सरतेशेवटी सगळे मरणारच असले तरी 'जिंदगी बडी होनी चाहिये,लंबी नहीं। - मुसानियस रूफस
मनाचा समतोल साधणारा काव्यसंग्रह पातीवरल्या बाया
'डू इट टुडे'आजचं काम आजच करा आजचं काम आजच करा या पुस्तकात डारियस फरु आपल्या वैयक्तिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.या बाबत म्हणतात.
" वुहू! मी माझं कॉलेज पूर्ण केलं.व त्या जुन्या पुस्तकांना कायमचा टाटा ! "
तुम्ही असं म्हणणाऱ्यांपैकी असाल,तर तुमचं वय कितीही असो,
तुम्ही मूर्ख आहात! एकच गोष्ट शिकून कोणीही शिक्षण कायमचं थांबवेल का? आपल्या डोक्यात ही कल्पना कोणी घालून दिली,
हेही मला कळत नाही.मी नेहमी असा विचार करायचो,की शाळा संपली की शिक्षणही संपतं.पण,जेव्हा तुमचं शिक्षण थांबतं,तेव्हा आयुष्यही थांबतं,हे सत्य आहे.
हा संदर्भ या ठिकाणी येण्यासाठीचे कारणही तसे खास आहे.
माझ्या लाडक्या मित्राचा व माझ्यासाठी जिवाभावाचा असणारा काव्यसंग्रह पातीवरल्या बाया.. चला मग जाणून घेऊया याबद्दल..!
मित्र म्हणून जीवनाच्या एका वळणावरती माधव गव्हाणे यांच्यामुळे मनातील एक हळवा कप्पा बनलेले कवी सचिन शिंदे,तसा कवितेचा आणि माझा दूरचा संबंध..पण कमी जागेमध्ये समजून सांगण्याचा कवितेचा आवाका खूप मोठा असतो.सचिन सरांमुळे कविता मागील कविता मला समजायला लागली.वारंवार भेटी होत गेल्या,कविता कशी तयार होते, कवितेचे प्रकार यावर आमच्या भरपूर चर्चा व्हायच्या.या सुसंवादातून कवी हळूहळू समजत गेला आणि कळत नकळत मला कविता कधी समजायला लागली हेच कळालं नाही.
प्रत्येकाला कोणी ना कोणी बनायचं आहे किंवा बनवायचं आहे.हे सर्व बनत असताना आपण वाचक बनलो पाहिजे हे फार कमीजणांना वाटतं.या फार कमी मधला मी एक.. एक वेळ जेवण नाही मिळाला तरी चालेल तुमचं शरीर तुम्हाला जिवंत ठेवू शकतं,पण जर तुम्ही अर्धा तास दररोज वाचन नाही केलं तर या जगापासून तुम्ही दहा वर्षे मागे जाल.इतकं जग झपाट्याने बदलत आहे.जवळजवळ एक वर्ष होत आले.पातीवरल्या बाया या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मला सन्मानित आग्रहाचे निमंत्रण होतं.वाचकाला केंद्रबिंदू ठेवून वाचकांसाठी जागा रिकामी ठेवणारा हा माझ्या आयुष्यातील एकमेव असा कवी लेखक आहे.
मी अनेक विद्वानांसोबत असतो अनेक पुस्तक वाचलेली आहेत.व यातून मला जे सत्य समजलं ते फक्त एका ओळीचं आहे.ते म्हणजे मी अज्ञानी आहे..
ल्युसियस ॲनियस सेनेका निरो सम्राटाचा सल्लागार याने हे अतिशय छान सांगितले आहे.
अखेरीस तुम्ही ज्ञानाचा वापर करा अथवा नका करू,ज्ञान हा जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग आहे.तुम्हाला त्यामुळे ऊर्जा मिळते आणि तुमचं आयुष्य बदलत.चांगलं काय असतं?जीवनाच ज्ञान.वाईट काय असतं?जीवनाबद्दलचं अज्ञान.जीवनाबद्दल ज्ञान असणं, पुस्तकातून,लेखातून आणि त्याच मार्गावरून चालणाऱ्या लोकांशी परस्पर संवाद करून त्यातून ज्ञान मिळवणं.
पातीवरल्या बाया हा काव्यसंग्रह,अष्टगंध प्रकाशनचा ६९ कवितांचा व ११२ पानांचा भरगच्च कवितांचा सदाबहार संवेदनशील मानवी मनाचा नजराणा,माणूस म्हणून विचार करायला लावणारा आहे.
भरगच्च कवितांचा सदाबहार संवेदनशील मानवी मनाचा नजराणा,माणूस म्हणून विचार करायला लावणारा आहे.नदी आणि पुराच्या कविता,गुरांच्या आणि दुष्काळाच्या कविता,बाईच्या कविता,गावशिवाराच्या कविता,अवांतर कविता या विभागात असणाऱ्या या कविता काहीतरी सांगत आहेत.
जे आपल्याला माहित आहे,पण धावपळीच्या या जगात त्यावर साठलेली धुळ झटकण्याचे काम हा काव्य संग्रह अगदी डौलाने करीत आहे.मनोज बोरगावकर यांचा पाठिवर असणार हात मलपृष्ठावर उठून दिसतो आहे.ज्यांनी बाई पूर्णपणे जाणलेली आहे,याउलट ज्यांच्या आत मध्ये बाईचं एक हळवं मन आहे.असे किरण येले यांची प्रस्तावना या कवितेतील अस्सलपणा निदर्शनास आणते. प्रस्तावनेमुळेच हा काव्यसंग्रह वजनदार झालेला आहे.
