* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: राणी : एक माकडीन Queen: A monkey

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३०/५/२४

राणी : एक माकडीन Queen: A monkey

एकदा जवळच्या दुर्गा टेकडीवर तिथल्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरता पिंजरा बांधून त्यात माकडाची जोडी कुठून तरी पैदा करून ठेवली होती.ती बॉनट जातीची माकडं होती.

ही माकडं महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील राज्यां-

मधेही आढळतात.ही मंडळी शाकाहारी असली तरी कधी कधी कोळी,कोळ्यांची जाळी आणि काही कीटकही आनंदाने गट्टम करतात.दुर्गा टेकडीवर फिरायला येणारे नागरिक या माकडांना केळी, सफरचंदं वगैरे खायला घालत.तिथले कर्मचारीही कधी कधी पपई,अंजीर अशी चविष्ट फळं आवर्जून माकडांसाठी आणत.टेकडीवर दिवसा माणसांची जाग असे,पण रात्री मात्र माकडं त्या पिंजऱ्यात एकटीच असत.


एका रात्री गावभर भटकणाऱ्या रानटी कुत्र्यांनी त्यांच्या जबड्यांनी त्या तकलादू पिंजऱ्याच्या जाळ्या तोडून टाकल्या आणि त्या निष्पाप माकडांवर हल्ला चढवला.

त्या रानटी हल्ल्यामधे नराचा जागीच मृत्यू झाला.मादीही गंभीर जखमी झाली.सकाळी निरोप मिळाल्या मिळाल्या आम्ही टेकडीवर जाऊन पोहोचलो.माकडिणीची अवस्था पाहून काळजात चर्र झालं.उजव्या हाताच्या जागी फक्त हाड शिल्लक राहिलं होतं. कुत्र्यांनी तिचा हात पिंजऱ्या

बाहेर ओढून त्याभोवतीच्या मांस आणि कातडीचा फडशा पाडला होता.खूप रक्त गेलं होतं;पण कशी कोण जाणे,ती अजूनही जिवंत होती.त्या वेळी तिथे कामावर असलेल्या आलेल्या गोरख नेवाळेने तिला हलकेच पोत्यामध्ये गुंडाळलं आणि स्कूटरवर माझ्या मागे बसला.पार्कवर आल्यावर त्या मादीला खाली झोपवून नीट तपासलं. खांद्याच्या सांध्यातून हाड मोकळं झालं. ताबडतोब औंधच्या सरकारी दवाखान्याचे प्राण्यांचे डॉक्टर सोनटक्के यांना बोलावणं पाठवलं.तेही तातडीने आले.अँटिबायोटिक्स, इंजेक्शनं,गोळ्या,ड्रेसिंग सगळं यथासांग पार पडलं.दोन दिवस तिला सलाइनवर ठेवलं.त्या वेळी आमच्याकडे नारायण शिंदे नावाचा वैदू समाजातला वॉचमन कामावर होता.त्यालाही जडी-बुटीची बऱ्यापैकी जाण होती.त्याने मावळातल्या जंगलातून शोधून आणलेल्या कुठल्या तरी औषधी झाडपाल्याचा लेप बनवून तिच्या हाताला लावला.पहिले दोन दिवस ती जगते की वाचते याची खात्री नव्हती.नेवाळे दिवसरात्र तिच्यासोबत बसून होता.


सोयरे वनचरे-अनिल खैरे-राणी : आमच्या मर्कट परिवारातली आद्य स्त्री-समकालीन प्रकाशन


पण तिसऱ्या दिवशी सकाळी ती आपणहून उठली.

