कसे मारावे हे माणसांना अलेक्झांडरने शिकविले,कसे जगावे हे त्यांना तत्त्वज्ञान्यांनी शिकविले.१९१४ सालच्या महायुद्धामुळे ज्याप्रमाणे तरुण पिढीच्या डोळ्यांसमोर भ्रमपटले दूर झाली,
त्याचप्रमाणे प्राचीन काळी अलेक्झांडरच्या जागतिक युद्धांमुळे नवीन पिढी निर्भान्त झाली.जे संशयात्मे होते,ते जीवनाच्या मूल्यांविषयी व देवाच्या विचित्र लहरींविषयी प्रश्न करू लागले.जे निरर्थकवादी होते,कशातच काही अर्थ नाही असे म्हणणारे होते,ते सर्व मानवी आशा-आकांक्षांची टर उडवू लागले.विरून जाणाऱ्या चंचल ढगांच्या पाठोपाठ पळत जाण्याप्रमाणे,मावळणाऱ्या इंद्रधनुष्याच्या पाठीमागे लागण्याप्रमाणे,या आपल्या आशा-आकांक्षा निष्फळ ठरणार आहेत;म्हणून त्यांच्यासाठी धडपडण्यात काही अर्थ नाही,असे ते म्हणत निराशावादी व दुःखवादी तत्त्वज्ञानी तर याच्याही पलीकडे जाऊन म्हणत,
"हे जीवन जरी कितीही सुखमय व आनंदपूर्ण दिसले तरी तिथे दुःखाची नांगी आहेच;अत्यंत आनंदाच्या क्षणातही दुःख लपलेले असते;प्रत्येक फुलात डंख मारणारी गांधीलमाशी असते; प्रत्येक सुखाभोवती दुःखाचा विळखा असतो! दोन झोपांमधे एक अत्यंत कटुस्वप्न म्हणजे जीवन ! जीवनाआधी शून्य;जीवनानंतरही शून्य ! दोन शून्यावस्थांमधला क्षणिक बुडबुडा म्हणजे जीवन ! हा बुडबुडा जितक्या लवकर फुटेल,हे स्वप्न जितक्या लवकर विराम पावेल,भंगेल, तितके चांगलेच."
हेगेसियस नावाचा एक अत्यंत निराशावादी व दुःखवादी तत्त्वज्ञ होता.तरुणांनी करण्यासारखी सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे आत्महत्या,हे आपल्या विद्यार्थ्यांस पटवून देण्यासाठी तो सारखी खटपट करी.ही गोष्ट प्रतिपादण्यात त्याने सारे आयुष्य वेचले,पण तो स्वतः मात्र ऐंशी वर्षांचा होऊन अगदी स्वाभाविकपणे हे जग सोडून जाण्याची पाळी येईपर्यंत जगला! आत्महत्या करा असे तो लोकांना सांगे,पण त्याने स्वतः मात्र कधीही आत्महत्येचा प्रयत्नही केला नाही.त्याला जेव्हा कोणीतरी असा प्रश्न केला की,'जे तुम्ही लोकांना उपदेशिता ते स्वतःच कृतीत का आणीत नाही?' तेव्हा त्याने उत्तर दिले,"मला माझ्या इच्छेविरुद्ध मोठ्या कष्टाने व दुःखाने जगावे लागते आहे.मरणे किती चांगले हे लोकांना पटवून देण्यासाठी तरी जगणे मला भाग आहे! काय करावयाचे ?"
या तत्त्वज्ञान्यांच्याविरुद्ध दुसरा एक अशा तत्त्वज्ञान्यांचा वर्ग होता की,त्यांना निरर्थक दिसणाऱ्या या जीवनातही आशा-तंतू दिसल्यासारखा वाटे.जीवनाच्या या अर्थहीन दिसणाऱ्या विणावटीतही बुद्धिमान अशा विणकराचा हात दिसतो,असे ते म्हणत. या जीवनात काहीतरी हेतुमयता,योजकता आहे,हे अगदीच निःसार व पोकळ नाही.यात थोडाफार अर्थ आहे,असे त्यांना वाटे.ते 'सर्वसह'वादी स्टोइक म्हणत की,"हे जीवन आशीर्वादरूप आहे.आपणास जी संकटे वाटतात ती वस्तुतःती दुःखरूप नसून आपले मन अधिक खंबीर व गंभीर व्हावे,अधिक सामर्थ्यसंपन्न व काटक व्हावे म्हणून आपल्या मार्गात मुद्दाम टाकलेले अडथळे असतात;त्या संकटातही आईची मंगल कृपाच असते.