नदी वाहे वळणाने,दु:ख घेत उदरात
गाव निजते खुशाल,दान घेते पदरात
नदी या कवितेतील ओळी माणूस आणि नदी यांचे सनातन नाते उलगडून दाखवते.फार पूर्वीपासून सगळी माणसं नदीकिनारी राहत असायचीत.त्यांना नदी व आपलं नातं कळालं होतं.कारण त्यांनी थोडी थोडी नदी वाचली होती.
खोल डोहाच्या तळाशी,दिशे शिंपल्यांचा खच
पाय ठेवून पाण्यात,थोडी थोडी नदी वाच
अपेक्षांवर फिरलेलं पुराचं पाणी २००५ च्या महापुराची आठवण करून देणारा ठरलं.ही कविता त्यावेळेला घडलेल्या घटनेच्या वास्तवाचं प्रतिबिंब आहे.
अविरत वाळूचा उपसा चालू असायचा..नदीच्या गाभ्यापर्यंत जखम करणारा! 'किती खोलवर इजा होत असेल नदीला!ॲबॉर्शनमुळे स्त्रीला होणार्या इजेसारखीच!' आपल्यालाही स्त्रीच्या गर्भापर्यंत जाता आले,पण गाभ्यापर्यंत कुठे जाता आले ? स्त्रीच्या उदरात राहता आले, पण तिच्या काळजापर्यंत कुठे पोहोचता आले? म्हणूनच वाटते आपल्यासाठी आई असते कलेजाचा तुकडा,पण आईसाठी मात्र आपणच अख्खे काळीज!एवढाच काय काळजीभर फरक आपल्या अन् आईच्या प्रेमात होमोओपॅथीतले 'सिलिका'हे औषध वाळूपासूनच तयार होते.निष्णात सर्जनचे हात देखिल जिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचून हे औषध काम करते. काय गुणधर्म असतील या नदीचे..! ' नदीष्ट ' मनोज बोरगावकर यांनी लिहिलेल्या कांदबरीतील या नोंदी माझ्या समोर उभ्या झाल्या.'पातीवरल्या बाया' मधील शेवटची नदीची कविता वाचली आणि मला पुन्हा आठवण झाली.त्या 'नदी किनारी असणाऱ्या बहात्तर पायऱ्यांची ज्यांनी अजूनही माणुसकी जोडलेली आहे.'
नदी म्हणजेच निसर्गाचा अविभाज्य श्वास..या संदर्भात काही थोर लोकांचे थोर विचारू पाहू..
निसर्गात जीवांची संख्या इतकी प्रचंड व अद्भुत आहे की या भुकेच्या यज्ञात अनेक जीवांची आहुती देण्यास त्याला सहज परवडते.एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो आणि तो अजून कुठल्यातरी.पण या पृथ्वीतलावर जे अपघात व युद्ध होतात त्याच्या तुलनेत याचे महत्व अल्प (किंवा जास्त ) असावे.सुज्ञ माणूस या सगळ्याला निसर्गाचा निरागसपणा समजतो.औषधांमध्ये विषांचाही काही उपयोग असतो आणि सर्व जखमांमुळे मृत्यू ओढवत नाही हेही समजून घेतले पाहिजे.अनुकंपेचा पाया बऱ्याच वेळा अस्थिर असतो त्यामुळे त्यावर अवलंबून किती निर्णय घ्यायचे याचा निर्णय एखाद्याला घ्यावा लागतो.अनुकंपा आणि दया हे त्यांच्या जागी ठीक आहेत.आपण एखाद्याच्या मृत्यूबद्दल शोक करू शकतो पण मृत्यू' वर आपण प्रेमच केले पाहिजे..!
प्रयत्न केले तर आपण आपल्या स्वतःचा कडेच एका त्रयस्थ पण निरोगी नजरेने पाहू शकतो. थोडेसे अजून प्रयत्न केले तर आपले कर्म आणि त्यापासून मिळणारे फळ या दोन्ही पासून आपण अलिप्त राहू शकतो. तसेच झाले की चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपण निर्विकारपणे पाहू शकतो.आपण निसर्गाशी पूर्ण एकरूप होत नाही. नाहीतर मी खाली ओढ्यात वाहणारी एखादी काटकी असलो काय किंवा वरून त्या काटकीकडे पाहणारा,पाऊस पाडणारा इंद्र असलो काय,काहीच फरक पडत नाही.
'वॉल्डन' हेन्री डेव्हिड थोरो यांच्या पुस्तकातील हा उतारा जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देतो.
हंगामी नदीचा कोपरान् कोपरा
हिंडतात बाया पाणी पाणी म्हणत
कधी रिकाम्या भांड्यासह परततात घरी
तरीही आटलेल्या नदीची खंत न करता
स्वतःच वाहतात अखंडपणे खळाळत
एखादी नदी होऊन
वाळूत चालणाऱ्या बाया
बाया नदी होतात ही कविता भरमसाठ पाण्याचा अस्ताव्यस्त अविचारपणे वापर करणाऱ्या लोकांना जल जीवन है,जल है तो कल है.. या तत्त्वांची गंभीरपणे आठवण करून देणारी आहे.
