…..असले तरी त्यांना या सृष्टीशी काही एक कर्तव्य नाही.त्यांना या आपल्या मर्त्य जगातील घडामोडींचे सोहेर,सुतक,काहीही नाही! हे जीवन म्हणजे एक मूर्खाचा बाजार आहे.दैवी मेंदूतून असल्या जगाची कल्पना निघणे शक्य नाही.कोणताही देव स्वतःच्या पूजेसाठी मंदिर बांधावयाला सांगून ते आपल्याच विजेच्या लोळाने भस्म करणार नाही.देव असा कसा असू शकेल? दयाळू देव एखाद्या मुलाला आजारातून बरा करून पुन्हा लढाईत मरावयाला पाठवील,हे कसे शक्य आहे? एपिक्यूरसच्या मते या अकस्मात उत्पन्न झालेल्या जगात देव व मानव दोघेही भयभीतपणे वावरत असतात.हे जग देवांनी निर्मिले नाही, मानवांनीही निर्मिले नाही,दोघेही या जगात अपरिचित पाहुणे आहेत.त्यांना सदैव धास्ती वाटते.देवांना स्वतःचीच काळजी वाहावी लागते,चिंता लागलेली असते.माणसांनी देवांच्या नावाने हाका मारण्यात काय अर्थ ? जगात चालेल्या झगड्यांमध्ये देवही माणसा प्रमाणेच निराधार आहेत.हे जग दुसऱ्या कोणी निर्मिलेले नसून अणूंच्या आकस्मिक संघांतातून आपोआप बनलेले आहे.ते स्वयंभू आहे.पण मग अणूंच्या संघांतातून बनलेल्या या जगात फुले-फळे,
पशु-पक्षी, देव-मानव, इत्यादी विविध प्रकार कसे झाले? या अणूंतून कोणत्या प्रक्रियेने व बनावाने डॅमॉक्रिटससारखे शास्त्रज्ञ व एपिक्यूरससारखे तत्त्वज्ञ जन्मले ? एपिक्यूरस म्हणतो, " प्रसंगाने,नाना चुका होत होत,नाना प्रक्रिया होत होत,हे सर्व झाले." हे अणू उत्तरोत्तर अधिकाधिक शुद्धतेकडे जात असतात त्यांचा उत्तरोत्तर विकास होत असतो.ओबडधोबड आकारांतून सुंदर आकारांकडे वस्तू जात असून जे अयोग्य आहे ते दूर,नष्ट होत असते,गळून जात असते व योग्य असेल ते कायम होत असते,थोडक्यात सांगावयाचे म्हणजे,या निरनिराळ्या वस्तू उत्क्रांतीच्या योगाने बनत आल्या आहेत.
डार्विनपूर्वी बावीसशे वर्षे इतक्या प्राचीन काळी एपिक्यूरसने उत्क्रांतीचे तत्त्व मांडले आहे.
एपिक्यूरियन मीमांसेनुसार;मनुष्य कसा जन्मला, निरनिराळ्या प्रजाती कशा जन्मल्या,याचे मोठे सुंदर वर्णन ल्युक्रेशियसने दिले आहे.अनंत काळापासून फिरणाऱ्या अणुपरमाणूंतून पुष्कळशा घटना व विघटना होत होत शेवटी त्यांतून एके दिवशी हे आपले जग निर्माण झाले.आरंभी या पृथ्वीवर जीव नव्हते.ती म्हणजे एक नुसता मातीच्या गोळा होती.पण हळूहळू त्या गोळ्यातून हिरवे गवत वर आले व त्याचा विकास होत होत त्यांतूनच एक दिवस झुडपे व फुले दिसू लागली. पशुंच्या अंगावर केस येतात किंवा पक्ष्यांना पिसे फुटतात,त्याप्रमाणे वृक्षांना व वनस्पतींना फुले आली.नंतर जीव उत्पन्न झाले,पक्षी उडू लागले,आकाशात गाऊ लागलेपशू जमिनीवर हिंडू-फिरू लागले.
