१८५६ साली टॉलस्टॉयने सैन्यातून राजीनामा दिला व तो सेंटपीटर्सबर्ग ऊर्फ लेनिनग्राड येथे परत आला.तो येण्यापूर्वीच 'शिपाई व लेखक' म्हणून त्याची कीर्ती तिथे येऊन धडकली होती! तो येताच त्याला लोक साहित्यसम्राट साहित्यातील सिंह समजू लागले.
शहरातील प्रमुख लेखकांनी व कलावंतांनी त्यांचा सत्कार केला.त्याला आपल्या बैठकीतही घेतले.पण ते सारे दांभिक आहेत असे त्याला आढळून आले. त्यांना स्वतःची मते नव्हती.ते संपत्तीचे गुलाम होते.'जो देईल पोळी,त्याची वाजवावी टाळी' असे ते होते.आपण म्हणजे मानव
जातीची वेचक माणिक-मोती असे ते समजत.ते स्वतःला आपल्या काळातील बौद्धिक पुरुषश्रेष्ठ मानीत. आपण सृष्टीचे भूषण आहोत,वैभव आहोत असे ते समजत,ते जे काही लिहीत ते वरिष्ठ वर्गासाठी लिहीत,आपल्या उदात्त विचारांत सहभागी होण्यास बाकीची मानवजात अपात्र आहे असे त्यांना वाटे.पण टॉलस्टॉयची वृत्ती नेमकी याच्या उलट होती.वाड् मय हा त्याचा धर्म होता. साहित्यसेवा त्याला पवित्र वाटे.सौंदर्य व शहाणपण यांचे उपनिषद म्हणजे वाङ् मय साऱ्या मानवजातीने त्यात सहभागी व्हावे,असे त्याला वाटे.साहित्य ही सर्वांची मिळकत,
सर्वांचा साहित्यावर वारसा.'असे त्याचे मत असे.तो मूठभर लोकांची करमणूक करण्यासाठी लिहीत नसे,तर बहुजन समाजाला सुशिक्षित करण्यासाठी लिही.तो बहुजन समाजासाठी लिही,याचा अर्थ त्याला त्याच्या बुद्धिमत्तेची यथार्थ कल्पना नव्हती असा नव्हे.बहुजन समाजाच्या क्षुद्र व तुच्छ जीवनाची बाजू त्याला ठाऊक होती.बहुजन समाज जणू गुराढोरांप्रमाणे वागे,हे टॉलस्टॉय जाणून होता. पण 'नेखलडोव्ह' नायकाप्रमाणे हे शेतकरीही प्रकाशासाठी धडपडत आहेत,ही गोष्टही तो पाहत होता.आंतरिक वृत्तीनेच ते प्रकाशाकडे चाचपडत येत आहेत,हे त्याच्या दृष्टीस दिसत होते.शेतकऱ्यांना,
बहुजन समाजाला कोणीतरी नेता वा मार्गदर्शक हवा होता.'लोकांना काय पाहिजे आहे हे समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे जा.त्यांच्या गरजा समजून घ्या व त्या पूर्ण होण्यासाठी त्यांना साह्य करा.'
यास्नाया पोलियाना येथे त्याने शेतकऱ्यांची शाळा उघडली.या शाळेत तो पंतोजी म्हणून वागत नसे,तर त्यांच्याबरोबर सहविद्यार्थी होई. तो किसानांचा सहाध्यायी होई.टॉलस्टॉय म्हणे की,'जीवनाच्या गहन,गूढ ग्रंथातील पहिली मुळाक्षरे घोकणाऱ्या मुलांप्रमाणे ते सारे होते.'पोलिसांनी ती शाळा बंद केली. शेतकऱ्यांना त्यांच्या अज्ञानात तसेच पडू दे.' असे टॉलस्टॉयला सांगण्यात आले.यानंतर आजार व निराशा याचे महिने आले.त्याचे दोन भाऊ क्षयाने मेले.आपणासही तोच रोग आहे अशी टॉलस्टॉयला शंका आली.त्याची सारी श्रद्धा लोपली.त्याची मंगलावरची श्रद्धा गेली. त्याचा कशावरच विश्वास उरला नाही.त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार डोकावू लागले.पण या वेळेस त्याच्या कलेने,तसेच त्याच्या प्रेमानेही त्याला वाचवले.सोफिया न्डेयेवना बेहर्स नावाच्या सतरा वर्षांच्या मुलीशी त्याने लग्न केले.तो तिच्या दुप्पट वयाचा होता.त्याने पंधरा वर्षे अमिश्र आनंद उपभोगला.
