अंघोळ आटोपून अनिरुद्ध घाईघाईतच बाहेर आला.
गुंडाळलेला टॉवेल बेडवर फेकत बायकोला आवाज दिला, "राधा,माझा टिफीन लवकर भर. मला आज लवकर जायचं आहे ऑफिसला."
"अरे,तू लवकर जाणार आहेस, शहे आधी का सांगितलं नाहीस?" भांबावलेल्या राधिकानं विचारलं.
"सगळ्या गोष्टी मी तुला विचारूनच केल्या पाहिजेत का?" असं तावातावानं म्हणतच त्यानं कपडे घातले.
"अरे, म्हणजे मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात केली असती ना. तू हा नाष्टा घे,तोवर मी लगेच दोन चपाती लाटते.भाजी फोडणी टाकलीच आहे.तुझा चहा पिऊन होईपर्यंत टिफीन तयार करते," असं म्हणत राधिकानं हातातली पोह्याची प्लेट टेबलवर ठेवली आणि एक प्लेट सासूबाईंच्या हातात दिली. आपली प्लेट मात्र झाकून ठेवली.
शेगडीवर एका बाजूला चपातीसाठी तवा ठेवला. दुसऱ्या बर्नरवर अगोदरच भाजीची कढई होती. कणकीला हात लावण्यापूर्वी मीठ टाकायला भाजीवरचं झाकण काढलं,तर तिच्या दोन्ही बोटांना चटका बसला. तोवर अनिरुद्धची हाक आली, "माझा रुमाल कुठं आहे?"
"कपाटात आहे ब्ल्यू पँटच्या शेजारी..." राधिकानं किचनमधूनच सांगितलं.टाय सावरत अनिरुद्ध टेबलजवळ आला.खांद्याला अडकविलेली लॅपटॉपची बॅग शेजारच्या खुर्चीवर ठेवली.हातातला सॉक्स पायात चढवत पुटपुटला "काल रात्री उशिरापर्यंत मीटिंग घेऊनपण आज लवकर बोलवलंय.ह्या सायबालापण ना.मुद्दाम मलाच असं करतो..."
"काय झालंय इतकी चिडचिड करायला?" समोर बसलेल्या आईनं पोहे खात खात विचारलं.
"काही नाही गं.एका प्रोजेक्टची डेडलाईन संपत आलीय;पण काम खूप शिल्लक आहे.काल बॉस इतका वेळ बडबडत होता ना,वाटलं त्याच्या तोंडावर राजीनामा फेकून मारावा;पण घराचा आणि गाडीचा हप्ता चालू आहे तोपर्यंत नो रिस्क ! हा प्रोजेक्ट जर वेळेवर पूर्ण झाला तर प्रमोशन होईल. जरा पगार वाढला की कार बदलावी म्हणतोय."
"होईल रे बाबा प्रमोशन.मी देवाला साकडं घातलंय, तू बघच..." आईनं आश्वस्त केलं.
"अगं आई,पण तो रोहन टपलाय ना माझ्या वाईटावर.सारखा बॉसकडं कागाळ्या करत असतो." असं म्हणत अनिरुद्धनं पोह्याची प्लेट उचलली.पहिला घास तोंडात घातला.दोन वेळा चघळून थू.. थू करीत राधिकाकडं बघत किचनमध्येच धुंकला. "बावळटा,पोह्यात मिठाची चिमूट घातलीय का आख्खा डबा ओतलाय.रात्री आमटीत मीठच नव्हतं,तर आता पोहे खारट करून ठेवलंस.तुझ्या आई-बापानं कधी तुला स्वयंपाक करायला शिकवला नाही का..?"
अनिरुद्धच्या संतापानं अधिकच गोंधळलेली राधिका म्हणाली, "अरे पण मी थोडंसंच घातलेलं."
"मग तूच खा ते..." असे म्हणून अनिरुद्धनं उरलेलं पोहे राधिकाच्या अंगावर फेकून दिलं आणि बॅग घेऊन पाय आपटतंच बाहेर निघाला.
