लिंकनने मोठेपणा कसा मिळवला,हे पाहणेच मोठे कौतुकाचे आहे.पण टॉलस्टॉयने आपला मोठेपणा कसा फेकून दिला.त्याचा कसा त्याग केला हे पाहणे अधिक कौतुकाचे आहे.
लिंकन धीरोदात्त धैर्यामुळे श्रेष्ठ पुरुष झाला,तर टॉलस्टॉय आपल्या अनंत प्रेमामुळे व सौजन्यामुळे आपले प्रतिष्ठित स्थान सोडून बहुजन समाजात जाऊन बसला.
बुद्धाप्रमाणेच टॉलस्टॉयही मोठ्या व श्रीमंत सरदार घराण्यात जन्मला होता.त्याच्या पूर्वजांपैकी एक जण पीटर दि ग्रेटचा मित्र होता.तो यास्नाया पोलिआना (म्हणजे प्रकाशमय दरी) येथे १८२८ साली जन्मला. वयाच्या दुसऱ्या वर्षी त्याची आई वारली,नवव्या वर्षी वडील वारले.त्याला दोन भाऊ होते व दोन बहिणी होत्या.
ही सारी भावंडे दूरच्या एका आत्याच्या ताब्यात देण्यात आली.तिचे नाव टाशिआना. तिच्या ठायी अत्यंत थोर असे दोन सद्गुण होते.प्रेम व गांभीर्यवृत्ती हे सुध्दा मोठ्या प्रमाणात होते.येणाऱ्या-जाणाऱ्या भोळसट यात्रेकरूंशी फार एकरूप होण्याचा दुबळेपणाही तिच्या ठायी होता.ती त्यांना साधुसंत मानी,गूढवादी मानी.
हे यात्रेकरू अनेक गोष्टी सांगत.टॉलस्टॉयच्या मनावर या गोष्टींचा खूप परिणाम होई.त्याला लागलेली अध्यात्म
ज्ञानाची गोडी कधीही सुटली नाही.तो दिवसाढवळ्याही जणू स्वप्नात रमे,गूढ चिंतनात मग्न होई! त्याच्या या वृत्तीमुळे त्याची तीव्र बुद्धी कधीकधी झाकोळली जाई.तो एकोणिसाव्या शतकातला अतिश्रेष्ठ महामती होता.पण त्याच्या गूढ गुंजनामुळे त्याच्या मतीचे तेज कमी होई.तो शाळेत मथ्थड होता.शाळेतील शिक्षक तो व त्याचे दोन भाऊ यांच्याविषयी नेहमी म्हणत की, 'सर्जियसच्या ठायी खूप काम करण्याची इच्छा आहे व कर्तबगारी आहे. डिमिटीला करण्याची इच्छा आहे.पण क्षमता नाही व लिओला काही करण्याची इच्छाही नाही व पात्रताही नाही!' पण जीवनाविषयी त्याची सहसा फारशी कोठे न आढळणारी अत्यंत गंभीर दृष्टी होती.वयाच्या पाचव्या वर्षीच तो अशा निर्णयाला आला की, 'जीवन करमणुकीसाठी नव्हे; तर फार मोठ्या जबाबदारीसाठी मिळालेले आहे.' वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याची सनातन धर्मावरची श्रद्धा उडाली व त्याने तात्त्विक परिभ्रमण सुरू केले.तारुण्याच्या वनातून तो तत्त्वज्ञानासाठी हिंडत-फिरत होता.प्रयोग करीत होता.मूळच्या धार्मिक श्रद्धेतून तो अज्ञेयवादाकडे गेला व अज्ञेयवादातून बौद्धिक शून्यवादाला पोहोचला.(कशावरच त्याची श्रद्धा राहिली नाही.) शेवटी तो निराश झाला. तेव्हा त्याचे वय एकोणीस वर्षांचे होते.