त्याच्या जीवनाचे आकाश निरभ्र व स्वच्छ होते.त्याची पत्नी बुद्धिमती होती. "मी खऱ्या ग्रंथकाराची पत्नी आहे. माझा तो हक्क आहे." असे ती म्हणे.ती त्याला शुद्धलेखन घाली,त्याच्या कल्पनाशक्तीला चेतवी, त्याला उत्तेजन देई.ती त्याच्या हस्तलिखितांच्या कष्टाने व मेहनतीने नकला करी.जी काही अत्यंत मनोहर पृष्ठे त्याने रंगवली आहेत,त्यांच्यासाठी ती जणू आदर्श म्हणून त्याच्यासमोर असे.या सुखाच्या वातावरणात त्याने दोन अत्यंत मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या - १. युद्ध व शांती (ही म्हणजे विश्वव्यापक दुःखाचे गद्य महाकाव्य आहे.) २. ना कॅरेनिना- वैयक्तिक वासनाविकारांची शोकांत कथा.पण या कलासेवेमुळे त्याला अद्यापि शांती,समाधान लाभले नाही.आपल्या हातून काहीतरी अधिक चांगले व्हावे असे त्याला वाटत होते.निर्दोष कादंबऱ्या लिहिण्यापेक्षा अधिक उदात्त काहीतरी आपल्या हातून व्हावे अशी अत्यंत उत्कट इच्छा उत्कंठा त्याच्या मनात होती. 'युद्ध व शांती' या कादंबरीतील नायक प्रिन्स ॲन्ड्रयूई हा जेव्हा ऑस्टर्लिट्झ येथे जखमी होऊन पडतो.तेव्हा त्याला जगाच्या आंतरिक शांतीमयतेचे अंधूक दर्शन होते.त्याला वर पसरलेले अनंत आकाश दिसते.पृथ्वीवर चाललेल्या हिंसेकडे,दुष्टपणाकडे व नीचतेकडे आकाश जणू विचारमग्न दृष्टीने पाहत असते आणि ते आकाश पाहून ॲन्ड्रयूईचे मन एकदम अपरंपार व अवर्णनीय आनंदाने उचंबळून येते.जीवनाच्या अंधारातून ही जी अंतर्यामीची शांती अधूनमधून आढळते;हा जो प्रकाश मधूनमधून दिसतो,तो प्रकाश आपल्या मानव बंधूंना देण्याची चिंता टॉलस्टॉयला होती. कलेच्या माध्यमाच्या द्वारा आपणास हे करता येईल,असे त्याला वाटेना.तो एका नवीन प्रकारच्या कलेचा विचार करू लागला.माणसामाणसांत सहानुभूतींचा बंध स्थापण्यासाठी एक निराळीच कला हवी,असे त्याला वाटू लागले.लोकांना प्रकाशाकडे घेऊन जाण्याची इच्छा त्याला होती.पण कोणता प्रकाश?सनातनी धर्मावरची त्याची श्रद्धा तर उडून गेली होती.रूसोने त्याला थोडे दिवस
सनार्थक आनंद व निसर्गाचा आनंद दिला होता. पण अतःपर तेवढ्याने त्याचे समाधान होईना. खरा धर्म मिळावा म्हणून तो पुन्हा तपासू लागला.तीन वर्षे त्याने रोयान कथालिकांचे सर्व आचार व विधिनिषेध पाळले,पण व्यर्थ.त्याचा काहीही उपयोग झाला नाही.त्याची ख्रिस्तावर इतकी दृढ भक्ती होती की,या रूढ सांप्रादायिका ख्रिश्चन लोकांप्रमाणे बाह्याचारी होणे त्याला शक्य झाले नसते,जे विधी,ते समारंभ,ती प्रायश्चित्ते,सारी कर्मकांडे त्याला मूर्खपणाची, पापात्मक,धर्माची निंदा करणारी अशी वाटली. तो लिहितो,'चर्चची शिकवण केवळ कापट्यमय व असत्यमय आहे यासंबंधी माझी खात्री झाली आहे.मूर्खपणाच्या रूढींचा,जादूटोण्यांचा,
चेटकाचा आजार! यांच्या बुजबुजाटात खरा ख्रिश्चन धर्म लुप्त होऊन गेला आहे.जो धर्म मुळात शांती व प्रेम यांच्यावर आधारलेला होता. पण जो आता युद्ध व असहिष्णुता यांचा प्रचार करीत होता.त्या धर्मापासून तो आता कायमचा दूर गेला.
