अनेक पशु-पक्षी कृत्रिम वस्तू घडवतात.मुंग्या-वाळव्यांची वारुळे,कागदमाशांची कागदाची,मधमाशांची मेणाची पोळी,बीव्हर ह्या उंदरांच्या जंगी भाईबंदांचे पाण्यात बांधलेले बांध,सुगरिणीची डौलदार घरटी.सामान्यतः ह्या कृत्रिम निर्मिती उपजत प्रेरणांतून ठरलेल्या साच्यांतल्या रचना असतात.पण कोणी,कोणी त्यांतही आपली काही तरी खासियत,सौंदर्यदृष्टी दाखवतात.ह्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे न्यू गिनीतले कुंजविहारी - बॉवरबर्ड.ह्या पक्ष्यांचे नर रानात जमिनीवर आपले घरटे थाटतात आणि त्याला आकर्षक करण्यासाठी रंगीत गोटे,शंख - शिंपले,
पिसे अशा नानाविध शोभेच्या वस्तूंनी सजवतात.हे मोठ्या चुषीने करतात आणि ह्यातही काही फॅशनी सुरू होतात.
ह्या फॅशनींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यांना वेगवेगळ्या रंगांच्या चकचकीत कचकडी चकत्या पुरवल्या.मग एका दरीत जांभळ्या चकत्यांची फॅशन सुरू झाली.सगळे नर जांभळ्याच चकत्या वापरायला लागले,
तर दुसऱ्या दरीत गुलाबी चकत्यांची चलती सुरू झाली !
प्राण्यांचे कृत्रिम वस्तुविश्व तसे अगदी मर्यादित आहे.माणसाने मात्र त्याला अगडबंब बनवले आहे.
मानव कार्यकारणसंबंध लक्षात घेऊन, विचारपूर्वक अनेक कृत्रिम वस्तू अथवा निर्मुके घडवून त्यांना हरत-तऱ्हेची उपकरणे,आयुधे म्हणून वापरतो.म्हणून एका बाजूने मानवाच्या संकल्पना,त्याचे ज्ञान विकसित होत राहते,तर ह्या स्मरुकविश्वाशी हातात हात मिळवून कृत्रिम वस्तूंचे विश्वही समृद्ध होत राहते.जनुक व स्मरुकांप्रमाणेच निर्मुकांच्याही नकला केल्या जातात.अशा नकला करताना त्यांच्यात बदल घडवले जातात.त्यातून नवनिर्मिती होत राहते.जीवसृष्टी व कल्पसृष्टीप्रमाणेच ही निर्मुकांची, आयुधांची सृष्टीही सतत वर्धिष्णु, नवनवोन्मेषशालिनी भासते.पृथ्वीचा जन्म झाला एका शिलावरणाच्या रूपात.मग ह्या शिलावरणाला पाण्याच्या
जलावरणाने व वायूच्या वातावरणाने झाकले. जिथे शिलावरण - जलावरण - वातावरण एकत्र येतात त्या परिसरात जीवसृष्टी पसरत जाऊन तिचे एक जीवावरण निर्माण झाले.मग प्राणिसृष्टीच्या आणि प्रामुख्याने मानव जातीच्या उत्पत्तीनंतर स्मरुकांची भरभराट होऊन एका बोधावरणाने आणि त्याच्याच जोडीला निर्मुकांची भरभराट होऊन एका आयुधावरणाने पृथ्वी आच्छादली आहे.माहिती व सदेश तंत्रज्ञानाच्या आजच्या झपाट्याच्या प्रगतीने जे एक संगणक - दूरसंदेश ही निर्मुके व संबंधित सॉफ्टवेअरची स्मरुके ह्यांच्या युतीतून सायबरस्पेसमधील विश्व साकारते आहे ते ह्याच उत्क्रान्तीचा अगदी अलीकडचा आविष्कार आहे.
सॅम्युएल बटलरचे एरेव्हॉन
चार्ल्स डार्विनने जीवसृष्टीच्या पातळीवर उत्क्रान्तितत्त्वाची मांडणी करताच त्याच्या सॅम्युएल बटलर ह्या समकालीन प्रतिभाशाली कादंबरीकाराला सुचले की मानव निर्मित कृत्रिम वस्तूही अशाच उत्क्रान्तिपथावर आहेत,आणि ह्यातूनही पुढे काय होईल ह्याचा विचार करणे अत्यावश्यक आहे.असा कल्पनेचा खेळ करत त्याने १८७२ साली 'एरेव्हॉन' नावाची एक कादंबरी लिहिली.