नेवाळेने तिला एक केळं सोलून दिलं,ते तिने अधाशीपणे खाल्लं.आम्हाला खूपच आनंद झाला.एवढ्या जीवघेण्या हल्ल्यानंतरही ही माकडीण बचावली होती.तिच्या जीवावरचा धोका टळला होता.तीन-चार आठवड्यांत राणीच्या खांद्याची जखम पूर्णपणे भरून आली. अंगात शक्ती यायला आणखी बराच वेळ लागला.जीवघेण्या हल्ल्यानंतर एक हात कायमचा गमावूनही ती आश्चर्यकारकरीत्या पूर्ण बरी झाली.तिचं नाव आम्ही राणी ठेवलं.दुर्गा टेकडीवरच्या प्रस्तावित पण नंतर रद्द झालेल्या प्राणिसंग्रहालयासाठी तयार केलेले चार-पाच ट्रान्झिट केज,चार चाकं असलेले एखादा प्राणी मावेल असे पिंजरे आमच्याकडे पडून होते.त्यातले दोन पिंजरे जोडून आम्ही राणीसाठी पिंजरा तयार केला.त्या पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला आणखी एक पिंजरा जोडून फीडिंग केज बनवला.राणी एकटीच असल्यामुळे तिचा वेळ कसा जाणार हा प्रश्न होता.त्यामुळे मोठ्या पिंजऱ्यामधे तिच्यासाठी मोटरसायकलच्या टायरचा झोका बांधला.राणीचा दिवसभराचा वेळ झोक्यावरच जात असे.सकाळ-संध्याकाळ तिला थोड्या वेळासाठी पिंजऱ्याबाहेर काढत असू.संपत पुलावळे नावाचा हुशार कर्मचारी पिंजरा झाडून स्वच्छ करण्याचं,तिच्या खाण्यापिण्याचं काम मन लावून करत असे.


पिंजऱ्यामधे एकटी-दुकटी राहणारी माकडं लवकरच कंटाळतात.त्यांना सतत एंगेज ठेवणं गरजेचं असतं.

राणीला विरंगुळा म्हणून आम्ही सुरुवातीला एक भला मोठा ओंडका पिंजऱ्यातल्या एका कोपऱ्यात उभा केला.तो ओंडका तिथे का ठेवलाय हे तिला बरोबर कळलं.तिने त्या ओंडक्यावर आपली शिल्पकला सुरू केली.दिवसभर आपल्या दातांनी ती ओंडका कुरतडत बसे.ती काय करते याची आम्हाला उत्सुकता होती.

थोड्याच दिवसांत तिने त्या ओंडक्याच्या मध्य भागात स्वतःला बसण्याजोगी खोबणी तयार केली.त्यानंतर रोज रात्री ती त्या खोबणीमधे जाऊन झोपत असे. तिच्याइतकं क्रिएटिव्ह माकड मी आजवर पाहिलेलं नाही.राणीच्या खांद्याची जखम बऱ्यापैकी भरत आली होती. 


एखादा अवयव गमावल्यानंतर माणसाला जसा फँटम लिम्बचा त्रास होतो,तसाच प्राण्यांनाही. आपला एक हात आता नाही,हे विसरायला होऊन त्या हाताचा उपयोग करायला गेलं की अपघात होतो.याला म्हणतात फँटम लिम्ब.राणीलाही सुरुवातीला त्याचा त्रास झाला.एकदा संध्याकाळी संपतने पिंजऱ्याची साफसफाई करण्यासाठी राणीला बाहेर काढलं आणि एका फांदीवर ठेवलं. फांदीवरून उतरून ती माझ्या जवळ येऊ लागली.पण लक्षात न येऊन तिने फांदी धरायला आपल्या नसलेल्या हाताचा,म्हणजे फँटम लिम्बचा आधार घेतला आणि तिचा साफ तोल गेला.माझं तिच्याकडे लक्ष असल्याने मी तिला वरच्यावर झेललं म्हणून बरं.आणखी एक-दोन वेळा राणी फँटम लिम्बमुळे गडबडली;पण तीन-चार महिन्यांच्या उपचारांनंतर तिचा फँटम लिम्ब सिंड्रोम पूर्णपणे बरा झाला.तीन पायांवर उड्या मारण्यात ती चांगलीच पटाईत झाली.


राणी महाउद्योगी होती.अधूनमधून एखाद्या संध्याकाळी आम्ही तिला पिंजऱ्याबाहेर काढत असू.आमच्यापैकी कोणाच्या तरी खांद्यावर बसून ती पार्कचा फेरफटका करायची.एकदा माझ्या खांद्यावर बसून तिची सैर चालू होती.सहज चाळा म्हणून माझ्या शर्टाच्या खिशाला लावलेलं पेन तिने काढून घेतलं.अमेरिकेच्या प्रसिद्ध क्रॉस कंपनीचं लाइफटाइम गॅरंटी असलेलं ते महागडं पेन होतं.माझ्या मेव्हण्याने मला वाढदिवसानिमित्त भेट दिलेलं.राणीने पेन घेतल्या घेतल्या माझे सहकारी एकदम सावध झाले.तिच्या हातातून पेन काढून घेण्यासाठी ते सरसावलेले बघून मी मोठ्या घमेंडीत त्यांना म्हटलं,

