* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: स्वतःची सुटका करा.Free yourself.

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

४/२/२५

स्वतःची सुटका करा.Free yourself.

आपण हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी जर आपल्याला आपलं योगदान द्यायचं असलं तर त्यावर विचार करण्यासाठी विनाव्यत्यय सर्वोच्च योगदान आणि कोणत्याही मानसिक दडपणाशिवायचा एकांतवास आणि अवकाश आपल्याला मिळायला हवा हे त्यांना पूर्णपणे माहीत होतं.इथे आपल्याला सर आयझॅक न्यूटन यांचं उदाहरण घेता येईल.त्यांनी सातत्याने दोन वर्षं ज्या सिद्धांतावर काम केलं,त्यातूनच पुढे 


'प्रिन्सिपिया मॅथमॅटिका'चं सुप्रसिद्ध लेखन आकाराला आलं.पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि गतीचे तीन नियम यांच्या संबंधीची महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण एकांतवासाच्या त्यांच्या कालावधीतूनच लोकांसमोर आली.याच माहितीतून पुढील तीनशे वर्षांमध्ये जबरदस्त अशा शास्त्रीय विचारसरणीचा आधार अवघ्या जगाला मिळाला.


रिचर्ड एस.वेस्टफॉल यांनी लिहिलं आहे :ज्या काळात न्यूटन साऱ्या जगाच्या कौतुकाचा विषय झालेले होते, त्या वेळी त्यांना विचारलं गेलं होतं की,"गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी कसा लावला?" त्यांचं उत्तर होतं,"यावर आणि फक्त यावरच सातत्याने विचार करून." ज्या गोष्टीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं,त्यावरच ते अविरतपणे विचार करत होते.ज्याचं वर्णन अनन्यसाधारण पद्धतीने असं करता येईल.किंबहुना 'जवळ जवळ अनन्यसाधारणपणे' असंही म्हणता येईल. जरा वेगळ्या शब्दांमध्ये हे मांडायचं म्हटलं,तर 'सखोल विचारप्रक्रियेसाठी न्यूटन यांनी स्वतःसाठी 'अवकाश' निर्माण केला,आणि या विनाव्यत्यय कालावधीने त्यांना या विश्वाचे महत्त्वपूर्ण गुणधर्म शोधून काढण्याची क्षमता दिली."


न्यूटन यांच्या कामाच्या पद्धतीने प्रभावित होऊन मी पण त्यांच्या इतक्या तीव्रपणे नाही,तरीही त्यांचा आदर्श समोर ठेवून जास्तीत जास्त एकाग्रतेने आणि स्वतःसाठी वेगळा वेळ राखून ठेवत हे पुस्तक लिहायचं ठरवलं. दिवसाचे आठ तास मी फक्त लेखन करायचा निर्धार केला.पहाटे ५:०० वाजल्यापासून ते दुपारी १:०० वाजेपर्यंतचा वेळ माझ्या लेखनासाठी असणार होता.


आठवड्यातले पाच दिवस मी लेखनाला देणार होतो. त्यासाठी मी काही नियम ठरवले. ई-मेल्स, फोन, कुणालाही अपॉईंटमेंट देणं आणि कुठल्याही प्रकारचा व्यत्यय,या गोष्टींना या आठ तासांमध्ये पूर्णपणे मज्जाव करणं माझ्यासाठी गरजेचं होतं.मी जे ठरवतो,तसं दर वेळी घडतंच असं नाही,पण तरीही या स्वतःवर लादून घेतलेल्या शिस्तीचा बराच फायदा झाला.ई-मेल्स पाठवणाऱ्यांसाठी मी त्यात एक सेटिंग करून घेतलं होतं,

ज्याच्यामुळे माझं पुस्तक पूर्ण होईपर्यंत मी 'मॉन्क मोड'मध्ये असल्याचं त्यांना कळणार होतं! याचा थोडक्यात अर्थ असा की,त्या काळात मी स्वतःवर घालून घेतलेली जास्त प्रमाणातली शिस्त,मनाची एकाग्रता,निर्मितीक्षमता,काही एक ध्येय मनाशी ठरवणं, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या होत्या.या पद्धतीने मी वागायचं ठरवलं,त्याचा मला किती मोठ्या प्रमाणावर फायदा झाला,त्याचं शब्दात वर्णन करणंसुद्धा अशक्य आहे.मला हवं होतं त्या प्रकारचं स्वातंत्र्य या काळाने मला भरभरून दिलं.सखोल चिंतन आणि मनन, विचारप्रक्रिया आणि लेखन यांच्यासाठी माझा असा जो अवधी मी तयार केला होता,त्यामुळे माझं पुस्तक तर खूपच झपाट्याने लिहून झालं,पण माझा उरलेला वेळ मी कसा घालवतो यावरही मला नियंत्रण ठेवणं जमायला लागलं.