भूगर्भातील संपत आलेलं पाणी हे तुम्हाला येणाऱ्या दुष्काळाची जाणीव करून देत आहे.माणूस वेळेत सावध नाही झाला तर पाणी पाणी म्हणून आपला अंत निश्चित आहे.हे विसरू नये हे सत्य वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे.
बाई सुपारीच खांड,दोहो बाजूंनी चेंदते
बाई अंतरीचा धागा,मनामनाला सांधते
बाई राबणारे कर,सदा सृजनाचा मळा
कापे सरसर दु:ख,बाई धारधार विळा
बाई ही कविता शेवटी पुरुषाची शाश्वत उध्दारकर्ती स्त्रीच होय.हेच सांगत आहे.
संसाराची पीडा
वेदनेचा हातोडा
असह्य झाल्यावर
बाई जवळ करते नदीला
बाईला पोटात सांभाळून घेतल्यास दुःख
भाळावर गोंदवून घेते नदी ही स्वतःच्या
अन् वाहत राहते अखंड
एक जखम घेऊन
अश्वत्थाम्यासारखी भळभळणारी
कवी सचिन शिंदे या़ंची जखम ही कविता वाचली अन् अश्वत्थामाची भळभळणारी जखम बाईच्या जखमेपेक्षा कमीच वाटली.
बाई ग,एक लक्षात ठेव चालताना रस्त्यालगतच्या दुकानातून खूप साड्या मांडलेल्या दिसतात.त्यांतल्या काही साड्या आवडतातही आपल्याला.पण म्हणून त्या सगळ्या घेत गेलो तर घराचाच बाजार होऊन जाईल! एवढ्या वर्षांत तू जे शिकलीस ते तू सांगितलंस...
आता एवढ्या वर्षांत मी जे शिकले ते तुला सांगते, नीट ऐक आयुष्य हे असंच असतं बये.मनाची एक मागणी पूर्ण केली की दुसरी उगवणारच कुत्र्याच्या छत्रीसारखी कुठेही,कशीही.मन लहान मुलासारखं असतं.त्याला आवडेल ते मागत राहणार,हट्ट करणारच लहान मुलासारखं.कारण त्याला माहीत नसतं आईसक्रीम खाल्ल्यानं पडसं होतं,चॉकलेट खाल्ल्यानं दात किडतात.मनाला आपण समजावायला हवं की,आयुष्यात खूप गोष्टी दिसताक्षणी आवडतात,पण जवळ केल्यावर त्याचे परिणाम वाईट होतात. आणि प्रवाहीपणाचं म्हणशील तर सगळ्या गोष्टी त्या त्या परिघातच बदलतात.म्हणजे बदलायचं म्हणून चंद्र,सूर्य,तारे आकाश सोडून समुद्रात प्रकाशत नाहीत.फक्त जागा बदलत राहतात आकाशातच.बदलायचं म्हणून पृथ्वी उलटी फिरू नाही लागली कधी एवढ्या वर्षांत.फक्त कोन बदलत राहिली.झाडं जमिनीऐवजी आकाशात उगवली नाहीत कधी बदलायचं म्हणून.म्हणे प्रवाही असायला हवं!"असं म्हणत ती निघाली. बाई ग... आपण आपल्यावर वार होतो तीच बाजू जोजवत बसतो कायम.छातीवर वार झाला की तीच जागा दाखवत राहतो आणि पाठ विसरूनच जातो.उजव्या हातावर झाला तर डावा हात विरसतो.डावा डोळा जखमी झाला तर उजवा डोळा विसरतो.तेव्हा प्रत्येक गोष्टीला दुसरीही बाजू असते हे लक्षात ठेव.
आपण सगळेच आपल्याला समजतो तसे नसतो.आपल्या सगळ्यांचंच आतलं रुप वेगळं असतं.एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे गेल्यावरच ते आपल्याला कळतं.मोराची बायको किरण येले.
गावाकडच्या पोरी या कवितेतील खालील ओळी..
माहेराला कवेत घेणाऱ्या
गावाकडच्या हासऱ्या कोवळ्या पोरी
कधी बाया होतात कळतच नाही.
एकदा कोल्हापूरला सचिन शिंदे सर व पांढरा शुभ्र काळोख या काव्यसंग्रहाचे निर्माते कवी संतोष शेळके घरी आले होते.तेव्हा सचिन सर आमच्या सौ.ला माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले होते.विजय गायकवाड म्हणजे पदराला बांधलेला जणू विस्तवच..
नाही मायबाप दारी
ओस उंबरा पडतो
सूनसान घर सारे
कसा माणूस कुढतो
ओल मनाची सुकता
नाते कोसळत जाते
माया दुभंगते वेडी
गाव ढासळत जाते.
गाव ढासळत जाते.ही कविता काय धरायला हवं आणि काय सोडायला हवं याचा फरक स्पष्ट करते.आत्ता चाललेल्या जगामध्ये आपली भूमिका कितपत आहे. याच प्रमाणही ही कविता सांगते.
साधुसंतांनी सांगितलेला विठ्ठल या काव्यसंग्रहामध्ये पान ९३ वर आपली वाट बघतो आहे.