तो दिसण्यास कुरूप होता.त्यामुळे त्याला असमाधान वाटे.त्याच्या दुःखाचे हेही एक कारण होते.लोकांनी आपले कौतुक करावे,आपली वाहवा करावी असे त्याला फार वाटे.तो आपल्या डायरीत लिहितो, 'मी सर्वांना माहीत व्हावा, सर्वांनी मजवर प्रेम करावे, असे मला नेहमी वाटे.' पण आपणासारख्या सौंदर्यहीनास जगात सुख लाभणे शक्य नाही हे तो जाणून होता. त्याचे तोंड खरोखरच गोरिलाच्या तोंडासारखे होते.बारीक खोल गेलेले डोळे,
आत गेलेले खोल कपाळ,जाड ओठ,भले मोठे नाक,
लांबलचक व मोठे कान अशी त्याची मूर्ती होती.त्याचे शरीर कॅलिबन नावाच्या भूताचे होते.. पण त्या शरीरातील मन एरीअलच्या मनासारखे दैवी होते. आपण कुरूप असल्याची जाणीव नष्ट व्हावी म्हणून त्याने आत्महत्या करण्याचेही ठरवले.पण सुदैवाने त्याचे मन पालटले व स्वच्छंदपणे विलासी जीवन कंठून विरंगुळा मिळवण्यासाठी तो निघाला.मृत्यूने कायमची विस्मृती मिळवण्याऐवजी सुखविलासाने तो आपणास तात्पुरती विस्मृती पाडू इच्छीत होता.
आणि असे चालले असता,एके दिवशी रूसो त्याच्या हातात आला.त्याला रूसोचा शोध लागला.हा शोध म्हणजे त्याला त्या वेळी अत्यंत आवश्यक असे टॉनिकच होते.रूसो भेटल्यावर स्वतःच्या कुरूपतेबाबत त्याला दुःख वाटेनासे झाले व निसर्गाच्या सौंदर्याकडे त्याची दृष्टी वळली.चर्चच्या धर्माचा त्याग करून तो रूसोच्या धर्माचा उपासक झाला.टॉलस्टॉय रूसोची देवाप्रमाणे पूजा करू लागला.रूसोची लहानशी प्रतिमा करून साधूसंतांच्या मूर्तीप्रमाणे तो ती गळ्यात घालू लागला.रूसोच्या तत्त्वज्ञानाने संस्फूर्त होऊन त्याने 'रशियन जमीनदार' ही आपली पहिली कादंबरी लिहिली.त्याला जन्मभर पुरून उरलेला प्रश्नच त्याने या कादंबरीत मांडला आहे.थोर प्रेषितांचे ध्येय व बहुजन समाजाची त्याबाबतची उदासीनता हा तो प्रश्न होय. नेखलडोव्ह नामक एक बडा जमीनदार या कादंबरीचा नायक आहे.तो विद्यापीठातील शिक्षण सोडून शेतकऱ्यांच्या साह्यासाठी म्हणून जातो.. पण हे सारे शेतकरी कर्तृत्वहीन अशा सर्वसाधारण लोकांप्रमाणेच असतात.ते स्वतः काहीच करू शकत नाहीत.'आपले नशीब' असे म्हणत ते पडून राहतात व आपल्या चाकोरीतून बाहेर पडण्याची इच्छाच त्यांना होत नाही. आपणास झोडपणारा धनी ते जाणू शकतात. पण दया दाखवणाऱ्या धन्याशी कसे वागायचे,हे त्यांना समजत नाही.असला कसला हा मालक?' असेच जणू त्यांना वाटत असते.हे त्याच्यापासून दूर राहतात. 'असा कसा हा बावळट?' असे म्हणून त्याची थट्टा,टिंगल करतात.त्याने देऊ केलेल्या मदतीकडे ते साशंकतेने पाहतात.त्याच्याकडे ते फसव्या,लफंग्या,हेरगिरी करणारा, दुष्ट,शठ,मूर्ख अशा अनेक दृष्टींनी पाहतात.पण आपला मित्र होऊ पाहणारा,
आपला मित्र होण्यासाठी धडपडणारा हा धनी आहे,हे त्यांच्या ध्यानात येत नाही.नेखलडोव्ह निराश होतो. तो पियानो वाजवत बसतो;पण त्याला संगीताची देणगी नसते.त्याच्या बोटांना जे गाणे वाजविता येत नाही ते त्याची प्रतिमा,त्याची कल्पनाशक्ती शब्दांत गुंफते.तो संगीत ऐकतो.अनेक भूतकालीन व भविष्यकालीन संमीलित ध्वनी एकमेकांत मिसळून जातात.त्याचे स्वप्न पूर्ण होते,विजयाने नटते.तो आपल्या मनःचक्षूसमोर स्वप्नसृष्टीत ते शेतकरी पाहतो.
