नवीन वर्षाचा पहिला महिना...
एक वर्ष आणखी सरलं...
जन्मल्यापासूनचा आयुष्य पट कधी कधी आपोआप समोर ठाकतो. मनात असो का नसो....!
आयुष्यात केलेल्या भल्या बुऱ्या गोष्टी,नाठाळपणा, अवखळपणा,अजाणतेपणे केलेल्या अनेक चुका आठवतात....
कधी हसू येतं... कधी रडायला होतं... !
सारं काही पुस्तकात मांडलंय...
पण पुस्तकाने तरी माझ्या किती गोष्टी झेलायच्या आणि सहन करायच्या ?
मला आठवतं, मी लहान होतो....
अंगात भरपूर "कळा" होत्या, पण एकही "कला" नाही...!
शाळेत गॅदरिंग असायचं...
माझ्या शाळेतली मुलं मुली याप्रसंगी विविध गुणांचे प्रदर्शन करायची...
यावेळी गॅदरिंग चा फायदा घेऊन मी सुद्धा "गुन" उधळायचो...!
गॅदरिंग च्या शेवटच्या दिवशी,बक्षीस समारंभ असायचा..... स्टेजवर खुर्च्या लावण्याची तयारी सुरू असायची... त्यात प्रमुख वक्ते,कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या खुर्च्या असायच्या.
जमिनीवर उकिडवे बसावे....
तसा मी चप्पल घालून या खुर्च्यांवर बसायचो...आणि काम करणाऱ्या बिचाऱ्या माझ्याच वयाच्या मुलांच्या चुका काढत राहायचो.
एकदा मुख्याध्यापकांनी हे पाहिलं,काही न बोलता त्यांनी हातातल्या पट्टीने मला फोडून काढलं.
तरीही, स्स हा.... स्स ... म्हणत मी सरांना विचारलं होतं,सर नुस्ता खुर्चीत बसलो होतो,इतकं का मारताय ?
'नालायका, तुला माहित आहे का ? या खुर्च्या कोणाच्या आहेत ?'
'हा सर,आपल्या शाळेच्या आहेत,म्हणून तर बसलो ना...' 'कळली तुझी अक्कल बावळटा,आपले आजचे प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आणि आपल्या महाराष्ट्राचे वैभव जे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत...या खुर्च्या त्यांच्यासाठी मांडल्या आहेत...'
'हा मं... ते यायच्या आधी मी बसलो तं काय झालं मं...' मी तक्रारीच्या सुरात पायाच्या अंगठ्याने जमीन टोकरत बोललो....
सोबत माझं स्स...हा... चालूच होतं.
त्यांना माझा धीटपणा आवडला ?
की माझी निरागसता ?
माहित नाही ....
परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा राग निवळला...
ते मला म्हणाले बाळा,'प्रत्येक खुर्ची ही खुर्चीच असते... पण त्यावर कोण बसतो;यावर त्या खुर्चीची किंमत ठरते.'
'खुडचीची किंमत काय आसंल सर...?' माझा भाबडा मध्यमवर्गीय प्रश्न.
आभाळाकडे पहात ते म्हणाले,'आपलं आयुष्य जो दुसऱ्यासाठी खर्ची घालतो,त्या प्रत्येकाला अशा खुर्च्या सन्मानाने मिळतात बाळा... याची किंमत पैशात नाही रे...'
'मला पण पायजे अशी खुडची' जेवताना मीठ मागावं, तितक्या सहजतेने सरांना मी बोलून गेलो.
'तुझे एकूण गुण पाहता,हि खुर्ची तुझ्या नशिबात नाही... या खुर्चीत तुला बसायचं असेल तर अंगात काहीतरी पात्रता निर्माण कर ... लायक हो... नालायका...!'
हे शब्द आहेत साताऱ्यामधल्या माझ्या शाळेचे,माझ्या वेळेचे मुख्याध्यापक सर यांचे...!
माझ्या याच शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी मला पाच वर्षांपूर्वी जीवन गौरव पुरस्कार दिला....
शाळा तीच... प्रांगण तेच ...स्टेज तेच...
मी बदललो होतो... !
मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले होते.
मी अट घातली होती,कार्यक्रमाला आदरणीय मुख्याध्यापक सरच हवेत...
स्टेजवर मी सन्माननीय म्हणून लिहिलेल्या खुर्चीवर आखडून बसलो होतो...पण यावेळी पाय खुर्चीवर नाही,जमिनीवर होते...
संयोजकांना मी विनंती केली होती,जे काही मला द्याल ते मुख्याध्यापक सरांच्या हातूनच मला द्यावं.... !
सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.
माझ्या विनंतीनुसार,मुख्याध्यापक सरांनी मला ते मानपत्र दिलं...
सरांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना म्हणालो, 'सर मला ओळखलं का ?'
त्यांनी चष्मा वर खाली करून मला ओळखण्याचा प्रयत्न केला... पण नाही...!
मी सर्वसामान्य माणूस....
किती विद्यार्थी त्यांच्या हातून गेले असतील... ?
ते मला इतक्या वर्षानंतर कसं ओळखतील ? आणि मी तरी असे काय दिवे लावले होते त्यांनी मला ओळखायला ? देवाला तरी सगळ्याच लोकांचे चेहरे कुठे आठवत असतात... ???
मग मी त्यांना शाळेतल्या दोन-चार आठवणी सांगितल्या...
आत्ता सरांना आठवले....
'अरे गधड्या.... नालायका... मूर्खा... बावळटा... तुच आहेस होय तो DOCTOR FOR BEGGARS ?'
मी खाली मान घालून हो म्हणालो...!
यावर अत्यानंदाने त्यांनी मला मिठी मारली...'
यानंतर सरांचे वृद्ध डोळे चकमक चकमक .... चकाकत होते...! कष्टाने वाढवलेल्या,जगवलेल्या झाडाला पहिलं फळ येतं,तेव्हा शेतकरी ज्या कौतुकाने त्या झाडाकडे बघेल...त्याच नजरेने सर माझ्याकडे बघत होते.
'मी तुझ्या कामात काय मदत करू ? मी तुला आता काय देऊ ?
ती वृद्ध माऊली,इकडे तिकडे पहात,जुन्या सफारीच्या खिशात भांबावून उगीचच इकडे तिकडे हात घालत बोलली...'
जुन्या सफारीची विण उसवली होती...
हे माझ्या नजरेतून सुटलं नाही...
मी खिशात जाणारे त्यांचे दोन्ही हात पकडून बोललो... 'सर,काही द्यायचं असेल तर हातावर एक छडी द्या... माझी तितकीच पात्रता आणि लायकी आहे सर....'
यावर लहान मुलासारखे ओठ मुडपून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला...
तो हसण्याचा प्रयत्न होता की रडू आवरण्याचा... ? मला कळलं नाही... !
ते म्हणाले... 'गधड्या.... नालायका... मला वाटलं आता तरी तू सुधारला असशील...पण तू अजून सुधारला नाहीस रे....' असं म्हणत माझ्या नावाच्या खुर्चीवर सरांनी मला हाताला धरून बसवलं....!
आता ओठ मुडपून,हसणं आवरण्याची आणि रडणं सावरण्याची माझी कसरत सुरू झाली...
जाताना कानात म्हणाले,'आता या खुर्चीवर मांडी घालून किंवा पाय वर ठेवून बसलास तरी चालेल,मी तुला ओरडणार नाही... हि खुर्ची तु कमावली आहेस बाळा...'
यानंतर ते स्टेजच्या मागे निघून गेले....
यानंतर माझ्या कौतुकाची भाषणांवर भाषणे झाली....
मला यातलं काहीही ऐकू आलं नाही....
मला फक्त ऐकू आले.... ते माझ्या मास्तरचे हुंदके... !!!
---------+++++++++-----------++++++++
साताऱ्यात त्यावेळी खूप साहित्य संमेलनं व्हायची...
आम्ही दोन चार मित्र या संमेलनाला जायचो...
व्हीआयपी लोकांसाठी तिथे एक कॉर्नर केला होता... त्यावेळी एसी नव्हते,पण कुलर होते...
