* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सायलेंट स्प्रिंग - रॅचेल कार्सन (१९६२)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/८/२३

सायलेंट स्प्रिंग - रॅचेल कार्सन (१९६२)

'सायलेंट स्प्रिंग' या रॅचेल कार्सन लिखित पुस्तकात निसर्गाच्या ढासळत चाललेल्या समतोलावर चर्चा करण्यात आली आहे.पृथ्वीवर असलेली माती,पाणी आणि जीवाणू यांच्यातले सहसंबंध आणि बिघाड यांबद्दल अत्यंत अभ्यासपूर्वक अशी मांडणी रॅचेल हिनं या पुस्तकात केली आहे.शेतीमध्ये वारेमाप वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर बंदी घालण्याची मागणी रॅचेलन सरकारकडे केली होती.निसर्गतज्ज्ञ डेव्हिड टनबरो यांच्या मते,'चार्ल्स डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पिशीज' नंतर हेच एकमेव असं पुस्तक आहे,की ज्यामुळे विज्ञान जगतात खळबळ माजली. '


१९६० च्या दशकात प्रगत देशांमध्ये हरित क्रांतीची एक लाट उसळली.शेतीतलं उत्पादन वाढावं यासाठी अनेक संशोधनं,अभ्यास होऊन नवनव्या गोष्टी शोधल्या गेल्या.

याच वेळी हायब्रिड बी-बियाणांचा देखील शोध लागला. तसंच पिकांवर कीड पडू नये यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचाही शोध लागला.यातच भर म्हणून आधुनिक तंत्रज्ञान यांच्या वापरानं शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळवायला सुरुवात झाली.या यशाचा आनंद साजरा करत असतानाच १९६२ च्या सप्टेंबर महिन्यामध्ये 'सायलेंट स्प्रिंग' नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं,या पुस्तकानं कृषी क्षेत्रात मिळत,असलेल्या तथाकथित यश वाटणाऱ्या कल्पनेला एक मोठा धक्का दिला आणि लोकांना खडबडून जागं केलं.संपूर्ण जगभर खळबळ माजवणाऱ्या 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाची लेखिका होती रॅचेल कार्सन ! 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकात असं सनसनाटी किंवा खळबळ माजवण्यासारखं होतं तरी काय? निसर्गाच्या ढासळत चाललेल्या समतोलावर या पुस्तकात चर्चा करण्यात आली होती.पृथ्वीवर असलेली माती,पाणी आणि जिवाणू यांच्यातले सहसंबंध आणि बिघाड याबद्दल अत्यंत अभ्यासपूर्वक अशी मांडणी रचेल हिन या पुस्तकात केली होती.शेतीमध्ये वारेमाप वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर बंदी घालण्याची मागणी रॅचलन सरकारकडे केली होती. रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांची फार मोठ्या प्रमाणात माणसाला किंमत मोजावी लागेल,असा इशारा तिनं या पुस्तकातून दिला होता.खरं तर ही गोष्ट काहीच काळात खरी ठरली.! 'सायलेंट स्प्रिंग' हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच वेळी अनेक कीटकनाशकांच्या कंपन्यांनी या पुस्तकाला विरोध दर्शवण्यासाठी त्यावर बंदी आणावी,अशी मागणी केली.या कंपन्यांच्या मालकांनी निदर्शनंदेखील केली पण त्यांच्या सगळ्या विरोधाला न जुमानता लोकांनी हे पुस्तक विकत घेतलं आणि या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली.या पुस्तकात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अनेक उदाहरणं दिल्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी या पुस्तकांवर आपलं परीक्षण लिहिलं आणि आपला पाठिंबा जाहीर केला. वैज्ञानिक क्षेत्रातून रॅचेलचं खूप कौतुकही करण्यात आलं. इतकंच नाही तर न्यायालयानंदेखील हे पुस्तक शास्त्रीयदृष्ट्या तपासून घेतलं.परिणामी अमेरिकन सरकारसोबतच अनेक देशांमधली सरकारं रॅचेलच्या बाजूनं उभी राहिली.डीडीटी आणि त्याचबरोबर इतर अनेक रसायनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.लहानपणापासूनच रॅचेल हिला पर्यावरणाबद्दल कळकळ आणि चिंता वाटत असे. २७ में १९०७ या दिवशी पेनसिल्व्हानिया इथे स्प्रिंगडेलजवळ रॅचेल हिचा रॉबर्ट कार्सन आणि मारिया या दांपत्याच्या पोटी जन्म झाला.रॉबर्ट कार्सन हा विमा एजंट होता. त्याचं वडिलोपार्जित असं ६५ एकरांचं शेतदेखील होतं.रॅचेलचा बराच वेळ आपल्या शेतात जायचा.तासन् तास झाडांकडे बघणं, पानफुलं न्याहाळणं तिला खूपच आवडत असे. निसर्गात रमत असताना तिला वाचनाचंही वेड लागल.