ओल
मृगाचा पहिला पाऊस
पडून गेला की
गळक्या घराचा अंदाज येतो
उन्हाचे कवडसे
छप्पराच्या फटीतून
आत झिरपत राहतात
घरावरची छपरं अन्
अंगावरची कापडं सारखीच
गळकी काय नि फाटकी काय
धापा टाकतं दमलेलं घर
त्याच्याही मनात एक सलते
सल
अन् पावसाळ्यात
भिताडातून घरात शिरते
ओल
ही ओळ प्रत्येकाच्या ओळखीची आहे..खर ना ?
हा काव्यसंग्रह वाचून हातावेगळा केला.आणि चिंतन करीत बसलो….
तुम्ही जहाजांनं प्रवास करताना किनाऱ्यावर जाऊ शकता,तिथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता, शंखशिंपले वेचू शकता किंवा फुले वेचू शकता.पण तुम्हाला जेव्हा जहाजावर परत बोलावलं जात,तेव्हा तुम्हाला गोळा केलेला सगळ्या वस्तू तिथंच टाकून घाईनं परत जावं लागतं,नाहीतर जहाज तुम्हाला सोडून निघून जाईल.एपिक्टेटस
विजय गायकवाड - मॅट्रिक फेल
केवळ अभ्यासापूर्ता अभ्यास करणे हे स्वतःलाच फसविल्यासारखे होय,असं मत व्यक्त करीत समीक्षेची सुरुवात केली आहे.
त्यातूनच शिकणं किती महत्त्वाचं आहे हेही अधोरेखित होतं.दुसरं म्हणजे कमी शब्दात मोठा अर्थ सांगणार्या कविता कशा लिहायच्या,त्याचे प्रकार काय आहेत,याबद्दल सचिन शिंदे या कवींसोबत झालेली चर्चा महत्त्वाची आहे.कारण, काहीही करायचे ठरविले,तर त्याला वाचनाची गोडी आणि सातत्यही आवश्यक आहे.
याबद्दलही केलेला ऊहापोह वाचनाची जोड किती महत्त्वाची आहे,हे यातून ठळक होते.त्यासाठी एक वेळ जेवण नसले तरी चालेल;पण वाचन नसेल तर तुम्ही जगापासून दहा वर्षे मागे जाल,असे समीक्षकाला ठामपणे सांगायचं आहे.
मी अनेक विद्वानांसोबत असतो खूप विषय वाचले आहेत पण यातून जे सत्य समजलं ते म्हणजे मी अज्ञानी आहे,हे वाक्य मात्र गोंधळात टाकणार असले तरी त्याला अर्थ आहे
निरो सम्राटाच्या सल्लागाराने सांगितलेल्या एका तत्त्वज्ञानाचा उल्लेख इथे आवश्यक वाटला.तो म्हणतो की,'ज्ञान तुमचे ऊर्जास्रोत आहे.त्याचबरोबर ते आयुष्यात बदल घडवून आणते. सकारात्मक जीवन घडवतं.' ज्यानिमित्त समीक्षा लिहिली आहे तो विषय आहे 'पातीवरल्या बाया' हा काव्यसंग्रह.हा काव्यसंग्रह सर्वच दृष्टिकोनातून बहारदार आहे.तसेच तो विचार करायला लावणारा आहे.यामध्ये नदी आणि पुराच्या कविता,गुरांच्या आणि दुष्काळाच्या कवितांचा समावेश आहे. त्यामुळे हा कवितासंग्रह निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणार आहे,असे समीक्षकाचे मत आहे. स्त्रीविषयी या कवितासंग्रहात केलेला ऊहापोह तिचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे हे दर्शवितो.
विशेष म्हणजे यामध्ये स्त्रीला जीवन जगताना कशाला महत्त्व दिले पाहिजे,हे अधोरेखित केले आहे.या कवितासंग्रहातून गावाकडच्या हसर्या कोवळ्या पोरी कधी बाया होतात कळत नाही,हे वास्तव दर्शविले आहे.मॅट्रिक फेल विजय गायकवाड यांच्या अभ्यासू आणि त्रयस्थ नजरेतून साकारलेले समीक्षण सत्यतेकडे नेते हे मात्र नक्की.
*** - भरत बुटाले ('लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.
प्रिय साहेब,
कवी मित्र सचिन शिंदे यांच्या 'पातीवरल्या बाया ' या काव्यसंग्रहावर केलेले भाष्य आवडले. पातीवरल्या बाया या कवितासंग्रहातून सचिन सरांनी स्त्री ,नदी, गाव ,शेतकरी आणि शेती यांचे परस्पर संबंध अनंत काळापासून कसे आहेत हे कसदारपणे मांडले आहे.आजरोजी गावगाड्यातील सर्व मूलभूत घटकांचे बदलत गेलेल्या मानवाच्या वृत्तीमुळे झालेली स्थिती सुद्धा सचिन यांनी कवितेच्या माध्यमातून सक्षमपणे वाचकांच्या समोर मांडली आहे. कविता संग्रह वाचताना वाचक शब्दांच्या नदीतून लयदार बोटीत बसून प्रवास करत जातो. प्रवास करताना त्याला नदी ,बाई, शेती, मातीने सहन केलेले दुःख, जीवन जगण्याची चिकाटी, संकटांशी केलेले दोन हात, पुढे पुढे जात राहण्यासाठीची जिद्द अशा महत्त्वपूर्ण किनाऱ्यावरील ठिकाणांना वाचक भेट देत पुढे जात राहतो. तुम्ही सचिन यांची कविता समजून घेतली आहे. समजून घेताना या कवितेला वैश्विक पातळीवरच्या विचारवंतांच्या चिंतनातून पडताळून पाहिल्याचे लेखातून दिसून येते. कवी सचिन यांच्या कवितेला तुम्ही सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन हा गुणवंत माणूस असल्यामुळेच तो कविताही चांगली लिहितो. चांगला माणूस होता आलं की चांगलं लिहिता येतं हे सचिनकडे पाहून वाटत राहतं. त्यांची कविता सर्वांना आवडतेय म्हणून पातीवरल्या बाया घराघरात जाऊन बसलेल्या दिसून येत आहेत. तुमच्या चिंतनामुळे कवितेला अजून साज चढला आहे.