वर्गात उकडतंय,म्हणून या कुलरचं वारं घेण्यासाठी आम्ही येत होतो,अन्यथा साहित्यातलं आम्हाला काय ढेकळं कळतंय... ?
निर्लज्जपणे आम्ही खुर्च्यांवर पाय ठेवून कुलरचं वारं घेत बसायचो ...
संयोजक मंडळी येऊन मग आम्हाला कुत्रं हाकलल्यागत हाकलून द्यायचे...
------++++++---+++++------+++--+++
एखाद्या कार्यक्रमात पहिल्या तीन रांगा व्हीआयपी साठी असतात...आम्ही पोरं पहिल्या रांगेमध्ये बसायचो... इथूनही संयोजक आम्हाला कानाला धरून उठवायचे..!
मागून शब्द कानावर पडायचे... लायकी आहे का तुमची पहिल्या रांगेत बसायची ?
या सर्व जुन्या बाबी मी अजून विसरलो नाही.
आज किती वेळा मी प्रमुख पाहुणा झालो असेन, अध्यक्ष झालो असेन,वक्ता झालो असेन... पण त्या खुर्चीत बसलो की अजूनही मला भीती वाटते...
मुख्याध्यापक सर येतील पट्टी घेऊन....
आज कित्येक मोठ्या मोठ्या साहित्यिकांमध्ये,अनेक मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठबस होते... व्हीआयपी लाउंज मध्ये बसवलं जातं...पण आजही भीती वाटते आपल्याला इथून कोणी उठ म्हटलं तर... ?
हाताला धरून आज पहिल्या रांगेमध्ये बसवलं जातं.... तरीही माझ्या नजरेत धाकधूक असते...आपल्याला इथून कोणी उठवलं तर... ?
पूर्वी एखाद्या कार्यक्रमांमध्ये माईक चालू असायचा....
कोणाचं लक्ष नाही असं पाहून,मी माईक हातात घ्यायचो... उं... ऐं ... खर्र... खिस्स.... फीस्स... असे आवाज काढून बघायचो... माइक वर आपला आवाज कसा येतो ते बघायचो... मीच गालातल्या गालात हसायचो. तेवढ्यात पाठीमागून शाळेतल्या शिक्षिका यायच्या,आणि पट्टीचे फटके मारून स्टेजवरून खाली उतरवायच्या.मागील दहा वर्षात किमान पाच हजार व्याख्यानासाठी उभा राहिलो असेन....
मात्र अजूनही माईक पुढे गेलो,तरी भीती वाटते.... मागून कोणी तरी येईल आणि पट्टीचा फटका मारेल.... !
त्यावेळी केलेल्या चुकांची अजूनही भीती वाटते...
मी केलेल्या चुका या "गुन्हा" नव्हत्या...
पण त्या चुकाच होत्या... ! हे आज कळतंय.
आमचे एक गुरुजी होते... ते म्हणायचे, 'आपल्याला आपली चूक समजली म्हणजे समजा निम्मी सुधारणा झाली... !'
'आपल्याला आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर कायम माघार घ्यायची,कुणाशी वाद घालायचा नाही...' हे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं आहे.
माझ्यासारख्या रेड्याला हे काय कळणार ? पण ज्ञानेश्वर माऊली होऊन माझ्या शिक्षकांनी मला हे सांगितलं.
'बाळा कुणाच्या कर्जात राहू नकोस पण आयुष्यभर एखाद्याच्या ऋणात रहा...' हे सांगणारी माणसं,आता देवा घरी निघून गेली....
देवाचीच माणसं हि.... तिथेच जाणार... !
मी अजूनही शोधतोय यांना...
तुमच्या आयुष्यात जर अशी माणसं असतील,तर हृदयाच्या तळ कप्प्यात आत्ताच यांना सांभाळून ठेवा, पुन्हा ते भेटत नाहीत माऊली !
वो फिर नही आते...
वो... फिर नही आ....ते... !!!
गतकाळात केलेल्या या चुका पुसायची मला जरी संधी मिळाली तरी मी त्या पुसणार नाही.
कारण या चुकांनीच मला बरंच काही शिकवलं...