रॅचेल आठ वर्षांची असल्यापासून गोष्टी लिहायला लागली.वयाच्या १० व्या वर्षी तिचं पहिलं गोष्टींचं पुस्तक प्रकाशितदेखील झालं. लहान असताना रॅचेलला निकोलस मॅगेझिन,हरमन मेलविले आणि जोसेफ कोब्रॅड ही पुस्तकं वाचायला खूप आवडत.या पुस्तकांमुळेच आपल्याला लिहायची प्रेरणा मिळाली,असं रॅचेल नेहमीच म्हणत असे.रॅचेलचं हायस्कूल पर्यंतचं शिक्षण स्प्रिंगडेलच्या शाळेतच झालं.पेनसिल्व्हानिया इथे तिनं आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.पदवीचं शिक्षण घेत असताना प्रत्येक वर्षी रॅचेल पहिली आली. सुरुवातीला इंग्रजीचा अभ्यास करत असतानाच तिनं जीवशास्त्राचाही अभ्यास सुरू केला. हॉपकिन्स विद्यापीठात असताना पुढे तिनं प्राणिशास्त्र आणि आनुवंशशास्त्र यांचा अभ्यास सुरू केला.असं सगळं सुरू असताना त्याच वेळी रॅचेलच्या घरातली आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होत चालली होती. रॉबर्ट कार्सनचा व्यवसाय डबघाईला आला होता.तो ठप्पच झाला होता म्हटलं तरी चालेल.आईला वाढत्या वयामुळे काहीही करणं अशक्य झालं होतं आणि त्यातच शेतीतूनही उत्पन्न मिळेनासं झालं होतं. चहूबाजूंनी अशी कोंडी झाल्यामुळे रचलनं आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी एका लॅबोरेटरीमध्ये अर्धवेळ नोकरी करायला सुरुवात केली.१९३२ साली रॅचेलन प्राणिशास्त्रातली मास्टर डिग्री मिळवली.खरं तर तिला त्यानंतर डॉक्टरेटही मिळवायची होती;पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्यच नव्हतं.त्यातच तिला घरचा भार उचलणंही भाग होतं.अशा परिस्थितीत विद्यापीठात प्रवेश घेणं रॉवेलसाठी कठीण होतं.याच गोष्टीमुळे आता तिला नोकरीदेखील पूर्ण वेळ करायची पाळी आली. १९३५ साली रॅचेलच्या वडिलांचा मृत्यू झाला.आणि परिस्थिती आणखीनच हलाखीची बनली. रॅचेलच्या गाईड मेरी स्फिंकर यांच्या ओळखीनं रॅचेलला यू.एस.ब्युरो ऑफ फिशरीजमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचं काम मिळालं.रोमान्स अंडरवॉटर या आठवड्यातून एकदा प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी रॅचेलला कार्यक्रमासाठी स्क्रिप्ट लिहिण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. प्रत्येकी सात मिनिटांच्या अशा ५२ स्क्रिप्ट्स रॅचेलनं लिहिल्या.तिच्या या स्क्रिप्ट्समुळे हा कार्यक्रम प्रचंडच लोकप्रिय झाला.

त्यामुळे तिला आता तिथेच पूर्ण वेळ कामासाठी नेमण्यात आलं.तसंच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षांची तयारी करण्याचाही प्रस्ताव तिला दिला गेला.१९३६ साली रॅचेलन सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली.आणि ती चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाली.तसंच ब्यूरो ऑफ फिशरीजमध्ये पूर्ण वेळ ज्युनिअर ॲव्कँटिक बायॉलॉजिस्ट या पदावर काम करणारी ती दुसरी स्त्री होती.मत्स्यसंस्थांची संगतवार आकडेवारी ठेवणं, ब्रोशर बनवणं आणि समुद्री जीवनावर वर्तमानपत्रांमध्ये लिहिणं हेही त्याच वेळी रॅचलचं सुरू होतं.याच दरम्यान १९३७ साली आयुष्य स्थिरावत असताना आपल्या दोन लहान मुलींना मागे ठेवून रॅचेलची बहीण या जगातून कायमची निघून गेली.या दोन मुलींना सांभाळण्याची जबाबदारी आता रॅचेलवर येऊन पडली होती. याच वर्षी रॅचेलनं लिहिलेला 'द वर्ल्ड ऑफ वॉटर' हा निबंध 'टलांटिक मंथली' यात प्रकाशित झाला.त्या निबंधाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.या लेखात समुद्रतळाशी घडणाऱ्या घटना सविस्तरपणे चित्रांसह दिल्या होत्या.