थोडसं तुमच्याविषयी... तुम्ही उत्तम वाचक आहात हे या लेखातून दिसून येते. मला असं वाटते की तुम्ही मॅट्रिक फेल न लिहिता फक्त विजय गायकवाड इतकं लिहिलं तरीही पुरेसं आहे.तुमच्या ,वागण्या - बोलण्यातून, वाचनातून - लिखाणातून तुम्ही खूप पुढचे आहातच. तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरक आहात. हा शेर कुणाचा आहे माहिती नाही पण हा तुमच्यासारख्याकडे पाहूनच लिहिला असावा असे वाटते...
डिग्रियां तो तालीम के खर्चों की रसीदें हैं,
इल्म तो वह है जो किरदार में झलकता है।
प्रिय मित्र सचिन यांच्या पातीवरल्या बाया या कवितासंग्रहाचे खूप कौतुक वाटते.एका गुणवान शिक्षकाला, चांगल्या कवीला आणि माणुसकी जपणाऱ्या माणसाला माझ्याकडून मनःपूर्वक सदिच्छा.
सॉक्रेटिस... माधव गव्हाणे...
प्रिय विजयजी,
तुमच्या लेखणीचा अनुभव घेताना प्रत्येक वेळी एक वेगळीच अनुभूती मिळते." पातीवरल्या बाया " या कवितासंग्रहावर तुम्ही लिहिलेली समीक्षा वाचली आणि नकळतपणे माझं मन त्या शब्दांमध्ये गुंतत गेलं.तुमच्या शब्दशैलीत एक विलक्षण सहजता आहे,जी थेट वाचकाच्या मनाशी संवाद साधते.
तुमच्या लेखणीत केवळ शब्द नसतात,तर त्या शब्दांतून अनुभव,विचार, आणि संवेदना यांचं सुरेख मिश्रण असतं.
तुमच्या या लेखनात ग्रामीण जीवनाचा,विशेषतः स्त्रीजीवनाच्या संघर्षाचा आणि त्यातील बहराच्या क्षणांचा सुंदर आलेख उमटला आहे.स्त्री म्हणजे केवळ एक भूमिका नाही,तर तिच्या अस्तित्वाचा व्यापक पैलू तुमच्या मांडणीत दिसतो.तुम्ही केवळ कवितांचा आस्वाद घेतला नाही,तर त्या कवितांतून उमटणाऱ्या भावनांना, विचारांना,आणि वास्तवाला एका नव्या दृष्टीकोनातून मांडलं आहे.
तुमच्या लेखनाची जादू अशी आहे की,वाचक जणू त्या कवितांच्या भावविश्वात स्वतःला हरवून बसतो. कवितांचा अर्थ शोधताना तुम्ही त्यातील प्रत्येक शब्दाचा संदर्भ समाजजीवनाशी जोडला आहे,हे विशेष कौतुकास्पद आहे.तुमच्या लेखणीतून फक्त समीक्षा होत नाही,तर त्या कवितांचं सजीव चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.
" शाळा सोडली तरी शिक्षण संपत नाही" हे तुमचं म्हणणं केवळ एक विचार नाही,तर जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे,तर आयुष्यातील अनुभव,निरीक्षणं आणि चिंतन हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं,हे तुमच्या लेखणीतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं."
विजयजी,तुमचं लेखन हे केवळ शब्दांचा खेळ नाही,तर ते विचारांना चालना देणारं,अंतर्मुख करणारं,आणि मनाला समृद्ध करणारं आहे.तुमच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे तुम्ही केवळ कवितांचं रसग्रहण केलेलं नाही,तर त्या कवितांच्या मुळाशी जाऊन त्यातील आशय उलगडला आहे.तुमच्या शब्दांनी वाचकाच्या मनात विचारांची नवी पालवी फुटते,त्याला नवा दृष्टिकोन मिळतो,आणि कधी कधी तो स्वतःच्या अनुभवांशी त्या शब्दांना जोडतो. हीच तर तुमच्या लेखणीची ताकद आहे.
तुमच्या पुढील लेखनप्रवासाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!असेच विचारप्रवर्तक लेख आणि समीक्षा लिहीत राहा.तुमच्या शब्दांनी आमच्या विचारविश्वात नवी उमेद निर्माण होत राहो!
