संपूर्ण एकांतवासाशिवाय उत्तम दर्जाचं आणि महत्त्वाचं काम होणं शक्यच नाही. - पाब्लो पिकासो
'फ्रँक ओ'ब्रायन हे Conversations या कंपनीचे संस्थापक आहेत.कॉन्व्हर्सेशन्स ही एक मार्केटिंग सर्व्हिसेस देणारी न्यूयॉर्कस्थित कंपनी असून 'अमेरिकाज फास्टेस्ट ग्रोईंग कंपनीज'पैकी एक म्हणून Inc ५००/५००० च्या यादीतही तिचं नाव सुचवलं गेलं होतं.सध्याच्या जगात कामांच्या ठिकाणी ज्या जबरदस्त वेगाने कामं सुरू आहेत,त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी एक काहीशी मूलभूत क्रांतिकारी अशी पद्धत चालू केली आहे.महिन्यातून एकदा ब्रायन हे पन्नास कर्मचारी असलेल्या त्यांच्या कंपनीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या खोलीत बोलावून घेतात.पूर्ण दिवस हे कर्मचारी त्यांच्या बरोबर असतात.तिथे फोन आणण्यावर बंदी आहे आणि ई-मेल्सही बेकायदेशीर ठरवलेल्या आहेत.या मीटिंगमध्ये खास असा कोणताच विषय चर्चेला घेतला जात नाही. फक्त परस्परांशी बोलण्यासाठी,काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी,विचारविनिमय करण्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलावलं जातं.इथे लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट आहे ती म्हणजे,ही मीटिंग महिन्याच्या अधल्यामधल्या शुक्रवारी ते कधीही घेत नाहीत.कारण त्या सुमाराला एकंदरीतच निर्मितीक्षमता काहीशी कमी झालेली असते आणि लोकांची खऱ्या अर्थाने कुठलीच कामं होत नसतात.
म्हणूनच सबंध दिवस चालणारी ही मीटिंग दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ते घेतात.कंपनीतल्या अंतर्गत शिस्तीसाठीसुद्धा ही मीटिंग नसते.त्यांचे ग्राहकसुद्धा Do-Not-Call Monday ला आपला फोन कॉल घेतला जाईल अशी अपेक्षा ठेवत नाहीत.
ही जी पद्धत त्यांनी सुरू केली आहे,ती या हेतूने की, त्यांचे कर्मचारी सतत फक्त कामातच गुंतून राहिले तर आवश्यक कामं कोणती,हेच त्यांच्या लक्षात येणार नाही.महत्त्वाचं काय आहे,याचा शोध घेण्यासाठी त्यांना थोडा अवकाश मिळण्याची गरज आहे.
त्यांनी लिहिलं आहे की, "मोकळा श्वासघेण्यासाठी,आजूबाजूला काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आणि विचार करण्यासाठी निवांतपणा मिळण्यासाठी थोडा तरी वेळ वेगळा राखून ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला अभिनव संशोधन करायचं असेल,अधिक प्रगल्भ व्हायचं असेल,स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुमच्या विचारांमध्ये एका विशिष्ट पातळीपर्यंत स्पष्टता यायलाच हवी."
स्वतःची सुटका करून घ्या.उपलब्ध नसण्याचे फायदे,
इसेंशियलिझम -ग्रेग मॅकेऑन - अनुवाद - संध्या रानडे,
मायमिरर पब्लिशिंग हाऊस,
याशिवायही या मीटिंगचा ब्रायन यांना आणखी एक फायदा होतो.एखाद्या लिटमस चाचणीसारखा ! अनावश्यक कामांमध्ये त्यांचे कर्मचारी नको इतका वेळ घालवत आहेत का,हे या वेळी त्यांना बघता येतं.
एखादा कर्मचारी जर खूप काम असल्यामुळे मीटिंगला येत नाहीये असं माझ्या लक्षात आलं,तर त्यातून दोन निष्कर्ष निघतात.एक असा की,आमच्याकडे एखादं काम पूर्ण कार्यक्षमतेने होत नसावं किंवा मग आम्हाला आणखी काही कर्मचाऱ्यांची गरज आहे."