जंगलांतून गर्जना करू लागले, पशुपक्ष्यांच्या काही विशिष्ट जाती त्या त्या वातावरणास अनूकूल होत्या; म्हणून त्या तिथे तिथे जगल्या व वाढल्या.या जातींच्या ठायी धैर्य व धूर्तताही असल्यामुळे त्या वाचल्या.काही जाती दुबळ्या होत्या,काहींना कमी दिसे,
काहींना ऐकू येत नसे,काहींना हलण्या-चालण्याची साधने नव्हती, त्या नष्ट झाल्या.निसर्गाच्या लहरींतून हे दुबळे प्रकार जन्मास आले व नष्ट झाले.हेतुहीन,योजनाहीन अशा या जगातील आंधळ्या प्रयोगाचे ते बळी होते व नष्ट होणे हेच त्यांचे भवितव्य होते.
विनाशच त्यांच्या नशिबी होता. मानवप्राणी हा या मनोरंजक नाटकातला बलवान् प्राणी होय.तो या योजनाहीन नाटकांत शेवटी येऊन उभा राहिला.तो काटक होता.रानटी होता.उघडा - बोडका होता,इतर प्राण्यांप्रमाणेच तोही या भूतलावर भटकत होता.
पाला,कंदमुळे,कवचीची फळे यांवरच जगत होता व रात्री उघड्यावरच निजत होता.
पण अधिक भयंकर हिंस्त्र श्वापदांनी मानवांवर हल्ले चढविले,तेव्हा त्यांना गुहांमध्ये आश्रय शोधणे भाग पडले.हे पशुसम मानवी जीव एकेका गुहेत समुदायाने राहू लागले.त्यांच्यांत भाषा प्रकट झाली.
त्यांना एकमेकांबद्दल आपलेपणा,करुणा,मैत्री वाटू लागली. त्यांना स्वप्नात जे विचित्र आकार दिसत,त्यांना देव मानून आणि अमर जीवन व अपरंपार शक्ती त्यांच्या ठायी कल्पून,त्या काल्पनिक देवदेवतांची ते पूजा करू लागले. पुढे त्यांना धातूंचा शोध लागल्यावर ते अधिक चांगली हत्यारे तयार करू लागले;व स्वतःचा बचाव आणि दुसऱ्याचा संसार करण्याच्या क्रियेत अधिक तरबेज झाले.निरनिराळे मानवसमुदाय परस्परांशी विचारविनिमय व वस्तुविनिमय करू लागले;मालाची अदलाबदल व ठोशांची देवाणघेवाण करू लागले, आणि अशा रीतीने ते नाना कला व उद्योग शिकले. देवघेव,व्यापार,नौकानयन,शेती,काव्य,संगीत,शिल्प, राजकारण,मुत्सद्देगिरी,भांडणतंटे,फिर्यादी,मारामाऱ्या, लढाया,सारे काही ते शिकले.थोडक्यात म्हणजे ही संस्कृती,ही सुधारणा हळूहळू उत्क्रांतीने होत आली आहे.आपत्तींनी भरलेल्या या जगात स्वतःचे सारे कसे जुळवून घ्यावयाचे,हे मानव हळूहळू ठरवीत होता.तो बदल करीत,फरक करीत चालला होता,जीवनार्थ चाललेल्या या अखंड झगड्यात थोडा वेळ जगता यावे म्हणून मनुष्य प्रयत्न करीत आहे.हे सारे जीवन म्हणजे एक अखंड,
अविरत झगडा आहे.या जगात मरणाशिवाय शांती नाही.आणि अशा रीतीने आपण एपिक्यूरसच्या विज्ञानातूनच त्याच्या तत्त्वज्ञानाकडे येतो.