टॉलस्टॉय आता नवधर्माचा प्रणेता झाला किंवा नवधर्म म्हणण्याऐवजी बुद्धाचाच विस्मृत धर्म,इसाया,
कन्फ्यूशियस व ख्रिस्त यांचाच धर्म तो नव्याने विवरून सांगत होता.तो या नव्या धर्माचा निरंहकारी प्रस्थापक,नेता होता.या धर्मात विधि-निषेधांचे अवडंबर नव्हते. भट-भिक्षुक-उपाध्याय यांचेही बंड नव्हते.यात चर्चची अडगळ नव्हती.काही साध्या आदेशांवर हा धर्म उभारण्यात येणार होता.कोणते हे आदेश ? कोणत्या या आज्ञा? कोणाचेही वैर करू नका, क्रोधाच्या आहारी जाऊ नका,कधीही हिंसा
करू नका.श्रीमंतांची कर्मशून्य विलासलोलुपता, शासनसंस्थेचा जुलूम,चर्चची दुष्टता या गोष्टींविरुद्ध त्याच्या नवधर्माचे बंड होते.'तो समाजवादी,अराजकवादी व चर्च न मानणारा झाला.थोडक्यात म्हणजे,तो ख्रिस्ताचा खरा अनुयायी झाला.'
मानव-जातीच्या सेवेसाठी आपली कीर्ती, आपली प्रतिष्ठा,आपले स्थान,आपली संपत्ती,फार काय पण आपले प्राणही द्यायला तो तयार होता.तो शेतकऱ्याचे साधे कपडे वापरू लागला.परित्यक्त व दीनदरिद्री यांच्यात मिसळू व बसू-उठू लागला.विजयी व उन्नत होण्यासाठी तो नमला होता.आपल्या नवाबी अलगपणापासून तोसामान्य जनतेच्या पातळीवर येऊन उभा राहिला आणि असे करीत असता सर्व मानवजातीला नैतिक भव्यतेच्या उंच स्थानावर, नवीन उच्च भूमिकेवर तो नेत होता.सारे जग त्याला नवीन धर्मदाता म्हणू लागले.त्याचा जयजयकार करू लागले.पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याला वेडा ठरवले.आपला पती बुद्धिभ्रष्ट होत आहे असे त्याच्या पत्नीला वाटू लागले.त्याचे डोके ठिकाणावर नाही असे वाटून ती घाबरली.तो मानवांच्या बंधुत्वाविषयी बोलू लागला की त्याची मुले जांभया देऊ लागत व निघून जात.केवळ निःस्वार्थ जीवन जगणे म्हणजे मूर्खपणाची निश्चित निशाणी,असे त्यांना वाटे.आपल्या ध्येयासाठी त्याने स्वतःला खुशाल वाहून घ्यावे!पण आपल्या सर्व कुटुंबीयांचा त्यासाठी होम करण्याचा त्याला काय अधिकार,असा त्यांचा सवाल असे. तो स्वतःच्या घरातही जणू अपरिचित झाला!
त्याची ध्येये कोण ओळखणार?त्याचे अंतरंग कोणाला कळणार?आपल्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो, 'मला अगदी एकटे एकटे वाटते.माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.पण वस्तुस्थिती अशी आहे खरी.माझे जे सत्य स्वरूप,माझा जो खरा मी आहे त्याचा भोवतालच्या लोकांकडून उपहास केला जात आहे,त्याची ते सारे उपेक्षा करीत आहेत.अशी मानसिक वेदना होत असताही तो आपले कार्य पुढे रेटीतच होता.. ख्रिस्ती धर्माचा अर्थ तो एकोणिसाव्या शतकाच्या भाषेत समजावून सांगत होता.ख्रिस्ताने ईश्वराचे राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला,तर टॉलस्टॉयने मानवांचे लोकराज्य स्थापण्याचा यत्न केला.भूतदया,प्रेम,
अन्यायाचा प्रतिकार ही तत्त्वे जनतेच्या मनावर बिंबविण्यासाठी त्याने अनेक निबंध लिहिले. अनेक गोष्टी लिहिल्या.त्याचे पारितोषिक म्हणून चर्चने त्याला १९०१ साली धर्मबाह्य ठरविले.तो वृद्ध होत चालला,तसा त्याच्या शिकवणीत आणखी एक नवीन रंग आला.तो लोकांपासून,कुटुंबीयांपासून,पत्नीपासून,मुलांपासून विन्मुख झाला होता.तो सर्वांचा होता.पण त्याचे कोणीच नव्हते.सर्व मानवी व्यवहाराकडे तो निराळ्याच गूढतेने पाहू लागला,दिव्य दृष्टीने पाहू लागला.तो संन्यासी झाला.