१९२५ सालची गोष्ट. नैनितालच्या चॅलेट थिएटरमध्ये चाललेल्या गिलबर्ट आणि सुलिव्हनच्या 'Yeomen of the Guard' या ऑपेराच्या मध्यंतरातच केव्हातरी मी या 'रुद्रप्रयागच्या नरभक्षक बिबळ्याबद्दल' निश्चित असं ऐकलं.तसं माझ्या कानावर आलं होतं की गढवालमध्ये एक नरभक्षक बिबळ्या हैदोस घालतोय,प्रेसमधले त्याबद्दलचे काही लेखही मी वाचले होते.पण मला कल्पना होती की गढवालमध्ये जवळजवळ चार हजार बंदुकांचे परवाने आहेत.आणि रुद्रप्रयागपासून फक्त सत्तर मैलांवर असलेल्या लँड्सडाऊनमध्ये शिकारी लोकही आहेत.साहजिकच मला वाटलं की ह्या बिबळ्याला 'बॅग' करण्यासाठी तिथे हौशानवशांच्या उड्या पडत असणार आणि अशा वेळी दुसऱ्या एखाद्या बाहेरच्या शिकाऱ्याचं स्वागत नक्कीच होणार नाही.
मध्यंतरात चॅलेट बारमध्ये मित्रांबरोबर मद्यपान घेत असताना मायकेल कीनला काही लोकांशी या विषयाबद्दल बोलताना आणि त्या बिबळ्याच्या शिकारीसाठी उद्युक्त करताना जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला जरा आश्चर्यच वाटलं.हा मायकेल कीन तेव्हा युनायटेड प्रॉव्हिन्सचा मुख्य सचिव होता.(आता आसामचा गव्हर्नर आहे) बाकीच्यांनी त्याला दिलेल्या प्रतिसादावरून त्याच्या आवाहनाचं काही फार उत्साहाने स्वागत झालं नसावं हे कळत होतं.त्यातला एक म्हणत होता."शंभर बळी घेणाऱ्या नरभक्षकाच्या मागे जायचं ? Not on your life?" दुसऱ्या दिवशी मी मायकेल कीनला भेटलो आणि आवश्यक ती माहिती घेतली.हा नरभक्षक नक्की कोणत्या भागात सक्रिय आहे ते तो सांगू शकत नव्हता.पण मी रुद्रप्रयागला जाऊन इबॉटसनशी संपर्क साधावा असं त्याचं म्हणणं पडलं.तिथून घरी आलो तर टेबलवर इबॉटसनचंच पत्र पडलं होतं.हा इबॉटसन आता 'सर विल्यम इबॉटसन' युनायटेड प्रॉव्हिन्सच्या गव्हर्नरचा सल्लागार - त्या वेळेला गढवालचा डेप्युटी कमिशनर म्हणून रूजू झाला होता.आणि त्या भागातल्या लोकांची नरभक्षकाच्या तावडीतून सुटका करणे ही त्याची पहिली जबाबदारी होती.ह्याच संदर्भात त्याने हे पत्र लिहिलं होतं.लवकरच माझी सर्व बांधाबांध झाली.आणि रानीखेत,आडबद्री,करणप्रयाग असा पायी प्रवास करत दहाव्या दिवशी मी नाग्रासू इथल्या इन्स्पेक्शन बंगल्यावर पोचलो. नैनितालहून निघताना मला माहीत नव्हतं की ह्या बंगल्यात राहण्यासाठी परमिट घेऊन जाणं आवश्यक आहे.तिथल्या केअरटेकरला परमिटशिवाय कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश असल्याने माझं सामान वाहणारे सहा गढवाली,माझा नोकर आणि मी,पुढचे दोन मैल रुद्रप्रयागचा रस्ता तुडवत निघालो.शेवटी मुक्कामाला त्यातल्या त्यात बरी अशी कॅम्पसाईट सापडली.माझी माणसं पाणी व काटक्या गोळा करण्यात गुंतलेली असताना आणि माझा नोकर चुलीसाठी योग्य दगड तसेच जागा शोधत असताना मी कुऱ्हाड उचलली आणि कुंपण घालण्यासाठी काढेरी झुडपं तोडायला गेलो.आम्हाला दहा मैल मागेच सांगितलं गेलं होतं की आम्ही नरभक्षकाच्या इलाख्यात प्रवेश केला आहे.स्वयंपाकासाठी जाळ