ज्या पृथ्वीवर आपण जगत असतो,ती जणू आपणास थोडा वेळ भाड्यानेच मिळाली आहे.येथून निघून जाण्याची वेळ आली की आपले सारे लुबाडले जाते;व अकिंचन होऊनच आपणास येथून जावे लागते.पण आपणास मरणावर जय मिळविता आला नाही,तरी मरणाच्या भयावर आपण जय मिळवू या.
मानवी जीवन अल्प आहे,म्हणून दुःख करीत बसण्याचे कारण नाही.उलट ते अल्प आहे,म्हणून आनंदच मानू या.मरणानंतर जाणीव नाही;मरणानंतर ना दुःख ना वेदना,ना शिक्षा ना बक्षीस,ना स्वर्ग ना नरक! या पृथ्वीवर केलेल्या चुकांबद्दल आपणास मरणोत्तर कोणी सजा देणार आहे असे नाही.मृत्यूदेवाचा तो कारुण्यपूर्ण शुभ्र हात आपणास थोपटतो व स्वप्नहीन,चिरमधुर निद्रेत नेऊन सोडतो.जगद्रुपी वेड्यांच्या घरांतून होणाऱ्या आपल्या सुटकेच्या कागदावर सही करणारा प्रेमळ रक्षक म्हणजे मृत्यू.सर्व रोगांहून भयंकर रोग म्हणजे हे जीवन.जीवनाच्या दुर्धर व भीषण रोगापासून आपणास मुक्त करणारा सौम्य व शांत वैद्यराज म्हणजे मृत्यू. पण तुम्हांपैकी काहींना जरी हे जीवन सुखाचे,चिरसुखोप -
भोगांची जणू मेजवानीच अशा स्वरूपाचे लाभले असले,तरी तुम्ही नेहमीच चैन करीत व अधाशासारखे खातपीत राहावे हे बरे का?ओ येईपर्यंत खात बसणे बरे नव्हे.पोटाला तडस लागण्यापूर्वीच उठावे.दोन घास कमीच खाल्लेले बरे.एखाद्या दमलेल्या; पण सुखी अशा मेजवानी झोडलेल्या माणसाप्रमाणे प्रसन्नपणे व हसतमुखाने सुखाची झोप घ्यावयाला जाणे बरे नव्हे का? एक दुर्दिन येईल व तुमच्या जीवनातील सारे नष्ट होईल याचे तुम्हाला वाईट वाटते.पण हा जो अखेरचा दिवस येणार आहे,तो या नानाविध हव्यासांतून,
वासनांतून व इच्छांतून सोडविणारा आणि हे हवे ते हवे अशा धावपळीपासून मुक्त करणारा असेल, ही गोष्ट तुम्ही विसरता.
मरणाची भीती झुगारून द्या व या जीवनात जे जे मंगल आनंद मिळतील,त्यांकडेच लक्ष द्या.एपिक्यूरस व 'सर्वसह'वादी स्टोइक लोक यांचे येथपर्यंत एकमत आहे.दैव बलवत्तर असल्यामुळे जे जे होईल ते ते सहन करणे हे ध्येय सामान्य;पण यापुढे मात्र दोघांत तीव्र मतभेद आहेत.स्टोइक म्हणत की,ज्या सुखांमुळे आपली प्रवृत्ती सद्गुणांकडे होत नाही,जी सुखे सत्कर्मांस प्रेरक होत नाहीत,ती त्याज्य होत.सुखांनी आपली समुन्नती व्हावी. याच्या उलट एपिक्यूरस म्हणे,"जी सत्कर्मे सुखावह होत नाहीत,ती कुचकामी होत" प्रथम केवळ सुखदवादी लोकांप्रमाणे तोही क्षुद्र शारीरिक सुखे वानी,वाखाणी व आपल्या विद्यार्थ्यांना सदैव शिकवी की,"जे जे सुख मिळेल ते ते भोगा,जी जी सोन्याची संधी सापडेल,ती ती पकडा." पण केवळ शारीरिक सुखांनी कायमचे समाधान थोडेच लाभणार? क्षणभर जिभेचे सुख मिळवाल,
शारीरिक सुख मिळवाल पण कदाचित् एखादे वेळ जीवनात कायमचे रोगी अगर दुःखीकष्टी होऊन जाल.क्षणिक सुखाचे पर्यवसान कायमच्या दुःखात होणे शक्य असते.