जेव्हा त्यांचे कर्मचारी विचार करण्यात बराच वेळ घालवतात,
तेव्हा तो त्यांचा 'खराखुरा' खूप व्यग्र असण्याचा काळ असतो.आपल्याला थोड्या पण अत्यावश्यक गोष्टी आणि भारंभार क्षुल्लक गोष्टी यांच्यातला फरक जाणून घेण्यासाठी मोकळा अवकाश हवा असतो.पण सध्याच्या आपल्या या वेळेची प्रचंड कमतरता जाणवणाऱ्या कालखंडात आपल्याला तसा तो अजिबातच मिळत नाही.किंबहुना कामाची आखूनरेखून केलेली ती पद्धतच तशी असते.
एका कंपनीच्या प्रमुखाबरोबर मी काम करत होतो,तेव्हा त्याने कबूल केलं होतं की गेली पाच वर्षं तो त्या कंपनीत काम करत असताना ठरलेल्या वेळेपेक्षा खूप जास्त वेळ थांबून काम करत होता आणि त्याचं कारण मी विचारलं,तेव्हा तो म्हणाला होता,"मी माझ्या कंपनीच्या कामात इतका कमालीचा व्यग्र होतो की,मी कंपनीत इतका वेळ थांबणं योग्य आहे की नाही याचा निर्णय घेण्याइतकासुद्धा रिकामा वेळ माझ्याजवळ नव्हता." उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर कामाच्या संदर्भात नव्यानव्या मागण्या पुढे येत असत.इतक्या की, थोडा वेळ विचार करण्यासाठी पाऊलभर मागे सरकून एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्याइतकीसुद्धा सवड त्याला मिळत नव्हती.
असंच आणखी एक उदाहरण ! जागतिक स्तरावरच्या एका मोठ्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंटशी बोलताना मला असं कळलं की,ते आठवड्यातले पस्तीस तास मीटिंगमध्ये घालवतात.या मीटिंगमध्येच ते इतके गुंतून गेलेले असतात की स्वतःच्या करिअरसंदर्भात काही आखणी करायला, स्वतःच्या भविष्याविषयी विचार करायला त्यांना कधी तासभरसुद्धा वेळ मिळत नाही.मग स्वतःच्या कंपनीच्या प्रगतीकडे लक्ष देणं तर फारच दूरची गोष्ट झाली. स्वतःला कुणाशी तरी बोलायला,चर्चा करायला,नेमकं काय चाललंय आणि काय करणं गरजेचं आहे,याचा विचार करायला ते वेळ देत नव्हते.त्याऐवजी त्यांचा वेळ ते अखंड चालू असलेली प्रेझेंटेशन्स आणि जुनाट कल्पनांना चिकटून बसणाऱ्या,नव्याचा स्वीकार करायला फारशी तयार नसणाऱ्या कंपनीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लोकांशी सुरू असलेल्या चर्चा यांच्यातच वाया घालवत होते आणि याच्यातून काहीही निष्पन्न होत नव्हतं.
काय अत्यावश्यक आहे आणि काय नाही याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमचे पर्याय आधी पारखून घ्या. अनावश्यकतावादी अगदी सहजपणे नव्या कल्पना स्वीकारतात,पूर्णपणे नवी संधी मुठीत पकडण्याची धडपड करतात,किंवा अगदी नुकत्याच आलेल्या ई-मेलला तातडीने उत्तर पाठवतात.आवश्यकतावादी मात्र स्वतःला अवसर देणं पसंत करतात.ते पर्याय पारखून घेतात,त्यावर सखोल विचार करतात.
अनावश्यकतावादी - आयुष्याचा विचारसुद्धा करायला फुरसत नसते इतके कामात व्यग्र असतात.
आवश्यकतावादी - आयुष्याचा सखोलपणे विचार करण्यासाठी अवकाश निर्माण करतात.
काही गोष्टी ठरवण्यासाठी 'स्वतःचा'
वेगळा अवकाश ठेवा.