जे पापाची शक्ती मान्य करतात,त्यांच्यावरच जगातल्या दुःखांची व जगात जे जे असत् आहे,त्याची सत्ता चालू शकते; पापाची शक्ती मान्य करणारांनाच पाप अपाय करू शकते;
भुताला भिणाऱ्यांच्याच छातीवर भूत बसते. दुःखाला स्वतःची अंगभूत शक्ती नाही.दुःखाने रडणारा कोणीच न भेटला तर दुःख काय करील?तुमच्या दुबळेपणामुळेच दुःख प्रबळ आहे.त्या दुःखाचा इन्कार करा म्हणजे ते तुमच्यापुरते तरी नष्ट झाल्यासारखेच आहे."हे स्टोइक म्हणजे ख्रिस्तपूर्व जगातील आशावादी शास्त्रज्ञ.
यांच्या उलट दुसरे सुखवादी तत्त्वज्ञानीही होते. ते दुःख आहे असे मानीत.पण सुखोपभोगात रंगून माणसाने स्वतःला दुःखाचा विसर पाडावा असे शिकवीत,त्यांना 'उदरंभर तत्त्वज्ञ', 'शिश्नोदरपरायण तत्त्वज्ञानी'अशी नावे ठेवण्यात येत.त्यांना शांत व सौम्य अशा मानसिक व बौद्धिक आनंदापेक्षा प्रक्षुब्ध व मत्त करणारे शारीरिक आनंद आवडत.'खा, प्या, मजा करा,' हे त्यांचे ब्रीदवाक्य होते, 'उद्या एखादा अलेक्झांडर येईल व तुम्हाला मरावयास सांगेल, म्हणून मिळेल तेवढा क्षण सुखात घालावा.'असे ते सांगत. या न समजणाऱ्या जगात,या अनाकलनीय संसारात कसे वागावे हे न समजल्यामुळे हे सारे तत्त्वज्ञानी जणू प्रयोगच करू पाहत होते.या जगाशी कसे जमवून घ्यावे हेच जणू ते पाहत होते.कोणी दुःखावर भर देई;कोणी सुखावर कोणी दुःखेही आशीर्वादरूप असे सांगत,कोणी सुख मिळेल तेवढे भोगून पदरात पाडून घ्या असे सांगत.अलेक्झांडरने जी सारखी युद्धे पेटविली त्यांमुळे मानवी मन अस्वस्थ झाले होते.रबरी चेंडूप्रमाणे मानवी मन केव्हा या बाजूला तर केव्हा त्या बाजूला,केव्हा वर तर केव्हा खाली फेकले जात होते,केव्हा इकडे तर केव्हा तिकडे ओढले जात होते.कोणी त्याला आशेकडे ओढी तर कोणी निराशेकडे; कोणी त्याला भोगाकडे ओढी तर कोणी त्यागाकडे. कोणी म्हणे, 'दुःखे भोगा',तर कोणी सांगे, 'सुखे भोगा.' कोणी विषयलंपटतेचे तत्त्वज्ञान पसरवीत तर कोणी 'जे जे होईल ते ते पाहावे' असे सांगत.जगात धर्म राहिला नव्हता.जुन्या ईश्वराने मानवी व मनोरथांची वंचना केली होती व मानवजात ज्याच्यावर विश्वास टाकू शकेल असा नवीन ईश्वर अद्यापि लाभला नव्हता.'जुना ईश्वर गेला, नवीन ईश्वराचा पत्ता नाही,'अशी स्थिती होती.
परंतु या सुमारास सॅमॉस बेटात एक तरुण वाढत होता. त्याचे नाव एपिक्यूरस धर्म नसतानाही सुखी कसे व्हावे हे तो शिकविणार होता,देवदेवतांच्या मदतीशिवाय हे जीवन नीट कसे जगता येईल,हे शिकविणार होता.