त्यांची ती दुर्दशा व त्यांचे ते भिकारडे जीवनच त्याला दिसते असे नव्हे,तर त्या शेतकऱ्यांतील प्रेमळपणाही त्याला दिसतो.किती सुंदर व साधे ते जीवन ! शेतकऱ्यांतील जे जे चांगले, ते ते त्याच्या दृष्टीला दिसते.त्या शेतकऱ्यांच्या अज्ञानाची,आळसाची,
हट्टीपणाची,दंभाची व अविश्वासाची तो त्यांना क्षमा करतो.कारण,तो आता त्यांच्याकडे पाहत नसून त्यांच्या आत पाहतो.जणू त्यांच्या जीवनात, हृदयात शिरतो.त्यांच्या हालअपेष्टा,त्याची अनंत सहनशक्ती,त्यांचा आनंद,दया,उत्साह,जे-जे नशिबी असेल, ते-ते जीवनात शांतपणे स्वीकारणे,मृत्यूसमोरही धैर्याने व शांतपणे उभे राहणे हे सारे आता त्याला दिसू लागते.तो गुणगुणतो "खरोखरच सुंदर आहे हे शेतकऱ्यांचे सरळ,निर्दोष व निष्पाप जीवन! किती साधे व किती गोड,किती सेवामय व किती कर्ममय !" त्याने देऊ केलेली मदत ते नाकारीत. त्यामुळे त्याला वाईट वाटे.पण आता त्याला सारे समजू लागले व समजू लागल्यामुळे त्याला सहानुभूतीही वाटू लागली.कारण ते सारे भाऊच होते.तो व ते शेतकरी एकरूपच होते. एकाच हाडामांसाचे,एकाच रक्ताचे,निर्दय भवितव्यतेच्या प्रहाराखाली जगणारे,
श्रमणारे, मरणारे असेच ते सारे अगतिक जीव नव्हते का? भवितव्यताच मालक,तीच जमीनदार! हे दैव सर्वांना नाचवीत आहे,रडवीत आहे,नष्ट करीत आहे.सारेच दैवाच्या हाती ! सारेच दैवाचे दास !!
१८५१ साली टॉलस्टॉय पैसे उधळून बसला होता.
सावकारांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो कॉकेशसमध्ये पळून गेला व सैन्यात दाखल झाला.त्याचा भाऊ आधीच तिथे अंमलदार झाला होता.एकोणिसाव्या वर्षी तो आत्महत्या करू इच्छित होता.पण आता तेविसाव्या वर्षी तो जीवनावर पूर्ण भरवसा ठेवणारा झाला होता.तो जीवनाला मिठी मारून बसला होता.
तात्त्विक संशय पिशाचे त्याने पिटाळून लावली.मानगुटीला बसणारी पापाची भीती त्याने झुगारून दिली.तो पुन्हा एकदा गूढवादात व सुंदर स्त्रियांत रमू लागला.तरुण फौस्टप्रमाणे तो जगात वावरू लागतो,जगाला नाकारण्याऐवजी त्याचे स्वागत करतो.हे जग एकंदरीत बरे व करमणूक करणारे खेळणे आहे,असे त्याला वाटू लागते. सुखात भर घालणारा प्रत्येक अनुभव त्याला चांगला वाटू लागतो. आपल्या 'कोसॅक्स' या कादंबरीत तो लिहितो,'काहीही वाईट नसते.एखाद्या सुंदर मुलीच्या संगतीत करमणूक करून घेण्यात काय पाप आहे? उलट,ते आरोग्याचे निकोप आणि निरोगी प्रकृतीचे लक्षण होय.'पर्वतांच्या सौंदर्यात तो रंगला,तन्मय झाला.तो लढला व जुगार खेळला.त्याने प्रेमप्रकारही केले आणि अत्यंत काव्यमय;पण यथार्थदर्शन घडवणाऱ्या अप्रतिम कादंबऱ्या त्याने लिहिल्या.त्याने नानाविध साहित्य निर्माण केले बाल्यातील गोष्टी,मुलांच्या गोष्टी,युद्धातील कथा,कोसॅक्स लोकांवरील कादंबऱ्या,निबंध,पत्रे असा प्रचंड वाङ्मयप्रवाह त्याच्या बहुप्रसव,प्रतापी व प्रतिभासंपन्न लेखणीतून जोराने व भव्यतेने वाहू लागला.वाङ्मयातच विलीन होऊ लागल्यामुळे लष्करी कर्तव्यात व शिस्तीत त्याचे नीट लक्ष नसे.तो निर्मितीचा भक्त होता.