त्या वेळी युरोपीय दक्षिण अमेरिका खंड हळूहळू व्यापत होते.ह्या खंडात एका दुर्गम्य गिरिप्रदेशात एरेव्हॉन ह्या देशात ह्या कादंबरीचा नायक वाट चुकून पोचतो.ह्या देशात काही दशकांपूर्वी यंत्रांची पुढील प्रगती पूर्णपणे रोखायची असा निर्णय घेतला गेलेला असतो. ह्या निर्णयामागचे तत्त्वविवेचन हा ह्या कादंबरीचा गाभा आहे.त्यातील काही उतारे :
◆आम्ही यांत्रिक जीव,यंत्रांचे राज्य आणि यंत्रसृष्टी असे शब्द जाणूनबुजून वापरतो,कारण जशी वनस्पतिसृष्टी खनिजसृष्टीतून निर्माण झाली आणि त्यातून यथावकाश प्राणिसृष्टीची उत्क्रान्ती झाली,तशीच गेल्या काही तपांत एक नवीच सृष्टी आपल्यापुढे प्रगटली आहे.ह्या सृष्टीचे काही अप्रगत प्रतिनिधीच अजूनपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आले आहेत.
◆आज ह्या यंत्रसृष्टीचा आपला समज फारच अपुरा आहे.अजून आपण ह्यांचे वेगवेगळे वंश,कुळे,प्रजातु,वाण ह्यांच्यात नेटके वर्गीकरण करू शकत नाही किंवा गुणवैशिष्ट्यांच्या यंत्रांतले दुवे समजू शकत नाही.हे तर उघड आहे की वनस्पतिसृष्टीत व प्राणिसृष्टीत नानाविध जशी नैसर्गिक निवड होते तशीच मानवाला यंत्रांचा कसा उपयोग होतो याची निवड समितीत उत्क्रान्ती घडवते आहे,पण ह्या उत्क्रान्तीची नक्की दिशा अजून आपल्याला समजलेली नाही.
◆आपण खूपदा मानवानंतर पृथ्वीवर कोणत्या प्रकारच्या प्राण्याचे वर्चस्व प्रस्थापित होईल ह्याची चर्चा करत राहतो.
पण खरे तर आपणच आपले वारस घडवतो आहोत.
आपण रोज त्यांचे साँदर्य,त्यांच्या रचनेतल्या खुब्या,त्यांची शक्ती जोपासत आहोत हळूहळू त्यांच्यात स्वत:चे नियंत्रण करण्याची,स्वतःच्या कामकाजाची दिशा ठरवण्याची शक्तीही वाढते आहे.ही यंत्रांची स्वयंचलनाची,
स्वनियंत्रणाची शक्ती मानवाच्या बुद्धीची जागा घेत आहे.
◆काळाच्या ओघात यंत्रांपुढे मानवच खालच्या पातळीचा प्राणी ठरेल.दुर्बल,स्वतःवर काबू ठेवू न शकणारा मानव यंत्रांनाच सर्वगुणसंपन्न मानू लागेल.यंत्रांच्या विश्वात क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सरांचा शिरकाव होणार नाही;त्यांना पाप,शरम आणि दुःख ठाऊक नसेल.ती नितांत स्थितप्रज्ञ असतील.
◆हे घडले की आज घोड्याचे किंवा कुत्र्याचे व मानवाचे जे नाते आहे,तेच नाते मानवात आणि यंत्रांत प्रस्थापित होईल.कदाचित यंत्रांनी माणसाळलेला मानव आजच्या रासवट मानवाहूत सुखाने जगू लागेल.जसे आपण घोड्या-कुत्र्यांना प्रेमाने सांभाळतो,तशीच यंत्रे मानवाला मायेने पाळतील.