तयार केल्यानंतर थोड्याच वेळात एक अगदी व्याकुळ आवाजातील हाक आम्हाला दूर डोंगरावरील गावाच्या दिशेने आली.तो विचारत होता की, 'आम्ही यावेळेला उघड्यावर काय करतोय ?' जर आम्ही आहे तिथे राह्यलो तर आमच्यातला एक किंवा जास्ती नरभक्षकाकडून मारला जाईल असं त्याचं म्हणणं होतं.त्या बिचाऱ्याने इतकी साधी मदत करतानाही काही प्रमाणात धोका पत्करला होता.त्याची ती सूचना ऐकल्यावर माधोसिंग म्हणाला. (हा माधोसिंग तुम्हाला माझ्या 'मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ'मध्ये भेटला असेल) आपण इथेच थांबू या साहेब कारण आपल्या कंदिलात बऱ्यापैकी तेल आहे आणि तुमच्याकडे रायफल आहेच.' रात्रभर पुरेल इतकं रॉकेल आमच्याकडे निश्चित होतं कारण दुसऱ्या दिवशी उठल्यावरही कंदील जळत होता. माझी रायफलही माझ्या बेडवर होती पण आमचं काटेरी कुंपण तसं तकलादूच होतं आणि दहा दिवसांच्या चालीमुळे आम्ही खूप थकलो होतो. जर त्या रात्री आम्हाला बिबळ्याने तिथे भेट दिली असती तर त्याला अगदी सहज शिकार मिळाली असती.
दुसऱ्या दिवशी आम्ही रुद्रप्रयागला पोचलो आणि इबॉटसनने आदेश दिल्यानुसार त्याची माणसं मला भेटली.
रुद्रप्रयागमध्ये घालवलेल्या एकूण दहा आठवड्यांपैकी प्रत्येक दिवसाच्या माझ्या खटपटीचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न करणार नाही कारण एकतर इतक्या वर्षांनंतर मला इतका बारीकसारीक तपशील आठवणारही नाही आणि जरी मी लिहिलं तरी तुम्हाला कंटाळवाणं होईल.पण मला आलेले काही रोमांचकारी अनुभव मात्र मी तुम्हाला सांगणार आहे.कधी मी एकटा असताना तर कधी इबॉटसन बरोबर असताना पण हे सर्व सांगण्याअगोदर ज्या मुलखात या बिबळ्याने सतत आठ वर्ष धुमाकूळ घातला होता आणि जिथे मी त्याच्या मागावर दहा आठवडे फिरलो त्या मुलखाची थोडी कल्पना मात्र मला दिलीच पाहिजे.रुद्रप्रयागच्या पूर्वेकडचा पहाड चढून वर गेलात तर तुम्हाला या बिबळ्याचा वावर असलेल्या पाचशे चौ.मैलांचा बराच टापू नजरेखाली घालता येईल.या संपूर्ण प्रदेशामधून वाहणाऱ्या अलकनंदा नदीमुळे हा विभाग थोड्याफार प्रमाणात समान विभागला गेला आहे. करणप्रयाग सोडल्यानंतर अलकनंदा दक्षिणेकडे वळून रुद्रप्रयागला मिळते.इथेच तिचा वायव्येकडून येणाऱ्या मंदाकिनीशी संगम होतो. ह्या दोन नद्यांमधला त्रिकोणी प्रदेश हा अलकनंदाच्या डाव्या तीरावरच्या प्रदेशाच्या मानाने कमी चढउताराचा आहे.त्यामुळे साहजिकच त्यात डाव्या तीरापेक्षा जास्त गावं वसली आहेत.