विनाशाचा नव्हता,जरी त्याला अद्यापि लष्करी गणवेशाचा अभिमान वाटत होता.जरी ती सुंदर पदके व चकचकीत बटणे त्याला आवडत,तरी युद्धाचे खरे स्वरूप त्याच्या लक्षात येऊ लागले होते. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्याने 'स्वारी' ही कादंबरी लिहिली लष्करशाहीविरुद्ध त्याने केलेली ही पहिली निर्भय घोषणा.तीत तो लिहितो, 'या जगात शांततेने राहणे अशक्यच आहे काय? हे जग किती सुंदर आहे! बर अनंत तारांकित आकाश! असे सुंदर आकाश व अशी रमणीय धरणी यांच्यामध्ये राहून या मानवांच्या मनात द्वेष व मत्सर राहतात तरी कसे? निसर्गाचा स्पर्श होताच खरोखरी मानवी हृदयातील सारी दुष्टता,सारी कटुता,वितळून जावी,अदृश्य व्हावी,'सत्यं शिवं सुंदरम'चे अत्यंत जवळचे रूप,त्याचा साक्षात्कार म्हणजे हे निसर्ग-दर्शन होय.त्याने आपण स्वतः नको का प्रेमळ व सुंदर व्हायला- निष्पाप व्हायला?'
अद्यापि त्याने प्रत्यक्ष युद्ध पाहिले नव्हते. लुटुपुटीच्या लढाया व हालचालीच त्याने पाहिल्या होत्या.युद्धाचे प्रतिबिंब,युद्धाची नक्कल त्याने पाहिली असली तरी अस्सल युद्ध त्याने पाहिले नव्हते.ते पाहण्याची वेळ
आली.१८५३ साली रशियाने तुर्कस्तानविरुद्ध युद्ध पुकारले, 'झारच्या महान वैभवासाठी तुम्हीही आपणास करता येईल ते थोडेफार करा.' असे टॉलस्टॉयला सांगण्यात आले.प्रथम देशभक्तीच्या भावनेने तोही वाहवून गेला.इतर रशियन तरुणां-
प्रमाणे तोही एकदम भीषण झाला, क्रूर झाला. त्याच्यावरून जणू एक प्रकारची रानटी; पण धार्मिक उत्साहाची लाटच गेली! बालपणीच्या गूढगुंजनाकडे तो पुन्हा वळला.तो तुकांना मारीत होता व ईश्वराशी बोलत होता.रशियनांवर ईश्वराची कृपा होती व तुर्कावर त्याचा कोप होता.यासाठी तो ईश्वराची प्रार्थना करी,प्रभूचे आभार मानी.संकटकाळी देवाने आपले प्राण वाचवले म्हणून तर तो फारच कृतज्ञता प्रकट करी.युद्धाच्या ऐन गर्दीतही काहीतरी मोठ्या कामासाठी ईश्वर आपणास वाचवीत आहे,असे त्याला वाटे. सा गूढ अनुभव त्याला येई.
१८५५ सालच्या मार्चच्या पाचव्या तारखेस तो डायरीत लिहितो -
'एक महान विचार माझ्या मनात आला आहे.त्या विचाराच्या साक्षात्कारार्थ मी आपले सारे जीवन देईन असे मला वाटते. मी आपले जीवन त्या ध्येयार्थ देऊ शकेन. कोणता हा विचार? कोणते हे नवीन ध्येय? नव्या धर्माचा पाया घालण्याचा विचार मला स्फुरला आहे...'
कोणता हा धर्म? अप्रतिकाराचा,आंतरराष्ट्रीय बंधुतेचा,
शांततेचा.पण हा महान विचार मनात डोकावत असताच एकीकडे तो तुर्वांना कंठस्नान घालीत होता.कारण झारची तशी आज्ञा होती. पण लवकरच त्याला या खाटिकखान्याचा वीट आला.क्रिमियन युद्धाच्या काळात त्याने तीन पुस्तके लिहिली.पहिले देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आहे.दुसऱ्यांत 'मानवा'ने एकमेकांचा संहार करण्याबाबत तो लिहितो.
पण तिसऱ्याच्या प्रस्तावनेत आपल्या प्रजेला तोफांचा चारा करणाऱ्या शास्त्यांचा त्याने धिक्कार केला आहे. तो युद्धाकडे जितके-जितके अधिक पाहत राहिला,तितके-तितके युद्धाचे अधिक यथार्थ दर्शन त्याला झाले.
उर्वरित राहिलेला भाग ०६.०५.२४ या पुढील लेखमालेत..