◆आपण भोगवादी दृष्टिकोनातून म्हणू शकू की जेव्हा जेव्हा यंत्रांचा उपयोग आपल्याला लाभदायक आहे,तेव्हा तेव्हा तसा वापर करणे शहाणपणाचे आहे.पण ही तर यंत्रांची हुषारी आहे;आपली सेवा करत करत ती आपल्यावर हुकमत गाजवू लागली आहेत.मानवाने दुसरी अधिक गुणवान कुळी निर्माण करत एका कुळीचा निःपात केला तर त्यांना काहीच दुःख नाही.उलट त्यांना विकासाच्या वाटेने पुढे नेण्याबद्दल ती मानवाला शाबासकीच देतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,त्यांना सुधारण्यासाठी सारखे झटत राहिले नाही तर मात्र ती रागावतात.पण आपण खरे तर हेच केले पाहिजे. यंत्रांच्या उत्क्रान्तीच्या आजच्या प्राथमिक अवस्थेत ह्यातून आपल्याला खूप त्रास सोसावा लागेल,पण आपण जर आज यंत्रांविरुद्ध बंड पुकारले नाही तर भविष्यकाळात मानवाला आणखीच दारुण यातना सोसाव्या लागतील.पण काळाच्या ओघात यंत्रे ह्या जगावर आपली पकड अधिकाधिक बळकट करत राहतील हे तर निःसंशय.तेव्हा आज एकच मार्ग शहाणपणाचा आहे:मानवाच्या भवितव्याची चाड असणाऱ्यांनी तातडीने सगळ्या यंत्रांविरुद्ध जिंकू किंवा मरू असे युद्ध पुकारावे.ह्यात कोणतेही अपवाद नकोत.
आपण थेट आदिमानवाच्या पातळीवर पोचायची आवश्यकता आहे.जर आज मानवाला हे शक्य नाही असे कोणी म्हणत असेल तर त्यातून आपली किती अधोगती झाली आहे.आपणच निर्माण केलेली यंत्रकुळी नष्ट करणे कसे आपल्या हाताबाहेर गेले आहे,आपण कशी गुलामगिरी पत्करली आहे,हेच सिद्ध होते.
आदिमानव..
रानकुत्रे,तरस टोळीने शिकार करताना आपल्याहून आकाराने खूप मोठ्या पशुंनाही सावज बनवतात.
माकडे,वांदरे हिंस्र पशूपासून बचाव करण्यासाठी एकमेकांना धोक्याच्या सूचनां देतात.मानवी कंपू सामूहिक प्रतिकारही करतात आणि शिकारही.चिंपांझी असेच आहेत. व्हेव्हेंट माकडाची शिकार करताना सावज पळत जाऊन झाडावर उंच जाऊन बसले,तर चिंपांझी ते कोणत्या कोणत्या झाडांवर उडी मारत जाऊन तेथून खाली उतरून निसटू शकेल ह्याचा आजमासच घेतात.मग अशा सगळ्या वाटा रोखण्यासाठी त्या त्या झाडांच्या बुंध्यांशी जाऊन उभे राहतात आणि त्यांच्यातला एक वर चढून सावजाला हुसकावतो.मनुष्यप्राणी अशी व्यूहरचना करून शिकार करण्यात आणखी खूपच पुढे गेला आहे.काही ठिकाणी उभ्या कड्यांखाली मॅमथसारख्या हत्तीच्या भाऊबंदांची चिक्कार हाडे सापडली आहेत.
शिकारी टोळ्या ह्या महाकाय पशूना हुशारीने कड्यांकडे पळवत आणून कडेलोट घडवून आणायच्या.मग सावकाश खाली उतरून मांसावर ताव मारायच्या अशी कल्पना आहे.( 'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',
ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन ) प्राण्यांचे संदेश सामान्यतः आता व इथल्या मर्यादांना घुटमळत असतात. पण मानवी भाषा यांना पार करून भविष्यात किंवा भूतकाळात आणि अगदी दूरसुद्धा काय घडते आहे किंवा घडू शकेल ह्याचा ऊहापोह करते.
