने अमीर यांना कळवलं.पुढेही अनेक प्रयत्न करून अमीर यांनी तो शिलालेख वाचवला.


एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की माणूस काय करू शकतो याचं दर्शन हे पुस्तक वाचताना होतंच,पण आकड्यांच्या इतिहासाचीही माहिती आपल्याला सहजगत्या मिळते.गणिताशी संबंध नसलेल्या व्यक्तीलाही हे पुस्तक गुंगवून टाकेल यात शंकाच नाही. 


२०.८.२३ या लेखातील शेवटचा भाग.. लेख संपला.