हे खरं तर सगळ्यांच्याच बाबतीत घडतं,पण तुमच्या व्यस्त दिनक्रमातून तुम्ही शेवटचा स्वतःसाठी असा वेळ कधी बाजूला काढून ठेवला होता? स्वस्थ बसून फक्त विचार करण्यासाठी? सकाळी कामावर जाता जाता दिवसभरात तुम्हाला काय काय करायचंय,त्याची नोंद करून ठेवणं किंवा तुम्ही हजर असलेल्या मीटिंगमध्येच काही वेळ तुमचं मन भरकटून ते दुसऱ्या प्रकल्पात अडकणं या गोष्टी मला इथे अभिप्रेत नाहीयेत.मी तुम्हाला विचारतोय,ते विनाव्यत्यय मोकळा वेळ आणि तुमचं चित्त विचलित होणार नाही,तुम्ही फक्त विचार आणि विचारच करू शकाल,अशा फक्त तुमच्या असलेल्या अवधीविषयी !


मला माहीत आहे की सध्याच्या आपल्या या यंत्रयुगात, अति जास्त प्रमाणात चलनवलन सुरू असलेल्या जगात हे अर्थातच खूप कठीण आहे.एकदा ट्विटरच्या एका प्रमुख व्यक्तीने मला विचारलं होतं,"कंटाळा येणं म्हणजे काय? या गोष्टीची तुम्हाला अलिकडे आठवण तरी येते का? कारण आता कंटाळा येण्याइतका वेळच आपल्याजवळ उरलेला नाहीये." 


खरंय त्याचं म्हणणं.अगदी काही वर्षांपूर्वी असं चित्र बघायला मिळत होतं.तुमचं विमान ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा निघणार असेल,किंवा एखाद्या डॉक्टरच्या प्रतीक्षा कक्षात तुम्ही तुमचा नंबर येण्याची वाट बघत असाल, तर इथे तिथे बघत राहणं किंवा खूप कंटाळा येणं या गोष्टी आपोआपच घडत असत.आज चित्र बदललं आहे. विमानतळावर आपलं विमान सुटण्याच्या प्रतीक्षेत असलेली किंवा एखाद्या प्रतीक्षालयात ताटकळत बसलेली प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फोन,लॅपटॉप किंवा तशाच प्रकारच्या एखाद्या गोष्टीत रमून गेलेली दिसते. कारण अर्थातच कुणालाच कंटाळून नुसतं बसायला आवडत नाही.पण कंटाळा येऊ नये म्हणून आपण ज्या दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टी करण्याच्या मोहात पडतो, त्यामुळे सखोल विचार करून एखादी गोष्ट करण्याची प्रक्रियाच आपल्या बाबतीत घडत नाही.


✓ इथे आणखी एक विरोधाभास दिसून येतो. आजूबाजूच्या व्यस्त जगात सगळ्या गोष्टी इतक्या जलदगतीने घडत असताना आपल्याला मात्र आपल्या दैनंदिन जीवनात स्वतःसाठी मोकळा वेळ,विचार करण्यासाठी अवधी मिळणं यांची अधिकाधिक निकड भासते आहे.सर्वत्र गलबला माजला असतानाच आपल्याला स्वतःसाठी शांतपणे विचार करण्यासाठी, मन एकाग्र करता यावं यासाठी मोकळा अवकाश तयार करून घेणं गरजेचं होतंय !


आपला दिनक्रम कितीही व्यस्त असला तरीही त्यातून आपल्याला स्वतःसाठी थोडा तरी मोकळा वेळ,आपला स्वतःचा स्वतंत्र अवकाश निर्माण करणं खरं तर शक्य असतं.लिंक्डइनचे सीईओ जेफ वायनर यांचच उदाहरण पाहू या.प्रत्येक दिवशी ते स्वतःसाठी दिवसातले दोन तास बाजूला ठेवतात.मात्र या वेळात कोणतंच काम किंवा इतरही काही गोष्टी ते करत नाहीत.ही एक साधीशी सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली आहे.कारण एकापाठोपाठ एक मीटिंग्जमधून आपल्याला नेमकं काय साधायचं आहे,कोणतं काम कशाप्रकारे पुढे न्यायचं आहे,या बाबतीत विचार करायला त्यांना क्षणभरही फुरसत मिळेनाशी झाली होती.