पूर्वी त्याने व्यभिचाराला धिकृत केले होते.आता वयाच्या सत्तराव्या वर्षी तो लोकांना संपूर्णपणे ब्रह्मचारी राहावे' असे शिकवू लागला. 'जो कोणी एखाद्या स्त्रीचा स्वतःच्या पत्नीचाही विषयबुद्धीने विचार करील.त्याने तिजशी व्यभिचार केल्यासारखेच आहे.' आपल्या क्षीण इच्छांनुसार जगाची पुनर्रचना करू पाहणाऱ्या वृद्धाचे दर्शन एक प्रकारे करुणास्पद असते.अशा वृद्धाला पाहून त्याची कीव येते. 'संपूर्ण ब्रह्मचर्य पाळल्यामुळे मानवजात नष्ट झाली तरी हरकत नाही' असे तो म्हणे! पण त्या वेळी त्याची बुद्धी व त्याचे मन त्याला हळूहळू सोडून जाऊ लागली होती. त्याचा गूढवाद त्याच्या बुद्धीला संपूर्णपणे ग्रासू पाहत होता. 'रिसरेक्शन' (पुनरुद्धार) या आपल्या शेवटच्या कादंबरीत तो एका पाप्याच्या शरीरात संताचा आत्मा घालतो.या कादंबरीतला नायक नेखलडोव्ह आरंभी दुष्ट व पापी असतो; पण शेवटी हुतात्मा होतो. शत्याच्या जीवनात आकस्मिक क्रांती होते व थोडक्याच वर्षांत तो एकदम पाप्याचा संत होतो.पाप-शिरोमणीची पुण्यमूर्ती होते ! अपूर्व बुद्धीच्या टॉलस्टॉयला जी स्थिती गाठण्यासाठी जीवनात धडपडावे लागले, ती हा पापात्मा थोड्याशा अवधीतच मिळवतो !
रिसरेक्शन ही कादंबरी म्हणजे जगातील अत्यंत सुंदर व करुण काव्यापैकी एक आहे.पण ती एका वृद्धाची कृती आहे.(मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,सानेगुरुजी अनुवादित)टॉलस्टॉयला स्वतःचा मोठेपणा पाहावयास मिळाल्यानंतरही बराच काळ तो जगला. आयुष्याच्या अखेरच्या दहा वर्षांत तो राजकीय, सामाजिक व नैतिक ध्येये उपदेशीत होता.पण ती ध्येये या मर्त्य लोकी कशी अंमलात येणार? ज्या जगात अतिमानुष लोक असतील,
त्यातच ती मूर्त होण्याची शक्यता.तो वृद्ध होत चालला तसतसा तो अधिकाधिक गहन,गंभीर तत्त्वज्ञानी व बालकाप्रमाणे साधा होत गेला. १९१० सालच्या ऑक्टोबरच्या अठ्ठाविसाव्या तारखेस तो घर सोडून बाहेर पडला,तेव्हा त्याचे वय ब्याऐंशी वर्षांचे होते.त्याच्या अंगात शेतकऱ्याचे कुडते असे.त्याच्या चेहऱ्यावर वार्धक्यामुळे सुरकुत्या व वेदनांमुळे आठ्या पडल्या होत्या, त्याची मुद्रा सौम्य;पण करुण व शांत होती. बुद्धाप्रमाणे परिव्राजक होऊन जगाच्या राजमार्गाने तो फिरत होता.
बुद्धाने जीवन मिळावे म्हणून घराचा त्याग केला होता,तर टॉलस्टॉय जणू मरण मिळावे म्हणून घराबाहेर पडला होता.
एकटेच कोठेतरी मरून पडावे,आसपास कोणी नको,असे त्याला वाटले.त्यांनी सारे जीवन दुसऱ्यांवर दया करण्यात घालवले,पण तो मात्र घरच्यांची दया सोडून पळून गेला! कित्येक दिवस तो गावोगाव भटकत होता.शेवटी एके दिवशी तो जो रस्त्याच्या कडेला पडला,तो पुन्हा उठलाच नाही! एक डॉक्टर त्याच्यापाशी आला. त्याला तो म्हणाला,पृथ्वीवर लाखो लोक दुःखी व आजारी आहेत.
मग तुम्ही फक्त माझाच विचार का करता? १९१० सालच्या नोव्हेंबरच्या विसाव्या तारखेस जी शांती तो आयुष्यभर मिळवू पाहत होता,ती त्याला मिळाली.
नुकतेच सहा वाजले होते व त्याचे दुःखभन्न शरीर शांत झाले. 'शेवटचा महामोक्ष' त्याला मिळाला. 'मृत्यू', 'धन्यतम मृत्यू' त्याला मिळाला.याच शब्दांनी त्याने मृत्यूला गौरविले होते.जग सुसंस्कृत व युद्धहीन व्हावे यासाठी त्याने जीवन खर्चले;पण त्याच्या मृत्यूनंतर चार वर्षांत सारे जग भीषण व रानटी अशा एका महायुद्धात बुडून गेले !
०४.०५.२४ या लेखातील पुढील भाग..