"अरे,हे क्रॉस कंपनीचं पेन आहे.त्यात कसलाही बिघाड होत नाही.काही काळजी करू नका." माझं वाक्य संपायच्या आतच कटकन पेन तुटल्याचा आवाज आला.लाइफटाइम गॅरंटीवाल्या क्रॉस पेनचं मुंडकं राणीने तिच्या दातांनी एका झटक्यात तोडलं होत.सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली.ते लाइफटाइम गॅरंटीवालं तुटकं पेन आजही आमच्या जुन्या सामानात चिरनिद्रा घेत आहे.तीन पायांची राणी हा आमच्या पार्कमधला पहिला सस्तन प्राणी होता. 


आमचं पहिलं माकडही तीच होती.त्यामुळे आम्हा पार्कवरच्या मंडळींची आणि पार्कला भेट द्यायला येणाऱ्या बालगोपाळांची ती अतिशय लाडकी होती.मी रोज सकाळी पार्कच्या मेन गेटवर दूध आणि पेपर आणण्यासाठी जायचो, तेव्हा राणीसाठी घरून काही तरी खाऊ नेत असे.तिला खायला द्यायचं,तिच्याशी गप्पा मारायच्या आणि घरी परतायचं हा राणी आल्यापासूनचा माझा दिनक्रम ठरून गेला होता. राणीही माझी वाट बघत असायची.पण एके दिवशी मात्र भलतंच घडलं.त्या दिवशी मी राणीसाठी शेंगा घेतल्या होत्या.खिशातल्या शेंगा तिच्या हातात दिल्या.त्यातल्या बऱ्याच खाली पडल्या.काही पिंजऱ्याच्या आत,तर काही पिंजऱ्याबाहेर.

पिंजऱ्याबाहेरच्या शेंगा तिला देण्यासाठी मी खाली वाकून गोळा करू लागलो आणि अचानक एक प्रचंड वेदनेची कळ डोक्यामधून अंगभर पसरली.डोळ्यांपुढे अंधारी आली;पण काही क्षणातच मी स्वतःला सावरलं. घाबरून राणीकडे पाहिलं आणि अक्षरशः गर्भगळितच झालो.

माझ्या डोक्यावरच्या दाट कुरळ्या केसांचा पुंजका तिच्या हातात होता. दूध- पेपर वगैरे सोडून मी थेट घर गाठलं. आरशात पाहिलं तर माझ्या डोक्यावरचा केसांचा एक गोल पॅच गायब झाला होता.दाट कुरळ्या केसांमध्ये छोटं गोल टक्कल पडलं होतं.पण नशिबाने तिची नखं माझ्या टाळूला लागली नव्हती.वेदना होत होत्या त्या केस उपटले गेल्यामुळे.पण त्या अवस्थेतही माझं ते विनोदी रूप बघून प्रतिभा आणि तेजसबरोबर मलाही हसू आवरत नव्हतं.

त्या दिवशी माझ्या टकलाची सुरुवात झाली ती झालीच.


पण राणीने त्या दिवशी असं का केलं? खरं तर ते कोडंच आहे.आपण फक्त अंदाज बांधू शकतो. खरं काय ते फक्त राणीलाच माहीत.पण माझ्या मते मी वाकलेलो असताना दिसणारे माझे कुरळे केस पाहून तिला त्यांच्याशी खेळण्याची इच्छा झाली असणार.शेंगा उचलाव्यात त्या सहजतेने ती माझे केस हाताने पकडायला गेली आणि झालं भलतंच.त्याआधी तिने कधीही पार्कमध्ये कुणाला इजा केली नव्हती आणि त्यानंतरही कधी केली नाही.दोन अडीच वर्षं राणी आमच्या पार्कवर मजेत राहिली.पुढे सेंट्रल झू ॲथॉरिटीने अपंग प्राण्यांना प्रदर्शनार्थ ठेवण्यास बंदी केल्यावर आम्ही तिला कात्रजच्या वन्यप्राणी अनाथालयात हलवलं.तिथेही ती खूप वर्ष समाधानाने राहिली.राणीच्या संगतीचं गारुड आमच्या सर्वांच्या मनावर कायम राहिलं. त्यामुळेच आमच्याकडे त्यानंतर आलेल्या आणखी एका माकडिणीचं नाव आम्ही 'राणी'च ठेवलं.