"मान" म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आधी एकदा अपमानाची चव घ्यावीच लागते...
पोट भरल्यानंतर जी "तृप्तता" येते ती अनुभवण्यासाठी, कधीतरी उपाशी राहण्याची कळ सोसावीच लागते...
आपण "बरोबर" आहोत हे समजण्यासाठी आधी खूप चुका कराव्या लागतात...
जिथं अंधाराचं अस्तित्व असतं, तिथंच प्रकाशाला किंमत मिळते...
पौर्णिमेच्या चंद्राचं कौतुक सर्वांनाच असतं... पण हा चंद्र पाहायला सुद्धा रात्र काळीकुट्टच असावी लागते... !
त्याच्या प्रकाशाला काळ्या मध्यरात्रीचीच किनार लाभलेली असते... नाहीतर दिवसा दिसणाऱ्या चंद्राकडे कोण पाहतं ?
आपल्या आयुष्यात आलेल्या काळ्या रात्री आपणही अशाच जपून ठेवायच्या...
आता थोड्याच वेळात उजाडणार आहे;हे स्वतःलाच सांगत राहायचं...
अमावस्या काय कायमची नसते...
बस्स पंधराच दिवसात माझ्याही आयुष्यात पौर्णिमा येणार आहे,हे स्वतःला बजावत राहायचं...!
आणि पुढे पुढे चालत राहायचं... !!!
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन,या महिन्यात केलेले काम थोडक्यात सांगतो.
१. ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा पाच ताई आपल्या मुलाबाळांसह भीक मागायच्या. या पाचही जणींना कामाला तयार केलं आहे.त्यांना नवीन हातगाड्या घेऊन दिल्या आहेत.२६ जानेवारी या पवित्र दिवसापासून त्यांनी काम सुरू करून भिकेपासून स्वातंत्र्य मिळवले आहे.
भिक्षेकरी म्हणून नाही तर गावकरी म्हणून जगायला सुरुवात केली आहे... भारताचे नागरिक आणि प्रजा म्हणून त्यांना आता ओळख मिळेल... माझ्यासाठी खऱ्या अर्थाने यावेळचा २६ जानेवारी प्रजासत्ताक झाला. !
२. रस्त्यावर पडलेली एक ताई,हॉस्पिटलमध्ये उपचार करून हिला बरं केलं.काम सुरू कर भीक मागणं सोड अशी गळ घातली.तिने मान्य केलं.तिची एकूण प्रकृती आणि अशक्तपणा पाहता हातगाडी ढकलणे तिला शक्य नव्हते.हॉस्पिटलमध्ये तिच्याशी बोलत असताना, बाबागाडीमध्ये बाळाला बसवून एक ताई चाललेल्या मला दिसल्या.हिच आयडिया मी उचलून धरली,विक्री करायचे साहित्य बाबा गाडीत ठेवून विक्री करायची, बाबागाडी ढकलायला सुद्धा सोपी...
समाजात आवाहन केले,आपणास गरज नसेल तर, तुम्ही वापरत नसाल तर मला बाबागाडी द्या...
बाबागाडीचा हट्ट लहानपणी कधी केला नाही,आज मोठेपणी मात्र मी बाबागाडी मागितली...
"लहान बाळाचा हट्ट" समजून,समाजाने माझा हा हट्ट सुध्दा पुरा केला.
हि ताई कॅम्प परिसरात बाबा गाडीत साहित्य ठेवून बऱ्याच वस्तूंची विक्री करते.
बाबागाडीचा उपयोग बाळाला फक्त "फिरवण्यासाठीच" होतो असं नाही... "फिरलेलं" आयुष्य पुन्हा "सरळ" करण्यासाठी सुद्धा होतो... !
३. मागे एकदा एक परिचित भेटले.मला म्हणाले, 'घरात काही जुन्या चपला आहेत,तुला देऊ का ?'
मी द्या म्हणालो
त्यांच्या सोबतीने त्यांच्या इतर मित्रांनी सुद्धा घरातल्या नको असलेल्या चपला आणून दिल्या.
आठ दहा पोत्यांमध्ये भरलेल्या या चपलांच्या आता जोड्या कशा जुळवायच्या ?