आपला मित्र,
विष्णू बाबासाहेब गाडेकर
रायपुर,जि.परभणी
कवी सचिन शिंदे यांच्या 'पातीवरल्या बाया' हा काव्यसंग्रह आमचे मित्र विजय गायकवाड साहेब यांनी वाचला आणि आज मला पहाटे सहाच्या दरम्यान संपर्क साधून या काव्यसंग्रहावर दोन-चार ओळी तुम्ही लिहा अशी विनंती केली.मी लागलीच त्यांना हो म्हणालो.कारण विजय गायकवाड साहेब आमचे केवळ मित्र नसून मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत. 'पातीवरल्या बाया' या काव्यसंग्रहावर विजयजी गायकवाड साहेबांनी जे छोटेखानी लिखाण लिहिलेले ते मी वाचले आणि त्यावरुन मला या काव्यसंग्रहातील ज्या कविता आहेत त्या कवितांची बरीच ओळख झाली बाई म्हणजे पुरुषांपेक्षा अनेक पट ऊर्जा असलेली परंतु नम्र आणि सोशिक बनलेली महिला असं तिचं वर्णन आहे.सोशिक महिला न बोलता,न थकता,न कंटाळता,न थांबता निरंतर काम करत राहणारी ही महिला पाण्यासाठी वणवण भटकणारी महिला बाई पणाचं एक मुर्तीमंत उदाहरण आहे.ही बाई अनेक कष्ट सोसते पण बोलत तर काहीच नाही,याविषयी तक्रार करत नाही.
नम्रपणे,निमूटपणे आपलं कार्य अगदी रेखीवपणे अत्यंत साचेबद्ध पद्धतीने करणारी महिला म्हणजेच बाई.बाई हा शब्द शिक्षिकेला अत्यंत आदराने वापरला जातो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अनेक पट ऊर्जा असते. या ऊर्जेचा वापर जर कौशल्याने बाई करते हे अतिशय कमी शब्दांमध्ये या काव्यसंग्रहात सांगितले आहे. बाईपणाचे सोस,बाईपणाचे कष्ट देखील या काव्यसंग्रहात सांगितले आहे,मांडलेले आहेत हे वाचताना बाई किती व्यस्त असुन तरीही ती संयतपणे सर्व परिस्थिती हाताळते हे समजून येते. पण समजून कोण घेणार? हा प्रश्न आहे. हे बाईपण समजून घ्यायला हवं...
बाईपणाला माझा त्रिवार मानाचा मुजरा. बाईसाहेबांना ग्रेट सॅल्युट.
🙏🏻🍁🌺🌷✍🏻
आपला स्नेहांकित,
श्री.शितल मिराबाई विठ्ठल खाडे,
आदरणीय स्नेही विजय गायकवाड सर
सस्नेह नमस्कार !
पातीवरल्या बाया या कवितासंग्रहाच्या वर्षपूर्ती निमित्त आज आपण आपल्या चिंतनशील विचारशैलीतून प्रदीर्घ आस्वादक समीक्षा केलेली आहे.सदर पातीवरल्या बाया बद्दल नोंदवलेले निरीक्षणात्मक टिपण अत्यंत अभ्यासपूर्ण,वस्तुनिष्ठ आणि आशयाला अनुसरून तर आहेच मात्र आपल्यावर असलेल्या पश्चिमात्य साहित्य लेखकाचा आणि वाचनाचा प्रभाव इथे जाणवत आहे,म्हणून कविता हा प्रांत आपल्यासारख्या वाचनवेड्या माणसाला नव्या जाणीवाची अनुभूती देणारा असला तरी आपण मात्र कवितेच्या गाभ्यापर्यंत पोहोचलेला आहात.हेही तितकेच खरे !
लेखक पुस्तक लिहितो तेव्हा ते अपूर्ण आणि अर्धे असते मात्र वाचक जेव्हा त्या पुस्तकाला वाचतो तेव्हा ते खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाते.या आपल्या वाक्याने मला नेहमीच प्रभावित केलेलं आहे.ज्या भावनेनं लेखकाने आणि कवीने पुस्तक लिहिले आहे,
त्या भावनेनेच जर का वाचकाने ते वाचले तरच ते काळजात उतरते.ही आपली भावना पातीवरल्या बाया बाबत तंतोतंत लागू पडते इतके एकरूप होऊन या कवितासंग्रहावर भाष्य केलेलं आहे.आपल्यासारख्या पश्चिमात्य साहित्यवेड्या माणसाने मराठी कवितेची वाट चालावी आणि तिचे अनेक दुवे समजून घ्यावे हे माझ्यासाठी फार फार आनंदाची गोष्ट आहे.खरं तर तुमच्या तोंडून ऐकलेले पुस्तकाचे नाव आणि त्यांचे लेखक वगैरे माझ्यासाठी नवे असतात.मात्र जो विषय अत्यंत क्लिष्ट आणि किचकट वाटतो त्या विषयाशी तादात्म्य साधून त्याची उकल करण्यात आपल्याला नेहमीच अवर्णनीय आनंद मिळत आलेला आहे.
खरं तर पातीवरल्या बाया या कवितासंग्रहाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्त आपण पुस्तकावर केलेले चिंतन माझ्यासाठी प्रचंड सुखावणारी बाब आहे.आपल्या वाचनाची आणि चिंतनाची व्याप्ती पाहता आपण दिलेले मुसानियास रुफस, निरो,थोरो,एपिक्टेटस इत्यादी तत्वज्ञानी व्यक्तींबरोबर मा.किरण येले आणि मा.मनोज बोरगावकर सरांच्या साहित्याचा जाणीवपूर्वक केलेला उल्लेख हा आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा दृढ पुरावाच म्हणावा लागेल.मी शाळा सोडलेली आहे पण शाळेने मला सोडलेले नाही असे आपण पातीवरल्या बायाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान म्हणाला होतात.शाळा हे शिक्षणाचे औपचारिक माध्यम असते मात्र आपण शाळेबाहेरच बहुतांशी ज्ञान संपादन करत असतो याचे जिवंत उदाहरण आपण आहात.म्हणून आपल्या नावापुढे जरी आपण मॅट्रिक फेल असा नामोल्लेख केला असला तरी पदव्यांच्या ढिगाऱ्याचा आणि मनुष्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा काहीएक संबंध नसतो हे आपण सिद्ध केलेलं आहे.