एखादी गोष्ट पारखून घेण्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ देण्याचं महत्त्व माझ्या मनावर ठसलं ते माझ्या कामानिमित्त मी स्टॅनफर्ड इथल्या डी.स्कूलमध्ये (अधिकृत नाव Hasso Plattner Institute of Design - Stanford) होतो,त्या काळात ! मी एका कोर्सच्या संबंधात शिक्षण देण्यासाठी तिथे गेलो असताना तिथल्या वर्गात पाऊल टाकल्याबरोबर एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे,तिथे पारंपरिक पद्धतीच्या खुर्चा ठेवण्यातच आल्या नव्हत्या.त्याऐवजी फोमचे मोठे चौकोनी ठोकळे तिथे बसण्यासाठी ठेवले होते.अर्थातच ते आरामदायी मुळीच नव्हते,हे लवकरच माझ्या लक्षात आलं.डी.स्कूलमधली प्रत्येक गोष्ट आखूनरेखून केली होती.त्याचप्रमाणे बसण्यासाठी ठेवलेले हे ठोकळेही विशिष्ट पद्धतीनेच डिझाईन केलेले होते.ते आरामदायी असणार नाहीत हे जाणीवपूर्वक ठरवून ! अशा त-हेच्या ठोकळ्यांवर काही वेळ बसलं की, विद्यार्थी हमखास उठणारच,हे धोरण त्यामागे होतं. ते उठले की जरा वेळ इकडेतिकडे फिरणार,
एक दुसऱ्याला भेटणार.वर्गात जसे ते एकमेकांच्या फक्त डावी-उजवीकडे बसतात,तसं अर्थातच इथे होणार नव्हतं आणि तोच मुख्य हेतू होता,त्यांची बसण्याची आसनं आरामदायी न करण्यामागे.डी.स्कूलने विद्यार्थ्यांना इथे तिथे मन गुंतवण्याची आणि विचार करायला त्यांना वेळ देण्याची ही अभिनव पद्धत इथे वापरली होती.अशाच प्रकारचा विचार मनात ठेवून डी. स्कूलने एक लपता येईल अशी जागा तयार केली होती.
तिचं नाव होतं, 'बूथ नॉयर'. ही एक अशी छोटीशी खोली होती जी जाणूनबुजून जेमतेम एक ते तीन माणसं मावतील एवढी छोटी केली होती.या खोलीला खिडकी नव्हती.खोलीत बाहेरचे कुठलेली आवाज येऊ शकत नव्हते,आणि चित्त विचलित होईल,अशी कुठलीही गोष्ट त्या खोलीत मुद्दामच ठेवलेली नव्हती. 'मेक स्पेस' या पुस्तकाचे लेखक स्कॉट डुर्ले आणि स्कॉट विथॉफ्ट म्हणतात त्याप्रमाणे,"कमी तंत्रज्ञानापेक्षाही कमी किंबहुना - यात तंत्रज्ञान नाहीच." ही छोटीशी खोली जमिनीत घट्ट बसवलेली आहे.डोर्ले आणि विथॉफ्ट म्हणतात की, "ती तिथून कुठेही जाणार नाहीये." तुम्हाला तिथे जाण्याचं फक्त एकच कारण असेल आणि ते म्हणजे विचार करण्यासाठी तुम्हाला निवांतपणा हवा असणं. विचार करण्यासाठी आणि मनाच्या एकाग्रतेसाठी अशी जागा तयार केलेली असल्यामुळे विद्यार्थी काही काळ इथे येऊ शकतात आणि पुढच्या कामाचं चित्र स्पष्टपणे त्यांच्या नजरेपुढे उभं राहण्यासाठी त्याची मदत होते.
का कुणास ठाऊक,पण मन एकाग्र करण्याच्या बाबतीत लोकांचे विचार काहीशा चुकीच्या पद्धतीने जोडलेले असतात.काही लोक तर सरळ सरळ 'एकाग्रता' ही एखादी गोष्ट आहे असं समजतात.हे खरं आहे की मनात काही ध्येय असणं या दृष्टीने ती आपल्यात असते.पण त्याच वेळी ही गोष्टसुद्धा खरी आहे की,आपलं मन आपण समजून उमजून एकाग्र करतो.कोणतंही ध्येय मनाशी ठरवण्यासाठी आपण सवड काढून मन एकाग्र करणं गरजेचं आहे.
मी जेव्हा एकाग्रता हा शब्द वापरतो,त्या वेळी मला असं अजिबातच अभिप्रेत नसतं की,कोणती तरी एखादी समस्या किंवा कुठली तरी एखादी शक्यता मनात ठेवून सातत्याने आणि झपाटल्यासारखं फक्त त्याचाच विचार करत रहायचं! मला इथे अभिप्रेत आहे,ते शंभरएक समस्या आणि शक्यता यांच्या खोलात शिरून त्यावर विचार करण्यासाठी स्वतःला मोकळा वेळ देणं. स्वतःच स्वतःसाठी अवकाश निर्माण करणं ! आपले डोळे जितक्या सहजपणे एखाद्या गोष्टीवर नजर केंद्रित करतात,तितक्याच सहजतेने आवश्यकतावादी व्यक्ती त्यांच्या मनाशी ठरवलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून सातत्याने जुळवून घेत राहतात,त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतात.त्यात पुरत्या बुडून जात नाहीत.