कदाचित मॅमथ कड्यावरून कोसळून कुठे पडताहेत हे बिलकूल दिसत नसेल,तिथे पोचायला दोन दिवस लागणार असतील,तरी त्याची चर्चा करून हाका केला जात असेल.असे हाके करायला अनेक जण हवेत.टोळक्या-टोळक्यांनी अशा मोठ्या सावजांच्या शिकारी करत - करत माणसाची सामाजिक जडण-घडण झाली असावी.आफ्रिकेच्या शुष्क माळरानांवर, दोन पायांवर पळत,हाताचा वापर करत, गारगोट्यांची,हाडांची हत्यारे वापरत आपले पूर्वज सर्व जीवसृष्टीवर कुरघोडी करण्यात यशस्वी झाले असे दिसते.आरंभी मनुष्यप्राणी निसर्गप्रणालींशी,जलचक्रांशी जुळवून घेत एका साध्या सोप्या जीवनाला आकार देत होता.तो टोळी-टोळीने आफ्रिकेच्या माळरानांवर भटकत फळे,कंदमुळे,खेकडे,
शंख-शिंपले गोळा करत, शिवाय छोट्या- मोठ्या सावजांची शिकार करणारा एक प्राणी होता.इतर पशूहून अवजारे वापरण्यात व आगीवर काबू ठेवण्यात काकणभर सरस होता एवढेच.आगीवरील नियंत्रण तर आधुनिक मानवजातीच्या उत्पत्तीआधीच,सुमारे चार लक्ष वर्षांपूर्वीपासून सुरू झाले असा अंदाज आहे. दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आधुनिक मनुष्यजातीने पृथ्वीवर पदार्पण केले.पण मानवजातीच्या स्मरुक-निर्मुकांच्या विश्वात भराभर प्रगती होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली पन्नास- साठ हजार वर्षांपासून.ह्या सुमारास माणूस आजच्या धर्तीची समृद्ध भाषा वापरायला लागला असावा. या कालापासून मानवसमाज दगड- हाड - लाकडांची उपयुक्त उपकरणे बनवण्यासोबत शंख-शिंपल्यांचे दागिने बनवू लागला असावा, छोट्या छोट्या मूर्ती घडवू लागला असावा,प्रेते पुरू लागला असावा.ह्याच वेळी मानव समूहांनी गोष्टी रचायला,गायला,नाचायला आरंभ केला असावा.ह्या माध्यमांतून निसर्गप्रणालीचे, ऋतुचक्राचे,शिकारीच्या डावपेचांचे ज्ञान संकलित करायला,त्यात सतत भर घालायला सुरुवात केली असावी.ह्या साऱ्या कृतींतून माणसांच्या वेगवेगळ्या टोळ्या,निरनिराळे समूह आपापल्या परिसराला समर्पक असे ज्ञान, अनुरूप अशी तंत्रे विकसित करू लागले असावेत.कारण ह्या कालानंतर मानवसमूह खूप विस्तृत अशा भौगोलिक परिसरात, आफ्रिकेबाहेरच्या आशिया,
युरोप,ऑस्ट्रेलिया खंडांत पसरायला आरंभ झाला.हे समूह नदीकिनारे,समुद्रतट,डोंगरपठारे,शुष्क माळराने, घनदाट जंगले,प्रवाळांची बेटे अशा वेगवेगळ्या अधिवासांत राहू लागले.नानाविध परिसरांशी जुळवून घेत ते आपापली वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्कृती घडवू लागले.जीवसृष्टीच्या वैविध्याला मानवी संस्कृतींच्या वैविध्याची जोड मिळू लागली.या साऱ्या उलाढालींतून मानवाने आज जड,तसेच चेतन सृष्टीवरची आपली पकड घट्ट केली आहे.ह्याचा आरंभ लाखो वर्षांपूर्वी आगीवरील नियंत्रणातून,नंतर काही दशसहस्र वर्षांपासून हाडे,दगड,लाकडाची अधिकाधिक प्रगत आयुधे बनवण्यातून झाला.मग टप्प्याटप्प्याने गेल्या काही हजार वर्षांपासून धातूंचे उत्पादन सुरू झाले.नवनव्या रसायनांची, पदार्थांची निर्मिती केली गेली.घरे उभारली गेली, नद्यांना पाट काढले गेले,बंधारे,धरणे बांधली गेले.जोडीने मानवाने विरजणातल्या जिवाणूंपासून तूर,भात,रेशमाचे किडे,रोहू- कटलांसारखे मासे,कोंबड्या,गायी,घोडे इथपर्यंत विविध जीवजाती आपल्या काबूत आणल्या.
आज मानवी नियंत्रण जीवांच्या शरीरातील रेणूंच्या पातळीवर पोचले आहे.आपण जिवाणूंतले जनुक उचलून कपाशीत भरतो आहोत.असेच नवे जनुक ठासलेले मासेही निर्माण करत आहोत.सध्या भूतलावरील एकूण जैविक उत्पादनातील अर्धे उत्पादन एकटा माणूस,कोटी जीवजातींतील केवळ एक जात,पटकावतो आहे.