चौथी की पाचवीच्या परीक्षेत जोड्या जुळवा असा एक प्रश्न असायचा,माझ्या तो आवडीचा.
आज डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा जोड्या जुळवा हाच प्रश्न समोर पुन्हा एकदा आला.
मग आमच्या काही भिक्षेकरी मंडळींना हाताशी घेतलं, साधारण निर्जन स्थळी जाऊन सगळी पोती खाली केली... आणि आम्ही सगळेजण लागलो जोड्या जुळवायला... !
काही चपला आमच्या लोकांना वापरायला दिल्या, उर्वरित चपला जुन्या बाजारात आमच्या लोकांना विकायला दिल्या.
"चपलीची पण किंमत नाही" असा आपल्याकडे एक शब्द प्रयोग आहे.पण याच चपला विकून,आमच्यातले अनेक लोक भीक मागणे सोडून प्रतिष्ठा मिळवत आहेत. चप्पलला किंमत असेल - नसेल; पण आमच्या लोकांची किंमत वाढवली ती या पायताणांनीच...!
माझ्या दृष्टीने या चपलांची किंमत अनमोल आहे...!
४. दोन लोकांना ओळखीच्या माध्यमातून स्वच्छता सेवक आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीस लावून दिले आहे.
५.रस्त्यावर ते जिथे बसतात रस्त्यावर दवाखाना थाटून वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे,हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे सुरू आहे,डोळ्यांचे ऑपरेशन करणे, चष्मे देणे रक्ताच्या विविध तपासण्या करणे, कानाची तपासणी करून ऐकायचे मशीन देणे इत्यादी इत्यादी वैद्यकीय बाबी सुरू आहेत.
६. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या गरीब रुग्णांना रोजच्या रोज जेवण देत आहोत.पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांची एक टीम तयार करून त्यांच्याकडून सार्वजनिक भाग स्वच्छ करून घेत आहोत त्या बदल्यात त्यांना कोरडा शिधा देत आहोत,साबण टूथपेस्ट, टूथ ब्रश या सुद्धा गोष्टी पुरवत आहोत.
(सध्या भीक मागणाऱ्या अनेक लोकांना भीक मागणे सोडायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही. अशांसाठी एखादे प्रशिक्षण केंद्र तयार करून,त्यांना प्रशिक्षण देऊन,त्यांच्याकडून काही वस्तू तयार करून घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची; असे स्वप्न गेल्या सहा वर्षांपासून पाहत आहे,अनेक कारणांमुळे ते सत्यात येऊ शकले नाही.परंतु येत्या महिन्याभरात असे प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची पूर्वतयारी सुरू आहे.याबाबत सविस्तर माहिती काही दिवसात देणार आहे)
असो..
आपण ज्या समाजात राहतो तिथे वय वाढलेल्या लोकांना ज्येष्ठ म्हटलं जातं...
मी ज्या समाजासाठी काम करतो, तिथे वय वाढलेल्या लोकांना म्हातारडा - म्हातारडी थेरडा - थेरडी म्हटलं जातं...आपण ज्या समाजात राहतो तिथे कुणी गेलं तर, ते देवा घरी गेले,कैलासवासी झालेअसे शब्दप्रयोग केले जातात.आमच्याकडचं कोणी गेलं तर म्हणतात... त्ये मेलं... खपलं
वरील सर्व शब्द;अर्थ जरी एकच सांगत असले, तरीसुद्धा शब्दाशब्दांमध्ये प्रचंड अंतर आहे.
हे अंतर आहे...हा फरक आहे फक्त प्रतिष्ठेचा...!
हे जे काम आपल्या सर्वांच्या साथीनं सुरू आहे,ते फक्त या शब्दातले अंतर कमी करण्यासाठी...
शब्दातला फरक मिटवण्यासाठी...
"प्रतिष्ठा" नावाचा "गंध" त्यांच्या कपाळी लावण्यासाठी... !!!
जानेवारी महिन्याचा लेखाजोखा आपल्या सर्वांच्या पायाशी सविनय सादर... !
३१ जानेवारी २०२५
डॉ.अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स