तुमच्या उंचावरच्या जागेवरून तुम्हाला जी काही लागवडीखालची जमीन दिसते आहे ती पहाडाच्या अंगावर काढलेल्या आडव्या समांतर रेषांच्या स्वरुपात दिसेल.ही 'टेरेस फील्डस' किंवा 'सोपानशेती' किंवा डोंगरशेती आहे व ती डोंगरउतारावर पायऱ्यांसारखी दिसते.ही शेतं काही ठिकाणी एक ते दोन यार्ड तर काही ठिकाणी पन्नास ते साठ यार्ड रुंद आहेत.इथे शेतांना कुंपणं घातलेली नाहीत.त्यामुळे या डोंगरउतारावरून शेतांवर देखरेख करण्यास सोपं जावं म्हणून इथल्या घरांच्या इमारती शेतांच्या वरच्या भागात दिसतील.हे सर्व निसर्गचित्र तपकिरी आणि हिरव्या पट्ट्यांनी रंगवल्यासारखं वाटतं.तपकिरी पट्टे म्हणजे गवताळ भाग आहे तर हिरवे पट्टे जंगलाचे.नीट बघितलंत तर असं दिसेल की काही गावं गवताळ प्रदेशांनी वेढली आहेत तर काही जंगलांनी.सर्व प्रदेश अतिशय ओबडधोबड आणि रांगडा आहे.तसंच तो असंख्य छोट्या मोठ्या घळींनी आणि कड्यांनी आडवा उभा कातरला गेल्यासारखा वाटतो. एवढ्या मोठ्या प्रदेशात रस्ते असे फक्त दोनच दिसतील;
एक रूद्रप्रयागपासून सुरू होऊन केदारनाथला जाणारा व दुसरा केदारनाथ ते बद्रीनाथ प्रमुख यात्रामार्ग.ज्या काळाच्या संदर्भात मी ही गोष्ट सांगतोय त्या वेळेपर्यंत हे रस्तेसुद्धा अतिशय खडबडीत,अरूंद होते आणि कोणत्याही प्रकारचं 'चाक' त्यावरून गेलं नव्हतं.
हे सर्व पाह्यल्यानंतर साहजिकच आपल्याला असं वाटेल की जंगलांनी वेढलेल्या गावांमध्ये जास्त बळी गेले असणार.हा नरभक्षक 'वाघ' असता तर तुम्ही म्हणता तसंच झालं असतं पण हा बिबळ्या होता.संपूर्णपणे निशाचर असल्याने लपायला जंगल असणे किंवा नसणे याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही.त्यामुळे एखाद्याच गावात जास्त बळी का किंवा दुसऱ्या ठिकाणी कमी का याचं कारण म्हणजे पहिल्या बाबतीत निष्काळजीपणा व दुसऱ्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे.
मी मागे सांगितलंच आहे की हा बिबळ्या बऱ्याच मोठ्या आकाराचा नर बिबळ्या होता आणि वयाने प्रौढ असला तरीही प्रचंड ताकदवान होता.आपलं भक्ष्य एखाद्या लांबच्या ठिकाणी वाहून नेण्याच्या एखाद्या बिबळ्याच्या क्षमतेवर, त्याने शिकार कोठे करायची हे अवलंबून असतं. अगदी वजनदार माणसाचा मृतदेहसुद्धा मैलोनमैल वाहून नेण्याच्या या नरभक्षकाच्या क्षमतेमुळे त्याच्यासाठी सर्व जागा सारख्याच होत्या.एका प्रसंगात तर त्याने भक्ष्य चार मैल ओढून नेलं होतं.यावेळी त्याने एक प्रौढ माणूस त्याच्या घरात ठार मारला होता आणि त्यानंतर २ मैलाची अत्यंत उभी चढण चढून पलीकडे २ मैलांचा उतार उतरून झुडपी जंगलात घेऊन गेला होता.खरंतर ही शिकार मध्यरात्रीच्या आसपास झाली होती आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत पाठलागही झाला नव्हता.त्यामुळे वरकरणी तरी इतकं लांब जायचं कारण नव्हतं.