सुरुवातीला त्यांना वाटत होतं की आपण स्वतःचे जरा जास्तच लाड करतो आहोत.त्यात आपल्या हाती असलेला वेळ वाया जातोय.पण नंतर हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागलं.आपण करतोय ते बरोबर आहे,याची त्यांना जाणीव झाली. आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्यातली निर्मितीक्षमता आपल्याला या आणि फक्त याच मागनि जाताना सापडणार आहे हे त्यांना जाणवायला लागल. स्वतःच्या दिवसभरातल्या वेळावर आता आपली सत्ता आहे, आपण आता त्या वेळाचे गुलाम उरलेलो नाही, ही भावना त्यांना आता समाधान देते आणि त्यासाठी आपण अनुसरलेल्या मार्गाची ही सुरुवात आहे याची त्यांना पूर्णपणे खात्री आहे. या संदर्भात त्यांनी माझ्याजवळ खुलासा केला तो असाः


 "एक दिवस मला असा आठवतोय की,परिस्थितीच्या रेट्याने असेल किंवा इतर काही कारणाने असेल,पण सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत मी एकतर कॉन्फरन्स कॉल्सवर तरी होतो,नाही तर एकामागून एक होणाऱ्या मीटिंग्जमध्ये तरी ! मला आठवतंय की त्या दिवशी रात्री मी कमालीचा वैफल्यग्रस्त झालो होतो.मी दिवसभरासाठी आखलेल्या वेळापत्रकाचा माझ्यावर जराही ताबाच उरला नव्हता. उलट त्या वेळापत्रकाला मीच वेठीला धरलं होतं.पण नंतर मला लगेचच त्या वैफल्यग्रस्ततेचे आभार मानावेसे वाटले.कारण त्या भावनेनेच मला माझ्या तशा प्रकारच्या दिवसांमधून बाहेर पडायला मदत केली.मी सध्या ज्या प्रकारे माझा दिवस आखून घेतला आहे,जी भूमिका मी त्या दिवशी स्वीकारली,तिच्यामुळे तो तशा प्रकारचा दिवस माझ्यासाठी शेवटचाच ठरला."


हा जो अवकाश त्यांनी आता जाणूनबुजून स्वतःसाठी तयार केला आहे,त्याच्यामुळे त्यांच्या मनातल्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांविषयी विचार करायला त्यांना आता सवड मिळाली आहे."पुढल्या तीन ते पाच वर्षांत आपल्या कंपनीचं स्वरूप कसं असेल? सध्याच्या आपल्या आधीच लोकप्रिय असलेल्या उत्पादनात आणखी कोणकोणत्या प्रकारच्या सुधारणा करता येतील? किंवा मग ग्राहकांची एखादी आजपर्यंत पूर्ण न करता आलेली गरज कशा प्रकारे पूर्ण करता येईल?" अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना आता शोधता येतात.आपल्या स्पर्धकांपेक्षा वेगळं काही तरी करून आपल्या उत्पादनांची गुणवत्ता,त्यांच्यातलं वेगळेपण,यांच्यात अधिक वाढ कशी करता येईल ? तसंच एखाद्या उत्पादनात काही कमतरता आढळली,तर ती कशा प्रकारे भरून काढता येईल ? असे अनेक प्रश्न हाताळायला त्यांना वेळ मिळतो.मानसिकदृष्ट्या स्वतःला अधूनमधून ताजंतवानं करण्यासाठीसुद्धा त्यांनी राखून ठेवलेला हा वेळ ते वापरतात.यामुळे फक्त समस्या सोडवण्याच्या विचारांपुरताच या वेळेचा उपयोग न करता त्यांच्या टीमचे प्रमुख या नात्याने टीममधल्या लोकांना प्रशिक्षण देण्याचं कामही ते करतच असतात.


स्वतःसाठी असा स्वतंत्र,वेगळा वेळ बाजूला काढून ठेवणं हा आता जेफ यांच्यासाठी फक्त सवयीचा भाग उरलेला नाही.त्यामागे एक सखोल विचारधारा आहे. अधिकाचा हव्यास,अधिकाचा पाठलाग,

आणि तोही बेशिस्तपणे केलेला,कोणत्याही संस्थेसाठी किती घातक ठरू शकतो,त्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतात, संस्थांच्या वरिष्ठांच्या आयुष्यावरही त्याचे किती विपरित परिणाम होऊ शकतात,ते त्यांनी प्रत्यक्षपणे अनुभवलं होतं.आणि म्हणूनच त्यांच्यासाठी अशा त-हेचा अवकाश ठेवणं ही एक विचारधारा आहे.एखादी घोषणा किंवा वापरून गुळगुळीत झालेली म्हण अथवा वाक्प्रचार नाही.


वाचनासाठी स्वतंत्र अवकाश ठेवा...!