पुराणामध्ये एखाद्या योध्याकडे असलेले अस्त्र आणि शस्त्र ही त्या योद्याची खरी ओळख समजली जायची.त्यागतच आपण माझ्या मित्रांपैकी अत्यंत निकटचे आहात ही खऱ्या अर्थाने माझी उपलब्धी तर आहेच मात्र ओळखही आहे.
पातीवरल्या बायांना एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद आपणही प्रदीर्घ चिंतनलेख लिहून साजरा केलात.आणि माझाही आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल आपले आभार न मानता कायम ऋणाईत !
आपला
सचिन शिंदे
आदरणीय विजयराव गायकवाड सर....
आपण .......
जीवन जगण्याचं खरं तत्व पुस्तकात व वाचनात लपलेल आहे हे पुरेपूर जाणलेल आहे....
वरील वाचनातून माझ्या मानवी संवेदनाच्या ओलावा असलेल्या मनाला एवढच जाणवलं ...की बाई व नदी या दोन्हीही मानवाच्या खऱ्या अर्थाने जीवनदायी आहेत.... कुटुंबाचा समाजाचं वाईट ते पोटात घ्यायचं आणि कायम दातृत्व करत शेवटी सागर रुपी अनंतात विलीन व्हायचं..... म्हणूनच पुराणात सुद्धा सतीला निर्मितीचे केंद्रबिंदू मानलेल आहे आणि निसर्गाने सुद्धा निर्मितीची जबाबदारी ही पुरुषाला नव्हे तर स्त्रीला दिलेली आहे.... म्हणूनच स्त्री व नदी यांचं कार्य कर्तुत्व अतुलनीय आहे......
डॉ.संजय मोरे ,परभणी
" पातीवरल्या बाया " काव्यसंग्रह जीवनाचा अर्थ सर्वश्रेष्ठपणे उजागर करतो.सचिन शिंदे यांच्या लेखणीतील संवेदनशीलता व विचारशीलता वाचकाला खोलवर विचार करायला लावते.
प्रत्येक कविता एक नवा दृष्टिकोन देणारी आहे.उत्कृष्ट संग्रह! आणि त्यात तुमच्या लेखातून ते समजून घेण्यास खूप सहज आणि सोपा झाला आहे.
पार्थ राजे गाडेकर रायपुर..
वाचक शोधतो अर्थ नवा,
लेखक विणतो शब्दरचना,
दोघांच्या या नात्यामध्ये,
साहित्याची होते साधना.
वाचक आणि लेखक त्यांच्या नात्यातील दृढ संबंध कवी सतीश शिंदे आणि मॅट्रिक फेल विजय गायकवाड यामध्ये दिसून आला.साहित्याचे साधनेत रूपांतर झाले आहे.हे विजयरावांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आले आहे.
गुरु शिष्य नातं आपणास सर्वश्रुत आहे.पण या प्रतिक्रियेमुळे लेखक व वाचक यांचा घनिष्ठ संबंध दिसून आला आणि तो पुनश्च अधोरेखित झाला आहे.
एक लिहितो,एक वाचतो !
दोघांतूनच साहित्य घडते !!
- डॉ. दिपक शेटे .
- महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त 2021
जग वाचणारा माणूस कविता समजून तिची अस्खलीत समीक्षा करतो हे वाचून 'दुध' साखरेविना खूप गोड आहे हे समजलं.. खूपच सुंदर हो साहेब
आदरणीय दादासाहेब ताजणे,सेलू,परभणी
पातीवरल्या बाया
नावातच वास्तव स्पष्ट होतं.
ती राबते हसत
दु:ख झेलते हसत
रडते हसत हसत
हसते हसत हसत
कष्टकरी स्त्रियांचं हे रोजचं जगणं अधोरेखित करणार्या काव्यसंग्रहाचा तुम्ही घेतलेला आढावा केवळ डोळे उघडत नाही तर खरी जाग आणून देतो.स्त्री समजून घ्यावी लागते.वरवर वाचण्यासारखी सोपीही नाही आणि समजून घेतली तर अवघडही नाही..पुरुष असून स्त्रीच्या मनाचा वेध घेणारा हा काव्यसंग्रह कवीच्या हळव्या मनाची आणि भावनांच्या मुक्ततेची साक्ष देतो.तरल,वेचक आणि वेधक शब्दांत स्त्री अस्तित्व मांडण्याची आणि सांगण्याची शैली तुम्हीसुद्धा तुमच्या विचारगर्भ शब्दातून सांगितली आहे.
तुम्ही करुन दिलेला काव्यसंग्रहाचा हा परिचय कवीच्या मनाजवळ आणि मनातल्या भावनांना आवाहन करणारा आहे.