नरभक्षक बिबळ्याचा अपवाद वगळता बिबळ्याची शिकार करणं हे इतर जनावरांपेक्षा तसं सोपं आहे.कारण त्यांना गंधज्ञान फार कमी असतं.कोणत्याही इतर जनावरांपेक्षा बिबळ्याला मारण्यासाठी जास्त क्लृप्त्या लढवल्या जातात.ही शिकार फक्त पैशासाठी केली जातेय की 'ट्रॉफी'साठी यावर या पद्धती ठरतात. शिकारीच्या आनंदासाठी शिकार करायची असेल तर सर्वात रोमांचकारी अनुभव म्हणजे जंगलात त्याचा माग काढून ठावठिकाणा शोधणे,त्यानंतर दबा धरून जास्तीत जास्त जवळ जाणे आणि शूट करणे.सर्वात सोपी आणि क्रूर पद्धत म्हणजे त्याने मारलेल्या जनावराच्या शरीरात स्फोटक बॉम्ब पेरून ठेवणे.हल्ली बरेच खेडूत लोक असे बॉम्ब बनवायला शिकले आहेत.ह्या बॉम्बला बिबळ्याच्या दाताचा स्पर्श झाला की तो फुटतो व त्याच्या जबड्याच्या चिंधड्या उडतात.जर ताबडतोब मृत्यू आला तर नशीब,
पण बऱ्याच वेळा ते मुकं जनावर रखडत,वेदनामय जीवन जगतं कारण असल्या भेकड पद्धती वापरणारे लोकही भेकडच असतात आणि जखमी जनावराला शोधून त्याला वेदनामुक्त करण्याचं धैर्य त्यांच्यात नसतं.
बिबळ्यांचा माग काढणे,त्याचा ठावठिकाणा शोधणे आणि शिकार करणे हे जितकं रोमांचकारी आहे तितकंच सोपंही आहे कारण त्यांच्या पावलांच्या गाद्या मऊ असल्याने,ते शक्यतो पाऊलवाटांवरूनच फिरतात.त्याचा ठावठिकाणा शोधणं पण फार अवघड नाही कारण जंगलातला जवळजवळ प्रत्येक पक्षी व प्राणी आपल्याला त्यासाठी मदत करत असतो. दबा धरून त्याच्याजवळ जाण्यात फार अडचण येत नाही कारण त्याला तीक्ष्ण नजर आणि श्रवणशक्तीचं वरदान असलं तरी गंधज्ञान नसल्याने तो कमी पडतो.त्यामुळे वारा कुठून वाहतो आहे याचा विचार न करता शिकारी त्याला योग्य वाटेल त्या दिशेने त्याच्या जवळ जाऊ शकतो.
एकदा हे सर्व जमलं तर रायफलचा ट्रीगर दाबण्यापेक्षा कॅमेराचं बटन दाबल्याने जास्त निखळ आनंद मिळू शकतो.बिबळ्याचं तासन् तास निरीक्षण करण्यात मजा आहे.कारण आपल्या जंगलात त्याच्यासारखं रुबाबदार जनावर दुसरं कोणतंही नाही.आपल्या मर्जीनुसार कॅमेराचं बटन दाबून आपण कायमस्वरूपी स्मृतिचिन्ह ठेवू शकतो आणि त्याची मजा कधीच कमी होत नाही.शिकारीच्या बाबतीत तसं नाही.त्याची एक क्षणभरच झलक आणि नंतर रायफलचा ट्रीगर दाबणे.जर नेम अचूक असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त एखादी ट्रॉफी किंवा विजयचिन्ह मिळू शकते की जिचा ताजेपणा लवकरच नष्ट होणार असतो.
२९ जुलै २०२३ या लेखातील पुढील भाग