एपिक्यूरस अलेक्झांडरच्या जन्मानंतर पंधरा वर्षांनी, म्हणजे ख्रि.पू.इ.स. ३४१ मध्ये जन्मला.त्याचा बाप अथीनियन होता.तो शिक्षकाचा धंदा करी.परंतु त्याला पगार फारच थोडा होता.त्यामुळे त्याच्या पत्नीला धार्मिक गंडे,मंतरलेले ताईत वगैरे विकून महिन्याची दोन्ही टोके पुरी करावी लागत.ती अंगारे- धुपारे,
जपजाप्य करून संसार चालवी.ती मनुष्यांना भुताखेतांपासून,
प्रेतांपिशाच्चापासून मुक्त करणारी बिनपदवीची वैदू होती.
लहानग्या एपिक्यूरसला आईच्या या फसव्या धार्मिक जादूटोण्यांत मदत करावी लागे.या गोष्टी पाहून त्याला बालपणीच धर्माविषयी मनापासून तिटकारा वाटू लागला.
अगदी तरुणपणीच आध्यात्माविषयी त्याची आवड व तीव्र बुद्धिमत्ता या दिसून आल्या.
एके दिवशी गुरुजी शिकविताना म्हणाले,"हे जग मूळच्या अव्याकृत प्रकृतीतून जन्माला आले." एपिक्यूरसने विचारले, " पण ती अव्याकृत प्रकृती कोणी उत्पन्न केली?"पंतोजी म्हणाले,"मला ठाऊक नाही.त्याचे उत्तर एखादा खरा तत्त्वज्ञानीच तुला केव्हातरी देईल."
त्याच क्षणी त्याच वेळी एपिक्यूरसने तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचे नक्की केले.ज्या अव्याकृत प्रकृतीतून हे प्रत्यक्ष जगत निर्माण झाले,ती मूळची अव्याकृत प्रकृती कोणी निर्मिली या प्रश्राचे उत्तर शोधून काढावयाचे,असे त्याने ठरविले.
वयाच्या अठराव्या वर्षी तो अथेन्सला गेला.ती त्याच्या पित्याची जन्मभूमी होती.तिथे तत्त्वज्ञानातील नाना पंथांशी व संप्रदायांशी त्याचा परिचय झाला,पण कोणत्याच विचारसणीकडे त्याचे मन आकृष्ट झाले नाही.नंतर तो पूर्वे कडे गेला.तो कित्येक वर्षे ज्ञानशोध करीत हिंडत होता.तो ज्ञानाचा यात्रेकरू झाला.पौर्वात्त्य देशांतील ज्ञानाच्या सोन्याच्या लगडी आणण्यासाठी तो मोठ्या उत्सुकतेने गेला व खरोखर ज्ञानसंपन्न होऊन वयाच्या पस्तिसाव्या वर्षी अथेन्सला परत आला. अथेन्सजवळच्या एका खेडेगावातील एक घर त्याने विकत घेतले.त्या घराभोवती बाग होती.
त्याने तिथे तत्त्वज्ञान शिकविणारी 'आकाशाखालची शाळा' उघडली.मोकळी,उघडी शाळा.
तत्त्वज्ञानाचे हे उघडे मंदिर स्त्री-पुरुष दोघांसाठीही होते. कोणीही यावे व शिकावे.ही संस्था फारच लवकर लोकप्रिय झाली.
एपिक्यूरसचे श्रोते त्याचे ईश्वरविषयक नवीन नवीन व आधुनिक पद्धतीचे विचार ऐकून डोलत, तन्मय होत.ते विचार ऐकून कधी त्याच्या मनाला धक्का बसे,तर कधी अपार आनंद होई.या विश्वाचे स्वरूप काय,मानवी भवितव्य काय,इत्यादी गहन गंभीर प्रश्नांवर तो बोले.भविष्यकालीन म्हणजेच मरणोत्तर जीवन अशक्य आहे हे तो अथेन्समधील तरुण-तरुणींना पटवून देई.भविष्यजीवन नसल्यामुळे शक्य तितके आनंद व रस या जीवनातूनच मिळविले पाहिजेत,हा विचार तो त्या तरुण श्रोत्यांच्या मनावर बिंबवी.या मिळालेल्या जीवनाचाच जास्तीतजास्त उपयोग करून घेतला पाहिजे.असे तो शिकवी व पटवून देई.आपल्या काळी तो अत्यंत लोकप्रिय तत्त्वज्ञानी झाला,त्याची लहानमोठी तीनशे पुस्तके त्या वेळेस प्रसिद्ध झाली होती.जे त्याच्या प्रवचनांना उपस्थित राहू शकत नसत,ते त्याची पुस्तके विकत घेत.एपिक्यूरसची बहुतेक पुस्तके नष्ट झाली आहेत,परंतु ल्युक्रेशियस नामक प्रतिभावान कवीने 'वस्तूंचे स्वरूप' या आपल्या महाकाव्यात एपिक्यूरसच्या तत्त्वज्ञानाची संपूर्ण रूपरेषा दिली आहे.