"अरे आणि,डबा तर घेऊन जा..." एका हातात डबा आणि दुसऱ्या हातानं डोळ्यांवर आलेलं केस नीट करीत ती अनिरुद्धच्या मागून पळतच आली.
"तूच खा तुझं बेचव जेवण..." असं म्हणत अनिरुद्धनं दरवाजा खाडकन् ओढून घेतला.
आई शांतपणे बसून सगळा तमाशा बघत होत्या.
"आई,खरंच पोहे खारट झालेत का हो? तुम्ही खाल्ले ना..." रडवेल्या सुरातच राधिकानं विचारलं.
"पोहे नीट भिजवायला येत नाहीत का तुला? एखाद्या घासात मिठाचा खडा तसाच राहिला असणार.एवढ शिकून काय उपयोग.साधे पोहे करता येत नाहीत.गेलं ना माझं लेकरू उपाशी...' आईनं टोमणा मारला.
एवढ्या आपुलकीनं आणि कष्टानं हे सारं करूनही दोघांनीही तिला फटकारून बोललेलं सहन न झालेली अनिता संतापली आणि म्हणाली,"माझ्या आई-वडिलांनी मला इंजिनिअर केलं होतं.पोहे करायच्या कोर्सला पाठवलं नव्हतं.तुमची लेक तर किचनमध्ये पायच ठेवत नाही.तिला स्वयंपाक शिकवायला काय झालं होतं?"
"तिच्या घरी स्वयंपाकाला बाई आहे आणि माझी लेक नोकरी करते."
वाघीण-प्रतिक पाटील-स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर
"मीपण नोकरी करीत होते.तुम्ही बाळाला सांभाळत नाही म्हणून मला घरी बसावं लागलं."
"पोरं संभाळायला होत नाहीत,तर जन्माला कशाला घालायची..?"
"तुम्हालाच हवा होता ना वंशाला दिवा !"
"मग झाला का? मुलगा हवा होता आम्हाला."
"अच्छा म्हणजे मुलगी झाली म्हणून तुम्ही असं वागताय;पण यात माझी काय चूक आहे?"
"जी चूक झाली आहे ती आधी निस्तर.माझा मुलगा उपाशीपोटी गेलाय,त्याला आधी डबा देऊन ये." सासूनं ठेक्यात सांगून नाक मुरडलं आणि पदर खांद्यावर सावरत निवांत बसून उरलेलं पोहे खायला सुरुवात केली.
सासूकडं रागानं बघत कोपरापासून हात जोडलं आणि ती ताडकन् किचनमध्ये गेली.
करपलेली चपाती तव्यातून बाहेर काढून गॅस बंद केला.किचनभर पडलेले पोहे तिनं गोळा केलं आणि ती अंघोळीला गेली.अंघोळ झाल्या झाल्या लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली.
अनिरुद्धनं वाटेत टपरीवरच इडली सांबार खाल्लं आणि ऑफिस गाठलं.तरीही त्याला पोहोचायला दहा मिनिटे उशीर झाला.बॉस अजून यायचा होता.
अनिरुद्धचा खास दोस्त आणि कलिग संदेश पाठीमागून आला आणि,"अन्या चल नाष्टा करूया. सकाळी लवकर येण्याच्या नादात घरी काही खाल्लं नाही.मग सोबत बायकोनं डबा दिलाय.चल खाऊया थोडं थोडं."
"नशीबवान आहेस रे तू.. किती काळजी घेतात वहिनी!"
घरोघरी मातीच्या चुली ही म्हण शाळेमध्ये असताना तोंडपाठ केलेली असायची,कारण म्हणी व त्याचा अर्थ सांगा असा प्रश्न असायचा.पेपरमध्ये उत्तर दिले.त्याचा गुण मिळाला..पण आज ही गोष्ट वाचल्यानंतर त्याचा खरा अर्थ कळाला.आपण ही गोष्ट आवर्जून वाचावी…विजय गायकवाड
उर्वरित शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..।