रॅचेलच्या लिखाणाचा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा होता.हाच निबंध पुढे वाढवून 'अंडर द सी विंड' नावाच्या पुस्तकात १९४१ साली समाविष्ट करण्यात आला.


रॅचेलची लेखणी स्त्रियांना विशेष प्रेमात पाडणारी होती.त्यामुळे तिने लिहिलेले निबंध,पुस्तकं आणि लेख यांना स्त्रियांकडून भरभरून प्रतिसाद मिळत राहिला.

१९४५ साली डीडीटी या विषयानं रॅचेलच्या डोक्यात 

घर केलं.डीडीटीला त्या वेळी इन्सेक्ट बॉम्ब असं म्हटल जात असे. हिरोशिमा नागासाकी या शहरांवर झालेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर जगाला पहिल्यांदाच पर्यावरणीय चाचण्या वगैरे करायला हव्यात या गोष्टी सुचायला लागल्या.पर्यावरणाची हानी होईल असं दुष्कृत्य माणसाकडून होऊ नये.यासाठी निरनिराळे निर्बंध जगावर लादण्यात आले.या दरम्यान रॅचलला डीडीटी विषयावर काही लिखाण प्रसिद्ध करायचं होतं,पण प्रकाशकांना या विषयांत काडीचाही रस वाटत नव्हता.त्याच वेळी ब्युरो ऑफ फिशरीजमधलं तिचं स्थान बळकट होत चाललं होतं. १९४८ साली तर तिला कुठल्याही विषय निवडीचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. या आपण आपला पूर्ण वेळ लिखाणासाठी द्यायचा असं ठरवलं.ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं रॅचेलच्या समुद्री जीवनावरच्या लिखाणात रस दाखवला.त्यामुळेच १९५० साली 'द सी अराऊंड अस' हे रॅचेलचं पुस्तक प्रकाशित झालं.पुस्तक सतत ८६ आठवडे सर्वाधिक विक्रीचं पुस्तक ठरलं.शिवाय रॅचेलला नॅशनल बुक अवॉर्डनंही गौरवलं गेलं.तिनं या पुस्तकावर एक माहितीपट देखील बनवला.१९५३ साली या महितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.असं सगळं एकीकडे सुरू असताना रॅचितच्या डोक्यातून मात्र डीडीटीचा विषय काही केल्या जात नव्हता.अखेर तिनं त्यावर जोरात काम सुरू केलं.

त्या वेळी पिकांवर डीटी किंवा इतर कीटकनाशकांची फवारणी सर्रास केली जात असे आणि या गोष्टीला रॅचेलचा विरोध होता.तिच्या म्हणण्यानुसार हा वापर सरसकट असता कामा नये.कीटकांचा प्रकार,माती आणि पाणी यावर डीडीटीचा होणारा परिणाम यावर सखोल अभ्यास व्हायला हवा आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ठरावीक नियमावली करायला हवी,असं तिला वाटत होतं.यासाठी रॅचेलनं आपले वैयक्तिक संबंध वापरून अनेक कॉन्फिडेन्शिअल गोष्टी सरकार अखत्यारीत असलेल्या जाणून घेतल्या. तिच्या या डीडीटीच्या वापराच्या विरोधाला बायोडायनॅमिक ग्रिकल्चर गार्डनरी या संस्थेनं पाठिंबा दिला.ही संस्था सेंद्रिय पद्धतीनं शेती करण्यावर जोर देत होती.आणि या पद्धतीचा प्रसारही करत होती.या संस्थेकडूनही रॅचेलला

अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली.या माहितीला रॅचेल 'गोल्ड माइन ऑफ इन्फॉर्मेशन' म्हणजे सोन्याची खाण असंच म्हणते.तिच्या म्हणण्यानुसार 'सायलेंट स्प्रिंग' हे पुस्तक लिहिताना या माहितीचा खूपच उपयोग तिला झाला.त्यानंतर १९५७ ते १९५९ या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या अमेरिकेतल्या क्रेनबेरीजमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची मात्रा आढळून आली.या संदर्भात रॅचेलनं सरकारला 'सायलेन्सिंग ऑफ बर्ड' नावानं एक पत्र लिहिलं. कीटकनाशकांच्या वापरावर तिचं संशोधन सुरूच होतं.तिनं यात काम करणाऱ्या अनेक लोकांना भेटून बरीच माहिती गोळा केली होती.'पोस्ट वॉर अमेरिकन कल्चर' म्हणून ती या गोष्टींचा उल्लेख करत असे.