एपिक्यूरसनंतर दोनशे वर्षांनी ल्युक्रेशियस कवी झाला.तो रोममध्ये राही.तो एपिक्यूरियन पंथाचा होता. 'वस्तूंचे स्वरूप' हे ल्युक्रेशियसचे महाकाव्य साहित्याच्या इतिहासातील एक अती अपूर्व व आश्चर्यकारक अशी वस्तू आहे.
वास्तविक,हे महाकाव्य अती निष्ठुर तर्कपद्धती शिकविण्यासाठी लिहिले आहे;पण त्यात ती अत्यंत उत्कट भावनांनी शिकविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.भावनोत्कट भाषेने निष्ठुर तर्क शिकविणारे हे अपूर्व महाकाव्य 'मनुष्याच्या सुखाव्यतिरिक्त जगात दुसरी दैवी व उदात्त गोष्ट नाही,'असे मानणाऱ्या एका नास्तिकाने लिहिले आहे.ते म्हणजे अधार्मिकांचे-कशावरच विश्वास न ठेवणाऱ्यांचे बायबल होय.
थोडा वेळ आपण ल्युक्रेशियसला भेटीला बोलावू या व एपिक्यूरसच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा थोडक्यात सांगण्याची विनंती त्याला करू या.एपिक्यूरसच्या मते जीवनाचा हेतू जीवनातला आनंद अनुभवणे हा होय.या जगात आपणाला दुसरे कर्तव्य नाही,आणखी कसलेही काम नाही.आपण दयाघन परमेश्वराची लेकरे नसून बेफिकीर निसर्गाची सावत्र मुले आहोत.हे जीवन म्हणजे या यंत्रमय श्वातील एक अकल्पित व आकस्मिक घटना होय.पण आपली इच्छा असेल,तर आपणास हे जीवन सुखमय व रसमय करता येईल,कंटाळवाणे वाटणार नाही,असे करता येईल.
आपणास आपल्या सुखासाठी दुसऱ्यावर विसंबून राहून चालणार नाही,स्वतःवरच विसंबून राहिले पाहिजे,हे विश्व विश्वंभाराने निर्मिलेले नसून अनंत अशा अवकाशातल्या अणुपरमाणूंच्या गतीतून ते कसेतरी सहजगत्या बनले आहे एपिक्यूरस हा परमाणुवादी होता.ही मीमांसा त्याने
मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनु-साने गुरुजी मधुशी पब्लिकेशन
डेमॉक्रिटस नामक पूर्वीच्या ग्रीक तत्त्वज्ञापासून घेतली.
डेमॉक्रिटस ही फारशी कधी न आढळणारी प्राचीन काळातील अपूर्व व्यक्ती होती.एखादे शास्त्रीय सत्य शोधणे हे त्याला एखादे साम्राज्य मिळविण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे वाटे.अशी माणसे प्राचीन काळात फारशी नव्हती.हे जग कसेतरी यांत्रिक रीतीने अणुपरमाणूतून बनले आहे.या जगाच्या उपपत्तीतच पुष्कळशा महत्त्वाच्या अर्वाचीन शोधांचे बीज आहे.डेमॉक्रिटसने जणू आजच्या पदार्थविज्ञान शास्त्रातील बऱ्याचशा शोधांची पूर्वकल्पनाच केली होती.
डेमॉक्रिटसच्या या अणुमीमांसेच्या पायावर एपिक्यूरसने आपल्या तत्त्वज्ञानाची इमारत उभारली. तो म्हणे-
आपण सारे अणूंचे संघात आहो,कोठूनतरी शून्यातून आपण येथे फेकलो गेलो असून पुन्हा त्या शून्यातच परत फेकले जाणार आहोत. हे अणू सदैव खाली असे अनंत शून्यात (पोकळीत) फिरत राहतात.कधीकधी हे अणुसंघात या किंवा त्या बाजूला कलल्यामुळे संघर्ष होतात.