अलिकडेच माझी डी.स्कूलमध्ये एक मीटिंग झाली.या वेळी ती दुसऱ्या एका खोलीत होती.या खोलीत बसण्यासाठी कुठलीच आसनं नव्हती आणि डेस्कही नव्हते.फक्त जमिनीपासून खोलीच्या छतापर्यंत पांढरे फळे लावलेले होते आणि त्यावर कधीही चिकटवता किंवा काढता येण्याजोगे कागदाचे असंख्य रंगांचे तुकडे चिकटवलेले होते.तिथे माझी जेरेमी युटली यांच्याशी भेट ठरली होती.आम्ही दोघे मिळून एका विशिष्ट प्रकारच्या वर्गाची रचना करणार होतो.त्याचं वर्णन जेरेमीने क्षणार्धात आणि थोडक्यात करून टाकलं. 'आयुष्याची आखणी - आवश्यकतावादी विचारसरणीने.'
या वर्गाचा मूळ हेतू आहे;तो तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची आखणी करण्यासाठी अवकाश देण्याचा. दर आठवड्याला विचार करण्यासाठी त्यांना एक कारण ठरवून दिलेलं असतं.त्यांचे लॅपटॉप्स आणि स्मार्टफोन बंद करून ठेवण्याची त्यांच्यावर सक्ती करण्यात येते आणि त्याऐवजी सर्व शक्ती त्यांना त्यांच्या मनाच्या एकाग्रतेवर केंद्रित करायला सांगितलं जातं.मोजक्या, पण महत्त्वाच्या गोष्टी आणि खूप साऱ्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी यांच्यातला फरक ओळखायला त्यांनी शिकावं,यासाठी त्यांना काही विशिष्ट प्रकारची कामं नेमून दिलेली असतात.खरं म्हणजे हे शिकण्यासाठी,ही सवय स्वतःला लावून घेण्यासाठी तुम्ही डी.स्कूलमध्येच जायला हवं असतं असं नाही,आपण सगळेच स्वतःसाठी सवड काढायला शिकू शकतो.
लक्ष केंद्रित करण्यासाठी हवा असलेला अवकाश
माझ्या माहितीतले एक कार्यकारी अधिकारी अतिशय बुद्धिमान आहेत आणि स्वतःला नेमकं काय करायचंय याचं त्यांना पूर्णपणे भान आहे.मात्र त्यांचं मन वारंवार वेगवेगळ्या गोष्टींकडे वळत असतं.कधीही पाहिलं तरी ते द्विटर, जी-मेल,फेसबुक आणि इस्टंट मेसेजिंग यातच व्यग्र असतात आणि एकाच वेळी या सगळ्यात ते गुंतलेले असतात.कोणत्याही प्रलोभनांना न जुमानता स्वतःसाठी अवकाश जपण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी एकदा त्यांच्या एका कनिष्ठ सहकाऱ्याला त्यांच्या कॉम्प्युटरच्या इंटरनेटच्या सर्व केबल्स काढून टाकायला सांगितलं.पण शेवटी इतर अनेक मार्ग शोधून काढत ते ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करतच राहिले.त्यांनी हाती घेतलेला तो एक महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ते अक्षरशः धडपडत होते.म्हणून मग त्यांनी एक वेगळं असं पाऊल उचलायचं ठरवलं. इंटरनेटची सुविधा नसणाऱ्या एका मोटेलमध्ये स्वतःचा फोन घरीच ठेवून ते राहायला गेले आणि आठ आठवड्यांच्या संपूर्ण एकांतवासात त्यांनी स्वतःला जखडून घेतलं,तेव्हाच स्वतःचा तो प्रकल्प ते पूर्ण करू शकले.माझ्या दृष्टीने ही एक अतिशय खेदजनकच अशी घटना आहे.एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं ? पण त्यांचे हे पाऊल टोकाचं असलं तरी त्यांच्या सद्हेतू बद्दल माझ्या मनात जराही शंका नाही किंवा त्यावर मला काही भाष्यही करायचं नाही.
शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…