क्षणिक आनंदाच्या जीवनात असणाऱ्या प्रक्षुब्धतेपेक्षा वाटणाऱ्या जोमापेक्षा,सतत टिकणाऱ्या सुखाची शांत स्थिती अधिक चांगली.म्हणून स्थूल व क्षुद्र शारीरिक आनंदापेक्षा वेगळा असा एक नवीन शांत मनाचा आनंद तो शिकवू लागला; या जीवनातील गोंधळ च सुख-दुःखे यांकडे अनासक्त व अत्रस्त दृष्टीने पाहणे, पाण्यातील कमळाप्रमाणे अलिप्त राहणे.
एपिक्यूरस म्हणे,हे जीवन म्हणजे एक कटू देणगी आहे.ती इतकी कटू आहे की,जीवनात आपण रडत ओरडत येतो व रडत ओरडतच जीवन सोडतो. 'आदि-अंती दुःखप्रद' असे हे जीवन आहे.पण आपल्या या दुःखातूनही सुख निर्मिता येईल.म्हणून आपण दुःखाला सुखाची जननी करू या.गत दुःखाच्या आठवणी आपणाला मागाहून सुखप्रद वाटत नाहीत का?
"म्हणून थोडा विनोद शिका;विनोदी,मोकळी वृत्ती ठेवण्याचा यत्न करा.जरा प्रमाणबद्धता शिकलात म्हणजे हे साधेल.दुःख आले तर त्या दुःखाचेच अती करीत नका बसू. 'यायचेच की जरा दुःख ! बदल नको का काही!' असे गमतीने म्हणा.आपणांसभोवतालचे हे अनंत विश्व बघा,म्हणजे आपल्या चिंता व आपली दुःखे ही इतकी क्षुद्र वाटतील की,तुम्हाला हसूच येईल.
स्वतःला जीवनाच्या विराट नाटकातील एक पात्र समजून सुखदुःखे भोगावयाला,एवढेच नव्हे,तर एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे आपल्या दुःखांकडे बघून जरा हसावयाला शिका."
"वासना, इच्छा कमी करा. त्यांना मर्यादा घाला.गरजा कमी करा.जे मिळाले आहे.त्यात समाधान माना.
महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे शक्य नसेल,तर जेवढे मिळणे शक्य असेल तेवढ्याचीच महत्त्वाकांक्षा धरा. फार उच्च महत्त्वाकांक्षा बाळगून त्या फलद्रूप होणार नसतील तर त्या जरा कमी उंच करा."
एपिक्यूरस स्वतः साधा मनुष्य होता.तो आपल्या कोणीही अनुयायांपेक्षा कमी एपिक्यूरियन होता. त्याला लालसा नव्हती,
सुखाची ओढ नव्हती.साधी ज्वारी-बाजरीची भाकरी त्याला पुरे होत असे; पण ती कोणा मित्राबरोबर खावी असे त्याला वाटे.
खाताना एखादा मित्र बरोबर असला म्हणजे झाले; मग त्याला आणखी काही लागत नसे. आपण काय खाणार, यापेक्षा कोणाबरोबर खाणार हीच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे.असे तो म्हणे.एपिक्यूरस सर्वांचा मित्र होई.मैत्री जोडण्यात तो अद्वितीय पुरुष होता.मैत्री कशी जोडावी हे तोच जाणे. आपल्या सुखात सर्वांना सहभागी करणे हाच सुखी होण्याचा खरा मार्ग होय.आपले सुख सर्वांना द्या.असे करणे मोठे उदारपणाचे अगर उदात्तपणाचे आहे म्हणून मात्र नव्हे; तर जरुरीचे आहे म्हणून आपल्या जगण्यात शहाणपणा नसेल,न्यायीपणा नसेल,गोडपणा नसेल, तर आपणास आनंदाने जगता येणार नाही,सुखासमाधानाने नांदता येणार नाही.प्राचीन काळातील कन्फ्यूशियस प्रमाणे व आपल्या काळातील बर्ट्रेंड रसेलप्रमाणे एपिक्यूरस शहाणा व अविरोधी स्वार्थ शिकवित असे.