अशाच प्रकारचे आणखी एक स्फूर्तिदायक उदाहरण आपल्याला सीईओ बिल गेट्स यांच्या विचारपद्धतीत दिसून येतं. गेट्स अगदी नियमितपणे (आणि हे सगळ्यांना माहीत आहे) एखादा आठवडा सुट्टी घेतात. मायक्रोसॉफ्टमधली त्यांची दैनंदिन कर्तव्यं या काळात ते बाजूला ठेवतात ते फक्त विचार करण्यासाठी आणि वाचन करण्यासाठी ! 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन'च्या सिॲटल वॉशिंग्टन इथल्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गेट्स यांच्या बरोबरच्या प्रश्नोत्तरांच्या सत्राला मी एकदा हजर राहिलो होतो. योगायोगाने त्यांचा तो विचार करण्याचा आठवडा नुकताच पूर्ण झालेला होता.त्यांच्या या पद्धतीबद्दल मी ऐकलेलं होतं,तरी मला हे माहीत नव्हतं की,


१९८० सालापासूनच त्यांचा हा परिपाठ होता आणि मायक्रोसॉफ्टचा आजचा जो प्रचंड विस्तार झाला आहे, तिथवर ही कंपनी पोहोचेपर्यंतच्या काळातही ते कधी त्यापासून ढळले नाहीत.


याबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेताना लक्षात येतं की,

कंपनीच्या इतिहासातल्या सर्वाधिक व्यस्त आणि सर्वाधिक गडबड गोंधळाच्या काळातसुद्धा गेट्स वर्षातून दोन वेळा एक एक आठवडा स्वतःसाठी वेळ, स्वतःसाठी अवकाश राखून ठेवत होते. स्वतःला सगळ्यांपासून वेगळं ठेवत होते.त्या एकांतवासाचा उपयोग त्यांनी अनेक लेखांच्या (११२) आणि पुस्तकांच्या वाचनासाठी,तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेण्यासाठी आणि आणखी काही तरी भव्यदिव्य करण्यासाठी केला.आजही त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा दैनंदिन कारभार चालवताना मधेमधे येणाऱ्या, चित्त विचलित करणाऱ्या अनेक गोष्टींपासून बाजूला जाण्यासाठी,फक्त विचार करण्यासाठी ते आवर्जून सवड काढतात.एक पूर्ण आठवडा बाजूला काढून ठेवणं अवघड किंवा अशक्य वाटत असेल,तर तुमच्या दैनंदिन दिनक्रमातूनच रोज थोडासा वेळ 'विचार करण्याचा आठवडा' समजून बाजूला काढण्याचेही काही मार्ग आहेत.मला उपयुक्त वाटलेली एक पद्धत म्हणजे, पहिली वीस मिनिटं फक्त चांगल्या आणि दर्जेदार साहित्याच्या वाचनात घालवावीत.(छोटे-मोठे लेख, वर्तनमानपत्र,

किंवा नवीनच बाजारात आलेली,पण वाचकांकडून फारशी मागणी नसलेली कादंबरी,हे सर्व टाळावं.) सकाळी उठल्याबरोबर ई-मेल्स बघण्याची माझी सवय या वाचनाने पुरती बदलून तर टाकलीच, शिवाय हे वाचन माझ्या दिवसाच्या सुरुवातीचा केंद्रबिंदू झालाय.

त्याच्यामुळे माझा दृष्टिकोनही विस्तारला गेलाय आणि कठीण प्रसंगांमध्ये गरजेच्या असलेल्या काही उपयुक्त गोष्टी आणि कल्पना सुचण्यासाठी मला त्यांची मदतही झाली.प्रेरणादायी साहित्याला माझी नेहमीच पहिली पसंती असते.पण तरीही याबाबतीत प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असू शकते. तरीही ज्यांना अशा प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं,त्यांच्यासाठी काही वाचनीय पुस्तकांची नावं मी सुचवू शकतो- 


Zen, the Reason of Unreason, The Wisdom of Confucius, The Torah, The Holy Bible, Tao, to Know and Not Be Knowing, The Meaning of the Glorious Koran: An Explanatory Translation; As a Man Thinketh, The Essential Gandhi, Walden, or, Life in the Woods, The Book of Mormon, the Meditations of Marcus Aurelius, Upnishads. 


अशाच त-हेची आणखीही असंख्य पुस्तकं आहेत. यातलं कुठलंही पुस्तक निवडून ते वाचा.तुमची खात्री पटेल की ही पुस्तकं आपल्या सध्याच्या मुबलक संपर्कसाधनांच्या युगाच्याही कित्येक वर्षं आधी लिहिली गेली आहेत आणि तरीही ती कालातीत आहेत. नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत,याचे आपल्या मनाशी जे अंदाज आपण बांधलेले असतात, त्यांना अशा तहेचं साहित्य नक्कीच आव्हान देतं.


तुमच्या दिवसातले दोन तास,वर्षातून दोन आठवडे किंवा रोज सकाळी पाच मिनिटं,यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.महत्त्वाचं आहे ते फक्त तुमच्या व्यस्त आयुष्यातून थोडासा अवकाश तुम्ही स्वतःसाठी निर्माण करणं !


०२.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग…।