वैयक्तिक व्यापात गुरफटलेल्या माणसाला स्त्रीचा ताप आणि तगमग ठळकपणे जाणवून देणार्या काव्यसंग्रहाचा तुम्ही घेतलेला आढावा ती च्या अस्तित्वाबद्दलची जाणीव करुन देतो.
काव्यसंग्रहासाठी व कवींच्या लेखनकार्यासाठी मनस्वी शुभेच्छा..भास कथेचे लेखक,विष्णु सुतार (व्ही।जी)
आदरणीय विजय गायकवाड सर,सप्रेम नमस्कार.
जीवनाबद्दलच अज्ञान कमी करून थोडस ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करणारा एक सामान्य वाचक .
लिहीण्याचं कारण की,तुम्ही जे कविवर्य सचिन शिंदे सरांचा ' पातीवरल्या बाया ' हया कविता संग्रहावर केलेलं विवेचन वाचलं काही दिवसापूर्वी माझी पुतनी श्रृती गाडेकर हिने या कविता संग्रहा बदल छान प्रतिक्रिया लिहीली होती.आदरणीय गव्हाणे सरांनी तिला ते पुस्तक वाचण्यास दिल होते मी त्याचे केवळ त्यावेळी मुखपृष्ट बघीतले होते.
आज गायकवाड सरांची त्यावरील प्रतिक्रिया वाचली आणि या कविता संग्रहाची नव्यान ओळख झाली आणि वाचण्याची उत्सुकता वाढली आहे.सर अतिशय कमी शब्दात संपुर्ण कवितांचे सार लक्षात आले आणि शिंदे सरांविषयी आणखीनच जाणुन घ्यायची इच्छा झाली.
याविषयी सोशल मीडियावर बऱ्याच बातम्या आणि प्रतिक्रिया वाचल्या खुप छान सरांनी लिहलं आहे.नदी कविता मोबाईल वर मिळाली ती वाचून मला माझ्या लहानपणची मामाच्या गावची नही आठवली त्यातील मनसोक्त डुंबणे आठवली जीवलग मार्गदर्शक गव्हाणे सरां मार्फत गायकवाड सर तुमची ओळख झाली लोखंडाचे सोनं करणारा परिस असतो म्हणतात पण तुम्ही लोखंडाचा परिस करणारे आहात.
मी अगोदर पासुन वाचत होतो.पण तुमच्या मुळे जसा एखादा आहारतज्ञ काय,कसे,आणि किती खावे याचे मार्गदर्शन करतो तसेच सर तुमच्या मुळे मला काय आणि कसे वाचावे ते कळले तुमचे प्रत्येक ब्लॉग मी न चुकता वाचतो आणि त्यातुन मला प्रेय आणि श्रेय यातला फरक कळाला .
प्रत्येक पुस्तक वाचल्या नंतर त्याचे सार मला सर्वात अगोदर तुम्ही मला फोनवर सांगता त्यामुळे मला मी स्वतःला भाग्यवान समजतो.अनेक परकिय लेखकांची तुमच्यामुळे मला ओळख झाली.खरोखर तुमच्या मुळे प्रत्येक घटनेकडे आणि जीवनाकडे तटस्थ बघायचा प्रयत्न करतोय.निरोगी नजर आणखी वाढीस लागली.. तुमच्या मुळे गीतेचा ' कर्मण्यवाधिकारसे ' हा श्लोक लवकर लक्षात आला.
'नदी होतात बाया ' यातुन खरचं पाण्याचा किती वाईट पध्दतीने आपण वापर करतो ते समजते आणि आदरणीय सतिश खाडे सरांचे अग्रोवन मधिल सर्व लेख आठवले..पाण्याच्या थेंबा थेंबाचा हिशोब ठेवणारा जलदुत माहीत झाला.आणि खाडे सरांची प्रत्यक्ष संवाद साधता आला तुमच्या मुळेच.
'असह्य झाल्यावर बाई जवळ करते नदीला.' हे वाचुन जीव कासाविस झाला.साड्यांच्या उदाहरणावरून खरोखरच सर थोड्यात गोडी ही म्हण आठवली .
दुःखाचे कारण तृष्णा हे बुद्धांनी सांगीतले होते.ते आज ह्या उदाहरणामुळे सोप झालं.बदल (परीवर्तन) काय आणि कशाचे हे खरचं छान समजल आणि मन हलकं झालं.
'मृगाचा पहिला पाऊस वाचल्यावर माझं जुनं गळणार घर आठवलं आणि पावसात प्रत्येक गळणाऱ्या थेंबा खाली घरातल भांड आणि त्यावर पडणाऱ्या थेंबाचा आवाज आठवला .
यातील प्रत्येक ओळ खरचं ओळखीची होती परंतु आता सिमेंट च्या घरामुळे त्यावर धुळ बसली होती.ती आठवण तुमच्या मुळे स्वच्छ झाली सर .
जहाजाचे उदाहरण वाचुन वाटले मुठीत मावेल तेवढेच घ्यावे खुप छान लिहताय सर तुम्ही,अनोळखी परंतु आवश्यक जगाची सफर करण्याचं भाग्य मला मिळालं.
अशीच तुमची सोबत राहो ...
हे लिहणे सुद्धा तुमच्या मुळे आणि तुमच्याच शब्दांमुळे .
बाकी मोडकं तोडकं थांबवतो.
लक्ष्मण विठ्ठलराव गाडेकर
मु रायपूर ता.सेलु जि.परभणी
ं