सूर्यकिरणांतील त्रसरेणू एकमेकांवर आदळतात तद्वतच हे घडते.हे अणू नाना रूपांचे व आकारांचे असतात.हे अखंड भ्रमंतीमुळे व परस्परांच्या संघर्षामुळे हळूहळू संघटित होतात.त्यांपासून नाना पदार्थ बनतात.चंद्र, पृथ्वी,तारे हे विश्व अशा रीतीने या अणूंच्या संघातांतून जन्मले,आणि आपले विश्व हे एकच अशा प्रकारचे आहे असेही नव्हे.असली अनंत आश्चर्यकारक व अवाढव्य जगे,
विश्वे,ब्रह्मांडे आहेत.त्या दुसऱ्या विश्वातही आपल्या पृथ्वीसारखीच पृथ्वी असेल व तीवर पर्वत,समुद्र,मानव, पशु,पक्षी असतील.
आपणच तेवढे या अनंत समुद्राच्या अनंत किनाऱ्यावरील वाळूचे कण आहोत,असे नव्हे. कारण हे अणू पुन्हापुन्हा त्याच त्याच प्रकारच्या समवायांत व संघांत एकत्र येतात व तशाच वस्तू पुन्हापुन्हा सर्वत्र घडतात.जेथे जेथे तशी परिस्थिती असेल,तिथे तिथे वस्तुजात.या भ्रमणशील व संघर्षशील अणूंची ही सारी हालचाल स्वंयस्फूर्त असते.तीत कोणा विश्वसूत्रचालकाचा हात नाही;तिला कोणी योजक वा मार्गदर्शक लागत नाही.देवदेवताही अणूंपासूनच बनवतात..फरक इतकाच की,माणसे ज्या अणूंपासून बनतात त्यापेक्षा हे अणू अधिक शुद्ध व निर्दोष असतात.पण या देव नाही माणसांप्रमाणेच नाशवंत असतात.निरनिराळ्या विश्वांमधल्या अनंत अवकाशांत या देवदेवता राहतात,मानवी अस्तित्वाविषयी त्यांना फिकीर नसते,मानवी जीवनाविषयी त्यांना फारसे काही वाटत नाही.शेवटच्या विनाशकालाची प्रलयाची वाट पाहत आपण पृथ्वीवर वावरतो,ते स्वर्गात इतकाच फरक देव व मानव ज्या अणूंतून जन्माला येतात;त्याच अणूंत त्यांचे पुन्हा पर्यवसान होते.
ज्याअर्थी हे अणूसारखे भ्रमणशील आहेत,एका वस्तूंतून फुटून दुसऱ्या वस्तूंत मिळतात,त्याअर्थी एक गोष्ट सिद्ध आहे की,हे जग झिजत आहे व एक दिवस ही पृथ्वीही कोळशाच्या राखेप्रमाणे,
विझलेल्या निखाऱ्याप्रमाणे शून्य होणार आहे.विझलेल्या,थंडगार होऊन गेलेल्या अनंत विश्वाच्या उकिरड्यावर ही पृथ्वीही एके दिवशी गार होऊन पडेल.एपिक्यूरसच्या योजनेत देवांचे स्थान काय हे मात्र नीट समजत नाही.त्यांना मानवाचे महत्त्व वाटत नाही, मानवांना त्यांचे वाटत नाही.एपिक्यूरसला धर्म म्हणजे एक क्षुद्र,नजीवी,अर्थहीन वस्तू वाटत असे.तरीही तो अनेक देवदेवतांवरचा विश्वास सोडावयास तयार नव्हता.अर्थातच,हे देवही नाशवंत अणू आहेत व त्याने देवनाही शून्यांच्या किनाऱ्यावरील सुखी लोकांच्या बेटावर हद्दपार करून टाकलेले आहे हे खरे,पण त्यांना बेटाच्या कडेला ओढून विस्मृतीच्या समुद्रात कायमचे लोटून देण्याचे धैर्य मात्र त्याला झाले नाही.
एपिक्यूरसच्या विश्वात या देवदेवतांचे अस्तित्व असले तरी त्यांना या सृष्टीची काही एक कर्तव्य नाही.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…