तो म्हणे, "जर दुसऱ्यांनी आपल्या सुखाआड येऊ नये असे तुम्ही इच्छित असाल तर तुम्हीही दुसऱ्यांच्या सुखाआड येऊ नये.
स्वतःला अपाय होऊ नये म्हणून तरी दुसऱ्यास अपाय करू नका.तुम्हाला त्रास नको असेल, तर दुसऱ्यांसही त्रास देऊ नका.
स्वतः जगा आणि दुसऱ्यासही जगू द्या.प्रक्षुब्धता टाळा.उगाच धोके पत्करू नका.युद्धाच्या रानवटपणापासून दूर राहा. राजकारणाच्या घाणीत नका शिरू.प्रेमाचा अतिरेक नको,तसा अती द्वेषही नको.मैत्रीचा गोड गुण जोडा.मैत्री जोडणे हा धर्म माना.मैत्रीची पूजा करा.कारण मैत्री ही अत्यंत मधुर,अती पवित्र व सुंदर वस्तू आहे.या जगात निश्चितपणे सुखाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे खऱ्या मैत्रीने मिळणारी सहानुभूती.बाकी सारे कितपत किमतीचे आहे.याविषयी शंकाच आहे; पण मैत्रीचा आनंद ही मात्र निःशंक गोष्ट आहे. जीवनातील दुःख क्लेशांमुळे आपण मरणालाही मिठी मारतो,त्याप्रमाणे मैत्रीच्या आनंदासाठी हे जीवन कितीही कटू वाटले, तरी आपण त्याला कवटाळू या."
एपिक्यूरसला मित्रांचे सुख होते म्हणूनच त्याला साऱ्या आपत्ती सुखाने सहन करता आल्या.दारिद्र्य, प्रियजनांचा वियोग,
दुखणी,यामुळे त्याचे जीवन खरोखरच निःसार झाले होते.पण मृत्यूशय्येवरूनही तो आपल्या एका मित्राला पुढील पत्र लिहिताना दिसतो; "माझ्या आयुष्यातला हा शेवटचाच सुखाचा दिवस आहे.आणि मी तुला लिहीत आहे.मला मूत्राशयाचा रोग झाला आहे.वेदना इतक्या होत आहेत की,याहून आणखी काही दुःखदायक असू शकेल,असे मला तरी वाटत नाही.पण या अपरंपार दुःखाच्या विरुद्धबाजूच्या पारड्यात आपण कितीदा प्रेमाने बोललो व एकत्र अनेक गोष्टी केल्या त्यांच्या प्रेमळ स्मृतींचा आनंद घेतला की हे असीम दुःखही मला नसल्यासारखेच वाटते.दुःखाचे पारडे हलके होते."
आयुष्याच्या त्या शेवटच्या दिवशी त्याने या ओळी लिहिल्या व एकाहत्तर वर्षांपर्यंत रोज रात्री तो ज्याप्रमाणे डोळे मिटीत असे,त्याचप्रमाणे त्याने त्या रात्रीही शांतपणे,समाधानाने व सहजतेने डोळे मिटले, ते कायमचे.दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठू की न उठू; जागे होऊ की कायमचेच झोपी जाऊ,याचे त्याला काय होय ? तो जागा झाला असता वा कायमचा झोपी गेला असता,तरी त्याला असा काय मोठासा फरक वाटणार होता? जीवन-मरण, दोन्ही त्याला जणू सारखीच सुखप्रद होते !
२४.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग…!