पेस्टिसाइड्स हे बायोसाइड्स आहेत. आणि ते आपल्या पर्यावरणाला संपवणारे किंवा पर्यावरणासाठी अतिशय घातक आहेत,असं तिचं म्हणणं होतं.यावर तिनं बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल (रसायनांशिवाय कीटकांना प्रतिबंध) असा उपायही सुचवला होता.रॅचेलनं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इथल्या विल्यम हूपर यांच्याशी संपर्क साधला आणि कीटकनाशक ही कॅन्सर निर्माण करणारी आहेत या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसंच तिनं याबाबत पुरावेही गोळा केले.तिनं आसपासच्या अनेक शेतकऱ्यांची भेट घेतली.अशा रीतीनं कीटक

नाशकांचा पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास रॅचेलनं जवळजवळ सहा ते सात वर्ष अविरतपणे केला आणि याचं फलित म्हणजे १९६२ साली तिचा हा सगळा अभ्यास 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाच्या रूपानं जगासमोर आला.


'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाचं शीर्षक कसं सुचलं हीदेखील एक विलक्षण गोष्ट आहे.


खरं तर रॅचेलच्या पक्ष्यांसंदर्भात प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाला हे नाव यापूर्वीच तिनं सुचवलं होतं;पण त्या वेळी काही कारणांनी हे नाव दिलंच गेलं नाही आणि मग १९६२ साली रॅचेलच्या मेरी रॉडेल नावाच्या एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर या पुस्तकाला ते पडून असलेलं नाव देण्यात आलं.या पुस्तकात प्राण्यांमध्ये अचानक दिसलेल्या लिव्हरच्या अनोळखी गाठींवरचं संशोधनही समाविष्ट करण्यात आलं होतं.संपूर्ण सजीव सृष्टीला उपकारक असलेलं हे संशोधन पुस्तकरूपानं अखेर सर्वसामान्य लोकांसमोर येऊ शकलं;पण काही समाजकंटकांनी आणि रासायनिक पदार्थांचे उद्योगधंदे असलेल्या लोकांनी या पुस्तकाला प्रचंड विरोध केला.या पुस्तकावर सडकून टीकाही केली.काही शास्त्रज्ञांनीही या टीकेमध्ये सहभाग घेतला.अशा सगळ्या टप्प्यांमधून जात डोळे उघडायला लावणारी,मनुष्यप्राण्याला खडबडून जागं व्हायला भाग पाडणारी, निसर्गाचा समतोल सांभाळायला हवा याची जाणीव करून देणारी आणि जगात सर्वप्रथम 'प्रदूषण' या मुद्द्याला हात घालणारी ही माहिती 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचली.या पुस्तकाचं सर्वात मोठं यश म्हणजे डीडीटीसह अनेक कीटकनाश-

कांवर प्रतिबंध ! हा प्रतिबंध झाला नसता,तर ७० ते ८० वर्षांमध्ये कदाचित संपूर्ण जीवसृष्टी उद्ध्वस्त झाली असती.समुद्री जीवशास्त्राचा अभ्यास करणारी एक स्त्री जैवरसायन शास्त्रावर आधारित पुस्तक लिहिते ही गोष्ट खूपच कौतुकास्पद होतं,तेही वैज्ञानिक दाखल्यांसह! या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की,शास्त्रीय विषय असूनही या पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि

रसाळ आहे.पुस्तक वाचताना वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद या पुस्तकात आहे. २००६ मध्ये जेव्हा सर्वेक्षण झालं तेव्हा जगातल्या पहिल्या २५ वैज्ञानिक पुस्तकांमध्ये 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाचं नामांकन झालं होतं.


अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि पर्यावरणतज्ज्ञ अल गोर यांनी म्हटलं होतं की, ...'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकानं खरी पर्यावरणीय चळवळ सुरू केली.माझ्यावर या पुस्तकाचा इतका प्रचंड पगडा आहे की,या पुस्तकामुळेच मी पर्यावरणाविषयी जास्तच सतर्क झालो आहे."


'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाचा समावेश २० व्या शतकातल्या पहिल्या १०० नॉन- फिक्शन पुस्तकांमध्ये केला गेला.निसर्गतज्ज्ञ डेव्हिड टनबरो यांनी,"चार्ल्स डार्विनच्या 'ओरिजिन ऑफ स्पीशीज' नंतर हेच एकमेव असं पुस्तक आहे की, ज्यामुळे विज्ञान जगतात खळबळ माजली.'


रॅचेल कार्सन हिचा स्वभाव खूपच शांत आणि सरळमार्गी होता.ज्या व्यक्ती रॅचेलच्या आयुष्यात आल्या,त्यांनी तिला शेवटपर्यंत साथ दिली. 


डोरोथी फ्रीमन ही रॅचेलची अतिशय जिवलग मैत्रीण होती.१९३३ साली एका उन्हाळ्यात दोघी जणी भेटल्या दोघींच्या आवडीनिवडी खूपच सारख्या होत्या.त्यांच्या बोलण्यात 'निसर्ग' हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असायचा.खरं तर दोघींचा प्रत्यक्ष संपर्क खूप कमी झाला;पण पत्रांद्वारे त्या सतत एकमेकींच्या संपर्कात असायच्या.या दोघींनी एकमेकींना जवळजवळ ९०० पत्रं लिहिली. 


"आभाळात मुक्तपणे विहार करण्यासाठी रॅचेलला एका समर्पित आणि निष्ठावान मैत्रिणीची आवश्यकता होती.आणि ती आवश्यकता डोरोथीनं पूर्ण केली,' असं रॅचेलचीचरित्रकार लिंडा लिअर हिनं लिहिलं होतं. 


डोरोथी आणि पॅचेल यांनी एकमेकींना लिहिलेली पत्रं पुढे डोरोथीच्या नातीनं १९९५ साली पुस्तकरूपात प्रकाशित केली.या पुस्तकाचं नाव 'रॅचेल: द लेटर ऑफ रॅचेल कार्सन अँड डोरोथी!' ही पत्रं म्हणजे दोन मैत्रिणींच्या निस्सीम मैत्रीचं द्योतक तर आहेच,पण जगासमोर मैत्रीचा एक आदर्शदेखील आहे.!


'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाचं काम सुरू असतानाच रॅचलला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं.त्यासाठी उपचार म्हणून तिनं रेडिएशन थेरपीदेखील घेतली.

कीटकनाशकांच्या वापरामुळे जीवसृष्टीला अपाय पोहोचू नये म्हणून, मनुष्यजातीत कॅन्सरचं प्रमाण वाढू नये म्हणून, प्राण्यांचा औषधांना रेझिस्टन्स वाढू नये म्हणून जिवाचं रान करणाऱ्या रॅचेललाच कॅन्सरनं ग्रासावं याला काय म्हणावं?


१९६४ साली रॅचेलला श्वसनमार्गाचा व्हायरल संसर्ग झाला. त्यामुळे तिची प्रकृती आणखीनच बिघडत गेली. त्यातच रेडिएशन्सच्या माऱ्यामुळे झालेल्या ॲनिमियामुळे तिची प्रकृती खालावतच गेली. अखेर १४ एप्रिल १९६५ या दिवशी रॅचेलनं तिच्या राहत्या घरातच आपला प्राण सोडला. तिच्या घराचं नावदेखील 'सायलेंट स्प्रिंग' असं होतं! तिच्या शरीराचं दहन करण्यात आलं आणि तिची अर्धी रक्षा तिच्या आईच्या दफनभूमी मेरीलँड रॉकविले इथे पुरण्यात आली,तर अर्धी रक्षा तिची मैत्रीण डोरोथीकडे पाठवण्यात आली. रॅचेलची उर्वरित रक्षा डोरोथीनं साऊथपोर्ट आयलँड इथे विखरून टाकली.निसर्गामध्ये परतून येण्यासाठी पुन्हा जणू निसर्गप्रेमी रॅचेल या निसर्गातच एकरूप झाली होती.!


निसर्गातील रहस्य आणि सौंदर्य यात जे रममाण होतात ते कधीच एकटे नसतात.- रॅचेल कार्सन 


१७ जुलै २०२३ या लेखमालेतील पुढील लेख